Smita Vivek Agte

Tragedy

4  

Smita Vivek Agte

Tragedy

गोदा आत्या...

गोदा आत्या...

13 mins
313


काल रात्री जवळजवळ बारा एक वाजता आईचा फोन आला होता," मंजुषा आपली गोदाआत्या गेली गss... तू येणार आहेस ना?"....


मी आणि नितीन सकाळी लवकरच निघतो आणि तिकडे पोचतो असं मी आईला सांगून फोन ठेऊन दिला...पण तिचा फोन येऊन गेल्या नंतर मात्र माझा डोळा लागलाच नाही. गोदाआत्याची ती तांबड्या आलवणातली मूर्तीच सारखी नजरेसमोर येत होती...


सकाळी लवकरच सगळं आवरून आणि आठ वर्षांच्या आमच्या सुमेधला सासूबाईंकडे सोडून मी आणि नितीननी सात ची रत्नागिरीची एसटी पकडली..


एसटी मध्येही माझ्या डोळ्यासमोरून गोदा आत्या काही केल्या जात नव्हती..


गोदाआत्या...


आमच्या लहानपणापासून आमच्या घरात तांबडं आलवण नेसून सतत राबणारी माझी आणि शशांकची आत्या...शशांक तर काही आत्ता येऊ शकणारच नाही.. एक तर तो पहिल्यापासूनच ह्या गोदाआत्यापासून लांब लांबच असायचा.. खरं तर तिच्या त्या तांबड्या आलवणातल्या आवताराला आम्ही दोघेही लहानपणी खूप घाबरायचो.. तांबडी नऊवारी साडी नेसलेली आणि त्याचा पदर डोक्यावरून घेऊन पूर्ण कपाळ झाकलं जाईल असा असायचा, परत तो पदर दोन्ही कानाच्या मागून घेऊन गळ्याशी पूर्ण वेढलेला असायचा. गोरी गोमटी आणि नीटसं अशी होती ती, पण तांबड्या आलवणाच्या आतमधे डोक भादरलेलं आणि भुंडे हात असल्यामुळे भीती दायकच वाटायची..


तर शशांक लंडनला असल्यामुळे तो काही येऊ शकणार नव्हताच..


आम्हाला नेहेमी अशीच दिसायची ती. जास्त कधी बोलायचीच नाही कोणाशी.. गप्प गप्प राहून सगळी कामं करत राहायची.. आणि कामं झाली की चुलीच्या पलीकडच्या भिंतीला टेकून तासनतास आढयाकडे बघत राहायची.. माझ्या आईशी तिची सलगी होती थोडीशी.. पण ती ही अगदीच कमी.. तिला सतत कोणाची तरी धास्ती वाटत असायची.. कोणाची ते ही म्हणा माहिती होतच आम्हाला.. काशी काकुचीच भीती होती तिला..


काशी काकू.. आमची मोठी काकू.. आम्हालाही हिचा पहिल्यापासूनच घाक होता..आईनेच मला माझ्या लग्नानंतर बरीचशी माहिती सांगितली होती काशी काकूबद्दलची. तिनी सांगितलेल्या माहिती प्रमाणेच.


काशी काकू मोठी.. म्हणजे दामू काका हे बाबा आणि गोदाआत्या ह्या दोघांपेक्षा भावंडांमध्ये मोठे होते..दामू काका आणि बाबा ह्यांच्यामध्येच जवळजवळ दहा बारा वर्षांचं अंतर होतं.. आजीची दामू काकांच्या पाठीवरची एक दोन मुलं जन्माला येऊन काही आजाराचं निमित्त होऊन गेली होती म्हणे..दामुकाकांच्या नंतरची गोदाआत्या.. माझ्या बाबांपेक्षा एक दोन वर्षानीच मोठी.. बाबांच्या वेळेला आजीला बाळांतपणातला रोग जडला होता. त्यामुळे आजीची तब्बेत जरा


यथातथाच असायची. आणि नंतर बाबा जेमतेम चार पाच वर्षांचे असतानाच आजी गेली.. मग दामूकाका, आत्या आणि बाबा ह्यांची सगळ्यांची जवाबदारी आजोबांवरच आली..


त्यावेळची गावातली घरं मातीची असल्यामुळे, आणि आजूबाजूला झाडंझुडपंही खूपच असल्यामुळे घरात साप विंचू यांच्यासारखे प्राणीही बरेचदा निघायचे.. तर एक दिवस आजोबा देवाची पूजा करत असताना त्यांचं लक्ष्य गेलं नाही आणि खिडकीतून आलेल्या एका सापानी आजोबांच्या पायाला दंश केला.. खूप विव्हळत होते म्हणे ते त्यावेळी.. दामू काका धावतच मांत्रिकाला घेऊन आले. पण त्या मांत्रिकाच्या मंत्र तंत्र ह्यासगळ्या मध्येच खूप उशीर झाला आणि त्यामुळे आजोबांच्या पूर्ण शरीरात विष भिनलं गेलं आणि त्यातच आजोबांचा अंत झाला. आता सगळ्या घराची, बाबांची आणि गोदाआत्याचीही जबाबदारी एकट्या दामू काकांवरच येऊन पडली होती.. त्यामुळे साहजिकच ते थोडे कठोर आणि पारंपरिक विचारांचे होत गेले. आणि ते जे म्हणतील ती पूर्व दिशा असं सगळं वातावरण घडत गेलं.. पण त्यातल्यात्यात दामू काकांनी बाबाचं शिक्षण तरी चांगलं होऊ दिलं. आजोबा गेल्यानंतर त्यांनी स्वतःच तर शिक्षण अर्ध्यावरच सोडून दिलं होत, पण गोदाआत्याही मुलगी असल्यामुळे.. हीला काय करायचं आहे फार शिकून, असा विचार करून तिलाही अगदीच जेमतेम शिक्षण दिलं होतं ..काही वर्षांनी दामू काकांना काशीकाकुचं स्थळ सांगून आलं. आणि त्यांनीही आता घरातली थोडी तरी जवाबदारी वाटली जाईल ह्या हेतूने तिच्याशी लग्न केलं.. पण मोठ्या भावापेक्षाही काशीकाकुचीच गोदाआत्या आणि बाबांना भीती असायची..तिचा दरारा कायमच ह्या घरावर, इथल्या माणसांवर होता. अगदी दामू काकांवरही होता.. थोड्या कमी प्रमाणात असेल पण तरी दामू काकांनाही तिची भीती ही वाटायचीच.. पहिल्यापासूनच तिनी गोदाआत्याला अगदी कामामध्ये झुपलं होतं.. ती स्वतः काहीच करायची नाही, पण दुसऱ्यांकडून काम कसं करून घ्यायचं ही कला मात्र तिला चांगलीच अवगत होती..काशीकाकूनी खूप प्रयत्न करून आणि बरेच नवससायास करूनही त्या दोघांना काही मूल बाळ होऊ शकत नव्हतं..


पुढे काही वर्षांनंतर काशी काकूनी गोदाआत्याचंही अगदी साधेपणाने घरातल्या घरातच लग्न करून दिलं. पण लग्नानंतर दोन चार दिवसातच गोदा आत्याला तिचा नवरा अचानक गेल्यामुळे तिच्या सासरच्या लोकांनी परत माहेरी पाठवून दिलं होतं... घरातल्या पुरातन चालीरीतीप्रमाणे काशीकाकूनीही गोदाआत्याला तांबडं आलवण नेसायला लावून आणि तिच्या डोक्यावरचा तो सुंदर केशसंभार भादरून तिला सोवळी करून टाकलं होतं..आणि आता ह्या गोदाआत्याचा उपयोग फक्त घरातली कामं करण्यापूरताच राहिला होता.. अगदी एक मिनिटही काही काशी काकू तिला बसून देत नव्हती. एकामागोमाग एक कामांची यादीच काशी काकूकडे तयार असायची..रागात असताना तर ती गोदाआत्याला अग तुगच करायची.. सारखी तिच्यावर ओरडत राहायची,"गोदेss बसलीयेस काय.. ते सगळं घर कोण झाडणार?.. आणि चूल सारवून झाली नाss.. मग ती काय फक्त पुजा करायला आहे का? होss गंss.. त्यावर स्वयंपाक कोण तुझा तो वर गेलेला दारुडा नवरा येऊन करणार आहे काss? आणि विहिरीचं पाणी कोण शेंदणार गंss...नुसता खायला काळ आणि भुईला भार आहे ही.. अवलक्षणी मेली..स्वतःच्या नवऱ्याला तर खाल्लंच आणि येऊन बसलीये आता आमच्याच मढयावर "... हे सगळं बघून, आणि ऐकून माझ्या बाबांना मात्र गोदा आत्याची फार कीव यायची. पण काशी काकूपुढे त्यांचंही काहीच चालत नव्हतं..


गोदाआत्या नंतर एक दोन वर्षातच धाकट्या राघवच म्हणजेच माझ्या बाबांच लग्न झालं..आणि वसुंधरा म्हणजे माझी आई, धाकटी सून म्हणून ह्या घरात आली.. त्यावेळी बाबांनी मात्र म्हणे आईला सांगूनच ठेवलं होतं की गोदा आत्याला जराही दुखवू नकोस.. कारण आधीच खूप होरपळून निघाली आहे ती.


तर..सुरवातीला गोदा आत्या माझ्या आईशीही थोडीशीच बोलत असे. पण काही दिवसांनी मात्र त्यांच्यात फक्त नणंद भावजय हे नातं न राहता, मैत्रीचं नातं तयार झालं होतं..पण हे सगळं काशी काकुला समजणार नाही ह्याची खबरदारी मात्र आई, गोदा आत्या आणि माझे बाबाही घेत होते..


दामू काकांपेक्षा बाबा मात्र खूपच सुधारित विचारांचे होते. म्हणजे आईने मला माझ्या लग्नानंतर जे सगळं सांगितलं होतं त्यावरून तरी बाबांबद्दलचं माझं मत असं झालं होतं. आईने मला सांगितलं की गोदा आत्याच्या बाबतीत जे काही घडलं, त्यावरून बाबा दामू काकांना एकदा म्हणाले होते, "दादा आपण खरं तर अक्काचं दुसरं लग्न करून द्यायला हवं होतं. इतक्या तरुण वयात तिला अश्या तांबड्या आलवणात बघून मला तरी गलबलून येतं रेss, लग्नानंतरच्या दुसऱ्याच दिवशी तिचा नवरा अपघातात गेला. त्यात तिची काय चूक? तो दारू पिऊन रस्त्यातून येताना गाडीखाली आला. मग आपण त्या सगळ्याची शिक्षा हिला का द्यावी?


आणि तो दारू प्यायचा हे ही त्या लोकांनी अक्काच्या लग्नाआधी सांगितलं नव्हतं. नाहीतर आपण हे लग्नच होऊ दिलं नसतं. पण त्याच्याच घरच्यांनी ही लपवाछपवी केली, आणि अक्काला हे सगळं भोगावं लागलं."...


त्यावर दामू काका बाबांना इतकंच बोलले होते म्हणे, "राघवाss गोदाच्या बाबतीतला विचार करायला मी आणि काशी अजून तरी जिवंत आहोत.. त्यामुळे तुला तिची काळजी करण्याची काहीच गरज नाही"...


पण त्या दोघांत चाललेला हा सगळा संवाद काशीकाकू ऐकत होती. तशी ती म्हणे रागाने पुढे आली आणि बाबांना म्हणाली, "भाऊजी तुमच्या त्या सुधारकी विचारांचं वारं आम्ही काही ह्या घरात खपवून घेणार नाही समजलं नाss.. आणि तुम्हाला नको गोदावंसंची इतकी कणव यायला.. आम्ही त्यांच्या बाबतीत जसं वागतोय आणि जे करतोय, ते अगदी रुढीला धरूनच आहे होss. त्यामुळे ह्यापुढे तुमचं शहाणपण तुमच्या स्वतःपुरत आणि तुमच्या बायकोपुरतच मर्यादित ठेवा म्हणजे झालं.. तुमची अक्कलहुशारी आमच्यावर पाझळायची काहीही गरज नाही"...


इतक्या परखडपणे काशी काकूनी सांगितल्यावर बाबा तरी काय करणार..


एस टी आता घाटातुन जात होती.. पण माझ्या डोक्यातले विचार काही थांबायला तयार नव्हते..


माझं लग्न होऊन आता दहा वर्ष झाली होती.. पण मी आणि नितीन लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदाच रत्नागिरीला गेलो होतो, तेव्हाची गोदाआत्या माझ्या डोळ्यासमोर आली.. आम्ही घरी गेलो. सगळ्यांच्या, अगदी गोदाआत्याच्याही पाया पडलो.. किती सुखावली होती ती त्यावेळी.. माझे हिरव्या बांगड्या भरलेले हात आणि लग्नानंतरचे माझ्या नजरेतले भाव ती कितीतरी वेळ निरखत होती.. मला त्यावेळी जरा विचित्रच वाटलं होतं तिच्या त्या अश्या नजरेचं..पण तिच्याही लगेचच ते लक्षात आलं असावं.. कारण तिनी तिची नजर लगेचच दुसरीकडे वळवली.. आणि मला म्हणाली, "काय गss मंजेss तुझ्या नवऱ्याला लग्नानंतर पहिल्यांदा कोकणात घेऊन येताना ते गाणं तर नाही म्हणलं नाss कोणी?"..मी ही मग काहीच न झाल्यासारखं दाखवत तिला विचारलं, "कोणतं गाणं गंss गोदाआत्या?"... "अग ते गाणं गंss.. गोमूss माहेरला जाते हो नाखवाss.. तिच्या घोवाला कोकण दाखवाss"...असं म्हणून ती कितीतरी वेळ हसत होती.. मग मी ही तिला म्हणलं की, आत्या मी त्या गाण्यासारखं नावेत बसून नाही तर एसटी मध्ये बसून आले आहे बरंकाss...आणि तो तिच्या नजरेबद्दलचा विषय मग तिथेच संपला होता.. पण माझ्या मनात मात्र तिच्या त्या नजरेनी गोंधळ घातला होता..


आठ वर्षांपूर्वी सुमेधच्या जन्माच्या वेळी बाळांतपणासाठी आई इकडे माझ्या घरी मुंबईला आली होती..जवळ जवळ महिना सव्वा महिना तरी ती होती माझ्याकडे... त्यावेळी रत्नागिरीतल्या बऱ्याच जुन्या आठवणी मी आणि आई बोलत असायचो.. गोदाआत्याचा विषय निघाल्यामुळेच मी आईला त्या दिवशीच्या गोदाआत्याच्या त्या विचित्र नजरेबद्दल सांगून टाकलं..त्यावर आई म्हणाली, "अग तूच नाही तर प्रत्येक नव्या नवरीला त्या अश्याच नजरेनी न्याहाळत असतात..तुला आता तुझ्या लग्नानंतर हे सगळं सांगायला काहीच हरकत नाही म्हणा. पण माझं आणि तुझ्या बाबांचं लग्न झाल्यानंतरच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच त्यांनी मला स्वयंपाक खोलीत गाठलं होतं.. आणि असंच माझ्या हातात भरलेल्या चुड्याकडे आणि एकदा माझ्या डोळ्यांकडे त्या निरखून बघत होत्या.. मी खूप घाबरले होते गंss त्यावेळी..अगदी पळत पळतच आमच्या खोलीत गेले आणि दरवाजा लावून घेतला... जवळजवळ तीन चार दिवस मी त्यांना टाळत होते.. त्यांच्या पुढेच येत नव्हते.. बहुतेक त्यांनाही हे सगळं जाणवलं असावं..पण त्या गप्प गप्पच राहात होत्या.. त्याही मग माझ्याशी फारश्या बोलत नव्हत्या.. फक्त कामामध्ये स्वतःला बांधून ठेवत होत्या.. काशी वहिनी खूपच वाईट वागणूक देत होत्या गंss त्यांना.. खूप राबवून घ्यायच्या अगदी..आणि काशी वहिनींचं बोलणं तर इतकं तिखट आणि मनाला झोंबेल असंच असायचं ...ते सगळं पाहून कळवळाही यायचा गोदावंसंचा.


मग वर्षभरानी तुझा जन्म झाला.. आणि तुला न्हाऊ माखू घालायचं कामही त्यांच्याकडेच आलं.. पण हे काम मात्र खूप आनंदाने करायच्या त्या.. खूप बडबड करायच्या त्या तुझ्याशी..


त्यावेळी मी एकदा त्यांना विचारलंही होतं की, " मंजुला आंघोळ घालताना मात्र तुम्ही इतक्या बडबड करता तिच्याशी, इतक्या आनंदी असता. मग तुम्ही बाकीच्यांशी का नाही इतक्या आनंदानी बोलत होss गोदावंसं.. त्यावेळी त्या मला म्हणाल्या"...


"वसूss ये इकडे..तुझ्याशी मी बोलतेच की गंss.. मलाही खूप आवडतेस तू. किती शांत आणि संस्कारी आहेस. आणि तेव्हढीच मार्दवताही आहे तुझ्याकडे..कोणालाही उलटून बोलणार नाहीस. खूप समंजस आहेस तू.. पण तूच तर माझ्यापासून लांब लांब पळत असतेस.. अगदी तुझं लग्न झाल्या दिवसापासून बघते मी तुला.. टाळत असतेस तू मला.. मग मी कशी येणार तुझ्याशी बोलायला, सांग बरंss?"...


"मग मीही खरं काय ते कारण सांगून टाकलं.. की तुमची भीती नाही पण माझं लग्न झाल्यानंतर मी नवी नवरी असताना त्या स्वयंपाक घरात माझ्या हातातल्या बांगड्या आणि माझ्या चेहेऱ्याकडे किती विचित्र बघत होता तुम्ही, म्हणून तुमच्या त्या नजरेची भीती वाटायला लागली होती"...


पण मंजू तुला सांगते, त्यावर त्यांनी सांगितलेलं कारण ऐकलं आणि मला त्यांच्याबद्दल फारच वाईट वाटायला लागलं गंss"....


मग मीच आईला खोदून खोदून विचारलं की आई सांग नाss काय ते.. कारण मलाही ती नजर विचित्र आणि वेगळीच वाटली होती गंss...


"हेच हेच ते वाक्य मंजूss मी त्यांना बोलले त्यावेळी, की मला तुमची ती नजर वेगळीच वाटली होती.. तेव्हा त्या हसत म्हणाल्या"...


"वसूss माझं लग्न झालं, त्यावेळी मी अशी किती वर्षांची होते गss फार फार तर सतरा अठरा वर्षांचीच होते. नवी नवरी मी म्हणून कितीतरी आनंदात होते...तो किणकिण वाजणारा हिरवा चुडा, गळा भरून घातलेले अलंकार, तो नऊवारी शालू आणि मुख्य म्हणजे ते भरीव टप्पोऱ्या काळ्या मण्यांचं छातीवर रुळणारं मंगळसूत्र ह्या सगळ्या नव्या नव्या आनंदातच मी मग्न होते.. मी ही त्यावेळी लग्नानंतरच्या माझ्या सुखी संसाराची खूप चित्र मनामध्ये रंगवली होती... पण त्या दिवशी म्हणजे आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीच हा माझा नवरा खूप दारू पिऊन बेशुद्ध होऊन माझ्यासमोरच पडलेला होता..मी काय बोलणार.. माझं संसाराचं स्वप्नचं भंगलं होतं गंss.. आणि त्यानंतरही त्या नियतीचा खेळ पहाss..माझ्या नवऱ्याला तिने दुसऱ्याच दिवशी ह्या जगातून उचलून नेलं.. माझ्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर करून.. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरा गेल्यामुळे सासरच्या लोकांनी मला पांढऱ्या पायाची म्हणून खूप दूषणं दिली होती.. मला कळलं होतं.. ह्यापुढचं माझं आयुष्य आता मला माहेरी काशी वहिनीच्याच म्हणण्यानुसार सोवळं होऊन काढावं लागणार.. माझी सगळीच स्वप्न तुडवली गेली होती.. हा असा हिरवा चुडा, शालू, ते मंगळसूत्र असं हे सगळंच सौभाग्यलेणं फक्त एकच दिवस मला घालायला मिळालं होतं वसूss.. आणि मग मला लगेचच बेवारश्यासारखं सासरच्या लोकांनी माहेरी आणून टाकलं... इथे येऊन तर काशी वहिनींनी मला ह्या लाल आलवणात बंदिस्त करून टाकलं.. माझे सुंदर लांब केस भादरून टाकताना त्यांना जरा सुद्धा वेदना झाल्या नव्हत्या गंss.. पण त्यावेळी माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता आणि आधारही नव्हता त्यामुळे मला इथेच आश्रितासारखं राहावं लागणार हे मी मनोमन समजले होते.. आणि ओठ घट्ट दाबून धरून आतून रडतच तो माझा सुंदर केशसंभार मी भादरू देत होते... काशी वहिनीनी माझ्या शरीराला आलवणात कोंबलं ते मी मान्य केलं होतं.. पण मी माझ्या मनाला कुठे कोंबणार होते गंss.. ऐन तारुण्यात मी असं सोवळं आयुष्य जगत होते.. तारुण्य फार वाईट असतं वसूss.. आणि शरीरधर्म कुणाला सुटलाय गंss.. पण तरीही आतून मनाचा कोंडमारा मी करतच होते.. हे सगळं सुख देवाने आपल्यासाठी ठेवलेलेच नाही हे मी माझ्या मनाला पदोपदी समजावतचं होते गंss.. पण ते समजवतानाही खूप त्रास, खूप वेदना होत होत्या मला.


काशी वहिनीनी माझं दुःख कधी समजूनच घेतलं नाही.. किंवा त्यांना ते समजून घ्यायचंच नव्हतं.. पण नेहेमी माझ्यावर त्या डोळ्यात तेल घालून पहारा ठेवायच्या.. ही घराच्या बाहेर कुठे जाणार नाही नाss, हिचं पाऊल कुठे घसरणार नाही नाss, ह्याची खबरदारी त्या बरोब्बर घ्यायच्या.. म्हणूनच मी विद्रुप दिसण्यासाठी दर महिन्याला माझं डोकं भादरून घ्यायच्या..तिचं हे असलं वागणं समजत नव्हतं का मला? पण तरीही मी मूग गिळून होते... तिचा रागही येत होता. ..असं ती का वागतीये माझ्याशी?.. असंही मनात यायचं.. पण तुला आता मी विचारते वसूss मी इतकी वाईट आहे काss?..आणि मला माझं भलं बुरं समजत नव्हतं का? माझा पाय इथे घसरू शकतो ह्याची काळजी मला नसेल का?.. पण तरीही मी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होते.. काशी वहिनीला मूल बाळ झालं नाही ह्याचाही राग ती माझ्यावरच काढायची.. आणि म्हणायचीही की तुझी अवलक्षणी नजर लागते म्हणूनच मला मूल होऊ शकत नाही.. पण मग तुला मूल झालंच नाss वसूss?..तुला लागली काss माझी नजर?..कदाचित ती माझ्याशी ज्या प्रकारे वागत होती, त्याचीच शिक्षा तिला मिळत असावी.. पण माझ्या असं मनातही येत नव्हतं की मला जे सुख नाही मिळालं ते कोणालाच मिळायला नको.. उलट मी म्हणते की जे भोग माझ्या वाट्याला आले ते कोणाच्याच वाट्याला यायला नको वसूss.. ह्या लाल आलवणातलं जीवन फार वाईट असतं...त्यातूनही पोटी पोर असेल तर त्याला वाढवण्यात, त्याला मोठं होताना बघण्यात किंवा आपल्या मुलाच्या पुढच्या जीवनाची स्वप्न बघण्यात तरी बाईच आयुष्य निघून जातं..पण माझ्या मेलीच्या बाबतीत तर ते ही सुख नाही.. कारण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी माझी ह्या बाबतीतली सगळीच सुखं ह्या नशिबाने माझ्याकडून ओढून घेतली होती.. हे ही मी सगळं सहन केलं.. पण आता तुमच्या सारख्या नव्या नवऱ्या बघितल्या की नेहेमी माझ्या मनात येतं की, माझं तर आता झालं गेलं..पण ही वेळ ह्यापुढे तरी कोणाच्याही वाट्याला यायला नको... पुढच्या पिढीने तरी आता हे लाल आलवण, ह्या जुन्या परंपरा, बाईच्या जातीला दिलेल्या ह्या वेदना, हिणकस रितीरिवाज फेकून दिले पाहिजेत.. तिच्या मनाचा विचार केला पाहिजे"....


"त्यानंतरही मी गोदावंसंना म्हणलं की गोदावंसं मी समजू शकते तुमचं दुःख, पण तरीही तुमच्या त्या विचित्र नजरेची मलाही भीती वाटली होतीच?"...


मंजू त्यावेळी आत्याने दिलेलं ते कारण ऐकलं आणि आमच्यातले सगळे गैरसमज दूर होऊन आमच्यात एक निखळ मैत्रीचं नातं तयार झालं होतं..


आत्या मला म्हणाली"...


"वसूssमाझ्या लग्नानंतर इथे आल्या दिवसापासून मला एक सवयच लागून गेली... कोणतीही नवी नवरी दिसली की मी तिच्या हातातल्या चुड्याकडे बघते आणि मनोमन प्रार्थना करते की हिच्या वाट्याला माझ्यासारखं आयुष्य देऊ नकोस बाबा देवाss.. हिचा हात असाच हिरव्या चुड्याने भरलेला राहूदे.. आणि मग मी त्या नवीन लग्न झालेल्या मुलीच्या डोळ्यात शोधत राहते की हिला ह्या घरात हीचं हक्काचं सुख मिळतंय नाss?.. तिची सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत नाss?.. माझ्यासारखं हिचं जीवन व्यर्थ नको जायला.. ही बाई कायम संसार आणि मुलाबाळांच्या सुखामध्ये न्हाऊन निघू दे..बसss इतकंच मी मागत असते गंss"....


आईनी त्यावेळी सांगितलेली सगळी वाक्य मला अजूनही जशीच्या तशी आठवत होती.. खरंच खूपच अन्याय झाला होता गोदाआत्यावर.. मुख्य तर त्या नियतीनेच तिच्या आयुष्याची फार मोठी क्रूर थट्टा केली होती. आणि भरीस भर म्हणून की काय पण काशी काकूनेही तिच्यावर बराच अन्याय केला होता...


पण आई आणि गोदाआत्याचं मात्र आता छान पटत होतं. गोदा आत्या नको नको म्हणत असतानाही आई काशी काकूंना कळणार नाही ह्याची काळजी घेऊन गोदाआत्याला तिच्या कामांमध्ये मदत करत होती.. कधी कधी काशी काकू देवळात किंवा शेजारच्या इंदूताईंकडे गेलेली असली तर तेव्हढ्या वेळात आई गोदाआत्याला काहीतरी गरम गरम ताजा पदार्थ खायला करून घालत होती.. गोदा आत्याचं माझ्यावर खुपच प्रेम होतं


माझ्या पाठीवर तीन वर्षांनी शशांकचा जन्म झाला.. त्यालाही गोदाआत्या असंच प्रेमाने न्हाऊ माखू घालत होती.. पण मी जरा जास्तच लाडकी होते तिची..


पाच सात वर्षांपूर्वीच काशी काकू गेली आणि ती हाय खाऊन दामूकाकाही थोड्याच दिवसात गेले... पण ज्या बाईने आपलं सर्वस्व गमावलं होतं त्या गोदाआत्याच्या हालअपेष्टा आणि दुःख काही त्या दोघांना शेवटपर्यंत जाणवलच नव्हतं..


काशी काकू आणि दामूकाका गेल्यानंतर मात्र आई आणि बाबा गोदाआत्याला खूप जपत होते.. आई तिला जास्त काम करूच द्यायची नाही.. मग गोदा आत्याच तिला गमतीने म्हणायची, "वसूss अग माझ्या शरीराला कामांचीच सवय आहे.. उगाच तू माझ्या शरीराचं पथ्य मोडू नकोस गंss, नाही तर अशाने हे शरीर आळशी होईल बाईss"..


मग आईही तिला म्हणायची, " थोडं काम नाही केलं तर लगेच काही तुम्ही आळशी होणार नाही.. आणि मी तुम्हाला अजिबात कामं करू नका म्हणून नाही सांगत होss...पण तुम्हाला मदत करण्याची इच्छा असूनही ह्या आधी काशीवहिनींपुढे काही माझं चालायचं नाही. पण आता मात्र मी तुम्हाला घरातली सगळी कामं करू देणारच नाही.. इतके वर्ष नुसते कष्टच केले आहेत तुम्ही, आता मात्र थोडा आरामही करत जा"..


पण आधी केले असलेले अति कष्ट आणि स्वतःच्या शरीराची, मनाची हेळसांड झाल्यामुळेच गोदाआत्याही आताशा वरचेवर आजारी पडत होती..आणि शेवटी अतिशय थकून भागून तिने तिच्या ह्या कुडीतून स्वतःच्या जीवाची सुटका करून घेतली होती..


आता इतक्या वर्षांनी कोकणातलं वातावरणही बरंच बदललं होतं, गोदाआत्यासारखं तांबडं आलवण नेसवून आणि केस भादरवून सोवळं करण्यासारख्या परंपरा काळानुसार संपुष्टात आल्या हे बरंच झालं.. पण गोदाआत्यावर झालेला अन्याय पाहून मला त्यावेळी नेहेमी वाटायचं की, नको रे बाबाss असले जीवघेणे रितीरिवाज, ह्या जुनाट आणि अन्यायकारक परंपरा. ज्या माणसाचं रक्त शोषून घेत राहतील आणि त्या जीवाला जीवंतपणीचं मरणयातना भोगायला लावतील..जशी पिढी बदलत जाईल त्याप्रमाणे माणसानं स्वतःच्यात सकारात्मक बदल हा केलाच पाहिजे..फेकून दिले पाहिजेत हे जाचक रीतिरिवाज आणि घाणेरड्या परंपरा... दुसऱ्याला होणाऱ्या दुःखाची जाणीव समोरच्याला झालीच पाहिजे, स्त्रियांवरचे हे अत्याचार नामशेष व्हायलाच हवेत .


विचारांच्या गर्दीत रत्नागिरी कधी आलं ते मला समजलच नव्हतं.. नितीनने मला खांद्यावर थोपटून विचारांच्या तंद्रीतून भानावर आणलं होतं..


आता घरी गेल्यावर जे गोदाआत्याला बघू ते शेवटचंच असणार होतं... मनातून खूप गलबलून येत होतं मला. जरी आता गोदाआत्या हे जग सोडून गेली असली तरी माझ्या मनातली गोदाआत्या तरी तशीच राहणार होती.. कायमचं घर करून....


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy