Aditya Adake sk

Horror Romance Action

2  

Aditya Adake sk

Horror Romance Action

मोह...

मोह...

7 mins
189


तो सर्व भाग अतिशय दाट अशा झाडांनी व्यापला होता. सह्याद्रीची उंचच्या उंच शिखरं आभाळाला मस्तकं लावून कणा ताठ करून उभी होती. जणू देसाईवाडीवर कधीच कुठलच संकट येऊ नये म्हणून ते सह्याद्रीचे कडे शिवरायांच्या मावळ्यांसारखे अखंड उभे होते. अक्राळविक्राळ ढग पैलवानाच्या गतीनं येऊन त्या कड्यांवर आदळून उद्ध्वस्त होत होते.

पूर्वेकडून एक वळणवाट डोंगर उतरून नागमोडी वळण घेत देसाईवाडीकडे गेली होती... त्या वळणवाटेला झाडाझुडपांनी दोहोबाजूंनी वेढा दिला होता. सभोवतालच्या वातावरणाला कसलातरी दुःखाचा गंध येत होता. काहीतरी आक्रीत नक्कीच घडणार होत.

पहाटेची वेळ असल्याने सूर्यभानरावाला घोडा नीट पळवता येत नव्हता. त्याचा तो अस्मानी वेग धारण करणारा सफेद वर्णाचा घोडा सुद्धा त्या अंधाऱ्या पहाटे वाट चुकत होता, पण क्षणात सूर्यभान त्याला परत टाच मारून मार्गाच्या वाटेला आणत होता. पूर्ण वातावरणात घोड्याच्या टापांचा आवाज तेवढा घुमत होता बाकी चराचर शांत भासत होते. काही अंतर राखून कुणीतरी सुर्यभानरावच्या मागोमाग येत होतं, ते साधारण सात ते आठ जण असावेत. त्यांची गती एकदम सौम्य होती , हालचाल क्षीण जाणवत होती. बहुदा त्यांना समोरच्या माणसाला आपला सुगावा लागू द्यायचा नसावा. दिवसभर पोटासाठी वणवण करणारे निसर्गातील हरएक जीव गाढ निद्रिस्त अवस्थेत होते.

आपली तलवार नीट आहे का ते तपासून घेत आपण देसाईवाडीच्या वेशीवर पोहचल्याची त्याने खात्री करून घेतली. अजून कडूस पडायला अवकाश होता. सूर्यभानरावने घोड्याला लगाम देत , हळुवार तो घोड्यावरून खाली उतरला. त्याला आज कुठलीही गलती करून हार पत्करायची नव्हती. ज्या कामगिरीवर तो आज आला होता ती कामगिरी काहीही करून आज त्याला फत्ते करायची होती. घोडा वेशीवर ठेवत दबक्या पावलांनी त्याने कुलकर्ण्याचा वाडा जवळ केला. तोंडावर केशरी तलम कापड अच्छादून घेत त्याने आपले अस्तित्व त्या काळोखाला अर्पण केले.

वाड्याला समोरून भक्कम दरवाजा होता त्यामुळं मागच्या बाजूने आत जाण्यावाचून त्याच्याकडे पर्यायच नव्हता. तटाला मागील बाजूस घनदाट अरण्य लागून होत.त्याच ठिकाणी आक्रमणाच्या वेळी निसटून जाण्यासाठी एक लहान पण मजबूत दरवाजा होता तो आतूनच बंद असायचा.

वाड्याच्या मागच्या बाजूला तटाला लागूनच जंगली बाभूळ वाड्याला वेडावन दाखवल्यागत अक्राळविक्राळ उभी होती. त्या बाभळीचा काटा बोटभर लांब होता.खोड तटाला लागून सरळ आणि परत वेडेवाकडे पसरले होते. अमावस्येच्या त्या काळोखात सुद्धा त्याला ते झाड स्पष्ट दिसत होते , गेल्या कित्येक दिवसांच्या निरीक्षणाचा त्याचा तो अंदाज होता. सुर्यभानचा घोडा वेशीवर दिसताच ते सगळे थांबले लांबूनच त्यांनी घोड्याजवळ कुणी नसल्याचा कयास पक्का केला. हातभर अंतरावर येत त्यांनी घोड्यांना लगामी दिल्या, सगळे भरभर खाली उतरले. प्रत्येकाने आपापल्या कुर्हाडी पाठीवरून काढत हातात घेतल्या. इशारत होताच सगळेच्या सगळे वेगवेगळ्या दिशांनी गावात शिरते झाले. त्यांच्या चालण्यात एक वेगळाच वेग होता, प्रत्येकाचं पाऊल भक्कम होत. मारू अथवा मरू म्हणत खंडेरायाचा जप करत ते सगळे वेगवेगळ्या मार्गानी कुलकर्णी राहत असलेल्या वाड्याच्या आसपास पोहचले.

सुर्यभानने बाभळीवरून तटावर उतरत पहिली चढाई यशस्वी केली होती. आता प्रश्न होता तटावरून खाली उतरण्याचा , उडी मारली तर आवाजाने पहारेकरी सावध होण्याची शंका होती. त्यामुळंच की काय त्याने कंबरेचा दोरखंड सोडून बाभळीच्या एका मजबूत फांदीला बांधत आतील बाजूस सोडला. दोर धरत हळूहळू तो खाली उतरला. त्याला तटाच्या आत उतरताच समोरच्या वाड्याच्या भव्यतेची जाणीव झाली. तो भान हरखून त्या वाड्याची कारागिरी बघत उभा झाला. अतिशय रेखीव पद्धतीने कोरलेले ते दगडी बांधकाम बघताना त्याला आपण राहत असलेल्या जंगलातील त्या ओबडधोबड पाषानांची उगीचच दया आली. काहीवेळाने भानावर येत तो भिंतींच्या आडाने त्याच्या इस्पिताकडे सरकू लागला. 

सूर्यभान वाड्याच्या आत गेल्याच समजताच बाहेरील त्या साऱ्यांच ह्रदय धडधडू लागलं.सौम्य अशी भीतीची लहर प्रत्येकाच्या मनात चमकून गेली , भयंकर अशा थंडीत सुद्धा घामाचे थेंब त्यांच्या कपाळावर जमू लागले. पुढं काय होईल या विचारांनी त्यांची मस्तके ठणकू लागली. पण बाहेर वाट बघत बसण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नव्हता.

एक एक खोली सरकत अखेर सूर्यभान त्या सागवानी पायऱ्यांजवळ येऊन पोहोचला.

तोच साऱ्या चारचरातील शांततेला भंग करत , चर्रर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज झाला तस त्याने स्वतःला अंधारात फेकत मागे बघितले, दिवाणखोलीचा दरवाजा उघडून कुणीतरी बाहेर पडले होते. डोक्यावर असलेल्या काळ्या टोपी अन नेसलेल्या धोतरामुळे तो मुनीमच असावा अशी त्याची खात्री पटली. अनेक पहारेकर्यांना चुकवत तो इथपर्यंत येऊन पोहचला होता.पण खरी कामगिरी अजून बाकी होती. आवाज न करता त्याने एक एक पायरी चढायला सुरवात केली. वरच्या मजल्यावर येताच त्याला हवी असलेली खोली समोरच दिसली. इकडं तिकडं बघत त्याने दरवाजावर विशिष्ट प्रकारच्या खुणेन आपल्या उजव्या हाताचा अंगठा वाजवला. क्षणात आतुन हालचाल जाणवली. दार उघडलं गेलं आणि समोरच्या व्यक्तीने त्याला आत ओढत घट्ट मिठी मारली. तिच्या त्या उबदार स्पर्शाने त्याच्या अंगातील थंडीचा जोर वितळू लागला. तिच्या भावनांना मोकळी वाट करून देत त्याने तिच्या केसांमधून आपला हात फिरवत मानेवर आणला तसे तिचे शरीर शहारले , तिच्या मखमली त्वचेवर होणारा त्याचा स्पर्श तिला नवखा वाटू लागला......


किती उशीर केलासा , आज तुमि येत नव्हता तर म्या जीवच देणार हुते. तिचा आवाज सुद्धा तिच्यासारखाच गोड होता.

अन मी बरा तुला मरू दिन ग ?? 

त्याच्या मिठीतील जोर वाढवत तो बोलला.

सूर्यभानराव आज आत्ताच्यालाच म्या तुमच्याबर येणार हाय, मला आता ह्या नारकातन आझादी द्या.मला एकदा तुमच्या नावान हे कपाळ कुंकू लिउद्या , म्हंजी उद्या जरी मरण आलं तर मला फिकीर नसलं.

मरणाची भाषा करू नये राणीसाहेब, म्या तुमास्नी न्यालाच आलोया की. चला जाऊया, बाहेर पारा बी ढिला हाय.


सूर्यभानरावणे पुन्हा एकदा बाहेर डोकावून बघितलं पहारेकरी गाढ झोपेत होते. तो खूप खुश होता. त्याची गुना आज कायमसाठी त्याची झाली होती. अखेर त्याच प्रेम त्यान मिळवलं होत. बाहेर कुणी जाग नसलेलं बघून त्यांन बाहेर पाय टाकला तोच तीन त्याला परत आत ओढून घेतलं, पुन्हा एकदा त्याला मिठीमध्ये घेत तिने त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले त्याच्या सर्वांगावरून सरसरून काटा उभा राहिला. तो स्पर्श त्याला आणखी हवाहवासा वाटू लागला. प्रणयाच्या धुंदीन त्याला सभोवतालच्या परिस्थितीचा विसर पडला. दोघांच्या शरीरावरील कपड्यांची अडसर दूर होऊ लागली. आणि त्याच वेळी दारातून दहा-बारा पहारेकरी एकदम आत आले.धरा त्याला मुसक्या आवळा त्याच्या, अचानक आलेल्या त्या आवाजाने सूर्यभान गांगरून गेला. त्यानं दरवाज्याकडे बघितलं आणि त्याला दरवाज्यात कुत्सित हास्य करत उभा असलेला कुलकर्णी दिसला. त्यान कमरेला हात घालुन आपली तलवार ऊपसन्याचा प्रयत्न केला, पण त्याची तलवार तिने कधीची काढून त्याच्यापासून दूर फेकली होती. क्षणात त्याला साऱ्या गोष्टींची उकल झाली, आपण कैद झालो या गोष्टीवर त्याचा विश्‍वास बसत नव्हता. पुन्हा एकदा शरीरसुखाच्या मोहापायी एक मर्द फसला होता. क्षणात त्याला त्यांन आत्तापर्यंत आपल्या लोकांसाठी उभारलेल्या क्रांतीची आठवण झाली. आपल्या लोकांवर होणारा अन्याय मोडून काढण्यासाठी त्यांन खूप मोठी लढाई उभी केली होती, त्या लढाईचे नेतृत्व तोच करत होता. पण नेतृत्वाचा सर्वात मोठा गुण तो विसरून गेला होता आणि त्याचीच शिक्षा म्हणून आज तो कैद झाला होता.

बाहेर उभारलेल्या लोकांनी आत काहीतरी गडबड झाल्याच ओळखून पटापट बाभळी वरून तटावर आणि तटावरून आतल्या बाजूस उड्या घेतल्या. वाड्याच्या आतील बाजूस सर्व पहारेकरी खडखडीत जागे होते. मागून अचानक आलेल्या सात ते आठ जणांवर सारे पहारेकरी तुटून पडले, अगोदरच परिस्थितीची जाणीव असलेल्या त्या सात ते आठ जणांनी पहारेकऱ्यांच्या माना मारण्यास सुरुवात केली. सपासप वार होऊ लागले कित्येक धडे शरीरापासून वेगळी होऊ लागली. सगळीकडे एक भयंकर रक्तपात माजला. बाहेरील पहारेकऱ्यांना ठार करत ते सारेजण वाड्याच्या आत मध्ये शिरले. तोवर सूर्यभानला बांधून घालण्यात आलं होतं.

वरील खोलीच्या खिडकीमधून कुलकर्णी बाहेरील सगळी परिस्थिती बघत होता. पहारेकरी कोसळताच त्याचं मन सुद्धा कोसळून गेलं होतं. आता आपण जगणार नाही याची खात्री त्याला पटत होती म्हणूनच त्यांन त्या स्त्रीला आपल्या सोबत घेऊन वाड्याच्या दुसरीकडील बाजूस पळ काढला पण त्याच्या मनात काहीतरी भलतचं होतं. तो त्या स्त्रीला घेऊन सरळ वाड्याच्या सर्वात वरील बाजूस गेला. आधीपासूनच वर ठेवलेल्या बंदुकीत त्यान काडतूस भरलं, आणि वाड्याच्या मागील बाजूस नेम धरून तो शांत उभा राहिला.

समोर येईल त्याला गारद करत ते सगळे जण सूर्यभान असलेल्या खोलीत येऊन पोहोचले. सूर्यभानची झालेली अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी सूर्यभानला मोकळं केलं आणि वाड्याच्या मागच्या बाजूने पळून जाण्याचा इशारा दिला, आम्ही इथल बघून घेऊ तुम्ही मागच्या बाजूने वस्तीकडे चला असं म्हणताच सूर्यभान मागच्या बाजूस गेला. आणि उरलेले सगळे समोरच्या दरवाजाने बाहेर गेले.

वाड्याच्या बाहेर येताच सूर्यभानला काहीतरी आठवलं आणि तो वार्याच्या वेगाने पुन्हा एकदा त्याच खोलीत गेला, कोपऱ्यात पडलेली त्याची तलवार त्यांन उचलली आणि त्याच्या मनात विचार चमकला. याच तलवारीच्या जीवावर आपण अनेक अन्याय करणाऱ्यांच्या माना मारल्या, याच तलवारी च्या जीवावर आपण आज पर्यंत आपल्या लोकांसाठी अखंड लढा दिला, त्याच तलवारी कडे बघत त्यांन मनात काहीतरी निश्चय केला आणि तो पुन्हा एकदा वाड्याच्या मागील बाजूस निघाला.

त्यांन मघाशी बांधलेला दोरखंड जणू त्याचीच वाट बघत तिथच होता, दोरखंड धरत त्यान तट चढण्यास सुरुवात केली तटाच्या सगळ्यात वरच्या बाजूला तो आला, एक पाय पलीकडच्या बाजूस टाकून बाभळीच्या फांदीला धरण्याचा विचार तो करतच होता की त्याच्या उजव्या पायाच्या चिंधड्या करत एक गोळी आरपार तटाला जाऊन भिडली. गगनभेदी किंचाळी फोडत सूर्यभान तटाच्या मागील बाजूस कोसळला. कुलकर्न्यान डाव साधला होता त्याचा नेम जरी चुकला असला तरी त्यांन सूर्यभानला जन्माचा अधू करण्यात यश मिळवलं होतं. सूर्यभानचा तोच अस्मानी वेग असलेला सफेद वर्णाचा घोडा तिथेच तटाच्या बाहेरील बाजूस येऊन थांबला होता. त्याच्या पायातून वेगात रक्त बाहेर पडत होतं पायातील जखमेची ठणक थेट त्याच्या मेंदवापर्यंत जाऊन पोहोचत होती. तशाच अवस्थेत त्यांन घोड्यावर उडी घेतली आणि वाऱ्याच्या वेगानं वस्ती जवळ करण्यास सुरुवात केली.

नागमोडी वळणे घेत डोंगरावरून देसाईवाडी कडे आलेल्या वळण वाटेने सूर्यभानरावचा घोडा डोंगराच्या दिशेने बेफाम पळत होता. त्या घोड्याला जणू आपल्या धन्याला जिवंत तळापर्यंत न्यायचं होतं.

घोडा वस्तीवर पोहचेपर्यंत चारी दिशा केसरी रंगाच्या छटांमध्ये परावर्तित व्हायला सुरवात झाली होती. सगळीकडे पक्षांच्या किलबिलाटाने वातावरण प्रफुल्लित झालं होतं, पण तरीही सूर्यभानरावच्या तळावर स्मशान शांतता होती जणू मरणकळाच तिथं पसरली होती. वाड्याबाहेर पडल्या पडल्या त्या सात आठ जणांनी बंदूकीचा आवाज ऐकला होता. धनाजी रामोश्याने बंदुकीच्या आवाजावरून बंदूक अन बंदुकीवरून तिचा मालक ओळखला होता, आणि ती गोळी सुर्यभानरावच्या जीवाचा ठाव घेऊन गेली असणार अशी खात्रीच त्यांची झाली होती. सूर्यभान आता आपल्यात राहिला नाही ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण तळात पसरली अन् आयाबायांनी हंबरडा फोडला, तरुण पोरांना बाप गेल्यासारखं दुःख झालं, तर म्हाताऱ्या-कोताऱ्यांनी सगळं संपलं म्हणून अंग टाकलं.

(क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from Aditya Adake sk

Similar marathi story from Horror