Rajesh Gorivale

Classics

3.7  

Rajesh Gorivale

Classics

निःशब्द मुकं प्रेम

निःशब्द मुकं प्रेम

3 mins
312



      किती गोड नाव होत त्याचं? "मन्या", मन्या म्हणजे आमची लाडाची मनिमाऊ, मांजर. माझ्या आईने आमच्या घरात मांजर पाळली होती. त्यालाच आम्ही "मन्या" म्हणायचो. आई त्याचे खूप लाड करायची पण बाबांना तो मुळीच आवडत नसे, त्यांना त्याचा प्रचंड राग यायचा त्यालाही तस कारण होतं. बाबा जेवायला बसले की नेमका त्यांच्याच ताटात तोंड घालायचा मन्या. आम्हांला तर तो खेळण्यासाठी हवाच होता. आई जेवायला बसली की तिच्यासोबत मन्याही जेवायला बसायचा. मग त्याला त्याच्या ताटात काहीतरी वाढायची. मन्याचा आमच्या घरात मुक्त वावर असायचा. कधी किचनमध्ये, तर कधी खाटेवर लोळत असायचा. आमच्या सर्वांचा लाडका मन्या होता.

     एकदा बाबा जेवायला बसलेले असताना नेमकं मन्याने त्यांच्या ताटात तोंड घातलं. बाबांना राग अनावर झाला ते आईवर चिडले आणि रागारागाने मन्याच्या डोक्यात हातातील पाण्याचा भरलेला तांब्या घातला. आम्ही सर्वजण बाबांचा तो अवतार पाहत होतो. पण बाबांपुढे काय बोलणार?

 घाव वर्मी बसल्याने मन्या काही वेळ निपचित पडून राहिला. ' मेला की काय?' अशी शंका येत असतानाच मन्या अंग झटकून उठून बसला. पण बाबांना खूप घाम सुटला होता कारण आईचं ते लाडकं मांजर होतं अन् मांजर आपल्या हातून मेल्याचं पाप माथी लागेल. मन्या उठून बसलेला पाहून बाबांना हायसे वाटले. पण मन्याला रागात मारलं म्हणून मनात दुःखीही झाले. भले मन्याचा संपूर्ण घरात मुक्त वावर असला तरीही तो नम्र आणि आज्ञाधारक होता. आईचं तो सर्व काही ऐकत असे. आईने बस म्हटलं की तो त्याच्या जागेवर म्हणजे कोपऱ्यात जाऊन बसत असे. आमच्या घरी उंदीर येतंच नसतं कारण उंदीर दिसला कि मन्याने तो मारलाच म्हणून समजा.

     बाबांनी मन्याला मारल्यानंतर मान्य एकदा घर सोडून गेला होता. आम्हा सर्वांना वाटले की गेला असेल कुठेतरी येईल रात्रीपर्यंत घरी पण रात्र झाली तरीही मन्या कुठेच दिसत नव्हता. बाबांनाही खूप वाईट वाटत होतं. आम्ही रात्रभर मन्याचा शोध सुरू केला या गल्लीतून त्या गल्लीत सर्वांकडे विचारपूस करत होतो पण मन्या काही सापडलाच नाही. जरी तो मुका जीव असला तरी त्यालाही काही भावना होत्याच. त्यालाही राग आलाच असणार. त्या दिवसापासून आईचंही मन कुठेच लागतं नव्हतं. ती बाबांनाच दोष देत होती की तुमच्या मारामुळेच मन्या घर सोडून गेला. शेवटी मन्यालाही रहावलं नसेल म्हणून दोन दिवसानंतर मन्या पुन्हा आमच्या घरी आला. आम्हां सर्वांना आनंद झाला होता. बाबांपुढे मन्या निःशब्द भावनेने उभा होता. हे सारं त्याच्या डोळ्यात दिसत होतं. बाबांची आणि त्याची नजरानजर झाली. बाबांनी मन्याला प्रेमाने उचलले आणि जवळ घेतले. त्याच्या अंगावरून हात फिरवू लागले. बाबांच्या हाताला चाटू लागला आणि त्यांच्याशी खेळू लागला.

     मन्याच्या त्या डोळ्यातील भावना पाहून असं वाटत होतं की तो काहीतरी सांगत असवा, मी तुमच्या मनासारखा वागत नाही, तुम्हाला हवं तसं वावरत,वागत नाही म्हणून तुम्ही मला मारता, सतत राग राग करता. मी मुका असलो तरी मलाही भावना आहेतच की, मीही तुमच्यासारखाच सजीव आहे. फक्त प्रेम व्यक्त करताना माझी चूक होते.

     असेच काही दिवस गेल्यानंतर आम्ही आमचे भाड्याचे घर सोडून जाणार होतो. पण मन्याला सोडून कसे जायचं? त्याचं करायचं काय? या विचारात आम्ही सर्वजण होतो. पण मन्याला सोडून जायचं आम्हाला मान्य नव्हतं. जिथे जायचं तिथे मन्या सोबत हवा आणि मन्याही आम्हाला सोडण्यास तयार नव्हता. तेव्हाच दारात बेवारस कुत्री आणि मांजर पकडून नेणारी महानगरपालिकेची गाडी येऊन थांबली. मन्याने घरातील खिडकीतून ती गाडी बघितली. त्याच्या मनात काय आलं कोण जाणे, धावत जाऊन तो गाडीमध्ये बसला. आम्ही सर्वजण थक्कच झालो. सर्वजण एकमेकांकडे पाहू लागलो. बाबा स्वतः उठले आणि गाडीजवळ गेले.

     मन्याला गाडीतून उतरवण्यासाठी बाबा मन्याशी बोलू लागले,"मन्या, अरे इथे गाडीत येऊन का बसलास? ही गाडी बेवारस मंजरांसाठी आहे. तुझ्यासाठी नाही." 

     मन्या बाबांकडे डोळ्यातील भावनेने बोलत होता,"मला माहितेय...! पण मला जावच लागेल आता. तुम्ही हे घर सोडून चाललात आणि मलाही नेणार नाही. मग मी येथे थांबून काय करू?"

     आम्हालाही कसेतरीच वाटत होते. मग बाबाच म्हणाले,"अरे मन्या आम्ही हे घर सोडतोय तुला नाही, तुही आमचा घरचा सदस्य आहेस तू आमच्या सोबत चल. तुला आम्ही कुठेही सोडणार नाही." बाबांचे वाक्य पूर्ण होते न होतेच,मन्याने गाडीतून टुणकन उडी मारली आणि त्याच्या कोपऱ्यात गप्प जाऊन बसला. आम्ही सर्वजण एकमेकांकडे पाहत मन्याच्या या कृतीकडे पाहून हसत राहिलो.

     ही कथा खूप काही सांगून जाते.

     जीव मुका असला तरी त्यांनाही भावना असतात. जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो, तेव्हा ते स्वतःला आणि समोरच्याला बरं वाटावं म्हणून नसावं. तर मनाने निःशब्द प्रेम करावे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics