Smita Vivek Agte

Inspirational

3  

Smita Vivek Agte

Inspirational

बदल..

बदल..

7 mins
242


घराच्या ओसरीवर शंकऱ्या आपल्या नातवा बरोबर बसला होता,रस्त्याने जाणारा येणारा प्रत्येक जण "नमस्कार शंकरराव", असं म्हणून आपल्या आपल्या कामाला पुढे जात होता... त्या सगळ्या गावकऱ्यांमध्ये कोणी शेतकरी, कोणी दुकानदार,शिक्षक,डॉक्टर,माल वाहतूक करणारे, असे सगळेच होते!! कारण सगळेच शंकऱ्या म्हणजेच त्यांच्या कररावांना ओळखत होते, आता तुम्ही म्हणाल की ह्या शंकऱ्या ला इतके सगळे जण कसे ओळखतात बरं ?.... मग आता ऐकाच बरका!!

तीस पस्तीस वर्षांपूर्वी हे गाव आत्ता जसं दिसतं आहे ना तसं नव्हतं, गावात कोणत्याही सोयी नव्हत्या, शेतात जी पिकं येतील त्यावर घरं अवलंबून होती. पण ह्या भागात मुळातच पाऊस खूप कमी आणि बेभरवशाचा असल्यामुळे बरेच वेळा पिकांचं इतकं नुकसान व्हायचं की शेतकऱ्याला बाजारात विकण्यासाठी तर जाऊद्या, पण स्वतःच्या घरात खाण्यासाठी सुध्दा दाणा मिळायचा नाही. शेतकरी हातावर हात धरून आभाळाकडे बघून पावसाची वाट पाहत राहायचा.. काळ्या मातीत दाणा पेरायचा, पण पाऊसाविना बियाणं करपून जायचं, अगदी डोळ्यात पाण्याचा पाऊस भरून यायचा पण आभाळातून काही पाण्याचा थेंब पडायचा नाही..

भेगाळलेल्या जमिनी बघून, शेतकरी डोक आपटून घ्यायचा... त्यात परत शेतीसाठी सावकाराकडून कर्ज घेतलेलं असायचं,त्यामुळं तो ही तगादा लावायचा हप्ता घेण्यासाठी....अशातच मग काहीच उपाय नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत असत!!!अशाच एका शेतकऱ्याने तेव्हा आत्महत्या केली होती, तो शेतकरी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून शंकऱ्याचा बापच होता...अख्ख घर दार दुःखाच्या खाईत लोटलं गेलं होतं..तसं तर सगळ्याच शेतकऱ्यांची दुःख सारखीच हो!! त्यामुळे कोण कोणाचं सांत्वन करणार...शंकऱ्या आईबापाचा एकुलता एकच पोर होता, बापानी आत्महत्या केली तेव्हा तो साधारण वीस बावीस वर्षाचा तरुण गडी होता...                        


बापाचं सर्व कार्य पार पडलं...शंकऱ्या आताशा घरी किंवा शेतात जाऊन तासन तास विचार करत बसायचा की, आम्ही सगळ्यांनीच काय असं पाप केलं आहे की आपली आणि ह्या गावातल्या लोकांची अशी परिस्थिती व्हावी?....तसं थोडं फार शिक्षण तरी बापानं शंकऱ्याला दिलं होतं, त्या शिक्षणासाठीही शंकऱ्या ला रोज चार किलोमीटर चालत तालुक्याच्या ठिकाणी जावं लागे, पण पुढं शिकवायला ना बापाकडे पैसा होता ना तालुक्याला पुढचं शिक्षण होतं, त्यासाठी मग त्याला शहरातच जावं लागणार होतं, पण त्याचा खर्च कसा करणार, मग बस झालं शिक्षण आता!असच बापाचं म्हणणं होतं!!शकऱ्यांनेही बारावी नंतर शेतीविषयक शिक्षणाचाच विषय निवडला होता, त्यामुळे अर्धे मुर्धे शेतीचे ज्ञान त्याला होते, आणि तो आपल्या स्वतःच्या शेतीसाठी हे ज्ञान वापरणार होता पण बापाचं हे अचानकच झालं...बापानी कच खाल्ली, त्याचंही काय चुकलं म्हणा..., हा म्हणतो तसं करायला त्याच्याकडे तर अजिबात पैसा नव्हता, आणि ह्या वर्षी तर एक टिपूस सुद्धा पाऊस न पडल्यामुळे बी बियाणांसाठी घेतलेलं कर्ज ही तो फेडू शकणार नव्हता त्यामुळे त्यानी हा मार्ग पत्करला....आताही शेतात बसल्या बसल्या शंकऱ्या विचार करत होता की काही तरी करून आपल्या आणि आपल्या गावातल्या शेतात पिकं आली पाहिजेत, तरच आपला आणि आपल्या पुढच्या पिढीचा निभाव लागेल....हल्ली तो घरात तासन तास आपली शेतीविषयक पुस्तकं काढून बसलेला असे, आई खायला चार दाणे घातलेल भाताचं पाणी आणून देत होती, प्यायचं पाणी सुद्धा दोन दोन कोस चालून आणावं लागे....              


त्यानी मनात काही विचार करून आपल्या सगळ्या शेतकरी बांधवाना भेटायला एकत्र बोलावलं, आणि सांगितलं की आपल्या शेतात आणि घरादारावर ही जी परिस्थिती येते आहे त्याचा आपण सगळ्यांनी जरा विचार केला पाहीजे, आपण दरवर्षी कर्ज काढून बी बियाणं विकत घेतो आणि पावसा अभावी शेतात त्या बियाणांच थोडं फार धान्य ही पिकत नाही....तर !!आता वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी मिळून काही विचार करून आता अशी शेती करावी, ज्यामुळे आपलं नुकसान न होता, फायदा होऊन घरातल्या मूलाबाळांच्याही तोंडात पोट भरून घास जाईल...सगळे त्याच्याकडे नुसते बघत होते, आणि म्हणत होते की, "शंकऱ्या, बाबा तू म्हणतोयस तसं कोणाला नकोय का व्हायला"? "पण कसं करायचं तेच तर डोसक नाही चालत रे बाबा!!!मग शंकऱ्या त्या सगळ्यांना म्हणाला," कोणतीही परिस्थिती असो पण खचून जायचं नाही आणि प्रत्येक परिस्थिवर काहीतरी उपाय हा असतोच ना?"..तर ह्या बिकट परिस्थितीवर सुद्धा काहीतरी उपाय असेलच..त्या दिवशी शंकऱ्या रात्रभर विचार करत होता, आणि त्याला एकदम आपल्या कॉलेजच्या पुस्तकातल्या एका लेखाची आठवण झाली, ती म्हणजे वर्षानु वर्ष आपण तीच बियाणं पेरतो जी पावसा अभावी उन्हाच्या तडाख्याने मातीतच जळून जातात...नदीचा पाट काढलेला आहे पण, पाऊसाविना प्रत्येक शेतकऱ्याला शेताला तेव्हढ पाणी नाही मिळत, आणि मग पाणी कमी मिळाल्या मुळे पिकं येत नाहीत...बरं पावसा अभावी नदीलाही पाणी कमीच असतं...मग त्याच्या डोक्यात एक विचार आला...     


आणि सगळ्या शेतकऱ्यांना त्यानी परत एकत्र बोलावलं...सगळ्यांना तो म्हणाला," काही गोष्टीचा मी अभ्यास केला, त्यामधून मला असं लक्षात येत आहे, की आपण वर्षानुवर्षे एकाच प्रकारची बियाणं पेरतो, त्यामधून फायदा होत नाही तरी बियाणं पेरून, नशिबावर आणि पावसावर भरोसा ठेवतो.पण जर आपण असं केलं तर?"...सगळे त्याच्या कडेच लक्ष देऊन ऐकत होते, की हा आता काय शेती विकायला लावतो की काय...तर!! तो म्हणाला, "पावसा पाण्या अभावी आपली शेती होत नाही ना?..मग आपण अशीच शेती केली तर, की त्याला अगदी थोडंच पाणी लागतं आणि पीक मात्र भरघोस येतं, फळ भाज्या, फुल, काही औषधी वनस्पती, ज्यांना पाणी खूप कमी लागेल आणि पीक मात्र छान येईल, आणि ते विकून पैसाही मिळेल" ..तेव्हा शेतकरी म्हणाले,"तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण मग दाणा च पिकवला नाही तर, मुलांच्या पोटात काय फक्त फळभाज्याच घालणार का?, त्यांना ज्वारी, बाजरी असच पाहिजे ना?".त्यावर शंकऱ्या म्हणाला ,"अहो अगदी एखादा कोपरा लावूया ही बियाणं!! आलंच पीक थोडं तर आपल्या घरात होईलच पण बाकी सगळ्या शेताच तर नुकसान होणार नाही ना?आणि नाहीच आलं तरी, बाकीच्या शेतातील फळभाज्या फुलं विकून आपल्याला पैसे मिळतील त्यातून थोड्या पैशांतून, दुसरी कडून आपण घरच्यांसाठी धान्य विकतही घेऊ शकतो.पण आत्ता तर अशी परिस्थिती आहे की, ना घरी खायला काही, ना विकायला काही, ना विकत घ्यायला पैसा"...सगळ्यांना ही गोष्ट पटली, आणि सगळ्यांच्या डोळ्यात थोडी स्वप्नही दिसू लागली....          


 मग ठरलं, शंकरच्या म्हणण्यानुसारच करायचं असच सगळ्यांनी ठरवलं..पण ही शेती करायला जी बी बियाणं लागतील त्याला पैसा कुठून आणायचा?...पण शंकऱ्या नी ह्यावर एक उपाय काढला, तो सगळ्यांना बरोबर घेऊन सावकाराकडे गेला आणि आम्हा सगळ्यांसाठी मिळून एकच रक्कम कर्ज म्हणून द्या असं त्यांना म्हणाला...पण सावकार म्हणाला की अरे आधीचच कर्ज आहे बाकी, आणि अजून नवीन?..पण मग त्यानी स्वतः च्या जवाबदरीवर मी हे कर्ज घेतो, नाही फेडलं तर मी माझी जमीन तुमच्या नावावर करीन असं सांगितलं...सावकारानेही मग मागे पुढे न बघता कर्ज दिल, शंकऱ्याच्या घराचे कागद सावकाराकडे अटी नुसार ठेवले गेले...पण सावकार शंकऱ्या ला फसवू शकत नव्हता, कारण शिक्षण असल्यामुळे शंकऱ्याने सगळे व्यवहार अगदी कायद्यानुसारच केले होते....सावकाराकडून मिळालेल्या पैशांतून त्याने शहरात जाऊन काही बी बियाणं, खत विकत घेतले, आणि प्रत्येक शेतकऱ्याला थोडी थोडी बियाणं आणि खत दिले...शेतींची परत नांगरणी करून प्रत्येक शेतात अंतरा अंतरावर वाफे तयार केले!काही वाफ्यांमध्ये फुलांसाठी तर काही वाफ्यांमध्ये फळं, औषधी वनस्पती ह्याची लागवड केली...          


वाफ्यांमध्ये तुषार पाणी फवारणीची सोय केली.नदीच्या किनाऱ्याला पाणी खेचून घेण्याच्या मोटारी बसवल्या आणि त्यांना ह्या तुषार पाणी फवारणीच्या नळ्या जोडल्या..दिवसातून एक वेळा मोटर चालू करून नळ्यांमधून थोडं थोडं पाणी तुषार फवारणीतून शेताला मिळू लागले, ह्या लागवडीला जास्त पाण्याची अजिबात गरज नसल्यामुळे, थोडंच पाणी शेतांना पुरत होत....रात्रंदिवस सगळेच शेतकरी, अगदी शंकऱ्या सकट सगळेच कामाला लागले होते...काहीच दिवसात शेतांचा कायापालट झाला होता...प्रत्येक शेतात हिरव्या भाज्या, फळं, फुलं, आणि औषधी वनस्पतींचे ताटवे फुलू लागले होते...सगळेच शेतकरी समाधानाने शेताकडे बघू लागले..शेतातून फळं, भाज्या, फुलं, औषधी वनस्पती ह्यांच्या काही टोपल्या भरल्या गेल्या...आता सगळे शंकऱ्या कडे बघून म्हणू लागले," पिक तर चांगलं आलं, आता हे नेऊन ईकायच कसं?""मी सगळी व्यवस्था करून ठेवली आहे, फक्त बैलगाड्या भरा आणि माल घेऊन तालुक्याला चला, तिथे आपला माल काही काँट्रॅक्टर विकत घेतील, आणि आपल्याला पैसे देतील, प्रत्येकाला सारखेच पैसे वाटले जातील, पण त्यातील काही रक्कम ह्या महिन्यापासून तालुक्याच्या बैंकेत प्रत्येकाच्या नावावर भरली जाणार आहे, त्यासाठी प्रत्येकाचं खातं बँकेत उघडलं जाईल, जेणे करून अडीअडचणीला प्रत्येकाकडे बँकेत थोडी तरी रक्कम उभी असेल, फिक्स डिपॉझिट मध्ये".शंकऱ्या बँकेचं काय म्हणत होता, ते काही शेतकऱ्यांना समजत नव्हतं, पण आता त्याच्यावर त्यांचा विश्वास बसला होता...ठरल्याप्रमाणे तालुक्याला गाड्या गेल्या, प्रत्येकाचं बँकेत खाते उघडले गेले, काही रक्कम लगेचच बँकेत भरली आणि काही रक्कम शेतकऱ्यांच्या हातात आली, त्यातले प्रत्येकाने थोडे थोडे पैसे शंकऱ्या कडे दिले, सावकाराचा हप्ता फेडायला.....


अश्याप्रकारे जवळजवळ सात आठ वर्षे गेली, आता तर माल टेम्पोतून,ट्रक मधून भरून जाऊ लागला, शेतकरी, व त्यांची बायका पोरे पोटभर जेऊ लागली, तसेच बँकेतही प्रत्येकाच्या नावावर थोडा थोडा पैसा शिल्लक राहू लागला.शंकऱ्याने सावकरकडून आपली जमीन सोडवून घेतली...दरम्यान शंकऱ्याने सरकारची परवानगी घेऊन गावातल्या मुला मुलींसाठी शाळाही बांधून घेतली...तसेच छोट्या मोठ्या आजारांसाठी नेहेमी तिकडे लांब तालुक्याला जावं लागायचं, म्हणून त्याने शाळेसारखच सरकारीदवाखान्याचीही सोय गावातच केली...हळू हळू गावाचा कायापालट होत गेला..शेतकरीही सुखाने राहू लागले, आत्महत्या सारख्या गोष्टी पूर्णपणे बंद झाल्या!!!गाव नव्या तेजाने झळकू लागले होते!!!शंकऱ्या आता शंकऱ्या न राहता सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनून राहिला, आता तो शंकरराव म्हणून सगळ्या गावात प्रसिद्ध झाला होता, त्याचे स्वतः चे ही लग्न होऊन दोन मुले झाली होती, त्याच्या आईचाही शंकऱ्या सारखा मुलगा आपलाच आहे ह्या गोष्टीने उर भरून येत होता, नातवंडांमध्ये ती ही रमून गेली...आणि त्यालाही मनापासून आनंद होत होता, की आपल्या गावातील शेतकरी आता कर्जाच्या डोंगरामध्ये अडकून आत्महत्येचा विचारही करणार नाहीत...

गावाची परिस्थिती अमुलाग्र बदलली. सगळ्या आधुनिक सोयीही गावात उपलब्ध होऊ लागल्या, शिक्षणासाठी शाळा होत्याच, पण आता दवाखाने, हॉस्पिटल्स, महाविद्यालये, तसेच बँकेची सुद्धा सोय गावात सुरू झाली, तालुक्यातले आणि शहरातले लोकं ही आता गावात नोकरी निमित्ताने येऊ लागले. वर्षांवर वर्षे जात होती आणि आज तीस पस्तीस वर्षांनी शंकरराव आपल्या नातवंडाबरोबर, मोठ्या मुलाच्या मूला बरोबर घराच्या ओसरीवर बसला होता, त्याची मुलं ही त्याच्याचसारखी होती, गावाला शेताला वाहून घेणारी... रस्त्यातले जाणारे येणारे प्रत्येक जण त्याला नमस्कार करून जात होते, त्यामध्ये कोणी शेतकरी, शिक्षक, डॉक्टर, दुकानदार तसेच मालवाहतूक करणारे असे बऱ्याच प्रकारचे लोक होते. शंकऱ्यासारखा एखादा जरी माणूस प्रत्येक गावात असेल तरी गावाची परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही, लोकं खचून जाऊन आत्महत्येसारखा शब्दही ओठावर आणणार नाहीत...

खरंच मनापासून सलाम आहे शंकऱ्यासारख्या लोकांना...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational