फसवाफसवी
फसवाफसवी


शिला तशी सभ्य मुलगी होती. लहानपणापासून तिच्या घरातील वातावरण शिस्तप्रिय व संस्कारी होते. शालेय जीवनात ती गुणवत्ताधारक होती.सिविल इंजीनियर पर्यंत शिक्षण घेतले होते. तिला जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरी लागली होती. पोटापुरता पगार होता. सुखी व आनंदात जीवन जगत होती. घरची गरीब परिस्थिती होती. तिच्यावर घर अवलंबून होते. पण अचानक तिच्या एका नातेवाईकाने तिच्या वडिलांना मुलीचे लग्न करण्यास सांगितले. वडिलांना ही बरे वाटले आपल्या जवळचा नातेवाईक आहे ,चांगले होईल. तिच्या वडिलांना असे सांगितले की समोरची सासर कडची माणसे खूप संस्कारीत आहेत. लोभी नाही, लबाड नाही. लग्न तुमच्या सांगण्यानुसार करून दिले तरी चालेल. लग्नात हुंडा भांडा काही नको. नवरदेव मुलगा बी.कॉम. शिकला आहे. एका नामांकित बँकेत मैनेजर ह्या पदावर आहे. जर ही संधी हुकली तर सरकारी नोकरी असलेला मुलगा हातातून जायचा. शिला वयात आली होती तिचे लग्न करायचेच होते. भले ही थोडे कर्ज काढून का होईना.
आपला जवळचा नातेवाईक आपल्यासाठी एव्हढे प्रयत्न करतोय तर आपण का नाही म्हणायचे.असे म्हणून शिलाच्या वडीलानीही चांगलेच मनावर घेतले. त्यासाठी स्वतःचे वावर तारण म्हणून बँकेत ठेवले. पाच लाख रूपयांचा तडकाफडकी बंदोबस्त केला. एकच मुलगी असल्याने लग्न धुमधड्याक्यात करायचे ठरविले.
त्या नातेवाईकाने मुलामुलीची रास पाहिली. ब्राह्मणाकड़े जावून दोघांचेही रासगुण जुळले होते. ते ऐकल्यावर शिलाच्या वडीलानाही खूप आनंद झाला. लग्नाची तारीख पक्की ठरली. शिलाच्या वडिलांनी नवरमुलगा कुठे कामाला आहे ते प्रत्यक्ष पाहण्याचे ठरविले. नवरदेव मुलगा फसवा होता. त्याचे बारावी पर्यंत शिक्षण होते. आपल्याला पाहुणे बँकेत बघायला येणार म्हणून अगोदरच योजना आखली होती. त्याने बँकेत मी मैनेजर आहे असे सांगा म्हणून सांगितले. त्याप्रमाणे ही योजना सफल ठरली. तो बुधवारी बँकेत गेला.मैनजर त्या दिवशी गैरहजर होते. त्यांच्या खुर्चीवर बसून तो मैनेजर असल्याचे भासवत होता. तसे इतर मित्रानाही त्याने तसे सांगून ठेवले होते. त्याच दिवशी शिलाचे वडील व तो नातेवाईकही सोबत होते. ते बँकेत आले. भावीनवरदेव मैनेजरच्या खुर्चीवर कामात मग्न दिसले. त्या दोघांनाही खरे वाटले. नंतर आनंदाची बातमी घरी आल्यावर सांगू लागले. मुलीची आई, भाऊ, बहीन यांना ही खूप आनंद झाला. आयुष्यात प्रेमाचा वारा नसलेली शिला खूप आनंदी झाली. तिच्या आयुष्याची स्वप्न रंगवू लागली. तिच्या आनंदाची बातमी तिने मैत्रीनीना सांगितली. त्यांनी ही तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. मे महिन्यात लग्न ठरले. परंतु नवरदेवमुलाची कहाणी वेगळीच होती. तिचे आयुष्य उध्वस्त करणारी होती.लग्न झाल्यानंतर तो शिलाला त्रास देऊ लागला. मानसिक व शारीरिक छळ करू लागला. त्याने पगाराचा एक रूपयाही दाखविला नाही. घरात आर्थिक अडचण भासू लागली. शिला हे सर्व गप्पपणे सहन करत होती. परंतु अचानक तिच्या राजू नावाच्या पतीचा मोबाइल हाती लागला. त्यात त्याचे व एका मुलीचे अश्लील फोटो होते. ते पाहिल्या नंतर तिला संशय आला व आपण फसले गेल्याचे कळले. तिने तिच्या वडिलांना ही सर्व हकीकत मोबाईलवरुन सांगितली. तिचे वडील लगेच आले आणि कायमचा संबध तोडण्याचे ठरविले. त्यांनी कायदेशीर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. तिथे त्याची कसून चौकशी केली असता तो खोटारडा बोलत होता. त्याने शिलाच्या नातेवाईकाला व वडिलांना खोटी माहिती देऊन लग्न केले होते.
तो मुलगा बँकेत शिपाई होता. त्याचे बाहेर अनैतिक सबंध होते. एका मुलीसोबत कायदेशीर लग्नही केले होते.
शेवटी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून जेल मध्ये बंद केले. शिलाच्या वडिलांनी ही लग्नाचा खर्च वसूलीसाठी मध्यस्थी माणसाला बोलावून पाच लाख रूपयांचा दावा कोर्टात टाकला. तसा त्याच्याकडून पाच लाखाचा चेक पोलिसांसमोर घेतला. आता वर्षानंतर कोर्टात जावून कायमचा घटस्फोट घेण्याचा कायदेशीर दावा ही टाकला.