नियती
नियती


:: गूढ कथा ::
---- //// नियती ////----
------© प्रकाश बोकारे, नागपूर.
एकतर मला सहसा गाढ झोप येत नाही, आणि आलीच तर हमखास एखादं गूढ, सूचक स्वप्न पडतं. स्वप्नातील व्यक्ती, वस्तू आणि घटना बारकाव्याने अगदी स्पष्ट, रेखीव दिसतात. ही पडलेली स्वप्नं पुढे बरेच दिवस मनाला चुटपुट लावून जातात आणि दीर्घकाळ लक्षात रहातात.
स्वप्नातले प्रसंग आणि भेटलेल्या व्यक्ती अंतर्मनाला इतक्या हुरहुर लावून जातात, की कधी कधी एकांतात त्यांच्या आठवणीने मी अगदी व्याकूळ होऊन जातो आणि त्यांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी मन तळमळू लागते. मग पुन्हा कधीतरी त्याच गावात मी स्वप्नात पोहचतो. जुन्या व्यक्ती मला पुनश्च भेटतात, जिव्हाळ्याने एकमेकांचे सुखदुःख शेअर होतात, पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन समाधानाने एकमेकांचा निरोप घेतल्या जातो.
स्वप्नातली अशी अनेक गावं, स्थळं आणि व्यक्ती जणू खरोखरच अस्तित्वात असावीत इतकी माझ्या स्मृतीतल्या कप्प्यात ती आजही शाबूत आहेत.
अशाच एका अनामिक, छोट्याशा पण आडमार्गाच्या गावी मी एकदा स्वप्नात पोचलो. आजूबाजूला गर्द झाडी. पक्षांची किलबिल. तहानेने मी व्याकुळ झालेलो. वस्ती अजून दीड-दोन किलोमीटरवर असावी. बाजूलाच एक पायवाट एका टुमदार पण जुन्या एकाकी बंगल्याकडे वळलेली होती. समोर पडवी, नक्षीदार लोखंडी बालकनी, कौलारू छत आणि नागमोडी लाकडी जिना, त्यावर लाईट-हाऊस सारखा दिवा, असा तो दुमजली बंगला होता. सुदैवाने वरच्या गॅलरीत बनियन पैजामा घातलेले, पांढऱ्या केसांचे सद्गृहस्थ उभे होते. माझ्याकडे लक्ष जाताच काय हवे म्हणून खुणेनेच त्यांनी विचारले. आणि मला वर येण्यास खुणावले.
वर डाव्या बाजूच्या मोकळ्या गच्चीत मी नळाखाली हात-पाय धुतले. दारातून बाहेर येणाऱ्या गृहस्थांना मी नमस्कार केला. सात्विक चेहरा, गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर टिळा. आपुलकीने त्यांनी मला आत नेले. समोर भारतीय बैठकीवर मी बसलो. भिंतीवर एका सत्पुरुषाचा फोटो. आतून येणारा उदबत्तीचा सुगंध! कपाटात धार्मिक पुस्तकं. भारावलेले वातावरण! एकमेकांचा परिचय झाला. आतल्या खोलीतून त्यांची म्हातारी आई पिण्याचं पाणी घेवून आली. प्रसन्न चेहरा. पांढरं नऊवारी लुगडं. मी तिला वाकून नमस्कार केला.
गृहस्थांनी आपुलकीने माझी विचारपूस केली. त्या परिसरातले ते एक सत्पुरुष असून लोक त्यांना भाई म्हणत म्हणून समजलं. चहा झाला. त्या दोघांच्या प्रेमळ वागणुकीने आणि पवित्र वातावरणाने मी अगदी भारावून गेलो. निघतांना पुन्हा या म्हणून आईंनी अगदी आवर्जून सांगितलं.
त्यानंतर, या दोघांशी जणू माझं अगदी जवळचं नातं आहे अशासारखी त्यांना पुन्हा भेटण्याची मला चुटपुट लागून राहिली.
चार-सहा महिन्यांच्या अंतराने दोन-तीन वेळा माझे त्या घरी स्वप्नातच जाणे येणे झाले. आपुलकी आणि जिव्हाळा आणखीन वाढतच गेला.
एक दिवस कंपनीच्या कामासाठी ट्रॅव्हल बसने मी पुण्याला निघालो होतो. (स्वप्नात नव्हे, प्रत्यक्षात). बाजूलाच शांताराम साल्पेकर नावाचे सद्गृहस्थ बसले होते. परिचय झाला. गृहस्थ सात्विक, आध्यात्मिक, कर्माच्या सिद्धांतावर व पुनर्जन्मावर विश्वास असणारे व सत्-प्रवृत्तीचे वाटले. लांबचा प्रवास असल्याने लवकरच आमची मैत्री झाली. मने जुळली.
न राहाऊन मी त्यांना माझ्या विलक्षण स्वप्नांबाबत सविस्तर सांगितले. एकाग्रतेने संपूर्ण माहिती त्यांनी विश्वासाने ऐकून घेतली. थोडा वेळ ते ध्यान-मग्न झाले.
"कदाचित लवकरच या सगळ्याचा उलगडा होईल" असे ते म्हणाले.
मध्यरात्र उलटून गेली. बसल्या जागेवर आमचे डुलक्या घेणे सुरू होते. कदाचित चार-साडेचार झाले असतील. दुर्दैवाने आमची बस बंद पडली.
आता दोन-तीन तासांची फुरसत आहे, समजल्यावर साहजिकच नाईलाजाने पाय मोकळे करायला आम्ही बाहेर पडलो. हायवेच्या कडेला एक चहाची बंद टपरी होती. टपरीतल्या आरशात बघून आम्ही आमचे केस नीट केले. आसमंतात थंडगार हवेची झुळूक मनाला प्रसन्न करत होती. हायवे सोडून आम्ही लगतच्या पायवाटेला लागलो. मोठाल्या वृक्षांवर पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता. झुंजूमंजू होत होते. दूरवरच्या खेड्यातले मिणमिण दिवे अजूनही जळत होते. डाव्या दिशेला जाणाऱ्या वाटेकडे आमचे नकळत पाय वळले.
एकाएकी मला इथे पूर्वी कधीतरी आल्यासारखे वाटू लागले. पायाखालची पाऊलवाट, आजूबाजूचे मोठाले वृक्ष, परिचयाचे वाटू लागले. समोर नजर गेली. मला आश्चर्याचा धक्काच बसला!
"बर का शांतारामजी, अहो हाच तो कौलारू बंगला, जिथे यापूर्वी मी अनेकदा स्वप्नात भेट दिली होती. तोच नागमोडी लाकडी जिना व तो वर लाईट-हाऊसचा दिवा". भारावलेल्या अवस्थेत मी म्हणालो.
नेमकी याच ठिकाणी आमची बस बंद पडावी, हा ही एक योगायोगच!
"माय गॉड! स्वप्नातला बंगला खरंच अस्तित्वात असावा!" शांतारामजी स्तिमितच झाले.
दुसऱ्याच मिनिटाला वरच्या गॅलरीत भाई प्रकट झाले. तोच बनियन- पैजाम्यातला पोशाख, कपाळावर टिळा, तुळशीची माळ. मला पाहताच त्यांनी परिचयाचं स्मित केलं आणि या या म्हणून आनंदाने वर बोलावले.
"आई, समीरभाई आलेत" म्हणून त्यांनी आत आईला आवाज दिला.
"बरेच दिवसांनी फिरकलात" म्हणत आईंनी दोघांना पिण्याचं पाणी दिलं. "बसा" म्हणाल्या. नजरेत तोच जिव्हाळा, तीच आपुलकी! मी स्तंभितच झालो.
आश्चर्य म्हणजे या गावात प्रत्यक्षात मी आज प्रथमच आलो होतो. आणि या दोघांना मी पूर्वी फक्त स्वप्नातच भेटलो होतो. तरीही ते दोघे मात्र मला पूर्वीपासूनच नावाने ओळखत असून, जणू मी त्यांना पूर्वी प्रत्यक्षच भेटलो होतो असे नॉर्मल वागत होते. माझ्या येण्याचा त्या दोघांना मनस्वी आनंद झाल्याचे स्पष्ट दिसत होते. नेहमीप्रमाणे माझ्या कुटुंबाची खुशाली विचारुन झाली, चहा झाला. मी भाईंशी शांतारामजींची ओळखही करून दिली. मनसोक्त गप्पा झाल्या. पाय निघत नव्हते. नाईलाजानेच आईंना नमस्कार करून आम्ही दोघे बसकडे रवाना झालो.
आम्हा दोघांची मति गुंग झाली होती.
टपरीसमोरच्या बाकड्यावर बसून शांतारामजी चिंतन करू लागले.
"आपल्या जड देहाभोवती एका वायुरूप अदृश्य शरीराचे वलय असते, ज्याला इंग्रजीत astral body म्हणतात. काही गुप्त साधना केल्यास मनाच्या अद्वितीय शक्तीने या वायुरूप शरीराने मानवाला हवे तिथे जाता येते". शांतरामजी सांगत होते.
"याचा अर्थ यापूर्वी स्वप्नावस्थेत तुम्ही वायुरूप शरीराने त्या बंगल्यास भेट देत असत".
"मागील जन्मात तुम्ही एक सत्पुरुष असावे. त्या जन्मात एखाद्या योग्याने तुम्हाला ही विद्या शिकवली असावी. बहुतेक तुमची साधना अर्धवट राहिली असावी. परिणामतः या जन्मात अंतर्मनावर तुमचा पाहिजे तसा ताबा राहत नाही. त्यामुळे नकळत झोपेत असतांना, तुम्ही तुमच्या वायुरूप शरीरासोबत बाहेर फिरून येता. त्यावेळेस इतरांना मात्र तुम्ही प्रत्यक्ष देहरूपाने वावरत आहात असा भास होतो".
सर्वच फार अनाकलनीय अन विलक्षण होते.
याचा अर्थ माझ्या स्वप्नात येणाऱ्या इतरही व्यक्ती व ठिकाणं कुठेतरी अस्तित्वात असण्याची दाट शक्यता होती - - - - - -
- - - - - - - - बस पुण्याला पोचली. भविष्यात लवकरच परत भेटण्याचे ठरवून एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही आपापल्या ठिकाणी मार्गस्थ झालो.
आठ दिवसांनी मी नागपूरला परतलो.
असाच १२ जुलै २०१९ च्या रात्री मी अतिशय गाढ झोपेच्या स्वाधीन झालो. पहाटे पहाटे धप्पकन समोरच्या पोर्चमध्ये पेपर टाकल्याचा आवाज झाला. तडक दार उघडून मी पेपर उचलला.
सोमवार, तारीख २२ जुलै २०१९ चा तो पेपर होता.
समोरच्याच पानावर माझ्या स्वप्नातल्या 'त्याच' हवेलीचा फोटो पाहून मी स्तंभितच झालो.
"विदर्भ व आसपास पुराचे थैमान! 'पाचोळा' गावातील ऐतिहासिक हवेलीचा हिस्सा कोसळून दोन व्यक्ती ठार! गावात घरांची पडझड". अशी बातमी होती. बाजूलाच 'इनसेट'मध्ये पांढऱ्या कपड्याने झाकलेले दोन मृतदेहांचे फोटोही होते.
ते पाहून मला खडबडून जाग आली. भानावर आलो. प्रत्यक्षात आज जुलैची २२ तारिख नसून १३ तारिख होती.
म्हणजेच २२ तारखेला छापल्या जाणारी ती बातमी मला आधीच १३ तारखेला स्वप्नात दिसली होती. अघटितच!
तोंडावर पाणी मारून मी लगेचच शांतारामजींना फोन केला. भेट घेऊन त्यांना स्वप्नातला तपशील सांगितला.
"आत्म्याला स्थळ आणि काळाचे बंधन नसते म्हणतात. शक्य आहे, तुमचा आत्मा तुमच्या वायुरूप शरीराने भविष्यातल्या २२ तारखेचा पेपर वाचून, इकडे वर्तमानात १३ तारखेच्या सकाळी परत आला". शांतरामजी म्हणाले.
"याचा अर्थ हवेलीवर संकट येणार होते. नियतीने मला होणाऱ्या घटनेची आगावू कल्पना दिली होती. नियतीचा त्यामागे काही उद्देश तर नसावा! जणू काही जन्म-जन्मांतरीचा संबंध असावा इतकी ओढ असणाऱ्या हवेलीतल्या त्या दोघांना आता आपण वाचवायला हवे". मी शांतारामजींना सुचविले.
काही वेळ ते विचारमग्न झाले.
"त्याचे असे आहे समीर, मानवाचा जन्म, विवाह, संतती आणि मृत्यू हे नियतीने आधीच ठरविले असते. कितीही योग-साधना केली तरी मानव त्या प्रारब्धात काहीही ढवळाढवळ किंवा बदल करू शकत नाही". शांतारामजी उद्गारले.
"ते जरी खरे असले, तरी श्रीकृष्णाने गीतेत प्रत्यक्ष सांगितले आहे, आलेल्या परिस्थितीत आपल्या बुद्धी व चेतनेचा वापर करून आपले नैतिक कर्तव्य पार पाडणे हाच मानवतेचा धर्म आहे".
"कदाचित, येणाऱ्या संकटकाळी आपणच त्या दोघांच्या रक्षणासाठी धावून जावे असेच त्या स्वप्नाद्वारे नियतीला सुचवावयाचे असेल". मी म्हणालो.
हो-ना करत शांतारामजी तयार झाले.
२१ तारखेला आधल्या रात्रीच तिकडे निघायचे ठरले.
२१ तारीख उजाडली. दिवसभर हवा साफ होती. साधा पाऊसशी नव्हता. निघायला रात्रच झाली. शांतारामजींच्या गाडीने आम्ही निघालो. गावाची लोकेशन कळावी म्हणून बसचाच मार्ग आम्ही पत्करला. चिखलीनंतर केव्हांतरी ती पाऊलवाट होती. वाटेत पाऊस सुरू झाला. शांतारामजींनी गाडी सावकाश घेतली. एकाएकी विजांच्या चमचमाटासोबत वादळी वारा जोर धरू लागला. पहाटेच्या सुमारास दुरूनच ती चहाची बंद टपरी दृष्टीस पडली. साईडला गाडी थांबली. पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. पेपरातली वादळाची न्युज खरी ठरू पहात होती.
नाईलाजाने पावसातच आम्ही पाऊलवाट पकडली. त्या बंगल्याजवळ आलो. वादळी पावसाचा जोर वाढला. वादळाने हा जुनाट बंगला कधीही ढासळू शकत होता. वेळ कमी होता. अनुचित घटना घडण्याआधी दोघांना बाहेर काढणे भाग होते. आमचे प्रयत्न सार्थकी लागायला हवे. नियतीचे फासे मला बदलायचे होते.
मोठाले वृक्ष उन्मळून पडतील की काय असे वाटत होते. पळतच आम्ही लाकडी जिन्याकडे धावलो. जोरजोरात आम्ही दाराची कडी वाजवली. दार उघडल्याबरोबर, "खाली चला" म्हणत धावतच मी आईंना अक्षरशः उचलले आणि जिन्याकडे धावत सुटलो. काही कळायच्या आतच शांतरामजींनी भाईंना ओढतच जिन्यावरून खाली आणले. आमचे पाय जमिनीला लागत नाहीत तोच धाडकन लाकडी जिना कोसळला. पडवीतल्या व्हरांड्याच्या दाराची कडी काढून आधी मी आईंना सुरक्षित आत नेले. कोपऱ्यातली चटई अंथरून आम्ही दोघांना तीवर बसवले.
शेवटी नियतीवर मात करून दोन प्राण वाचविल्याचा आनंद व्यक्त करायलाही आमच्याकडे वेळ नव्हता. शांतरामजींकडे मी फक्त एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला. निसर्गाने रौद्र रूप धारण करण्याचे आत आम्हाला ते गाव सोडणे भाग होते. आम्हाला परत जायचे होते. भाईंना आपुलकीचे एक स्मित देऊन, कृतकृत्य होवून आम्ही माउलीला नमस्कार करत धावतच बाहेर पडलो. कसेबसे हायवेवर कारपर्यंत येऊन पोचलो. कार सुरू व्हायचे नाव घेईना. अंगात थोडी उब यावी म्हणून सोबत आणलेले टोस्ट आणि डोनट खाल्ले. पाणी प्यायलो.
एवढ्यातच गावाच्या दिशेने वाहणारे पाणी, जे मघाशी गावकऱ्यांच्या गुडघ्यापर्यंत पोचले होते, ते आता कंबरेच्याही वर गेलेले दिसत होते. मी थबकलो. पाण्याची पातळी आणखी वाढली तर पाणी बंगल्याच्या व्हरांड्यात शिरू शकते.
"दोघांना बंगल्यातच सोडून आपण चूक तर नाही ना केली? येणाऱ्या संकटाची भाई व आईंना अजिबात चाहूल नसणार! ते निर्धास्तपणे तिथेच बसून असतील. त्यांना धोका न होवो". मी शांतारामजींकडे शंका व्यक्त केली.
तडकच आम्ही पुन्हा हवेलीकडे धूम ठोकली. थोडक्याकरता मोहीम फेल व्हायला नको. अचानकच जोराने एक अवाढव्य लाट हायवेकडून आली. आम्ही दोघे फेकल्या गेलो. सावरायची संधी मिळायच्या आतच पाण्याच्या प्रवाहाने आम्हाला लोळवले. थंडगार शिरशिरी अंगातून सळसळत गेली. जिन्याचे लाकडी अवशेष अंगावरून वाहात गेले. संपूर्ण अंग खरचटून निघाले. बर्फासारख्या थंडगार पाण्याने अंग थिजून गेलं. निसरड्या चिखलासोबत वाहत आलेल्या काटेरी फांद्या शरीरभर टोचल्या. नाकातोंडात पाणी शिरलं. गारठ्याने थरथरत्या शरीरास ग्लानी आली. काळच थांबल्यासारखा झाला. संवेदना बधीर झाल्या.
देवाचे नाव घेऊन, प्राण पणाला लावून एकदाचा मी उठलो. शांतारामजींनी माझा हात घट्ट पकडला होता. शरीरास अकस्मात दैवी चेतना मिळाली, बधीर झालेल्या पावलांना गारठा जाणवेनासा झाला. चिखलात अटकलेले काटेही पायास टोचेनासे झालेत. पाठीवर पडणाऱ्या टपोऱ्या थेंबांचा आता मार जाणवत नव्हता. इकडे पाणी पडवीत शिरत होते. कसेही करून भाईंना, आईंना सुरक्षित बाहेर काढायचे एवढेच लक्ष होते.
तितक्यात चहा-टपरीवरची आरशाची चौकट चिखलात न्हाऊन वाहत आली. मी ती उचलून पडवीत ठेवली. पण त्यात मला प्रतिबिंब मात्र दिसले नाही. आरसा फुटला वाटतं. अपशकूनच!
बाजूने चार तरुण पोरं पाण्यातून वाट काढत गावाकडे जात होते. मदतीसाठी म्हणून त्यांना आम्ही हाका मारू लागलो. त्यांनी आमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. कडुनिंबाच्या झाडाकडे चिखलात दोन प्रेतं वाहत आल्याचं त्यांच्या बोलण्यातून कानावर पडलं. छातीत धस्स झालं. विश्वास बसेना. आमची सगळीच धावपळ पाण्यात गेली म्हणायची! अरेरे! नियतीने मला स्वप्नात सूचना देऊनही केवढी घोडचूक घडली होती आमच्या हातून. शेवटी नियतीने डाव साधलाच कि काय! वेळ निघून गेली होती.
खिन्न मनाने आम्ही निंबाच्या झाडाकडे धावत निघालो. चार लोकं जमली होती. पोलीस इन्स्पेक्टर रिपोर्ट लिहीत होता. दबकतच आम्ही दोघे झाडाजवळ चिखलात गेलो. हिम्मत करून, जवळ जाऊन एक कटाक्ष टाकला. दोनही मृतदेहांवर पांढरा कपडा टाकलेला होता. तितक्यात न्युज चॅनेलचा वार्ताहर कॅमेरा घेऊन आला. क्षणभर हवालदाराने कपडा बाजूला केला. माझ्या छातीतून एक जीवघेणी कळ उठली. आकाशाकडे भेसूर नजरेने एकटक बघणारे ते दोन प्रेतं आमचेच दोघांचे होते!