Suresh Kulkarni

Tragedy Inspirational

4.0  

Suresh Kulkarni

Tragedy Inspirational

नाना!

नाना!

8 mins
372


"पंडित, आहेस का घरात?" सक्काळी सहा वाजता, नाना गेट बाहेरून तार स्वरात ओरडले. हा म्हातारा कोंबड्यापेक्षाही लवकर उठतो. कधी का उठेना. पण माझ्या गेटसमोर येऊन बांग देतो! माझे शुभांगी आणि वामांगी शेजारी माझ्या नावाने बोंबलतात!


"अहो, त्या नानाला जरा सांगा न, सकाळी सकाळी असे भेसूर ओरडत नका जाऊ म्हणून? ते तुम्हाला आवाज देतात पण, आमची झोपमोड होते ना?" शेजारचे कांतराव एकदा मला म्हणाले.


"अहो, मी हजारदा सांगितलं. ऐकत नाहीत! 'मी माझ्या तोंडाने बोंबलतो! इतरांना काय करायचंय? कोण्या हरामखोराला त्रास होतो? आण माझ्या समोर! का? तूच इतरांच्या नावानं हे मला सुनावतोस?' असं मलाच म्हणाले! तुम्ही स्वतःच का सांगत नाहीत?"


"नको रे, बाबा!! तो दूर आहे तेच बरं आहे! त्याला बोलायचं म्हणजे, पतल्या शेणावर दगड मारून, आपल्याच अंगावर शिंतोडे उडवून घेण्यासारखं आहे!! तुमचा दोस्त आहे, तुम्हीच सांभाळा!" कांतरावांनी शरणागती पत्करली. 


खरं तर, या 'सकाळच्या अलार्म'ला मीच जबाबदार आहे! एकदा सकाळी, नानाला माझ्या घरासमोरच्या जास्वंदीचे फुल तोडताना पाहिलं. घर भाड्याचं आहे तरी, घरासमोर मी, चारसहा फुलांची झाडं जोपासली आहेत. त्या दिवशी काय मला काय अवदसा सुचली कोणास ठाऊक? त्यांच्यावर उखडलो.


"नाना, आम्ही इतके कष्ट करून झाड वाढवतो, खत पाणी देतो. अन तूम्ही फुलांची मलाई घेऊन जाता, याला काय अर्थ आहे?!"


"मग? त्याला काय होतंय? तुझ्या फुलाचा, मी काय, माझ्या टकलाला गजरा करून, घालून फिरतोय काय? देवासाठीच तर फुल घेतोय!"


"माझ्या घरी पण देव आहेत!"


"असू देत! सगळ्या चराचरात देव असतो! तुझा देव आन माझा देव एकच आहे! माझ्या देवाला फुलं वाहिली की तुझ्या देवाला मिळतील! अन, एक टमरेल भर पाणी झाडाला घातल्याची, काय मिजाज सांगतोस? मी काय तो शेपूटघाल्या कांतू वाटलो कि काय, तुझं काहीही ऐकून घ्यायला?"


विनाकारण कांतरावला नाना हिणवून गेले. बोलता बोलता असं पाणी उडवायची त्यांना सवय आहे! हे नाना म्हणजे मोठं कठीण प्रकरण!


"अहो, देवाला न्यायचीत तर न्या की... पण विचारण्याची काही पद्धत आहे का नाही?"


"असे का? आज घेतलीत. आता विचारून उपयोग नाही! उद्यापासून विचारीत जाईन."


नानाची बोलती बंद केल्याचा अर्थात मला आनंद झाला. पण नाना डाम्बिस निघाले. त्या दिवशीपासून पहाटेच 'पंडित, जागा आहेस का?' म्हणून जोरकस हाळी मारू लागले! फुलाचा बहर संपला तरी, त्यांची हाळी बंद झाली नाही! 'आज फुलंच नाहीत. म्हणून घेता आली नाहीत! तरी तुला सांगायला पाहिजे ना? म्हणून हाक मारली!' मलाच सुनवतात!


नाना म्हणजे, बहात्तरीतले (खरंतर तो 'शुकबहात्तरीत'च आहे!), आख्या अळीने ओवाळून, 'टाकायचं कुठं?' या प्रश्नाला उत्तर नसल्याने, आळीतच ठेवलेले, एक (सद?)गृहस्थ! त्यांचा मुलगा गोपीनाथ, एकदम मऊ माणूस! बापाची तक्रार कोणी घेऊन आला तर हात जोडून उभा राहतो. 


"देवा! नाना चुकीचं वागतात! त्यांच्या वतीने मी माफी मागतो. वय झालंय. पूर्वी असे नव्हते. मी एकुलता एक, माझ्याशिवाय ते कोठे जातील? आणि मी तरी त्यांना कोठे सोडू? तुम्ही समजदार आहेत, थोडं समजून घ्याल तर बरे होईल!" तक्रार करणारा काय बोलणार?


हे खरे आहे. नानांचं जिभेवर नियंत्रण नाही. काय तोंडाला येईल ते बोलतात. पण म्हणून मोकळ्या मनाचे नाहीत. मोठा आतल्या गाठीचा अन खुन्नसबाज माणूस! अशा तिरसट माणसानं माझ्याशी मैत्री का करावी? आणि ती का टिकावी? हे एक कोडंच आहे. 


नाना म्हणजे, एक ड्राय फ्रुटचं मिनी स्टोर आहेत! चेहरा एका मोठ्या जर्दाळूसारखा, विशेषतः ते लोंबते गाल आणि रंग. खारकेच्या अठोळीसारखं चकचकीत, आणि टोकदार नाक! बाकी सगळीकडं सुरकुत्या असतील पण नाकावर एकही नाही! बोटाची पेर सुकल्या खारकाच! डोळे बदामी, आकारानं आणि रंगानं सुद्धा. काही बदाम खऊट असावेत, ते त्यांच्या बोलण्यात मुरलेत!


'पंडित!' हा, त्यांनी मला बहाल केलेला 'किताब' आहे! कारण मी लॅपटॉपवरची काहीकाही माहिती त्यांना ऐकवत असतो! मला याच नावाने मला हाक मारतात. त्यात थोडासा कुचकटपणा असतोच.


"काय नाना? आज गाड्यावर वडा पाव? एकटेच खाताय? मला देणार नाहीत?" मला एकदा ते 'बजरंग वडा'च्या गाड्यावर दिसले. मी त्यांची गंमत करण्यासाठी म्हणालो. 


"कोण? पंडित? ये, ये! आता तुला वडा 'नाही' म्हणून कसं चालंल? यानंतर, मला चहा तूच पाजणार ना?"


"वा! म्हणजे, तुम्ही वडापावची किंमत वसूल करणार?"


"बेवकूफ! मुळीच नाही! कारण वड्याचेसुद्धा तुलाच पैसे द्यावे लागणार आहेत! मी आधी एक वडा खाला आहे. माझी पेन्शन संपली! पैसे नाहीत माझ्या जवळ!" 


"पैसे नाहीत? मग कशाला खाताय बाहेरचं?"


"मग काय करू? गोप्याच्या बायकोने आज काही केलं नाही! माहेरी गेली. मला भूक लागली होती! गोप्या बाहेरगावी गेलाय! चहा सांगतोस ना?" 


नाना असेच आहे. तिरसटपणाचा बुरखा फाटून कधीकधी त्यांची आगतिकता चमकून जाते. 


"नाना, तुमचं काय वय असेल?" मी विषय बदलला.


"मी न? बहात्तरिचा! पण बघ, कसा ठणठणीत आहे? तुझ्या सारखं कुबड चालावं लागत नाही! अन तुला चष्मा कधीपासून लागलाय?"


"नाना, अहो वाचायला लागतो. खूप दिवस झाले वापरतोय. तुम्हाला नाही लागत?"


"छट! मला त्याची गरजच पडत नाही! कारण मी वाचतच नाही!"


पण हे खोटं आहे. नानांनी वाचायचं का सोडलं? याची कहाणी मला, त्यांनीच सांगितली आहे! ते आता ओळख दाखवणार नाहीत! एकदा नानाच्या चष्म्याची एक टांग तुटली. त्यांनी गोप्याला नवीन चष्मा घेण्यास सांगितले. नाना दोरी बांधून वापरू लागले. गोप्याची बायको, तिने एकदा, तो दोरीवाला चष्मा चपलेखाली तुडवला. कारण 'तुझी बायको मला, चारचा चहा सहापर्यंत देत नाही!' अशी तक्रार त्यांनी गोप्याजवळ केली होती!


एके दिवशी मी दुपारी लोळत होतो. साडेचारचा सुमार असावा.


"पंडित, काय करतोस?" नाना दारात उभा. 


"नाना! सालं, सुट्टीचं पण आराम करू देत नाहीत."


"आराम हराम असतो! तू करतोस? का मी करू?"


"काय?"


"चहा!"


"का? तुमच्या घरी चहा संपला का?"


"नाही! गोप्याची बायको, मला उकळल्या पत्तीचा चहा देते! म्हणून आलो! तुझ्याकडे रेड लेबल चहा असतो ना!"


"बसा, करतो!"


मी चहा केला. त्यात अंमळ साखर जरा ज्यास्तच घातली. नानाची फार मोठी अपेक्षा नसते. सोबत मारीचे काही बिस्किटे बशीत ठेवली. 


त्यांनी अधाशासारखा चहाचा पहिला घोट घेतला.


"वा! पंडित! फक्कड चहा झालाय! साखर काय भाव झालिय?" मी समजलो साखर ज्यास्त झाली. 


"नाना, त्या सोबत बिस्किटे घ्या. म्हणजे चहा फार गोड लागणार नाही."


"पंडित! हि मारीची बिस्किटे म्हणजे, खपटाचे तुकडे! चव ना ढव! कुत्र्यापुढे टाकले तर, ते सुद्धा तोंड लावणार नाही! पण, तू काळजी करू नकोस! मी माझा 'पार्ले-जी' सोबत आणलाय!" त्यांनी खिशातून बिस्किटाचा पुडा काढला. मी समोर बसल्याची दखल न घेता एकट्यानेच खाऊन टाकला!


माझी बदली झाली. मी निघालो. नाना भेटायला आले. 


"पंडित! आता मी एकटा पडणार बघ! मला काय भेट देणार?" हे नानाचं डोकं! बदली माझी झाली, मला गिफ्ट देण्याऐवजी, मलाच मागत होते.


"काय देऊ?"


"चार सहा पोस्ट कार्ड दे! तुझी आठवण आली तर पत्र लिहीन!"


"नाना, फोन करा कि, त्या पेक्षा."


"मग! मोबाईल घेऊन दे!" मोबाईल त्यांच्यापर्यंत, गोपाळची बायको येऊ देणार नव्हती, ही त्यांची अडचण होती!

मी डझनभर पोस्ट कार्ड त्यांना आणून दिली. 

००० 

नवीन ब्रान्चला जॉईन झालो. चार-सहा महिन्यांनी, 'येऊन जा.' हे एकच वाक्य लिहलेले, नानाचे पत्र आले. त्यांनी भेटण्याचा पत्ता दिला होता. तो वाचून काळजात चर्रर्र झाले. तो एका वृद्धाश्रमाचा होता! खरे तर असं काही होईल असा माझा होरा होताच. नाना पडतं घेणार नाहीत, आणि गोपाळची बायको (हिला नानांनी कधी 'सुनबाई' म्हटल्याचे मला तरी आठवत नाही. कारण गोपाळचे लव्ह मॅरेज!) तर म्हाताऱ्याला झटकून दूर करायच्याच मागे होती. म्हणजे नानाच तसे सगळ्यांना सांगत. मी शनिवार रविवार गाठून गाडी काढली.


नानाचा वृद्धाश्रम झकास होता. टापटीप स्वच्छता होती. मी आधी मॅनेजरच्या ऑफिसमध्ये गेलो नानांची चौकशी केली. त्यांचा खोली क्रमांक घेतला. 


"काय नाना कसे आहेत? बाकी हे मात्र मस्त झालं. इथे बरोबरीची मंडळी आहे. छान सोबत मिळाली तुम्हाला. कसं वाटतंय इथं? करमतं ना येथे?" मी विचारले. 


"करमायला, इथं काय कॅबरे असतो की काय? अन सोबतीच म्हणशील तर, येथे येणाऱ्या प्रत्यकाने आपापल्या 'आठवणी' सोबत आणल्यात! बाकी सोबतीची आम्हाला गरज पडत नाही! ते, तुझ्या फेसबुकमधलं नको बरळूस! नाव जरी 'वृद्धाश्रम' असलं तरी, हे म्हाताऱ्याचं 'अनाथ आश्रमच' असतं! अरे आम्हाला, तुम्हा पोरांसोबत राहायचं असतं! पोरं सोबत नसतील तर, 'घर' काय अन 'आश्रम' काय दोन्ही सारखेच! काही फरक नाही!"


नानाच्या आवाजात पूर्वीचा जोर नव्हता. ते खूप थकल्यासारखे पण दिसत होते. 


"पण, नाना इथं कसे आलात?"


"काय करू? इलाज नव्हता! गोप्याची बायको, उगाच खुचपट काढून भांडली. 'एक तर मी या घरात राहीन नाहीतर नाना रहातील! त्यांना वृद्धाश्रमात ठेव!' तिनं गोप्याला अल्टीमेटम दिला! तो का कू करू लागला. तर म्हणते कशी? ' काय होतं त्या वृद्धाश्रमात न राहायला? मी नाही का माझ्या पिंट्याला, डे केयरमध्ये ठेवते! मी पोटच्या पोराला ठेवते, तसं तुही तुझ्या बापाला ठेव!'"


"बाप रे! बरंच रामायण झाल्यासारखं दिसतंय!"


"तर? रामायणचं झालं, आता माझा वनवास सुरु झालाय! तर काय सांगत होतो? डे केयर! मी म्हणालो, 'ठेव तुझ्या पोराला, अनाथ आश्रमात! अन जात जा शनिवार-रविवार भेटायला! करतेस?' मग तिनं भोकाड पसरलं! मलाच गोप्याची गोची बघवेना. आलो झालं इथं!"


"नाना, अशात काय आजारी-बिजारी होतात कि काय?"


"नाही रे! ते दवाखान्यातून आल्या पासून जरा थकवा वाटतोय!"


"दवाखाना?"


"अरे काही नाही. पंचविशीतला जवान पोरगा! दारूनं लिव्हर, पार गोवरीच्या खांडासारखं झालं होत! माझ्या लिव्हरचा थोडा भाग डोनेट केला! आता तो माझ्या लिव्हरच्या जोरावर पुन्हा दारू पीत असेल! माझ्या लिव्हरलापण व्हिस्कीची चव कळेल!"


"नाना! तुम्ही लिव्हर डोनेट केलंत!"


"हो! ते माझ्या मालकीचं होतं! मी वाढवलेलं!"


"गोपूला माहित होतं? काही म्हणाला नाही?"


"गोप्याला खूप वाईट वाटलं! कारण मी फुकटच दिलं, पैसे घेतले नाहीत म्हणून! म्हणून माझ्यावर रागावला! ते राहू दे. माझ्यासाठी काही आणलंस का गोप्यासारखा हात हलवत आलास? गोप्या, खरंतर मायाळू आहे रे, पण बायकोच्या नादानं बिघडलाय!"


मी सोबत आणलेली शाल त्यांच्या खांद्यावर घातली. 


"नाना, त्या बाकीच्या शाली तुमच्या हातानी तुमच्या मित्रांना द्या!"


नानांनी मी आणलेल्या शाली इतर आश्रमवासीयांना वाटल्या. माझ्या 'पंडित'न आणल्यात म्हणून आवर्जून सांगत होते. मी त्यांच्या उत्साहाकडे, डोळेभरून पहात होतो! सोबत थोडे सामोसे आणि केळी नेल्या होत्या. आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचेही वाटप केले.


"पंडित! एक विचारू?"


नाना खरं तर असं कधी 'विचारू?'च्या भानगडीत पडत नाहीत. कारण तो त्यांचा स्वभाव नाही. 


"बोला कि नाना, अशी औपचारिक भाषा का वापरताय?"


"पंडित! माझं आयुष्य कारकुनीतच गेलं. कोट आमच्या खांद्याला लागण्याची सूतराम शक्यता नव्हती आणि आता नाहीही. पण कोटाची हौस ----" माझ्या कोटाकडे पहात म्हणाले.


मी पटकन माझा कोट काढला त्यांच्या हाती दिला. 


"मला! मी घेऊन टाकू?" त्यांच्या डोळ्यात एका लहान मुलाची अविश्वसनीयता होती. 


मी मानेनेच होकार दिला. त्यांनी लगबगीने तो अंगात घातला. 


"पंडित, तुमचं काय म्हणतात ते, मोबाईवर काढून घे! आपल्या दोघांचा फोटो!"


मी मोबाईल काढला. आमच्या दोघांचा एक सेल्फी काढून घेतला. काय वाटले कोणास ठाऊक? त्यांनी कोट माझ्याकडे परत केला. 


"असू देत नाना!"


"पंडित, नाही झेपायचे ते कोटाचे ओझे माझ्या खांद्याला!"


आश्रमाच्या जवळ एक फोटो स्टुडिओ होता. तेथे मी आमच्या फोटोची प्रिंट काढून घेतली. त्याच्याकडचीच एक फ्रेम विकत घेतली. परत आश्रमात आलो अन तो फ्रेम केलेला फोटो नानाला दिला. त्यांचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडत होता.


"माझा कोटातला फोटो!" ते स्वतःशीच पुट्पुले.


त्यांनी तो आपल्या पलंगाजवळच्या छोट्या टेबलवर ठेवून दिला. आणि पलंगावर बसले. फोटोकडे पाहात.


"नाना, आता मी निघतो. काही लागलं तर काळवा. सारखं नाही पण, जमेल तस चक्कर मारत जाईन. तसेही गोपाळची चक्कर होत असेलच ना?"


"हो! कालच येऊन गेला! पेन्शन खात्याच्या चेकवर सही घेऊन गेला! महिन्यातून एकदा असते त्याची चक्कर!"


"नाना, उशीर झालाय. मी येऊ?"


नाना पलंगावरून उठले. माझ्या गळ्याला घट्ट मिठी मारली. खूप वेळ. जिवंत माणूस कधी न पहिल्यासारखी! तसंही त्यांना मिठी मारणार किंवा त्यांना मिठीत घेणार होत तरी कोण? किती दिवसांनी, कि वर्षांनी असा प्रसंग त्यांच्या जीवनात आला असावा, देव जाणे! ती मिठी, माझ्या साठी निःशब्द आशीर्वाद होता! काही बोलले नाहीत. माझ्याकडे पाठ फिरवून बसले. मी आश्रमाबाहेर पडलो. 

०००

नानाचे या जगातले वास्तव्य संपले. ते गेल्याचं कळलं. आतल्या आत काहीतरी तुटलं. डोळे भरून आले. माझे कोण होते? माझ्यात आपुलकीचा ओलावा शोधत आलेला एक माणूस. मी जमेल तस ंतो देण्याचा केलेला प्रयत्न! मनात घर करून गेले नाना. कायमच!


काही दिवसांनी ऑफिसच्या कामासाठी आलो होतो. मुद्दाम गोपाळला भेटायला गेलो. 'दुःखात सहभागी' असल्याची औपचारिकता आटोपली. घराबाहेर पडताना, माझी नजर, तेथे टीव्ही शोकेसवर ठेवलेल्या फोटो फ्रेमवर गेली. ती तीच होती जी मी नानाला, आमचा सेल्फी फ्रेम करून दिलेली होती! त्यात आता गोपाळ आणि त्याच्या बायकोचा फोटो होता!


गोपाळला बापाच्या फोटो पेक्षा, फोटोची फ्रेमच आवडली असावी! 


ही जग रहाटीच आहे, उपयोगी वस्तू ठेवून घेतात! त्याला गोपाळने तरी का अपवाद असावं?


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy