Atul Shirude

Drama

3  

Atul Shirude

Drama

निवडणूक ज्वर

निवडणूक ज्वर

4 mins
203


   बलरामवाडी नामक एक छोटेसे, टुमदार गाव असते.गाव अतिशय स्वच्छ, सुंदर असल्याने त्यास आदर्श तसेच स्वच्छ गावाचा पुरस्कार मिळालेला असतो.गावात अमर आणि अभय असे दोन जिवलग मित्र राहात असतात. दोघांचीही घरे जवळ-जवळ असल्याने दोघांमध्ये लहान असल्यापासूनचं छान गट्टी जमलेली असते.दोघांचेही पदवीपर्यंत शिक्षण झाले असल्यामुळे दोघेही जवळचं असलेल्या तालुक्याच्या गावी पर्वतनगर येथे दोन वेगळ्या खाजगी पतसंस्थांमध्ये नोकरी करत असतात. 

     अमरकडे दुचाकी असल्याने दोघेही नोकरीच्या ठिकाणी सकाळी बरोबर जात व संध्याकाळी बरोबरचं घरी येत. दोघेही रोज बरोबर जात-येत असल्याने जीवनातील सुखदु:खे एकमेकाला सांगत व एकमेकाला गरजेनुसार मदतही करत असत. अशा प्रकारे दोघांचेही व्यवस्थित चाललेले असते.म्हणतात नां नियती कधी परिस्थितीस बदलवेल सांगता येत नाही. अगदी तसेचं या दोघा जिवलग मित्रांच्या बाबतीत घडते.

     त्या वर्षी विधानसभेची निवडणूक जाहीर झाली होती. नामांकित पक्षांचे उमेदवार तसेच अनेक अपक्ष उमेदवार आपापले उमेदवारी अर्ज मोठा गाजावाजा करुन भरत होते. पर्वतनगर विधानसभा मतदारसंघातून दणकटराव टांगमोडे व बलवंतराव पोटझोडे हे दोघे दोन वेगळ्या नामांकित राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळवतात व लागलीच छान मुहूर्त बघून आपापला उमेदवारी अर्ज मोठे शक्तीप्रदर्शन करुन भरतात. पतसंस्थेतल्या कामानिमित्त अमरचे दणकटरावांशी तर अभयचे बलवंतरावांशी नेहमी संबंध येत असतात.अनायसेचं दोघाही उमेदवारांना अमर आणि अभयच्या रुपाने कार्यकर्तेकम मतदार मिळतात. दोघाही उमेदवारांनी मग अमर आणि अभय यांना आग्रहाने प्रचारास नेले. बघता-बघता मग अमर आणि अभय अनुक्रमे दणकटरावांचे अन् बलवंतरावांचे कट्टर प्रचारक, समर्थक बनले. दोघांनीही मग आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आपापल्या पतसंस्थांमध्ये १५-१५ दिवसांची सुट्टी टाकली.

     आता दोघेही आपापल्या उमेदवाराच्या प्रचारात इतके व्यस्त झालेत की, त्यांना समोरील उमेदवार, त्यांचे समर्थक, कार्यकर्ते ही सारीचं आपली शत्रु वाटू लागली. त्याचा परिणाम असा झाला की, ती दोघेही आता आपली जिवलग मैत्री विसरुन एकमेकांना अगदी कट्टर शत्रु मानायला लागलीत. हो आणि मग त्यांचा एकमेकांशी असलेला संवाद एकदमचं बंद झाला, त्यांचे बरोबर कुठंही जाणे आता बंद झाले,एकमेकांना आपल्या समस्या सांगणे बंद झाले, परिणामी एकमेकांना आपापसात होत असलेले सहकार्य बंद झाले.

     एव्हाना निवडणूक ऐन रंगात आली होती अन् त्याचबरोबर ही दोघेही एकमेकांची कट्टर शत्रु झाली होतीे. अशातचं मग एक दिवशी दोन्ही उमेवारांची प्रचारफेरी तालुक्यातील एका गावातल्या चौकात अचानकपणे समोरासमोर आली. दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी आपापल्या नेत्याच्या समर्थनार्थ उत्साहाने घोषणा दिल्या.त्यातुनच मग वादाची ठिणगी पडली. बघता-बघता हाणामारी सुरु झाली. अशातचं मग अभयची विरुद्ध पक्षातल्या म्हणजेच अमर समर्थक असलेल्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांशी शाब्दिक बाचाबाची व त्यानंतर ज़ोरदार मारामारी झाली. दणकटराव समर्थक पाच कार्यकर्त्यांनी अभयला खुप धोपटले. इतके सारे समोर घडत असतांना अमर समोर असतांनाही केवळ राजकीय विरोधापोटी तो आपला जिवलग मित्र अभयला वाचवायला पुढे आला नाही की, त्यांच्याच पक्ष्याच्या कार्यकर्त्यांना आवरायला पुढे आला नाही. अशा प्रकारे राजकीय विरोधातुन दोघांमधील दरी वाढतचं चालली होती दोघांनाही या गोष्टीचा मनस्ताप जरुर होत होता. दोघांनाही होत असलेले तोटे, नुकसान दिसत होते परंतु माघार घेऊन स्वतः बोलायला सुरुवात करायला कुणीच तयार नव्हते. 

     अशा प्रकारे मग आठ-दहा दिवस जातात, मतदान मोठ्या उत्साहात पार पडते.सगळीच आता निकालाची आतुरतेने वाट पहात असतात.तीन दिवसानंतर निकाल लागतो. दणकटराव केवळ एक हजार मतांच्या फरकाने बलवंतरावांवर विजय मिळवतात व आमदार होतात. लागलीच मग दणकटरावांची फुलांनी सजविलेल्या उघड्या गाडीतून शहरातल्या मुख्य रस्त्यावर मिरवणूक निघते. नवनिर्वाचित आमदार दणकटराव साऱ्या मतदारांचे,नागरीकांचे ह्रदयापासून आभार मानतात. अमरही आपला उमेदवार निवडून आला या खुषीत मिरवणूकीत सामील होतो व आनंदात बेभान होऊन नाचतो. इकडे मात्र बलवंतराव मातब्बर असुनही पराभूत झाल्याने ते स्वतः, त्यांचे समर्थक, कार्यकर्ते विशेषतः अभय खुप नाराज, दु:खी होतात. याच दरम्यान एक गोष्ट चांगली घडली ती म्हणजे स्वतः बलवंतराव याही परिस्थितीत पराभव खुल्या मनाने स्वीकारतात व विजयी उमेदवार आमदार दणकटरावांना आमदारकीच्या पुढील प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा देतात. आणखी पुढे जाऊन बलवंतराव आपल्या समर्थकांना,कार्यकर्त्यांना 'हार- जीत होतच राहते' असे म्हणून पराभवाच्या धक्क्यातून बाहेर येत शांतता राखण्याचे आवाहन करतात.अभय मात्र तरीही खुप नाराज होतो. आपला आवडता नेता पराभूत झाल्याचे त्याला जरा जास्तच दु:ख होते. त्याला सुरुवातीचे काही दिवस जेवणही रुचकर लागत नाही, त्याचे कुठल्याही गोष्टीत मनही रमत नाही. 

     अशा प्रकारे दणकटरावांच्या विजयामुळे अमर खुश तर बलवंतरावांच्या पराभवामुळे अभय दु:खी होतो. अशातच मग काही दिवस जातात, विजयी, पराभूत उमेदवारांसह सारी मंडळी निवडणूकीच्या रणधुमाळीतून बाहेर येत आपापल्या दैनंदिन कामाला लागते. दणकटराव आमदारकीची शपथ घेण्यासाठी मुंबई येथील विधानभवन गाठतात तर पराभूत उमेदवार बलवंतराव पराभवाच्या दु:खातून बाहेर येत स्वतः स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेत तसेच साखर कारखान्यात लक्ष गुंतवतात. इकडे अमर आणि अभयही आपापल्या पतसंस्थेच्या नोकऱ्यांमध्ये रमतात मात्र दोघांमध्ये निवडणूकीच्या दरम्यान निर्माण झालेली दरी तशीच असते. ती दोघेही एकमेकांशी साधी बोलतही नाहीत की पहिल्यासारखे बरोबर एकाच गाडीवर नोकरीच्या ठिकाणी जातही नाहीत.दोघेही एकमेकांची भेटसुद्धा टाळतात. अशा प्रकारे दोघेही अगदी दोन भिन्न टोकांच्या ध्रुवांसारखे झाले होते.दोघांमधील कटुता अगदी पराकोटीस गेलेली होती.

    अशातच अचानक एके दिवशी तेथील नामांकित दैनिकात आमदार दणकटराव व त्यांचे निवडणूकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार बलवंतराव यांचे एका कौटुंबिक कार्यक्रमातील हास्यविनोदाचे छायाचित्र प्रसिद्ध होते. अमर आणि अभय दोघेही दररोज तेचं वर्तमानपत्र वाचत असल्याने दोघेही ते छायाचित्र पाहतात. छायाचित्र पाहून मात्र दोघांच्याही डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. दोघेही विचार करतात की, ज्यांच्यासाठी आम्ही चांगले जिवलग, लहानपणापासुनचे मित्र शत्रु झालो ती दोघे मात एकमेकांशी अगदी मैत्रीने वागताहेत. मग आपणचं का अबोल राहायचे?अशा प्रकारे दोघांच्याही डोक्यात प्रकाश पडल्याने मग दोघेही एकमेकास भेटण्यास तयार होतात. पण बघाना तरीही पुढे जातांना त्यांच्यातला आपणचं का सुरुवात करावी?हा अहंभाव आडवा येत असतो. शेवटी तिसऱ्याच एका मित्राच्या मध्यस्थीने दोघेही भेटतात. समोरासमोर आल्यावर मात्र दोघांनाही राहवत नाही व दोघे एकमेकाला घट्ट मिठी मारतात.भूतकाळातल्या घटना आठवून दोघेही खुप रडतात. हुंदके देतच दोघेही एकमेकाकडून एकचं वचन घेतात की,यापुढे राजकारणासारख्या गोष्टी आपल्या मैत्रीच्या आड येणार नाहीत,आपण त्या मध्ये येऊ द्यायच्या नाहीत.अशा प्रकारे दोघेही हसत-हसत आपसातला दुरावा मिटवतात. दोघांचेही संबंध सुरळीत झाल्याने तिसरा मित्र त्यांचा आनंदाने निरोप घेतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama