Ganesh Malleshe

Inspirational


4.4  

Ganesh Malleshe

Inspirational


पावनखिंड

पावनखिंड

13 mins 23.5K 13 mins 23.5K

१.

पौर्णिमेच्या श्वेतवर्णी गोलाकार चंद्राला आज काळ्याभोर ढगांनी ग्रहण लावलं होतं. आपल्या शुभ्र शीतल हाताने पृथ्वीला कवेत घेऊ पाहणाऱ्या चंद्रदेवाला आज ढगांनी पूर्णपणे बंदिस्त केलं होतं. आमचा राजा सुखरूप पोहोचला पाहिजे म्हणून जणू काय निसर्गानेच त्या लखलखत्या चांदण्या आणि चंद्र लपविला होता. सर्वत्र किर्र्रर्र्र्र अंधार पसरला. कुठूनतरी आकाशात अचानकचं वीज चमके आणि निसर्गाचे ते रुद्ररूप पाहून काळजाचे पाणी पाणी होऊन जाई. ढगांच्या अखंड नादा समवेत पावसाच्या धारा कोसळत होत्या. पिशाच्चाची किंकाळी कानावर पडावी आणि उभा देह थरथरून जावा तसा ढगांचा आवाज कानावर पडू लागला ज्यामुळे अंगावर सरसरून काटा येऊ लागला.

अशा निसर्गाच्या थैमानात सहाशे बांदल सैनिक आपल्या राजाला घेऊन विशालगडाकडे निघाले होते.

“चला. थांबू नका! पुढे चालत रहा", म्हणत बाजीप्रभू आपल्या बांदल सेनेला बळ देत होते.

पालखी वेढ्याच्या नजीक आली तशी सगळ्यांची गती मंदावली. सर्वांनी श्वास रोखून धरला, अलगद पावले टाकीत चालाकीने सगळे वेढ्याच्या नजीक जाऊ लागले. येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यास प्रत्येकाने आपली तलवार आवाज न करता म्यानातून बाहेर काढली. दिवस रात्र डोळ्यात तेल ओतून पहारा देणाऱ्या चौकी पहाऱ्यावरील जोहरचं सैन्य पावसाच्या या भयाण तांडवामुळे तंबूत जाऊन विसावा घेत होत. महाराजांची युक्ती कामी आली होती. शिवाजी शरण येणार म्हणून गनीम गाफील झाला होता.

वेढा नजीक आला, अगदी नजीक. दबक्या पावलाने, चलाखीने आणि मोठ्या सावधगिरीने मावळे वेढा पार करू लागले. प्रत्येकाचे काळीज धपापू लागले, येणाऱ्या क्षणाची भीती मनात घर करू लागली, प्रत्येक क्षण मोलाचा आहे या जाणीवेने प्रत्येक पाऊल सावधगिरीने पडू लागला. आणि..... आणि वेढा पार झाला. वेढा मागे टाकून मावळे पालखी घेऊन पुढे निघून आले. अजगराच्या विळख्यातून सुखरूप बाहेर निसटाव अगदी तसाचं सह्याद्रीचा हा नरसिंह वेढ्याच्या विळख्यातून बाहेर पडला. प्रत्येकाचे मन आनंदाने भरून आले.

आता शर्थ होती ती पावसाचा मारा अंगावर घेऊन, वादळ-वाऱ्याला तोंड देऊन, किर्र्र्रर्र्र्र अंधारातून, गर्द-राईतून महाराजांना घेऊन सुखरूप जाण्याची, आता शर्थ होती विशालगड गाठायची आणि झपाझप पाऊले टाकत मावळे चालू लागले. सहाशे मावळ्यांच्या मधोमध महाराजांची पालखी होती, बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू पालखीच्या सोबतचं चालले होते. हेलकावे देत पालखी वेगाने पुढे जाऊ लागली. “चला. पुढे चला एवढाच आवाज महाराजांच्या कानावर पडू लागला. पालखीला वाट दाखवण्यासाठी हेर अगोदरच जागोजागी पेरले गेले होते. हुशार्र्र्र S S S असा अंधारातून हेरांचा आवाज येताच पालखी त्या दिशेने दौडू लागे. पावसामुळे वाट चिखलाने माखून गेली होती. चिखल पायाखाली तुडवीत मावळे पळत होते. अचानक आकाशात वीज चमकायची आणि सर्वांच्या काळजात लक्क होऊन जाई.

वेढा तर पार झाला पण जोहरच्या हेरांनी निवडक सैन्यासह महाराजांची पालखी जाताना पहिली. ते हेर तसेच सिद्धी जोहरकडे धावत गेले.

“हुजूर.... दुश्मन भाग गया. सिवा भाग गया हुजूर.”

“क्या बकते हो.” म्हणत मध्यपानात धुंद झालेला जोहर ही बातमी ऐकताच ताडकन उठून उभा टाकला. त्याचे नेत्र आरक्त झाले. संतापाने त्याचे अंग थरथरू लागले.

त्याच्या शेजारी उभा असलेला फाजलखान म्हणाला,”तभी हम कह रहे थे. सिवा पे भरोसा मत रखना.”

“खामोश!!”, फाझलचे शब्द ऐकताच जोहर चा राग उफाळून आला.

संतापाच्या भरात जोहर त्याचा सरदार सिद्धी मसूद याला म्हणाला, “मसूद. फौज लेकर तुरंत निकलो और शिवाजी राजे को कैद करके हमारे सामने पेश करो”

सिद्धी मसूद हा सिद्धी जोहरचा जावई होता. त्याने वेळ न दवडता फौज गोळा केली. एक हजार घोडेस्वार आणि एक हजार पायदळ घेऊन तो विशाल गडाच्या रोखाने दौडू लागला. आवेगाने मसूद आपल्या फौजेसोबत दौडत होता.

“दुश्मन.. वो रहा दुश्मन" बेंबीच्या देठापासून एकजण ओरडला आणि मसूदला बळ आले. आपला घोडा त्या दिशेने फेकीत मसूद दौडू लागला. महाराजांच्या पालखीला मसूदच्या सैनिकांनी चहु बाजूंनी घेरले. पालखीत शिवाजी राजे बसलेत याची खात्री करून घेऊन कडेकोट बंदोबस्तात पालखी छावणीवर आणण्यात आली. महाराज पालखीतून खाली उतरले, मसूदने महाराजांना जोहर समोर पेश केले.

महाराजांना पाहून जोहर आनंदला. त्याचा चेहरा उजळून निघाला. ज्याने अफझल खान सारख्या पराक्रमी सरदाराला पराभूत केले असा शिवाजी राजा आपल्या समोर उभा आहे यावर त्याचा विश्वासच बसेना. शेवटी मराठ्यांचा राजा यवनांच्या हातात सापडला होता. ज्याने अली आदिलशहाला बेचेन करून सोडले होते असा शिवाजी आज कैद झाला.

पण त्याचा हा आनंद फार काळ टिकणार नव्हता.

एक हेजीब पुढे झाला आणि हा शिवाजी नसल्याचे त्याने जोहरला सांगितले. ते ऐकताच सिद्धी जोहरच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याच्या क्रोधाला सीमा उरली नाही. त्याच्या मुखावर उमटलेले हास्य कुठल्या कुठे गेले, त्या हास्याची जागा आता क्रोधाने आणि संतापाने घेतली. शिवाजी जवळ जात जोहर ओरडला,

“कौन है तू बता?”

“शिवाजी....”

“झूट. साफ झूट. तू शिवाजी नही है. कौन है तू?”

तसा तो व्यक्ती मिस्कीलपणे हसला. आपण मृत्युच्या मुखात आहोत हे माहित असूनसुद्धा त्याबद्दल तिळमात्र भीती त्याच्या मनात नव्हती. तो होता शिवाजी महाराजांचा न्हावी. अंगकाठीने शिवाजी महाराजांसारखा असणारा, चेहरापट्टी महाराजांसारखी. त्याने महाराजांसारखीच दाढी देखील राखली होती. या निडर साहसी वीराचे नाव होते शिवा न्हावी. जोहर च्या नजरेला नजर देत शिवा म्हणाला

“मी.. मी महाराजांचा सेवक. या सेवकाला शिवा न्हावी म्हणतात”"

“तो फिर शिवाजी कहा है? ”,तलवार हातात घेऊन जोहर संतापाने म्हणाला.

जोहरचा संताप पाहून शिवाला हसू आले. हसतच तो म्हणाला,

“आमचे महाराज म्हणजे तुम्हा यवनांचे राज्य उधळून लावणाऱ्या वावटळी सारखे. तुझ्यासारख्या नादान सरदाराच्या हाती महाराज तर काय महाराजांचे नख पण लागणार नाही. राजे वेढ्यातून केंव्हाच बाहेर पडलेत. आत्तापर्यंत ते खूप लांब गेले असतील. महाराज आता तुझ्या हाती लागणार नाहीत”"

शिवाचे बोलणे ऐकून जोहरच्या रागाचा पारा आणखीन चढला. रागाच्या भरात त्याने आपली तलवार शिवाच्या छाताडात खुपसली. खोल जखम करून तलवार बाहेर निघाली. शिवाच्या मुखावर वेदनांचे असंख्य भाव उमटून गेले. आपल्या जीवनाचा शेवट होत आहे याची तिळमात्र खंत त्याला नव्हती.

होते फक्त समाधान!

आजच्या सोनेरी दिवसाचे समाधान! ज्या क्षणी महाराजांनी स्वतःच्या हातांनी शिवाला त्यांचा पेहराव चढवला त्या क्षणाचे समाधान. त्याच्या सारख्या सामान्य माणसासाठी महाराजांच्या डोळ्यात पाणी आले अशा त्या राजांनी त्याच्याप्रती दाखविलेल्या प्रेमाचं समाधान. आपल्या मजबूत बाहूंनी महाराजांनी शिवाला दिलेल्या मिठीच समाधान. सोंगातील का असेना पण एक दिवस शिवाजी महाराज झाल्याचे समाधान!

तो तृप्त झाला!

त्याच्या छातीतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक इमानी रक्ताच्या थेंबाला पाहून तो तृप्त झाला. मातीवर टपकणाऱ्या प्रत्येक थेंबाला जणू शिवा सांगत होता की तुम्ही फुकट खर्ची गेला नाहीत. आपल्या राजासाठी, स्वराज्यासाठी तुम्ही कामी आलात. शिवाच्या मुखावरील वेदनेची जागा आता त्याच्या तृप्त झालेल्या भावनांनी घेतली होती. आणि.. आणि शिवा कोसळला. दाटून आलेल्या कंठातून फक्त दोनच शब्द बाहेर पडले,

“महाराज S S S !! मुजरा S S S S !!!”

आणि त्या सोंगातल्या शिवाने डोळे मिटले.

३.

फजिती झालेल्या सिद्धी मसूदने पुन्हा आपले सैन्य गोळा केले आणि तो त्याची फौज घेऊन मध्यरात्रीच्या वेळी विशालगडाकडे निघाला. सिद्धी जोहरला वाटले की खरा शिवाजी गडावरच असू शकतो म्हणून त्याने विस्कळीत झालेला वेढा पुन्हा नीट लावला. दीड हजाराची फौज घेऊन मसूद विशालगडाकडे दौडू लागला.

बांदल सेनेचे वीर पालखी घेऊन धावतचं होते. क्षणभरसुद्धा विश्रांती न घेता ते वीर चिखल तुडवत पावसाचा मारा सहन करत धावत होते. पालखी उचलणारे सैनिक बदलत होते. छाती फुटेपर्यंत ते मर्द मावळे पळत होते. आपल्या खांद्यावर जबाबदरी होती स्वराज्याच्या स्वामीची केवळ एवढ्या एकाच विचाराने त्यांना बळ मिळत होते. पहाट झाली होती. सूर्य उगवतीला आला होता.रात्रभर बांदल सेनेचे वीर विश्रांती न घेता धावले होते.

आणि तेवढ्यात हेर धावत आला. मसूद फौजेसकट येत आहे अशी बातमी बाजींना मिळाली. ते ऐकताच सर्वांच्या थकलेल्या शरीरात प्राण आला. ते अजून वेगाने धावू लागले. पालखी आता गजापुरच्या घोडखिंडीत आली होती. विशाल गड अजून तीन मैलाच्या अंतरावर होत.

आपल्या मावळ्यांची झालेले हे हाल पाहून महाराजांना गहिवरून आले. पालखीत गोंडा धरून बसलेले महाराज विचारात पडले.

का? का आमच्यासाठी एवढे कष्ट घेतले जात आहेत. कुठून एवढी शक्ती मिळते आमच्या मावळ्यांना. कुठून आली ही जिद्द, किती मोठ हे धाडस. का आमच्यावर जीव ओवाळून टाकण्यास आतुर असतात हे वीर.

आम्ही महाराज आहोत म्हणून?

पण आम्ही.. आम्ही तर स्वतःला या श्रींच्या राज्याचा सेवक मानतो. मग का आमच्या वाटेचे भोग यांच्या वाटेला जावेत. कशासाठी? काय मिळत आमच्या जिवलगांना जीव मुठीत घेऊन लढण्यात. महाराज विचारात गुंग झाले.

शिवा. आमचा शिवा न्हावी. आमच्यासाठी हसत हसत पालखीत बसला. हे माहित असताना की त्या पालखीला यमदेवताचे दूत आपल्या खांद्यावर घेऊन मरणाच्या वाटेला घेऊन जातील. स्वतःचा आयुष्याची समिधा करून पेटलेल्या अग्नीकुंडात प्राणाची आहुती देण्यास शिवा हसत हसत तयार झाला. कुठून येत हे धाडस.

शिवा.... जोहरच्या हाती तर लागला नसेल ना? त्याच्या जीवाच काही बरवाईट तरी....

नाही.. शिवा s s s.. नाही नाही.....

शिवाच्या विचारांनी महाराजांना हुंदका फुटला. त्यांच्या डोळ्यावाटी अश्रू ढळू लागले.

आणि इतक्यात पालखी खाली ठेवण्यात आली. त्यामुळे महाराजांची तंद्री मोडली. महाराज पालखी बाहेर आले. बाजीप्रभू महाराजांना म्हणाले,

“महाराज, मसूद मोठी फौज घेऊन येतो आहे. कुठल्याही क्षणी तो खिंड जवळ करेल. तुम्ही निम्मी सेना घेऊन विशालगड गाठा, निम्मी सेना घेऊन मी खिंडीत थांबतो.”

“नाही बाजी. तुम्हा एकट्याला इथे सोडून आम्ही जाणार नाही. शत्रूशी आपण मिळून झुंज देऊ.”

“नाही महाराज. गनीम खूप मोठा आहे. आपली संख्या कमी. मसूदच्या विशाल फौजेपुढे आपल टीचभर सैन्य टिकण कठीण आहे. तुम्ही निम्मी सेना घेऊन विशालगड गाठा. आम्ही गनिमाला खिंड ओलांडू देणार नाही”

“बाजी!! तुम्हास खिंडीत सोडून आम्ही जाणे शक्य नाही. श्रींची जी इच्छा आहे तेच होईल. आमच्या दैवात जर आमचा मृत्युचं लिहला आहे तर तेही आम्ही स्वीकारू. जीव गेला तरी बेहत्तर पण तुम्हास सोडून जाणे नाही.”

“राजे. तुम्ही स्वराज्याचे स्वामी. शेकडो बाजीप्रभू उभे करता येईल पण त्यांना एकजूट करणारा शिवाजी राजा परत मिळणार नाही.

महाराज S S !! लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे!

तुमच्या सेवेत आजपर्यंत काहीचं मागितले नाही. आज एकच मागणं आहे. तुम्ही पुढे जाऊन विशालगड जवळ करा. प्रत्येक क्षण मोलाचा आहे. गनीम जवळ येत आहे. स्वराज्याला महाराजांची गरज आहे. हा बाजी तुम्हास वचन देतो, जोपर्यंत तुम्ही विशालगडावर सुखरूप पोहचत नाही तोपर्यंत आम्ही खिंड झुंजवू. विचार करू नका महाराज. आई भवानीची शपथ आहे तुम्हास.”

महाराजांनी बाजींना मिठी मारली. श्रीरामांच्या मिठीत हनुमान जसा तृप्त होऊन जाई अगदी तसेच महाराजांच्या मिठीत बाजी क्षणभर विसावले. महाराजांना शेवटचा मुजरा करीत बाजी म्हणाले,

“महाराज! काळजी नसावी. हा बाजी गनिमाला खिंडीतून टीचभर पुढे येऊ देणार नाही.. आपण फक्त एक करा, विशालगडावर सुखरूप पोहोचताच तोफांचे आवाज द्या. आमच्या जीवाचा दगा फटका जरी झाला तरी परिवाराची काळजी घेण्यास स्वामी समर्थ आहेत. तुम्ही आता पुढे व्हा आम्ही मागून येतोच. जय भवानी!!”

“जय भवानी”,म्हणत महाराज जड अंत:करणाने पालखीत बसले. तीनशे बांदल सेना सोबत घेऊन महाराजांची पालखी पुढे धावू लागली. बाजीप्रभूंनी त्या पालखीला एकदा डोळेभरून पहिले आणि आपल्या तीनशे बांदल फौजेसोबत खिंडीत थांबले.

४.

सिद्धी मसूदची फौज खिंड जवळ करत होती.

शंकराने आपल्या जटेतून जसा वीरभद्र उभा करावा तसा हा शिवाचा वीरभद्र खिंडीत उभा टाकला. सोबत बाजींचे थोरले बंधू फुलाजीप्रभू सैनिकांच्या तुकड्या करून त्यांना युद्धासाठी सज्ज करू लागले.

सहा साडे सहा फिट उंची असलेले, तालमीत कसलेले पिळदार शरीराचे बाजी दोन्ही हातात दांडपट्टा चढवून खिंडीत उभा टाकले. बाजी त्वेषाने त्या फौजेकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यातून निखारे फुलत होते. आपल्या बांदल सेनेकडे पाहत बाजी म्हणाले,

“मर्दांनो, ही वेळ आहे झुंज घेण्याची, आपल्या अंगात वाहणाऱ्या सळसळत्या रक्ताला आव्हान देण्याची. स्वराज्यासाठी जीव देण्याचं भाग्य सगळ्यांच्या नशिबी नसत. ते तुमच्या नशिबात आलं आहे. त्या संधीच सोन करा! आपल्या जगण्याचं सार्थक करा! गनीम समोरून येतो आहे. महाराज विशालगडावर पोहचेपर्यंत गनिम टीचभर खिंड ओलांडणार नाही याची जबाबदारी आपली. माझ्या बांदल मर्दांनो आपल्या छातीचा कोट बांधून गनिमाला खिंडीतच थोपवणे”!”

बाजींचे शब्द ऐकून बांदल सेनेच्या पायात त्राण आले. त्यांच्या धमन्यातून वाहणारे उष्ण रक्त उसळू लागले. बाहू स्फुरण पावले.

हर हर हर हर महादेवची आरोळी घुमली. मावळ्यांच्या आरोळीने आसमंत दुमदुमून गेले.

‘दीन दीन' म्हणत यवनी सैन्य खिंडीला भिडले.

दीड हजार यवनी फौजेशी तीनशे मावळ्यांचे रणकंदन सुरु झाले. तलवारीला तलवारी भिडल्या. दोन्ही हातात दांडपट्टा चढवून बाजी फिरू लागले,त्वेषाने यवनी सैन्यावर आक्रमण करू लागले. दांडपट्ट्याच्या वर्मी घावाने शत्रूची खांडोळी पाडू लागले. गरगर फिरत दोन्ही हातात चढवलेला दांडपट्टा गनीमाच्या अंगातून रक्ताच्या चिळकांड्या काढत होता. बाजींचे आघाडीचे सैनिक मागे हटले , पाठीमागचे पुढे सरकले. बाजीप्रभूंचे थोरले बंधू फुलाजीप्रभू पण आपल्या बांदल परिवाराचं नाव सार्थक करत होते. समोर आलेल्या शत्रूला सपासप कापत होते.

महाराज विशालगड जवळ करत होते. विशालगड नजरेत आला आणि समोरील दृश्य पाहून महाराज थक्क झाले. सूर्यराव सुर्वे विशालगडाला वेढा घालून बसला होता. शिवाजी राजांना गडाच्या पायथ्यालाच गाठायचे असा डाव सुर्वेंनी मांडला होता. राजांची बुद्धी सुन्न झाली. एकवीस तास धावून-धावून दमलेल्या आपल्या सैन्याचा सुर्वेच्या ताज्या दमाच्या सैन्यापुढे निभाव कसा लागेल अशी काळजी महाराजांना वाटू लागली. महाराज पालखीतून उतरले. काही झाले तरी हा वेढा फोडून गडावर पोहोचणे गरजेचे होते.

'हर हर महादेव' च्या गर्जनेत महाराज आपल्या मावळ्यांसह शत्रूवर तुटून पडले. काही करून महाराजांना गड गाठायचे होते. कारण जोपर्यंत गडावरून तोफांचे आवाज होणार नाहीत तोपर्यंत आमचे बाजी खिंड सोडून परत येणार नाहीत याची पुरती जाणीव महाराजांना होती. महाराजांना लवकरात लवकर गड चढून तोफेला बत्ती द्यायची होती. सुर्वेचा बेमोड करत महाराज गड जवळ करत होते.

५.

खिंडीत यवनांचे प्रेतच प्रेत पडले होते. बाजींचे पण निम्मी फौजच उरली होती. प्रहरावर प्रहर उलटत चालले होते पण मसूदच्या सैन्याला बाजी खिंड ओलांडू देत नव्हते. मसूदने ताज्या दमाची सैन्याची तुकडी पुढे सरकावली. बाजी प्रेतांच्या ढिगावर थांबून पट्टा फिरवत होते. समोर येणाऱ्याला सपासप कापत होते. बाजींच ते शौर्य बघून शत्रूची सेना त्यांच्या समोर येण्यास धजावेनाचं. बाजींच्या डोक्यावरचे पागोटे कधीच खाली पडले होते. संजाबातून शेंडी मानेवर रुळत होती. घामाने शरीर ओले चिंब झाले होते. नरड्याच्या धमन्या तटतटून फुगल्या होत्या. त्यांचे स्फुरण पावलेले बाहू वज्रासमान भासत होते.

आणि इतक्यात लढता लढता बाजींचे थोरले बंधू फुलाजी कोसळले. शत्रूच्या वाराने त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. लढत लढतच क्षणभर बाजी आपल्या बंधूंकडे पाहू लागले. फुलाजी नजरेच्या इशाऱ्याने धाकल्या बंधूंना जणू सांगत होते.

"बाजी, आम्ही पडलो म्हणून धीर सोडू नको. राजांचा जीव मोलाचा आहे खिंड लढवणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही खिंड लढवा आमच्या प्रयत्नाची आता वेळ झाली."

एकाच वाघीणीचे दुध प्राशन करणारे ते दोन बंधू टक लाऊन एकमेकांकडे बघू लागले आणि फुलाजींनी डोळे मिटले. बाजींचे काळीज पिळवटून निघाले..

“भाऊ!!” असा नकळत हुंदका बाजींच्या मुखातून निघाला.. आपल्या बंधूसोबतच्या सर्व आठवणी एका क्षणात डोळ्यांसमोर रेंगाळू लागल्या. मोठ्या भावाची साथ आता नाहीशी झाली या जाणीवेने त्यांच्या अंतकरणाला प्रचंड यातना झाल्या. आता कोणाच्या मिठीत विसावणार? कोण मायेने पाठीवरून हात फिरवणार? भाऊ!! आम्हाला पोरका करून गेलात. बाजींच्या डोळ्यातून अश्रू निखळले. डोळ्यात दाटलेल्या पाण्याने समोर पडलेल्या थोरल्या भावाची आकृती पुसटशी दिसू लागली.

पण महाराज अजून विशालगडावर पोहोचले नव्हते. आपल्यावर असलेल्या जबाबदारीमुळे बाजी भानावर आले. क्षणातच स्वतःला सावरीत बाजी परत शत्रूवर तुटून पडले.

एव्हाना निसर्गाचे थैमान थांबले होते. पण बाजींप्रभूंनी रुद्र्तांडव खिंडीत सुरु केला. सव्वाशे मावळे हाती घेऊन बाजी शत्रूशी दोन हात करत होते. शरीरावर वार झाला नाही असा एकही मावळा शिल्लक राहिला नव्हता. ताज्या दमाची फौज बाजींवर तुटून पडली. समोरून झालेला वार बाजींनी पेलला. बाजींची निधडी छाती तटतटून फुगली, पेललेल्या वाराने बाजी किंचित खाली झुकले, त्यांच्या पिंढऱ्याच्या मासपेश्या लाल बुंद झाल्या, पायात हत्तीच बळ आणून बाजींनी तो वार उधळला आणि शत्रूच्या फळीवर आवेषाने तुटून पडले. विजेचा तडाखा बसावा तसा बाजींचा तडाखा शत्रूला बसला. समोर उभ्या असलेल्या यवनांना काही कळण्याच्या आधीच त्यांच्या अंगावर बाजींचा वार झाला. एकच कापाकापी सुरु होती. मावळे काही केल्या शरण येत नव्हते. स्वतः बाजीप्रभू प्रेतांच्या ढिगाऱ्यावर आपले पाय ठेऊन लढत होते.

ते शौर्य पाहून सिद्धीचे डोळे मोठे झाले. उभ्या आयुष्यात त्याने असा पराक्रम पाहिला नव्हता. आपल्या सैन्याची होणारी कापाकापी पाहून सिद्धी तडफडला. मसूदने बंदूक आणायला सांगितली. नेमबाजाला बाजींवर नेम धरण्यास सांगितले. नेम धरला गेला आणि बार उडाला. गोळी सु-सु करत बाजींच्या छाताडात घुसली. गोळी लागताच बाजी कोसळले. चार सहा मावळे बाजींना मागे घेऊन आले. बाजी कोसळले तरी त्यांचे मावळे डगमगले नाहीत. तेवढ्याच आवेशाने ते समोरून येणाऱ्या फौजेवर हल्ला चढवू लागले.

६.

महाराज गडाच्या नजीक पोहचू लागले. सुर्वेचा प्रतिकार आता कमी झाला होता. गड गाठण्याकरिता महाराज आपल्या फौजेनिशी गडाच्या दिशेने धावत होते. एकीकडे महाराज गड जवळ करत होते तर दुसरीकडे बाजीप्रभू ग्लानी येऊन पडले होते. ग्लानीत असलेल्या बाजींनी विचारले, इशारतीची तोफ झाली का? सगळ्यांच्या नकारार्थी माना हलल्या. ते पाहून बाजी शुद्धीवर आले.

“तोफ झाली नाही? महाराज गडावर पोहोचले नाहीत? तोफ झाली नाही तर हा बाजी मरतो कसा!! आम्ही महाराजांना वचन दिले आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत बाजी खिंड लढवणार" म्हणत बाजी उठू लागले. मावळ्यांनी त्यांना अडवलं पण बाजी म्हणाले,“तोफ झाली नाही आणि बाजी मरतो कसा.....”

आणि यावेळेला हातात विटा घेऊन बाजी परत खिंडीत उभे राहिले. शत्रूशी झुंज घेऊ लागले. जणू काय बाजी यमाला दरडावून सांगत होते,

“अरे यमराजा.... अजून तोफ झाली नाही. आमचे महाराज गडावर पोहोचले नाहीत. जोपर्यंत इशारतीची तोफ घुमत नाही तोपर्यंत हा बाजी खिंड सोडून तुझ्यासोबत येणार नाही..”

महाराजांनी सुर्वेंचा बिमोड करून विशालगड गाठला होता. महाराज गडाच्या महादरवाजातून प्रवेश करताच गडाचे किल्लेदार त्यांना सामोरे केले. किंचित ही वेळ वाया न जाऊ देता महाराजांनी किल्लेदाराला आज्ञा दिली.

“किल्लेदार s s s तोफास बत्ती द्या. आमचे बाजी फुलाजी खिंड लढवत आहेत. तोफांचे आवाज ऐकल्या शिवाय आमचे मावळे खिंड सोडणार नाहीत. तोफ डागा!!"

महाराजांच्या आदेशानुसार किल्ल्यावरून तोफांना बत्ती देण्यात आली.

आणि लढता लढताच बाजींच्या कानावर तोफांचा आवाज ऐकू आला. पहिली तोफ!! दुसरी तोफ!! तिसरी तोफ!! धडामधूम S S S S करत तोफा गर्जल्या. आणि बाजी तोफांचा आवाज कानी येताच प्रसन्न झाले.

“महाराज गडावर पोहोचले. आता बाजी मरावयास मोकळा झाला.”

एवढ्यात समोरून बाजींच्या शरीरावर तलवारीचे वार झाले. बाजींचे शरीर पूर्ण रक्तबंबाळ झाले होते. एकवीस प्रहर घेतलेल्या अपार कष्टाचे सार्थक झाले होते. पूर्णपणे थकलेले बाजी शत्रूचा वार होताच कोसळले.

बाजी कोसळले, जणू काय स्वराज्याचे बुरुजचं ढासळले. बाजी पडलेले पाहताच यवनी सैन्याला जोर चढला. त्यांनी प्रचंड हल्ले चढवले आणि एक एक मावळा गतप्राण होऊन पडू लागला पण खिंड कोणी सोडत नव्हता. मावळे आता थकले होते ,रक्ताने माखलेले मावळे एक एक करीत पडू लागले, पण मनगटात जोर असेपर्यंत कोणीच हटले नाही,जिद्द सोडली नाही. आणि.. आणि मावळ्यांच्या शरीराचे चिंधड्या-चिंधड्या करीत सिद्धी मसूद विशालगडाकडे दौडू लागला.

तीनशे मावळ्यांची बांदल सेना आपल्या बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभूच्या नेतृत्वाखाली अखंड झुंजली.

“महाराज विशालगडावर पोहचेपर्यंत गनिम टीचभर खिंड ओलांडणार नाही याची जबाबदारी आपली. माझ्या बांदल मर्दांनो आपल्या छातीचा कोट बांधून गनिमाला खिंडीतच थोपवणे”

बाजींचे हे एकच वाक्य मावळ्यांच्या कानात शेवटपर्यंत घुमत होते. महाराजांना वाचवण्यासाठी बाजींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अंधारात गुडूप होत चाललेल्या स्वधर्म आणि स्वराज्याला बाजींनी आपल्या बलिदानाच्या ज्योतीने प्रकाशमय केले. बाजींच्या रक्तानी खिंड पावन झाली आणि खिंडीला बाजी,फुलाजी प्रभू आणि त्यांच्या तीनशे मावळ्यांच्या स्वामिनिष्ठ रक्ताचा अभिषेक झाला.....


Rate this content
Log in