नक्षत्र
नक्षत्र
"नाही नाही, अजिबात नाही, सातव्या घरातला हर्षल नेहमी घटस्फोट देतो आणि आश्लेषा नक्षत्रावर ची मुलगी सासूच्या जीवावर उठते." देशपांडे बाई कळवळून म्हणत होत्या. निर्मला कुलकर्णी आणि तिचे यजमान नेहमीप्रमाणे आपल्या मुलासाठी स्थळ बघत होते, मुली पसंत पडल्या कि पत्रकांची जुळवाजुळव चालायची, पत्रिकेसाठी देशपांडे बाई म्हणजे शेवटचा शब्द.
गोर्यापान सुरेख देशपांडे बाई, त्यांचं टापटीप असलेलं सजवलेलं नीट्नेटकं घर, पंचवीस वर्षाचा अनुभव, आणि कुंडल्या पत्रिके यांच्यावरती प्रगाढ अभ्यास. मृदुला देशपांडे, निर्मला कुलकर्णी ची चांगली मैत्रीण आणि ज्योतिषी देखील. मृदुला कळवळून म्हणत होती," एवढ्या पत्रिका बघितली आहेत, मुलगी कितीही चांगली आणि रूप आणि सुरेख जरी असली ना तरी ग्रह बोलतात बरं. आणि तू मला परदेशातली उदाहरणे देऊ नकोस, त्यांच्याकडे कुठे आहे हे शास्त्र, न कुंडल्या माहिती न ग्रहतारे माहिती."
"या मुलीच्या पत्रिकेमध्ये दोन दोष आहेत. पहिला म्हणजे तिच्या सातव्या घरातला हर्षल, अग तुमच्या घरात ती तीन महिने देखील राहणार नाही. काहीतरी कुरकुरी होतील, भयानक काहीतरी घटना घडतील आणि मंदार चा आणि तिचा घटस्फोट होईल दुसरी गोष्ट तिचा जन्म आश्लेषा नक्षत्रावर असा आहे, या नक्षत्रावरती जन्माला येणाऱ्या मुली आपल्या जोडीदाराच्या आईच्या जीवावर उठतात." मृदुला आपल्या मतावर ठाम होती.
"काहीतरी बोलु नकोस, रोहिणी मंदार ची पक्की मैत्रीण आहे, आमच्याकडे येणंजाणं आहे, तिचं कुटुंब आणि आमचं कुटुंब चांगली मैत्री आहे आमची. ती कशी माझ्या जीवावर उठेल?" निर्मला म्हणाली.
"अगं जीवावर उठणार म्हणजे, काही प्रत्यक्षच खून करणं नाही, वेडाबाई, घटनाच अशा घडतील ज्या तुझं आयुष्य संपवतील." मृदुला म्हणाली.
"तुला उदाहरणच घ्यायचं झालं तर घोरपडे बाईंचा मृत्यू च घे ना. घरात पाय घसरून पडल्या, डोक्याची फॅन्सी क्लिप डोक्यात घुसली, मेंदूला इजा झाली, तडफडून मेल्या. त्यांना त्यांच्या सुनेने ना ढकलले होतं, ना तीने त्यांना मुद्दाम पाडलं होतं. कितीतरी उदाहरणे आहेत बरं. धडधाकट असलेली सासू काही तरी क्षुल्लक निमित्त होऊन स्वर्गवासी होते." मृदुला म्हणाले.
"म्हणजे, आश्लेषा नक्षत्रावर च्या मुली नी काही लग्नच करू नयेत?" निर्मला कटाक्षाने म्हणाली.
"असा मी कुठे म्हटलं? पण ज्या मुलींच्या पत्रिकेमध्ये आश्लेषा नक्षत्र आहे त्यांनी बिना सासूचे घर बघावे. म्हणजे सासुचा ऑल रेडी स्वर्गवास झाला आहे, मग त्यांच्यावर ती पण दोष येत नाही, आणि संसारही सुखाचा होतो." मृदुला ने अभ्यास पूर्ण सांगितले.
"आणि हो, तू माझी पक्की मैत्रीण आहेस, मला माहिती असताना तरी तुला मी अश्लेषा नक्षत्र ची सून करू देणार नाही." मृदुल ने गंभीर पूर्वक सांगितले.
कुलकर्णी पती-पत्नी नाराजीनेच उठले, श्री कुलकर्णी म्हणाले," मृदुल ताई तुम्हीच मंदार ला समजावा, एकाचा संसार उध्वस्त करून दुसऱ्याने संसार थाटलेला, कोणालाच सुख मिळणार नाही, माझ्या मुलाची दोन्ही बाजूंनी गळचेपी होईल त्यापेक्षा आम्ही त्याला इथे घेऊन येतो, तुम्ही त्याला समजावून सांगा."
आठवडा भयंकर मनस्थिती मध्ये गेला. श्री सुहास कुलकर्णी जरी पेशाने सायंटिस्ट असले तरी पत्रिके वरती त्यांचा गाढ विश्वास होता. निर्मल च्या बाबतीमध्ये ते कुठलीही तडजोड करायला तयार नव्हते. पुढच्या रविवारी रोहिणीच्या आई-वडिलांना त्यांनी घरी बोलावले आणि तिचा नक्की जन्मवेळ आणि हॉस्पिटल चे कागदपत्र मागवले. रोहिणीची जन्मवेळ परत परत तपासून त्यांनी मृदुला देशपांडे ला नवीन पत्रिका बनवायला सांगितले.
दोनच दिवसात मृदुल चा फोन आला, "पत्रिका तयार आहे दोन्ही कुटुंबांनी एकत्र यावे म्हणजे शंकानिरसन करण्यात येईल."
मंदारला पूर्ण कल्पना होती, आई वरच्या पूर्ण प्रेमामुळे लग्नाच्या बाबतीत तो अजिबातच आग्रही नव्हता, रोहिणी चे मात्र मंदार वरती अतिशय मन जडलेले होते , त्याला विसरून दुसऱ्या कोणाशी लग्न करणे तिला अतिशय अवघड वाटत होते. दोन्ही कुटुंब मृदुला देशपांडेच्या घरी जमले. परत मंदारच्या आणि रोहिणीच्या पत्रिकेचे वाचन झाले. मंदारच्या सातव्या घरातला शनि आणि रोहिणी च्या पत्रिकेतला सातव्या घरातील हर्षल याच्यामुळे दोघांचे लग्न टिकणे देखील अवघड होते, तसेच रोहिणीच्या पत्रिकेतल्या आश्लेषा नक्षत्र, तिने कोणाशी जरी लग्न केले असते तरी जिवंत सासूच्या जीवाला धोकाच होता.
मृदुलाने रडत असलेल्या रोहिणीला खूप समजवायचा प्रयत्न केला," सगळं कबूल आहे ग, प्रेम काही ठरवून करता येत नाही, पण नुसतं प्रेमच म्हणजे जीवन नाही ना. उद्या तुझ्या नवऱ्याच्या आईला काही झालं, तर खापर तुझ्या डोक्यावर फुटेल. एकविसाव्या शतकात देखील मला नाही वाटत आपल्या आईच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या व्यक्ती बरोबर कोणीही मुलगा संसार करू शकेल, त्यामुळे तुम्ही दोघ आत्ताच थांबा. आपल्या ऑफिस मधून बदल्या करून घ्या, दूर जा, एकमेकांना विसरायचा प्रयत्न करा आणि नीट पत्रिका बघून लग्न करा."
रोहिणीच्या आत्या देखील तिथे आलेली होती, कुत्सित पणे हसून म्हणाली," रोहिणीला मी सून करून घेते, बघू मला काय होते ते."
रोहिणीच्या आत्याला रोहिणी लहानपणापासूनच फार पसंत होती, रोहिणी बरोबर येणारी माहेरची दौलत तिला खुणावत होती. जाणून बुजून त्यांनी हा निर्णय घेतला. रोहिणीचे बाबा निःशब्द झाले. काही न बोलता सगळेजण आपापल्या घरी गेले.
एका महिन्यानंतरची गोष्ट, सगळीकडे रोहिणीच्या कुंडलीची प्रसिद्धी झाल्यामुळे रोहिणीच्या बाबांनी आपल्या बहिणीच्या मुला बरोबरच तिचे लग्न ठरवले. लग्न देखील गावाकडे करून नवीन नवरा नवरी आपल्या बदलीच्या गावी निघणार होती. गावापासून एअरपोर्ट फक्त एका तासाच्या अंतरावर होतो, तेवढेच फक्त गाडीने जायचं होतं आणि नंतर तर विमानाचा प्रवास होता.
सगळं कुटुंब आनंदामध्ये होतं. रोहिणी पण कुंडली, का सगळं काही विसरून लग्नाचा आनंद घेत होती. आत्याच्या मुलाशी, आनंदबरोबर लग्न असल्यामुळे ती पण खुषीत होती. कुटुंब, आजी, आजोबा, सगळेच खुश होते. भरपूर भारी साड्या, दागिने याची रेलचेल लग्नामध्ये होती. रोहिणीच्या बाबांनी देखील दिल खोलून खर्च केला होता, पंचपक्वानाचा थाट लग्नाच्या दिवशी होता. आठ दिवस गावाकडचे लग्न गाजत होतं. रोहिणीची आत्या, आनंद रोहिणी, सगळी पत्रिका वगैरे विसरून गेले होते. जसं काही ते एक दुःस्वप्न होतं. थाटामाटात लग्न पार पडले, रोहिणी चे आत्या एकदम कुर्यात होती. आपल्या भावाला परत परत म्हणत होती, "अरे पत्रिका वगैरे सगळं थोतांड आहे, मी चांगली धडधाकट आहे नातवंड बघितल्याशिवाय काही जाणार नाही."
संध्याकाळचे रिसेप्शन पार पडले, रात्री हॉटेलमध्ये मुक्काम करून दुसर्या दिवशी पहाटेच मोठ्या गाड्यांमध्ये बसून वऱ्हाडी परतणार होते.
नवरा, नवरी आणि नवऱ्याची आई असे मोठ्या होंडा सिटी मध्ये बसले. बाकीची मंडळी आपापल्या गाड्यांमध्ये बसली. हसून रोहिणीची आत्या आपल्या भावाला म्हणाली," काळजी करू नकोस दादा, तुझ्या मुलीला मी सुखात ठेवीन, आणि कायम तिच्या बरोबर राहील." पहाटे पाच वाजता गाड्या निघाल्या, वाटेमध्ये नाश्ता करून एअरपोर्ट च्या दिशेने प्रवास चालू झाला, गावापासून एअरपोर्ट फक्त एका तासाच्या अंतरावर होतो, तेवढेच फक्त गाडीने जायचं होतं आणि नंतर तर विमानाचा प्रवास होता. आणि तेवढ्यात... कर्कश्य आवाज करत होंडा सिटी उलटी -- उलटी--पालटी होत रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. अचानक मागचे टायर फुटल्यामुळे ड्रायव्हरचा कंट्रोल गेला, गाडी वेगात असल्यामुळे वेडीवाकडी होत तिने दोन तीन कोलांट्या उड्या मारल्या, आणि धाडकन झाडावर जाऊन आदळली. ज्या बाजूने आदळली तिथेच आत्या बसली होती.
रोहिणीच्या नवऱ्याने सीटबेल्ट घातला होता, प्रसंगावधान राखून त्याने रोहिणीला आपल्या जवळ घट्ट मिठीत धरले. आत्याने मात्र सीटबेल्ट घातला नव्हता, गाडी उलटी होताना तिचे डोके जबरदस्त आदळले आणि मणक्यावर ती जीवघेणा मार लागून तिचा तडकाफडकी मृत्यू झाला. मागच्या पुढच्या गाड्यांच्या समोर होंडा सिटी ला झालेला अपघात हा अतिशय विचित्र होता, होंडा सिटी चा ड्रायव्हर देखील शुद्धीवर असून कोणाला खरचटलेदेखील नव्हते. गाडीमध्ये कोणाला काहीही झाले नाही मात्र आत्याबाईचे जागेवरच प्राणोत्क्रमण झाले होते. ते बघून रोहिणीने किंकाळी फोडली आणि ती बेशुद्ध पडली.
मृदुला देशपांडेचे भाकीत खरे ठरले.
