नातं
नातं
नात्यामध्ये बरेचदा अस घडत की एखाद्या व्यक्तीशी नातं तुम्हाला हवं असत, तुम्ही त्यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन नात जोपासायचा प्रयत्न करता, पण समोरून मात्र असा प्रयत्न तर सोडाच पण तुमची साधी दखलही घेतली जात नाही.
मग मात्र तुमचं मन नाराज होत, राग यायला लागतो. *"मी इतक नात जोपासायचा प्रयत्न करतोय/करतेय पण त्याच काहीच वाटत नाही." मग कधी समोरच्या व्यक्तीचा राग तर कधी स्वतःचाच राग. आणि एकूणच मग नकारात्मक विचारांची सुरवात.* ह्याचा परिणाम आयुष्यातल्या इतर घटकांवर, माणसांवर, नात्यांवर आणि मुख्य म्हणजे स्वतःवरच होत असतो. जगण्यातलं समाधान, आनंद हरवून जातो आणि उरतात फक्त ऊसासे आणि खेद.
मग काय करायच? नाती नकोच का ? कोणाशी जोडलेपण नको आणि नाकारलं जाणं पण नको? तर नाही अस काहीच न करता समोरच्याच वेगळेपण स्वीकारायच आणि मग ठरवायच आपल्याला नातं कसं ठेवायच आहे ते.
एक अगदी कटू असलं तरी सत्य आहे की माणसाच्या मनात तुम्हाला जर जागा निर्माण करायची असेल तर तुमची वागणं, जीव लावणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतातच पण सगळ्यात महत्त्वाचं असत ते त्या माणसाला तुम्हाला त्याच्या मनात स्थान द्यायच आहे की नाही? आणि हाच मुख्य मुद्दा नेहमीच निसटून जातो आणि सुरू होतो अपेक्षांचा खेळ.
*दोन माणसं आपआपल्या ठिकाणी कितीही चांगली असतील तरीही त्यांचं एकमेकांबरोबर पटलच पाहीजे असा नियम नाहीये. तुम्हाला हव्याश्या वाटणाऱ्या माणसाला तुम्ही पण हवेसे वाटलाच पाहीजेत हा पण नियम नाहीये कुठेच. तुम्हि तुमच्या वागण्याने त्याच्या मनात जागा मिळवायचे प्रयत्न करू शकता पण त्याला तशी जबरदस्ती नाही करू शकत.*
मग अश्यावेळी होणाऱ्या वेदनांच काय करायच? बरेचदा मैत्री किंवा नातं तोडणं आपल्या स्वतःसाठी शक्य नसतं, आपला उर्जेचा स्रोत असते ती व्यक्ती. *अश्यावेळी त्याच वेगळेपणं स्विकारायचं. एकदा का हे वेगळेपणं स्विकारलं की आपल्यापसमोर दोन पर्याय येतात एक तर आठवणींच गाठोडं बांधून त्या नात्याचा दिवा गंगेवर सोडायचा आणि आयुष्याचं हे वळण पार करून पुढे सरकायचं. दुसरा पर्याय म्हणजे आहे ते आणि आहे तसं नात/ मैत्री स्विकारायची. समोरच्याला गरज आहे अस जाणवलं की मदत करायची आणि निरपेक्ष भावनेने गरज संपली की बाजूला सरकायचं. फारश्या अपेक्षा ह्या नात्यात ठेवायच्या नाहीत. मान्य आहे की हे इतक सोप्प सहज नाही, पण स्वतःच्या समाधानासाठी आणि आनंदासाठी मुख्यत्वे सकारात्मक जगण्यासाठी हे असं वागणं गरजेचं असतं.*
आपण कोणाच्याही मनात त्याच्या इच्छेशिवाय जागा निर्माण करू शकतच नाही हे सत्य स्वीकारायच.... बस इतकच....

