मृगजळ
मृगजळ
त्या दिवशी प्रतिभाला एका तरूणाचा चुकून धक्का लागला असता प्रतिभाला वाटलं त्या तरूणानं आपल्याला जाणुनबुजून धक्का दिला असावा म्हणून प्रतिभा रागावून त्याला म्हणाली, ‘काय रे! आंधळा आहेस का? दिसत नाही का? की जाणुनबुजून धक्का मारतोस?’ त्यावर तो तरूण रागावून म्हणाला, तू काय स्वतःला महाराणी समजतेस काय? तसं असेल तर रिक्षाने किंवा टॅक्सीने जात जा! त्या तरूणाचा तो सडेतोडपणा पाहून प्रतिभा किंचित मनात घाबरली आणि काही न बोलता गप्प उभी राहिली. प्रतिभा ज्या बसस्टॉपवर उतरली त्याच बसस्टॉपवर तोही उतरला. प्रतिभाला वाटलं की हा आता नक्कीच आपल्याला काहीतरी बोलणार पण तो तरूण काही न बोलता तिच्याकडे पहात गालात मंद स्मित करत पुढे निघून गेला. तसा तो तरूण दिसायला बऱ्यापैकी सुंदर असल्यामुळे प्रतिभाला भावला होता पण त्याच्या उद्धटपणामुळे तिच्या मनात त्याच्याबद्दल द्वेष निर्माण झाला होता. यापूर्वी कोणत्याही तरूणानं तिचा इतका मोठा अपमान केला नव्हता. त्या दिवशी खऱ्या अर्थानं त्या तरूणामुळे प्रतिभाचा इगो दुखावला होता.
त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रतिभानं त्याच तरूणाला बसस्टॉपवर उभा असताना पाहिलं आणि तिच्या मनात अहंकारी विचार थैमान घालू लागले. नकळत तिच्या मनात विचार आला याने आपला अपमान केलाय त्या अपमानाचा बदला आपण नक्कीच घ्यायचा पण! थोडया वेगळया मार्गाने ज्याची कल्पना त्याने स्वप्नातही केली नसेल. बसस्टॉपवर बस येताच तो तरूण बसमध्ये चढला आणि खिडकीशेजारी जाऊन बसला. प्रतिभा हळूच त्याच्या शेजारी जाऊन बसली. ते पाहून त्या तरूणाला आश्चर्य वाटलं आणि नकळत त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला की काल मी हिचा इतका मोठा अपमान केला आणि आज ही माझ्या शेजारी कशी काय येऊन बसली? काल झाल्या प्रकाराबद्दल हिचा आज तर वचपा काढायचा विचार नाही ना? आता तोही मनात थोडा घाबरला आणि तिच्याकडे न पाहता खिडकीतून बाहेर पहात राहिला. त्यानंतर सतत चार-पाच दिवस प्रतिभा त्याची वाट पहात बसस्टॉपवर उभी रहायची. तो बसमध्ये चढून सीटवर जाऊन बसला की ती ही निमूट जाऊन त्याच्या शेजारी बसायची. त्याला हे कळत नव्हतं की ती हे सारं का करतेय. त्याबद्दल स्पष्ट विचारावं असा विचार त्याच्या मनात येत होता पण काही केल्या त्याची हिंमत होत नव्हती.
एक दिवस प्रतिभाने बसमध्ये तिकिट काढण्याकरिता शंभर रूपये सुट्टे आहेत का म्हणून त्यालाच विचारणा केली असता तो नाही म्हणाला. पण कंडक्टर जवळ येताच त्याने दोघांचीही तिकीट काढून एक तिकीट तिच्या हातात दिल्यावर त्याचे आभार मानताना गालात गोड हसत त्याला तुम्ही कोठे कामाला आहात? तुमचं शिक्षण किती झालंय? तुमच्या घरी कोण कोण आहेत इ. प्रश्न विचारले. तिच्या प्रश्नाला उत्तर देत तो म्हणाला, मी एका खासगी कारखान्यात कामाला आहे. माझं शिक्षण फक्त सातवीपर्यंत झाल आहे आणि माझ्या घरात माझ्या व्यतिरिक्त माझे आई, वडील, दोन भाऊ आणि एक बहीण आहे. त्यानंतर तिला प्रश्न केला तुम्ही काय करता? त्याच्या प्रश्नाला उत्तर देत प्रतिभा म्हणाली, मी बी. ए. च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. प्रतिभाच्या उत्तरावर छान! म्हणत तो गप्प बसला.
त्यानंतर प्रतिभा त्या तरूणाला रोजच भेटू लागली. इकडच्या तिकडच्या गप्पा मारतामारता त्याच्या हृदयाशी खेळू लागली. एका क्षणाला तो आपल्या प्रेमात पडलाय याची जाणीव झाल्यावर प्रतिभाने त्याला झुरविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती त्याला एक दिवसाआड करून भेटू लागली. एक-दोन महिन्यानंतर ती त्याला आठवड्यातून एकदाच भेटू लागली. त्यानं त्याचं कारण विचारलं असता घरातून निघायला उशीर होतो म्हणून ती वेळ मारून नेऊ लागली. प्रतिभाच्या प्रेमात अखंड बुडालेला तो तरूण तिला भेटण्यासाठी कासावीस होत. बसस्टॉपवर तिची वाट पाहात उभा राहायचा. त्याला अशा अवस्थेत पाहून प्रतिभा मनात जाम खुश व्हायची आणि आतुरतेने त्या क्षणाची वाट पाहायची. जेव्हा तो तिच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव मांडेल आणि क्षणाचाही विचार न करता ती त्याच्या हृदयाचे हजारो तुकडे करून तिच्या अपमानाचा बदला घेईल. प्रतिभा ज्या क्षणाची आतुरतेने वाट पहात होती तो क्षण लवकरच जवळ आला. एक दिवस त्या तरूणानं तिच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव मांडला असता ती म्हणाली, ‘आपल्या मैत्रीचा तू असा चुकीचा अर्थ घेशील असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. अरे! तुझ्यासारख्या सातवी शिकलेल्या मुलाच्या प्रेमात मी पडेनच कशी? तू असा विचार केलासच कसा? अरे मी एक मृगजळ आहे. सारेच ज्या मृगजळामागे धावत असतात. मृगजळामागे धावणारे धावून धावून आपले प्राण गमावून बसतात पण मृगजळ काही केल्या त्यांच्या हाती लागत नाही. माझ्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव मांडून तू माझी मैत्रीही गमावली आहेस यापुढे तू मला भेटण्याचा किंवा माझ्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करू नकोस.
त्यानंतर जवळजवळ वर्षभरानंतर त्या तरूणाला पुन्हा पाहिलं ते ही बसमध्ये. पण त्यानं तिला पाहिलं नव्हतं. बसमध्ये त्याच्या शेजारी त्याचा एक मित्रही बसला होता. त्या दोघांमध्ये होणारं संभाषण चक्क इंग्रजीमध्ये होतं. ते ऐकून प्रतिभा मनातल्या मनात म्हणाली, सातवी शिकलेल्याला इतकी चांगली इंग्रजी कशी काय बोलता येते. कदाचित तो इंग्रजी माध्यमातून शिकला असेल असं स्वतःला समजावत ती तिचा बसस्टॉप येताच बसमधून उतरून चालू लागली. चालताना पुन्हा त्याच्याशी बोलण्याची तीव्र इच्छा तिच्या मनात निर्माण झाली कारण तिचा बदला पूर्ण होताच जेव्हा तिने शांतपणे विचार केला तेव्हा ती खरोखरच त्याच्या प्रेमात पडली आहे याची तिला जाणिव झाली होती. पण ती जाणीव व्यक्त करण्याची संधी त्यानं तिला दिली नाही. त्या दिवसानंतर तो तिला आज पहिल्यांदा दिसला होता तेही मित्राबरोबर. दुसऱ्या दिवशी ती त्याची वाट पहात बसस्टॉपवर उभी राहिली. तो आला पण त्याच्याबरोबर प्रतिभाचीच नीलम नावाची एक मैत्रीण गप्पा मारत येत होती. तेव्हा मात्र त्यानं तिला पाहिलं पण! पाहून न पाहिल्यासारखं केलं.
नीलमनं जवळ जाऊन प्रतिभाशी हाय! हॅलो! केलं आणि त्या तरूणाशी तिची ओळख करून देत ती म्हणाली, ‘हा माझा भाऊ विजय जाधव! ज्याच्या कथा आणि कवितांची वही मी तुला वाचायला दिली होती जी वाचून तू त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होतीस. तोच हा परवाच गावाहून मुंबईला आलाय अगं! जवळजवळ वर्षभर गावी राहून तो तिथल्या जीवनपद्धतीचा अभ्यास करत होता.’ ते ऐकून प्रतिभा क्षणभर चक्रावून गेली पण! स्वतःला सावरत तिने विजयला हॅलो ! करण्याकरता हात पुढे केला. विजयनेही तिच्या हातात हात मिळविला पण काही बोलला नाही. इतक्यात बस आल्यावर तिघंही लगबगीने बसमध्ये चढले. विजयबरोबर बोलणं तिला काही शक्य नव्हतं. प्रतिभाचा बसस्टॉप जवळ येताच प्रतिभा त्या दोघांना बाय करत बसमधून खाली उतरली. त्या रात्री प्रतिभाला काही केल्या झोप येत नव्हती. राहून- राहून ती स्वतःलाच दोष देत होती आणि म्हणत होती, ‘ज्याला फक्त एकदाच भेटण्यासाठी कित्येकजण आतूर असतात तो माझ्या इतक्या जवळ होता आणि मी तयाला ओळखू शकले नाही, खरंच मी स्वतःला त्याच्यासमोर मृगजळ म्हटलं तेव्हा तो नक्कीच मनातल्या मनात हसला असेल, मृगजळ कधीच कुणाच्या हाती लागत नाही पण विजयच्या रूपाने ते माझ्या हाती लागलं होतं जे मला सांभाळता आलं नाही.
त्यानंतर एक दिवस विजयला एकटं गाठून प्रतिभानं त्याला विचारलं की तुम्ही माझ्याबरोबर खोटं का बोललात? तिच्या प्रश्नाला उत्तर न देता विजयनेच उलट तिलाच प्रश्न केला तू माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक का केलंस? त्यावर प्रतिभा म्हणाली, ‘मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा होता म्हणून! पण जर त्या दिवशी मी तुमच्या प्रेमाचा स्वीकार केला असता तर तुम्ही काय केलं असतं?’ तिच्या या प्रश्नाला उत्तर देत विजय म्हणाला, ‘तसं तू काही करणार नाहीस याची मला खात्री होती.’ मी एक लेखक आहे. माणसाच्या मनात काय चाललंय हे त्याच्या चेहरा पाहून मी ओळखू शकतो. तुझा अपमान करूनही दुसऱ्या दिवशी तू जेव्हा माझ्या शेजारी बसलीस तेव्हाच मी ओळखलं की तुझ्या मनात काहीतरी शिजतंय म्हणूनच मी तुला सतत भासवत राहिलो की मी तुझ्या प्रेमात पडलोय... मी तुझ्या प्रेमात पार बुडालोय अशी तुझी पक्की खात्री झाल्यावर मी तुझ्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव मांडला आणि तेच झालं जे मला अपेक्षित होतं.
आणि हो ! मी जरी एक कवी / लेखक असलो तरी कोणाच्याही प्रेमात पडण्याइतका मुर्ख नाही. तू नीलमची मैत्रिण आहेस हे मला सुरवातीलाच माहीत होतं. पण आपल्या भेटीची सुरवात एका भांडणानं झाल्यामुळे हे सारं घडत गेलं अर्थात मी घडवत गेलो. पण आता मात्र माझी एक नवीन कथा आकार घेईल ज्या कथेची नायिका तू आणि नायक मी असेन. पण त्या कथेच नाव काय ठेवणार? या प्रतिभाच्या प्रश्नाला हसत उत्तर देत तो म्हणाला, ‘मृगजळ’ जे कधीच कोणाच्या हाती लागत नाही...

