प्रेम... एक यातनामय प्रवास..?
प्रेम... एक यातनामय प्रवास..?
अजय आपल्या नवविवाहित पत्नी सोबत आजोळी आला होता. लग्नानंतर आजोळी जाऊन तेथील ग्रामदैवताची पूजा करणे, ही रीत असल्याकारणाने लग्नाच्या सहाव्या दिवशीच तो मामाच्या गावी पोहोचला. त्याच संपूर्ण बालपण आजोळी गेलेलं... त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीशी, वास्तुशी त्याचा जवळचा संबंध होता. मामा मामी आणि हे दोघे गावातील ग्रामदैवतेची पूजा करून घरी निघाले. अजयला आपल्या घरी परतण्यासाठी पुरेसा वेळ असल्याने ते नाना मामाच्या दुकानाजवळ गप्पा मारत उभे राहिले. याच दरम्यान योगायोगाने त्याची बालपणीची मैत्रीण सुरेखा त्याला समोरून येताना दिसली. तिला पाहताच त्याची नजर एकदम गंभीर झाली. तिनेही अजयकडे पाहिले. या दोघांचा पेहराव पहिल्या नंतर कोणाच्याही अगदी सहज लक्षात येईल की हे नवदांपत्य आहे. तिने एक दीर्घ नजर अजयवर टाकली आणि क्षणार्धात काहीच न बोलता पुढे निघून गेली. या घटनेनंतर काही काळ कसाबसा नाना मामासोबत घालवून अजय पत्नी व मामा मामी समवेत घरी आला. आजोळी सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडला.
घरी परतत असताना त्याची पावलं जड झाली होती. काही काळासाठी का होईना डोक्याऐवजी त्याचे डोळे विचार करू लागले होते. मनात वेगळंच वादळ सुरू झालं होत. मनाची घालमेल इतकी तीव्र होती की तिने हृदयाच्या ठोक्याना परिसीमा पार करायला लावली.मी कोणती चूक तर केली नाही ना ? सुरेखाचं माझ्याकडे पाहणं आणि क्षणार्धात नजर वळवून काहीच न बोलता पुढे निघून जाणं.. काय असेल यामागे ? अशा अनेक प्रश्नांनी अजयला बेजार करायला सुरुवात केली.
पाचवी उत्तीर्ण होऊन अजय मामाच्या गावी आला. त्याच्या गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्याकारणाने दुसरा मार्ग त्याच्याजवळ नव्हता. शाळेत दाखला मिळाला. शिक्षणाची त्याला भयंकर आवड होती. आई वडिलांनी त्याच्याकरिता पाहिलेली स्वप्न त्याला पूर्ण करायची होती. त्यासाठी आई वडील अपार कष्ट करत होते. आता खरे प्रयत्न करण्याची वेळ अजयची होती. याची त्याला जाणीव होती.
गावापासून शाळा थोड्या दूरच्या अंतरावर होती. जाताना नदी ओलांडून जावे लागायचे. खालच्या आळीतून जाणारी ही पाच सहा मुलं होती. काही दिवसातच त्याच्या सोबत शाळेत जाणाऱ्या मुलांमधल्या सुरेखाशी त्याची ओळख होते. ती ही त्याच्याच वर्गात शिकणारी एक हुशार आणि संस्कारी मुलगी होती. दोघेही एकाच वर्गात शिकत असल्याने अभ्यासाविषयी येत जाता त्याच्या गप्पा व्हायच्या. अगदी समंजस मुलं होती... अजय व सुरेखा हे दोघे सोबतच लहानाचे मोठे झाले. पुढे त्याची मैत्री अधिकच घट्ट होत गेली. बालपणीचा सुखद, मनमोहक काळ हा दोघांनी एकत्र घालवला. दोघांच्या घरचे परस्पर संबंध खूप चांगले होते. दोघेही चांगल्या संस्कारी घराण्यात वाढलेली मुलं. त्यांचा तो एकमेकांना हवा हवा असलेला सहवास पुढे प्रेमात कसा बदलला हे दोघांनाही कळाले नाही. दोघांच्याही डोळ्यात ते प्रेम दिसायचे. क्षणभरासाठी मनातल सगळ ओतून टाकावं असदेखील वाटायचं. पण आपण जर असे वागलो तर इतरांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला ? घरची प्रतिष्ठा ,आई वडिलांनी पाहिलेली स्वप्न.... त्यांचं काय..?? यामुळे एकमेकांना विचारण्याचे धाडस मात्र कोणी केले नाही. दोघांच्याही मनात प्रेमाचा दिवा तेवत होता. आज ना उद्या ती वेळ येईल याची सुरेखाला खात्री होती. हा प्रवास असाच पुढे चालू राहिला.
आज जवळजवळ पाच ते सहा वर्षांनी अजय पुन्हा आजोळी आला होता. तो सुद्धा लग्न करून... अचानक समोर दिसलेल्या या दृश्याने सुरेखाच्या मनावर तीव्र जखम केली. तिने भविष्य काळासाठी पाहिलेली स्वप्न आज एका क्षणात उध्वस्त झाली. नियतीने तिला अंतर्मुख बनवले. पण आता मात्र तिच्या हातात काही नव्हते.
काही काळासाठी अजयलाही वाटले. की आपण पुन्हा जाऊन सुरेखाला भेटावे. तिच्याशी सविस्तर बोलावे. पण दुसर्या बाजूला हातात हात होता तो मीनाक्षीचा. आपल्यावर असलेल्या विश्वासाच्या जोरावर, नवीन जीवनाची सुरुवात करण्याच्या विचाराने ती तिचं सर्वस्व बाजूला सारून माझ्यासोबत आली होती. तेही कायमची... आयुष्याच्या जीवन पटलावर प्रेम आणि कर्तव्य या दुहेरी भूमिकेत अजय अडकला होता. हतबल झाला होता.त्याला काय करावे काहीच कळत नव्हते. एकीकडे काळानं त्याला हरवलं... दुसरीकडे मनाने.... !!!!!!!

