गोळ्यांची खिचडी
गोळ्यांची खिचडी


आईईईईईई... ए आई.... दे ना गं जेवायला भूक लागलीये मला...
माझी चिमणी... सकाळी सकाळी भूक लागली म्हणून ओरडत होती. पण आज महाशिवरात्र आहे असे सांगितले तर लगेच ओरडली...
आई म्हणजे आज उपवास असेल ना ... मग "गोळ्यांची खिचडी" कर ना गं... जरा जास्तच कर, तुला माहितीये ना मला किती आवडते ती...
मी पण हसून बोलले तिला, हो गं माझी राणी माहितीये मला तुला किती आवडते ती "गोळ्यांची खिचडी..." आता तुम्ही म्हणाल हे काय नवीनच गोळ्यांची खिचडीचं...
तर झालं असं की माझी मुलगी लहान होती तेव्हा तिला साबुदाण्याची खिचडी म्हणता येत नव्हते... आणि एवढे मोठे लांबलचक नाव घेण्यापेक्षा ती आपलं साबुदाण्याला गोळेच म्हणायची... मग असे तिने साबुदाण्याच्या खिचडीला नाव पाडले "गोळ्यांची खिचडी..." खूप आवडते तिला... त्यात जास्त बटाटे घालायला सांगते ती... तेलात परतवलेले बटाटे तर खूप आवडीने खाते... अशी साधी बटाट्याची भाजी नाही खाणार लवकर, पण खिचडीतले बटाटे तर खूप आवडतात. बटाट्याला पण पताते म्हणायची... खूप हसू यायचं तेव्हा तिचे ते बोबडे बोल ऐकून... तिच्यामुळे आम्हीही तेच म्हणायला लागलो... गोळ्यांची खिचडी खूप सारे पताते घालून...
आता आठवले की खूप हसू येते पण, असे अनेक शब्द आहेत तिचे... जे आम्ही अजूनही तिने ठेवलेल्या नावावरूनच बोलतो... आणि उपवास असला की हमखास "गोळ्यांची खिचडी" होतेच होते... ते ही फक्त तिच्यासाठी, तिला आवडते म्हणून... कधीकधी तर उपवास नसला तरीसुद्धा करायला लावते... मग काय करून द्यावीच लागते... आणि खिचडीबरोबर दही असेल तर खूप आवडीने खातात सगळेच...
आज कोणता उपवास आहे म्हणून तिने विचारले होते. आज तर महाशिवरात्र... वर्षातील सर्व शिवरात्रींमध्ये या महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी शंकर-पार्वती यांचा विवाह झाला होता. शिवलिंगाचा अभिषेक करणे, बेलपत्र वाहणे, दुध-दह्याने अभिषेक करणे, रुद्राभिषेक करणे, ॐ नम: शिवाय असा जप करणे, शिवलिलामृताचे वाचन करणे, शंकराच्या मंदिरात काही लोक आवर्जून जातात दर्शनासाठी आणि पिंडीला धोत्रा, बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहतात... अशी मी थोडक्यात माहिती सांगितली...
आणि ती म्हणाली, आपण पण जाऊ या का मंदिरात...
मी आनंदाने हो म्हटले तिला... मंदिरात जाताना मी पण सोबत दुधाची पिशवी आणि बेलाची पाने फुले घेतली होती... मंदिराच्या बाहेर बरीच लहान मुले हात पसरून बसली होती...
मावशी काहीतरी द्या की ओ... भूक लागलीये... म्हणून मी त्यांना माझ्याजवळची दुधाची पिशवी दिली आणि काही फळे घेऊन दिली... ती मुलं खूप खुश झाली होती...
पण माझी मुलगी लगेच बोलली की 'आई आपण तर देवाला वाहायला आणले होते ना दूध... मग त्या मुलांना का दिलेस...'
मग मी तिला सांगितले की देव काही खात नाही त्याला फक्त भक्तीभावाने एकदा नमस्कार करून त्याच्यासमोर नतमस्तक व्हा, त्यानेच त्याचे पोट भरते... देव फक्त भावाचा भुकेला असतो... बाकी तुम्ही काही सोबत नेले नाही तरी चालते... आणि तसेही देवावर ते दूध घातले असते तर ते बाहेर निघून गेले असते आणि खराब झाले असते... त्यापेक्षा त्या भुकेल्या पोरांना दिले तर त्यांचे पोट भरले असेल... तर कधीही कोणताही देव म्हणत नाही की तुम्ही माझ्यासाठी हे आणा ते आणा... देव फक्त भक्तीने खुश होतो... देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. असे म्हणून आम्ही दर्शन घेऊन घरी आलो.
हा उपवास दुसऱ्या दिवशी दुपारी सुटेल... म्हणून आज "गोळ्यांची खिचडी" साबुदाण्याच्या पापड्या, बटाट्याचे वेफर्स, दूध केळी, राजगिरा लाडू, भगर आमटी, फळे, खजुर, रताळ्याचे काप, बटाट्याची भाजी, साबुदाण्याचे वडे-शेंगदाणा चटणी... असे अनेक पदार्थ करतात... तुम्हाला काय वाटले की हे सगळे पदार्थ मी केले आणि खाल्ले... तर तसे अजिबातच वाटून घेऊ नका... मी पण करतेच सगळे... पण एक एक करून, एकदम नाही करून खात सगळे... शक्यतो मी जास्त फळेच खाते पण मुलींना आवडते म्हणून मी आवर्जून करते सगळे... सकाळी "गोळ्यांची खिचडी" आणि संध्याकाळी भगर आमटी... उपवास असला की मोठ्यांपेक्षा लहानांना खूप खायची मज्जा असते... चला तर, मग तुम्ही काय काय करणार आहात आज... सगळ्यांच्या घरी "गोळ्यांची खिचडी" तर नक्कीच बनणार असेल...!!!
कैलासराणा शिवचंद्रमौळी।
फणींद्र माथां मुकुटी झळाळी।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी।
तुजवीण शंभो मज कोण तारी॥