The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Ganesh Malleshe

Horror

3.7  

Ganesh Malleshe

Horror

पानाचा बटवा

पानाचा बटवा

8 mins
443


अंगावर उबदार गोधडी ओढून शंकर घराच्या दिशेने निघाला होता. रक्त गोठवणाऱ्या भयाण गारव्यात रानातून जाताना स्वतःला बोचऱ्या गार वाऱ्यापासून वाचवण्यासाठी गोधडीचाच काय तो त्याला आधार होता. गुडघ्यापर्यंत घातलेल्या धोतरामुळे शंकरच्या पायांना वातावरणातील गारवा अधिकच जाणवत होता. हवेच्या नुसत्या स्पर्शाने त्याच्या गारठलेल्या शरीरावर सरसरून काटा येत होता. गोधडी कानावरून ओढून घेऊन त्याने कंबरेपर्यंत आंग झाकून घेतलं होतं आणि वेगाने घराकडे चालत होता. सगळीकडे किर्रर्रर्रर्र अंधार पसरला होता आणि सर्वत्र शांततेचं साम्राज्य निर्माण झालं होतं. रानातून गेलेल्या निमुळत्या पाऊलवाटेवर चालताना शंकरच्या पायातल्या जोड्याच्या आवाजामुळे त्या शांततेचा किंचितसा भंग होत होता. 


शंकर तसा तिशीतला तरुण. उंचीने लहान आणि सडसडीत अंगाचा. गावातल्या पाटलाने शेतगडी म्हणून त्याला काही दिवसांपूर्वीच कामाला ठेवले होते. अंगाने फारसा दणकट नसला तरी शेतातील कामामध्ये तो चांगलाच चपळ होता. पाटलाचा मळा गावापासून बऱ्याच अंतरावर होता. रोज सूर्य मावळण्याच्या अगोदर शंकर गाव गाठीत असे पण आज त्याला थोडा उशीरच झाला. बगलेत खुरपं आणि अंगावर गोधढी पांघरून शंकर घाईघाईने गावाच्या दिशेने चालत होता. 


"च्या माईला, आज जरा उशीरच झाला. अंधार व्हायच्या आगुदर गावाकडं निघालो असतो तर बाका झालं असतं. माझी वाट बगून-बगून माईने स्वतःच म्हईस पिळली असलं आतापस्तोर" 


थोडा चिडतंच शंकर स्वतःच्या मनाशी बोलत समोरील वाट तुडवत होता. शेतातून उशिरा निघाल्यामुळे आणि अशा बोचऱ्या थंडीत सापडल्यामुळे तो भलताच वैतागला होता. काही अंतर पार केल्यावर शेतातील पाउलवाट संपून हमरस्ता लागणार होता. त्याला लवकरात लवकर हमरस्ता गाठायचा होता. 


पण अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि त्याचे पाय अडखळले, त्याची गती किंचितशी मंदावली. हमरस्त्याचा विचार मनात येताच त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. असं काय होतं हमरस्त्यावर? 


त्याला त्याच्या माईचे ते शब्द आठवले - "शंकऱ्या, पाटलाच्या मळ्यात काम करलालास खरं, पन रात्री-अपरात्री तिकडं जायच न्हाई. चांदण पडायच्या अगुदरच गावाकडं यायचं बिगी-बिगी कसं! तिथं हमरस्त्याच्या वळणावर चिंचचं भलं दांडग झाड हाय. त्या झाडावर अमुशाच्या रात्री भूतं येऊन बसत्यात. कळतंय न्हवं" 


शंकरला त्याच्या माईने सांगितलेली गोष्ट आठवली आणि त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं, आकाशामध्ये चांदण्यांचा सडा पडला होता पण चंद्र कुठेच दिसत नव्हता. आणि शंकरच्या लक्षात आलं की आज तर "अमावस्याची रात्र". तो थोडा घाबरलाच. तसा शंकर हा फारसा भित्रा नसला तरी त्या परिसरातील वातावरणामुळे त्याची पाचावर धारण बसली. आता काय करायचं हे त्याला सुचत नव्हतं. 


रात्रभर अशा भयाण गारव्यात रानात थांबणं शक्य नव्हतं आणि अमावस्येची रात्र असल्यामुळे त्याला पुढे जाण्याची पण भीती वाटत होती. काही काळ तो तसाच एका जागी स्तब्ध झाला. विचार करताना त्याचं लक्ष सहज त्याच्या गळ्यात असलेल्या मारुतीच्या माळेकडे गेलं. आता हा मारुतीरायाच काय ते रक्षण करेल असा विचार करून ठाम निश्चयाने त्याने पुढे पाऊल टाकण्यास सुरुवात केली. 


काही काळ तो असाच चालत राहिला आणि हमरस्ता समोर दिसू लागला. फारसा रुंद नसला तरी बैलगाडी सहज जाईल असा तो रस्ता वळणं घेत गावात जात होता. शंकर त्या रस्त्याने पुढे चालू लागला. काही अंतरावर एका नागमोडी वळणावर रस्त्याच्या उजव्या दिशेला ते चिंचेचं खूप जुन झाड होतं. 


एव्हाना शंकर त्या वळणाच्या जवळ आला होता. नकळत त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते. पुढे जाण्यास त्याचे पाय अडखळत होते. तो आपली नजर पूर्णपणे समोरच्या त्या वळणावर रोखून धीम्या गतीने पाऊल टाकत होता. ते चिंचेचं झाड अजून त्याच्या नजरेच्या टप्प्यात आलेलं नव्हतं. पंधरा-वीस पाऊलं पुढे जाताच ते चिंचेचं भलंमोठं झाड त्याला दिसलं आणि तिथे चालू असलेला प्रकार पाहून त्याची दातखीळच बसली.


झाडाखाली त्याला तीन आकृत्या अमावस्येच्या अंधारात पण स्पष्ट दिसत होत्या. पांढरा सदरा आणि धोतर परिधान केलेले ते तिघे त्याला सुरुवातीला भूतासमान भासले पण लगेच त्याच्या लक्षात आलं की एवढ्या अंधाऱ्या रात्रीत पण ही माणसं मला स्पष्ट दिसली याचं कारण - त्यांच्या समोर पेटत असलेली शेकोटी. शेकोटी म्हणजे आग आलीच. आणि भूत-प्रेत आगीला घाबरतात हे शंकरने अनेक जाणत्या मंडळींकडून ऐकलेलं होतं. 


त्या शेकोटीचा प्रकाश शंकरच्या डोक्यात पडला आणि त्याची खात्री झाली की ते तिघे भूत नसून मनुष्यच आहेत. दबक्या पावलाने आणि सावधगिरीने शंकर त्यांच्या दिशेने चालू लागला. दहा पाऊल चालून तो त्यांच्या जवळ गेला आणि पाच हात अंतर ठेवून उभा राहिला, मात्र काहीच बोलला नाही. 


शेकोटीकडे एकटक पाहणाऱ्या त्या तिघांचे शंकरकडे लक्षच नव्हत म्हणून शंकर गोधडी सावरीत म्हणाला "राम राम पाहुणं". शंकरच्या आवाजाने सुद्धा त्यांची तंद्री मोडली नाही. शंकरच्या 'राम-राम' ला उत्तर न देता ते तिघे एकटक शेकोटीकडे पाहत होते.


 यामुळे शंकर परत म्हणाला 

"पाहुणं तुमी या गावचे तर दिसत न्हाई, इतक्या रातच्याला अशा गरव्यात इथं काय करताय?" 


शंकरच्या बोलण्याने यावेळेस ते कदाचित भानावर आले, त्यातील एकाने फक्त स्मित करत एक नजर शंकरवर टाकली आणि शेजारी पडलेलं गवत शेकोटीत टाकत तो म्हणाला,


"पाहुणं आमी वाटसरू हाव. हितनं अजून पाच कोसावर आमचं गाव हाय. रात्र चांगलीच झालीया आन अजून बरंच अंतर कापायचं हाय अमास्नी. गारव्यानं आंग नुसतं थंडगार पडलंय बगा. तवा थोडं हात पाय शेकावं म्हनलं, अंगात नक्कर तरतरी आली की पुढची वाट लवकर कापता येईल." 


"असं असं! पण मंडळी आता लई येळ झालाय बगा. एवढ्या रातच्याला कुठं जाता तेवढ्या लांब. त्यापेक्षा एक काम करा, तुमी समदे माझ्या घरी चला. आज रातच्याला माझ्याहितच मुक्काम करा आन सकाळच्या रामपारी निगा तुमच्या गावाला." 


आपल्या नावाप्रमाणेच स्वभाव असणारा भोळा शंकर बोलून गेला. त्याच्या या बोलण्यावर मिस्कीलपणे हसत समोरला इसम म्हणाला,

"पाहुणं, आमाला जरा महत्वाचं काम हाय त्यामुळं आजच गावाकडं जावं लागल बगा" 


त्यावर शंकर फार काही बोलला नाही. तो त्यांच्या आणखीन जवळ गेला आणि दबक्या आवाजात म्हणाला, 

"म्या काय म्हणतो, तुमी जास्त येळ इथं थांबू नका. ही जागा बरी न्हाई" 


शंकरच्या या काळजीपूर्वक उपदेशाकडे विशेष लक्ष न देता त्यातला एक म्हणाला,

"तुमी लईच उशीरा निघालाव गावाकडं. थंडीत चांगलेच गाराठलेले दिसताय. एक काम करा, थोडा वेळ आमच्या सोबत बसा. हात पाय शेकून मंग जावा गावाकडं." 


शंकरच्या मनात त्या जागेवर जास्त वेळ थांबण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण वातावरणातला गारवा एवढा वाढला होता की शेकोटीचा मोह त्याला आवरला नाही. त्या इसमाच्या बोलण्यावर मान हलवीत शंकर खाली बसला आणि अंगावरील गोधडी आणि बगलेत असलेलं खुरपं शेजारी ठेऊन तो जिभल्या चाटीत वरच्या दिशेने जाणाऱ्या अग्नीपुढे आपले दोन्ही तळहात समोर धरून शेकू लागला. पण त्या आगीमुळे विशेष काही ऊब त्याला जाणवत नव्हती. 


"पाहुणं, गारवा एवढा पडलाय की शेकोटीची ऊब पण जाणवणा गेलीया बगा." 


तेवढ्यात समोरील व्यक्ती उठून उभा राहिला आणि कमिजाच्या खिशात हात घालून त्याने एक बटवा बाहेर काढला. 

"आता समद्यांसाठी पान बनवितो म्हंजी जरा तोंडाला चव येईल", असं म्हणत त्या इसमाने पानावर चुना लावण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या खिशातून आडकित्या काढून सुपारी कातरली. कातरलेली सुपारी पानावर टाकून त्याने सगळ्यांना खाईला दिले. पान तोंडात टाकून थोडा वेळ चघळताच शंकरला अचानक गारवा नाहीसा झाल्यासारखे जाणवले. जणू शरीराच्या नसांमधून वीज वाहत आहे. पान चघळत शंकर म्हणाला,

"अहो हे तर लईच विचित्र पान हाय, सगळ्या अंगात कशी तरतरीच आली बगा" 


शंकरच्या समोर तो पानाचा बटवा धरत तो व्यक्ती म्हणाला,

"ह्यो बटवा राहू द्या तुमच्या जवळ. चांगले ताजे पान हाईत ह्याच्यात" 


नकारार्थी मान हलवीत शंकर म्हणाला,

"अहो पाहुण्या कशाला उगाच, राहू दे तुमचा बटवा तुमच्या जवळ. तुम्हांसनी अजून पुढं लागल की पान खायला" 


"ठेवा हो पाहुण्या, आमच्याकड हाईत अजून पानं" म्हणत त्या व्यक्तीने बटवा शंकरच्या पुढ्यात टाकला. 


शंकरने तो बटवा उचलला. त्याला सतत जाणीव होत होती की आपण चिंचेच्या झाडाखाली आहोत. बटवा खिशात ठेवत शंकरने शेजारी ठेवलेली गोधडी परत अंगावर पांघरली आणि निघायच्या उद्देशाने म्हणाला,

"चांगलाच उशीर झालाय आता, तवा निगतो म्या. तुमी पन जास्त येळ थांबू नगा हितं." 


"एवढी शेकोटी विजली की निगतो आमी पन"


"परत भेटू, राम-राम" म्हणत शंकर उठला आणि गावाकडे चालू लागला. 


दहा पावले चालल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याने खुरपं घेतलचं नाही. खुरपं घेण्यासाठी तो परत वळला आणि समोरील दृश्य पाहून थक्क झाला.  त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला, हृदयाचे ठोके एवढे प्रचंड वाढले की जणू आता काळीज फुटून जाईल. त्याच्या पायातील सर्व त्राणच गेला. त्याच्या शरीरात कंप निर्माण झाला. 


ज्या ठिकाणी काही सेकंदापूर्वी तो बसला होता तिथे आता काहीच नव्हतं. अगदी अल्पकालावधीतच ते सगळं गायब झालं होतं. ते तिघे, ती शेकोटी वगैरे काही काही तिथे नव्हतं. शेकोटीची राख किंवा धूर पण नव्हता. सर्वत्र किर्रर्रर्रर्रर्र अंधार पसरला होता. आणि त्या अंधारात ते चिंचेचं झाड भयावह भासत होते जणू राक्षसच. 


शंकरचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आपण एखाद्या स्वप्नात आहोत असं त्याला वाटू लागलं. आणि तेवढ्यात झाडावर काहीतरी चमकत आहे असा भास शंकरला जाणवला. 


त्याने डोळे किलकिले करून झाडाच्या शेंड्याकडे पाहिलं आणि लाल हिरे चमकावेत असे सहा लालबुंद डोळे चमकत होते. ते डोळे त्याच्याकडेच रोखून पाहत होते. त्या डोळ्यांकडे पाहत असताना अचानक झाडाच्या फांद्या हलु लागक्या आणि शंकरच्या पोटात भीतीचा असा गोळा आला की त्याची शुद्ध हरवली आणि तो तिथेच बेहोष होऊन कोसळला... 


"शंकऱ्या.... आरं ये शंकऱ्या" कोणाच्या तरी हाकेने शंकरला जाग आली. समोर मळ्यात काम करणारे दोन गडी उभे होते. शंकर पाटलाच्या मळ्यात एका बाजेवर झोपला होता. त्याचे सर्व शरीर जड झाले आहे असे त्याला वाटले. डोळे उघडल्यावर त्याला काही सुचलेच नाही आणि थोड्या वेळात त्याच्या ध्यानात आले की आपण पाटलाच्या मळ्यात आहोत. 


"शंकऱ्या... रातच्या असल्या गारव्यात हितच झोपलास व्हय रं.", गडी म्हणाला


"म्या... म्या हित कसं" शंकर पुटपुटला


"ते आता तुलाच माहीत बग, म्हातारी कालच्यापासून बेजार हाय आन तू हित पडलाय. जा आदी घराकडं जाऊन ये. ऊठ.." 


"हा.. हा जातो. घराकडं. जातो" आणि शंकर उठून घराकडे निघाला. 


सकाळच्या सोनेरी सूर्यकिरणांनी धरित्री न्हाऊन निघत होती. रानातील पिकं आनंदाने डुलत होते. शंकर जड पावलांनी घराकडे जात होता आणि रात्री आपण स्वप्न पाहिले असेल असे स्वतःलाच समजावत होता. थोडा वेळ चालल्यावर तो त्या झाडाच्या जवळ आला आणि त्याचं लक्ष झाडाखाली पडलेल्या खुरप्याकडे गेलं.

 "हे खुरप तर माझंच" असं तो स्वतःशीच म्हणाला. 


म्हणजे काल आपण भुतांसोबत बसलो, बोललो! त्यांच्या सोबत पान खालला. त्याच्या डोक्यामध्ये विचार चक्र सुरू झाले. रात्री घडलेली सर्व घटना तो आठवू लागला. पानाची आठवण येताच त्याने आपल्या खिशात हात घातला. खिशातून त्याने हळूच बटवा बाहेर काढला.  बटवा हातात येताच त्याची खात्री पटली की काल आपण जे काही पाहिलं ते खरं होतं. त्याने एकदा चिंचेच्या त्या झाडावर नजर टाकली. हवेच्या झोताने चिंचा डुलत होत्या पण रात्रीसारखी भीती मुळीच वाटत नव्हती. आपण भूत पाहिले आणि तरी जिवंत आहोत या भीतीमिश्रित कुतूहलाने त्याने चुना लावून पान बनवला आणि पान तोंडात टाकत 'बिगी-बिगी' गावाच्या दिशेने निघाला...


हा प्रसंग घडून सहा महिने झाले. शंकर अजून पण त्याच पाटलाच्या मळ्यात काम करतो. पण रात्रीच्या वेळी तो कधीच त्या वाटेने जात नाही. सहा महिन्यानंतर पण त्या बटव्यामधील 'पान' संपले नाहीत. बटव्यात हात घातला की हिरवीगार ताजी पान हातात येतात. पान कधीच न संपणाऱ्या बटव्याकडे पाहून शंकर ला नेहमी वाटत, 

"पानाच्या ऐवजी ह्यो पैश्यांचा बटवा असता तर किती 'बाका' झालं असतं न्हवं!"


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror