Smita Vivek Agte

Inspirational

4  

Smita Vivek Agte

Inspirational

नव्या माहेरची नाती

नव्या माहेरची नाती

22 mins
358


सरोजिनीताई भराभरा त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडल्या आणि नवं माहेर या त्यांच्या संस्थेमधल्या मुलींना उद्देशून म्हणाल्या,"काय झाली ना सगळी सभेची तयारी? चला तर मग, आपल्या संस्थेला भेट देण्यासाठी येणारी प्रमुख पाहुणे मंडळी आत्ता येतीलच".

सरोजिनी ताई पुढे जात होत्या तेव्हढयात त्यांना काही तरी आठवलं आणि त्या परत मागे फिरुन म्हणाल्या,"आपल्या संस्थेतल्या तुम्हा मुलींपैकी कोणकोण बोलणार आहेत ते लक्ष्यात आहे ना?".

तश्या जयश्री, सुजाता आणि चंदा तिघी त्यांच्या जवळ आल्या आणि त्यांच्या पाया पडून म्हणाल्या," ताई आम्ही तिघी ह्या सभेमध्ये बोलणार आहोत. आणि तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही अगदी छान बोलू. त्यातून तुमचे आशीर्वाद तर आहेतच. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत राहा ताई". सरोजिनी ताईंनी त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि कौतुकाने त्यांना म्हणाल्या," मला कसली काळजी असणार गंss? तुम्ही सगळ्याजणी असल्यावर आपला कार्यक्रम अगदी छानच होणार. ठीक आहे, लवकर चला आता, प्रमुख पाहुणे मंडळी येण्याची वेळ झालीच आहे".

इतके बोलून त्या स्टेजवरची तयारी पाहण्यासाठी गेल्या.

हार, श्रीफळ, शाली असं सगळे वेगवेगळ्या ताटांमध्ये ठेवलेले होते, स्टेजवरची सजावटही संस्थेतल्या मुलींनी उत्तमच केली होती. हे सगळं पाहून सरोजिनी ताई मनापासून प्रसन्न झाल्या होत्या.

संस्थेमधल्या सगळ्या माहेरवाशीणी स्टेजच्या पुढे लायनीमधे शिस्तीत बसल्या होत्या. सरोजिनी ताई आणि काही मोजक्या दोन तीन जणी संस्थेच्या गेटजवळ उभ्या राहून पाहुण्यांची प्रतीक्षा करत होत्या. समोरून पाहुण्यांच आगमन झालं.

प्रमुख पाहुण्या नीला ताई, आणि त्यांचे बाकीचे सहचारी मुख्य दरवाजाजवळ आले. तसे सरोजिनी ताईंनी त्यांचे हार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

पाहुणे स्टेजवर येऊन स्थानापन्न झाले होते. सरोजिनी ताई माईक जवळ येऊन स्मित हास्याने बोलू लागल्या.

"आपले आजचे आदरणीय पाहुणे आणि पुढे बसलेल्या माझ्या सगळ्या मुली म्हणजेच माझ्या माहेरवाशीणी या सगळ्यांचे मी प्रथम स्वागत करते. आपल्या संस्थेला आज नीला ताईंसारख्या मानसोपचार तज्ञांनी भेट दिली आहे त्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानते व आमच्या संस्थेकडून त्यांना शाल व श्रीफळ अर्पण करते. नीला ताईंनी त्याचा स्वीकार करावा अशी मी विनंती करते".

जयश्री आणि सुजाता या दोघींनी लगबगीने सरोजिनी ताईंकडे शाल व श्रीफळ दिले. सरोजिनी ताईंनी ते नीला ताईंना अर्पण केले. टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला.

नीला ताई दोन शब्द बोलण्यासाठी माईक जवळ आल्या आणि म्हणाल्या, "आदरणीय सरोजिनी ताई आणि समोर बसलेल्या माझ्या मैत्रिणी यांची मी आभारी आहे. आज तुम्ही मला थोडा वेळ का होईना तुमच्या या माहेर च्या घरामध्ये सामील करून घेतलत. आज एका स्त्रीने स्त्री च्या मागे उभे राहणे, तिला संकटाच्या वेळी मदत करणे आणि तिचे मन खंबीर करण्याची खूप गरज आहे. जे काम आज तुमच्या सरोजिनी ताईंनी अगदी लीलया केलेलं आहे नाही काss? त्या तुमच्या पाठीशी उभ्या आहेत, आज अश्या माहेर सारख्या संस्था असल्यामुळे आणि सरोजिनी ताईंसारख्या समाजसेविका असल्यामुळे आपल्यासारख्या कित्येक स्त्रियांना जगण्यासाठी आधार मिळतो आहे. सरोजिनी ताईंच कार्य अगदी वाखाणण्याजोगचं आहे. पण खरतर समाजात आज काही स्त्रियांवर अशी वेळ येते की मग त्यावेळी त्यांना त्यांचं सासर आणि माहेर दोन्हीही पारखी होतात, ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. स्त्रियांवर होणारे हे शारीरिक व मानसिक अत्याचार थांबायला हवेतच ना? आपले जन्म दाते आई वडील आपले सासू सासरे यांनी ही गोष्ट समजून घ्यायला हवी. आज हुंडा नाही दिला म्हणून, नाहीतर नवऱ्याचं एखाद प्रेम प्रकरण म्हणून किंवा घरातली सगळीच कामं मुद्दाम वाटेल तशी तिच्याकडूनच करून घेऊन तिला मोलकरणीसारखी वागणूक दिली जाते. खरच त्या वेळी स्त्रियांची किती विटंबना केली जाते ह्याचा विचारच केला जात नाही. एखाद्या पुरुषाने बळजबरीने स्त्रीला घराबाहेर काढताना असा विचार त्याच्या मनात एकदाही येत नसेल का? की ही आपलं घर, आपले आईवडील ह्या सगळ्यांचा त्याग करून लग्न होऊन इथे येते तेव्हा तिची काळजी घेणं, तिला आपल्या स्वतःच्या पायावर उभं करणं, तिला आधार देणं हे आपलं कर्तव्य आहे. ही परिस्थिती माझ्या बहिणीवर, मुलीवरही येऊ शकते हा विचार त्यांनी करायला नको का?

पण नाही असे विचार अजूनही समाजामध्ये रुजत नाहीयेत. रुजत आहेत ते फक्त असे विचार, की ही मुलगी लग्न करून आपल्या घरचं काम करायला किंवा आपण म्हणू तसं वागायला इथे आली आहे. तिने आपल्या शब्दाबाहेर जाताच कामा नये. नाही तर तिला आम्ही मारू किंवा घराबाहेर तरी काढू. ह्या सगळ्यामध्ये खंत वाटावी अशी गोष्ट असते जेव्हा त्या घरात असलेलीच स्त्री, मग ती ह्या मुलीची सासू असेल किंवा नणंद असेल. तर तीही एक स्त्री असूनही दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकत नाही. आणि मग अश्या अबला मुली रस्त्यावर येतात. हे कुठेतरी थांबायला नको का? आपल्या पासून तरी ही सुरुवात करायला हवीच ना? एखाद्या बाईच्या मागे एका बाईनेच ठाम पणे उभे राहायला हवेच की. जर स्त्रिया अश्या अनाथ होत असतील तर त्यांना आपल्या सारख्याच माणुसकी असलेल्या स्त्रियांनीच सावरायला हवं. आपणच त्याच्यासाठी हे काम करायला हवं.

जे कार्य आज तुमच्या सरोजिनी ताई करत आहेत. तर त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन तुम्ही आणि मी ही या कार्याला पुढे न्यावं अशी माझी इच्छा आहे. आता मी माझे हे दोन शब्द थांबवते. कारण आपल्यातल्याच काही मैत्रिणींना बोलायची त्यांना त्यांचे अनुभव व्यक्त करण्याची संधी मला द्यायची आहे. बरोबर ना? नमस्कार".

नीला ताई बोलत होत्या आणि सगळे अगदी मन लावून त्यांचं बोलणं ऐकत होते.

सरोजिनी ताई पुढे आल्या आणि म्हणाल्या,"आज नीला ताई जे काही म्हणाल्या ते खरच वास्तव आहे. अजूनही आपल्याकडे एका स्त्रीकडे एकतर ती उपभोगाची वस्तू किंवा आपल्या घरातली नोकर ह्या दृष्टीनेच बघितलं जातं. पण तरीही ज्या स्त्रीच्या वाट्याला असे भोग येऊन बेघर होण्याची वेळ येत असेल तर तिला ह्या माहेरची दारं कधीही उघडीच असतील. आता आपल्यातल्याच काही जणी इथे येऊन दोन शब्द बोलतील".

"जयश्री माईक पाशी येऊन उभी राहिली... "नमस्कार, माझं नाव जयश्री. या इथे स्टेजवर येऊन बोलण्याचं भाग्य मला लाभलं आहे हेच माझ्यासाठी खूप काही आहे.

माझं लग्न ठरलं तेव्हा आमच्या घरात खूपच आनंद झाला होता सगळ्यांना. सासरची माणसं ही चांगली वाटली होती. थोडा हुंडा जास्त मागितला होता पण वडील म्हणाले की करू काहीतरी. हातचं चांगलं स्थळ जायला नको. पण आता असं वाटतं की मी तेव्हाच हे थांबवायला हवं होतं. पण मीही लग्न ठरलं ह्या आनंदातच होते. पुढचा विचारच केला नाही. भाऊ आणि वहिनी सुध्दा म्हणाले की बघू करू काहीतरी व्यवस्था. वडिलांनी त्या प्रमाणे बरंच कर्जही काढलं...

लग्नाच्या दिवशीही सगळं छान चाललं होतं. आणि अचानक मुहूर्ताच्या वेळी मुलाचे बाबा म्हणाले की आम्ही हुंडा वाढवला आहे. आता तीन लाख नाही तर पाच लाख दयावे लागतील. नाहीतर हे लग्न मोडलं असं समजा. बाबा खूप अस्वस्थ झाले होते. आता काय करावं हेच त्यांना सुचत नव्हतं. पण तरीही ते म्हणाले की मी तुमच्या पाया पडतो होss, वाटल्यास मी दोन तीन दिवसात पैशांची काहीतरी व्यवस्था करीन पण मुहूर्त टळू देऊ नका".                                             

शेवटी कसे बसे मूलाकडचे तयार झाले. लग्न होऊन मी सासरी आले. पण त्या दिवशी मला माझ्या नवऱ्याबरोबर त्याच्या खोलीत कोणीच जाऊ दिलं नाही. तुझ्या वडिलांनी बाकीचे पैसे दिले की तुमचा संसार सुरू होईल असं माझ्या सासूबाई म्हणाल्या. दोन दिवसांनी बाबा माझ्या सासरी आले. दोन लाख रुपये घेऊन. आणि माझ्या सासरच्या लोकांना म्हणाले की आता मात्र मागू नका. हेच पैसे मी घर गहाण ठेऊन आणले आहेत. एकदाचा आमचा संसार सुरू झाला. काही दिवस चांगले गेले होते. इकडे आईकडे मात्र बाबा आणि भाऊ ह्यांची घर गहाण ठेवण्यावरून भांडण व्हायला लागली होती. पैसे नाही भरता आले तर घरही जाईल. असंच भावाचं म्हणणं होतं. पण बाबा त्याला म्हणाले की त्यांना त्या वेळी जे सुचलं तस त्यांनी केलं.

आमच्या लग्नाला एक वर्ष झालं. बाबांना कर्जाचे हप्ते फेडणं कठीण जात होतं. त्यात घर ही गहाण. रोज हा विचार करून करून बाबा आजारी पडू लागले. आणि एक दिवस त्यांच्या छातीत दुखू लागलं ते शेवटचचं.

बाबा गेल्यानंतर परत सासरच्या लोकांच्या मागण्या चालू झाल्या. तुझे बाबा गेले, आता तुझ्या वाटणीचं जे काही असेल ते घेऊन ये. मी माहेरी येऊन आईला सांगितलं की मी नाही जात परत तिकडे. काही नको त्यांना पैसे द्यायला. पण आई गप्प गप्पच होती. तिने तिचे काही दागिने मोडून भावाला न सांगता माझ्या हातात सासरी देण्यासाठी काही पैसे दिले. मी पैसे घेऊन सासरी आले. आणि त्या लोकांना म्हणालेही की आता मी माझ्या घरच्यांकडे कधीच पैसे मागणार नाही. के करायचं आहे ते करा. ह्यावर ती मंडळी ही मान्य झाली होती. पण ते तेव्हढ्यापुरतचं होतं बहुतेक.

आईची तब्बेत माझ्या काळजीने बिघडू लागली होती. त्यात भाऊ आणि वाहिनी पण तिला घर दागिने ह्यांबद्दल वाटेल तसे बोलतं होते. शेवटी ती ही आजारी पडली आणि हे जग सोडून गेली.

आता तर ह्या सासरच्या माणसांच्या नवीन मागण्या सुरू झाल्या. म्हणे आईचे दागिने मुलगी म्हणून तुलाचं मिळायला हवेत. जा घेऊन येss. पण आईने तर दागिने ह्या आधीचं विकून टाकले होते. त्यावरून रोज भांडणं होत होती. मला आता हे सहन झालं नाही आणि एक दिवस मी त्यांना नकळत त्या घरातून बाहेर पडले. परत जायचं नाही असं ठरवूनच. भावाकडे आले आणि त्याला सगळं सांगितलं तर आता तो ही मला आता ह्या घरात ठेवायला काचकूच करत होता.

शेवटी वाट मिळेल त्या रस्त्याने निघाले. एका देवळाच्या पायथ्याशी बसून मी रडत होते. तेव्हाच माझ्या खांद्यावर कोणीतरी प्रेमाने हात ठेवला. मी मान वर करून बघितलं तर एक मध्यम वयाच्या बाई माझ्यासमोर उभ्या होत्या. अन मला रडण्याचे कारण खोदून खोदून विचारत होत्या. त्यांना मी माझी सगळी कहाणी सांगितली तेव्हा त्या म्हणाल्या की तुझी इच्छा असेल तर माझ्याबरोबर येशील का? तुझ्या माहेरी. मी डोळे पुसून फक्त मानेनेच हो म्हणलं. त्याच ह्या आमच्या सरोजिनी ताई. इथे आल्यावर त्या म्हणाल्या की एक तर तू पहिलं काम करायचं ते म्हणजे ह्या पुढे असं हतबल होऊन रडायचं नाही. तुझं नवीन आयुष्य सुरू झालंय असं समजायचं. आणि इथे नुसतंच राहायचं नाही तर तुला पुढचं शिक्षणही घ्यावं लागेल. स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल. समजलं?

मी त्यांना मिठी मारली आणि त्यांनी माझे डोळे पुसले पण तरीही माझ्या डोळ्यातून आनंदाने पाणी येतचं होतं. मला त्यांनी जवळ घेतले आणि म्हणाल्या की आजपासून मीच तुझी आई.                              

त्यांनतर मात्र मी डिग्री पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. आणि ताईंच्या ओळखीनेच एका शाळेत शिक्षिका आहे मी आज. पण माझं घर आता एकच माझं माहेर".

जयश्रीची कहाणी ऐकून सगळ्यांच्याच डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या.

सुजाता पुढे आली आणि माईकवर बोलू लागली.

"मी सुजाता. माझंही असंच एका घरात लग्न झालं. पण मला जयश्री सारखे आईवडील नव्हते पहिल्यापासूनच. म्हणजे मी लहान असतानाच एका अपघातामध्ये ते दोघेही गेले. त्यावेळी मी माझ्या आत्याकडे होते म्हणून वाचले.

पुढे मग काही दिवस आत्या आणि काही दिवस मामा अशी माझी वाढवण्यासाठी वाटणी झाली. कारण त्या कोणालाही मला कायमसाठी अडकून घ्यायचं नव्हतं म्हणे. एकाच गावात असल्यामुळे शाळेचा प्रश्न नव्हता. ते तर मी दोघांकडूनही जाऊ शकत होते. मग सहा महिने आत्या व सहा महिने मामा असा माझा गावातल्या गावातच प्रवास सुरु असायचा. बरं मी आयतेच खाते असं त्यांचं म्हणणं असावं म्हणनू की काय पण दोन्ही घरी मला अगदी मोलकरणी सारखी कामे करावी लागत होती. आणि खुप वेळा कारण नसताना मारही खावा लागत होता. माझे लोढणे विनाकारण गळ्यात अडकून बसल्याचा हा आत्या आणि मामाचा राग असावा असं मला नेहेमी जाणवायचं.

कसं तरी बारावी पर्यंत माझं शिक्षण झालं. झालं म्हणजे काय ते शाळेतून मुलींना मोफत होतं म्हणून तरी झालं. नाहीतर माझी फी भरायला पैसे नाहीत म्हणून कदाचित मला मामा आणि आत्याने शाळेत घातलच नसतं बहुतेक.

मी बारावी झाले आणि आता ही ब्याद लवकर इथून जाऊ दे म्हणून मामा आणि आत्यानी माझं लग्न ठरवलं...

लग्न झाल्यावर पहिले काही महिने खरच खूपच छान गेले. मी मनात म्हणलही की चला आता तरी माझी परवड होणार नाही. मला आता हक्काची प्रेमाची माणसं मिळाली.

काही महिन्यानंतर मला दिवस गेले. घरात एकच विषय चघळला जाऊ लागला. सगळे मला रोज रोज एकच गोष्ट ऐकून दाखवू लागले. ते म्हणजे आपल्या घरात पहिला मुलगाच जन्माला आला पाहिजे बरं का? आम्हाला तुझ्याकडून मुलगाच हवा. आणि मुलगाच आहे का याची खात्री करण्यासाठी एक दिवस माझ्या नवऱ्यानं मला खोटं सांगून त्याच्या ओळखीच्या डॉक्टर कडे नेलं. तिथे माझ्या काही तपासण्या झाल्या आणि कळलं की गर्भ मुलीचाच आहे. ह्या चिकित्से बद्दल मला काहीच कळू दिलं नव्हतं. मग मला घरी सांगितलं गेलं की जे मूल पोटात वाढतंय त्याला काहीतरी प्रोब्लेम आहे त्यामुळे आपल्याला गर्भपात करावाच लागेल नाहीतर जन्माला येऊन त्याला खूप त्रास होईल. मग मी ही तयार झाले कारण एवढं डॉक्टर सांगत आहेत म्हणजे नक्की खरंच असणार अशीच माझी समजूत होती.

मला गर्भपात करावा लागला. पण घरी आल्यावर सासू म्हणाली की बरं झालं हे केलं. नाहीतर मुलीला जन्म द्यावा लागला असता. डॉक्टरांकडुन हे आधीच समजलं ते बरं झालं.

तेव्हा मला काय खर आहे ते समजलं की मुलगी नको म्हणून खोटं सांगून ह्या लोकांनी मला हे पाप करायला भाग पाडलं होतं.

काही महिन्यांनी मला परत दिवस राहिले. आता मला संशय येईल म्हणून नवऱ्याने डॉक्टरच बदलला. आणि फक्त मला कळू न देता गर्भजल चिकित्सा केली.

परत मुलगीच आहे हे लक्ष्यात आलं माझ्या. कारण ह्या वेळीही नवरा असंच काही तरी बोलायला लागला की मुलगा हवा होता पण नशीबच फुटकं आहे तुझं. तू काही मला मुलगा देऊ शकणार नाहीस. पण मला मुलगी नकोय. तुला मागच्या वेळेसारखाच गर्भपात करावा लागेल. आणि जोपर्यत मुलगा होणार नाही तोपर्यंत असंच चालत राहणार. असं बोलून तो तावातावाने बाहेर गेला.                                 

आता मात्र मी शहाणी झाले होते. पोटात मुलगी असेल तरी मी तिला जन्म देणारच असं मी मनाशी पक्क ठरवलं. पण हे लोक माझं ऐकून घेणार नाहीत हीच भीती होती.

एक दिवस मात्र काहीतरी निमित्त साधून मी घरातून बाहेर पडले. वाट मिळेल तशी चालत सुटले. किती वेळ चालत होते कोण जाणे पण मला स्वतःला आणि माझ्या मुलीला वाचवायचं होतं. त्यामुळे मी वाट फुटेल तशी चालतचं राहिले. एकतर पोटात बाळ आणि दिवसभर अन्नाचा कणही नाही, त्यामुळे चालता चालताच माझ्या डोळ्यांपुढे अंधेरी आली आणि मी खाली पडले. पुढचं मला काहीच कळलं नाही. शुद्धीवर आले तेव्हा मी कुठल्याशा दवाखान्यात होते. आणि एक मध्यम वयाच्या बाई माझ्या बाजूला बसल्या होत्या. माझ्याकडे पाहून त्या म्हणाल्या की आत्ताच डॉक्टरांकडून समजलं की तुला दिवस आहेत? मग तरी घर सोडून अशी वणवण का फिरते आहेस. त्या बाळाला आणि तुला त्रास होणार नाही का?

माझ्या डोळ्यात पाणी येऊन मी त्यांना म्हणाले की अहो ताई मी बाळालाच तर वाचवते आहे. म्हणूनच तर अशी घरापासून दूर दूर पळते आहे. त्यांनी मला खर काय ते विचारलं आणि मी ही अगदी लहानपणापासूनची सगळी हकीकत त्यांना सांगितली.

त्या माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या की तुला तुझ्या घरी तुझ्या माहेरी, जिथे तुझ्यासारख्याचं आणखीही मुली आहेत तिथे कायमचं यायला आवडेल का?

मला आई मिळल्याचाच आंनद झाला आणि मी रडता रडता त्यांच्या मिठीतच शिरले.

ती माझी आई म्हणजेच आमच्या सरोजिनी ताई.

आता मला एक आठ वर्षाची मुलगी आहे. मला ताईंनी विचारले होते की तुला पुढे शिक्षण घ्यायचे आहे ना? मग मी ही हो म्हणाले. मी पदवी पर्यंतच शिक्षण इथे पूर्ण केलं. आमच्या ह्या माहेरी ताईंचा फक्त एकच नियम आहे तो म्हणजे माझ्यासारख्याचं ज्या ज्या मुली इथे आहेत त्यांना ताई शिक्षण घ्यायला लावतातच. त्या म्हणतात की इथे तुम्ही राहा. पण शिक्षण घ्या आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहा. मानानी जगा. कुणाच्याही कुबड्यांचा आधार घेऊ नका. खरच आज मी शिकले आणि माझ्या हिमतीने आणि ताईंच्या आशिर्वादाने मी वकिली करते आहे. सत्याची बाजू मांडते आहे. मी मुलीलाही छान शिकवून कणखर बनवणार आहे. पण माझं घर मात्र आता एकच आहे. ते म्हणजे माझं माहेर". सुजाताच बोलणं संपलं तरी सगळ्यांचे कान आणि डोळे फक्त तिच्यावरच स्थिर होते...

चंदा स्टेजवर आली आणि तीही अनावर होऊन बोलायला लागली.

"माझं नाव चंदा. जयश्री आणि सुजताप्रमाणेच मी ही अशीच ह्या माहेरची होऊन गेले. तसं पाहिलं तर आम्ही तिघीच नाही तर आमच्या माहेर मधल्या प्रत्येक स्त्री ची एक वेगळी कहाणी आहे.

मला असं म्हणायचं नाहीये की सासरच्या प्रत्येक घरातली माणसं किंवा प्रत्येक नवरा हा वाईट असतो. काही ठिकाणी खरच खूप छान असतात सासरची माणसं. नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला विचारल्याशिवाय एकही गोष्ट करत नाही. दोघेही अगदी मिळून मिसळून राहतात. पण अजूनही काही ठिकाणी खरच बायकांना अजिबात किंमत नसते. त्यांच्या विचारांना तर जाऊद्या त्यांना स्वतःलाच त्या घरात किंमत नसते.

माझी तर कहाणी वेगळीच आहे. माझंही बारावी पर्यंत शिक्षण झालं होतं. सगळं कसं खूप छान चाललं होतं. मला पुढेही शिकायचं होत पण एक दिवस अचानक वडील हृदय विकाराच्या धक्क्याने गेले. घरात मी आणि आई दोघीचं, कारण मला भाऊ बहीण कोणीच नाही. वडील गेले हे दुःख आईनी खूपच मनाला लावून घेतलं होतं. इतकं, की ती मधे मधे डोक्यावर परिणाम झाल्यासारखीच वागायला लागली होती. मधूनच काही कारण नसताना ओरडा आरडा करायला लागली. आमचं घर म्हणजे एक चाळीवजा होतं. त्यामुळे रात्री बेरात्री आई ओरडायला लागली की सगळे आजूबाजूचे आमच्या घरी जमा व्हायचे. कधी कधी बाहेरच्या नळावर पाणी भरायला म्हणून आई जायची, पण तिथेही ती विनाकारण भांडण करायची. आणि अगदी समोरच्या कोणालाही मारायला धावायची. मग मात्र मी तिची ट्रिटमेंट चालू केली मानसोपचार केंद्रामध्ये. त्यानंतरचे थोडे दिवस चांगले गेले पण परत तिचा त्रास सुरू झाला आणि एकदम ती वेड्यासारखे हातवारे करायला लागली. कधीकधी तर मलाही मारायला अंगावर धाऊन येत होती.

आता मात्र शेजारी पाजारीही म्हणू लागले होते की ही बाई वेडी झाली आहे. हिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवायला पाहिजे. नाहीतर ही कोणालाही मारेल.

मग मात्र मी माझं मन घट्ट केलं आणि डॉक्टरांना विचारून तिला वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये ठेवलं. बाबांनी जाताना जे काही थोडे फार पैसे ठेवले होते ते मी आईच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये तिच्या नावावर ठेऊन दिले.

आता मी घरी एकटीच राह्यले. आई नसली तरी माझा स्वतःचा खर्च तर करायलाच हवा नाss म्हणून मी रोज नोकरी शोधण्यासाठी जाऊ लागले. पंधरा दिवसच झाले असतील आईला हॉस्पिटलमध्ये ठेऊन, पण एक दिवस तिकडून निरोप आला की आई झोपेतच गेली. तीचं सगळं कार्य मीच केलं. हॉस्पिटल मध्ये तिच्या नावावर ठेवलेले जे पैसे होते त्यातले काही तिच्या शेवटच्या कार्याला खर्च झाले. आणि उरलेले त्या हॉस्पिटलला डोनेट केले.

परत मी नोकरीच्या शोधात फिरू लागले.

आमच्या बाजूला आधीचे भाडेकरू जाऊन एक नवीनच बिऱ्हाड रहायला आलं होतं. त्यांचं नाव होतं यमुताई. त्यांचे मिस्टर बाहेरगावी असायचे. ते मला कधी दिसलेच नाहीत. थोड्याच दिवसांत त्या यमुताईंची माझ्याशी त्यांची ओळख झाली. मी ही आई आणि बाबा याच्याबद्दल त्यांच्याशी मनमोकळं बोलायला लागले. माझी सगळी कहाणी ऐकून त्यांनाही वाईट वाटलं होतं. आणि मग मला त्या म्हणाल्या की. अग नोकरी मिळेल तेव्हा मिळेल, आजकाल नोकरी मिळायला खूप जड जातं. त्या हे ही म्हणायच्या की नोकरी कशाला लग्न कर ना. माझ्याकडे आहे एक चांगलं स्थळ आहे. लग्न झाल्यावर तुला तिथे काही करावं लागणार नाही. अगदी सगळ्या कामांना नोकर आहेत. राणीसारखी राहाशील तू तिथे. ती माणसं चांगली आहेत पण त्यांच्या शब्दा बाहेर जायचं नाही. ते सांगतील तसं करायचं. कायss?....

मला पण आनंदच झाला होता. त्यानंतर एक दिवस त्या यमुताईंनी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम ठरवला.         

मुला कडचे फक्त आई आणि मुलगा असे दोघेच जण बघायला आले होते. आणि माझ्याकडचे तर काय मी आणि बाजूच्या काकू एव्हढेच.

मुलाच्या आईला मी पसंत पडले होते. मुलालाही मी आवडली असावी असं मला आपलं तेव्हा वाटलं होतं.

त्या लोकांनी लग्न पुढच्याच आठवड्यात ठरवलं. त्यामुळे खूप घाईघाईतच आमचं लग्न झालं.

लग्न झाल्यावर मी ते चाळीतले भाड्याचे घर सोडून दिलं होतं. इकडे सासरी त्यांचं घर खरचं प्रचंड मोठं होत. लग्नाच्या दिवशी रात्री मी त्याची वाट पाहत आमच्या खोलीत बसले असतानाच, त्याच आगमन झालं. तो खोलीत आला ते दारूच्या नशेतच. त्यामुळे आमची लग्नानंतरची पहिली रात्र साजरी झाली ती त्याच्या तोंडाला येणाऱ्या उग्र वासानी आणि ज्या नात्याला आपण प्रेम म्हणू शकणार नाही अश्या दादागिरीमधेच...

त्यानंरची प्रत्येक रात्र ही अशीच जाऊ लागली. रात्री बेरात्री तो घरी यायचा. दिवसभर कुठे असायचा, काय करायचा हे मला काहीही कळत नव्हतं. पण रात्री कितीही उशिरा आला तरी त्याची वासना मात्र मी शमवलीच पाहिजे अशी त्याची अपेक्षा नाही तर बळजबरी होती.

मला घरात सगळं मिळत होत पण सासुबाई मला घराच्या बाहेर कधी जाऊच द्यायच्या नाहीत. काय हवं असेल ते सांग, ते आम्ही आणून देतो असं त्या म्हणायच्या. त्यांना काही विचारायचं धाडस होत नव्हतं मला.

माझ्या बाबतीत काय चालले आहे ते काहीच मला कळत नव्हतं.

एक दिवस मात्र ते धक्कादायक सत्य माझ्यासमोर आलं.

माझा नवरा गेले आठ दिवस घरीच आला नव्हता.

मी सासूला विचारलं की हे कुठे बाहेरगावी गेले आहेत का?

तर त्यावरचं त्यांचं उत्तर ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकते आहे की काय असचं मला वाटायला लागलं.

त्या म्हणाल्या होत्या की तो गेला आता त्याच्या घरी. त्याच इथलं काम झालं. आणि तो काही तुझा नवरा नाहीये बरं काss? आणि मी ही तुझी सासू बिसू काही नाहीये.

तुझ्या बाजूला ज्या बाई राहतात त्यांनी दोन लाख रुपयांमध्ये तुझा सौदा केला आहे माझ्याशी.

आता ह्यापुढे तुझ्या त्या खोट्या नवऱ्यासारखी नेहेमी वेगवेगळी माणसं येतील इथे, आणि त्यांना तू खुश ठेवायचं. तुला ह्या घरात काही कमी पडणार नाही, तुला हवं ते सुख मिळेल. कपडालत्ता, सोनं नाणं, जे हवं ते खायला मिळेल, पण मला पैसे कमावून द्यायचे रोज रात्री.

बापरे..त्या बाईचे हे भयंकर शब्द ऐकून मला इतका धक्का बसला होता की मी भोवळ येऊन खालीच कोसळले होते.

जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा एका दवाखान्यात होते. बहुतेक त्या बाईनेच मला इकडे आणलं असणार. आणि ते खरही होतं. मी इकडे तिकडे बघितल्यावर ती बाई मला खोलीच्या बाहेर बसलेली दिसली.

मी विचार करत होते की मला ह्या बाईच्या कचाट्यातून सुटका करून घ्यायची होती, पण कशी? ते समजत नव्हतं....

मी परत बेशुद्ध असल्याचं नाटक केलं. कारण शुद्ध येईपर्यंत तरी ती मला इथून नेऊ शकत नव्हती.

असा बराच वेळ गेला आणि ती डॉक्टरांना म्हणाली की ही मुलगी शुद्धीवर येईपर्यंत मी जरा खाली जाऊन काहीतरी खाऊन येते. हिला शुद्ध आली की मी तिला लगेचच घेऊन जाईन. त्याप्रमाणे ती खाली गेलेली मी डोळे अर्धवट उघडे ठेवून बघत होते. बासss मला हाच चान्स घ्यायचा होता. 

मी मदतीसाठी असणारी बेल वाजवली. आणि नर्स ला बोलावून घेतले. मी शुद्धीवर आले आहे हे पाहून नर्सनीही डॉक्टरांना बोलावून घेतलं. डॉक्टर आले आणि मला तपासू लागले. त्यावेळी मात्र मी त्यांना म्हणाले की मला वाचवा होss ह्या बाईपासून. मी अगदी फसले आहे हिच्या कचाट्यात. आणि मग मी माझी सगळी हकीकत डॉक्टरांना सांगितली.. ते ही अगदी देवासारखे धावून आले. आणि मला म्हणाले की तू थोडा वेळ बेशुद्ध असल्याचेच नाटक कर. पुढचं मी बघून घेतो. मग त्यांनी फोन करून पोलिसांना बोलावलं. आणि माझी जी सासू असणारी बाई होती तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

काही वेळाने त्या डॉक्टरांनी अजून एक फोन केला. कोणाला केला ते मला समजलं नाही. पण थोड्याच वेळात एक मध्यमवयीन बाई माझ्यासमोर उभ्या होत्या. छान सात्विक भाव असलेल्या. डोळ्यात ममता भरलेली.

त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या. तुझी सगळी कहाणी या डॉक्टरांनी मला ऐकवली आहे. तर येशील ना मग माझ्याबरोबर तुझ्या घरी तुझ्या माहेरी.

तेव्हड्यात डॉक्टरही आले आणि त्यांनी मला ह्या बाई कोण आहेत? आणि त्यांचं कार्य काय आहे? माझ्यासारख्याच किती तरी मुलींना त्यांनी कसा आधार दिला आहे ते सविस्तर सांगितले...

हे ऐकून माझे डोळे भरून आले होते. आणि मी त्या बाईंच्या म्हणजेच आमच्या सरोजिनी ताईंच्या मिठीत शिरून खूप रडले होते.

आमचं आराध्य दैवत. आमच्या विग्नहर्ताच आहेत ह्या सरोजिनी ताई.

आणि आमचं घर ही एकच, आमचं माहेर"....

जयश्री, सुजाता आणि चंदा ह्या तिघींनी आपलं मनोगत उत्तम प्रकारे मांडलं होतं.

आणि हे सगळं ऐकून नीला ताई डोळे पुसतच माईक जवळ आल्या खऱ्या पण काही बोलायच्या ऐवजी त्या परत मागे गेल्या आणि सरोजिनी ताईंना घट्ट मिठी मारून म्हणाल्या," खरच तुमचं जे कार्य आहे त्यासाठी आमचे शब्द अपुरे आहेत. आज ह्या मुलींना तुमच्यासारखी आई भेटली नसती तर काय झालं असत ह्या मुलींचं हा विचारही करवत नाही.

मग माईक जवळ येऊन नीला ताई म्हणाल्या,

"ज्या मुलींवर असे प्रसंग येत असतील, मग त्या इथे असलेल्या सगळ्या तुमच्यासारख्या मुली असोत किंवा अजूनही ज्या ह्या प्रसंगातून जात असतील त्यांना सरोजिनी ताईंसारखी आई मिळायला हवी.

पण खरं तर प्रत्येक स्त्री मध्ये अश्या सरोजिनी ताई जन्माला आल्या पाहिजेत नाही का? एका स्त्री नेच जर दुसऱ्या स्त्री ला संकटाच्या वेळी मदत केली, तरच हे जे समाजात स्त्रीयांवर वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार होत आहेत त्याला आळा बसेल...                                       

सरोजिनी ताई, तुम्ही सगळ्या जणी,आणि आता मी सुद्धा ह्या आपल्या कार्यात सामील होणार आहे...

पण खरं तर जर एखाद्या स्त्री ची बाजू सत्याची असेल तर हे अत्याचार होण्याआधीच आपल्या घरातीलच आई, सासू, बहीण, नणंद ह्या सगळ्यांनीच जर असं ठरवलं की आपल्या घरातल्या स्त्रीवर आपण ही परिस्थिती येऊ द्यायचीच नाही. नाही होऊ द्यायचे कोणतेही अत्याचार. आपणच जर एकमेकांबरोबर उभे असू तर समोरच्या कोणाचीही हिम्मतच होणार नाही त्या स्त्रीला बेअब्रू करण्याची.

ह्या माहेरसारखीच लाखो माहेर प्रत्येकाच्या घरा घरातच तयार व्हायला हवीत.

सासुपण दाखवण्यापेक्षा सुनेला आईपण द्यायला हवे. माहेरी असो किंवा सासरी असो प्रत्येकीच्या नात्यांमध्ये अधिकार असण्यापेक्षा एकमेकांबद्दल खात्रीचे प्रेम हवे नाही का?

पण मला आपल्या सरोजिनी ताईंना असं विचारायचं आहे, की ताई तुमच्या मनामध्ये ह्या माहेर ची कल्पना कशी उभी राह्यली? आणि ह्या माहेरचा जन्म कधी झाला? हे ऐकायला आम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल".

नीला ताईंचा हा प्रश्न ऐकून काही सेकंद तरी सरोजिनी ताई गंभिर झाल्या होत्या. आणि हे सगळ्यांनाच जाणवलं होतं.

पण लगेचच आपल्या चेहेऱ्यावरचे भाव बदलून त्या माईकपुढे उभ्या राहिल्या होत्या.

" नमस्कार, आज नीला ताई आणि आपल्यातल्याच काही माहेरवाशीणी ह्यांच माहेर बद्दलचं कौतुक ऐकून फार बरं वाटलं. माझी इतक्या वर्षांनी साधना थोडी तरी फळास आली असं जाणवलं. पण ही साधना पूर्णपणे फळाला आली असं मी तेव्हाच म्हणू शकेन जेव्हा अश्या अत्याचार होणाऱ्या मुलींवरचे अत्याचार थांबतील आणि प्रत्येक घरातच अश्या मुलींना माहेर मिळेल.

मगाशी नीलाताईंनी विचारलं की ही माहेरची कल्पना माझ्या मनात कधी आली? आणि ह्या माहेरचा जन्म कसा झाला?

"हे माहेर जन्माला आणण्यापूर्वी आम्हाला स्वतःला एका मोठ्या दुःखाला सामोरं जावं लागलं होतं.

माझी मुलगी गौरी, हिला आम्ही, म्हणजे मी आणि माझे मिस्टर अश्या दोघांनीही अतिशय सुसंस्कारात वाढवलं होतं. एकुलती एकच असल्यामुळे साहजिकच तिचे लाडही आम्ही पुरवले होते. पण त्या बरोबरच तिला उत्तम शिक्षण आणि संस्कारही आम्ही दिले होते.

अतिशय सुस्वरूप आणि मनमिळाऊ अशी होती आमची गौरी.

ती लग्नाच्या वयाची झाल्यावर आम्ही तिच्यासाठी सुस्वभावी वर संशोधन करूया असा विचार करत असतानाच तिने तिचं एका मुलावर प्रेम असल्याचं जाहीर करून टाकलं.

आम्हीही म्हणलं की हीच्या स्वतःवरच जर आम्ही इतक्या चांगल्या विचारांचे संस्कार केले आहे. बरं ती उच्चशिक्षित असल्यामुळे तिची निवडही तिच्यासारखीच आणि सुसंस्कारिच असणार. असा विचार करून काही आडकाठी न आणता आम्ही ह्या लग्नासाठी असं न म्हणता गौरीच्या पसंतीच्या लग्नासाठी तयार झालो होतो.

गौरी आम्हाला एकुलती एकच असल्यामुळे कुठेही काही कमी पडायला नको म्हणून तिचं लग्न धुमधडाक्यात करून द्यायचं असं ठरवलं. आम्ही दोघांनी आमची बरीचशी पुंजी खर्च करून सालंकृत कन्यादान केलं होतं. गौरीच्या सासरची लोकं तर अगदी तोंडात बोटं घालून बघत होती आमच्या खर्चाकडे. तिच्या सासूबाई तर मला हसून म्हणल्याही की आमचा नितीश भाग्यवानच म्हणायला हवा. त्याला इतके हौशी आणि उदार सासू सासरे मिळाल्याबद्दल. चला म्हणजे आमच्या नितीशचे पुढेही असेच लाड होणार तर.

पण त्यावेळी त्यांच्या ह्या अश्या बोलण्याचा अर्थच समजला नव्हता आम्हाला. मला तर वाटत होतं की आपण इतकं छान लग्न करून दिलं म्हणून त्या कौतुकच करत होत्या. त्याचा अर्थ आम्हाला खूप उशीरा समजला. पण त्यावेळी सगळ्यालाच उशीर झाला होता.

लग्नानंतर गौरीच्याही नकळत नितीश कधी कधी आमच्या घरी यायचा. आणि बाबा बिझनेस मधे बराच लॉस झाला होss, बरेच पैसे फुकट गेले. आता पुढचं कसं काय करणार ह्याच चिंतेत मी असतो हल्ली असं म्हणायचा. पण गौरीला ह्याची अजिबात झळ बसू देत नाही बरंका मी. अगदी सगळं छान चाललय असंच दाखवत असतो आम्ही. असंही म्हणायचा. पण नाटक तरी किती करणार नाही का? पैशांचं सोंग नाही आणता येत. असं म्हणून तो खूप डिस्टर्ब झाल्यासारखा बसून राहायचा. मग मीच ह्यांना सांगून त्याला किती पैसे हवे आहेत ते विचारलं. तर त्यावेळी तो पन्नास लाखांचा फटका बसला आहे असं म्हणाला. आमच्याकडे काही इतके पैसे नव्हते पण गौरीसाठी म्हणून आम्ही त्याला काहीतरी करू असं म्हणालो. पण आम्ही ह्या बाबतीत गौरीला काहीही कळून देणार नाही ह्याच नितीशनी आम्हाला वचन मागितलं. आणि आम्ही ते त्याला दिलंही. दोन तीन दिवसांनी आम्ही आमच्या एफडी मोडून बारा पंधरा लाखांची रक्कम आम्ही नितीशला बोलावून त्याच्या हातात दिली. ही गोष्ट आम्ही नितीशच्या सांगण्यावरून गौरीला कळू दिली नाही. पण परत काही महिन्यांनी नितीश आमच्याकडे पैशांची मागणी करू लागला. तेव्हा मात्र आम्हाला थोडा त्याचा संशय येऊ लागला. माझे मिस्टर त्याला म्हणालेही की इतका लॉस होतो तर हा बिझनेस सोडन दे, कुठेतरी चांगल्या ठिकाणी नोकरी बघ. पण त्याचं आपलं एकच वाक्य की मी नोकरी करण्यासाठी जन्माला आलोच नाहीये. मी बिझनेसच करणार. थोडे पैसे द्या, ह्यापुढे सगळं ठीक होईल. आम्ही त्याला म्हणलंही की एकतर इतके पैसे आमच्याकडे नाहीतच आणि जरी दयायचे तरी एखाद दोन लाख रुपये आता आम्ही गौरीच्या हातातच देऊ.

तर तो रागाने निघून गेला. आम्हीही हा विषय मग इथेच संपवला. पण आता वाटतय की त्याचं वेळी गौरीशी बोलून तिला इकडे आणायला हवं होतं.

नितीश घरी गेला आणि गौरीला वाटेल तसं बोलायला लागला. हातही उचलला त्यानी तिच्यावर.

आणि त्याची आईही गौरीला म्हणाली की पैसे घेऊनच यायचं तुझ्या आई वडिलांकडून. इतके पैसे तर आहेत की त्यांच्याकडे. एव्हढं मोठं लग्न केलं, दोन महिन्यांपूर्वी नितीशलाही पंधरा लाख रुपये दिले त्यांनी मग आता अजून द्यायला काय हरकत आहे.

हे सगळं ऐकून तर गौरीला प्रचंड धक्का बसला. त्यातच ती प्रेग्नेंट होती.

तिनी त्या लोकांना नकार दिला पण नितीश तिच्यावर इतका चिडला की त्यानी तिला एकदम जोरात ढकलून दिलं. त्यावेळी ती त्यांच्या घरातल्या जिन्याजवळ उभी होती. त्यानी ढकलून दिल्यामुळे ती तोल जाऊन जिन्यावरून खाली पडली ती पोटावरच. तिचं कपाळही आपटून रक्तबंबाळ झालं होतं. पोटावर जोरात पडल्यामुळे आणि बराच मार लागल्यामुळे तिला खूप ब्लिडिंगही झालं होतं आणि त्यानंतर गौरी बेशुद्ध पडली. मग ह्या लोकांनी घाबरूनच ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. आम्हाला दोघांनाही नितीशनीच फोन केला होता की आई बाबा लवकरात लवकर मी सांगतो त्या हॉस्पिटलला या.. कारण आपली गौरी घरातला जिना उतरताना पाय अडकून पडली, हे ही अगदी त्याने रडकुंडीला येऊन सांगितलं होतं. मग आम्ही दोघेही धावत पळतच त्यानी सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये गेलो. गौरीची अवस्था तर अगदीच वाईट होती. डॉक्टरांनीही आता तिचं काही खरं नाही असंच सांगितलं होतं. आणि तिचं मिस कॅरेजही झालं होतं. पण थोडी तरी धुगधूगी होतीच तिच्यात. कदाचित तिला न्याय मिळण्यासाठीच असावी, पण थोड्याच वेळानी गौरीला शुद्ध आली होती, पण जेमतेम काहीच वाक्य ती बोलू शकली होती.... तिला फक्त आम्हाला दोघांनाच भेटण्याची इच्छा आहे असं तिनी सांगितलं. त्यामुळे आम्ही दोघे तिला भेटायला आयसीयू मध्ये गेलो. त्यावेळी तिने हळूहळू सगळी घडलेली हकीकत आम्हाला सांगितली, आणि आई बाबा तुम्ही ह्या लोकांना अजिबात सोडू नका असंही सांगितलं. पण तिचं हे बोलणं थोडाच वेळ आणि शेवटचच ठरलं होतं.. भरपूर इंटर्नल ब्लिडिंग झाल्यामुळे तिची तब्बेत एकदमच क्रिटिकल होऊन काही मिनिटांतच तिचा अंत झाला होता....

माझ्या मिस्टरांना नितीश बद्दल आधीच संशय येत असल्यामुळे, गौरी शेवटचं बोलत असतानाच प्रसंगावधान ठेऊन त्यांनी ती सांगत असलेली वाक्यनवाक्य त्यांच्या मोबाईलवर रेकॉर्ड केली होती... त्या पुराव्यावरूनच आम्ही पोलिसांना सगळी खरी हकीकत सांगितली.. पोलिसांनी नितीश आणि तिच्या सासरच्या लोकांना अटकही केली. पण आमची गौरी तर तिची काहीही चूक नसताना हकनाक बळी गेली ह्याचं दुःख माझ्या मिस्टरांना सहन न झाल्यामुळे गौरीनंतर अगदी काहीच दिवसात ते ही हे जग सोडून गेले.

मग मला स्वतःलाही अश्याच विचारांनी छळलं होतं की माझी गौरी आणि मिस्टर दोघेही नाहीत तर मीही जगून काय करू. पण बऱ्याच विचारांती मी ठरवलं की जशी वेळ माझ्या गौरीवर आली होती तशी वेळ मी अश्या परिस्थितीतुन जाणाऱ्या मुलींवर येऊ देणार नाही. त्यावेळी जर अश्या मुलींना कोणताही आधार नसेल तर तो आधार मी त्यांना देईन. त्या मुलींना न्याय मिळवून देईन. समाजात ताठ मानेने जगायला शिकवेन.

आणि त्याचवेळी ह्या नव्या माहेरचा जन्म झाला".

सरोजिनीताई बोलत होत्या आणि सगळे अवाक होऊन त्यांच्याकडे बघत होते. कारण त्यांची ही कहाणी त्यांच्या मुलींना, त्यांच्या माहेरवाशीणींना ही आत्ताच कळत होती. आपल्या ताईंचं इतकं मोठं दुःख त्यांना आत्ताच समजत होतं. आणि त्यांच्या मनातला ताईंबद्दलचा आदर अजूनच द्विगुणित झाला होता.

खरच अश्या सरोजिनी ताई प्रत्येकाच्या घरातच तयार होतील तर त्यामुळे स्त्रियांवरचे असे अत्याचार थांबायला खूपच मदत होईल. ज्यामुळे स्त्री अबला नाही तर सबला होईल. आणि मग तिच्या स्वतःचीच नाही तर कुटुंबाचीही भरभराट ती करू शकेल.

खरंय ना???........

कथा काल्पनिक आहे पण जगात अश्या प्रकारच्या घटना घडतच असतात. आणि अश्या सरोजिनी ताईही कुठे तरी जन्माला येत असतातच....


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational