Krishna Shilvant

Inspirational

3  

Krishna Shilvant

Inspirational

आठवणीतील जत्रा

आठवणीतील जत्रा

8 mins
138


           1998 ला मी 9वी मध्ये शिकत असतानाची ही घटना.तेव्हा आमच्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती.आई लोकांच्या शेतात, गवंडीकाम अथवा मिळेल ती मोलमजुरी करून म्हणा ना एकटीच संसाराचा गाडा नेटानं हाकत होती.कोणाची कवडीचीही मदत नसताना मला शिकून सवरून मोठं करण्याचा तिने जणू विडाच उचलला होता की काय कोणास ठाऊक म्हणूनच की काय ती मोठ्या इर्षेने,जिद्दीने व मेहनतीने तिच्या परीने मला सर्वकाही देण्याचा आटोकाठ प्रयत्न करीत होती.आणि मी ही परिस्थितीची जाणीव ठेवून तिच्याकडे हट्ट न करता, तिच्यावर कोणत्याही नाहक अपेक्षांचं ओझं न लादता. आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहत आईला जणू एकप्रकारे मदत करीत होतो. तिच्याच भाषेत सांगायचं झालं तर अगदी शहाण्या मुलासारखं वागत होतो. 


     आगामी सणासुदीच्या धामधुमीचा हंगाम सुरू झाला होता. अशाच एके दिवशी माझ्या एका मित्रा बरोबर मी सहज गावात गेलो असताना अनाहूतपणे बाळू नावाच्या एका मुला बरोबर माझं क्षुल्लक कारणावरून तु-तू मी- मी झालं.आम्ही त्यांच्या गल्लीत असल्याने त्याचा रागाचा पारा चढला. क्रोधीत मुद्रेन माझ्याकडं कटाक्ष टाकत त्यानं मला एक जोरदार शिवी हासडली.मी ही काही कमी नव्हतो म्हणा. त्याच ताकतीने मी ही त्याला दोन शिव्या हासडल्या.पण तो रांगडा गडी गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हता. शेवटी आपल्या गल्लीत होता ना! गप्प कसा बसेल.मला म्हणाला ये काळतोंडया वानरा कपडे घालायला आहेत का बघ आधी फाटकी तुटकी तिचं तिचं कपडे दोन-दोन आठवडे घालतंइस आणि माझ्याशी भांडतंइस जातस काय तिकडे *झडग्या झवण्याच्या* (आमच्या कोल्हापूर भाषेतील एक नामांकित शिवी) मला काय बोलावं सुचेना,कारण असं बोलून माझ्यावर त्यानं एकप्रकारे वर्मी घाव घातला होता.मला खूप वाईट वाटलं.मनातून खूपच खजील झालो.खऱ्या अर्थानं त्यानं मला माझी जागा दाखवली होती.कारण मी तेव्हा त्याचे बोलणे समजण्या इतका मोठा नक्कीच होतो त्यामुळे भांडण वाढवलं तर आपला जास्तीचा उद्धार होईल म्हणून अधिकचे काही न बोलता माघार घेऊन अक्षरशः तेथून पलायन केले. 


          पण कपडे हा विषय काही माझ्या डोक्यातून जाता जाईना. म्हणून संध्याकाळी जेवता जेवता आईला सहज म्हणालो,आई मी पुढच्या आठवड्यात अंबाबाई यात्रेला जाणार आहे.मला नविन कपडे घेशील का? नविन कपडे म्हणालो कारण या आधी ते क्वचित मिळाले होते. दुसऱ्यांचे वापरलेले कपडेच बहुदा वापरायला मिळायचे.आणि मला ही ते आवडत कारण मी तेव्हा आमची ऐपत ओळखून होतो. 


