Sanjeev Bhide

Horror Thriller

4.0  

Sanjeev Bhide

Horror Thriller

प्रदक्षिणा

प्रदक्षिणा

11 mins
24.4K


इंजिनिअरिंगच्या परीक्षा नुकत्याच संपलेल्या होत्या. या वेळेला मी माझ्या आई-बाबांना सांगून ठेवलेलं होतं की परीक्षा संपल्यावर मला इंदूरला जायचं आहे. इंदूरला माझी एक मावशी राहत असे. मावशी, यजमान व दोन मुलं म्हणजे माझे मावसभाऊ असं ते छान कुटुंब होतं. इंदूरला एका कॉलनीमध्ये त्यांचा बंगला होता. "शुभमंगल कॉलनी." पूर्वीपेक्षा आता इंदूर शहर खूपच बदललेलं होतं. मोठमोठे रस्ते मोठ्या इमारती, वाढलेल्या car, bikes, शहर झपाट्याने वाढत चाललेलं होतं. 

इंदूर मला फार आवडत असे, त्यामुळे यावेळेस इंदूरला जायचं असं मी माझ्या आई-बाबांना परीक्षेच्या आधीपासूनच तगादा लावून वचन घेतले. मावशीला मी फोन केला. तिला खूपच आनंद झाला होता. ती म्हणाली, "अथर्व, कधी येतोयस आम्ही सगळेजण वाट बघतोय."


"मी तुला खरं तर फोनच करणार होते. यावेळेस ट्रेकिंग, किल्ले इ. बघायला न जाता सरळ माझ्याकडे ये आणि घरात राहा बाबा. कामाच्या गडबडीत विसरले मी तुला फोन करायला," एवढं बोलून मावशीने फोन ठेऊन दिला. 


गाड्यांना बर्‍यापैकी गर्दी होती. इंदूरला जायचं प्लॅनिंग आधीच केलेलं असल्यामुळे मी अवंतिका एक्सप्रेस रिझर्वेशन १ महिना आधीच करून ठेवलेलं होतं. इंदूर मला खूप आवडत असे. पानिपतची लढाई, होळकरांचा पाडाव, नजीब खान, मल्हाराव होळकर, अहिल्याबाई. इंदूरमध्ये असलेले विविध राजवाडे, किल्ले हे जरी मी अनेक वेळा बघितले असले तरी जेव्हा-केव्हा मी इंदूरला गेलो असेल तेव्हा तेव्हा माझी एखादी चक्कर तिथे निश्चित असे. ऐतिहासिक शहर आणि इतिहास हा माझा अतिशय आवडीचा विषय.


इंदोर स्ट्रीटफूडसाठी फारच प्रसिद्ध आहे. पोहा जिलेबी, दही वडा, खट्टा समोसा, मावा बट्टी (म्हणजे आपल्याकडचा गुलाबजाम). इंदोरमधील नमकीन शेव, आलू भुजिया तर खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळे ज्यांना स्ट्रीट फूड खाण्याचा नाद आहे, मित्र-मैत्रिणींबरोबर टाईमपास करत एन्जॉय करतो. एखाद-दुसरा पिक्चर बघत ज्याला सुट्टी एन्जॉय करायची आहे, त्यांच्याकरता इंदूरसारखं शहर नाही.


बांद्रा स्टेशनहुन अवंतिका पकडली, दुसऱ्या दिवशी इंदूरला पोहोचलो. इंदूरला माझे मित्रही बरेच असल्यामुळे ट्रेनमध्येच व्हाॅट्सअप, फेसबुक, ट्विटर सगळे सोशल मीडिया वापरून पुढच्या टाइमपासचं प्लानिंग झालेले होते. शुभमंगल कॉलनीत जेव्हा मी माझ्या मावशीच्या घरासमोर येऊन उभा राहिलो, तेव्हा मला हसू आलं. मावशी दरवाजातच उभी होती.


"अथर्व अरे किती मोठा झालास... ये..." मी मावशीच्या पायांना हात लावून नमस्कार केला. आत आलो. मावशीची मुलं तशी लहानच होती. ती मला येऊन बिलगली. सगळं आवरुन झाल्यावर बडा गणपती मंदिरामध्ये जाऊन गजाननाचं दर्शन घ्यायचं हा माझा नेहमीचा परिपाठ. १८७५ मधे बांधलेले हे मंदिर, २५ फूटी देखणी मूर्ती. तिथे जरा रेखीव मूर्ती डोळ्यात साठवून घरी आल्यावर मावशीच्या हातचे गरम गरम पोहे खाल्ले. अर्थात हा माझा परिपाठ. बराच वेळ गप्पा झाल्या. पण मावशीचा चेहरा खूप थकलेला दिसत होता. तिच्या चेहऱ्यावरती कसली तरी चिंता दिसत होती. 


मामा पण जरा गंभीरच दिसत होते. मुलांचा किलबिलाट चालू होता. मी त्यांना म्हटलं, "एक-दीड तासाने आपण बाहेर जाऊ." पोरं खुश झाली, "तोपर्यंत तुम्ही जरा वेळ गार्डनमध्ये खेळा..." मी. मावशीकडे मी बघितलं, "मावशी तुला एक विचारू का, तुझी तब्येत बरी नाहीये का, नेहमीसारखी तू फ्रेश दिसत नाहीस."


मावशी म्हणाली, "तसं काही नाही रे तुला उगाच वाटतं असं." 


"मावशी तू खोटं बोलू शकत नाहीस, आजपर्यंत ते तुला जमलं नाही, काय झालं माझ्याकडून काही मदत करणे शक्य आहे का..."


मावशीने माझ्याशी बोलायला सुरुवात केली, "अरे आपली ही कॉलनी आहे ना या ठिकाणी आता जो तो आपापल्या मर्जीप्रमाणे बांधकाम करू शकतो." 


मी मावशीला म्हटलं, "अगं मग चांगली गोष्ट आहे, या जमिनीला प्रचंड भाव असेल, मोठे टॉवर उभे राहतील, फायदाच होईल...!"


मावशी म्हणाली, "अथर्व तू म्हणतोस ते खरं आहे पण आमच्या शेजारी राहणारे जे गृहस्थ आहेत ते हा बंगला मला विकत द्या म्हणून आमच्या मागे लागलेत. बंगल्याच्या दहापट रक्कम मोजायला तयार आहेत. येथे राहणाऱ्या सगळ्यांनी कोणा कोणा बिल्डरशी कॉन्टॅक्ट केलेलं आहे. आम्हीपण ऑलरेडी एका बिल्डरशी डिल केलंय, पण हे शेजारचे जोशी आमच्या मागे लागलेले आहेत की हा बंगला तुम्ही मला देऊन टाका. अर्थात आम्ही त्याला नकार दिला. जोशींच्या दोन तीन चकरा झाल्या, त्यांचा बिल्डर इथे दोन तीन वेळा येऊन गेला. त्याने आमच्या बिल्डरपेक्षा जास्त पैशाची ऑफर दिली. पण त्याचं असं म्हणणं आहे की या कन्स्ट्रक्शनमध्ये आम्ही राहायचं नाही. तो आम्हाला दुसरीकडे कुठेतरी जागा देईल, अर्थात आम्हाला काही ही कॉलनी सोडून जायचे नाही, त्यामुळे त्याला आम्ही नाही सांगितलं. एके दिवशी झाडांना पाणी घालत असता, जोशींचा बंगला आमच्या बाजूला आहे, जोशी स्वभावाने चांगले आहेत पण त्यांची बायको जरा विचित्रच आहे ती म्हणत होती, अहो, तुम्ही काळजी नका करू, तीन महिन्याच्या आत हे घर सोडून जातात की नाही ते तुम्ही आता डोळ्याने बघालच!!!! म्हणून चिंता वाटते..."


मी मावशीला म्हणालो, "तू काही काळजी नको करूस अगं माझे बाबा D.I.G. आहेत. हवं तर त्यांना आता बोलावून घेऊ का..."


तेव्हा मावशी म्हणाली की, "नको, मी सांगते तुला."


दुपारी मुलांना मी बागेमध्ये घेऊन गेलो. संध्याकाळी मावशीने माझ्याकरता मला आवडते म्हणून साबुदाण्याची खिचडी केलेली होती. रात्री कसल्या तरी आवाजाने मला जाग आली. मी उठून बसलो. कोणाच्यातरी पावलांचा आवाज संथगतीने जवळ येत होता. खिडक्यांचे पडदे ओढलेले होते. मी पडदा बाजूला करून बघितला बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये एक काळाकुट्ट ब्राह्मण त्याच्या अंगावर फक्त धोतर व गळ्यात जानवं होतं, डोळ्यांमध्ये पिवळसर झाक... गेटमधून आत आला आणि बंगल्याचा दरवाजा वाजवला, बेल असताना दरवाजा वाजवणाऱ्या ब्राह्मणाविषयी मला जरा नवलच वाटलं. मी उठलो. बाहेरच्या खोलीतला दिवा लावला. आणि दार उघडायच्या आतच मावशी विजेच्या वेगाने तिच्या खोलीतून बाहेर आली.

 

"अथर्व अजिबात दार उघडू नकोस..." इतकं बोलून काही झालंच नाही अशा थाटात ती तिच्या खोलीत निघून गेली. मी कोर्टवर येऊन बसलो तीनदा दार वाजवून झालं असेल. नंतर येत होता तो पावलांचा आवाज. ब्राह्मण संथपणे घराला प्रदक्षिणा घालत होता. त्यादेखील नेहमी आपण घालतो तशा नाही, उलट्या प्रदक्षिणा. पावलांचा आवाज जवळ येऊन लांब जात होता. खिडकीतून बघण्याची परत माझी हिंमत झाली नाही. डोळे मिटून डोक्यावरती चादर घेऊन पडून राहिलो. आतून खूप भीती पण वाटत होती. जरा वेळाने तो आवाज नाहीसा झाला. 


पाणी प्यायचं निमित्त करून मी उठलो. घड्याळात बघितलं. त्यावेळेला पहाटेचे तीन वाजले होते. केव्हा तरी मला झोप लागली. सकाळी डायनिंग टेबलवरती ब्रेकफास्ट करताना मी मावशीला विचारलं, "मावशी...! हा काय प्रकार आहे..?..हा कोण माणूस..? मामांनाही माहिती आहे का सगळं..?


मावशीने माझ्याकडे बघितलं आणि ती म्हणाली, "माहित आहे. रात्री बारा ते तीन गेले कित्येक दिवस एखादा महिना झाला असेल हा मनुष्य गेट उघडून आत येतो दरवाजा वाजवतो. दार उघडलं नाही म्हणून घरावरती प्रदक्षिणा घालत राहतो आणि नंतर तीन वाजता नाहीसा होतो. बंगल्याच्या बाहेर आम्ही सीसीटीव्ही बसवलेत कॉलनीला वॉचमन होता. त्यालाही काही दिवस ठेवलं होतं पण आश्चर्य म्हणजे त्याला दिसत नाही आणि तो सीसीटीव्ही फुटेजमध्येपण नाही." मावशीच्या चिंतेचे कारण आत्ता मला समजलं होतं.


मी तिला म्हणालो, "तू काळजी नको करूस आपण यातून काहीतरी मार्ग काढू..."


मावशी व्यथितपणे म्हणाली, "काय मार्ग काढणार? हा प्रकार सुरू झाल्यावर तीन मोजक्याच लोकांना ही गोष्ट दिसते, बाकीच्यांचा विश्वास बसणं शक्यच नव्हतं."


"विभूती-अंगारे..."


"पोथ्या पारायणेसुद्धा झाली... अनुष्ठानाला ब्राह्मण बसवून झाले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पुढे काय होणार हे माहित नाही." 


तिच्या बोलण्याचं मला फार वाईट वाटलं. आई सारखं माझ्या मावशीवर माझं खूप प्रेम होतं. तिलादेखील माझ्याविषयी खूप माया होती. पुढच्या दोन-तीन दिवसात मलाही दरवाजा वाजणे, पायांचा आवाज येणे इत्यादी गोष्टींची सवय झाली होती. एका गोष्टीचं मात्र मला राहून राहून विशेष वाटत होतं की ज्या काही मोजक्या लोकांना मावशीने सांगितलं होतं ते 

एक-दोन रात्री मुक्कामी येऊन गेले होते. पण त्यांना तो ब्राह्मण दिसला नव्हता ना पायाचे आवाज!


मावशी त्यांना खिडकीचा पडदा किंचित बाजूला करून दाखवतसुद्धा होती, "तिथे पाहा ब्राह्मण येतो आहे... आता तो दार वाजवेल..."


पण त्यांना कोणी येताना दिसलं नाही, दरवाजाही वाजला नाही, कोणाची पावलंही ऐकू आलं नाही. मात्र मावशीला तिच्या यजमानांना हे दृश्य रोज बघायला मिळतंय आणि मलाही मिळालं होतं. म्हणजे हा भास नव्हता हे काहीतरी वेगळंच होतं. भीतीदायक अंगावर शहारे आणणारे होतं.


"मावशी तुला एक विचारू... "शेजारी जोशी राहतात त्यांच्या बायकोविषयी तुझं काय मत आहे... कारण बोलता-बोलता तू म्हणाली होतीस ना की तीन महिन्यात हे घर सोडून गेले नाही तर पाहाच."

 

तेव्हा मावशी म्हणाली, "या बाईचा कॉलनीत पूर्वीपासूनच खूप धाक होता. भांडण-तंटे झाले की ती नेहमी म्हणत असे,

लक्षात ठेवा मी कोकणातील बाई आहे, महागात पडेल. त्यामुळे त्या कुटुंबाकडे कोणी फारसं जात नव्हतं. आम्ही फारसे संबंध 

कधी ठेवले नाहीत."


आठ दिवस होऊन गेले होते. माझ्या मोबाईलमध्ये गेटमधून आत येणाऱ्या, प्रदक्षिणा घालणाऱ्या ब्राह्मणाचे व्हिडिओ 

रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला होता पण अंधाराव्यतिरिक्त त्या व्हिडीओमध्ये काही आलेलं नव्हतं.


मी परत मुंबईस निघालो. घरी आलो. गोष्ट कोणाला सांगण्यात काही अर्थ नव्हता. कारण याच्यावरती कोणीही विश्वास ठेवला 

नसता. मी सरळ अविनाशजींचं घर गाठलं.


"अथर्व ये, खूप दिवसांनी आलास, बस कशी झाली परीक्षा? पेपर वगैरे चांगले गेले ना?" 


अविनाशजींनी आपुलकीने चौकशी केली. काकूने गरम-गरम काॅफी आणली, ती पीत इंदूर येथे घडलेली सर्व घटना मी त्यांना सविस्तर पणे सांगितली. अविनाश गंभीर झालेले होते ते म्हणाले, "अथर्व हा कोणीतरी फारच घाण प्रयोग केलेला दिसतो आहे. तुला परत इंदूरला जाणं शक्य आहे का?"


मी, "हो..." म्हणालो. त्यांनी मला बसण्यास सांगितले ते स्वतः सगळं आवरुन स्वामी महाराजांच्या फोटो समोर येऊन 

डोळे मिटून बसले. त्यांच्या हातामध्ये दोन तीन कदाचित जास्त तांब्याचे ताईत होते. कागदावरती त्यांनी काही रेखाकृती काढून त्यात अक्षरं लिहिली होती. तोंडाने काहीतरी म्हणत होते. नंतर थोडीशी विभूती व कागद तांब्याच्या ताईतात भरून ते ताईत त्यांनी माझ्या हातात दिले. आणि म्हणाले, "शक्य तितक्या लवकर इंदूरला जा, मावशी व मामांच्या दंडाला हे ताईत बांध. लहान मुलांच्या गळ्यामध्ये घाल आणि एक दरवाजामध्ये दिसेल असे टांगून ठेव..! आणि हा इथे माझ्यासमोर तुझ्या गळ्यात घाल. आणि निघ आता!. याला आता पहिली प्रायोरिटी."


मी घरी आलो. घरचे मी परत इंदूरला चाललो म्हणून जाम वैतागले होते. पण मी माझं खूप काहीतरी महत्त्वाचं प्रोजेक्टचं काम 

आहे असं काहीतरी कारण सांगून इंदूरमध्ये पोहोचलो.


"परत आला... तुला जाऊन दोन तीनच दिवस झाले... काय झालं?" असं मावशीने मला विचारले. तिला मी सगळी हकीकत सांगितली. ताईत दंडाला बांधायला लावले. लहान मुलांच्या गळ्यात घातले. त्यांना ताईतचं अप्रूप.


"अथर्वदादा यामुळे काय होतं..." 


म्हटलं, "काही नाही... आम्हाला तुम्हाला आकाशात उडता येईल..." पोरं खुश.

 

काही दिवसांनी मला निघावे लागेल कारण आमचं कॉलेज सुरू झालेलं आहे, असं म्हणून मी त्यांचा निरोप घेतला. 

मावशीला रोज फोन कर म्हणून सांगायला मी विसरलो नाही. दुसऱ्या दिवशी मावशीचा फोन आला होता. दार वाजलं नाही व त्या ब्राह्मणाने घराभोवती प्रदक्षिणा घातल्या नाहीत, शेजारी जोशी राहतात त्यांच्या घरातली बाई मोठमोठ्याने बडबड करताना मात्र मी ऐकले, "स्वतःला समजतात काय इतक्या सहजासहजी सोडणार नाही....!"


मावशीला म्हटलं, "तू अजिबात काळजी करू नकोस."


कॉलेज आटपून मी अविनाशना भेटायला गेलो होतो. त्यांना सर्व प्रकार सांगितला. ते म्हणाले, "तू अजिबात चिंता करू नकोस. या जगामध्ये स्वामी महाराजांपेक्षा श्रेष्ठ काहीही नाही, कोकणातील मंत्रविद्या फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे आणि तेथील मंत्रविद्या अतिशय सामर्थ्यवानसुद्धा आहे. पण शेवटी सर्व देव, देवता, दैवत यांच्यावर स्वामी महाराजांची सत्ता असल्यामुळे त्याने कितीही प्रयोग केले तरी तसा काही उपयोग होणार नाही. तीन महिन्याच्या कालावधीसाठी त्याने ज्याला भेटीला पाठवलेले आहे, वेठीस धरलेले आहे त्याची व्यवस्था मात्र आपल्याला करावी लागेल..!"


कामाच्या व्यापात कॉलेजमध्ये मी परत अडकून पडलो होतो आणि एक दिवशी अचानक मावशीचा फोन आला आणि माझ्या छातीत धस्स झाला पण ती म्हणाली, "आता अजून बघ काही त्रास झालेला नाही पण यांना हल्ली बरं नसतं. चित्रविचित्र स्वप्न पडतात, झोपेतून दचकून उठतात. सारखं कोणीतरी पाळत ठेवून आहे असं वाटतं."


जसा वेळ मिळाला तसे मी अविनाशजींकडे गेलो. तेव्हा ते म्हणाले की, "आता हा प्रकार संपवण्याची वेळ जवळ आली आहे. या खेपेस मी स्वतः तुझ्याबरोबर इंदूरला येईन. माझी ओळख करून देताना मी तुमचे सर आहे अशी ओळख करून देऊ. बाकी काही बोलू नकोस. पुढचं मी बघून घेईन..."


"परीक्षा जवळ आलेली आहे. सबमिशन मुळे दोन-तीन दिवस हॉस्टेल वरती थांबणारे..." असं कारण सांगून अवंतिका पकडली. सर माझ्याबरोबर असल्यामुळे मी निश्चिंत होतो. त्यांचं वाचन अफाट होतं. सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्यामुळे टेक्नॉलॉजी इतिहास गॅजेट्स वगैरेवरती गप्पा मारता मारता आमचा प्रवास कधी संपला हे कळलंच नाही. मावशीकडे आलो. दार वाजवलं. मावशीने दरवाजा उघडला. तिने जरा प्रश्नार्थक नजरेने सरांकडे बघितलं. मी म्हणालो, "मावशी हे आमचे कॉलेजचे सर आहेत. पर्सनल कामाकरता इंदूरला आले आहेत... ते म्हणाले, एवी तेवी तू जातोच आहेस, मी पण येतो तुझ्यासोबत. मी बाहेर रहाण्याची व्यवस्था केली आहे."


तेव्हा मावशी म्हणाली, "अथर्व हे काय... सर इथे राहिले तरी आमची काही हरकत नाही. बाहेर कशाकरता... हॉटेलमध्ये पैसे वाया घालवायचे?"


तेव्हा सर म्हणाले, "ताईसाहेब तुमची इच्छा असेल तर मला इथे राहायला आवडेल..."


जेवण झाले. आम्ही गप्पा मारायला बसलो. इंदूरचा माहिती नसलेला इतिहास जेव्हा त्यांनी ऐकवला तेव्हा मावशीला मात्र फारच आश्चर्य वाटलं. नंतर एकदम म्हणाले, "ताईसाहेब, गोष्ट फक्त मला सांग ना तुमच्या शेजारी राहणाऱ्या बाईने कधी काही तुम्हाला आणून दिलं नाही ना..?"


मावशी विचारात पडली, "हो मला आठवतं एकदा संध्याकाळी घरी मी एकटीच होते. जोशी काका आणि त्या त्यांच्या मिसेस दोघेही आमच्याकडे येऊन गेले होते. याच घरासंबंधी बोलण्यास... त्यावेळेस ते दोघे जण जेव्हा निघून गेले तेव्हा सोप्या वरती एक वस्तू मी बघितली. ती मी एका प्लास्टिकच्या bag मध्ये ठेवली आहे... म्हटलं रात्र खूप झाली ती सकाळी परत देऊन टाकू आणि विसरले पाहा..." असं म्हणत मावशी प्लास्टिकची पिशवी घेऊन आली. त्याच्यामध्ये अंगठी होती. अविनाशनी ती पिशवी उघडली. ती अंगठी बाहेर काढली आणि ते म्हणाले, "मावशी त्या बाईने तुमच्यावरती फारच मोठा प्रयोग केलेला होता. तुम्ही जर दार उघडलं असतं तर तुम्ही तिथेच खलास झाल्या असता. ही अंगठी नाही. लांडग्याच्या हाडात बसवलेला चेडा आहे. याला चेडा असं म्हणतात या चेड्यात एखाद्या अमानवी शक्तीची स्थापना केलेली असते. ही अंगठी ज्याच्या हातात असेल त्याच्याबरोबर ही अमानवी शक्ती इकडे तिकडे फिरत असते आणि ठरवून दिले असेल ते काम बिनबोभाटपणे पार पडते. त्या बाईने हीच गोष्ट केली. आता आपल्याला जे करायचे आहे ते आपण करून टाकू..." एवढ बोलून अविनाश सर म्हणाले, "आज रात्री जागण्याची तयारी ठेवा, आज तो काळा ब्राह्मण दरवाजा वाजवेल त्यावेळेला तो दरवाजा मी उघडेन. तुम्हाला जर काही विचित्र दृश्य दिसली तर तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही. करण हे सर्व भास निर्माण करतात... त्याकरता ते माणसाच्या शरीरातील ectoplasm चा वापर करतात."

 

रात्र झाली रात्री बाराच्या सुमाराला गेटचा आवाज झाला. पावलं हळूहळू जवळ यायला सुरुवात झाली. दार तीन-चार वेळा वाजवले गेले. आम्ही सगळेजण घाबरून आता काय होणार आहे हे बघत होतो. आतून भीती वाटत होती. दरवाजा उघडत असताना सरांनी काहीतरी बीजमंत्र म्हटले. त्यांच्या हातात एक ताम्हण होतं, त्यात तो चेडा किंवा लांडग्याच्या हाडाची अंगठी तुपात भिजवून ठेवली होती. दार उघडताच, "सून गहनी मेरी बानी, जल जाये ये अछूत कहानी, अलक्ष्य निरंजन आदेश गुरुजी को आदेश" म्हणत आग लावली. चित्रविचित्र आवाज  खोलीत येत होते. अंगठी ताम्हणात एखाद्या जळलेल्या माणसाने तडफड करावे तशी तडफडत होती. दरवाज्यात उभा असलेला तो काळा ब्राह्मण पायापासून डोक्यापर्यंत पेटलेला होता. एकदम उठून जिवाच्या आकांताने त्याने अंगठीत प्रवेश केला अविनाशने अंगठी पटकन एका त्यांच्याजवळ असलेल्या डबीत ठेवून मंत्र म्हणत त्याच्यावरती काळा धागा बांधून टाकला.


"अथर्व दार लावून घे असं म्हणत तेथेच बसलेले..." दोन दिवस तिथे थांबले. कुठलाही अनुचित प्रकार झाला नव्हता. नंतर आम्हाला कळलं की मी कोकणातली बाई आहे याद राखा मांडणाऱ्या काकू बिछान्याला खिळून त्यांना अर्धांग वायूचा झटका बसला होता. ज्या कुठल्या मांत्रिकाला सांगून त्यांनी हा प्रयोग केला होता ती विद्या त्याच्यावरच उलटल्यामुळे त्याने बांधून ठेवलेला चेड्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला नष्ट केलं होतं. पोलीस चौकीत हृदय बंद पडून आकस्मिक मृत्यू अशी नोंद त्याची करण्यात आली होती. अर्थात हे आम्हाला नंतर कळलं. जाताना सरांनी स्वामी महाराजांचा फोटो बॅगेतून काढून मावशीजवळ दिला व तिला सांगितलं, "ताईसाहेब यापुढे नेहमी स्वामींची सेवा करायची. जगातल्या कुठल्याही शक्ती तुमच्याकडे डोळे वाकडे करून बघणे टाळ्तील, वाटेस जाणे दूर....! निघतो..." 


आम्ही असं म्हणत कोणालाही नमस्काराची संधी न देता स्टेशनकडे चालायला सुरुवात केली. "अथर्व कशाकरता लोक हे विचित्र उद्योग करतात हे आजपर्यंत मला समजलं नाही. सुदैवाने तुझ्या मावशीने दार उघडलं नाही, ही ईश्वरी कृपाच समजावी लागेल!

अन्यथा तिथेच गतप्राण झाली असती आणि मग तुझ्या मामांचा नंबर लागला असता." 


"सर एक विचारू, त्या कागदावर काय लिहिलेलं होतं..."


"अरे ते महागणपती मालमंत्र व गणपती कवच याची मांडणी होती. भारतातील आध्यत्म हळू हळू लोप पावत चाललं आहे. हल्लीची तरुण पिढी नास्तिकतेकडे झुकते आहे त्याला काही इलाज नाही. जग सुधारण्याच्या भानगडीत न पडता कोणी आपल्याकडे मदतीची याचना केली तर अशाप्रकारची मदत नक्की करावी, असं माझे सद्गुरू मला नेहमी सांगत..."


माझ्या आयुष्यातील हा थरारक प्रसंग आजही मला आठवतो. सध्या मी US Florida ला स्थायीक झालो आहे, येथे कामाला असलो तरी सतत अविनाश सरांच्या संपर्कात असतो कारण सरांच्या संपर्क म्हणजे प्रत्यक्ष स्वामी महाराजांशी संपर्क. मी निश्चित भाग्यवान आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror