Prakash Bokare

Inspirational Others

4  

Prakash Bokare

Inspirational Others

मायना

मायना

7 mins
187


    सन १९७०. वर्ग सातवा अ. दोन दिवस शाळा बुडवल्याने माझा पत्रलेखनाचा पिरियड मिस झाला होता. मायना, समास, परिच्छेद, प्रेषक, ता क, या शब्दांचे अर्थ मला कळले नव्हते. वार्षिक परीक्षेची अॅन्सरशीट सबमिट करतांना सरांची बोलणी खावी लागली होती. परीक्षा संपली तरी मनाला हीच रुखरुख लागून राहिली होती.

    उन्हाळ्याची सुट्टी लागली. सुट्टीत एन्जॉय करायला मावशीकडे पुण्याला आलो. दुपारी भाड्याने सायकल घेऊन पुण्यात हिंडायला मला खूप आवडत असे. असाच एकदा पर्वतीपर्यंत गेलो. खाली सायकल लॉक केली. वर गेलो. घरून निघतांना मावशी मला खर्चाला पन्नास-साठ पैसे देत असे. त्यातून मी टोस्ट आणले होते. पुडक्यातून ते काढून मी खाणार तितक्यात माझ्या लक्षात आले, थोड्या अंतरावरून एक चार-पाच वर्षाची मुलगी माझ्या टोस्टकडे दिनवाण्या नजरेने पहात होती. एका मोठ्या दगडावर नऊवारी पातळ नेसलेली, मोठं कुंकू लावलेली एक अशिक्षित बाई चिंताग्रस्त बसलेली होती. तिच्या कडेवर एक शेंबड पोर आणि जवळ ही मुलगी. कपडे मळलेले. तिचा चेहराच सांगत होता ती दोन दिवसापासून भुकेली असेल. तिला डावलून ते टोस्ट माझ्याने खाववेना. मी त्या मुलीजवळ गेलो. तिच्या हातात दोन टोस्ट दिले. तिने त्यावर झडपच मारली. बाकी मी तिच्या आईला देऊन टाकले. संकोचत तिने ते घेतले, त्यातूनही त्यातलं एक मला परत केलं, खा म्हणाली. ताईचे ओठ हलतांना पाहून कडेवरचं उपाशी पोर चुळबुळ करू लागलं. आईने पदराच्या टोकात एक टोस्ट बांधला, तो एका दगडाने ठेचून त्याची पावडर केली. चिमटीने ती पावडर त्या चिमुकल्याच्या जिभेवर भरविली. बराच वेळ चिऊ-काऊचा घास भरविणे सुरु होते. दरम्यान क्षीण आवाजात त्या माउलीने माझ्यातल्या बालमनाला समजेल अशा शब्दात थोडक्यात तिची आपबिती सांगितली. 

    तिचं नाव होतं मंदा. तिचा नवरा गजानन. तो चौकीदारी करत असे. इतक्यात त्याच्या 'पिण्या'मुळे दोघा नवरा-बायकोत खटके उडू लागले होते. त्याचं पर्यवसन टोकाच्या भांडणात होऊन रागाच्या भरात त्याने हिला हाकलून दिले होते. एका गठुड्यात चार कपडे, दोन भांडी घेऊन ही निघून आली होती. गेल्या काही महिन्यांपासून नाईलाजाने, कधी भीक मागून तर कधी मिळेल ते काम करून ती दोन जीवांची भूक भागवत होती. 

    माझ्या लक्षात आलं, एवढ्या मोठ्या पुणे शहरात सगळेच धावपळीत! तिचं दुःख कोण ऐकणार? अनायसे आज या निवांत ठिकाणी मी, एक शाळकरी पोर, तिला सापडलो होतो आपलं मन हलकं करायला. त्या ही लहान वयात कधी मधी वर्तमानपत्रातल्या जाहीर-नोटीसा माझ्या नजरेखालून गेलेल्या होत्या. त्यामुळे तिच्या कहाणीतल्या 'दुसरा घर-ठाव' 'सोडचिठ्ठी' 'उजर' असल्या शब्दांचा थोडाफार अर्थबोध होऊन माझे कोवळे मन विचलित झाले. तिच्या मुलांची मला काळजी वाटू लागली. तिच्यासाठी आता काहीतरी केले पाहिजे असे माझ्या बालमनाने ठरवले. उद्या याच ठिकाणी भेटायचे ठरवून मी तिचा निरोप घेतला.

    घरी माझं डोकं चालेना. त्या माऊलीसाठी मी करावे तरी काय! फार तर मावशीने दिलेल्या पन्नास पैशाचा खाऊ घेवून तिच्या लहानग्यांना देईन. पण त्याने तिच्या पोटापाण्याचा, कपड्यालत्त्याचा, निवाऱ्याचा प्रश्न सुटत नव्हता. घरी मावशीचा सल्ला घेण्याची सोय नव्हती. "तू काय जगाची गरिबी दूर करणार काय!" म्हणून तिने मला उडवून लावले असते. रात्रभर तोच विचार! 

    पुण्यात पान-टपरी, डेली नीड्स अशा छोट्या दुकानांत पोस्टाची स्टेशनरी मिळते हे मला माहीत होते. दुसऱ्या दिवशी मी एका पान-टपरीवर इनलँड-लेटर विकत घेतले. छोट्या मावस बहिणीच्या दप्तरातून एक सहा इंची स्केल, एक शिस-पेन्सिल घेतली. सायकल चालवत दुसऱ्या दिवशी मी त्या बाईला भेटायला गेलो. पोरांसाठी मी काही किडूक मिडूक आणेन या आशेने माउली माझी वाटच पहात होती. आज मी पुरेसे टोस्ट आणले होते.

    सुरवातीला माझा प्लान काही केल्या तिला पटेना. कारण तिला लिहिता वाचता येत नव्हतं. पण घराबाहेरचं जग तिने पाहिलं नसल्याने तिच्याकडे पर्याय नव्हता. शेवटी माझा उपाय करून पाहण्यास ती तयार झाली. आपला नवरा कुठे काम करतो हे तिला माहीत होते. 

    देवळाच्या पाळीवर बसून मी सोबत आणलेल्या इनलँड-लेटरवर आधी स्केलच्या मदतीने पेन्सिलने आडव्या रेघा मारल्या. कल्पना केली की सौ मंदा तिच्या नवऱ्याला पत्र लिहिते आहे. अडाणी असल्यामुळे तिने आयुष्यात कधी पत्रच लिहिले नव्हते. ती मला मजकूर सांगेना, आणि माझ्या अपरिपक्व मनाला ती झेप घेता येईना. आधीच मला पत्राचा 'मायना' काय असतो माहीत नव्हते. आता माझ्या पत्र-लेखनाची खरी परीक्षा होती. जशी जमेल तशी तिच्याच भाषेत मी सुरवात केली.

            दि --/--/१९७०

     मंदाचे पती 

     गजाननराव यांस मंदाचा 

     नमस्कार

 तुम्ही तीन महिन्यांपूर्वी मला  लेकरा-बाळांसह घरून हाकलून  दिलं. तवांपासून पोरांचे लई हाल  हायेत. मनू व गुड्डूचे पोट भरत नाही. अंगावरचे कपडे फाटून गेले हायेत. माझ्यावरचा राग पोरांवर कशापायी? मनू रोज इचारते घरी कधी जायाचं. लहाना गुड्डू बारीक झाला आहे. आई का बरं खाऊ  घालत नाही हे त्याला कळत  नाही. तुम्ही दुसरा घरठाव  केल्यावर लेकरं उपाशी राहातील. म्हणून मी तुमची फिर्याद इकडं पोलीस ठेसनला केली आहे. 

 लेकरं मोठी व्हतीन त म्हनतील  बाप दारूपायी जेलात गेला. याउपर तुमची मर्जी. मी इथं  पर्वतीपाशी राह्यते. आठ दिसात मला न्यायला आले न्हाई तर  गोखले नगरातून दिगू फुलवाला मला नांदवायास तयार हाय. 

जेलात काळजी घेजा.

                सौ मंदा

            पर्वतीवर, पुणे       

पत्रावर तिने सांगितलेला गजाननचा पत्ता टाकला.

    To

     श्री गजानन चौकीदार

     रेणुका बिल्डिंग, 

     अप्पा बळवंत चौक 

               पुणे

    लिहिलेलं पत्र मी तिला वाचून दाखवलं. बंद करून जिभेने चिकटवलं. ती ते पोस्टाच्या डब्यात टाकणार याची मला खात्री होती. त्यात अर्थातच दिगू फुलवाला हा काल्पनिक होता.

    मनूचे हाल मला पाहवत नव्हते. म्हणून तिसऱ्या दिवशी टोस्ट पोचवल्यानंतर मी गजाननच्या पत्त्यावर गेलो. रेणुका बिल्डिंगखाली, पार्किंग मध्ये पाच-सहा टारगट तरुणांचा मटक्याचा, जुगाराचा अड्डा होता. खाटेवर पत्ते, सिगारेट्स आणि दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता. विन्या नावाचा कसलेल्या शरीराचा एक दादा त्यांचा म्होरक्या होता. त्याने गजाननशी भेट करून दिली. बायकोलाच न जुमानणाऱ्या गजाननपुढे माझा काय टिकाव लागणार! मंदाचे नाव घेतल्याबरोबर त्याने मला पिटाळून लावले.

    दोन-तीन दिवस मला सायकल मिळाली नाही. नंतर माझा परत जाण्याचाच दिवस उजाडला. पुढे ते पत्र गजाननला मिळालं का? मंदाचं काय झालं? कळायला मार्ग नव्हता.

    कालांतराने मी माझे शिक्षण, माझी सर्व्हिस, संसार यात हा प्रसंग विसरूनही गेलो. 

    सन २०००. कंपनीच्या मीटिंग करता पुण्याला आलो. मीटिंगनंतर दुसऱ्या दिवशी सर्व सहकारी मिळून लक्ष्मी रोडला शॉपिंग, हिंडणे-फिरणे झाले. एकमेकांचा निरोप घेतल्या गेला. परत निघालो. इतक्यात माझं लक्ष रस्त्यावरच्या बोर्डवर गेलं. अप्पा बळवंत चौक कडे --> ! कित्येक वर्षांनी मंदा, मनू यांची आठवण झाली. त्या मंदाचं पुढे काय झालं असेल? गजानन कुठे असेल? पावलं घुटमळायला लागली.

    मी अप्पा बळवंत चौकात आलो. हिम्मत करून एक चहा-टपरिवाला गाठला. विन्यादादा हल्ली लॉटरीचे तिकिटे विकतो म्हणून समजलं. मी त्याचं फुटपाथवरचं दुकान शोधलं. एकेकाळचा धडधाकट शरीराचा विन्यादादा आता साठी उलटून थकला होता. त्याच्याकडे गजाननची चौकशी केली. त्याला आश्चर्य वाटले. जुगाराच्या अड्ड्यावर दादाने गजाननचा ठावठिकाणा विचारला. कोथरूड गावच्या बस-स्टँडमागे 'साई-कृपा' बंगल्यावर, गॅस एजन्सी समोर, तो वॉचमनचं काम करतो म्हणून समजलं. दादाने सांगितल्याप्रमाणे मी सिटी बसने कोथरुडला आलो. शिवाजी पुतळ्याजवळ चौकशी करून आलिशान बंगल्यासमोर उभा झालो. बंगल्याला कुलूप होतं. पोर्चमधलं कुत्र भुंकू लागलं. बंगल्याच्या आवारात एक मोठं टिनाचं झोपडीवजा सर्व्हन्ट क्वार्टर होतं. समोर साध्या साडीतली साधारण पस्तीस वर्षांची, कडेवर मूल असलेली, नीटनेटकी, गोंडस चेहऱ्याची तरुणी उभी होती. सावळा रंग, सरळ नाक, कपाळावर केसांच्या बटा, चेहऱ्यावर समाधान, मागे वेणी. 

    "कोण हवंय?" म्हणून तिने विचारले. माझं लक्ष तिच्या हनुवटीखाली गळ्यावरच्या तीळाकडे गेलं. होय! मनुच होती ती. तिने मला न ओळखणं स्वाभाविक होतं. सत्तर साली फारच लहान होती ती.

    "मंदा मावशीचं हेच घर का?" मी विचारलं. झोपडीत जाऊन तिनं आवाज दिला. पांढऱ्या केसांची नऊ-वारीतली वयस्क बाई बाहेर आली. 

    "तुम्ही मला ओळखलं नसेल, तीस वर्षांपूर्वी आपण पर्वतीवर भेटलो होतो"--- मी.

    फाटकाजवळ येऊन तिने माझा चेहरा न्याहाळला. क्षणभर गोंधळली.

    "पर्वतीवर - - - - - बाई बाई बाई, वळखीलं व वळखीलं, दादाsss आरं तुला कसं विसरेन मी! किती मोठा झाला रं बाबा तू! मोठाच साह्यब झालेला दिसतो तू तर, ये बाबा आत ये."

    गेट उघडून ती मला टिनाच्या घरात आत घेऊन गेली. प्लास्टिकच्या खुर्चीवर तोल सावरत मी बसलो. जुनाट खाटेवर, सुरकुतलेल्या चेहऱ्याचा, गाल खोल गेलेला, म्हातारपणाकडे झुकलेला गजानन, खोकल्याची उबळ आवरत बसला होता. त्याच्या कानाजवळ मंदा मावशी काहीतरी पुटपुटली. तो केविलवाणा हसला.

    "तवां लेकराच्या रुपात देवासारखा धावून आला दादा तू, माझा मोडलेला संसार पुन्हा उभा केला. तंवा इवलेशे लेकरं घेऊन कुठं गेली असती बाबा मी!" -- मंदा मावशी.

    "मी अशी अडाणी. गरिबाचं कुणी वाली नसतं. तू एवढसं पोर असून तुझं चित्त पाघळलं. थोरा मोठ्याचं चाललं नसतं इतकं डोकं चालविलस. एका पत्रानं लई उपकार केेलस रं तू आमच्यावर." पाणावलेल्या डोळ्यानं ती बोलत होती.

    "शिकल्या सवरल्या शिवाय का एवढी अक्कल येते! म्हणूनच माझ्या दोन्ही पोरांना शिकविलं बघा मी." 

    याचा अर्थ माझ्या पत्राचा तीर निषाणावर लागला होता तर! खऱ्या अर्थाने मी पत्र-लेखनात पास झालो होतो. पत्रातला मायना मला जमला होता, हे मला इतक्या वर्षांनी समजलं. मोडलेलं घरटं मी सावरलं होतं. मला आंतरिक समाधान वाटलं.

    मनूला आताशी आर्थिक विवंचना नसावीे. तिचा चेहरा समाधानी दिसत होता. आईच्या संभाषणावरून मनूने आता मला ओळखले होते. तिच्या बोलक्या डोळ्यात जिव्हाळ्याची, कौतुकाची झाक ओसंडत होती. ती गॅसवर चहा मांडू लागली.

    "ही मनू, दहावी पास केली हीनं. दापोडीला हिची सासुरवाडी हाय. नवरा नगर पालिकेत हाय. चार दिसाकरता माहेरी आलीे हाय. गुड्डू आय टी आय झाला, इथं वनाज मध्ये काम करतो". मंदा मावशीला कौतुकाने काय सांगू काय नाही असे झाले होते.

    तितक्यात मंदा मावशी खाटेखालची ट्रंक ओढून त्यात काहीतरी शोधू लागली. माझा चहा पिऊन झाला, तसे पॉलिथिनच्या पुंगळीतून तिनं चुरगळलेलं ते ऐतिहासिक पत्र काढून गहिवरून माझ्यासमोर धरलं. एखादा मौल्यवान ठेवा सांभाळावा तसेे तिने ते पत्र अजूनही जतन करून ठेवले होते. माझं अंतःकरण उचंबळून आलं. 

    नियतीचे खेळ किती अनाकलनीय असतात पहा! त्या कुटुंबाशी माझा काहीही संबंध नसतांना मला त्या मुलांविषयी तेव्हां इतकी दया काय यावी! इतक्या कोवळ्या वयात ती पत्राची कल्पना काय सुचावी! पत्र कसलं! जणू नोटिसच होती ती. जणू या कुटुंबाशी माझं फार जिव्हाळ्याचं अतूट नातं आहे या कल्पनेने मला त्यांच्याबद्दल जास्तच आत्मीयता वाटू लागली. 

    "कोण कुठला तू दादा, देवासारखा आमच्या मदतीला धावला, आम्ही तुला नाव बी नाही विचारलं. आता जेऊनच जा, थोड्या वेळात गुड्डू येईलच!" म्हणून मंदा मावशी मला थांबण्याचा आग्रह करू लागली. मी थांबू शकत नव्हतो. रात्रीची ट्रॅव्हल मला पकडायची होती. 

    "बरं आहे, पुन्हा कधी भेटू असेच" म्हणत मी समाधानाने तिघांचाही निरोप घेऊ लागलो. तिथूनच मी रस्त्यावरच्या ऑटोला हात दाखवला. फाटकाशी ऑटो थांबली.

    तशी आतापर्यंत रोखून धरलेला मनुच्या मनाचा बांध आता फुटला. धावतच येऊन तिनी माझे हात हातात घेतले. "तेव्हां त्या टोस्टची मला फार गरज होती हो दादा - - - - - - - -" म्हणत हुंदके देऊन ती रडू लागली. 

    " - - - - - - - - - - "

    आता मात्र मला निघायलाच हवे होते. ऑटोत बसून न आवरणारे अश्रू मला लपवायचे होते.


Rate this content
Log in

More marathi story from Prakash Bokare

Similar marathi story from Inspirational