Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Niranjan Niranjan

Tragedy Others


3  

Niranjan Niranjan

Tragedy Others


मोठ्या मनाचा माणूस - भाग एक

मोठ्या मनाचा माणूस - भाग एक

13 mins 836 13 mins 836

सकाळची वेळ होती. अंबाबाईच्या मंदीराबाहेर नेहमीप्रमाणेच आजही दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग होती. मंदीराच्या दारात उभे असलेले पोलीस हातात मेटल डिटेक्टर घेऊन भाविकांची तपासणी करण्यात मग्न होते. हारतुरे वाले, मिठाई, पूजेचं साहित्य विकणारे तसेच शोभेच्या वस्तूंचे विक्रेते नुकतेच आपली दुकानं उघडून बसले होते. काही दुकानात सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी झाली होती तर काही दुकानदार अजूनही भवानीच्या प्रतिक्षेत होते. आजूबाजूला बरीच चमकणारी तुळतुळीत डोकी दिसत होती. प्रथेप्रमाणे बरेच भाविक तिरूपती बालाजीचं दर्शन घेऊन मग अंबाबार्इच्या दर्शनासाठी कोल्हापूरात येत असत. त्यामुळे अंबाबाईच्या देवळाभोवतीचा परिसर कायमच पर्यटकांनी गजबजलेला असे.

मंदीर म्हंटल की भिकारीही आलेच. मंदीरा बाहेरच एका ओळीत भिकारी बसले होते. वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या आकाराचे, लुळे पांगळे, आंधळे तर काही चांगले धडधाकट सुद्धा होते. प्रत्येकजण मोठमोठ्याने ओरडत होता. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांकडे भीक मागत होता. त्यांच्यात जणू भिक मागायची स्पर्धाच सुरू होती. राजूही त्या भिकाऱ्यांपैकीच होता,पण तो भिकारी मुळीच वाटत नसे. बदकांच्या कळपात एखादा राजहंस कसा दिसेल तसा तो त्या भिकाऱ्यांमध्ये सुदधा वेगळा उठून दिसत होता. गोरा रंग, गोंडस चेहेरा आणि अंगावर फाटके कपडे असं त्याचं रूप होते.

तर एवढा गोंडस मुलगा या भिकाऱ्यांमध्ये काय करत होता हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल.


राजेंद्र भिडे आणि सरिता भिडे या जोडप्याला लग्न होऊन चार वर्ष झाली, तरी मुल होत नव्हतं म्हणून त्यांनी नरसोबाच्या वाडीत दत्ताला नवस बोलला होता. काही वर्षात त्यांना मुल झाल. नवसामुळे मुल झालं अस समजून हे जोडपं आपल्या बाळाला घेऊन नरसोबाच्या वाडीला नवस फेडण्यासाठी आले होते. बाळ जन्मल्यावर एक वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणजेच बाळाच्या पहिल्या वाढदिवशी बाळाला घेऊन दर्शनाला येऊ असा नवस त्यांनी बोलला होता. त्यांच्याबरोबर सरिताची बहीण जया सुदधा आली होती.

डॉ. राजेंद्रने गाडी पार्क केली आणि ते दर्शन घेण्यासाठी निघाले. जवळजवळ तासभर उभे राहिल्यानंतर त्यांना दर्शन मिळाले. प्रदक्षिणा घालून ते घाटावर आले. बाळ एवढं गोंडस होत की समोरून येणारा प्रत्येक जण बाळाकडे कौतुकाने पाहून हासत होता. राजेंद्र आणि जया कृष्णा नदीच्या पाण्यात पाय बुडवून घाटावरचं वारं खात बसले होते. सरिताच्या कडेवर बाळ असल्याने ती थोडी लांब बसली होती. घाटावर बराच वेळ घालवून ते आता तिथून निघाले. जेवणाची वेळ झाली होती. सर्वांना खूप भूक लागली होती. ते पार्किंगकडे जात असतांना सरिताला एक दागिन्यांचे दुकान दिसले. राजेंद्रला सागूंन सरिता आणि जया त्या दुकानांत शिरल्या. आता या दोघी एक तास तरी बाहेर येणार नाहीत हे राजेंद्रला माहीत होत. बाळाला कडेवर घेऊन तो पुढे चालू लागला. एका दुकानातून त्याने पेढे घेतले. वाडीच्या पेढयांबददल त्याने बऱ्याच जणांकडून ऐकले होते. राजेंद्रला आठवलं, एका महत्त्वाच्या कामासाठी त्याला एक फोन करावयाचा होता. तो आता STD बुथ शोधू लागला. जवळच एका दुकानदाराकडे STD फोन होता.राजेंद्रने बाळाला काउंटरवर ठेवले व त्या फोनवर ऑफीसचा नबंर डायल केला. कामाच बोलून झाल्यावर राजेंद्रने फोन ठेवला. आणि बाळाला घेण्यासाठी तो काउंटरकडे वळला पण काउंटरवर बाळ नव्हतं. समोर बसलेला दुकानदार वर्तमानपत्र वाचण्यात मग्न होता. त्याचं कुठे लक्षच नव्हतं. राजेंद्रने जवळपासच्या दुकानदारांना विचारलं, पण कुणीच बाळाला पाहील नव्हतं. राजेंद्रला काय करावं तेच कळत नव्हतं. तो वाटेत दिसेल त्याला, ‘माझं बाळ बघितलं का?’ असं विचारत सुटला. पण कुणाकडेच त्याच्या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर नव्हतं.

आता तो सरिताला काय तोंड दाखवणार होता ? बाळ सापडल्याशिवाय राजेंद्र तिच्यासमोर उभाही राहू शकत नव्हता, कारण एवढं लहान बाळ आपणहून त्या काउंटरवरून खाली उतरणं शक्यच नव्हतं. नक्कीच बाळाला कोणीतरी पळवलं होतं, आणि कोणी पळवलं हे केवळ तिथले स्थानिक पोलिसच शोधू शकणार होते.

राजेंद्र पोलिस स्टेशन मध्ये गेला, आणि त्याने बाळ हरवल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने तक्रार नोंदवली आणि एक फोटोही इन्स्पेक्टरकडे दिला. इन्स्पेक्टर राजेंद्रला म्हणाले, “तुम्ही काळजी करू नका. हे नक्कीच जवळच्याच झोपडपट्टीत राहणाऱ्या भिकाऱ्यांच काम असणार. आम्ही लवकरच तुमचं बाळ तुम्हाला मिळवून देऊ. मी आत्ताच आमची एक टीम झोपडपट्टीत पाठवतो.”


सबइन्स्पेक्टर सावंत आणि त्यांच्या बरोबर दोन कॉन्स्टेबल झोपडपट्टीपाशी आले. तिघांच्याही हातात बाळाच्या फोटोची एक एक कॉपी होती. ते तिघेही एकेका झोपडीत घुसून बाळ कुठे दिसते का हे पाहात होत. पण त्यांना बाळ मिळालं नाही. आता एकच झोपडी राहीली होती. राम्या भिकारी आणि त्याची बायको रखमा यांची झोपडी. राम्या आणि सबइंस्पेक्टर सावंत यांचे संबध तसे खूप जवळचे होते, कारण सावंतांनी राम्याला चोरीच्या आरोपाखाली बऱ्याचदा आत टाकलं होत. त्यामुळे सावंतांना राम्यावर दाट संशय होता. सावंत राम्याच्या झोपडीपाशी आले. राम्या आत बसून जेवत होता. सावंत आणि दोन कॉन्स्टेबल सरळ आत गेले. सावंतांची तीक्ष्ण नजर संपूर्ण झोपडीभर फिरली, पण त्यांना कुठेच बाळ दिसले नाही. सावंतांनी हाताने खूण करताच त्या कॉन्स्टेबलनी त्या झोपडीतील प्रत्येक वस्तू उचकायला सुरूवात केली. राम्याला या सर्व प्रकाराची सवय असल्याकारणाने तो अगदी शांतपणे जेवत होता. झोपडीचा कानाकोपरा शोधूनसुध्दा बाळ काही मिळालं नाही. सबइन्स्पेक्टर सावंत यांना अजूनही वाटत होतं की बाळ राम्या आणि रखमानीच पळवल आहे. त्यात रखमा कुठच दिसत नव्हती, त्यामुळे त्यांचा संशय अजूनच वाढला.

सावंत राम्याला म्हणाले, “ राम्या खरं सांग बाळाला कुठं लपवलयस ? रखमा कुठं घेऊन गेलीये बाळाला? आत्ताच्याआत्ता सांग.”

राम्या म्हणाला, “साब, तुमी काय बोलताय मला काइ कळना. कोणतं बाळ? आन मी कुठलंचं बाळ नाय लपवल.” अतिशय भोळा चेहरा करून राम्या म्हणाला.

“हे बघ राम्या, तुला बोलतं करायचे माझ्याकडे इतरही मार्ग आहेत. मी तुला आजून एक संधी देतो, जे काय मी विचारीन त्याची खरी उत्तरं द्यायची. देवळाजवळच्या दुकानातून हे बाळ तूच चोरलस ना ?” सावंतानी बाळाचा फोटो दाखवून राम्याला विचारंल.

राम्या चांगूलपणाचा आव आणून बोलू लागला, “साहेब तुमी मला यितकी वर्ष वळखता. भीक मागून पोट भरणारा मी एक क्षुल्लक जीव. कधी लई भिक मिळते कधी काहीच मिळत नाही. मग रिकामं पोट आनी पोटात ओरडणारे कावळे छोटी-मोठी चोरी करायला भाग पाडतात. खरच सागंतो साहेब मी चोर आहे पन येवढ्या लहान बाळाला पळवायला मी काय हैवान नाय. मी खरच नाय पळवलं बाळाला.” राम्या खरचं चांगला कलाकार होता. त्याच्या नौटंकीचा सावंतांवर खूपच परिणाम झाला होता. ते म्हणाले, “ठीक आहे. थोड्यावेळासाठी आपण असं समजू की ,तू बाळ पळवलं नाहीस पण मग रखमा कुठं गायब आहे ?”

राम्या म्हणाला, “तिच्या बहिणीला पोरगं झालं म्हणून ती काल रात्रिच बहिणीला भेटायला मिरजेला गेलीय. उद्या ती परत येईल, तवा तिची हवी तेवढी तपासनी करा.” उद्या परत येतो असे सांगून सावंत निघाले. त्यांनी कॉन्स्टेबलना राम्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं.

राजेंद्र अजूनही पोलिस स्टेशन मध्येच थांबला होता. बाळाच्या काळजीने त्याचा चेहरा पार उतरला होता. “तुम्ही घरी परत जा. तुमचं बाळ मिळालं की मी लगेच कळवीन. काळजी करू नका. तुमचं बाळ सुखरूप असेल.” असे सांगून इन्स्पेक्टर कदमांनी राजेंद्रला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो काय तेथून हलायला तयार नव्हता. सरिता आणि जया आपल्याला शोधत असतील याचही भान त्याला नव्हतं.

सावंतांना येताना पाहून राजेंद्रचा चेहरा एकदम खुलला. पण त्यांचे रिकामे हात पाहून त्याचा उत्साह ओसरला. आपल्या बाळाला शोधण्यात सावंतांना अपशय आलंय हे राजेंद्रला समजलं, तरी पण आपलं बाळ सुखरूप असेल आणि लवकरच पोलिस बाळाला शोधून काढतील याबद्दल तो आशावादी होता. जेव्हा माणसाकडे काहीच उरत नाही तेव्हा आशारूपी खांबच त्याच्या मनाला आधार द्यायचं काम करतो आणि राजेंद्रच्या बाबतीत सुद्धा आता तेच होत होतं.

रखमा बाळाकडे कौतुकाने पाहात होती. एवढं गोंडस बाळ तिने या पूर्वी कधीच पाहीलं नव्हतं. तिच्या थोराड, रखरखीत हातात ते बाळ शांत झोपलं होत. बराच वेळ रडून ते शांत झालं होतं आणि आता ते गाढ झोपलं होतं. रखमानं कसबसं त्याला शांत करून झोपवलं होतं. बस मधला प्रत्येक जण त्यांच्याकडे पाहात होता. असल्या गावंढळ, भिकारी बाईच्या हातात एवढं सुंदर, गोंडस बाळ पाहून प्रत्येकालाच आश्चर्य आणि कुतुहल वाटत होतं. बस आता कोल्हापूरच्या एस.टी. स्टँडवर येऊन थांबली. रखमा बसमधून उतरली आणि शिंगणापूर गावाच्या बसमध्ये चढली. शिंगणापूर गावाजवळच एक झोपडपट्टी होती. त्या झोपडपट्टीमध्ये रखमाची सख्खी बहिण चंदा रहायची. चंदा आणि तिचा नवरा दोघेही शेतात काम करून आपलं पोट भरत होते.

चंदा झोपडी बाहेर कपडे धुवत होती. तिला रखमा हातात बाळ घेऊन येतांना दिसली. रखमाला पाहून चंदा एकदम ओरडलीच. कितीतरी दिवसांनी त्या एकमेकीला भेटत होत्या. चंदा रखमाला म्हणाली, “कित्येक दिसांनी तोंड दाखवत्येस ? माझ्याकडं काय काम काढलस ? आनी भाऊजी कसे हायेत ? आनी हे पोर कोनाचं उचलून आणलस ? तुझं तर नाय वाटत.” असा तिने रखमा वर प्रश्नांचा भडीमार केला.

रखमा चंदाला म्हणाली, “अगं हो. सांगते की सगळं, किती प्रश्न इचारतीस, पहीलं मला एक गीलास पानी दे. लई ऊन हाय भायेर.”

पाणी पिऊन रखमा बोलू लागली, “आज सकाळी भिक मागायसाठी देवळाकडं गेले तर रग्गड गर्दी व्हती. लई लोक दर्शनासाठी आले होते. त्यामुळे लई भीक मिळाली. मी पन लई खुशीत होते. मिळालेले दोनशे रूपये घेऊन मी घराकडं निघाले व्हते, तवा वाटेत एका दुकानापाशी हे पोर मला दिसलं. येवढं सुंदर पोर मी माझ्या जिंदगीत कधीच पाहीलं नव्हतं. मी त्याच्याकडं पाहातच राहीले. कोनाचच त्या पोराकडे लक्ष नव्हत. पोराचा बाप कोनाशी तरी फोनवर बोलत व्हता. अन त्यो दुकानदार बी प्येपर वाचत व्हता. म्हनून मी हळूच गेले आणि पोराला उचलंल. पोराला घेऊन डायरेक झोपडीवर आले. आता मी आनी राम्या या पोराला आपलं पोर समजून सांभाळनार हाय. त्योबी लई खूश हाय.”

यापूर्वी चंदानं रखमाला एवढं खुश कधीच पाहीलं नव्हतं. कारण खुश व्हायसाठी तसा प्रसंगच रखमाच्या आयुष्यात कधी आला नव्हता. रखमाचे वडील पोलीसांचा खबऱ्या म्हणून काम करायचे. तिची आई कायम आजारीच असायची. गुंडांच्या एका टोळीची माहीती काढण्यासाठी रखमाचे वडील त्या गुंडांच्या टोळीत सामिल झाले होते. पण एकदा त्या गुंडांच्या म्होरक्याला ते पोलीसांचा एजंट आहेत आणि ते आपली माहीती पोलीसांपर्यंत पोहोचवतात हे कळलं आणि त्याने रखमाच्या वडीलांना ठार केलं. घरातला एकुलता एक कमावता माणूस गेल्यामुळे आणि आईच्या आजारपणामुळे रखमाला आणि चंदाला शाळा सोडावी लागली. त्या घरोघरी जाऊन धुण्याभांड्याची कामं करू लागल्या. वडील गेल्यावर वर्षभरातच आईनेही जगाचा निरोप घेतला. आता रखमा आणि चंदाकडे पुरेशी कामं होती. दोघींचही लग्नाच वय झालं होत. एका श्रीमंत शेठजीच्या घरात रखमा धुण भांडीची काम करायची. तिथे राम्या माळी काम करायचा.तिथेच दोघांची भेट झाली. पहीली मैत्री झाली आणि थोड्याच दिवसांत मैत्रीच रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही लग्न करायचा निर्णय घेतला. लग्न झाल्यावर रखमा आणि राम्या एकत्र राहू लागले. सगळं चांगलं चालत होत. शेठजीही आता म्हातारे झाले होते. शेठजींची रखमा आणि राम्यावर चांगलीच मर्जी होती. राम्या आणि रखमाचा संसार चांगला चालला होता. दोघेही अगदी सुखात होते. पण हे सुख थोडेच दिवस टिकलं.

एक दीवस अचानक शेठजींची तब्येत बिघडली. राम्या आणि रखमाने त्यांना हॉस्पीटल मध्ये ऍडमिट केलं. थोड्याच दिवसात त्यांचा अमेरीकेत राहणारा एकुलता एक मुलगा त्यांना भेटायला आला. शेठजींची तब्येत सुधरायचं नावच घेत नव्हती. त्यांच्या मुलानं त्यांना आपल्याबरोबर अमेरीकेला आपल्या घरी नेण्याचा निर्णय घेतला. शेठजींचा अमेरीकेला जाऊन आता एक महीना झाला होता.

रखमाकडची इतर कामही आता कमी झाली होती. आणि राम्यालाही दुसरं कोणतच काम नव्हतं. शेठजींच्या मुलाने परत जातांना राम्याच्या हातात त्या दोघांचे एक महिन्याचे पगार दिले होते. एक दिवस काही लोक शेठजींच्या बंगल्यावर आले आणि त्यांनी मशिनने बंगला पाडायला सुरूवात केली. रखमा आणि राम्याला काय चालल आहे काहीच कळेना. राम्याने त्या माणसांपैकी एकाला विचारले तर त्याने शेठजी वारले व त्यांच्या मुलानेच आता आम्हाला हे घर पाडायला सांगितलं आहे असे राम्याला सांगितले. त्या जागी आता नवीन उंच इमरत बांधणार आहेत असेही त्याने सांगितले. म्हणजे राम्याला आता नवीन काम शोधणं भाग होत. शेठजींच्या मुलाने दिलेले पैसेही आता संपत आले होते.

बराच प्रयत्न केल्यावर सुद्धा राम्याला काम मिळत नव्हतं. राम्याला जेवढे पैसे मिळत होते त्यात त्यांच एक वेळचं जेवण कसंबसं निघत होत. शेवटी त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. राम्याचा बालपणीचा एक मित्र नरसोबाच्या वाडी जवळच्या झोपडपट्टीत राहात होता. तिथेच तो शेतात ऊस तोडणीची कामं करीत असे. त्याच्या ओळखीने राम्या आणि रखमाला शेतात काम मिळाले. शेताचा मालक कामगारांकडून कमी पैशांत खूप काम करून घ्यायचा. राम्या आणि रखमा दिवसभर काम करून दमून जायचे. मालक राम्या कडून घरची कामही करून घ्यायचा.

जमीन शेणाने सारवण्यापासून अगदी मालकाच्या मुलाला शाळेत पोहोचवण्यापर्यंत सगळी कामं राम्या करायचा. रखमाही त्याला मदत करायची. एकदा राम्या नेहमी प्रमाणे वरांडा शेणाने सारवत होता. त्याला सोन्याचं कडं खुर्चीवर पडलेलं दिसलं, जवळपास कोण नाही हे पाहून पटकन ते आपल्या खिशात ठेवलं. मालक पहाटे उठून तालमीत जात असे. तो नेहमी हातातलं कडं काढून ते आत कपाटात ठेवत असे व परत घरी आल्यावर हातात घालत असे. आज पहाटे नेहमी प्रमाणे निघाण्यापूर्वी मालकाने कडं हातातून काढलं तेवढ्यात त्याला आपल्या मुलाचा “आई गं” असा ओरडण्याचा आवाज आला. मालकाचा मुलगा जिन्यावरून खाली येत असतांना घसरून पडला होता. गुडघा आपटल्यामुळे गुडघ्यातून रक्त येत होतं. मुलाचा आवाज ऐकून मालकाने हातातले कडं घाईत तसंच खुर्चीवर टाकलं आणि धावतचं तो मुलाजवळ गेला. आज तो तालमीत न जाता मुलाला घेऊन दवाखान्यात गेला. डॉक्टरचं घर दवाखान्याला लागूनच असल्यामुळे एवढ्या सकाळी पण डॉक्टर उपलब्ध होता.

परत घरी आल्यावर कडं कुठंच दिसत नाही हे मालकाच्या लक्षात आलं. मुलाचा आवाज ऐकून आपण कडं खुर्चीवरच ठेवल्याचं त्याला आठवलं. रोज सकाळी सगळ्या घराची साफसफाई करून जमीन शेणाने सारवण्याचं कामं राम्याच करत असे. त्यामुळे राम्या आणि रखमा सोडले तर इतर कामगारांच घरात फारसं येणं जाणं नसे. मालकाने, शेतात काम करणाऱ्या राम्याला आत बोलावलं आणि दोन माणसांना त्याची पूर्ण तपासणी करायला सांगितली. आपलं आज काही खरं नाही हे राम्याला कळून चुकलं होतं. फाशीची शिक्षा जाहीर झालेला कैदी ज्याप्रमाणे फाशीच्या फंदासमोर असाहाय्यपणे उभा असतो तसा राम्या एका जागी स्तब्ध उभा होता. त्याची पहिली चोरी सापडली होती. राम्याची तपासणी करणाऱ्यांपैकी एकाला राम्याच्या खिशात सोन्याच कडं सापडलं. संतापलेल्या मालकाने राम्याच्या कानाखाली लगावली. मालकाने एवढ्या जोरात मारलं होतं की मालकाची बोटं राम्याच्या गालावर उमटली होती. मालकाने बोट करताच त्या दोन माणसांनी राम्याला धक्के मारून घराच्या बाहेर ढकललं. गाल चोळत राम्या बाहेर आला. परत एकदा राम्या आणि रखमा बेरोजगार झाले.

आता राम्या आणि रखमाकडे कुठलचं काम नव्हतं. रखमाला चंदाची आठवण झाली. चंदाच सुद्धा लग्न झालं होतं. ती तिच्या नवऱ्याबरोबर कोल्हापूर जवळच्या शिंगणापूर गावापासून काही अंतरावर वसलेल्या झोपडपटी्त राहात होती. दोघेही शेतात काम करून आपलं पोट भरत होते. त्यांना एक मुलगाही झाला होता. रखमा, चंदाला भेटण्यासाठी शिंगणापूरला आली. रखमाला पाहून चंदा खूपच खुश झाली. ती रखमाला म्हणाली, “काय गं रखमे, इतक्या वर्षांनी बहीणीची आठवन कशी काय आली?”“ चंदाच्या हातातलं बाळ पाहून रखमा क्षणभर आपलं दु:ख विसरली. रखमा तिला म्हणाली, “काय नाय गं चंदे, तुझं बाळ पहायला आले मी.” ती जरी असं म्हणत असली तरी तिचा चेहेरा वेगळचं सांगत होता. आणि चंदा तर तिची बहीण होती. रखमाच्या चेहरयाकडे पाहूनच ती काहीतरी लपवते आहे हे चंदाला कळलं होत. ती रखमाला म्हणाली, “हे बघ रखमे मी तुझी बहीण हाय, त्यामुळे माझ्यापासनं काय बी लपवू नगस. जे काय बी हाय ते सपश्ट सांग.” रखमाने तिला दीड-दोन वर्षात घडलेलं सर्व- काही सांगितलं. कसं शेठजींच्या घरचं काम गेलं. कसं त्यांना नरसोबा वाडीला जावं लागलं. तिथे मालकाने त्यांना कसं हाकललं. हे सर्वकाही तिने चंदाला सांगितलं. ती चंदाला म्हणाली, “चंदे आमची लई वाईट हालत झालीये. आम्ही दोघे पन बिनकामाचे झोपडीत बसून असतो. आमच्या जवळचे पैसे सुद्धा आता संपत आलेतं. कायतरी काम देना आमाला.” हे एकून चंदाला फार वाईट वाटलं. आपलं एवढं चांगल झालं. चांगला नवरा मिळाला, चांगलं काम मिळालं, मुलही झालं. मग रखमाच्याच बाबतीत असं का व्हावं? नवरा चोरटा निघाला, त्याच्यापायी हातातलं कामही गेलं, लग्नाला दोन वर्ष होउनही अजून मुल नाही. चंदाला रखमाबद्दल खूप वाईट वाटत होतं. पण ती तरी काय करणार होती? तिला स्वत:लाच कसंबसं काम मिळालं होतं. ती रखमाला म्हणाली, “रखमे, खरंतर तुझ्याबद्दल जे झालं त्यासाठी मला लई खराब वाटतयं. पन मलाच कसंबसं काम मिळालय. मी तुला कुठंन काम आनून देउ? तरी पन मी मालकास्नी इचारते अन काम असलं तर तुला सांगते.”

चंदाच्या बोलण्यावरून तरी ती काय काम दिल अस वाटत नव्हतं. रखमा हाताश होउन परत आली. राम्या आपली वाट बघत असणार असे तिला वाटले होते. पण झोपडीत राम्या नव्हता. तिने चहा करून घेतला आणि पुढे काय करायचं याचा विचार करत बसली. आता सगळ संपलं. आता जगण्यात काही अर्थ नाही. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी आपल्याला चांगलं आयुष्य मिळेल. असे नको ते विचार तिच्या मनात येऊ लागले. तेवढ्यात राम्या आत आला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आंनद दिसत होता. त्याला खुश पाहून रखमालाही बरं वाटलं. ती काही विचारायच्या आत राम्याच तिला सांगू लागला, “रखमे, आज मी देवळाकडं गेलतो. तिथं देवळाबाहेर भिकारी बसले होते. देवळात दर्शनासाठी येणारे लोक त्या भिकाऱ्यांच्या झोळीत पैसे टाकत व्हते. मी दिवसभर तिथंच होतो. आगं तु इचार बी करू शकणार न्हाइस येवढे पैसे त्या भिकाऱ्याना मिळतात. मी ठरवलय, आपनबी उद्यापास्न देवळाबाहेर भिक मागायची.” खरं म्हणजे भिक मागण्यात आनंद व्हायचं काहीच कारणं नव्हतं. पण जिवंत राहण्यासाठी काहीही करायची राम्याची तयारी होती. त्याला झालेला आनंद हा काही भिक मागण्यासाठी नव्हता तर तो जिवंत राहण्यासाठी उपलब्ध झालेल्या पर्यायासाठीचा आनंद होता.

दुसऱ्या दिवशी सकाळीच राम्या आणि रखमा देवळाबाहेर भिक मगायला बसले. खरं तर रखमाला हे फारस पटलं नव्हतं. पण आता त्यांच्याजवळचे पैसेही संपत आले होते आणि सध्या तरी पैसे कमवण्याचा याहून सोपा मार्ग त्यांच्याजवळ नव्हता.

रोज स्वत:चं पोट भरण्यापुरते पैसे त्यांना भिक मागून मिळत होते. आता राम्या आणि रखमा सराईत भिकारी झाले होते. सुरूवातीला थोडे दिवस रखमाला भिक मागतांना लाज वाटायची. ओळखीचं कोणी आलं तर काय म्हणेल? जर कधी चंदा दर्शनासाठी आली आणि तिने आपल्याला असं पाहीलं तर तिला काय वाटेल? असले प्रश्न तिच्या मनात वारंवार यायचे. पण तिचं मन आता दगडाचं झाल होतं. आता पैसेही बऱ्यापैकी मिळू लागले होते. आता रखमाची एकच इच्छा पूर्ण व्हायची राहीली होती. आई होण्याची. लग्नाला तीन वर्ष पूर्ण होउन सुद्धा त्यांना मुल होत नव्हतं. दर्शनाच्या रांगेत हातात बाळ घेऊन उभ्या असलेल्या आयांचा तिला खूप हेवा वाटे.

चांगले पैसे मिळूनही राम्याची चोरीची सवय काही जात नव्हती. पोलिसांनी बऱ्याचदा त्याला चोरी करतांना पकडला होता. जेल त्याच्यासाठी दुसरं घरच झाल होत. जेव्हा रखमा एकटीच भिक मागायची तेव्हा इतर भिकारी ओळखायचे की राम्या तुरूंगात आहे.

असच एक दिवस दुपारी झोपडीकडे जात असतांना रखमाला ते गोंडस बाळ दिसले. कुणाचंच त्या बाळाकडे लक्ष नव्हतं हे पाहून आयत्या मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन तिने ते बाळ उचललं आणि त्याला पदराखाली लपवून ती झोपडीवर आली. तिने ते बाळ राम्याला दाखवलं, आणि बाळाला ठेऊन घेण्याची इच्छा तिने राम्याला सांगितली.

खरं म्हणजे राम्या काही त्यासाठी तयार नव्हता. पण, रखमाच्या हट्टासमोर त्याचं काही चाललं नाही. ते बाळ कोणालाही लळा लागेल असेच होतं.

पोलिस बाळाला शोधत येतील याचा अंदाज राम्याला आला होता. म्हणूनच त्याने रखमाला बाळाला घेऊन चंदाकडे जायला सांगितले. ती बाळाला थोडे दिवस चंदाकडेच ठेवणार होती. वातावरण शांत झाल्यावर बाळाला परत घेऊन येणार होती.


क्रमशः


Rate this content
Log in

More marathi story from Niranjan Niranjan

Similar marathi story from Tragedy