Abhishek Dongare

Inspirational

4.4  

Abhishek Dongare

Inspirational

साहेब परत कधी येतील..आई !

साहेब परत कधी येतील..आई !

3 mins
488


       अमरापूरला येऊन मला आज नऊ वर्ष झाली. या दिवशीच दुसऱ्यांदा नामकरण करून माझे नाव सुमन ठेवण्यात आले होते. गावातील एका प्रतिष्ठित घराण्याची मी सून बनले ते याच दिवशी... सासरी येण्यापूर्वीचा काळ हा अतिशय गरीबीचा होता. म्हणाल तर घरात अठराविश्व दारिद्र्य होतं.. नेहमी चूल पेटलेली आम्ही कधी पाहिलीच नाही.ती चूल पेटवायला घासलेट असायचे,पण काडेपेटी नसायची तर कधी काडेपेटी असायची पण घासलेटला खिशात, खणात शोधून दमडी देखील सापडायची नाही. अन्नधान्य साठवण्यासाठी वापरायचे रिकाम्या तेलाचे डबे देखील दिवसेंदिवस त्या भरडलेल्या, कोणी दिलेल्या तांदळाची वाट बघत असायचे. त्यांनादेखील ती पीडा सहन होत नसावी बहुतेक..? शेतातल्या बांधावर लावलेल्या तुरी घरी आणून मुसळच्या साथीने भरडून त्यात मिरची आणि मीठ टाकून त्याचं कालवण बनवायचं अशी विकट परिस्थिती! आजही ते दिवस आठवले की डोळ्यात पाणी तरळू लागते.


      घर म्हटलं तर त्याला चारही बाजूंनी बोराटीची झापं नाहीतर नारळीच्या झावळा एकत्र करून बांधलेली एक खोपडी होती. खोपडी बाहेरच वडील लाकडे फोडायचे. पण याच दिवसात देवीची साथ आली आणि वडील स्वर्गवासी झाले. त्यांच्याच मयताच्या बाराव्याला वापरण्यात आलेला तो पांढरा, पातळ पारदर्शक कपडा.. त्याचा सदरा शिवून शाळेत जायला लागले होते. अशा या विषाण्ण करणाऱ्या परिस्थितीत देखील आई डगमगली नाही की तिचा धीर सुटला नाही. नारळातील गोड मगज सुरक्षित ठेवण्यासाठी जसे त्यावर कवच असते त्याप्रमाणे ती आत्ता आमची तारणहार झाली होती.


      मला आठवतंय, साधारणत: तीन-चार महिन्यानंतर आईला गावच्या नाक्यावर असलेल्या हॉटेलात भांडी घासण्याचे काम मिळाले होते ते देखील पाटलांच्या ओळखीने! मी त्यावेळेस दुसरीत होते. माझी लहान बहीण दोन वर्षाची होती. आई तिथे दिवसभर भांडी घासायची आणि संध्याकाळ झाली की मालक एका पुरचुंडीत शिल्लक राहिलेले पदार्थ आईजवळ द्यायचा.कधीकधी तर ते पदार्थ गिर्‍हाईकाने अर्धवट खाऊन ताटात शिल्लक राहिलेले सुद्धा असायचे. पोटाची भूक भागवण्याएवढे नसले तरी पोटात पडलेली आज त्याने शांत व्हायची. 


      याच दिवसात गावाला भेट देण्याकरिता अधिकारी येणार होते. तिच्यासाठी ते साहेब होते. गावात एकमेव असलेल्या या हॉटेलमध्ये त्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.परप्रांतीय असल्या कारणाने त्यांच्या जेवणाकरिता मोहरीची आमटी व रोटीचा बेत करण्याचे ठरले होते. पण पंचायत ही होती की, हा पदार्थ बनवायचे तर दूरच... पण नावदेखील कोणाला माहीत नव्हते. हॉटेलात चाललेली ही चर्चा स्वयंपाक खोलीच्या बाहेर भांडी घासणार्‍या आईच्या कानावर पडली. बऱ्याच वेळानंतर ती हा पदार्थ बनवणार असे ठरले. तिला हा पदार्थ बनवण्याचे माहीत असण्याचे कारण म्हणजे, गावातल्या शाळेत हिंदी हा विषय शिकवणारे शिक्षक उत्तर भारतीय होते. त्यांच्या घरी आईने भांडी घासायचे काम केले होते.


      ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून आम्हाला खाणं-पिणं तयार करून आई कामावर निघून गेली. तिची ती उशीर न होण्याकरिताची लगबग, तिच्या शरीराची वेगाने होणारी हालचाल आजही डोळ्यासमोर तशीच जिवंत आहे. आईने तो पदार्थ बनवला. दुपारी जेवणाकरिता आलेल्या साहेबांनी त्याचा आस्वाद घेतला. त्यांना तो पदार्थ भयंकर आवडला. खुश होऊन त्यांनी हॉटेलच्या मालकाचे आणि स्वयंपाक घरातील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. पदार्थ बनवणारी माझी आई मात्र यातून वगळली गेली. साहेबांनी केलेली स्तुती ऐकून मालक खूप खूश झाला. संध्याकाळी घरी यायला निघणाऱ्या माझ्या आईला हाक मारून, काही पैसे व खाण्यासाठीचे भरपूर पदार्थ एका टोपलीत भरून आग्रह करून दिले. ते घेऊन भरधाव वेगाने पडणारी तिची ती पावलं काळालादेखील मागे टाकणारी होती. विरोध करणारा कातरवेळीचा मंद वारादेखील तिला शरण आला होता. दाट पसरत चाललेल्या अंधाराची तिला पर्वा नव्हती. 


      दाराची कडी वाजली. मी दार उघडले. आईच्या ‍चेहऱ्यावर स्मितहास्याच्या छटा उमटल्या होत्या. त्यांना विरून न जाऊ देता पायावर पाणी घेऊन तिनं ती टोपली उघडली. आणि त्यातला एकेक पदार्थ ती आम्हाला देऊ लागली. मला आणि शेवंतीला ! अन्नाच्या कमतरतेमुळे आमच्यासोबत कधीही न जेवणारी आई आज आम्ही पाहत होतो. तिने साहेबांसाठी बनवलेला तो पदार्थ जो खाऊन खूश होऊन मालकाचे केलेले कौतुक आणि यामुळे मालकाने देऊ केलेले हे पदार्थ आमची भूक शांत करीत होते. ही घटना आईच्या मुखातून आम्ही ऐकत होतो. ती ऐकत असताना शेवंतीच्या कमकुवत असलेल्या शरीरावर, सावळ्या मुखड्यावर असलेल्या काळ्याभोर पाणीदार डोळ्यांमध्ये आज वेगळच समाधान दिसत होतं. आईचं बोलणं संपताच तिच्या बोबड्या बोलत ती म्हणाली, साहेब परत कधी येतील..... आई ! 


      ते शब्द आजदेखील अंगावर विलक्षण शहारे आणतात. त्या परिस्थितीची आठवण करून देतात. आईच्या हृदयातील करुणामय ओलाव्याची जाणीव करून देतात. पोटासाठी केलेल्या धडपडीचा प्रवास सचित्र उभा करतात. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational