मर्यांबी
मर्यांबी
३० वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही.कळंबे या खेडेगावात माझ्या वडिलांची बदली तेव्हा झाली होती.ते प्राथमिक शिक्षक होते.विरळ लोकवस्तीच्या त्या गावात सहाशेच्या आसपास लोकसंख्या होती.आम्ही ज्या घरात रहात होतो तिथे जवळच मर्यांबीचे घर होते.खेळण्यासाठी कुणी मित्रमैत्रिणी नसल्याने मी आजुबाजुच्या झाडांच्या सान्निध्यात फिरत असे.फुले गोळा करणे,फुलपाखरांचा पाठलाग करणे असे बालिश उद्योग रविवारी सुट्टीच्या दिवशी मी करत असे."मुबारक तुम्हे फुलोंके गुलशन,हमे नशीब हुई काॅटो की दास्तान"ही प्रसिद्ध कव्वाली आजही तितकीच लोकप्रिय आहे.ती जेव्हा जेव्हा मी ऐकते तेव्हा मर्यांबीची मला आठवण येते.एके दिवशी घराशेजारच्या निवडुंगाच्या आड्यात कोरांटीची फुले गोळा करण्यासाठी मी गेले होते.पिवळ्या रंगाची, नाजूक,मुलायम पाकळ्यांची फुले सुवासिक नसतात पण दिसायला ती मोहक असतात.निवडुंगाच्या काटेरी कुंपणातून कोरांटीची फुले काढणे एवढे सोपे नव्हते.लांबलचक आड्यात कितीतरी कोरांटीची झुडुपे होती.फ्राॅकच्या खिशात मी एक एक फूल ठेवत होते एवढ्यात आड्यामध्ये सरसर असा आवाज आला.सरडा होता की साप देव जाणे!मी क्षणाचाही विलंब न लावता धावत सुटले नि थेट मर्यांबीच्या अंगणात घाब-याघुब-या उभी राहिले,मर्यांबी ओटीच्या टोकावर बसून झावळ्यांचे हिर तासत होती.माझी चाहूल लागताच तिने डोळ्यांवर हात धरला.बुबुळे ताणून ती माझ्याकडे पाहू लागली"कोण अशे?आयेशा ऽऽ गो देख कोण आयलाशे?"तेवढ्यात मर्यांबीची मुलगी आयेशा ओढणी सावरीत बाहेर आली"ती मास्तरकी पोरगी आशे" "ये गो बैठ बेटा"अस ती प्रेमळ आवाजात मला म्हणाली.मर्यांबीच्या पडवीतील लांबलचक बाकड्यावर मी बसले नि ती हिर कसे तासते ते पाहू लागले"बेटा तुमारी मायो?" "आई जेवण बनवता"असे मी कसेबसे सांगितले.खरे तर मर्यांबीच्या घरी भिण्यासारखे काहीच नव्हते पण आम्ही या गावात अपरिचित असल्याने सुरवातीच्या काळात मर्यांबीच्या घरी मी आईचा पदर धरून जात असे.
आईची व मर्यांबीची चांगली दोस्ती जुळल्यावर मी मर्यांबीच्या घरी केव्हाही बिनधास्तपणे जाऊ लागले.मर्यांबीच्या डोळ्यात मोतीबिंदू झाले होते, त्यामुळे तिला बरेच कमी दिसायचे.तिचा नवरा अब्बासमियाॅ मुंबईतून तिला मनीआॅर्डर पाठवायचा.त्यावरचा मजकूर अथवा त्याने पाठविलेले आंतरदेशीय पत्र ती माझ्याकडून वाचून घेत असे मर्यांबीच्या घरापासून आमचे घर हाकेच्या अंतरावर होते, पण मुस्लिम असलेल्या मर्यांबीचे त्या गावातील ते एकमेव घर होते,तिचे नातेवाईक जैनुद्दीन यांचे एक किराणा मालाचे दुकान शेजारच्या गावात होते,पण ती त्यांच्याकडे फारशी जात नसे.कधीतरी किरकोळ वाणसामानासाठी ती मला गावातल्या दुकानात पाठवत असे.शाळा सुटल्यावर विशेषतः रविवारी मी तिच्या घरी फे-या मारत असे.कळंबे गावातील अत्यंत आकर्षक असे तिचे घर होते.आॅईलपेंटने रंगवलेले, जुने कोकणी पद्धतीचे कौलारू घर होते ते.त्या जुन्या काळात तिच्या घरी भींतीला टाईल्स् लावलेल्या होत्या.तिच्या घरचे फर्निचर ही आकर्षक होते.तिची उपजिविका अब्बासमियाॅने पाठविलेल्या मनीआॅर्डरवर चालत असे.झाडू विणून,नारळ विकून ती घरातला किरकोळ खर्च चालवत असे.रविवारच्या दिवशी माझी आई, बहिण व मी मर्यांबीच्या घरी दुपारच्या टाईमपासाकरिता जात असू.माझ्या वयाचे तिथे कुणीच नव्हते परंतु मी काहितरी वात्रट विनोद करून सगळ्यांना हसवत असे.आयेशाचे डगळे कपडे घालून मी आले की सगळ्याजणी गप्पा थांबवून खो खो हसत असत.आयेशाचा बुरखा घातल्याने मला कधी ओरडा खावा लागला नाही उलट मनोरंजनाची तुटपुंजी साधने असलेल्या त्या काळात मला आयेशाच्या बुरख्यात पाहून सगळ्यांचे मनमुराद मनोरंजन होई.कधी कधी माझी आई,मर्यांबी आणि शेजारच्या वाडीतील सखुमामी यांच्या गप्पा दुपारच्या वेळात रंगत.तासून घोटलेल्या हिरांच्या वेण्या घालित घालित मर्यांबी बोलत असे.यात अनेक विषय असत.दुष्काळ,बायकांची बाळंतपणे ,रेशनच्या दुकानातील गंमतीजमती इत्यादी,पण मी लहान असल्याने बरेचसे माझ्या डोक्यावरून जात असे,माझे कान तेव्हा टवकारत जेव्हा त्यांच्या गूढ विषयावर चर्चा सुरू होत. खासकरून मर्यांबीच्या भावाला एकदा मध्यरात्री कब्रस्तानाजवळून जाताना मोग-याची फुले पांघरलेला जिन भेटला होता व त्या भयानक रात्री तो कसाबसा घरी पोहचला हे मर्यांबी रंगवून रंगवून सांगायची तेव्हा भीतीने अंगावर काटा उभा रहायचा.आम्ही त्या गावात असेपर्यंत मर्यांबीच्या घरी जाणे कधीच टळले नाही,त्याला कारणही तसेच होते, एखाद्या रविवारी घरात कोणी नाहीसे पाहून मर्यांबी मला खूप प्रेमाने जवळ बोलावत असे,"गो बेटा धानदाल खाया?"हो खाया" भाजी?"फणसाची" "आज पढाई किया ?आत्ता माझी बोलायची पंचाईत होत असे.मर्यांबीने असे अभ्यासाबद्दल प्रश्न विचारल्यावर बरेचदा मी बाकड्याच्या महिरपीवर हनुवटी टेकवून,डोळे मिटून मौन धारण करत असे आणि मर्यांबीही पुन्हा मला काही विचारत नसे.तिचे हात झाडू विणण्यात गुंतलेले असत पण आज मर्यांबी खुशीत दिसत होती तिचे हात झाडू विणण्यात गुंतलेले होते, तिने बारीक डोळे करून माझ्याकडे पाहिले भींतीच्या आधाराने ती स्वयंपाक घरात गेली व माझ्यासाठी एक गोड गोड मालपोआ घेऊन आली.अंड्याचा तो शुभ्र गोड मोगलाई मालपोआ मला फार म्हणजे फार आवडत असे परंतु अशी भेट एका खासवेळीच मला मर्यांबीकडून मिळत असे "बेटा गाना गानेको आता है क्या?" व्हय""मुबारक तुम्हे फुलोंके गुलशन" ये गाना सुना है तुमने ?मी म्हटले"व्हय,आयकलय मी आमच्या रेडिओवर लागला व्होता"मर्यांबीचा चेहरा एकाएकी खुशीने भरून आला,इतक्या आनंदात कधीच मी तिला पाहीले नव्हते तिच्या पिंगट डोळ्यात विलक्षण असे काही तकाकत होते"जरा गाके सुनाव बेटा"मग काय एका क्षणात माझ्या बालिश नि बेसूर आवाजात मी ती कव्वाली गावू लागले त्या काळात ती कव्वाली खूप मशहूर झाली होती इतकी की एका हिंदी चित्रपटात ती जशीच्या तशी घेतली गेली, रेडिओ टीव्ही आॅडिओ सगळीकडे ती कव्वाली लोकप्रिय झाली होती,नशिबाचा एक अचंबित करणारा खेळ मर्यांबीच्याबाबतीत घडला होता,मर्यांबीचा मुलगा झुल्फिकार याची ती कव्वाली होती,तो लहानपणी सारखी गाणी गात रहायचा,ते अब्बासमियाॅला आवडायचे नाही,तो सोळा ,सतरा वर्षांचा झाल्यावर त्याची व अब्बासमियाची भांडणे होऊ लागली व अशाच एका भांडणात तो कुणालाही काही न सांगता मुंबईला निघून गेला.आत्ता तो खूप मशहूर झाला तेव्हा जैनुद्दीनने मर्यांबीला घरी येऊन सांगितले होते.आपला मुलगा कुठेतरी या जगात अस्तित्वात आहे या भावनेने ती कशीबशी जगत होती,इतक्या प्रसिद्ध कलाकाराची आई होण्याचे भाग्य मर्यांबीला लाभले होते पण आता झुल्फिकार कसा दिसतो,त्यागे लग्न झाले का ? मुलेबाळे किती?हे मर्यांबीला ठाऊक नव्हते.
अनेकदा कुणी आजुबाजुला नाहिसे पाहून मर्यांबी ती कव्वाली मला गायला लावत असे तिच्याकडे रेडिओ किंवा टेपरेकॉर्डर नव्हता, मी जेव्हा गात असे मर्यांबीचा चेहरा आनंदाने लकाकत असे, तिच्या गोऱ्या सुरकतलेल्या चेह-यावर आनंदाची वेगळीच कळा दाटून येई, माझ्या बेसूर गायकीची तिने कधीच थट्टा केली नाही . प्रत्येक वेळी खूप उत्कंठेने व भक्तीभावाने ती कव्वाली ऐकत असे, झुल्फिकारची व मर्यांबीची पुन्हा कधी भेट झाली की नाही हे मला माहीत नाही पण तिच्या अंतर्मनात त्याच्याबद्दल असलेली अगाध माया मला त्या बालवयात जाणवत होती.मर्यांबीने गाणे गा म्हटल्यावर मी कधीच आढेवेढे घेतले नाहीत. पण हे गाणे माझ्या झुल्फिकारचे आहे असे उघडपणे ती मला कधीचं बोलली नाही व मी ही तिला झुल्फिकारबद्दल काही विचारले नाही.आज मर्यांबी जिवंत नाही झुल्फिकारचाही मृत्यू झाला आहे पण त्याच्या गाण्याचा ऋणानुबंध माझ्या बालपणीच्या आठवणीतील एक ठेव आहे . अनेकदा टीव्हीच्या लिरीक शो मध्ये हे गाणे हमखास कुणीतरी गाऊन जाते आणि माझे मन मर्यांबीच्या घराजवळच्या निवडुंगाच्या आड्यातील कोरांटीच्या झुडपासारखे झुलत रहाते... बालपणीच्या आठवणीत !
