फुगेवाला
फुगेवाला


वेळ साधारण १:३० ते २ असावी... या दुपारच्या भर उन्हात एक मुलगा रस्त्याच्या कडेला फुटपाथवर शाळेसमोर उभा होता. मी माझ्या मुलींना घ्यायला गेले होते, शाळा सुटायची वेळ झालीच होती. तो मुलगा बहुतेक १० ते १२ वर्षांचा असावा, अंगाने बारीक, कपडे मळलेले आणि ढगळ, बहुतेक ते त्याला कोणीतरी दिलेले असावे. हातात त्याच्या खुप सारे रंगीबेरंगी फुगे होते. तो दिसेल त्याला ते विकत घेण्यासाठी विनवणी करत होता. शक्यतो ज्यांच्याकडे लहान मुल आहे त्यांच्या तो मागे मागे फिरत होता. जेणेकरून ते लहान मुल तो फुगा मागेल आणि मग त्याचे फुगे विकले जातील. एका बाईच्या मागे मागे फिरत असताना ती ओरडली त्याला, पण त्या बाईची लहान मुलगी सारखा हट्ट करत होती आणि म्हणत होती की, मला घेऊन दे ना आई तो फुगा! मग काय शेवटी त्या बाईने त्यातला एक फुगा घेतला आणि त्याला १० रुपये दिले. मी हे सगळे लांबून बघत होते.
माझ्या मुली आता मोठ्या आहेत त्यामुळे त्या फुग्यासाठी नाही हट्ट करत. तरीपण मी त्याच्याजवळ गेले आणि त्यातला एक फुगा विकत घेतला आणि माझ्या मैत्रीणीच्या लहान मुलाला तो दिला. ते बाळ खुप खुश झाले फुगा बघून, पण त्या बाळापेक्षा जास्त खुश मला तो फुगेवाला मुलगा दिसत होता. बहुतेक त्याने सकाळपासून काही खाल्लेले नव्हते भुकेला दिसत होता अगदी. शाळेच्या बाजूलाच एक मिठाईचे दुकान आहे तिथे जाऊन त्याने काहीतरी खायला घेतले आणि आपले पोट भरले. मग पुन्हा तो चालू लागला राहिलेले फुगे विकण्यासाठी पुन्हा तिच धडपड करू लागला.
ज्या हातात पुस्तके हवी अभ्यास करायला, त्याच हातात तो फुगे घेऊन भर उन्हात लोकांच्या मागे मागे फिरत होता. त्याच्याकडे पाहून मला प्रश्न पडत होता की, कसे राहत असतील, कसे आयुष्य जगत असेल. दोन वेळचे जेवणसुद्धा मिळणे खुप कठीण जात असेल काहींना. परिस्थिती माणसाला काय काय करायला भाग पाडते.
खरंच आयुष्य म्हणजे काय? हे त्या गरीबांना विचारा ज्यांना आपली एक वेळची भुक भागवण्यासाठी आपली स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वासदेखील त्या फुग्यात भरून विकावा लागतो.