    एकदा मात्र माझ्या जीवनात बाका प्रसंग घडला होता.एका अनिल नावाच्या मुलाचा त्याच्या आईनं दिलेला जुना शर्ट घालून मी आनंदाच्या भरात त्याच्या समोर गेलो आणि झालं उलटचं त्यानं माझ्या अंगावर त्याचा शर्ट बघितल्याबरोबर त्याच्या अंगाची लाही लाही झाली.रागाच्या भरात त्याने माझ्या पाठीत अशी काठी घातली की जवळ पास पंधरा मिनिटे तरी त्याच्या फटक्यानं मी कळवळून रडत होतो. आणि माझी ती तळमळ बघून कोणालाही न दाखवता आतल्या आत रडून रडून आईचे डोळे लहान चेंडू एवढे मोठे अन लालबुंद झाले होते. आणि त्याही पुढं सांगायचं तर माझ्या अंगावर उठलेला तो वळ तर तास दोन तास माझ्या पाठीवर मोठ्या रुबाबात ठाण मांडून बसला होता. म्हणून मुद्दामच मी आईजवळ नवीन असा शब्द प्रयोग वापरला होता.जेवत असलेल्या आईनं त्या अनाहूत प्रश्नानं माझ्याकडं वर मान करून पाहीलं आणि टचकन तिचं डोळे पाण्याने डबडबले.आता पोराला काय सांगावं!तिला काहीच सुचलं नसावं कदाचित, ती फक्त बघू या एवढंच म्हणाली अन विषय तिथंचं थांबला.मी ही विषय पुढे न वाढवता शांतपणे कसाबसा जेवण आटोपत घेऊन बाहेर निघून गेलो. 


         बाहेर आलो खरा पण पाण्यानं भरलेलं आईचं ते डोळे काही केल्या माझ्या दृष्टीपटलावरून बराच वेळ हलेनात.मी कशाला नवीन कपडे घे म्हणालो असेन याकरीता मी मनातल्या मनात स्वतःला व देवाला ( माझी हक्काची ठिकाण ) शिव्यांची लाखोली वाहिली.आणि हे असलं दळभद्री जीवन आमच्या वाट्याला का? कधी बदलणार हे दिवस? मला ही सगळं नवनवीन कधी मिळणार ? आणि मोलमजुरी करून थकलेल्या माझ्या आईला सुखाचे दिवस कधी येणार असे नाना प्रश्न माझ्या बालमनात कितीतरी वेळ अक्षरशः थैमान घालीत होते.आणि त्या विविध प्रश्नांच्या गराड्यात रात्री उशिरा कधी झोप लागली हे काही मला समजलं नाही.


         दुसऱ्या दिवशी सायंकाळी कामावरून आई बहुतेक उसनवारी पैसे घेऊन आली होती.मला म्हणाली मुला (मला लाडानं घातलेली साद,आता कुठं सहसा ऐकायला मिळत नाही.लग्न झालं की सगळं बदलत म्हणतात तसं) गावात चल तुला कपडे बघून येऊ.कपडे म्हटल्यावर मला मनस्वी अत्यानंद झाला.गावातल्या दुकानदाराकडे गेलो.आईने तिच्या बजेट मध्ये बसतील असे मध्यम प्रतीचे पण माझ्या आवडीचे कपडे घेतले.व आपल्या केळात हात घालत पैसे किती झाले ते विचारले.कपड्यांचे 70₹ झाले होते मात्र आईकडे 65₹ होते. बारकू दादा म्हणाला अजून 5 रुपये लागतील आई म्हणाली नंतर देते आणून कपडे दे.तर तो म्हणाला नाही नाही आधी सर्व पैसे आणून दे आणि मगच कपडे घेऊन जा.सर्वजण नंतर देतो अस म्हणतात आणि मग इकडं फिरकत नाहीत. तरीही आईने पुन्हा पुन्हा विनवणी केली पण ती निरर्थक ठरली.आणि त्या दिवशी नवीन कपडे घेण्याची माझी खूप दिवसांची इच्छा मात्र अतृप्त राहिली.पण आई कपडे घेणार,आणि घेणारच काय? तर घेतलेत सुद्धा, राहिलेले पैसे काय आई उद्या नक्की देणार. व आपण कपडे घेऊन येणार याचा गगनात मावेना एवढा आनंद माझ्या अंतर्मनातून ओसंडून वाहत होता. व त्या अविर्भावातच आई बरोबर मी घरी आलो.आणि ही बातमी गल्लीत किती तरी जणांना देऊनचं घरात आलो.दुसऱ्या दिवशी आईनं कशी जोडणी केली माहीत नाही पण मला कपडे मिळाले आणि ते ही नवीन हं ! पण हे कोणाला सांगू आणि कोणाला नको असं मला झालं होतं. तो आनंद मी शब्दात वर्णूच शकत नाही.आणि या परिस्थितीतून गेलेल्या प्रत्येकाला तो आनंद काय असतो हे मी शब्दात सांगण्याची गरज नक्कीच नाही.


   यात्रेला जायच्या आदल्या दिवशी सायंकाळी आईनं मला दुकानात पावशेर साखर आणायला पाठवलं आणि माझे कमिशन म्हणून 50 पैसे खाऊसाठी माझ्या हातावर टेकवले.जवळ पैसे आल्याबरोबर या पैशाने पत्ते खेळून यात्रेला जाण्यासाठी जास्त पैसे मिळवू हा माझा मनसुबा अचानकपणे मनात ठरला.( त्यावेळी वयस्कर व थोडी थोराड मुलं पैशाने पत्ते खेळत असत ) घरी येऊन मी आईला खेळायला जातो असं सांगून हळूच माझा मोर्चा पत्ते खेळत बसले होते तिकडे वळविला.खेळायला बसलो खरा पण पहिलाच डाव फसला आणि माझ्या मनाची घालमेल सुरू झाली.दुसऱ्या डावाचे पत्ते वाटताना माझं मन बैचेन झालं होतं. पुढचा डाव फसला तर माझा खेळ खल्लास होणार या विचारानं मी पुरता गांगरून गेलो होतो. पण वेळेनं मला निभावून नेलं आणि लागोपाठ दोन डाव लागल्यानं 3₹ सारखी मोठी रक्कम माझ्या खिशात जमा झाली होती.तो प्रयन्त आईने मोठ्यानं हाक मारली आणि मोठ्या मुलांनी मला तिथून हाकलून लावल्यानं मी तडक घरी आलो. पण जास्त पैसे मिळवण्याची माझी हाव मात्र मला गप्प बसू देईना.त्यामुळे मित्राकडे जातो, हाक मारू नकोस, वेळ लागेल असं खोटं खोटं आईला सांगून पुन्हा पत्ते खेळायला जाऊन बसलो.आणि जे व्हायचं तेच झालं.आलेले सगळे पैसे मी घालवून बसलो.पांडव जुगारात पत्नी सुद्धा हारले होते असं शाळेत ऐकलं होतं. ते आज खरं वाटलं.कारण इथं तर 50 पैशावरुन जादा पैसे मिळवण्याचा माझा मानस या जुगारान पुरता धुळीस मिळवला होता. म्हणतात ना ! ' *करून बसलो आशा आणि तोंडात गेल्या माशा'* अशी माझी गत झाली होती.खाली मान घालून घरी आलो.आईनं पुढ्यात दिलेलं न कुरबुर करता गप्प गिळलं आणि मनातून नशिब,देव आणि हा खेळ यांना झोप येईपर्यंत शिव्या देत झोपी गेलो.


  अंबाबाई यात्रेला जायच्या श्रावणातील त्या आनंदाच्या दिवशी सकाळी आई म्हणाली,मुला (मला लाडानं मारलेली हाक आता ती क्वचित ऐकायला मिळते हे मघाशी सांगितलंच) मी कामावर जाणार आहे.तू मोठया माणसांच्या आणि पोरांच्या बरोबर यात्रेला जा. काळजी घे,कोणाचं भांडणं काढू नकोस.(गरीबी माणसाला लाचार बनवते.मी भांडण काढलं तर कोण तरी मला मारेल, मग कोणाला विचारायचं ! याची आईला कदाचित भीती वाटायची. म्हणून ती या सूचना मला वारंवार द्यायची.यामुळे तर मी जीवनात सहनशीलता शिकलो होतो.) हे 10₹. घे.5₹.चा प्रसाद आण.आणि बाकीचे तुला खाऊला घे. *त्यावेळी तरी मला पैसे देणाऱ्या माझ्या आईच्या हाताशिवाय दुसरं कोणतेही हात माझ्यासाठी नव्हते.* मी सगळ्यांकडे आशाळभूत नजरेने पाहायचो दादा किंवा अण्णा (रक्ताच्या नात्यापेक्षा ही श्रेष्ठ असे मानलेले) देतील.मात्र ती केवळ माझी कल्पनाच राहायची. *कधी कधी आई म्हणायची बाळं आपल्याकडं नसलं की जगाकडं नसतं* मला ते न शिकलेल्या माझ्या आईचं वाक्य तेव्हा अगदी खरं खरं वाटायचं. कारण आपल्याकडं नसले की कोण देत नाहीत.देव सुद्धा अडून बसतो हे मी प्रत्यक्ष अनुभवत होतोच.तसं मला कोणीचं द्यायचंही नाही आणि त्यामुळे माझ्या आशेची निराशा होत असे.पण मी आशा करायची सोडत नसे. कारण तीच तर मला जगण्याचं नवं बळं दयायची. 


  सालाबादप्रमाणे सर्वांसोबत दुपारी यात्रेत गेलो.आईनं सांगितल्याप्रमाणे आधी प्रसाद म्हणून चिरमुरे घेतले. आणि उरलेले अर्धे पैसे नंतर काहीतरी घ्यायचे म्हणून खिश्यात जपून ठेऊन यात्रेत फिरत होतो. फिरता फिरता मला तिकीट फाडण्याचा जुगार दिसला.आणि जास्तीचे पैसे मिळवायचा माझा मनसुबा पुन्हा एकदा जागृत झाला.पण एक-एक तिकीट फाडत आता लागेल नंतर लागेल असं करीत माझ्या जवळचे पाच रुपये कधी संपले हे माझे मलाच कळले नाही. कारण इथंही माझं करंट नशीब मला नेहमीप्रमाणे दगा देऊन गेलं होतं.परंतु या दोन दिवसात आयुष्यात जुगार किती वाईट असतो.आणि आपल्याकडे नसताना आपले कसे हाल करून जातो याचा जिवंत अनुभव देऊन गेला होता.खूप वाईट वाटलं. मनातून नशीब आणि देवाला खूप शिव्या दिल्या कारण त्यावेळी दुसरं कोणी माझं ऐकणाऱ्यांपैकी नव्हतं ना!म्हणून कोणावर तरी राग व्यक्त करायचा या हेतूनं मी मनातल्या मनात बडबडत होतो.आणि यात्रा संपेप्रयन्त मला कोण तरी पाच रुपये देतील का? किंवा जुगारात गेलेले माझे 5₹ मला इकडे तिकडे कोठे सापडतील का ? म्हणून मी शोध शोध शोधत होतो.इकडं एका बाजूला यात्रा संपत आली होती आणि दुसऱ्या बाजूला माझा पाच रुपये शोधण्याचा अंत संपत येत होता.हाती मात्र काहीच लागलं नव्हतं.


         यात्रेत खूप माणसं होती.खाऊची, खेळण्याची दुकानं होती. मल्लांनी भरलेलं कुस्तीचं मैदान होतं.सर्वत्र पसरलेले भाविक होते.पण मी मात्र तेथून मनानं खूप दूर कोठेतरी भरकटलो होतो.जास्तीचे पैसे मिळवण्याच्या उद्देशाने जवळचे हरवून बसलेल्या 5₹.याचे दुःख करीत बसलो होतो.पण कोणीच माझं सांत्वन करीत नव्हतं. *चराचरात वसलेला देव मला वाऱ्यावर सोडून हसत असल्या सारखा, अथांग पसरलेलं आभाळ मला निराधार म्हणून हिणवत असल्यासारखे तर जुगारात हरलेले ते 5₹ कसं फसवलं म्हणून वेडावून दाखवत असल्याचा मला भास होत होता* .त्या ओसाड रानांत मी वाट चुकलेला वाटाडया उभा आहे अन वाट सांगायला देखील तेथे कोणी नाही अस मला ते स्थळ निर्जन आणि भक्कास वाटत होतं.कुठचं लक्ष लागत नव्हतं. मन भरून रडण्यासाठी मला माझ्या आईच्या हक्काच्या कुशीची आठवण राहून राहून येत होती.तेवढ्यात सगळे घरी जाण्यासाठी उठले.


           मात्र एव्हाना मी यात्रेतील दुकानं व आमची कुस्त्या पाहत बसलेली मोठी माणसं या दरम्यान दहा एक तरी चक्करा पडलेले कोणाचे तरी पैसे मला सापडतील या आशेनं मारल्या होत्या.पण सारं व्यर्थ.शेवटी मी सर्वांच्या पाठून निमूटपणे त्या घेतलेल्या पाच रुपयांच्या चिरमुऱ्याकडे टक लावून पाहत,मनातून अश्रूधारा गाळत, कोणालाही न दाखवता आतल्याआत ढसाढसा रडत सर्वांच्या पाठून चालत होतो.परंतु जे काही मिळवायचं ते स्वतःच्या मनगटाच्या जोरावर! कोणाच्या आशेवर राहायचं नाही.आणि उभ्या आयुष्यात जुगार कधी खेळायचा नाही अशी मनाशी खूणगाठी बांधत एक एक न उचलणारा पाय टाकीत गावाच्या दिशेनं येत होतो.जणू या यात्रेने मला आयुष्य उभारणीचा एक *मौलिक सल्ला* दिला होता कधीही न विसरण्यासारखा एवढं मात्र नक्की...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational