Niranjan Niranjan

Tragedy Others

3  

Niranjan Niranjan

Tragedy Others

मोठ्या मनाचा माणूस - भाग दोन

मोठ्या मनाचा माणूस - भाग दोन

16 mins
544


भाग ५

भानावर आलेला राजेंद्र सरिता आणि जयाला शोधत पार्किंगपाशी आला. तिथे त्या त्याचीच वाट पाहात होत्या. त्यांच्या दोन्ही हातात पिशव्या होत्या. त्यांनी बरच शॉपिंग केलय हे हातातल्या पिशव्या पाहून कळत होतं. सरिता राजेंद्रवर चिडली होती. ती आणि जया एक तासापेक्षा जास्त वेळ राजेंद्रची वाट पाहत तिथे उभ्या होत्या. इतर वेळी राजेंद्र तिला शांत करू शकला असता. पण बाळ हरवले आहे हे तिला कळल्यावर ती काय करेल याचा विचार सुद्धा करू शकत नव्हता. ती काही बोलायच्या आतच त्याने सगळं सांगून टाकलं. सरिता पटकन खालीच बसली. तिच्या डोळयातुन अश्रू वाहू लागले. थोड्या वेळाने ती उभी राहीली आणि मला माझं बाळ पाहिजे, असं ओरडत राजेंद्रच्या छातीवर हात आपटू लागली. आपण कुठे आहोत, रस्त्यावरचे लोक आपल्याकडे पाहतायत याचही भान तिला नव्हतं. याक्षणी ती राजेंद्रची बायको आणि जयाची बहीण नव्हती. ती केवळ आपल्या बाळाच्या विरहामुळे व्याकुळ झालेली माता होती. जया आणि राजेंद्र ने कसंबसं तिला शांत केल. आता ते परतीच्या प्रवासासाठी निघाले. सरिता तिथून निघायला तयार नव्हती. पण जया आणि राजेंद्रने तिची खूप वेळ समजूत काढल्यावर ती कार मध्ये बसली

ते मुंबईला घरी पोहोचले. तिघांनाही खुप चुकल्या चुकल्या सारखं वाटत होतं. गेल्या वर्षभरात सगळ्यांनाच बाळाचा लळा लागला होता. बाळाचा जन्म झाल्यापासून सरिताच पूर्ण आयुष्यच बदललं होत. बाळाला सांभाळण्यासाठी तिने नोकरी सोडली होती.

तरी आता कुणाशीच बोलत नव्हती. बाळाचा फोटो घेऊन खोलीत रडत बसायची. तिने जेवणही सोडलं होतं. राजेंद्रचं सुद्धा कामात लक्ष लागत नव्हतं. त्याला ही सारखी बाळाची आठवण येत होती. पण आता परिस्थीतीच अशी होती की त्याला कठोर राहणं भाग होतं. स्वत:ला सावरून सरिताला सांभाळण्याचं अवघड काम त्याला करायच होतं. जया सुद्धा थोडे दिवस त्यांच्या घरी राहीली होती. सरिता पूर्वपदावर येईपर्यँत जया तिथेच सरिता जवळ थांबणार होती.

सलग तीन दिवस सरिताने काहीच खाल्ल नव्हतं. तिची तब्येत खूपच खालावली होती. पण तरीसुद्धा ती अन्नाला हात लावायला तयार नव्हती. आता ती केवळ एकाच माणसाचं ऐकण्याची शक्यता होती.

राजेंद्र, जया आणि सरिता राघवेंद्र महाराजांच्या मठात आले. महाराज ध्यान लावून बसले होते. थोड्या वेळाने महाराजांनी डोळे उघडले आणि त्यांची दयाळू नजर राजेंद्र आणि सरिता वर स्थिरावली.

ते काही बोलण्याच्या आधीच सरिता त्यांच्या पायापाशी बसून रडायला लागली. महाराजांनी तिला शांत होण्यास सांगितले. थोड्यावेळाने ती शांत झाली आणि तिने बाळ कसं हरवलं ते सविस्तर सांगितलं. मुल होण्यासाठी नरसोबावाडीच्या दत्ताला नवस बोलण्याचा सल्ला स्वत: राघवेंद्र महाराजांनीच त्या दोघांना दिला होता.

महाराज त्यांच्या ठेवणीच्या शैलीत बोलू लागले. हे बघ, बाळ, या जगात घडणारी कोणतीही घटना ही या सॄष्टीच्या विधात्याच्या इच्छेनुसारच होते. आपण मनुष्य प्राणी जरी स्वत:ला या पॄथ्वीसविस्तर वरील सर्वात हुशार प्राणी समजत असलो तरी त्याच्यासमोर आपण फारच लहान, छोटे आहोत. तुमच्या नशीबात नसतांनाही तुम्ही केलेल्या याचनेमुळे तुम्हाला मातॄसुखाचा आणि पितॄसुखाचा आनंद घेता यावा यासाठी देवाने तुमच्या पदरात मुल टाकले. आता, एक वर्ष मातॄसुख आiण पितॄसुख अनुभवल्यावर त्याने ते मुल परत नेले. एवढे बोलून महाराजांनी एका सेवकाकडे पाहून हाताने खूण केली, तो सेवक आत गेला आणि महाराजांची काठी घेऊन बाहेर आला. सुंदर नक्षीकाम केलेला तो दंड टेकत टेकत महाराज आत निघून गेले.

हा महाराज कोणी संत महात्मा नव्हता तर साध्या भोळ्या, पीडीत लोकांच्या भावनांशी खेळून त्यांना लुबाडणारा राक्षस होता. तो कधीच फुकटात दर्शन द्यायचा नाही. त्याने त्याचा मठ सुद्धा राजेंद्र, सरिता सारख्यांकडून मिळालेल्या देणगीतून बांधला होता. त्याचा मठ बाहेरून जरी वाटत नसला तरी आतून सर्व सोयी सुविधांनी युक्त होता. त्याच्या काही खास सेवकांनाच त्याच्या कक्षात प्रवेश करण्याची अनुमती होती. बाहेर जरी तो आपल्या मधूर वाणीने लोकांवर मोहीनी घालत असला तरी त्याच्या कक्षात वेगळाच सत्संग चालत असे.

काहीच दिवसात सरिता पूर्वपदावर आली. ती आता स्वत:ला घरकामात रमवत होती. कधी कधी तिला बाळाची फार आठवण येई. अशावेळी मग तिला भरून येई. अशावेळी ती जयाशी बोलत असे. जया तिची समजूत काढायची. जयाशी बोलून आपलं मन मोकळं केल्यावर सरिताला बरं वाटत होतं.

राजेंद्र सुद्धा स्वत:ला ऑफीसच्या कामात गुंतवून दु:ख विसरण्याचा प्रयत्न करत होता. त्यालाही बाळाची आठवण येई. शेवटी तो एक बाप होता.

वेळ हेच औषध या नियमानुसार राजेंद्र आणि सरिता या दोघांनाही दु:ख पूर्णपणे विसरणं जरी शक्य नसलं तरी जसा वेळ जाईल तशी त्यांच्या दु:खाची तीव्रता कमी होणार होती. त्यामुळे एकमेकाला सांभाळणे हाच त्यांच्या पुढचा एकमेव पर्याय होता.


भाग ६

बरेच दिवस सब इन्स्पेक्टर सावंत राम्या आणि रखमाच्या झोपडीकडे फिरकले नव्हते. बाळाला चंदाकडे ठेवून एक महिना पूर्ण होत आला होता. आज सकाळीच रखमा बाळाला पाहण्यासाठी चंदाकडे जाण्यासाठी निघणार होती. तेवढ्यात चंदाच दारात उभी होती. रखमा चंदाकडे आश्चर्याने पाहत तिला म्हणाली, “आज येवढ्या सकाळी माझ्याकडे कशी काय आलीस?” “अगं सांगते की सगळं, पन मी येवढ्या लांबन आले, पैलं चहा तर पाज.” चंदा म्हणाली.

चहा पिऊन झाल्यावर चंदा बोलु लागली, “आमचा मालक देशी दारू बनवन्याचा धंदा चालू करतोय. त्याला कामगार पायजेत म्हनून तुला सांगायला आले. तू आणि भाओजी आता आमच्या इथच राहयला या. पैसेबी बरं भेटतील. आणि भीक मागन्यापेक्षा हे काम बरं नाई का?”

भीक मागायचं काम खरतर रखमाला आवडलं नव्हतं. आणि बाळाला इथे परत आणणं धोक्याचं होतं. त्यामुळे चंदाने सांगितलेलं तिला पटत होतं. ती चंदाला म्हणाली, “चंदे खरतर मला बी हे भिकाऱ्याचं आयुष्य नकोय. आनी बाळाला इथं आणणं बी लई धोक्याच हाय. पोलिसांना कळालं तर आम्हाला दोघांनाबी आत टाकतील. पन मी येकदा राम्याशी बोलते.”

चंदा गेल्यावर रखमाने राम्याला उठवलं आणि त्याला सर्व काही सांगितल. तो पण लगेच तयार झाला. दोनच दिवसात दोघांनी आपलं बाड बिस्तर गुंडाळलं, आणि आपला संसार चंदा जिथे रहात होती त्या शिंगणापूर जवळच्या झोपडपटटीत हालवला.

आता राम्या आणि रखमा रोज देशी दारूच्या कारखान्यात जाऊ लागले. सुरूवातीचे काही दिवस रखमाला दारूच्या उग्र वासाचा खूप त्रास व्हायचा. पण हळूहळू तिला सवय झाली. संध्याकाळी घरी परत आल्यावर ती पूर्ण वेळ बाळाबरोबरच घालवायची. त्यांच्या शेजारीच एक आज्जी रहायची. तिला लहान बाळं फार आवडायची. बाळाचे आई वडील कामावर गेले की ही आज्जीच बाळाला सांभाळायची. ती एकटीच राहायची. तिला कोणीच वारीस नव्हता. झोपडपटटीतली तीन चार बाळं तीच सांभाळायची. या बाळांचे पालक रोज तिची जेवणाची सोय करायचे. त्या झोपडपट्टीतील किती तरी मुलं तीनं वाढवली होती. तिच्यामुळे रखमासारख्या बायका कामाला जाऊ शकत होत्या. त्या आज्जीनेच बाळाचं नाव राजू ठेवलं होतं. राम्या आणि रखमालाही हे नाव खूप आवडलं.

झोपडपट्टीत राहणारी मुलं सुटी्च्या दिवशी या आज्जीच्या झोपडीत जमायची. ती त्यांना गोष्टी सांगायची.

राजु हळूहळू मोठा होत होता. रखमा आणि राम्याचाही आता कामात चांगला जम बसला होता. त्यांची परिस्थिती आता आधीपेक्षा बरी होती. मालक राम्याच्या कामावर जामच खुश होता. त्यामुळे राम्याच्या कामावर खुश होऊन त्याच प्रमोशन होऊन चार वर्ष केलेल्या कष्टाचं हे फळ होतं. तो आता सुपरवायजर झाला होता. रखमाच्या आयुष्यात पहिल्यांदाच चांगले दिवस आले होते. राजू सुद्धा आता सगळी अक्षर व्यवस्थित बोलू शकत होता. आख्या झोपडपट्टीत तो सगळ्यांचा लाडका होता. इतकं सुंदर मुल या रखमेच कसं असा सर्वांना प्रश्न पडे. पण तसं तिला कोणी कधी विचारल नाही.

एक दिवस राम्या, रखमा, चंदा आणि चंदाचा नवरा आणि त्यांचा मुलगा हनमंत आणि राजू कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले. गर्दी कमी असल्यामुळे त्यांना थोडाच वेळ रांगेत उभ राहून अगदी आत देवीच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊन दर्शन घेता आले. पण रखमाला हे माहित नव्हतं की एक दिवस याच मंदीराच्या बाहेर बसुन भिक मागायची वेळ आपल्यावर येणार आहे.

राम्या आपलं काम अगदी प्रामाणिकपणे करत होता. काही वर्षापूर्वी चोऱ्या करणारा राम्या आणि आत्ताचा राम्या यात जमीन आसमानाचा फरक होता. कदाचित राजू त्यांच्या आयुष्यात आल्यामुळे त्याच्यात हा बदल झाला असावा. एखादा कामगार जर नीट काम करत नसेल तर राम्या त्याला चांगलाच खडसावत असे आणि तरी देखील त्या कामगाराने कामचुकारपणा केला तर राम्या मालकाकडे त्या कामगाराविषयी तक्रार करत असे. राम्या सुपरवायजर झाल्यापासून कामगारांची उत्पादकता देखील वाढली होती. पण त्याच्या अशा वागण्यामुळे त्याचे अनेक शत्रू झाले होते. त्याच्या सांगण्यावरून मालकाने काही कामचुकार कामगारांना कामावरून काढले होते. जग्गुही त्यापैकी एक होता. जेव्हा मालकाने नवीन कारखाना चालु केला होता, तेव्हा जग्गुला सुपरवायजर पदी नियुक्त केलं होत. पण जग्गु मुळातच गुंड प्रवॄत्तीचा माणूस होता. त्यामुळे काही कामगारांनी जग्गुच्या त्रासाला कंटाळून मालकाकडे तक्रार देखील केली. मालकाने सर्व कामगारांचे हित लक्षात घेऊन जग्गुला सुपरवायजर पदावरून हटवून राम्याला सुपरवायजर केलं होतं. त्यामुळे जग्गुचा पहिल्यापासूनच राम्यावर राग होता. आतातर जग्गु काहीच काम करत नव्हता. इतर कामगारांची टींगल करणे, त्यांच्यावर दादागिरी करणे, महिला कामगारांवरती अश्लील टीप्पणी करणे ही कामं जग्गु आणि त्याचे साथीदार करत असत. पण त्याला बोलुन काहीही उपयोग होणार नाही हे राम्याला माहीत होतं. त्यामुळे तो जग्गु आणि त्याच्या गँगकडे दुर्लक्ष करत होता. एक दिवस जग्गुने रखमाबद्दल अश्लील टीप्पणी केली आणि राम्याने ते ऐकलं. आता मात्रा त्याचा संयम सुटला आणि तो जग्गुवर धावून गेला. राम्या जरी सर्व शक्ती वापरून जग्गुवर हमला करत होता तरी अडदांड शरीराच्या जग्गुवर त्याचा परिणाम होत नव्हता. आता जग्गुही चवताळला आणि त्याने एक गुद्दा राम्याच्या थोबाडावर मारला. राम्याचे दोन दात तुटुन पडले आणि राम्याच्या जबड्यातुन रक्त वाहू लागले. त्यावेळी जर मालक तिथे आले नसते तर जग्गुने राम्याचा जीवच घेतला असता. मालकांनी स्वत: जमीनीवर पडलेल्या राम्याला हात देऊन उभ केलं. जग्गुलाही दोन कामगारांनी धरून ठेवल होतं. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही संताप दिसत होता. वातावरण थोड शांत झाल्यावर मालकाने जग्गुच्या हातावर शेवटच्या महिन्याचा पगार ठेवला आणि तू उद्यापासुन येवू नकोस असे सांगितले. जग्गुने मालकाकडे आणि राम्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि तो तेथून निघून गेला. आता सगळे कामगार परत आपआपल्या कामला लागले.

जग्गु गेल्यापासुन सगळे कामगार अगदी मनापासून काम करत होते. त्यांना त्रास देणारा माणूस आता तिथे नव्हता. महिला कामगारांनाही आता सुरक्षित वाटत होतं. जग्गुबरोबर दंगा मस्ती करणारी, त्याच्या दु:श्कर्माना साथ देणारी चार टाळकीही आपला म्होरक्या गेल्यामुळे नाईलाजाने कामाला लागली होती.

एक दिवस राम्याला फॅक्टरीतून निघायला उशीर लागला. कामच जास्त होतं. रखमा मात्र नेहमीच्या वेळीच घरी आली होती. नेमके त्याच दिवशी राम्याचे एक काका त्याच्याकडे आले होते. म्हणून रखमा राम्याला बोलवण्यासाठी फॅक्टरीच्या दिशेने निघाली. थोडं अंतर चालल्यावर तिला राम्या लांबून येतांना दिसला. आता आपल्याला जास्त चालायला लागणार नाही या विचाराने ती थोडी सुखावली व तिथेच एका झाडापाशी थांबली. इतक्यात एक मोटारसायकल राम्या जवळ येऊन थांबली. त्यावरून दोन माणसं उतरली. त्यातला एक चांगलाच दांडगा, धिप्पाड होता. काही कळायच्या आतच त्या माणसाने चाकू काढला आणि तो राम्यावर सपासप वार करू लागला. काही वेळातच तो माणूस परत गाडीवर बसून निघून गेला. राम्या जखमी होवून खाली कोसळला. हे पाहून रखमा पळतच राम्यापाशी आली. राम्याला अशा जखमी अवस्थेत पाहून तिला एकदम भोवळचं आली. पण तिने कसंबसं स्वत:ला सावरलं आणि रडवेल्या आवाजात ती राम्याला म्हणाली, “तुमाला कायबी होनार नाही. म्या लगीच डाक्टरास्नी बोलावते.” पण एक शब्द बोलायचाही राम्यात आता प्राण उरला नव्हता. “जग्गु” हा एकच शब्द कसाबसा उच्चारून रखमाच्या मांडीवर डोक टेकवून त्याने प्राण सोडले. कानाचे पडदे फाडणारी रखमाची किंचाळी ऐकून अख्खी झोपडपट्टी तिथे जमा झाली.

खेळण्या बागडण्याच्या कोवळया वयात पाच वर्षाच्या राजूवर स्वत:च्या वडीलांच्या पार्थीव देहाला अग्नी द्यायची वेळ आली. राजूचं नशीब पण पाहा. श्रीमंत घरात जन्माला येऊन देखील अगदी लहान वयात मातॄछत्रं, पितॄछत्रं हरवल, आणि तो एका भिकारणीच्या झोपडीत वाढला. आणि ज्याला तो आपले बाबा समजत होता तोही जग सोडून गेला.

राम्याला भेटायला आलेले काका राम्याचे दिवस कार्य अटोपून परत गावी गेले. या काळात रखमा आणि राजूची चंदाने खूप काळजी घेतली. राम्या जाऊन आता पंधरा दिवस होऊन गेले. रखमाला परत कामावर जाणं भाग होतं. नवरा मेला म्हणून तिला घरी बसून दु:ख करत बसणं परवडणारं नव्हतं. ती परत फॅक्टरीवर कामाला जाऊ लागली. पण आता पहिल्यासारखं तिचं कामात लक्ष लागेना. सारखी राम्याची आठवण येत होती. राम्या आणि जग्गु मध्ये झालेलं भांडण सारखं आठवायचं आणि अश्लील टीप्पणी करणाऱ्या जग्गुचा राक्षसासारखा क्रुर चेहरा डोळयासमोर आला की तिला कसतरीच व्हायचं. अशावेळी ती तिच्या आयुष्यात घडलेल्या ज्या काही चांगल्या घटना घडल्या होत्या त्या आठवायची. राम्या तिला ज्या दिवशी पहिल्यांदा भेटला तो दिवस, ज्या दिवशी राम्याने तिला लग्नासाठी मागणी घातली, ज्या दिवशी राम्या आनंदात घरी आला आणि आपण उद्यापासुन देवळाबाहेर भीक मागायची असे सांगितले, ज्या दिवशी राजू बाळ पहिल्यांदा दिसलं, त्याला पाहिल्यावर झालेला आनंद हे सारं आठवल्यावर तिला खूप बरं वाटत होतं.

आता त्या फॅक्टरीत तिचा जीव गुदमरत होता. त्यात एक नवरा नसलेली बाई, एक विधवा म्हणून काही पुरूष कामगारांच्या घाणेरड्या नजरांचा होणारा त्रास वेगळाच. शेवटी तिने फॅक्टरीचं काम सोडून परत भिक मागण्याचा निर्णय घेतला. मालकांनी आणि चंदानी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मालक तर तिला तुझा पगार वाढवतो असेही म्हणाले. पण रखमा आपल्या निर्णयावर ठाम होती. भिक मागायचं ठीकाणही तिनं ठरवलं होतं. काही महिन्यांपूर्वी जेव्हा ती अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात गेली होती. तेव्हा तिने पाहीलं होतं की इथे खूप लांबून, देशभरातून भाविक येतात. त्यामुळे इथल्या भिकाऱ्यांनाही चांगले पैसे मिळत असणार. आता ती रोज सकाळी अंबाबाईच्या देवळासमोर भिक मागायला बसायची. राजूही तिच्या सोबत असायचा. फॅक्टरीत काम करून तिला जेवढे पैसे मिळायचे त्यापेक्षा भिक कमीच मिळायची. पण दोन वेळचं जेवण त्यातून निघायचं.

दिवस पटापट पळत होते. राजूही दिवसागणीक वाढत होता. त्याचे आता बरेच नवीन मित्र झाले होते. दिवसभर भिक मागून राजू संध्याकाळी त्याच्या मित्रांबरोबर वेगवेगळे खेळ खेळायचा. कधी क्रिकेट, कधी खो खो, कधी पतंग उडवणे. रखमाला राजूचं खूप कौतुक वाटायचं. जर आपण राजूला पळवून आणलं नसतं तर आज तो किती चांगलं, श्रीमंतीचं आयुष्य जगत असता. आपल्यामुळे आज राजूवर भिक मागायची वेळ आली, असं तिला वाटायचं पण बरेच लोग राजूच्या तोंडाकडे पाहूनच भिक द्यायचे.

तिनं ठरवलं होतं की आपल्याकडे थोडे पैसे जमले की राजूला शाळेत घालयचे. राजू सुद्धा खरच खूप समजुतदार मुलगा होता. तो रोज त्याच्याच वयाची कितीतरी मुलं पाहायचा. पण स्वत:च्या परिस्थीतीचं चांगलच भान त्याला असल्यामुळे त्याने रखमाकडे कधीही “मला हे पाहिजे मला ते पाहिजे” असा हट्ट केला नाही. उलट या परिस्थीतीवर मात करून आपल्या आईसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, जेणेकरून तिला अशी रस्त्यावर भिक मागायला लागणार नाही असे त्याला वाटे.भाग ७

आज राजूचा शाळेचा पहिला दिवस होता. आपल्या आठ वर्षाच्या आयुष्यात आज राजू पहील्यांदा शाळेत गेला होता. राजू इतर मुलांपेक्षा वयाने मोठा असल्यामुळे वर्गात उठून दिसत होता. रखमाही खुप खुश होती. त्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिका चंदाच्या ओळखीच्या होत्या. त्यांच्या ओळखीमुळेच राजूला शाळेत प्रवेश मिळाला होता. राजू रोज न चुकता शाळेत जात होता. बाईंनी दिलेला गॄहपाठ देखील तो रोज करायचा. राजूला अभ्यास करतांना पाहून रखमाही सुखावून जायची. तिच्या आख्या घराण्यात कोणी कधी अभ्यास केला नव्हता. रखमा आणि चंदाला तर तशी संधीच मिळाली नव्हती. जे आपल्या बाबतीत घडलं ते राजूच्या बाबतीत घडू नये असे तिला वाटायचे. राजू मोठा ऑफिसर बनावा अशी तिची इच्छा होती. आजकाल रखमाला पैसे बरेच मिळत होते. जेवढं मिळतय तेवढ्यात ती समाधानी होती. पण रखमाचं भिक मागणं चंदाला काही आवडलं नव्हतं. ती अनेकदा रखमाला म्हणायची की आपणं तुझ्यासाठी एखादं काम बघू, हवंतर मी मालकांशी बोलते, पण रखमा काय तिचं ऐकायची नाही. रोज जे पैसे मिळायचे त्यातले थोडे ती राजूच्या शिक्षणासाठी बाजूला काढून ठेवायची.

राजूची परीक्षा आता जवळ आली होती. त्याचा आभ्यास चांगला झाला होता. आपल्याला चांगले मार्क मिळणार याची त्याला खात्री होती. पटापट दिवस पळत होते, आणि एकदाचा परीक्षेचा दिवस उजाडला. रखमाच्या पाया पडून राजू परीक्षेसाठी निघाला. त्याला पेपर खूप सोपा गेला. काही दिवसातच परीक्षा संपली. राजूला सगळेच पेपर चांगले गेले होते. महिनाभरात निकाल आला. राजू वर्गात पहिला आला होता. बाईही राजूवर खूप खुश होत्या. रखमाला तर प्रमाणाबाहेर आनंद झाला होता. इतका, की तिने तिच्याजवळ साठलेल्या पैशातून राजूसाठी स्वत: दुकानात जाऊन भारीतला शर्ट आणला होता. एक दिवस राजू झोपला असतांना तिने हळूच तो शर्ट बॉक्स सकट राजूच्या दप्तरात टाकला. सकाळी उठल्यावर वह्या ठेवण्यासाठी राजूने दप्तर उघडलं तर आत एक बॉक्स. त्या बॉक्सवर लिहीलं होतं, “माझ्या पोरा तुला जेवडे मार्क पडले तेवढे आपल्या खांदानात कदी कुनाला मिळाले न्हाइत तुज्या यशाबद्दल तुज्या या आडानी आईकडून तुला हा शर्ट गीप्ट. असाच अभ्यास करत रहा.”

हे वाचून राजूच्या डोळयात पाणी तरळलं, आपण रडतोय हे आईला कळू नये म्हणून त्याने दप्तर पाठीला लावलं आणि तो तिथून निघाला. रखमा आतून सगळं पाहात होती. तिचे ही डोळे पाणावले होते. तिला खात्री होती राजू मोठा झाल्यावर मोठा ऑफीसर बनेल आणि आपल्याला या परिस्थितीतून बाहेर काढेल. तिने ठरवलं काहीही झालं तरी राजूला काही पण कमी पडून द्यायच नाही. त्याच्या शिक्षणात कोणताही अडथळा येता कामा नये.

राजू केवळ आभ्यासात हुशार नव्हता तर, त्याला खेळायलाही आवडायचं. दर रविवारी तो झोपडपट्टीतल्या मुलांबरोबर क्रिकेट खेळायला कोल्हापुरात जायचा. आधी लहान म्हनूण त्याला ती मुलं खेळायला नेत नव्हती. पण वयाच्या मानानं तो खरच खूप चांगला खेळायचा. त्यामुळे त्याचा खेळ पाहून हळूहळू त्यालाही खेळायला घेऊन जायचे. वयाने जरी तो सर्वात लहान असला तरी त्याच्या टीममध्ये सर्वात चांगली बॅटींग राजूच करायचा.

शाळेत सुद्धा राजूचे बरेच मित्र झाले होते. राजूची शाळा उशीरा सुरू झाल्यामुळे वर्गातील इतर मुलं राजूपेक्षा वयान लहान होती. पण मोठा म्हणून राजूने कधीच दादागिरी केली नाही. प्रमोद हा राजूचा एकदम खास मित्र. पण प्रमोदची परिस्थिती राजूच्या एकदम विरूद्ध होती. त्याचे वडील गावचे सावकार होते. तशी प्रमोदला शिकण्याची काहीच गरज नव्हती. पुढच्या सात पिढ्या बसून खातील इतका पैसा प्रमोदच्या वडीलांनी कमावला होता. गावातला एक पेट्रोलपंपही त्यांच्याच मालकीचा होता. पण मुळात प्रमोदला अभ्यासाची आवड होती. राजू आणि प्रमोद मध्ये पहिल्या नंबरसाठी स्पर्धा असायची. पण चौथी पर्यंत राजूने पहिला नंबर सोडला नाही. त्यामुळे प्रमोदला दुसऱ्या नंबरवर समाधान मानावे लागले.

पाचवीत गेल्यावर राजूने कोल्हापुरच्या प्रायवेट हायस्कूलमध्ये ऍडमिशन घेतली. प्रमोदने पण तिथेच ऍडमिशन घेतली. प्रमोदच्या वडीलांनी राजूला एक जुनी सायकल दिली होती. राजू रोज सायकलने शाळेत जायचा. प्रमोद मात्र रिक्षाने यायचा. शनिवारी शाळा सकाळी लवकर चालू व्हायची. रस्त्यावरून राजूला बरेच लोक चालतांना दिसायचे. अशावेळी वेगवेगळया प्रकारचे लोक त्याला पहायला मिळायचे. काही स्थुल पुरूष आणि बायका वजन कमी करण्यासाठी रस्त्यावरून पळायचे, काही म्हातारी माणसं व्यायामाच्या नावाखाली घरातून बाहेर पडायचे आणि कट्यावर गप्पा मारत बसायचे हे पाहून राजूला गंमत वाटायची. काही माणसं कुत्र्याला घेऊन फिरायचे. त्या कुत्र्यांकडे बघून राजूला कधीकधी हेवा वाटायचा आणि रागही यायचा. लोक या कुत्र्यांचे किती लाड करतात. त्यांना कपडे काय घालतात. रोज फिरायला काय नेतात. त्यांना थंडी वारा लागू नये म्हणून त्यांच्यासाठी घर काय बांधतात. त्याला रोज न्हाऊ काय घालतात. कुत्र्याचा जन्म घेऊनही ही पाळलेली कुत्री किती ऐशआरामात राहतात, आयुष्य जगतात. आणि मनुष्याच्या जन्माला येऊनही आपण गरीबीत जगतो, असं त्याला वाटायचं.

पाचवीची सहामाही परीक्षा जवळ आली होती. राजूचा अभ्यास जोरात चालू होता. पण आता शाळेत पहिलं येणं आधी इतक सोप नव्हतं. कारण आधीची शाळा छोटी होती. आणि तिथ केवळ गावातलीच मुलं होती. पण आता संपूर्ण कोल्हापूर आणि जवळपासच्या खेड्यांमधली मुलं होती. त्यामुळे पहिला नंबर टीकवणं तितकं सोपं नव्हतं. प्रमोद सुद्धा खूप अभ्यास करत होता. शेवटी परीक्षेचा पहिला दिवस उजाडला. पहाटे उठूनच राजूने एक उजळणी केली. रखमाच्या पाया पडून तो घराबाहेर पडला.

थोड्याच दिवसांत परीक्षा संपली. नेहमीप्रमाणे यावेळीही राजूला सगळेच पेपर सोपे गेले होते. बाहेर फिरणे, प्रमोदच्या घरी कॅरम खेळणे आणि क्रिकेट यामुळे सुट्टी पण चांगली गेली आणि एकदाचा रिझल्टचा दिवस उजाडला. यावेळीही राजूने पहिला नंबर सोडला नाही. रखमालाही आता राजूच्या पहिल्या नंबरची सवय झाली होती. तिनं खास राजूसाठी तुपातला शिरा केला होता. गेली तीन वर्ष ती राजूच्या रिझल्टच्या दिवशी शिरा करत होती. राजूला केवळ रिझल्टच्या दिवशीच शिरा खायला मिळायचा. प्रमोदच्या आईने राजूला जेवायला बोलावलं होतं. प्रमोद सुद्धा शाळेत पाचवा आला होता. इतक्या गरीब परिस्थीतीत देखील हा मुलगा एवढा चांगला अभ्यास करून शाळेत पहिला येतो, याचं प्रमोदच्या आई वडीलांना फार कौतुक वाटायचं. राजूने त्यातल्या त्यात चांगला शर्ट घातला आणि तो प्रमोदकडे जेवायला गेला. तिथे आत्तापर्यंत न पाहिलेले वेगवेगळे पदार्थ तो पाहात होता. अर्थात हे सगळे पदार्थ प्रमोदच्या आईने बनवले नव्हते. त्यांच्याकडे स्वयंपाकासाठी गडी माणसं होती. जाताजाता प्रमोदची आई राजूला म्हणाली, “तू आणि प्रमोद असाच अभ्यास करत रहा, आणि पुढच्यावेळी येतांना बरोबर आईलाही आणं.” राजूने नुसतीच मान डोलावली आणि तिथून निघाला. त्याच्या मनात विचार चालू होते. प्रमोदची आई किती भारी साड्या घालते. तिच्या हाताखाली किती नोकर चाकर आहेत. आणि आपल्या आईने नवीन साडी घेऊन किती वर्ष झाले. त्याने आपली आई काय करते हे अजून प्रमोदला सुद्धा सांगितलं नव्हतं. आणि प्रमोदने सुद्धा आपणहून राजूला तसं कधी विचारलं नाही.

रिझल्ट नंतर शाळा आता परत सुरू झाली होती. एक हुशार विद्यार्थी अशी राजूची शाळेत ओळख झाली होती. शिक्षकांनी कोणताही प्रश्न विचारला की राजूचा हात पहिला वर जायचा. बहुतेक सर्व शिक्षक राजूवर खुश असायचे. गणित विषय शिकवणाऱ्या फडके सरांचा तर तो फारच लाडका होता. सरांनी एखादं गणित फळयावर सोडवण्याच्या आधी राजूच्या वहीत ते सोडवलेल असायच. मुळातच गणित हा राजूचा आवडता विषय होता.

वर्गात जशी हुशार मुल होती, तशीच काही टारगट, मवाली मुलही होती. पण राजू मात्र फारसा त्या मुलांमध्ये मिसळत नसे. कारण रखमाने आधीच राजूला सांगितलं होत, चांगल्या मुलांबरोबरच मैत्री कर. मवाली, गुंड मुलांपासून दूरच राहात जा असे तिने राजूला सांगितले होते. राजू जरी अशा मुलांबरोबर राहत नसायचा तरी प्रमोद मात्र सर्व मुलांमध्ये मिसळत असे. बबन रोकडे हा प्रमोदचा चांगला मित्र झाला होता. बबनच्या वडलांचे दोन बार होते आणि गावाकडे मजबूत शेती होती. बबनचे वडील आणि प्रमोदचे वडील लहानपणापासूनचे मित्र होते. बबनच्या वडीलांना प्रमोदच्या वडीलांनी अडचणीच्या काळात आर्थीक मदत देखील केली होती. बबन आणि प्रमोदचं एकमेकांच्या घरी कायम येणं जाणं असे. पण बबन आणि प्रमोदच्या घरची श्रीमंती हे केवळ एकच साम्य होत. प्रमोद जेवढा अभ्यासू होता बबन तेवढाच उनाडक्या करणारा आणि मवाली होता. गावातल्या मुलांबरोबर दादागीरी करणं, दमदाटी करणं, मागच्या बेंचवर बसून टींगल करणं आणि अभ्यासू शांत मुलांना त्रास देणं हे सारे उद्योग तो शाळेत करायचा. गावातील इतरही काही श्रीमंत बापाची मुलं या सगळ्यात सामील असायची. बऱ्याच वेळेस बबन शाळा चुकवून सायबर कॅफेत गेम खेळायला जायचा. शाळा चुकवून गेम खेळणे हा त्याचा छंद होता. बबन एकुलता एक असल्यामुळे घरच्यांनी त्याला फारच लाडावलं होतं. तो जे मागेल ते वडील त्याला आणून देत असत. बबन जेव्हा जेव्हा बाबांकडे पैसे मागायचा तेव्हा ते लगेच पाकिटातून पैसे काढून बबनच्या हातावर ठेवायचे. एवढे पैसे तुला कशासाठी लागतात असे एकदाही त्यांनी बबनला विचारलं नाही, त्यामुळे बबनलाही पैश्याची किंमत नव्हती. मनात आलं की तो मित्रांना घेऊन हॉटेलात जायचा आणि स्वतःच्या पैश्यानी त्यांना जेऊ घालायचा.

प्रमोदला खरतर बबनचं हे वागणं आवडत नव्हतं पण बबनचा स्वभाव त्याला चांगलाच माहित असल्यामुळे तो बबनला काहीच बोलायचा नाही. बबनमध्ये एक चांगला गुण पण होता. एखाद्या गरीब मित्राने मदत मागितली तर एक क्षण ही विचार न करता त्या मित्राला मदत करत असे. त्याच्या या गुणाचा बरेच मित्र गैरफायदा घ्यायचे. केवळ पैश्यासाठी सुद्धा बबनसमोर त्याचे कौतुक करायचे आणि पाठीमागून त्याला नावं ठेवायचे.

बबन गावतल्या हुशार मुलांना जरी त्रास देत असला तरी, राजू प्रमोदचा मित्र असल्यामुळे बबनने राजूला कधीच त्रास दिला नाही. उलट “तुझ्या मित्राला सुद्धा माझ्या घरी घेऊन ये” असं तो प्रमोदला बऱ्याच वेळा म्हणायचा, पण राजू काही यायचा नाही. खरतर राजूला आपल्या परिस्थितीची लाज वाटायची. जास्तीत जास्त अभ्यास करून नोकरी करायची आणि आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं असा निश्चय राजूने केला होता.

आता पाचवीच्या वार्षीक परीक्षेला थोडेच दिवस उरले होते. राजूचा अभ्यास जोरात सुरु होता. काहीही करून त्याला पहिला नंबर पटकवायचा होता. प्रमोद्चाही अभ्यास छान चालला होता. परीक्षा काही दिवसावर येऊन ठेपली असून देखील बबनच्या दिनचर्येत काहीच फरक नव्हता. मित्रांसोबत फिरणे, सायबर कॅफेमध्ये जाऊन दिवसभर गेम खेळणं, एखाद्या हुशार मुलाच्या घराजवळ जाऊन त्याला हाक मारून हैराण करणे हे सगळं त्याचं चालू होतं. परीक्षेला त्याचा नंबर प्रमोद मागेच असल्यामुळे तो जमेल तेवढं प्रमोदच्या पेपर मध्ये पाहूनच पेपर लिहित असे आणि कसाबसा पास होत असे. प्रमोद सुद्धा मित्र म्हणून शिक्षकांचं लक्ष नसतांना त्याला पेपर दाखवत असे.

वार्षिक परीक्षेत देखील अपेक्षेप्रमाणे राजू गावात पहिला आला. आता रखमालाही याची सवय झाली होती. तिला आता फारसं काही वाटलं नाही. मात्र तिला आपल्या मुलाबद्दल अभिमान आणि कौतुक वाटायचं. एखाद्या भिकाऱ्याला महिनाभर भिक मिळाली नाही आणि एक दिवस त्याच्या वाडक्यात सोन्याच नाणं पडावं तसं देवाने हे पोरगं आपल्या पदरात टाकलय असं तिला वाटायचं आणि तिचं उर भरून यायचं. तिच्या अंधारमय जीवनात एक कोपरा उजळून टाकणारा तोच एक दिवा होता.


क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy