STORYMIRROR

Anil Rathod

Inspirational

4  

Anil Rathod

Inspirational

प्रेम आणि वास्तव..!!

प्रेम आणि वास्तव..!!

3 mins
314

गेली दोन दिवसापासून ती राघवला बोलत नव्हती. यामुळे त्रस्त असलेल्या राघवला काय करावे, कुणाला सांगावे काहीच कळत नव्हतं. डोक्यात विचारांचा म्हणण्यापेक्षा कुविचारांचा गोंधळ जरा जास्तच चालला होता, शेवटी सहनशीलतेबाहेर गेल्याने,न राहवून त्याने हातावर ब्लेड ठेवला अन्.....


जिंदगी का हर लम्हा तेरे साथ जिना चाहता हूं...

तेरी हर एक अदा पे मै मरना चाहता हूं...!


तू बस साथ दें ऐ-मेरे-हमसफर

तुमपे ही मै कुर्बान होना चाहता हूं...!!


 राघव (नाव काल्पनिक आहे )तसा आज एका उच्च पदावर कार्यरत आहे.

"शानदार चेअरवर ac रूममध्ये बसलेल्या राघवला सर्व भूतकाळ आठवत होता. ती घटना आठवताना तो विचार करत होता. ती घटना त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी, एक नवे वळण देणारी घडली होती.तो ज्या मुलीवर प्रेम करत होता तिच्याशी दोन वर्षाआधी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर कधी प्रेमात झाले त्यांना कळालेच नाही. तिच्या प्रेमात तो इतका आकंठ बुडालेला होता की, स्वतःची विवेकबुद्धी पूर्णपणे गमावून बसला. रोज तिच्याशी बोलणं व्हायचं, अगदी तासन् तास गप्पा चालायच्या, वेळ कसा निघायचा त्याला कळतच नव्हते. असेच दिवसामागून दिवसाही जाऊ लागले, आता हे सर्व नित्याचेच झाले होते.

  तसं पाहता राघव व्यवसायाने एक विध्यार्थी असल्याने काहीच कामं करीत नव्हतं. आर्थिकदृष्टीने आईवडिलांवर अवलंबून.जन्मदाते देखील त्याला काहीच कमी पडू देत नसत.घरची परिस्थिती जेमतेम असली तरी याची जाणीव त्याला कधीच होऊ दिली नाही. जे मागेल ते वेळेवर मिळत होतं.

परंतु राघव मात्र वास्तवाकडे, त्याच्या करियरकडे आणि आईवडिलांच्या स्वप्नाकडे साफ दुर्लक्ष करीत होता. त्याला तिच्याशिवाय काहीच दिसत नव्हतं. एक दिवस तिच्याशी बोलता - बोलता एका गोष्टीवरून दोघात वाद निर्माण झाला, त्यामुळे ती गेल्या दोन दिवसापासून बोलत नव्हती. सारे काही करून भागले पण काही फरक नाही. शेवटी कसलाही विचार न करता अगदी टोकाचं पाऊल उचललं आणि ब्लेडनें स्वतःच्या हाताची नस कापून घेतली.

  रक्ताने माखलेला हात अन् खाली पडलेल्या राघवला बाबांनी उचलून हॉस्पिटलला नेले. नस जास्त कापल्याने खूप रक्त वाहून गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोन दिवसानंतर तो शुद्धीवर आला.तेव्हा त्याच्यासोबत आईबाबा होते, मित्रही भेटायला आले, पण ती नाही..... यावेळी आईबाबांनी त्याला सावरलं आणि मानसिक आधार दिला.


 बाबा जवळ आले अन् राघवचा हात आपल्या हातात घेत बोलू लागले. " बाळा, आयुष्य जगताना डोळसपणे जगावं. आंधळेपणाने जगण्यात आनंद मिळत असला,तरी त्याला भविष्य नसतं रे, असे आयुष्य भयाण काळोख आणि विनाशा-शिवाय काहीच देऊ शकत नाही." अगदी प्रेमाने बाबा समजावत होते. "माणसाने प्रेम करावं, प्रेमाविरुद्ध जन्मदाते कधीच नसतात, फक्त त्या प्रेमाला उज्ज्वल भविष्य आपल्याला देता आलं पाहिजे, यासाठी आधी मेहनत करून स्वतःचे अनिश्चित भविष्यकाळ स्थिर करावं लागतं. यां जगात माणसं ओळखता येणं खूप महत्वाचे, त्यातही आपली अन् परकी यातील भेद डोळसपणे अनुभवणं खूप गरजेचे."


बाबा पुढे बोलत राहिले अन् राघव शांतपणे ते ऐकत होता. "एखाद्या व्यक्तीला आपण पूर्णपणे कधीच ओळखू शकत नाही. बाळा, लहानपणापासून सोबत राहून जर आपण आपल्या आईबाबांना नीट समजू शकत नाही, तिथे इतरांना पूर्णपणे ओळखतो, हा दावा करणे चुकीचेच. विश्वास ठेवणे तर अगदी चूकच."

बाबाच्या या वरील एका वाक्याने राघव पूर्णतः शुद्धीवर आला.त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला अन् त्याचे जिवन पालटले. राघवने आपले आयुष्य नव्याने घडवले आणि अगदी कठोर परिश्रम करून आज तो एका उच्च पदावर आरुढ आहे.


 या सर्व घटनेतून त्याला एक गोष्ट मात्र नक्कीच कळाली नि आज तो इतरांना सांगत असतो की, प्रेम करताना एकमेकांना समजून घेणे महत्वाचे आहे, प्रेम ही फक्त एक भावना, आकर्षण, ब्रेकअप आणि सुसाईड इथपर्यंतच मर्यादित असत नाही. ते करत असताना काही बाबी अगदी स्पष्ट असायला पाहिजे. तसेच दोघांना त्याची सारखीच जाणीव असावी. आपण शेवटपर्यंत सोबत करू की नाही, हे शक्य असो वा नसो, पण यांची जाणीव मात्र नक्कीच ठेवावी.


आपल्यासाठी तो किंवा ती खूप महत्वाची असेल पण तिच्यासाठी आपलं महत्वदेखील तितकेच असायला हवे. नाहीतर आयुष्याचे वाटोळे व्हायला वेळ लागत नाही,पण त्यातून सावरताना मात्र खूप मोठी किंमत मोजावी लागते. यादरम्यान आपली आणि आपल्या स्नेही जणांच्या मनाची घालमेळ होते ती वेगळीच, नाही का?..

यावरून आपणास एव्हढेच सांगायचे आहे, की प्रेम असो वा करियर वा इतर नाते-संबंध निभावताना आपल्या विवेकबुद्धीने विचार करूनच निर्णय घ्यावा. आपल्या आयुष्यात येणारे प्रसंग, घटना ह्या काही काळ मेघासारखे दाटून आपल्या बुद्धीला व्यापून टाकत असले, तरी ते कायम राहत नसतात. त्यातून मार्ग काढीत पुढे जायचं असतं. आपल्या एका वाईट निर्णयामुळे आपण खूप काही गमावून बसतो, ज्याची भरपाई लवकर होत नाही. आपल्यामागे आपली कुणीतरी आहे, यांचा विचार नक्कीच करावा.कोणत्यावेळी,कोणत्या बाबीला, किती महत्व द्यावे, हे कळाले तर जीवनाचे सार समजले, असं म्हणता येईल. कारण आयुष्य हे अनमोल आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational