Abhishek Dongare

Others

4.0  

Abhishek Dongare

Others

खेड्यातील शांतता..!

खेड्यातील शांतता..!

3 mins
346


        कोकण म्हणजे पृथ्वीवरचा दुसरा स्वर्गच ! वृक्षराजींनी नटलेले उंच उंच डोंगर, त्या डोंगरावर शाल पांघरावी तशी माथ्यावरची हिरवळ... पावसाळ्यात याच हिरवळीवर खळखळणारे, मनमुराद बागडणारे पाण्याचे ओहळ... अगदी गाईच्या पाडसा प्रमाणे हुंदडताना दिसतात. साग , खैर, ऐरंडाची झाडे... झाडावर आसऱ्याला असलेली पाखरे... त्यांचा तो मनसोक्त कलरव... अफाट आनंदाची प्रचिती करून देतो. माळरानावर गुरे चरवणारा गुराखी जणू शेतात उभे केलेल्या बुजगावण्यासारखा वाटतो. सोबत असणारा गुरांचा कळप मान खाली घालून चरताना दिसतो. "क्षणभरासाठी ती गुरे शाळांमध्ये होणाऱ्या परीक्षा देत आहेत आणि गुराखी पर्यवेक्षकाची भूमिका बजावत आहे असा भास होतो." डोंगरात कुठेतरी कपारीत उगम पावलेला, दोन बोटानंएवढी धार असलेला झरा नदीच्या रूपात कधी बदलतो कळतच नाही. याच नदीकाठची शेती, नारळी-पोफळीच्या फुललेल्या सुंदर बागा... जणू काही डोळ्यांना अद्भुत आनंद देणारी दृश्यचं. थोडासं वरती चढून गेलं की सुरू होणारी माणसांची वस्ती... लाल रंगाची कौलारू घरे.. घरासमोरील अंगण... अंगणाला लागून असलेली शेती... बहरलेल्या शेतीवर दाणे वेचण्याकरिता बसलेली किलबिल करणारी पाखरे... गावच्या शांततेत बाधा निर्माण करतात.


तेवढ्यात कंडक्टरने बेल मारली. जाग आली. चेहऱ्यावर हात फिरवला आणि बाजूला असलेली, बसची हुकात अडकवलेली काळीभोर, अपारदर्शक काच दोन्ही हातांनी वरच्या दिशेने सरकवली. नजर उजवीकडे वळवून, डोळ्याच्या कोपऱ्यातून बाहेर पाहिले असता ' ताम्हाणे फाटा ' हा आमच्या गावच्या अगोदरचा बस थांबा होता. कंडक्टरने पुन्हा बेल मारली. तिचा खणखणीत आवाज कानावर पडताच चालकाने गाडीला पुढची दिशा दिली. गाडीत बेलचा आवाज एकदम स्पष्ट ऐकू येत होता. या मागचं कारण म्हणजे गाडीतील प्रवाशांच्या माना कुणाच्या उजवीकडे तर कुणाच्या डावीकडे साधारणतः पंचेचाळीस ते साठ अंशाच्या कोनात झुकल्या होत्या व डोळ्यावरच्या पापण्या मृतावस्थेत खाली पडल्या होत्या. सगळीकडे शांतताच शांतता होती.

ताम्हाणे फाट्यावरून सरळ येणारा रस्ता प्रथम उगवतीकडे व त्यानंतर मावळतीला वळून, एक मोठा घाट चढून, सीमा पार करून नांदळज गावात शिरतो. हाच रस्ता पुढे गावच्या मध्यावर माझ्या उजव्या बाजूला व समोरून माझ्या दिशेने येणाऱ्या कंडक्टरच्या डाव्या बाजूला वळून पुन्हा थोडा सरळ होत, बौद्धवाडीला मागे टाकत विहाराजवळ असलेल्या मोहित्यांच्या घराला वळसा मारून पुढे धनगर वाड्यावर जाऊन विसावतो. याच मार्गावरून येणारी आमची बस बौद्धवाडीकडे न वळता थेट गावच्या स्टॉपवर येऊन थांबली. मी दरवाजा उघडला. खाली उतरलो. आवाज करत ती गाडी पुढे उजगावला जाताना पांढर्‍या शुभ्र धुक्यात दिसेनाशी झाली.


घड्याळात पाहिले तर पहाटेचे पाच वाजून सतरा मिनिटे झाली होती. क्षणभर नजर स्थिर ठेवून मी मान उजवीकडे वळवली, तर रहाट्यांचे किराणा मालाचे दुकान नजरेस पडले. रात्री लावलेला दुकानाबाहेरचा दिवा अजुनही चालु होता. दुकानाच्या छताला छत लागून असलेल्या पेंडस्यांच्या घरात मुलांच्या चाललेल्या भांडणाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. एवढी भयानक शांतता.


माझी पावले पहाटेच्या नीरव शांततेत घरच्या दिशेने निघाली. समोरचं एक चौकोनी आकाराची, एका बाजूने बंदिस्त व उरलेल्या तिनही बाजूंनी उघडी असणारी शेड आहे. जिला देवाची "सहाण" असे म्हणतात. सहाणेच्या समोरच्या अंगणात होळीला मोठी जत्रा भरते. गावाचे सगळे लोक इथे जमतात. सगळं आवार माणसांच्या, लहान मुलांच्या खेळण्यांच्या आवाजांनी दुमदुमून निघतं. पण आज मात्र रामू काका एकटेच इथे झोपलेले दिसले. सहणेच्या बरोबर विरुद्ध बाजूला असणारी, मोडकळीस आलेली ग्रामपंचायतीची इमारत कोणतीही हालचाल करत नव्हती. एकदम स्तब्ध उभी होती. इमारतीच्या डाव्या बाजूला असलेल्या पायवाटेवरून मागच्या दिशेने गेले असता एक कंपाउंड पाहायला मिळते. या कंपाउंड ला लागून चार पायऱ्या आहेत त्या वर चढून गेल्यावर ग्रामदैवत "सुखाई देवीचे" मंदिर आहे. मंदिराला दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत. दक्षिणेच्या बाजूस असलेल्या मुख्य दारावर दोन मोरांचे पुतळे आहेत. त्या मोरांच्या चेहऱ्यावरील चित्रकाराने चितारलेले हावभाव मंदिराच्या शांततामय वातावरणात करुणेची घर घालताना दिसत होते.

‌ वाऱ्याची मंद झुळूक वाहात होती. त्या झुळुकीबरोबर मंदिराच्या कळसाची उंची गाठलेले ओवळीचे झाड देखील मंदगतीने हालचाल करत होते. त्याच्या नाजूक व रेखीव पानांचा सळसळणारा आवाज मनात भीतीची भर घालीत होता. पहाटेच्या गडद काळोखाचा, निरामय, ध्वनी विरहित सुंदर वातावरणाचा अनुभव या निर्जीव वास्तू सजीवांप्रमाणे घेत होत्या. त्या शांततेचा भंग करणाऱ्या माझ्या पावलांचा आवाज त्यांना सहन होणारा नव्हता बहुतेक? पण माझा नाईलाज होता. मला घरी पोहोचायचे होते.


पहाटेचे धुके, धुक्यात जाणवणारी थंडी, हा गारवा घेऊन येणारी हवा आणि दुग्धशर्करा योगाप्रमाणे घराची लागलेली ओढ मनाला विलक्षण आनंद देणारी होती. थोडे अंतर चालल्यावर पुढे दिसणारे माझे घर,त्याची लाल रंगाची कौले, कौलांच्या दिशेने झुकलेले आंब्याचे झाड. त्याची अंगणात पडलेली पाने, त्या पानांवरती डाव्या कुशीवर झोपलेला मोती, बाजूलाच अंगणात असलेले तुळशी वृंदावन.... सर्वच त्या पहाटेच्या दाट धुक्यात विरघळुन गेलं होतं. त्याच्या छटा डोळ्यांसमोर दिसत होत्या. काहीश्या अस्पष्ट होत जाणाऱ्या...


Rate this content
Log in