निरपेक्ष प्रेम
निरपेक्ष प्रेम


सुषमा कला शाखेत पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. रंगाने गोरी, प्रमाणबद्ध रेखीव अवयव, काळेभोर लांबसडक केस, गालावर हास्याची उमटणारी खळी, डोळ्यात अंजन, ओठावर लाली, आरक्त गाल एकंदरीत सर्वाना भुरळ पाडेल असे लावण्यवती रूप. तिच्याच वर्गात शिकत असलेला महेश हाही उंचापुरा, सडपातळ, एखाद्या राजपुत्राला शोभेल अशी शरीरयष्टी. या ना त्या कारणाने रोज दोघांची नजरानजर होत असे. प्रेमाचे कटाक्ष टाकले जात असत. त्यात शारीरिक आकर्षणापेक्षा आत्मिक प्रेमाचा ओलावा होता. एकाच उपनगरात दोघेही राहणारे.
सुषमा पुरातन संस्कृतीत वाढलेली त्यामुळे साडी, ब्लॉऊझ, केसात गजरा असा तिचा पेहराव असे. ती कॉलेजमध्ये आली की अनेकांच्या हृदयातील धडधड वाढत असे. अनेक मजनू तिच्या मागावर असत. जितकी रूपवान तितकीच ती कडक स्वभावाची असल्याने तिला न्याहळण्यातच अनेकांचा वेळ कारणी लागत असे. ती पायी चालतच येत असे. महेशचा बेलबॉटम, शर्ट, पायात बूट असा पेहराव असे. तो रोज सायकलवरून येत असे.
शनिवारचा दिवस होता. कॉलेजचा आजचा शेवटचा दिवस होता. आठवड्याभरात परीक्षा सुरू होणार होती. महेशने तिला ग्रंथालयात गाठले. भीतभीतच इंग्रजीच्या नोट्सची मागणी केली. तिने देखील शेजारी या नात्याने फारसे आढेवेढे न घेता त्याला नोट्स देऊ केल्या. महेशच्या मनात ती चांगलीच भरली होती. तिलाही महेशचा स्वभाव आवडला होता. अशी मुलगी आपली आयुष्याची साथीदार असावी अशी अनेकांनी स्वप्ने पहिली होती. त्यात महेश एक होता.
दुसऱ्या दिवशी महेशने तिच्या नोट्स परत केल्या. त्यातच मला तू खूप आवडतेस अशी चिट्ठी द्यायला तो विसरला नाही. तिने ती चिट्ठी वाचली. मूक संमती दर्शविण्यासाठी फक्त त्याच्याकडे पाहून स्मित हास्य केले. काही दिवसानी पुन्हा दोघांची भेट झाली. दोघेही जीवनसाथी होण्यास तयार होते. एके दिवशी दोघांनी ठाम निर्धार करून घरच्यांच्या कानावर ही गोष्ट घातली.
दरम्यान दोघांनाही एकाच कॉलेजवर लेक्चरर म्हणून नोकरी लागली. दोघांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नास संमती दिली. मोठ्या थाटामाटात त्यांचे लग्न झाले. दृष्ट लागावी असा जोडा होता. दोघांनी संसार थाटला. टू बीएचके फ्लॅट घेतला. सुखाचा संसार सुरू झाला. सुषमा इतकी रूपवान होती की सर्वजण तिच्या रूपावर फिदा झालेले होते. रस्त्याने जाताना लोक तिच्याकडे एकटक पहात रहायचे.
असेच काही दिवस गेले. एक दिवस सुषमा स्वयंपाक करीत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. त्यात सुषमा गंभीररीत्या भाजली. तिचा चेहरा भाजल्याने विद्रुप झाला होता. महेशला ही गोष्ट समजली. तो धावतच हॉस्पिटलमध्ये आला. त्याला पाहताच सुषमाला रडू कोसळले. आपल्या सौन्दर्यप्रमाणे आपल्या कुरूपतेवर महेश तेवढेच प्रेम करेल का अशी भीती तिच्या मनात निर्माण झाली. तिच्या एकूणच बदलामुळे महेश खचूनच गेला. एक दिवस तो असाच विचार करत घराकडे निघाला असता त्याला एका वाहनाने ठोकरले. त्याला उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार करणाऱ्या डॉक्टरनी त्याची दृष्टी कदाचित कायमची जाण्याची शक्यता बोलून दाखवली. महेश घरी आला. त्याने आपणास अंधुक दिसत असल्याचे सांगितले. सुषमाचा कुरूप चेहरा त्याला दिसेना. ती पहिल्यासारखी रूपवान असल्याचे समजून तो तिच्यावर तितकेच प्रेम करू लागला.
सुषमा त्या घटनेपासून अधिकच खिन्न झाली. एक दिवस तिची अचानक प्राणज्योत मालवली. महेशला खूप दुःख झाले. तिचा अंत्यसंस्कार पार पडल्यावर महेशने ते गाव सोडून अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मित्रानी त्याला खूप समजावले. तू असा दृष्टिहीन आहेस. आजवर तूझी सुषमाने सेवा केली आता कोण करणार असे त्याच्या मित्रानी विचारले. त्यावर महेशच्या उत्तराने सर्वजण आवक झाले.
महेश म्हणाला मुळात मी दृष्टिहीन नाही. मला चांगले दिसते. सुषमा चे सौंदर्य नष्ट होऊन ती कुरूप झाल्यावर तिला वाईट वाटू नये. तिच्या मनात भलते सलते विचार येऊ नयेत म्हणून मी तिला अंधुक दिसत असल्याचे सांगितले. मला तिची काळजी होती. सौदर्य क्षणिक असते. मला त्याची पुरेपूर जाण आहे. जिने माझ्यावर निस्सीम प्रेम केले तिला क्षणभर देखील वाईट वाटू नये म्हणून मी तिच्याशी दृष्टी कमी झाल्याचे खोटेच बोललो.
त्याच्या या उत्तराने सर्वांचेच डोळे पाणावले. जो तो म्हणू लागला प्रेम असावे तर महेश-सुषमासारखे.