कृष्णा शिलवंत

Horror

4.7  

कृष्णा शिलवंत

Horror

फेरा.....

फेरा.....

20 mins
712


   पूनमच्या सासर घरात पहाटे दोन वाजल्या पासून ये चला आवरा,आवरा,आवरा लवकर असं एकमेकांना सांगत आवराआवरीची एकप्रकारे लगीन घाईचं सुरू होती.नुकतंच लग्न झालेली पूनम नवीन घरात अंग चोरून आपलं स्वतःचं साहित्य बॅगमध्ये भरत होती.पण तिचं सारं लक्ष नव्या घरातील नवी मंडळी कोणी काय म्हणेल का?कोणी अचानक बोलावतील का? याकडे लागलं होतं.सावरगावच्या दिनकरराव जाधवांची ही लाडकी लेक नवीन लग्न होऊन भांबर गावात सून म्हणून आली होती.आज ते नवे वधूवर बोरसुत वरून सकाळी पाचच्या रेल्वेने हनिमून साठी नियोजित स्थळी रवाना होणार होते. त्यांनी आपण कोठे जाणार आहोत,काय काय पाहणार याबाबत घरात कोणालाचं पुसटशीही कल्पना दिलेली नव्हती.दोन वाजल्यापासून बोरूसूतला लवकरात लवकर पोहचून रेल्वे पकडण्यासाठीची ती धडपड सुरू होती. संपूर्ण तयारी पूर्ण झाल्यावर समीरचे बाबा संपतराव म्हणाले,चला! नारळ,लिंबू,अगरबत्ती,पाणी, शिरा, बिब्बा,कापूर,दहीभात,मिरच्या सगळं ताटात भरून बाहेर घ्या बघू. तसं सुनंदा वहिनीने सगळं साहित्य बाहेर उभ्या असलेल्या चारचाकी गाडी समोर आणून ठेवलं. समीरच्या बाबांनी नारळ फोडला,अगरबत्ती लावली,कापूर जाळला चार चाकांच्या खाली चार लिंबू ठेऊन ते फोडण्यासाठी समीरला गाडी पुढं घ्यायला सांगितली.गाडी लिंबावर घेतली खरं पण आश्चर्य म्हणावं की काय लिंबामधून चारी दिशेला टम्म फुगलेल्या जखमेतून रक्ताची एखादी चिळकांडी उडावी ना! अगदी तसा सर्व बाजूला लालबुंद फवारा उडाला. बापरे! त्या नकळत घडल्या प्रसंगाने साऱ्यांनी तोंडात बोटे घातली.सकाळच्या गार हवेत ही अंगाला सरसरून काटा येऊन घाम फुटावा ना! तसं भयभीत करणारं ते दृष्य होतं. सुनंदाने पुढं होऊन घाबरत घाबरत उगीचचं कुंकवाचं पाणी आहे असं म्हटल्यावर वातावरण काहीसं पूर्व पदावर आलं.

समोरचं दृष्य पाहिल्यावर पूनमला गाडीत बसण्याचं धाडस होईना.असे का झालं असेल,हा काही अपशकुन तर नाही ना? भानामतीचा प्रकार वगैरे नाही ना? या सारख्या नाना विचारांनी तिच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं.त्याचं वेळी वेळेचं गांभीर्य ओळखून सदरच्या गंभीर विषयाला बगल देण्यासाठी संपतराव पत्नीला म्हणाले अग,साऊ,जा जा सुई दोरा घेऊन ये.लिंबू, मिरच्या बिब्बा,गाडीला पुढं बांधायचं राहिलं बघ. पत्नीनं सुई दोरा आणल्यावर ते सारं साहित्य गडबडीने दोऱ्यात ओवून संपतरावांनी ते गाडीला पुढच्या बाजूला लोंबकळत बांधलं.व त्यांच्या परीने गंभीर वातावरण पूर्व पदावर आणण्याचा वरवरचा खटाटोप केला.तरी देखील नवखी पूनम अजूनही जीव मुठीत घेऊन हे सारं पाहत गर्भगळीत अवस्थेत एका बाजूला उभी होती.समीरने जवळ जाऊन धीर दिल्यावर कशीबशी ती वरच्या मनाने गाडीत बसण्यास तयार झाली.व पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास हाय बाय करत ते दोघेजण हा$ हा म्हणता घराचं कंपाउंड पार करून सर्वांच्या नजरेआड झाले.पण प्रवासाला जेमतेम दहा पंधराचं मिनिटे झाली असतील तोवर पूनम आई ग! मरेल ना तो,थांबवा गाडी,अहो गाडी थांबा.थांबवा ना! थांबवा म्हणते ना गाडी असं मोठं मोठ्याने किंचाळू लागली.समीरला तिला अचानक असं काय झालं काहीचं कळेना.तो कावरा बावरा झाला.कशीबशी गाडी त्याने एका बाजूला ओढली.पूनमला हलवून, हाक मारून,तोंडावर थोडं पाणी शिंपडून जागी केली.गाडीतल्या एसीमुळे बहुतेक तिला डोळा लागला असावा तर झोपेत पडलेल्या भयानक स्वप्नामुळे कदाचित ती किंचाळली असावी हे त्याने जाणले.थरथर कापत पूनम समीरला म्हणाली,अहो तो तरुण मुलगा,आपल्या गाडीच्या आडवा आला होता ना? अग कुठला तरुण!कधी आला होता!काय बरळतेस काय,शुद्धीवर ये आधी.असं समीर आता तिला थोडा ओरडलाच तशी ती भानावर आली. थोडसं पाणी पिऊन अंग चोरून काहीही न बोलता गाडीच्या काचेतून समोर रस्त्याकडे पाहत विचारमग्न अवस्थेत गप्प बसून राहिली.

              लग्न होऊन भांबर गावी येऊन आता कुठं तिला दोन तीन दिवस झाले होते.पण सासरी आल्यापासून तिला विचित्र व नको त्या मानसिकता डळमळीत करणाऱ्या प्रसंगांना सामोरे जावे लागले होते.येथे आलेल्या दुसऱ्याच दिवशी बाथरूम मध्ये तुला मारून टाकीन,चालती हो येथून,इथं का आली आहेस? कशाला आली आहेस?असे काहीसे चित्रविचित्र भयभयीत करणारे आवाज तिला ऐकू येऊ लागल्याने घाबरगुंडी उडाल्यामुळे कशीबशी चक्क अर्धवट अंघोळ करून ती बाहेर आली होती. आपल्या सोबत घडलेला हा प्रकार कोणाला सांगावा की नको या द्विधा मनस्थितीत घडलेली सारी हकीकत शेवटी न राहून तिने जाऊ सुनंदाला सांगितली.परंतू नवीन घर आहे ग!नवी जागा आहे.तेव्हा होतं असं कधी कधी तू नको लक्ष देऊ असं त्रोटक सांगत सुनंदाने ते सारं हसण्यावारी नेलं.पण तेव्हा पासून पूनम आपल्याच विचारात गढून गेली होती.आज बाहेर जायला मिळणार, मोकळा श्वास घेता येणार म्हणून स्वारी खुश होती.पण सकाळी सर्वांसमोर घडलेला ताजा प्रसंग आणि आता पडलेलं स्वप्न तिला काहीच सुचेना. समीर सारखा उच्चशिक्षित तरुण पती तर खानदानी गडगंज घरदार ज्यामध्ये कशाकशाची ददात नव्हती असं मोठं सासर एवढं सारं मनासारखं मिळाल्याने मध्यम कुटुंबातली पूनम खुश असताना तिच्या वाट्याला हे असे काही तरी येईल याची तिला काडीचीही कल्पना नसताना हे सारं प्रत्यक्ष कळत न कळत का असेना पण तिच्या सोबत घडत होतं. त्यामुळे नवखी पूनम पार भांबावून गेली होती. समीरशी हे बोलावं म्हटलं तर त्याचा तिला अजून काही पुरेसा अंदाज आला नव्हता म्हणून ती मूग गिळून गप्प होती.एव्हाना बघता बघता गाडी बोरूसुतला येऊन पोहचली.जेथे पूनमची नंदन सुजल (आशूताई )राहत होती.गाडी गेटजवळ येताच लाईट लागल्या.आगत स्वागत झाल्यावर पुन्हा एकदा दोघेजण फ्रेश झाले.चहापाणी उरकल्यावर म्हेवणे संग्रामरावांनी त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडले. रेल्वेत चढताना अनाहूतपणे समोर प्रत्यक्ष न दिसलेला एक माणूस तिला धडकला आणि क्षणात तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला.समीरने हाताला धरूनच तिला बुकिंग केलेल्या जागेवर नेऊन बसवलं.समीरला तर कोणी दिसलं नाही पण पूनम मात्र मला कोण तरी धडकले असे म्हणाली.यावर तो विचार मंथन करत असताना पाचची ती रेलगाडी मोठ्याने आवाज करत सुरू झाली.व त्यांचा पुढील प्रवास सुरू झाला.पूनम अजूनही डोळे न उघडता समीरच्या मांडीवर तशीच पडून होती.गाडी काही अंतर गेली असेल अन अवघ्या थोड्या अवधीत अचानक पूनम एका वेगळ्याचं भावविश्वात गेली. स्वप्नातल्या जगात! ज्या जगात ती सासर घरातला कोपरा नी कोपरा फिरत असलेचा तिला भास होऊ लागला.तिच्या समोर काही अंतरावर कोण तरी मुखवटा घातलेला अनोळखी मनुष्य दोन माणसांच्या पायाला धरून त्यांना ओढून नेत आहे.ज्या संबंधित दोघांची डोकी अर्धवट जळलेली असून त्यांचं शरीर रक्तबंबाळ अन दिसायला विद्रुप दिसत होतं.एकंदर पाहता क्षणी अंगावर सरसरून काटा आणणार उघड्या डोळ्यांनी पाहू नये असं ते दृष्य होतं.पुढे पुढे तर ते दोन्ही प्रेत समान देह पूनमकडे हात करत सोडव आम्हाला,सोडव यातून,ये ना!सोडव आम्हाला यातून प्लीज सोडव ना!अशी गयावया करू लागले.त्यांची चाललेली ती जीवघेणी धडपड पाहून पूनम ही न राहून मदतीसाठी हळूहळू पुढं सरकू लागली.तोच ती दोन भुतं,हा$हा भुतचं म्हणावे लागतील त्यांना कारण अचानक पूनमला ती ओरबाडू लागली.स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करू लागली.तिच्या समोर दिसू लागलेल्या अजस्त्र अशा काळ्याकुट्ट खोलच खोल दरीत तिला ढकलण्याचा खटाटोप करू लागली.पूनम त्या अनाहूतपणे चालून आलेल्या संकटातून स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागली.पण त्यांनी तिला घट्ट धरून एकाने तिच्या अंगावर रॉकेल ओतले.तर दुसरी काळीकुट्ट आकृती माचीस ओढण्यासाठी पुढे सरकू लागली होती.तसं त्यांच्या हाताला जोरदार झटका देऊन पूनम सैरावैरा धावत सुटली.जीवावर बेतलेल्या संकटाच्या कचाट्यातून स्वतःला सावरण्यासाठी जीव तोडून पळण्याची शर्थ करू लागली.मदतीचा धावा करू लागली.वाट दिसेल तिकडे मोकाट कानात वारं गेल्यागत धावत होती खरं फिरून फिरून ती त्यांच्याचं जवळ जात होती. अखेरीस आपण आता यातून वाचू शकत नाही या विचाराने तिला दरदरून घाम फुटला. घशाला कोरड पडली.स्वतःला त्या डोंगरा एवढ्या संकटातून सोडवण्यासाठी कोणी तरी मदतीला यावे याकरिता मोठं मोठ्याने ओरडू लागली,हात पाय झाडू लागली.डोकं आपटून घेऊ लागली.केसं उपटू लागली.समीर तिची चाललेली ती अनावश्यक धडपड उघड्या डोळ्यांनी पाहत होता.गाढ झोपेत असलेली पूनम अचानक अशी का करत आहे. म्हणून समीरने तिला हालवून उठवण्याचा प्रयत्न केला पण तिच्यावर काहीच फरक पडेना.मग अंतिम उपाय म्हणून तिच्या तोंडावर त्याने पाणी शिंपडले तेव्हा कुठे ती खडबडून जागी झाली व समीरला घट्ट बिलगली.त्यांच्या सोबत असलेले प्रवाशी थरथर कापत असलेल्या बिथरलेल्या पूनम व समीरकडे शाशंक नजरेनं पाहू लागले.समीरने पूनमला धीर दिला,तिला प्यायला पाणी दिल्यावर अगदी प्रेमळ शब्दात,काय झालं,तुला काही होतंय का?तुझी तब्येत बरी नाही का?तुला पुन्हा स्वप्न पडलं का?अशी आपलेपणाने विचारपूस केली.

         गेली दोन वर्षे नोकरी निमित्त तो रशियाला होता.या कालावधीत गावाकडे आपल्या राहत्या घरात काही विचित्र घडलं असावं यांबद्दल त्याला सुतमात्र कल्पना नव्हती.पण काय तरी गोडबंगाल निश्चित घडलं असावं असं एकंदर पूनमच्या झोपेतील संवादावरून त्याला थोडसं जाणवू लागलं. पण शिक्कामोर्तब होणं बाकी होतं.समीरने पूनमला धीर दिला.तसं घरात आल्या पासून आपल्याला कशी भीती वाटते,भिंतीतून वेगवेगळे आवाज कसे ऐकू आले.एकटीला घरात थांबावंस वाटत नाही. कोण तरी अंगाशी खेळत असल्या सारखं वाटतं.तर सकाळी बाहेर पडल्यापासून डोळे झाकल्या बरोबर स्वप्नं पाठ सोडेनात आणि रेल्वे स्टँडवर धडकलेला अदृष्य माणूस याबाबत भडाभडा सविस्तर सर्व बाबींचा समीर जवळ उलगडा केला.सगळं ऐकून घेतल्यावर तो ही थोडा कचरलाचं.अर्थात भूतंखेतं, भानामती,जादूटोणा,पिशाच्च बाधा याबाबत तो कधी फारसा विचार देखील करत नसे.मेलेल्या माणसांपेक्षा जिवंत माणसचं महाभयंकर भूतं असतात असे तो नेहमी म्हणायचा.राहता राहिला मेलेल्या भूतांचा प्रश्न! मेल्यावर जळून राख होणारा माणूस भूत बरं कसा होईल! या अनुषंगाने तो समोरच्याशी खूप तंडायचा.तर भूताबाबतच्या कोणत्याही घटनेनं आज पर्यंतच्या त्याच्या आयुष्यात तर कधीच शिरकाव केला नव्हता.अगदी रात्री अंधारी कुठं ही जाण्यास समीर तयारचं नव्हे तर पैज लावून एका पायावर जाऊन ही आला होता.पण आताचं नवीनच घरात आलेली पूनम तर सांगतेच आहे पण रशिया वरून आल्यापासून स्वतः बाबतीत एक दोन विचित्र घटनांनी दणका दिला होता.कारण त्याला ही काहीसे तसेच अनुभव येऊन गेले होते. जसे की,समोर एक चहाचा ग्लास ठेवलेला त्याला दिसला होता व क्षणात तिथून गायब.हँगरचा अडकवलेला शर्ट तो घ्यायच्या अगोदरच बेडवर आला होता.पण निडर समीरने त्याकडे लक्ष दिलं नव्हतं.प्रवासातील थकव्यामुळे आपल्याला असं झालं असेल अशी त्याने मनाची समजूत घातली होती.पण आज सकाळीच लिंबामधून उडालेला रक्ताचा फवारा! व दोनदा पूनमला पडलेलं ते स्वप्न आणि रेल्वेत त्याला न दिसलेला पण पूनमला धडकलेला तो माणूस विचार करून त्याचं डोकं ठणकून अक्षरशः फुटायची वेळ आली होती.

                  थोड्या वेळाने त्याने सहज पूनमच्या अंगाला हात लावला तर त्याला अक्षरशः चटकाचं बसला.तिला फणफणून ताप आला होता.डोकं तर खूपचं तापलं होतं.ती मलूल होऊन समीरच्या मांडीवर त्याच्याकडे आशाळभूत नजरेनं बघत निपचित पडली होती.पुन्हा स्वप्न पडेल म्हणून डोळे झाकत असतानाही झाकायचं नाव घेत नव्हती. समोर उद्भवलेल्या त्या नाजूक स्थितीने समीरची विचार तंद्री भग्न पावली.विचारांती त्याने पुढच्या स्टेशनवर उतरण्याचा मनाशी ठाम निश्चय केला. आपली सहचारिणी ठीक नाही तर कुठला हनिमून आणि कुठलं काय असा विचार त्याने केला.तापाचा बहर चढल्याने पूनम डोळे सताड उघडे असताना ही कायबाय बरळत होती.शाम्या सोड मला,सोड म्हणतोय ना!सोड लवकर,सोड नाहीतर तुझ्या घराची राखरांगोळी केल्याशिवाय गप्प बसणार नाही.चिमाला सोड,सोड म्हणतोय ना चिमाला!अरे असे बायकासारखे बांधून घालून काय मारता रे लेकांनो,तुम्ही मर्द नव्हेत रे?पळपुटे बायले आहात बायले.पाठमोरा वार करता काय? "पण लक्षात ठेवा साल्यांनो मी मेलो ना!, तरी तुमच्या आणि तुमच्या घराच्या मानगुटीवर बसल्याशिवाय एकजात राहणार नाही."संपतराव तुला लाज वाटायला हवी रे लाज !अशी पूनम एकसारखी काही तरी न थांबता बरळत होती.पण पूनम तोंडी घेत असलेल्या दूरच्या पाहुण्या माणसांच्या नावांनी मात्र समीर पुरता उडालाचं.तो पुन्हा विचार मग्न झाला.अरे काल परवा आलेल्या पूनमला चिमाचं नाव कस माहीत!आपला भाऊ शामाला ती कोणाला सोडायला सांगत होती.म्हणजे घरात काही तरी लपडं नक्की झालं आहे तर.आणि ते आपल्या पासून लपविले असल्याची त्याला खात्री झाली.दहा पंधरा मिनिटात पुढील स्टेशन आलं. पूनमच्या अंगात खाली उतरण्याचा त्राण उरला नसल्याने समीरने तिला लहान मुलासारखं उचलून घेतलं.खाली उतरल्यावर कोठे जायचं!कसं जायचं!त्याला काहीच सुचेना. प्रथमतः पूनमला डॉक्टरांना दाखवावे लागेल म्हणून त्याने पत्ता विचारला व ते दोघे रिक्षाने डॉक्टरांच्याकडे गेले.पूनमला तपासल्यावर तिला ताप वगैरे होता याबाबत डॉक्टर शाशंक असल्याचे समीरला जाणवले.म्हणून त्याने स्वतः तिच्या अंगाला हात लावून पाहिले तर काय खरोखरच तिचं अंग पूर्ण गार होतं.समीर ही आता सैरभैर झाला. डॉक्टरांनी द्यायचे म्हणून किरकोळ औषध दिले व जायला सांगितले.आता ती व्यवस्थित बोलत होती.अगदी नॉर्मल वाटत होती.समीरला आश्चर्य वाटले.पण तरीही त्याने आता माघारी जायचा निर्णय घेतला.पूनमला स्वतः ही खजिल झाल्यासारखी दिसत होती.

                     दोघेजण खाजगी गाडी करून पुन्हा बोरूसुतला पोहचले.त्यांना पुन्हा परत आलेले पाहून संग्राम व सुजलला काहीच कळेना.एव्हाना कातरवेळ व्हायला आली होती.सुजलने सर्वांना चहा केला.चहा घेता घेता परत का आलात असा विषय निघणार होता.त्यावेळी राजूने मारलेला चेंडू झाडावर अडकला म्हणून त्याने रडून सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधले असता बसल्या जाग्यावरून विचित्र पद्धतीने डोळे फिरवत,विद्रुप चेहरा करत पूनमने तो चेंडू झाडावरून खाली पाडला.सर्वांच्या डोळ्यादेखत पूनमचा तो विचित्र कारनामा पाहून सर्वांचीचं पळताभुई थोडी झाली.तिघे ही जण घाबरून आपापल्या खुर्चीत रेलून बसले.आता करायचं काय ?असा गंभीर प्रश्न त्यांना पडला. त्यांच्या गावात लिंगाप्पा नावाचा एक आदिवासी माणूस होता.तो भूतप्रेत वगैरे गोष्टी बघतो,अंगारा धुपारा देतो.असं त्यांच्या ऐकिवात होतं.त्यामुळे समोर काहीतरी भलतंच आहे हे सर्वांनी ताडल्याने संग्राम आपल्या नोकराला घेऊन थेट लिंगाप्पाकडे गेला व त्याला पुढे घालून घरी घेऊनच आला.

                  सुजलने लगोलग मघाशीच राजू व लहानग्या राजश्रीला शेजारच्या घरी नोकरांकरवी पाठवले होते.दहा वाजत आले होते तरी ही कोणालाचं जेवायची देखील शुद्ध राहिली नव्हती. संग्रामराव गावात गेले त्यावेळी पूनमने अचानक समीरवर तांब्या फेकून मारला नशीब बलवत्तर म्हणून त्याने कसाबसा तो चुकविला व संधी साधून जवळ असलेल्या दोरीने त्याने पूनमला सिमेंटच्या खांबाला गुंडाळलेले व तिचे हात करकचून बांधून ठेवले होते.तिला बांधल्यावर ती चित्र विचित्र आवाज काढू लागली मोठं मोठ्याने ओरडत लागली.तिच्या तोंडातून एकाचं वेळी दोन दोन आवाज बाहेर येत असल्या सारखे वाटतं होते.ते आवाज ऐकताना पाचावर धारण बसत होती.ती रडत काय होती, कायबाय बरळत काय होती.मोठं मोठ्याने खिदळत काय होती.खांबाला हिसडे काय देत होती.एकंदर सारचं वातावरण एकदम तप्त झालं होतं.लिंगाप्पा आला तेव्हा कुठं सर्वांच्या जिवात जीव आला. लिंगाप्पाने येताना सोबत बरेच साहित्य आणलं होतं.लिंबू,मिरच्या,बिब्बा,पान,सुपारी,एक काळी बाहुली,भोपळा,रस्सी,मानवी डोक्याचा सांगाडा,दोन मोठी हाडं एक गोल तबकडी आणि अंगारा धुपारा हे सगळं साहित्य त्याने बाहेर काढलं.पूनमच्या डोक्यावरून हाडाने ओवाळणी केल्यागत केलं व पांढऱ्या रंगाचा इभूत तिच्या अंगावर फेकला तशी ती चपताळल्या सारखी,मारक्या म्हैशी सारखी, दुखावलेल्या वाघाणीसारखी करू लागली.तरी बरं तिला खांबाला बांधली होती.नाहीतर क्षणाचा ही विलंब न लावता तिने लिंगाप्पाला कदाचित गिळून, चावून,कुरतडून खाऊनही टाकलं असतं.अशी ती खांबाला हिसडा देत होती.कधी ही न पाहिल्यासारखा तो भयंकर चेहरा पाहून लिंगाप्पा ही घाबरल्यासारखा दिसत होता.आता काय सांगावं म्हणून तो म्हणाला आज अमावास्या असल्याने झाड आवरण अवघड तर जवळ जाणं त्याहूनही धोक्याचं आहे.आज तिला बांधलेल्या अवस्थेत राहू दे.तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही अजून ही तारेने तिला करकचून बांधू शकता.नाहीतर तशीच ठेवून द्या पण बिलकुल सोडू नका.हे खूप मोठं पिशाच्च आहे. माझ्या कडून तर हे काम होणं मला शक्य वाटतं नाही.मी जातो म्हणून तो तडक वाटेलाचं लागला.

                 सुजल,संग्राम व समीर रात्रभर पूनम समोर जागे राहून तिच्याकडे एकटक बघत बसले होते.कोणाच्याही डोळ्याला डोळा लागला नव्हता. पूनम केविलवाणा चेहरा करून अहो मला सोडा ओ,माझा दोरी बांधलेला हात दुखायला लागलाय मला सोडा.मला अशी का बांधून ठेवली आहे.अशा विनवण्या करीत होती.परंतू तिला सोडण्याची कोणाची हिम्मत होत नव्हती.एक दोन वेळा समीरच्यातील नवरा जागा ही झाला होता पण सुजलने त्याला पुढे जाण्यास थांबवले होते. ताटकळत बसून तिघांनी रात्र काढली.तिला कुठं कसं व कोणाकडे घेऊन जायचं या विचारात त्यांची सारी रात्र कण्हत गेली होती.सुजलने सगळी इतंभूत बातमी फोन वरून भांबर गावी बाबाला दिल्याने तात्काळ शामराव,सुनंदा,साऊ व संपतराव गाडी काढून सकाळीच बोरूसुतला आले.बाबा समोर दिसताच वैतागलेल्या समीरने माझ्या माघारी आपल्या घरी असं काय गोडबंगाल घडले आहे का? ज्याचा तुम्ही माझ्या जवळ उहापोह केला नाहीत असे चढ्या आवाजात त्यांना विचारले.

                    समोर पेचचं असा गुंतागुंतीचा निर्माण झाला होता की साऱ्या सत्य बाबींचा उलगडा करण्याशिवाय त्यांच्याकडे आता गत्यंतर उरले नव्हते. डोक्याला हात लावून संपतराव बोलू लागले. समीर अरे गेल्या वर्षी इथं खूप मोठं रामायण घडलं रे! चिमा व चिंतामणी तुझे अजमपूरचे लांबचे चुलत भाऊ बहीण तर तुला माहीतचं आहेत ना!आपलं बांधलेलं हे नवे घर,गाड्या,जमीनजुमला बघून आपल्या इस्टेतील भाग आपणांस मिळावा म्हणून सातत्याने माझ्यापाठी तगादा लावून होते.भांडण काढत होते.धमक्यांचे फोन करत होते.प्रसंग घडला त्या दिवशी ही ते दोघे कुठलेसे जुने कागद घेऊन पुरावा दाखवत होते.आमच्या संपत्तीत हिस्सेदार नसूनही साऱ्या संपत्तीवर हक्क दावा करत होते. कर्मधर्म संयोगाने त्या दिवशी आम्ही सर्वजण घरी असल्याने भांडणाचा रागरंग विकोपाला गेला. माझ्या डोक्यात चिंतामणी काठी घालणार त्याचं क्षणी श्यामने रागाच्या भरात पाठीमागून चिंतामणीच्या डोक्यात हॉकी स्टिट घातली.पाठून डोक्यात झालेल्या जोरदार वर्मी हल्ल्यानं पहिलवान गडी खाली कोसळल्याने आपसूक आमच्या हाती आला. त्याच डोकं फुटून तो बेशुद्ध झाला.तर इकडं चिमाला सुनंदाने व साऊने बांधून घातली होती तिला ही रागाच्या सनकी सरशी श्यामने हॉकी स्टिकने बेदम मारली.हे दोघे भाऊ बहीण आम्हाला गेले वर्षभर अजिबात सुखाने जगू देत नव्हते. कळत न कळत म्हण अथवा रागापोटी म्हण अनाहूतपणे ते दोघे ठार मारले गेले,त्यांना रॉकेलने अर्धवट जाळून आम्ही जंगलात फेकून दिले. मी कमावलेल्या मिळकती मध्ये त्यांचा काडीमात्र संबंध नसताना ते दोघे आमच्यावर प्रेशर टाकत होते,दादागिरी करत होते कारण चिंतामणी गुंड प्रवृत्तीचा होता.एक वर्ष झाले अद्यापि कोणाला काही माहीत नाही.आणि त्यांना कंटाळलेल्या इतर लोकांना ही बरं वाटल्याने कोणीही पोलीस चौकीत तक्रार देखील दाखल केलेली नाही.पण आता समोर जे घडतंय हे सारं खूपच भयानक आहे.गेली वर्षभरात घरातील परिस्थिती तर अति बैचेन करणारी झाली आहे ना धंद्यापाण्यात यश आहे.ना घरात स्थिर वाटतंय. घरात येणाऱ्या वेगवेगळ्या आवाजने घरात थांबू वाटत नाही.भीती वाटते,कधी काय विचित्र घडेल सांगता येत नाही असे असताना ही आम्ही हे सारं कसं आलबेल चालू ठेवलं आहे.पण हळदीच्या अंगानं आलेल्या पूनमला कदाचित त्यांच्या भूतानं पछाडलं असावं असं ही पुढं जाऊन ते स्वतःचं म्हणाले.आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी कोणतं बरं पाऊल उचलायचं ! यासाठी सारी मंडळी डोक्याला हात लावून विचार करत बसली.सगळ्यांच्या डोक्यात विचारांचा वणवा पेटला होता.पूनम अजूनही बांधलेल्या अवस्थेत होती.तिचा चेहरा पाहून साऊ आई म्हणाली अमावस्या संपली आहे.कदाचित पिशाच्च बाधे पासून ती बाजूला झाली असेल सोडा तिला.कारण आता ती खरंच मलूल आणि निस्तेज दिसत होती.आपल्या न उचलणाऱ्या हातांनी ती समीरला खुणावत होती.तिची ती केविलवाणी अवस्था पाहून त्याला राहवलं नाही.धाडस करून त्याने तिला रिकामी केली.ती खूपच अशक्त झाली होती.गेले दीड दिवस तिच्या पोटात काहीच नव्हते त्यामुळे तिला खायला दिले गेले.आपल्याला काहीच झालं नव्हतं अशा अविर्भावात ती खात बसली होती. बाकीचे सारे जण कुजबुज करत तिच्याकडे पाहत होते. लिंगाप्पा नाही होय म्हणत होता घाबरला होता तरीही त्याला बळजबरीने विनंती करून घरी आणलं व त्याला सोबत घेऊन सर्वजण पुढचं पाऊल उचलण्यासाठी चर्चा करीत होते.शेवटी लिंगाप्पाने गुरुवारी त्याचा गुरू सोमेश्वरचं याचा सोक्षमोक्ष लावतील माझ्याकडून काहीही होणार नसल्याचं सांगितल्यावर सगळेजण तिला घेऊन भांबर गावी रवाना झाले.

          झाल्या प्रकाराने सारे जण जीव मुठीत घेऊन गाडीत बसले होते.राहिलेला एक दिवस घरात कसा काढायचा याबाबत त्यांच्या चेहऱ्यावर चिंतातूर सावट स्पष्ट दिसत होते. साधारण सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान सर्वजण घरी आले.समीरच सारं लक्ष पूनमवर होतं.ती खूप शांत निश्चल दिसत होती.कदाचित वादळा पूर्वीची तर ही शांतता नसेल ना!अशी त्याच्या मनाची धाकधूक त्याला जाणवत होती.पण गाडीत झोपली होती तरी तिला स्वप्न वगैरे काही पडलं न्हवत की तिने काहीही आरडाओरड ही केली नव्हती.रात्रीची जेवणं झाली.समीरला तिच्यासोबत बेडरूममध्ये झोपायला सुरक्षित वाटतं नव्हतं.पण बोलणार कसं.तेवढ्यात संपतरावचं म्हणाले आज सगळेजण हॉललाचं झोपू.समीरला थोडं बिनधास्त वाटलं.नाहीतर त्याने अनुभवच तसा घेतला होता ना!ज्यामुळे मी $मी म्हणणारा ही टरकला असता.रात्री बारा वाजल्यावर घुबड घुमल्या सारखा आवाज घुमू लागला.सारे जण गाढ झोपेत असता समीरला जाणीव झाली कारण तो फक्त डोळे झाकून नुसताचं पडला होता.डोळे उघडून पाहतो तर पूनम एकटक त्याच्याकडे बघत होती,तिचे डोळे कोळसे पेटवलेल्या इंगळा सारखे लालबुंद दिसत होते.सावजावर झेप घ्यायला टपलेल्या वाघिणी सारखी ती खुन्नस देऊन त्याच्याकडे बघत होती. तिच्या नजरेस नजर दिल्यावर भीतीनं समीरची अक्षरशः घाबरगुंडी उडाली.तो थरथर कापू लागला. स्वतःला वाचविण्याकरिता त्याने टणकन सोफ्यावर उडी मारली तोचं छताचे मोठे झुंबर तुटून जोरात खालच्या फरशीवर आदळले.झुंबरच्या मोठ्या आवाजाने सर्वजण खडबडून जागे झाले.जर समीर त्या जागेवरून उठला नसता तर कदाचित तो आता जिवंत राहिला नसता एवढा तो भयानक प्रसंग होता.सगळे जण ताडकन वर उठले पण एवढ्या जोरात झुंबरचा आवाज होऊन ही पूनम गाढ झोपलेल्या अवस्थेत असल्यासारखी तशीच पडून होती.हळूहळू घुबड घुमल्या सारखा तार छेड आवाज एकसारखा साऱ्या घरात घुमू लागला.जेवण खोलीत कपाटात असलेली भांडी एकमेकांवर आपटून घरभर नुसता आवाजच आवाज होऊ लागला.डोळे गरगर फिरवत हळूहळू पूनम ही वर उठली.तिच्यात एक वेगळाच रागरंग जाणवत होता. तिची सूडाची नजर कोणाला तरी शोधत होती.तिनं हेरलं,हो तिने शामरावला टार्गेट केलं.लांब हात करून तिने त्याला वर उचलून असा खाली आदळला की त्याच्या जीवघेण्या रडण्याचा आकांताने घरातली सारी मंडळी हादरून गेली. त्यांना कुठं पळावं अन कुठं लपावं काहीचं समजेना,साऊ बाहेर पळण्यासाठी दरवाजाकडे वळली तर तिचे केस धरून उचलून तिला सोफ्यावर अशी फेकली की,ती बिचारी म्हातारी अर्धमेली होऊन तोंडाचं भोकाड पसरून तशीच न हालता वर तोंड करून पडली.पूनमचा तो आक्राळ विक्राळ अवतार पाहून संपतराव,सुनंदा आणि समीर भांबावले.आता कोणाचा नंबर म्हणून स्वतःचं अंग चोरून कोपऱ्यात घुसण्याच्या सुरक्षित जागेचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागले.तोच सुनंदाला पूनमने होत्या त्या जाग्यावर डोक्यावर उभी केली.ती ठो$ठो$ठो बोंबलू लागली.संपतराव साऱ्या कोपऱ्या कोपऱ्यातून डोळे झाकून वाट दिसेल तिकडे धावू लागले.का कोणास ठाऊक पूनमने समीरला अद्यापि हात लावला नव्हता.मात्र घरातील एक ही वस्तू मूळ जाग्यावर राहिली नव्हती.आता ती पूनम आहे यावर कोणीही विश्वास ठेवला नसता एवढी ती विचित्र भासत होती.तिचे डोळे,केस हात पाय सगळं सगळं पूर्ण वेगळंच दिसत होतं.ती पूनम नव्हे भूत आहे हो भूतचं असं कोणी ही म्हणाले असते.आज प्रयन्त समीरने बरेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम केले होते.भुताखेता बाबत बऱ्याच लोकांशी भांडला होता.भूत वाड्यात अंधाऱ्या रात्री जाऊन आला होता.पण तो खमक्या गडी सुद्धा समोरचं दृश्य पाहून पार गांगरून गेला होता.नव्हे नव्हे पुरता हादरूनचं गेला होता म्हणा ना!कडक्याच्या थंडीच्या त्या दिवसात ही त्याच्या अंगातून घामाच्या पाण्यासारख्या धारा वाहत होत्या.समोर जे घडत होतं त्याने तो पुरता हतबलचं झाला होता.त्याच्या समोर पूनम पत्नी म्हणून नावाला होती. कर्ता करविता धनी मात्र वेगळाच होता.समीर सारखा दणकट शरीर यष्टीचा,कराटे चॅम्पियन तरुण देखील त्या ताकती पुढं क्षुल्लक भासत होता.मग हे समोर आहे हे आहे तरी काय याचा समीर विचार करत होता.तोच पाठीमागून एक जोराचा दणका समीरला बसलाच.त्याला बघेल तिकडे पूनम आणि पूनमच दिसू लागली.बसलेल्या फटक्या सरशी पुढची दोन तीन मिनिटे त्याला काहीच समजलं नाही.रात्रभर घरात नुसती रडारड,गोंधळ,आवाज,व हाणामारी सुरू होती.पूनमच्या मारापासून कोणीच वाचलं नव्हतं.एवढं आखीव रेखीव घरं,घर म्हणावं असं दिसतं नव्हतं.त्या घरात थांबावं असं वाटतं नव्हतं. नुसतं भूताचं हो फक्त भूतातचं साम्राज्य दिसत होतं.    

                     सकाळचे सहा वाजले आणि पूनम आता पुन्हा पूर्व पदावर आली.हो आता ती काहीच झालं नाही अशा रीतीने खाली कोसळली.रात्रभर सुनंदा डोक्यावर उभी होती,तिला सरळ होता येईना. संपतराव एका कोपऱ्यात उताणे पडले होते.त्यांना हलता येत नव्हतं.शामराव वरून खाली आदळल्याने त्यांचे कंबरडे मोडले होते.तो ही कण्हत फरशीवर डोळे छताला लावून थरथरत पडला होता.तर साऊ आईचा रात्री पासून आवासून केलेला तोंडाचा जबडा अजूनही मिटलेले नव्हता.म्हणायला फक्त समीरराव तेवढाचं बऱ्यापैकी होता.त्याने सर्वांना उठवण्याची धडपड केली.आणि पहिल्यांदा लिंगाप्पाला फोन केला.सोमेश्वर,लिंगाप्पा व चार पाच जणांचा ताफा घेऊन बरोबर अकरा वाजता ते संपतरावांच्या घरी पोहचले.खाली तळघरात त्यांनी एक मोठं रिंगण आखून त्यात पूनमला एका खांबाला बांधून घातली.सोबत आणलेले कायबाय सारं सामान विशिष्ट पद्धतीने लावून घेतले.त्या खांबाच्या समोर एक खड्डा तयार करून त्यात वेगवेगळ्या लाकडी काड्या,तूप,बिब्बा,कापूर,मीठ,चंदनाच्या काड्या,पूनमच्या अंगावरील साडीचा एक तुकडा, हळद कुंकू,लिंबू, मीठ,मोहरी असं बरचसं सामान टाकलं व त्यास अग्नी दिली.त्यामुळे साऱ्या घरात आता एक वेगळ्याचं प्रकारचा सुवासिक घमघमाट सुटला.पूनम मात्र आता पुन्हा एकदा विचित्र अशा वरच्या पटीत ओरडू लागली.रात्रीचा दणका बसलेले घरचे सगळे जण भेदरलेल्या अवस्थेत ते सारं पाहत होते,कारण तिचा तो आवाज मानवी असा वाटतंच नव्हता.सोमेश्वर तिच्याशी बोलू लागले,बोल,कोण आहेस तू,का आला आहेस?सांग लवकर सांग नाहीतर आता तुला सोडणार नाही.बाटलीतचं बंद करून ठेवतो.तशी पूनम मोठं मोठ्याने हसू लागली. सोमेश्वर पण या विद्येतील ताकतवान गडी वाटतं होता.काल रात्री अक्राळ विक्राळ किंचाळणारं ते भूत आता फक्त मारक्या जनावरासारखं त्याच्याकडं टक लावून बघत होतं.बोलत मात्र काहीच नव्हतं.बऱ्याच वेळानं ते बोलू लागलं,मी ना मी चिंतामणी!! नाही चिमा आहे चिमा,थांब तुझा करून टाकतो खिमा. असे म्हणून पूनम मोठं मोठ्याने बेसुर हसू लागली. आणि बाकीचे मात्र गर्भगळीत होऊन तिच्याकडे पाहत राहिले.

           संपतराव आता गोंधळले.आपलं सारं बिंग फुटणार म्हणून गडबडले.पण घरावर संकटचं असं आलं होत की,सर्व बाबींचा खुलासा झाल्याशिवाय सोमेश्वर त्यावर उपाय करणं शक्य नव्हतं.पूनम सुटण्यासाठी धडपड करीत होती.तिच्या हातातून रक्त वाहत होतं.तिच्या कर्णकर्कश आवाजानं सारं तळघर हादरून गेलं होते.ती सुटून येईल की काय म्हणून संपतराव साऊ,सुनंदा,शामराव यांच्या चेहऱ्यावर भीतीच सावट स्पष्ट दिसत होतं.त्यामुळे संपतरावांनी न विचारता क्रमवार सगळी घटना सविस्तरपणे सोमेश्वरांना सांगून टाकली.सर्व ऐकून घेतल्यावर सोमेश्वर म्हणाला,आता यावर एकच पर्याय दिसतो आहे.मृत सांगाडयाचा कोणता तरी भाग तुम्हाला आणावा लागेल.त्याचं योग्य पद्धतीने किर्याक्रम करावं लागेल आणि त्यांची हावमुक्तीतून सोडवणूक करून घ्यावी लागेल.तरच नवी नवरी पूनमला त्यांनी हळदीच्या अंगानं धरली असल्याने तिला आपण यातून बाहेर काढू शकतो.अन्यथा आता तरी सर्व वाटा बंद दिसत आहेत.

             सर्वांनी बसून पूनम साठी आणि सर्वांची यातून सुटका करावी या हेतूने खूप वेळ चर्चा केली जंगलात जायची तयारी दर्शविली.संग्रामला ही बोलावून घेतले.समीर संपतराव व संग्राम जंगलात जायला सज्ज झाले.तिथे पोहचले तेव्हा रात्रीचे सुमारे अकरा वाजले होते.घाबरत घाबरत त्यांनी आत जायला सुरुवात केली खरी पण वेगवेगळ्या आवाजानं त्यांना धाडस लागेना.घडल्या घटनेला जवळपास वर्ष होऊन गेलं होते.त्यामुळे शोधायचं कुठं त्यांना खूपचं पळापळ करावी लागणार होती. एक दोन तास ते नुसतंच इकडून तिकडे फिरत होते. पण कशा कशाचा पत्ता लागला नव्हता.फिरून फिरून ते त्याचं जागी येत होते.थोड्या वेळाने एक पुसटशी आकृती त्यांच्या मागे लागली.तिघे जण तीन बाजूला वाट दिसेल तिकडे पळू लागले.पडत होते, ठेचकळत होते,झाडाला आपटत होते,रडत होते, आरडत होते,विव्हळत होते.पण ती आकृती काय त्यांचा पाठलाग सोडेना.तिघे ही अर्धमेले झाले होते. कोठून झाडातून तरी आवाज यायचा,किंवा जमिनीतून यायचा तर कधी हवेतून आल्यासारखा वाटायचा.पण आवाज आला की ते सैरभैर व्हायचे आणि पुन्हा धावायचे.किती तरी वेळा तिघांना वरून खाली टाकलं होतं.झाडातून,हवेत त्या आकृतीतून भयावह विद्रुप चेहेरे दिसले की,तिघे पळायचे.आता त्यांच्यात त्राण उरला नव्हता.सोमेश्वरने तर सकाळी सूर्योदया पूर्वी घरी यायला सांगितले होते.करायचे तर काय करायचं हा प्रश्न आ वासून त्यांच्या समोर उभा होता.समीरच्या गळ्यात देवाचा ताईत होता.त्याने तो छातीशी घट्ट दाबून धरला आणि असेल तेवढ्या मोठ्या आवाजात म्हणाला देवा वाचव रे बाबा आम्हाला यातून तुझी अनादी शक्ती लाव आमच्या बाजूने आणि या धर्म संकटातून सोडव आम्हाला. विनाकारण काही ही दोष नसताना पूनमला व घराला या जीवघेण्या संकटातून सोडव रे बाबा. मी तुझ्यापुढे नतमस्तक होतो. त्या दोघांचा शरीराचा कोणता तरी भाग मिळू दे.आमची झाली चुकी पोटात घालून घे रे बाबा! आता लढण्याची ताकत माझ्यात नाही उरली.आणि त्याने दोघांना त्याचं वरच्या आवाजात हाक मारली.आणि यावेळी समीरच्या त्या आवाजाने संपतराव व संग्राम समीर जवळ आले.पुन्हा जवळ जवळ रांगत रांगतचं ते त्या अवशेषांचा शोधू घेऊ लागले.सरतेशेवटी समीरला एके ठिकाणी एक कवटी व त्यापुढे काही फर्लांगावर दुसरी कवटी सापडली.तिघे ही कवट्या घेऊन घरी परतणार पण त्यांना पुढची वाट मिळेना ते गोल गोल तिथंच फिरत होते.काय होत होत,कुठं चुकत होतं त्यांना काही समजेना.अखेर समीरने पुन्हा एकदा अनादी शक्तीचा धावा केला.व रस्ता सापडला.पण गाडीत हवा नव्हती ते तिघे कसेबसे रडत खडत, पळत,धडपडत बसत उठत कसेबसे घरी पोहचले. यांची शारीरिक अवस्था खूप बिकट झाली होती .

                       सोमेश्वर म्हणाले या कवट्या दहन विधी रितसर केल्यावरचं मला पुढील सोपस्कार पार पाडत येईल चला विधीवत दहन क्रियेसाठी सारे जण मागील शेतात जाऊया. पूनम तशीच अजूनही बांधलेल्या अवस्थेत मलूल मान टाकून बांधलेल्या स्थितीत उभी होती.इकडे पहिली दहन क्रिया सुरू असताना कवटी फुटून अगदी नेम धरल्या सारखी शामरावच्या डोक्यावर येऊन आदळली तसा तो जाग्यावर होत्याचा नव्हता झाला.घाई घाईत दुसरी कवटी दहन करायला घेतली असता त्या मृत कवटीच्या सुनंदाच्या डोक्याचा वेध घेतला तशी ती ही गेली.अर्थात चिमानं म्हटल्या प्रमाणे जणू मेल्यावरही तो खराखुरा मानगुटीवर बसल्यासारखं ते चित्र होतं. त्या दोन कवटींच्या दहन क्रियेविधी वेळी शामराव व सुनंदाची ही दहन विधी करावी लागेल असे कोणाला स्वप्नात ही वाटलं नव्हतं. रडत आरडत, आक्रोश करत तेथील सर्व क्रिया पूर्ण करून घरात आले तर घरातील विधी करताना साऊच्या पदराला आग लागून ती देखील हा$हा म्हणता सर्वांच्या डोळ्या समोर गतप्राण झाली.अगदी अल्पावधीत घरातले तिघेजण देवाघरी गेले होते.समोर घडल्या प्रसंगांने समीरसह सारेच दुःखी झाले होते.समीर गुडघ्यात तोंड खुपसून हमसून हमसून रडत होता.डोकं धरून हे काय चाललंय म्हणून डोळ्यातून राग व पश्चातापाची दुहेरी आग ओकत होता.एव्हाना ते साऊला ही अग्नी देऊन आले होते.संग्राम व संपतराव त्याला धीर देत होते.पण तो समजून घेण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हता.हळूहळू पूनम पूर्णपणे शुद्धीवर येत असल्याचे दिसू लागले.सोमेश्वर म्हणाले केलेला विधी यशाकडे वाटचाल करत आहे.आता शेवटचा एकच मुद्दा राहिला आहे.या हवन भोवती पूनमला पाच फेरे फिरवायला हवे.पण त्यासाठी घरचे वडीलधारे म्हणून संपतरावांनी सोबत करावी लागेल.पूनम आता शुद्धीत व एकदम बरी दिसत होती.तरीही संपतराव मागेपुढे होत समोर आले.चार फेरे कसेबसे पूर्ण झाले पण पाचवा फेरा अंतिम रेषेवर येताच हवन जवळ असलेला चाकू पूनमने संपतरावांच्या पोटात घुसवला.कोणी ही त्या त्यांना सावरण्याच्या आत त्याचाही खेळ ही खल्लास.एका अनामिक शक्तीचा घरावर फिरलेला तो फेरा जणू संपता संपत नव्हता. संपतरावांच्या शेजारी पूनमही धप्पकन काही कळायच्या आत खाली कोसळली.आता मात्र समीर अवसान गाळल्यागत गुडघे टेकून खालीच बसला. सोमेश्वर म्हणाले,समीर घाबरू नकोस.सर्व धोका जवळ जवळ टळला आहे.पण पूनम यातून स्वतःहून उठली तरचं तुमची,मग ती दोन दिवसांनी उठेल,महिन्यांनी उठेल,वर्षांनी उठेल पण तिला दुसऱ्यांनी कोणी उठवायचं नाही ती स्वतः उठली तर तुमची नाहीतर ती ही गेली म्हणून समजा.हवन जवळ ठेवलेलं तूप घरभर शिंपडत सोमेश्वर म्हणाले,तुमचं घर आता शुद्ध होऊन पिशाच्च बाधेपासून मुक्त झाले आहे.घाबरण्याचे कारण नाही. समीर आणि पूनमच्या घरची मंडळी पूनम शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते.चार दिवसांनी पूनम स्वतःहून शुद्धीवर येतं वर उठली.गेले चार दिवस पत्नीसाठी समीर देवाचा धावा करीत होता.बिचारी पूनम या पापात वाटेकरी नसताना तिला जन्मभराच्या झळा पोहचू नये म्हणून देव पाण्यात ठेवून बसला होता.त्याचंच त्याला फळ मिळालं होतं.सोमेश्वरनी सांगितल्या प्रमाणे पुन्हा एकदा योग्य विधी करून घेतला.कारण आयुष्यात असा फेरा पुन्हा कधी ही फिरू नये यासाठीच ती धडपडत होती.त्याच्या कुटुंबानं केलेली ती एक चूक त्यांना आयुष्याचा धडा देऊन गेली होती.तर भूत नसतं म्हणणारा समीर अजूनही त्या अनामिक शक्तीच्या विळख्यातून बाहेर आला नव्हता.फक्त पूनम पूर्व पदावर आली एवढीच काय ती जमेची बाजू होती.त्यामुळे सारं येथेच ठेवून अनामिक शक्तीचा शोध,वावर किंवा अस्तित्व यांच्या भानगडीत न पडता पत्नीस घेऊन समीर घडलेल्या फेऱ्याची आठवण कायमची दूर सारण्यासाठीचं जणू तडक रशियाला निघून गेला तो ही पुन्हा कधी परतून न येण्यासाठीचं बरं का?

                          


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror