STORYMIRROR

Riya Sarpe

Horror

3  

Riya Sarpe

Horror

पिशाच्च रूदन

पिशाच्च रूदन

6 mins
174

      तीन वर्षात असा आवाज मी कधीच ऐकला नव्हता.मध्यरात्र झाली होती.जंगलसदृश्य त्या वस्तीत भीतीदायक असे काही यापूर्वी घडले नव्हते.नुकत्याच शाळा सुरू झाल्या होत्या.पावसालाही ब-यापैकी सुरवात झाली होती. आताही पागोळ्यांवरून पावसाचा तालबद्ध आवाज ऐकू येत होता.टाचण लिहिण्यासाठी मी इतका वेळ जागा होतो. त्या विचित्र आवाजाची मला थोडी भीती वाटली.उद्या नंदूला त्याच्याबद्दल विचारावे असा विचार करून मी झोपेच्या अधिन झालो.

     दुस-या दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर मी नंदूला विचारले,"काय रे नंदू,तुमच्याकडे रात्री शेतात कोल्हे येतात काय? "

 "नाय वो गुर्जी"

"पण मी रात्री आवाज ऐकला"

"छ्या! छ्या!आमच्याकडे फक्त डुकरा येतत मळ्यात,कोल्हे बिल्हे तिकडे सडयार आसतत "

    मी जरा चक्रावलो.तो आवाज अस्पष्ट ऐकला होता मी,पण तो नक्की कोणाचा हे मी ठरवू शकलो नाही ,थोडासा मला तो मशिनच्या आवाजासारखा वाटला. रात्रीच्या त्या दाट काळ्याकुट्ट झाडांमध्ये कसले कसले आवाज यायचे, कधी माडावरून पडणा-या झावळीचा आवाज यायचा,कधी नारळ पडल्याचा धप्प असा आवाज यायचा,तर कधी पानपतेरा चुरगळल्याचा आवाज यायचा,असा आवाज आला की काळजाचं पाणी पाणी व्हायचं.

   आत्ता ह्या नव्या आवाजाच्या विषयावर फारसा विचार करायचा  नाही असे ठरवून तो विषय मी मनातून काढून टाकला.

    तीन वर्षापूर्वी मी या तांबळगावच्या प्राथमिक शाळेत रुजू झालो होतो. कोकणातल्या प्रातिनिधिक गावासारखे ते एक निसर्गसंपन्न गाव होते, अगदी समुद्राच्या कडेला. माड पोफळीची समृद्धता होती.गावाच्या मध्यभागी बारमाही ओढा नि त्याला लगटून विस्तिर्ण हिरवागार मळा.आल्हाददायक वातावरणातला वेड लावणारा कोकणी स्पर्शाचा निसर्ग इथे होता, इथली माणसे साधीसुधी, भाबडी अशी होती, बहुतेक लोक शेतकरी होते,गावची लोकसंख्या दोन हजारच्या आसपास असली तरी गावामध्ये फारश्या सुविधा नव्हत्या. मळ्यातल्या हिरव्या भातखाचरांमधून चालताना एक विलक्षण अनूभूती मिळायची, फावल्या वेळात इथला निसर्ग न्याहाळायचा मला छंद जडला होता. 

   नंदू एक साधा शेतकरी होता.त्याच्याच घरी मी रहात होतो.कधी कधी तो खाडीमध्ये मासे पकडायला जायचा.त्यादिवशी उशिराच्या भरतीमुळे घरी यायला त्याला रात्रीचे आठ वाजले. कमरेला माशांची झाबळी बांधून तो अंगणात आला तेव्हा गडद काळोख झाला होता. त्याने झाबळी सोडून बायकोच्या हातात दिली नि अंघोळ करायला न्हाणीत गेला. त्याचे पाय खाडीतल्या चिखलाने माखले होते. मी माझ्या खोलीत पुस्तक वाचत बसलो होतो. झाबळीच्या हिवसान वासाला आसपासची सर्व मांजरे गोळा झाली होती. त्याची बायको मासे साफ करायला अंगणाच्या एका कोप-यात बसली.

   समोरच्या पिंपळाची सळसळ चालू होती. रातकिडयांनी किरकिर करायला सुरवात केली होती .मधूनच पानपते-याचा आवाज ऐकू येत होता,पण तिचे तिकडे लक्ष नव्हते. ती आपल्या कामात गुंग होती.झाडाची फांदी गदागदा हलल्यासारखा आवाज आला. अर्धेअधिक मासे साफ करून झाले असतील नसतील एवढयात तोच विचित्र आवाज तिने ऐकला.अचानक वा-याचा झोत तिच्या अंगावर आला. पानपते-यातही काहीतरी सरसर झाले, तशी ती हडबडली.भीतीने थरथर कापत कसेबसे माशाचे भांडे हातात धरून ती पटकन घरात आली.नंदूही तोपर्यंत टावेल लावून घरात आला होता. तिने झटकन पुढचा दरवाजा लावून घेतला आणि त्या विचित्र आवाजबद्दल तिने धापा टाकीत सांगितले.

     आणखी दोन दिवस गेल्यावर अनेकांनी तो आवाज ऐकल्याचे सांगितले. अफवांना उत आला. त्या विचित्र आवाजाची जणू सगळया वस्तीवर दहशत बसली. कुणी रात्री एक वाजता कुणी पहाटे चार वाजता तो विशिष्ट आवाज ऐकला होता. ज्या लोकांनी तो आवाज ऐकला ते दुस-या दिवशी इतर लोकांना सांगून भीतीदायक वातवरणात भर टाकायचे. 

   एके रात्री मला अचानक जाग आली. सुमारे एक वाजला होता. मी पुन्हा कूस वळवून झोपण्याच्या प्रयत्न करायला लागलो. खरोखरच मी झोपेच्या अधिन होणार होतो पण त्या विचित्र आवाजाने माझी झोप उडाली नव्हे दातखिळी बसण्याची वेळ आली. एका विशिष्ट लयीत धाय मोकलून रडणा-या स्रीचा तो आवाज होता. काळीज पिळवटून टाकणारे ते भूताचे रूदन होते ते.

    मी भीती झटकण्याचा प्रयत्न केला, पण माझे ह्दय अतिशय वेगाने धडधडत होते.जणू मला बाकी शरीर नव्हते होते ते फक्त ह्दय. मी ताकत हरवलेल्या सुन्न बधीर शरीराने हापसे टाकत होतो. अंगात उठून बसण्याचे बळ नव्हते.माझ्या खोलीत मी एकटाच होतो. आवाज अगदी घराजवळून येत होता. 

   रात्रभर माझा डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी उठल्या उठल्या मी नंदूजवळ गेलो.

"नंदू काल रात्री मी आवाज ऐकला "

"व्हय,अवो गुर्जी आमीपण आयकलाव,रात्री एक वाजता कोणतरी रडत होत भायरं...बाईमाणसासारको आवाज व्होतो " नंदू जरा विचारात पडला नि खास गोष्ट असल्यासारखा पुढे सांगू लागला, "माका काय वाटता तात्या सावताची बायको हालीच पंधंरा दिवसापूर्वी वारली...तिचोच ह्यो आत्मो आसतलो "

     नंदूच्या म्हणण्याला त्याच्या बायकोनेही दुजोरा दिला. 

"व्हय व्हय माका पण तसाच वाटता,तिची पोरा अजून ल्हान आसत ना,त्येंच्यासाठी तिचो जीव तळमळत आसतलो म्हणान तिचो आत्मो हयसर घुटवाळता"

     दिवस उजाडला तरी माझी भीती अजून कमी झाली नव्हती. डोळे चुरचुरत होते.अर्धवट झोपेने ग्लानी येत होती, त्यामुळे हा आत्मा आहे की आणखी काही हे मला ठरवता येत नव्हते.

    विस्तीर्ण अशा भातमळ्याला लागुनच ही वाडी होती. मोठमोठी आंब्याची झाडे आणि त्या झाडांशी शर्यत लावल्यासारखी माडपोफळीची उत्तुंग झाडे तिथे होती. घरांच्या अंगणात क्वचितच ऊन येत असे नाहीतर सदानकदा सावली. पिंपळ आणि जांभळाची सुद्धा मोठमोठी झाडे तिथे होती.ह्याच मोठमोठया झाडांखाली त्या वाडीतली घरे होती ह्या झाडांची मला मोठी गंमत वाटायची पण आता मात्र रात्रीच्या अंधारात ह्या मोठ्या झाडांकडे बघण्याचे धारिष्ट्य व्हायचे नाही. हयाच एखाद्या झाडाखाली बसून तो आत्मा शोक करीत असावा.

     थरारक आणि भीतीदायक वातावरणाने कित्येक दिवस मला नीट झोप लागली नव्हती. दिवसा रात्री विचित्रसे भास व्हायचे.

      म्हाता-या अण्णा पेडणेकरला एक वाईट खोड होती. खाडीकडे जाण्याच्या वाटेवर खारफुटी झाडांच्या आडोशाला दाजी भाबल दारूचा अड्डा चालवायचा आणि त्याच्यावर अण्णा पेडणेकर नजर ठेवायचा. खांद्यावर टावेल टाकून अर्ध उघड्या अंगाने पुळणीत लपवलेली दारूची बाटली मिळते का हे तो हुडकत रहायचा. चुकून कधीतरी अशी एखादी बाटली मिळायची सुद्धा त्यामुळे तो रात्री आठ वाजता तिथे जायचा पण आता काही ह्या विचित्र आत्म्यापुढे उपाय उरला नव्हता .त्यामुळे त्याने रात्री आठ वाजता दारूसाठी बाहेर पडायचे बंद केले.

     कुणी आपल्या खिडक्या नीट बसवून घेतल्या,कुणी उचकटलेले,गंजलेले कडीचे दरवाजे सुताराकडून नीट करून घेतले, काहींनी गावातल्या बुवाकडून अंगारा आणला, कोणी मंतरलेली सुपारी आणली,कुणी औदुंबराच्या मुळ्या आणून घरी ठेवल्या.धसका घेतला लोकांनी. 

     स्रियांनी तर पहाटे विहिरीवर पाणी भरायचे सोडून दिले. सूर्य उगवल्यावर उशिराने त्या पाणी भरू लागल्या.रात्री आठ वाचण्यापूर्वीच लोक दरवाजे बंद करून घ्यायचे. सगळी सामसूम व्हायची. प्रत्येकाने आपापल्या परीने उपाययोजना केल्या होत्या, पण रात्रीचे हे भेसूर आवाजात रडणे थांबले नव्हते. तांबळगावची माणसे धास्ती खावून हवालदिल झाली होती.

    अनेक रात्री हा आवाज मीही ऐकला होता. आता जवळ जवळ चार महिने होत आले होते. ज्या रात्री भरपूर पाऊस पडायचा त्या रात्री पावसाच्या आवाजात हा शोकग्रस्त आवाज ऐकू यायचा नाही. त्या रात्री बरे वाटायचे.एकदा तर हे गाव सोडून जाण्याचा विचार मी केला होता पण पुन्हा अशी नोकरी मिळणे दुरापास्त होते

     एकदोनदा कुणाच्यातरी घरावर बारीक दगडांचा वर्षाव झाला होता, एकदा पांडू परबाच्या दरवाजाची कडी रात्री बारा वाजता वाजली होती. 

    खरे तर पांडू परबावर शेताच्या हद्दीवरून वासू भाबलाचा राग होता. त्याला घाबरवण्यासाठी रात्री बारा वाजता त्याच्या दरवाजाची कडी त्याने वाजवली होती. 

    आता सप्टेंबर महिना उजाडला होता. पाऊसही कमी झाला होता. तो आवाजही अधूनमधून कधीतरी ऐकू येवू लागला. माणसे थोडी गाफिल झाली होती. त्यादिवशी मी ही गाफिल होतो. बल्बच्या उजेडात बाहेर अंगणात बसून मी आणि नंदू गप्पा मारीत बसलो होतो. गार वारा अंगाला झोंबत होता.झाडांच्या पानांमधून क्वचितच एखादी चांदणी दिसायची. समुद्रावरून वटवाघळांचे थवेच्या थवे वल्हाटीकडे चालले होते. पानांची सळसळ ऐकू येत होती. विहिरीजवळच्या माडावरची झावळी झपकन जमिनीवर कोसळली, पिसरूंडीही पडली आणि इतक्याच तो भयकारी आवाज अगदी जवळ अंगणातल्या माडाच्या शेंड्यावर ऐकू येवू लागला. माझ्या शरीरात भीतीची शिरशिरी आली. हदय धडधडू लागले.झपकन वळून नंदू घरात शिरला. मीही गर्रकन 

वळून दरवाजा गाठला पण कोण जाणे माझ्यात एक असीम धैर्य अचानक आले होते. मी नंदूची टॉर्च घेवून परत अंगणात धावत आलो नि मान वर करून माडाच्या शेंड्यावर बॅटरीचा प्रकाशझोत टाकला...आश्चर्य...परम आश्चर्य...तो आत्मा...रडणारा आत्मा पाहून मी विस्मयाने थिजून गेलो. तो चक्क एक प्राणी होता. काळाकुट्ट लांब झुपकेदार शेपटीचा. नंदू माझ्याजवळ उभा होता. तो ओरडला,"कांडेचोर, कांडेचोर"तसे आसपासच्या घरातले लोक त्या काळमांजराला

 बघायला धावत आले .

    इतक्या दिवसांच्या त्या रहस्याचा आज उलगडा झाला होता. तो विलाप करणारा आवाज कोण्या पिशाच्च्याचा नव्हता तर तो एक निशाचर प्राणी होता. जो सहसा माडांवर, झाडांवर गुजराण करतो. शहाळी वा तत्सम फळे खातो आणि मादीला बोलावण्यासाठी असा रडका प्रेमविलाप करतो.काळमांजराने स्वत: रडून आम्हालाही रडकुंडीला आणले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror