नजर
नजर
मी नेहमी सारखाच बसची वाट पाहात बसस्टॉपवर उभा होतो. ती समोरून येताना दिसली. तिच्यासोबत कोणीतरी तरुण होता. का कोणास जाणे तिला पाहिलं की माझ्या मनात चित्रविचित्र भावना निर्माण होतात. खरं म्ह्णजे मी तिला पहिल्यांदा पाहिल तेंव्हाच तिच्या प्रेमात पडलो होतो. पण आता तिच्या चारित्र्याबद्दल माझ्या मनात शंका निर्माण झाली होती. मला वाटत होत तिच्या मनात नक्कीच माझ्याबद्दल काहीतरी आहे पण नक्की काय ते काही मला काही केल्या कळत नव्हते. यापूर्वी ज्या माझ्या प्रेमात पडल्या होत्या त्यांना माझ्या ज्या गोष्टी आवडल्या होत्या त्या हिला आवडण शक्यच नव्हतं कारण त्या सर्वजणी माझ्या ओळखीच्या आणि मला बर्यापैकी ओळखणार्या होत्या. माझ्याबद्दल सर्वकाही माहित असताना ती माझ्या प्रेमात पडली असती तर मला त्याचे फारसे आश्चर्य वाटले नसते. तिचा चंचल स्वभाव पाहता मला वाटत आतापर्यंत तिच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांपेक्षा मी कदाचित वेगळा होतो. त्यात तथ्यही होतेच कारण मी ही सर्वसामान्य पुरुष नव्हतोच म्ह्णूनच अनोळखी स्त्रिया माझ्या वाटेला जातच नाहीत. कदाचित तिच्याबद्दल तिला माझ्या डोळ्यात दिसलेली प्रेम भावना ओळखीची दिसली असेल अथवा माझ्या डोळ्यात तिला तिच्याबद्दलचे आकर्षण दिसले असेल. मी तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडल्यामुळे मी तिला तिच्या गुणोदोषासह स्वीकारेन असे तिला वाटत असले तरी ते शक्य नव्हते कारण मी प्रेम आणि तत्वे यांना कधीच एकमेकांत मिसळून देत नाही. तिने मला बसस्टॉपवर पाहिले. बसस्टॉपवर फार गर्दी होती. तिच्यासोबत असणारा तरुण तिच्या हाताला ओढत म्हणाला, ‘चल चालत जाऊ या ! चारचौघात तिला असं हाताला धरून ओढण्याची त्याची हिंमतच कशी झाली ? काहीतरी कारण सांगून तिने त्याच्या सोबत जाणे टाळले. ती जणू मला हे सांगण्याचा प्रयत्न करत होती की मी त्याच्यासोबत न जाता तुझ्यासाठी थांबले. पण अशा दिखाव्यांना भुळणार्यांपैकी मी नव्हतो. अशी नाटके मी यापूर्वी बरीच पाहिली होती. क्षणिक तडजोड कोणीही करतो पण कृती ही मनापासून व्हायला हवी ! ती त्याच्यासोबत शिस्तीत चालत गेली असती तर त्याचे मला काहीही वाटले नसते. तिच्यावर कोणीतरी पुरुष अधिकार गाजविण्याचा प्रयत्न करू पाहात होता हे मला आवडले नव्हते. माझ्यावर प्रेम करणार्या कोणाचा असा हात ओढणे तर सोडा चारचौघात साधा हात पकडेनेही माझ्या तत्वातच बसत नव्ह्ते. तिच्यापेक्षा सुंदर तरूणी माझ्या आयुष्यात यापूर्वी येऊन गेलेल्या असल्यामुळे तिचे सौंदर्य मला भुरळ घालू शकत नव्हते. ती नुसती माझ्याकडे पाहून तिच्या गाळात गोड हसली असती तरी मी तिच्यात गुंतत गेलो असतो पण जशी - जशी ती मला कळत गेली असती तस तसा मी तिच्यापासून दूर गेलो असतो. कोणा तरुणीशी कोणताही पुरुष जेंव्हा अशी अंगळट करतो जशी तो तरूण तिच्याशी करत होता याचा अर्थ असा होत नाही की ती तरुणी वाया गेलेली आहे पण ती चारचौघात विनाकारण बदनाम असणार याची मला खात्री होती. फोनवर बोलताना तिचे कंबरेत हलणे मला आधीच खटकले होते कारण हे एक लक्षण आहे बोलत बोलत दुसर्यांच्या भावनांशी खेळण्याचे. तिचे तोकडे कपडे, चेहर्यावर थापलेला मेकअप ही मला अगोदरच खटकला होता कारण माझ्या मते ते पुरुषांना आकर्षित करण्याच्या साधनांपैकी एक आहे. आपल्या सुंदर आकर्षक दिसण्याबाबत ती प्रचंड जागरुक असावी. याचा अर्थ तिला आयुष्य चैनीत सुखासमाधानात जगण्याची हौस आहे. संकटाना सामोर जाण्याची आणि कोणत्याही प्रतिकुल परिस्थितीला सामोर जाण्याची कदाचित तिची क्षमता नसावी. ती बसने प्रवास करत होती आणि नोकरी करत होती याचा अर्थ ती मध्यमवर्गीय
कुटुंबातील होती. तरीही तिचे राहणीमान करोडपती मुलींसारखे होते याचा अर्थ तिला श्रीमंतीचा हव्यास होता. ती माझ्या प्रेमात पडण्याला कदाचित हे कारण असावे की ती मला तिच्यापेक्षा अधिक श्रीमंत समजत होती जो कदाचित मी नव्हतो. तिला माझ्याकडून जे अपेक्षित असावे त्यातील माझ्याजवळ काहीच नव्हते. तिच्यावर प्रेम करायला माझ्याकडे वेळ नव्हता. तिच्या पोषाखाचे मी समर्थन करू शकत नव्हतो. मला श्रीमंती जीवन जगण्यात फार रस नव्हता. समाजसेवा आणि समाजकार्य करणे माझे स्वप्न होते. मी कोणाच्या ही प्रेमात पडलो तरी प्रेमात वाहून जाणे मला शक्य नव्हते. तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडणारी माणसे तिला पदोपदी भेटत असतील मी त्यांच्यापेक्षा तिला वेगळा वाटलो म्ह्णून ती माझ्या प्रेमात पडली असेल. ती माझ्या प्रेमात पडायला तिच्याकडे एाकतरी ठोस कारण होते पण माझ्याकडे तिच्या सौंदर्याव्यतीरिक्त काहीच कारण नव्हते मी तिच्या प्रेमात पडायला. माझ्यासाठी तिने स्वतःला आवर घालण्याचा स्वतःत काही बदल करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा तिला फायदाच होईल पण त्या बदलाची दखल घ्यायला मी तिला आता पुन्हा भेटेनच याची मला खात्री वाटत नव्हती. माझ्या अस्थिर जीवनात तिच्या नजरेशी नजरा नजर होताच माझ्या प्रेमाची नजर स्थिर झाली त्यामुळे ती मला इतर चारचौघांसारखा दिलफेक तरुण समजली. तिने मला जाणून घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. याचा अर्थ असा होतो की तिच्या आयुष्याबाबत बरीच बेफीकीर होती. ज्याला स्वतःच्या भविष्याची काळजी घेता येत नसेल तो जगाची काळजी काय घेणार ?
याच बसस्टॉपवर काही वर्षापूर्वी मी असाच एका तरुणीच्या मनापासून प्रेमात पडलो होतो. ती ही मला हिच्यासारखाच दिलफेक तरुण समजत राहिली. तिच्यासाठी तिची वाट पाहण्यात याच बसस्टॉपवर मी शेकडो तास वाया घालविले होते. पण तिचा स्वार्थी आणि घमेंडी स्वभाव लक्षात येताच मी तिला विसरण्यचा निर्णय घेतला. आज ती मला जेंव्हा जेंव्हा पाहते तेंव्हा माझ्या नजरेपासून लपण्याचा प्रयत्न करते कारण आता तिला कळून चुकले आहे की आपण काय गमावले आहे ते. जोर जबरदस्तीने मिळविलेली कोणतीच गोष्ट मला नको होती. मग ! ते प्रेम का असेना. मला ओळखणारी कोणतीही साधी-सरळ मुलगी जर मला मनापासून म्ह्णाली, ‘ मला तू आवडतोस, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि मला तुझ्यासोबत आयुष्य काढायला आवडेल तर मी त्या मुलीच्या सौंदर्याचा, शिक्षणाचा, जात – धर्माचा, उंचीचा, वयाचा कसलाच विचार न करता स्वीकार करेन पण यापूर्वी माझ्या प्रेमात पडलेल्या एकीचीही असं करण्याची हिंमत झालेली नव्हती आणि ती हिंमत आता ही हि करणार नव्हती. ती उगाच माझ्या नजरेत स्वतःला सिध्द करण्याचा अट्टहास करत होती पण तिला हे माहित नव्हते माझी नजर ही कोणा सामान्य माणसाची नजर नाही. काळाच्या पलिकडे जाऊन पाहण्याची क्षमता माझ्या नजरेत होती. ज्या क्षणी तिने माझ्या नजरेला नजर दिली त्याक्षणी तिची प्रतिमा माझ्या मेंदूत तयार झाली होती. माझ्या नजरेतून ती फक्त एक सुंदर तरुणी होती त्यापलिकडे काहीही नव्हती. मी तिला त्या तरुणासोबत पाहिले नसते तरी फार काही फरक पडणार नव्हता. कारण माझ्या नजरेने अगोदरच हेरले होते की आपला जीवनाचा प्रवास हिच्यासोबत होऊ शकत नाही. त्यामुळे मी तिचा विचार न करता एकटाच खचा-खच भरलेल्या बसमधे चढलो आणि ती माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहात राहिली त्या नजरेत माझ्यासाठी मला एक प्रश्न दिसत होता पण तिला मी त्या प्रश्नाचे उत्तर कधीच देणार नव्हतो कारण आता मी एक लेखक होतो आणि ती एक सामान्य तरुणी कोणाच्याही प्रेमात पडणारी....