शुभम भावे

Horror

4.5  

शुभम भावे

Horror

मिस्ट्री हाऊस

मिस्ट्री हाऊस

29 mins
623



गोव्यातील एका भल्यामोठ्या बंगल्याजवळ एक गाडी येऊन थांबली. बंगल्याच्या केअरटेकरने लगबगीने पुढे होऊन बंगल्याचे लोखंडी प्रवेशद्वार उघडले. ती गाडी आत बंगल्याच्या दरवाज्यासमोर थांबली. गाडीतून अमेय, त्याची पत्नी शारदा आणि १२ वर्षांची मुलगी किमया उतरले. "तर, हा आहे आपला नवीन बंगला." अमेय हात फैलावत म्हणाला. शारदा बंगल्याचं निरीक्षण करत होती. "छान आहे. तीन मजल्यांचा प्रशस्त आहे. पण थोडा जुना वाटतोय." शारदाने आपला रिमार्क दिला. "जुना तर आहेच. हा बंगला १८८४ मध्ये इंग्रजांनी बांधला होता." अमेय आपल ज्ञान पाजळत म्हणाला. "पण तरी मला आश्चर्यच वाटतय. एवढा मोठा बंगला आपल्याला इतक्या कमी किंमतीत कसा मिळाला." शारदाने आपला संशय व्यक्त केला. "अग आता तूच तर म्हणालीस ना की हा बंगला जुना वाटतोय म्हणून. आणी काही लोकांनी या बंगल्याबद्दल गैरसमज पसरवले आहेत." अमेय म्हणाला.


कसले गैरसमज ? शारदाने विचारलं


हेच की या घरात भूत-प्रेत वगैरे आहेत म्हणून… अमेय उत्तरला.


"बाबा, ही भूत खरच असतात का हो ?" छोटी किमया आपले डोळे मोठे करत म्हणाली.

नाही बेटा, हे काही खरं नसतं. हे रिकामटेकड्या लोकांच्या रिकामटेकड्या गोष्टी आहेत. अमेय बोलता झाला . बरं मग आपला इथेच मुक्काम करायचा विचार आहे का आतही जायच आहे. एवढा वेळ विचारात गुंतलेली शारदा त्याच्या ह्या प्रश्नाने भानावर आली. ते आता गृहप्रवेशासाठी सज्ज होते.

अमेयने आपल्याकडील चावीने दरवाजाचे कुलुप उघडले. दरवाजा उघडता क्षणी एक थंड वाऱ्याची झुळूक त्या तिघांच्याही अंगावर शहारे देऊन गेली. अमेय, शारदा आणि किमया यांनी घरात प्रवेश केला. "येssss आपल मोठ्ठ घर" अस म्हणून किमया आनंदाने बागडत घरभर फिरू लागली. सामान अगोदरच घरात शिफ्ट करण्यात आलं होतं. फक्त थोडी धूळ साचल्याने सफाईची गरज होती. शारदाने सर्वात आधी आपला मोर्चा किचनकडे वळवला. अमेय हॉलमध्ये उभ राहुन घराचं निरीक्षण करत होता. अचानक त्याचं लक्ष मागच्या दरवाज्याबाहेर bag  घेऊन उभ्या असलेल्या केअरटेकरकडे गेले. "रामूकाका, काय झालं, असे बाहेर का उभे आहात, आत या." अमेय म्हणाला. रामूकाका हळूहळू आत आले. त्यांच्या हातातल्या बॅगा त्यांनी बाजुला ठेवल्या आणि म्हणाले, "साहेब हे घर तुम्ही घ्यायला नको होतं." 


"का?" अमेयने चमकुन विचारल.


साहेब, या घरात काहीतरी आहे. 

हो, बरोबर या घरात खूप धूळ आहे. साफसफाई करावी लागेल. 


ते नाही साहेब. या घरात काहीतरी अघोरी शक्ती आहे.


काय. अघोरी शक्ती. रामूकाका तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला तरी कळतय का?


साहेब, तुमच्या इथे येण्याआधी अनेक विचित्र घटना घडल्या आहेत. 


कसल्या घटना ? अमेयने कुतुहलाने विचारलं.


काही घटनांच स्पष्टीकरण देता येत नाही साहेब. फक्त अनुभव घेता येतो.


अमेय काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलला. "हा बोल जयंता" 


अम्या, कुठेस तू ?


नवीन घरी. का ?


अबे यार, आपल्या हिटलर बॉसने आपल्याला ऑफिसला बोलावलय. काहीतरी महत्त्वाच काम आहे म्हणे.


अरे पण आज तर रविवार आहे ना


ते माहीतये. पण बॉसने बोलावलय म्हणजे जाव लागेल.


बरं ठिक आहे येतो मी. इतकं बोलून अमेयने  फोन ठेवला ना ठेवला तोच अचानक त्याच्या कानावर शारदाची किंचाळी पडली.  शारदाच्या किंचाळण्याने अमेय आणी रामुकाका दोघंही किचनकडे धावले. किचनमध्ये शारदा खिडकीच्या बाहेर एकटक पाहत होती. तिचा चेहरा भीतीने पिवळा पडला होता. अमेयने तिच्या जवळ जाऊन चौकशी केली. ती सर्वांगाने थरथरत होती. थरथरत्या हाताने तिने खिडकिच्या बाहेर पिंपळाच्या झाडाकडे बोट दाखवले. अमेयने बाहेर पाहीले पण त्याला तिथे काहीच दिसले नाही. "अग काय दिसलं तुला काही सांगशील का नाही." अमेय वैतागुन म्हणाला.


 शारदाने आवंढा गिळला आणी थरथरत म्हणाली, "मी...मी इथे किचनच्या बाहेर पाहत होते. अचानक माझं लक्ष त्या पींपळाच्या झाडाकडे गेले. त्यावर कोणीतरी बसलेलं. कोण आहे हे पाहण्यासाठी खिडकीच्या जवळ गेले. तर अचानक त्याने चेहरा वर केला. त्याचा चेहरा एकदम विक्रुत होता. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि एकदम गायब झाला. 


अमेय, मला वाटतं रामुकाका बरोबर बोलतायत. इथे नक्कीच काहितरी आहे आपण इथे नको राहुयात. प्लीज....." शारदा घाबरत घाबरत बोलली.  "ओ जस्ट शट अप शारदा." अमेय ओरडतच बोलला, "बस झालं आता माझ्याकडे असल्या फालतु गोष्टींसाठी वेळ नाहीये. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत, वास्तविकता नाही. आता हे विचार डोक्यातून काढून टाक. रामुकाका तुम्ही कृपा  करुन तिच्या डोक्यात असलं काही भरवू नका. मला अर्जंट ऑफिसला जावं लागतय. घरी यायला उशीर होईल." यावर कोणालाही बोलायची संंधी न देता अमेय तडक घरातून निघून गेला.                                                                                                                       


संध्याकाळ होत आली होती. अमेयचा अजून पत्ता नव्हता. दुपारची भयानक घटना शारदाच्या डोक्यातून जात नव्हती. तिने स्वतःला कामात गुंतवून घ्यायचे ठरवले. अचानक तिला आठवले की तिने दुसरा आणि तिसरा मजला अजून पाहीलाच नाहीये. ती दुसऱ्या मजल्यावर आली. त्या मजल्यावर तीन बेडरूम्स होत्या. एक कटाक्ष टाकून तिसऱ्या मजल्यावर आली. तिथे आल्या आल्या तिला अस्वस्थ वाटायला लागलं. त्या मजल्यावर एकच दरवाजा होता. ज्याला एक भलमोठंं कुलूप ठोकलेलं होतं. त्या कुलूपाला वेगवेगळे रंगीबेरंगी धागेदोरे बांधलेले होते. शारदा नकळतच त्या बंद दरवाज्याकडे आकर्षिली गेली. हळू हळू पावले टाकीत ती दाराजवळ आली. तिने दाराला हात लावला. अचानक पलीकडून ते बंद दार जोरजोरात ठोकलं जाऊ लागलं.  त्या बंद दाराच्या मागून कोणीतरी ते दार ठोकत होतं. या विचित्र घटनेने शारदा इतकी घाबरली की तिने एक भयानक किंचाळी ठोकली.         



शारदाची किंचाळी ऐकून बाहेर काम करत असलेले रामूकाका धावतच घरात आले. त्यांना जिन्यावरून शारदा घाबरलेल्या अवस्थेत खाली येतांना दिसली. "काय झालं बाईसाहेब? अश्या का ओरडलात तुम्ही." त्यांनी शारदाच्या जवळ जात विचारल. "रामू......काका.....ति....तिथे.....वरती." ती इतकी घाबरली होती की तिला धड बोलता सुध्दा येत नव्हतं. तिचं सर्वांग थरथरत होत. रामूकाकांनी तिला सोफ्यावर बसवलं आणि ग्लासभर थंडगार पाणी आणून दिलं. घाबरलेल्या शारदने  गटागट पाणी घशात ओतलं. काही वेळाने ती शांत झाल्यानंतर रामूकाकांनी तिला प्रश्न पुन्हा विचारला. शारदाने स्वतःला सावरत वरच्या मजल्यावर  हकीकत त्यांना सांगितली. ते ऐकल्यावर आता घाबरण्याची पाळी रामूकाकांची होती. "म्हणजे आता हे सर्व पुन्हा सुरु होणार आहे." रामूकाकांनी भयावह चेहरा करत म्हटलं. "काय सुरू होणार आहे रामुकाका?" शारदाने विचारलं. "त्या वाईट शक्तीला कळलं आहे की तुम्ही इथे राहायला आला आहात म्हणून. आता मृत्युचं तांडव सुरू होईल. तो दरवाजा ठोठावनं हा त्याचाच एक संकेत होता. ती शक्ती सुटण्यासाठी धडपडते आहे. बाईसाहेब चुकुनही तो दरवाजा उघडु नका. नाहीतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल आणी जमलं तर हा बंगला कायमचा सोडून द्या." इतकं बोलून आणि शारदाला संभ्रमात टाकुन रामूकाका बाहेर निघून गेले.                                                                 


शारदा बाहेरील अंगणात अस्वस्थ होऊन फेऱ्या घालत होती. रात्रीचे ८ वाजले होते. अमेय अजून आला नव्हता. रामूकाकांच्या बोलण्याचा अर्थ तिला काही केल्या समजत नव्हता. सतत ती त्याचाच विचार करत होती. तेवढ्यात तिला अमेयची गाडी गेट मधून येतांना दिसली. तो गाडीमधून खाली उतरला. "काय ग, काय झालं असं  बाहेर का उभी राहीलीयेस." तो शारदाजवळ येत म्हणाला. "मला तुला काहीतरी सांगायचय." असं म्हणून ती त्याला आत घेऊन गेली. आत येताच  तिने काही वेळापूर्वीची ती घटना आणि रामूकाकांच बोलणं  सांगितलं. "तुझं डोकं फिरलय का. तू काय बोलतेस हे तुला तरी कळतय का. तो दरवाजा अनेक वर्षांपासुन बंद आहे. तिथे कोणीच रहात नाही."  अमेय चिडून म्हणाला. 


शारदाला त्याच्याकडून अशीच प्रतिक्रीया अपेक्षीत होती. तरी समजावणीच्या सुरात ती म्हणाली,"मी पण तेच म्हणतेय.पहिले ती झाडावरची घटना आणी आता ही दरवाज्याची घटना. रामूकाका म्हणतात त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असणार".


ओके ठीक आहे. तुला जाणून घ्यायचय ना की तो दरवाजा कोणी ठोकला मग चल माझ्यासोबत".असं म्हणून अमेयने शारदाचा हात धरला आणी तिला तिसऱ्या मजल्यावर घेऊन गेला. त्या बंद दारासमोर आल्यावर तो म्हणाला,"हा दरवाजा मी आता उघडणार आहे. लगेच खरं खोट समोर येईल."


थांब अमेय, रामू काकांनी निक्षून सांगितलय हा दरवाजा उघडू नका म्हणून. रामूकाकांनी सांगितल आहे? मग तर मी आता नक्कीच उघडणार…. असं म्हणून त्याने शारदाला बाजुला ढकललं आणि  दरवाज्याजवळ जाऊन त्या कुलूपावर बांधलेले धागेदोरे काढायला सुरूवात केली. त्यांच्या खाली एक काळी बाहूली बांधली होती. ती बाहूली सुध्दा त्याने काढली. ती काढल्याबरोबर अचानक त्या दरवाज्याला लावलेल भलमोठ कुलूप आश्चर्यकारक रित्या तुटून खाली पडलं. अमेयने तो दरवाजा  आत ढकलला. बंद दरवाजा उघडला गेला होता. दरवाजा उघडल्यावर एक थंड हवेची अनैसर्गिक झुळूक त्या दोघांच्याही अंगात हुडहूडी भरवून गेली. 


" ये बघ आहे का कोणी इथे." अमेय आत येत म्हणाला. शारदा सुध्दा त्याच्या मागे आत आली. "हं. कायतर म्हणे दरवाजा ठोकला कोणीतरी. मुर्खांचा बाजार." ती खोली बर्यापैकी मोठी होती. त्या खोलीत सर्वत्र धुळीचे साम्राज्य होते. त्या खोलीतील सर्व वस्तु  पांढऱ्या  कपड्याने झाकलेल्या होत्या. शारदा त्या खोलीचं चांगल्या प्रकारे निरीक्षण करत होती. अचानक तिचं लक्ष समोरच्या भिंतीकडे गेलं. त्या भिंतीवर एक चित्र होतं. ते चित्र जुन्या काळातल्या एका ब्रिटीश स्त्रीच वाटत होत. शारदाने त्या चित्राजवळ जाऊन त्याला निरखून पाहील. त्या चित्राच्या खाली एक नाव आणी जन्म-मृत्युच वर्ष लिहील होतं. Sarah Winchester  - the owner of this Winchester house

                                      born: 1840 -  died: 1922.


"ओ बाईसाहेब, जर तुमचं निरीक्षण झालं असेल तर खाली चला आता. खूप भूक लागली आहे." अमेयच्या बोलण्याने शारदा भानावर आली. आणी त्याच्या सोबत खोलीतून बाहेर निघाली. बाहेर आल्यावर तिने एकदा मागे वळून खोलीवर नजर टाकली. ती खोली एकदम शांत वाटत होती.

कदाचित ही वादळापूर्वीची शांतता होती.   


त्याचवेळी  दूरवर कुठेतरी असललेल्या एका गुहेतील एक साधु एकाएकी अधिकच विचलित झाला. "काय झालं स्वामी, तुम्ही आजकाल खुप अस्वस्थ दिसता आहात." त्याच्या शिष्याने विचारल. त्यावर तो साधु म्हणाला,"मुकुंदा, ज्याची भीती होती तेच झालं. तो बंद दरवाजा उघडला गेलाय. ती पुन्हा स्वतंत्र झाली आहे. इतिहासातील त्या घटना पुन्हा  घडणार आहेत."


पण स्वामी कसं शक्य आहे. आपण तो दरवाजा शक्तीशाली मंत्रांच्या प्रभावाने बंद केला होता. ती तो दरवाजा उघडू शकत नाही. मुकुंदा म्हणाला.


स्वामी बोलते झाले - तिने नाही उघडला. पण कोणीतरी नकळत तिला स्वतंत्र केलं आहे. असं करून तो जो कोणी आहे त्याने भयंकर संकटाला आमंत्रण दिलय. मुकुंदा, आपल्याला तिला थांबवायला हव. नाहीतर विनाश अटळ आहे.                       


दुसरा दिवस उजाडला. सकाळचे १० वाजून गेले होते. अमेय ऑफिसला निघून गेला होता. रामूकाका आणी शारदा दुपारच्या जेवणाची तयारी करत होते. किमया हॉल मध्ये खेळत होती. अचानक तिच्या कानांवर  एक आवाज पडला. तो आवाज तिच नाव घेऊन बोलावत होता. तिने प्रथम इकडे-तिकडे पहिलं पण तिला कोणीच दिलं नाही. ती पुन्हा खेळण्यात गुंग झाली. परत एकदा त्या आवाजात तिला कुणीतरी हाक मारली . किमयाने आता वरती बघितलं. तो आवाज वरच्या मजल्यावरून येत होता. ती वरच्या मजल्यावर आवाजाच्या दिशेने जायला लागली.


काही वेळाने जेव्हा शारदा हॉलमध्ये आली तेव्हा तिथे किमया तिला दिसली नाही. तिने  बाहेर शोधले पण किमया तिथेही  नव्हती. शारदाने रामूकाकांना सांगितले. दोघांचीही शोधाशोध सुरू झाली. मात्र किमया काही केल्या सापडत नव्हती. "बाईसाहेब, तुम्ही वरच्या मजल्यावर बघा. मी बंगल्याच्या आजुबाजूला शोधतो." रामूकाका बोलले. शारदा दुसऱ्या मजल्यावर गेली तिथे तिने तिनही बेडरूम्स चेक केल्या. पण तिथेही किमया नव्हती. ती पुन्हा खाली जायला निघाली अचानक तिचं लक्ष  तिसऱ्या मजल्याकडे गेल. शारदा तिसर्या मजल्यावर गेली. तिथला खोलीचा दरवाजा उघडाच होता. शारदा घाबरत त्या खोलीत आली. त्या खोलीत थोडा अंधार होता. पण त्या अंधारात सुध्दा तिला किमया दिसली. ती खोलीच्या एका कोपऱ्यात गुडघे दुमडून त्यात डोकं खुपसुन बसली होती. शारदा तिच्या जवळ आली आणि तिला हाक मारली. किमयाने डोकं वरती केलं. 


शारदा घाबरून मागे सरकली. किमयाचे डोळे लाल होते. तिचा चेहरा विचित्रच दिसत होता. तिचा श्वास जोरजोरात चालू होता. शारदाने घाबरत विचारल,"काय झालय किमया बेटा तू अशी का दिसतेस." तशी किमया उठून उभी राहिली आणि घोगऱ्या आवाजात बोलू लागली,"मी किमया नाही. मी ह्या बंगल्याची मालकिण आहे. आता ही पोरगी पण माझी आहे. मी हिला सोडणार नाही. मला माझं अर्धवट काम पूर्ण करायचय. निघून जा ह्या बंगल्यातून नाहीतर तुम्ही सगळे मराल." इतकं बोलून किमायाच्या शरीरातील ती बाई अस म्हणून ती घोगऱ्या आवाजात हसली. अचानक किमया  बेशुध्द होऊन खाली पडली. शारदा तिच्या  जवळ आली. तिने किमयाच्या अंगाला हात लावला. किमयाला सणकून ताप भरला होता. शारदाने तिला उचललं आणि त्या खोलीतून बाहेर निघून गेली. 


ती हॉल मध्ये आली. रामूकाका तिथे उभे होते. "बाईसाहेब, छोट्या बाईसाहेबांना काय झालं." रामूकाकांनी शारदाला आल्या आल्या विचारलं. शारदाने किमयाला सोफ्यावर झोपवलं आणि घडलेली  हकिकत त्यांना सांगितली. "अरे देवा, बाईसाहेब, तरी मी तुम्हाला सांगितल होत की बंद दरवाजा उघडू नका म्हणून. आता बघा काय होतय ते." रामूकाका डोक्याला हात मारून घेत म्हणाले.


रामूकाका, काय झाल होत किमयाला. अशी का करत होती ती.


बाईसाहेब, मला फक्त एवढ माहीती आहे की इथे, ह्या बंगल्याच्या मालकिणीचा आत्मा वास करतो  आहे. बंद दरवाजा उघडल्याने तो आत्मा स्वतंत्र झाला आहे तोच हे सगळ करतोय. आता यातून आपल्याला फक्त देवच वाचवू शकतो. 


संपूर्ण दिवस शारदा त्याच भीतीखाली वावरत राहिली. संध्याकाळी अमेय घरी आल्यानंतर शारदाने त्याला सांगण्याचे टाळले. तिला माहीत होत की त्याने स्वभावाप्रमाणे याच्यातही काही वैज्ञानिक कारण शोधलं असतं. अमेय यापासून अनभिज्ञ होता की त्याच्या आयुष्यातील एका भयंकर युध्दाला प्रारंभ झाला होता.                                                                        

  

अचानक मध्यरात्री शारदाला जाग आली. तिने तिच्या आजुबाजूला पहिलं. अमेय आणि किमया दोघेही तिथे नव्हते. तिला आश्चर्य वाटल. दोघे एवढ्या रात्री कुठे गेले असतील. असा विचार करून ती उठली. बेडरूम मधून बाहेर आली. प्रथम तिने इतर खोल्यांमध्ये पाहील. तिथेही ते दोघे नव्हते. ती आता खाली हॉल मध्ये आली. हॉलमध्ये तिला समोर दोन आक्रुत्या पडलेल्या दिसल्या. तिने जवळ जाऊन पहिलं तर तिच्या पायाखालची जमीन सरकली. समोरचं दृश्य पाहून ती तिथेच थिजल्यासारखी उभी राहीली. तिच्या समोर अमेय आणी किमया रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अचानक एक हसण्याचा आवाज आला आणि  शारदाच्या कानांवर काही शब्द पडले,"हे दोघे गेले. आता तुझी पाळी. हाहाहा." हे ऐकल्यावर शारदा पूर्ण ताकदीनिशी किंचाळली. 


पुढच्याच क्षणी शारदा तिच्या बेडवर उठून बसली. तिच सर्वांग घामाने ओलचिंब झाल होत. तिने थरथरत आजुबाजूला पाहिलं. अमेय आणी किमया शांत झोपले होते. म्हणजे मघाशी जे बघितल ते स्वप्न होत तर. आता तिच्या जिवात जिव आला. तिने बाजुच्या टेबलवर पडलेला जग उचलला आणि  गटागटा घशात रिकामा केला. आता तिला थोडं बरं वाटत होत. तिने घड्याळाकडे पाहिलं . पहाटेचे ४ वाजले होते. अचानक तिच्या मनात एक विचार चमकुन गेला. अस म्हणतात की पहाटेचे स्वप्न खरे होतात. या विचाराने पुन्हा तिचा जीव घाबरा-घुबरा झाला.

                                

दुसऱ्या दिवशी अमेय नेहमीसारख ऑफीसला निघून गेला होता. शारदाला पुन्हा पुन्हा ते स्वप्न आठवत होतं. अचानक तिला हॉल मधून विचित्र आवाज यायला लागले. रामूकाका काही कामासाठी बाहेर गेले होते. ती घरी एकटीच होती. त्यात या विचित्र आवाजांनी तिच्या भीतीत आणखीनच भर पडली. ते आवाज आता अधिक वाढत चालले होते. तिने हिम्मत करून हॉल मध्ये जायचं ठरवलं. ती हळूहळू हॉलच्या दिशेने जायला लागली. हॉल मध्ये तिने पाहिलं की समोरच्या भिंतीवर किमया  काहीतरी करत होती. ती काय करते आहे हे पाहण्यासाठी अजुन जवळ गेली. त्या भिंतीवर लाल अक्षरात इंग्रजी मध्ये लिहिलेल होत,'GET READY TO DIE'. शारदा घाबरुन मागे सरकली. तेवढ्यात रामूकाका तिथे आले. त्यांनी सुध्दा ते लिहिलेलं पाहिलं. शारदा भीतीने थरथरत होती. रामूकाकांनी शारदाला धीर दिला आणि स्वतः हिम्मत करून किमयाच्या जवळ आले. रामूकाका गुडघ्यावर बसले आणी एक हात किमयाच्या खांद्यावर ठेवला. हात ठेवताच ती मागे फिरली आणी तिने रामूकाकांचा गळा पकडला. तिची पकड इतकी घट्ट होती की रामूकाकांना सुटण्याची संधीच नाही मिळाली. आणी तिने रामूकाकांना अगदी खेळण्यासारखं सहज उचलून दूरवर फेकुन दिलं. आता ती शारदाकडे वळली. शारदाने तिच्यासमोर गुडघे टेकले आणी हात जोडून म्हणाली,"हे बघ तु जी कोणी आहेस माझ्या मुलीला सोडून दे. तिने तुझ काही बिघडवलं नाहीये. तुला जे काही करायचय ते माझ्यामार्फत कर. पण माझ्या मुलीला सोड."


किमया विक्षिप्तपणे हसली आणी म्हणाली,"ही पोरगी माझी शिकार आहे. मी हिला सोडणार नाही. मी हिला मारून टाकणार आणी मग मला ते मिळेल ज्यासाठी माझा आत्मा इतकी वर्ष तडफडतोय. पण त्या आधी मी तुम्हा सगळ्यांना मारेन." असं  म्हणून ती पुन्हा एकदा भयानकपणे हसली. अचानक तिने शारदाचा गळा पकडला. तेवढ्यात कुठूनशी  पांढरी राख किमयाच्या अंगावर पडली. तिने शारदाचा गळा सोडला आणी किंचाळून दूर झाली. तिने वळून पाहील. समोर तो साधू आणि त्याचा शिष्य उभा होता. "तू परत आलास." किमया चवताळून म्हणाली. "हो मी परत आलोय. तुला कायमस्वरूपी या जगातून मुक्त करण्यासाठी." अस म्हणून त्या साधूने पुन्हा पिशवीतून मुठ्ठीभर पांढरी राख काढली आणी डोळे बंद करून  काहीतरी पुटपुटला. त्याने ती राख तिच्या अंगावर टाकली. ती पुन्हा ओरडून खाली पडली.


ऑफिसमधील टेबलावरचा फोन खणखणला. अमेयने फोन उचलला,"हेलो".

"अमेय, तु लवकर घरी ये. इथे खुप भयानक घडतय. मला काहीच कळत नाहीये." शारदाचा घाबरलेला आवाज आला.

अग पण काय झालय ते तर सांग…… फोनवर नाही सांगता येणार तू लवकर घरी ये. असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. 


"काय रे, काय झालं." त्याचा मित्र जयंतने विचारलं. अरे,  शारदाचा फोन होता. घरी बोलवलय. काहीतरी गंभीर प्रकरण दिसतय. मला जाव लागेल. तू  इथे सगळं सांभाळून घे. ओके….. इतकं बोलतच अमेय ऑफिसमधून निघाला. अमेय घरी पोहोचल्यानंतर धावत पळत आत गेला आणि समोरचं दृश्य पाहून तोही भयचकीत झाला.

                                          

राखेच्या गोल रिंगणात किमया बसलेली होती. ती त्या राखेच्या रिंगणातून बाहेर निघण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. स्वामी तिच्या समोर योगमुद्रेत बसलेले होते. त्यांचे डोळे बंद होते. त्यांचा शिष्य मुकुंदा किमयावर लक्ष ठेवत होता. दूर कोपऱ्यामध्ये शारदा आणी रामूकाका घाबरलेल्या अवस्थेत बसलेले होते. अमेयला पाहताच शारदा धावत येऊन त्याला बिलगली.


"शारदा,हे सगळ काय चाललय? हा माणूस कोण आहे? आणि किमयाला काय झालय?" असे एकावर एक प्रश्न अमेयने विचारले. शारदाने घडलेली सगळी हकिकत त्याला सांगितली.


"काय?" अमेय मोठ्याने ओरडला,"शारदा, आर यु आऊट ऑफ युवर माईंड? अग ही १२ वर्षाची मुलगी एवढ्या म्हाताऱ्या रामूकाकांना उचलुन कस फेकु शकते?"


अमेय, आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहीलंय. ती किमया नव्हती. तो तिच्या अंगात घुसलेला आत्मा होता.


ईनफ शारदा. मी तुला पहिलेही सांगितल आहे की जोपर्यंत मी स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत मी अशाप्रकारच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. जे तु किमयाबद्दल सांगितलस ना त्या मागे नक्कीच मानसीक कारण असणार. तिला असल्या तांत्रीकांची नाही तर एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे. अमेय बोलून मोकळा झाला. 


"पप्पा,मला वाचवा." तिकडून किमयाचा आवाज आला, "ही बघा, ही माणस माझ्यासोबत काय करत आहेत. मला इथून बाहेर काढा." ती रडत म्हणाली.


किमया बेटा, घाबरू नकोस मी आलोय ना मी तुला इथून बाहेर काढेन. असं म्हणून तो पुढे जायला लागला. शारदाने त्याला अडवलं. "नाही अमेय, स्वामींनी सांगितलय की त्या राखेच्या गोल रिंगणात कोणीही जाऊ नका. तो आत्मा......"


"शारदा", अमेय आता संतापला होता, "अग तुझी मुलगी आहे ती कोणी भूत नाही. तिच्याकडे बघ जरा तिला त्रास होतोय या सगळ्याचा. " अस म्हणून त्याने शारदाला दूर ढकलल. तो त्या राखेच्या गोल रिंगणात प्रवेश करणार इतक्यात स्वामी कडाडले, "थांब. असला मुर्खपणा करू नकोस. नाहीतर अनर्थ होईल." पण अमेयने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिल नाही. त्याने पायाने ते राखेचं गोल रिंगण विस्कटून टाकलं आणि किमयाजवळ जाऊन बसला. 


"तू ठिक आहेस ना बेटा. घाबरू नकोस तुझे पप्पा आलेत आता." त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. किमयाने डोकं वर केलं. तिचे डोळे लाल भडक होते. ती कुत्सितपणे हसत होती. अमेयला काही कळायच्या आत तिने त्याचा गळा पकडला आणि रामूकाकांना उचलून फेकलं होत तसच त्यालाही उचलून फेकलं. तो समोरच्या भिंतीवर जोरात आपटला. त्याला क्षणभर कळलच नाही की काय घडलं. त्याने समोर पाहीलं. किमया उभं राहुन घोगऱ्या आवाजात हसली, "मुर्खा, तु माझ्या सुटकेचा मार्ग मोकळा केलास. आता मी ह्या मुलीला घेऊन जाईन. ही एक्कावन्नावी असेल. आता माझं लक्ष्य पूर्ण होईल. पण जाण्याच्या आधी....." ती पुन्हा भयानक हसली. तिने तिच्या एका हाताची मूठ बंद केली. आणी डोळे बंद करून काहीतरी पुटपुटली. तिने डोळे उघडले तिचे डोळे काळेशार होते. तीने तिच्या हाताची मूठ  शारदाकडे उघडली. तिच्या तळ हातातून ाक काळा गोळा निघाला आणि तो शारदाकडे झेपावला. कोणाला काही कळायच्या आत तो गोळा शारदाच्या छातीला लागला. शारदाचं निष्प्राण शरीर जमीनीवर पडलं. किमया तिथून गायब झाली होती. कोणीही काहीही बोलत नव्हतं. भयाण शांतता पसरली होती.                                                                      

                     


 आकाशात काळे ढग जमू लागले होते. वारा जोरात वाहू लागला होता. सगळीकडे शांतता होती. बेडरूम मध्ये शारदाचं शरीर बेडवर पडलेलं होत. स्वामी डोळे बंद करून योगमुद्रेत बसलेले होते. मुकुंदा स्वामींजवळ बसुन त्यांच्या पुढच्या आदेशाची वाट पाहत होता. रामु काका कोपऱ्यात बसून देवाचा धावा करत होते. अमेय शारदाजवळ बसून तिच्या केसांतून हात फिरवत होता. "मला माफ कर शारदा, तुझ्या ह्या अवस्थेला मीच जबाबदार आहे. मी तुझ ऐकलं असतं तर तू आता जिवंत असतीस." तो भरल्या कंठाने म्हणाला.   अचानक बेडरूमचा दरवाजा उघडला आणि जयंत धडधडत आत आला. समोरच दृश्य पाहुन त्याला धक्काच बसला. अमेयने त्याला मिठीच मारली. इतक्या वेळेपासुन रोखून धरलेला त्याचा अश्रुंचा बांध फुटला. जयंतने मोठ्या प्रयत्नाने अमेयला शांत केल. त्याने अमेयला बेडवर बसवत म्हणाला, "मित्रा, शांत हो आणि मला सांग हे सगळं कस झालं? कोणी केलं?" अमेयने मोठ्या मुश्कीलीने स्वतःला सावरत घडलेली हकीकत सविस्तर सांगितली.


"काय? म्हणजे त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. साराह विंचेस्टरचा आत्मा खरच या घरात आहे." जयंत आश्चर्यचकीत होत म्हणाला.

तुला काय माहीत आहे या घराबद्दल? अमेयने चकित होऊन विचारले. 

हो, मी वाचल होूूतं. पण त्यावेळेस माझा विश्वास बसला नव्हता त्यावर.

जयंत, तुला या घराच्या इतिहासाबद्दल जे काही माहीत आहे ते सांग. मी शारदाला वाचवू शकलो नाही. पण मी माझ्या मुलीला काही होऊ देणार नाही. प्लीज मला सगळ सांग.

सांगतो….जयंत बोलायला लागला ... १८८४ मध्ये एक इंग्रज दांपत्य साराह  आणी विलीयम विंचेस्टर गोव्यात रहायला आले. विलीयम हे ब्रिटीश फौजेत कामाला होते. त्यांची गोव्यात बदली झाली होती. इथे आल्यानंतर त्यांनी या घराच्या बांधकामाला सुरूवात केली. घर बांधून पूर्ण झाल्यानंतर ते दांपत्य इथे रहायला आलं. पहिली काही वर्ष सगळ सुरळीत चालु होतं. पण विसाव्या शतकाच्या सुरूवातीला भारतात स्वातंत्र्यलढ्याचा जोर वाढू लागला होता. त्याचे पडसाद गोव्यातही उमटले. क्रांतीकारकांनी इंग्रजांविरूध्द जोरदार लढाई चालु केली होती. क्रांतीकारकांशी झालेल्या अश्याच एका चकमकीत विलीयम विंचेस्टर मारले गेले. त्यानंतर सगळच बदलल. पतीच्या आकस्मीक म्रुत्युमुळे साराह यांच्या मनावर फार वाईट परिणाम झाला. विलीयम यांच्या म्रुत्युनंतर काही दिवसांनी अचानक गोव्यातून लहान मुले गायब व्हायच्या बातम्या येऊ लागल्या. त्यावेळच्या ब्रिटीश सरकारने या घटनेचा कसुन शोध घेतला, पण सरकारच्या हाती ना गायब झालेली मुले लागली ना तो मुले चोरणारा गुन्हेगार.  पण मध्येच अश्या अफवा पसरल्या की त्या मुलांच्या गायब होण्यामागे साराह विंचेस्टरचा हात आहे. असं म्हणतात की तिने या घराच्या तळघरात एक गुप्त ठिकाण बनवल होत. त्यालाच विंचेस्टर मिस्ट्री हाऊस अस म्हणतात. हे कळल्यावर लोकांनी याच घरातील तळघरात तिला जिवंत जाळल. त्यानंतर काय झाल हे मला काही जास्त माहीत नाही.


"त्यानंतर काय झाल हे मी सांगतो." स्वामींचा आवाज आला. अमेय आणी जयंतने त्यांच्या दिशेने पाहीलं. स्वामींचा चेहरा पहिल्यापेक्षा जास्त तेजस्वी दिसत होता. त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. "त्या अफवा नव्हत्या. ते सगळ खरं होत. तीच त्या मुलांचे बळी देत होती."

"बळी?" अमेय आश्चर्य व्यक्त करत म्हणाला.


हो बळी. पतीच्या निधनानंतर तिची मानसिक स्थिती खालावली होती. अशातच तिला एका अघोरी विद्येची माहीती मिळाली. कमजोर मनाच्या लोकांवर वाईट गोष्टींचा परिणाम लवकर होतो. इथेही तसच झाल. ती एक अशी अघोरी विद्या आहे की जो माणूस या विद्येचे सगळे टप्पे  यशस्वीरीत्या पूर्ण करेल तो सर्व शक्तिमान होऊ शकतो. याच शक्तिच्या लालसेने तिने त्या अघोरी विद्येचे सर्व टप्पे पूर्ण केले. शेवटचा टप्पा होता १०-१५ वर्ष वयाच्या  ५१ लहान मुलांचे बळी. पण तिच्या दुर्दैवाने तिच्या ह्या कृत्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली. लोक आमच्या गुरूदेवांकडे आले. त्या लोकांसोबत गुरूदेव इथे आले. गुरूदेवांच्या आज्ञेनेच तिला तळघरात जिवंत जाळण्यात आलं. 


पण असं म्हणतात की मरण्यापूर्वी माणसाची एखादी इच्छा जर अधिकच तीव्र असेलस तर मृत्युनंतर सुध्दा त्याचा आत्मा भटकत राहतो. इथेही तेच घडलं. तिला कोणत्याही परिस्थितीत ती शक्ती प्राप्त करायची होती. त्यामुळे तिचा आत्मा इथेच राहीला. गुरूदेवांनी आम्हाला सांगितलं होत की संधी मिळताच ती लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. काही वर्षांआधी अगदी तसंच घडलं. इथे रहायला आलेल्या एका कुटुंबाचा संशयास्पद म्रुत्यु झाला.  त्यानंतर आम्ही लगेचच तिथे पोहचलो आणि तिला त्या वरच्या खोलीत कोंडून टाकलं. पण आता ती तुझ्या मुलीला घेऊन गेली आहे. हा तिचा ५१ वा बळी असेल. जर ती यशस्वी झाली तर संपूर्ण मानवजातीवर संकट येईल. तिचा आता समूळ नाश करणे हा एकच उपाय आहे. त्यासाठी आपल्याला एका विशिष्ट शस्त्राची गरज लागेल आणि ते शस्त्र आता मी निर्माण करणार आहे. मुकुंदा, चल…


स्वामी झपाझप पावले टाकीत बाहेर निघून गेले. अमेय आणी जयंत त्यांच्या मागोमाग गेले. स्वामी बाहेरील अंगणात उभे राहीले. त्यांनी मुकुंदाच्या हातातील पिशवीतून रिकामे कमंडलू काढले. ते कमंडलू उजव्या हातात धरून डोळे बंद करून स्वामी काहीतरी पुटपुटले. क्षणात ते रिकामे कमंडलू पाण्याने भरले. ते कमंडलू त्यांनी आता डाव्या हातात धरलं. त्यातील पाणी उजव्या हाताच्या ओंजळीत घेतल. स्वामींच्या मुखातून दिव्य शब्द बाहेर पडले.


"हे आकाश, धरती, वायू, जल, अग्नी हे सर्व विश्व तुम्हा पंचतत्वांपासुन निर्माण झाले आहे. या सगळ्याची उत्पत्ती, स्थिती, लय तुमच्यातच आहे. आज मानव जातीवर एक भयानक संकट घोंघावत आहे. त्या संकटाशी लढाई देण्यासाठी पंचतत्वांपासुन बनलेल्या एका दिव्य शस्त्राची गरज आहे. म्हणून मी आपल्या तपश्चर्येच पुण्य देऊन तुमची शक्ती असलेल्या दिव्य शस्त्राची मागणी करतो."

अस म्हणून ओंजळीतील पाणी जमीनीवर सोडले. पाणी सोडताक्षणी जोराचा वारा सुटला. जमीन हादरायला लागली. अचानक जमीन दुभंगली आणी जमीनीतून एक दिव्यास्त्र बाहेर पडले. त्याच्या तेजाने सगळ्यांचे डोळे दिपले. अमेय आणी जयंत आश्चर्याने हा चमत्कार बघत होते. स्वामींनी ते दिव्यास्त्र अलगद  हातात घेतले. "आता तिचा अंत कोणीही रोखु शकत नाही. मुकुंदा, चल." स्वामी जाण्यासाठी वळले.


अमेयने त्यांना थांबवलं. थांबा स्वामी, हे काम मला करू द्या. माझ्यामुळेच ती स्वतंत्र झाली. शारदाच्या ह्या अवस्थेला मीच जबाबदार आहे. किमयाचा जीव धोक्यात आहे. संपूर्ण मानवजातीवर संकट आहे. हे सगळ माझ्यामुळे  झालंय. मला माझी चूक सुधारण्याची एक संधी द्या. तिचा अंत करायला मला जाऊ द्या. स्वामींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. त्यांनी ते दिव्यास्त्र अमेयच्या हातात दिले. ते दिव्यास्त्र हातात घेताच अमेयच्या अंगात नवीन तेज संचारले. "जर तू तिचा अंत करण्यात यशस्वी ठरलास तुझ्या पत्नीचा सुध्दा जीव वाचेल." स्वामी म्हणाले.


"मित्रा," जयंतने हाक मारली, "तु एकटा नाहीस मी तुझ्या सोबत आहे."

"साहेब, थांबा." घरातून रामूकाका पळत आले, "साहेब, मी पण तुमच्या सोबत येतो.

स्वामी, आशिर्वाद द्या. ही लढाई आपणच जिंकू, अमेयने स्वामींचे आशीर्वाद घेतले.

"विजयी भव" स्वामी दोन्ही हात उंचावून हसत म्हणाले.                                                                                                  


 अमेय, जयंत आणि रामुकाका स्वामींसोबत बंगल्याच्या मागच्या बाजुला उभे होते.


अमेयनी स्वामींना विचारले, तुम्ही आम्हाला इथे मागच्या भागात का आणलंय?



तिचं एक गुप्त ठिकाण आहे. त्या ठिकाणावर जाण्याचा रस्ता तळघरातून आहे आणि तळघरात जाण्याचा रस्ता इथून आहे. पण तळघरात जाण्याचा रस्ता जनरली घरामधूनच असतो ना? अमेयने स्वामींना विचारले. 


हो पण हे फक्त तळघर नाहीए. तिच्या अनेक कुकर्मांच ते ठिकाण आहे आणि ते कोणाच्या दृष्टीस पडू नये म्हणून तिने इथे ते बनवलंय. 


"पण तळघरात जाण्याचा रस्ता तर कुठेच दिसत नाहीए. इथे सगळीकडे फक्त गवतच आहे." अमेय चारही बाजूंना नजर फिरवत म्हणाला.


यावर स्वामी फक्त हसले. ते जिथे उभे होते तिथून सरळ काही पावले चालत गेले आणी एका जागी जाऊन थांबले. त्यांनी खाली एक नजर टाकली आणी त्याकडे बोट दाखवून हसत म्हणाले, "तळघराचा रस्ता इथे आहे."


स्वामी ज्या ठिकाणाकडे बोट दाखवत होते, तिथे गवताच नामो-निशाण नव्हतं. तिथल्या साफ जमिनीवर एक चौकोनाचा आकार होता. स्वामी त्या आकाराकडेच बोट दाखवत होते. 


 पण मग आता या तळघरात शिरायच कसं, अमेयने विचारलं.


 तळघरात प्रवेश करणं इतकं सोपं नाहीये. हा दरवाजा ताकदवान मंत्राने बंद केला गेलाय. तो उघडण्या साठी सुध्दा एक मंत्रच लागेल….असं म्हणून स्वामींनी कमंडलूतील पाणी उजव्या हातात घेतलं. काही मंत्र पुटपुटले आणि हातातील पाणी त्या भागावर शिंपडल. पाण्याचे थेंब त्या भागावर पडताक्षणीच भलामोठा आवाज झाला आणी ज्या ठिकाणी चौकोनाचा फक्त एक आकार होता. तिथे आता चौकोनी छिद्र दिसायला लागलं. त्या छिद्रात खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या.


उघडला दरवाजा. आता तुम्ही या पायर्यांनी तळघरात जाऊ शकता, असं म्हणत स्वामी अमेयकडे वळले. त्याच्या खांद्यावर हात ठेऊन ते म्हणाले, "लक्षात ठेव. तुझ्या हातातले हे शस्त्र अजिंक्य आहे. कोणतीही अडचण या शस्त्राच्या मदतीने दूर होऊ शकते. आता जा आणि त्या वाईट शक्तीचा नाश करूनच परत ये."


अमेयने स्वामींना नमस्कार केला आणी ते तिघेही जण आता तळघराच्या पायऱ्या उतरायला लागले.

                                             

                                   


ते तिघेही जण तळघरात येऊन पोहोचले होते. तिथे धूळ आणि मातीशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. "स्वामींनी तर सांगितलं होतं की ती आपल्याला तळघरातच भेटेल म्हणून. पण इथे तर सर्वत्र धुळीच साम्राज्य आहे." जयंतने आपली शंका उपस्थित केली.


स्वामींनी सांगितलं होतं की तळघर हा फक्त तिच्या गुप्त ठिकाणावर जाण्याचा रस्ता आहे. तिचं ठिकाण असं सहजासहजी दिसणार नाही आपल्याला. जसा या तळघरात येण्यासाठी गुप्त रस्ता होता, तसा त्या ठिकाणावर जाण्यासाठी एखादा गुप्त रस्ता असला पाहीजे. आपण या भिंती तपासून पाहू,अमेयने जयंतच्या शंकेचे निरसन केले. ते तिघेही भिंती चाचपून पाहू लागले. थोडा वेळ शोधाशोध केल्यानंतर अचानक रामुकाकांचा आवाज आला. अमेय आणि जयंत त्यांच्या जवळ जाऊन पोहोचले. रामुकाकांनी समोरच्या भिंतीकडे इशारा केला. त्या भिंतीवरही एक चौकोनी आकार होता. 


साहेब, इथे पण तसाच चौकोनी आकार आहे. हाच तर तो गुप्त रस्ता नसेल.


पण हा जरी गुप्त रस्ता असला तरी आपण याला उघडणार कस? आपल्याला तर ते मंत्र-तंत्र काही येत नाहीत, जयंत म्हणाला.


त्यावर अमेय म्हणाला-  हा दरवाजा उघडण्यासाठी आपल्याला मंत्राची गरज नाही. तुम्ही दोघे मागे सरका.


जयंत आणी रामुकाका काही पावलं मागे गेले. अमेयने आपल्या हातातील शस्त्राला नमस्कार केला आणि पूर्ण ताकदीनिशी ते शस्त्र त्या चौकोनी भागात खुपसलं. एक भला मोठा आवाज झाला. तो चौकोनी भाग खालच्या बाजुला धसला आणी दरवाजा उघडला गेला. तिथे एक गुप्त खोली होती. तिघांनीही त्या गुप्त खोलीत प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर तिघांचेही डोळे भयाने विस्फारले गेले. ती खोली पूर्णपणे अघोरी साधनांनी भरलेली होती. जिकडे-तिकडे मानवी हाडं-कवट्या पडलेल्या होत्या. सुकलेल्या रक्ताचे डाग होते. एक भयानक दुर्गंधी सर्वत्र पसरलेली होती. प्रवेशद्वाराच्या जवळच एक लोखंडी पुतळा भाला घेऊन उभा होता. 


अमेयने चारही बाजुंना नजर फिरवली. अचानक त्याला समोरच्या एका कोपऱ्यात किमया दिसली. ती बेशुध्दावस्थेत पडलेली होती. तिची अवस्था फार खराब होती. अमेय तिच्या दिशेने जायला निघाला. तेवढ्यात एक मोठा आवाज झाला. अमेयने वळून पाहिलं. त्या खोलीत असलेला एक लोखंडी पुतळा जिवंत झाला होता आणि त्याच्या दिशेने येत होता. त्या पुतळ्याने भाल्याने अमेय वर वार केला. अमेयने चपळाईने तो वार आपल्या शस्त्रावर झेलला. त्या पुतळ्याने पुन्हा वार केला. अमेयने परत तो वार झेलला. काहीवेळ त्या दोघांची लढाई चालू होती. जयंत आणि रामुकाका आश्चर्याने सगळं पाहात होते. त्या पुतळ्याने तो भाला अमेयच्या पोटात खुपसायचा प्रयत्न केला. पण अमेय वेळेवर तिथून बाजूला झाला आणि तो भाला भिंतीत जाऊन रूतला. तो पुतळा भाला काढण्याचा प्रयत्न करत होता पण भाला फार खोलवर रूतला होता. हीच संधी साधून अमेयने त्या दिव्य शस्त्राने पुतळ्यावर वार केला आणि त्या पुतळ्याचं शिर धडावेगळ केल. तो पुतळा तिथेच शांत झाला. अमेय क्षणाचाही उशीर न करता किमया जवळ पोहोचला. त्याच्या मागोमाग जयंत आणि रामू काकाही तिथे आले. तिचा मंद श्वास चालू होता. अमेयने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात पुन्हा भयानक आवाज झाला. अमेयने मागे वळून पाहिले. त्याच्यापासुन काही अंतरावर एक बाई एक प्रगट झाली होती. अमेयने तिचा चेहरा निरखुन पाहीला आणि अचानक त्याला त्या बंद खोलीतील चित्राची आठवण झाली. ती साराह विंचेस्टर होती......


 ती त्या तिघांपासून काही अंतरावर उभी होती. अंगावर काळा झगा, विस्फारलेले केस, लालबुंद डोळे आणि ओठांवर दुष्ट हास्य. तो अवतार पाहुन तिघांचाही थरकाप उडाला होता.


"ती आता उठणार नाही." ढगांचा गडगडाट व्हावा तसे विंचेस्टरच्या तोंडून शब्द निघाले, "मी तिला निष्प्राण केलेल आहे आणि आता मी तिचा बळी देणार." असं म्हणून ती भयानक हसली.


अचानक अमेय भानावर आला आणि भीतीची जागा संतापाने घेतली. तो म्हणाला," नाही मी जोवर जिवंत आहे तोपर्यंत तू किमयाला हातही लावू शकत नाहीस. तुझाच अंत करायला आलोय मी इथे. हे शस्त्र बघ. हे स्वामींनी दिलय. तुला मारण्यासाठी."


ती पुन्हा हसली आणि म्हणाली, "तू करणार माझा अंत? बर ये मार मला. बघू कसा मारतोस तू."


अमेय काही विचार न करता सरळ तिच्यावर चालून गेला आणि त्या तिच्यावर त्या दिव्य शस्त्राचा वार केला. पण ती तिथून गायब झाली आणि त्याच्या मागे प्रकट झाली. अमेय मागे वळला आणि पुन्हा ते शस्त्र उगारल. पण ती पुन्हा गायब झाली. काही वेळ असाच प्रकार घडत राहीला. शेवटी अमेय थांबला आणि तिला आव्हान देत म्हणाला, "अशी भित्र्यासारखी का पळतेस? हिम्मत असेल तर समोरासमोर लढाई कर."


ते ऐकुन ती अमेयपासुन काही अंतरावर प्रकट झाली आणि "जशी तुझी ईच्छा" अस म्हणून आपला हात अमेयच्या दिशेने केला.  अमेय आपोआप हवेत उचलला गेला. तिने हाताला एक झटका दिला. त्याबरोबर अमेय मागच्या बाजुला फेकला जाऊन एका भिंतीवर आपटला आणि खाली पडताक्षणीच बेशुध्द झाला.


रामुकाका आणि जयंत भयचकीत नजरेने हे सगळ पाहत होते. ती आता हळूहळू किमयाच्या दिशेने येत होती. अचानक रामुकाकांना काहीतरी आठवल. ते बेधडक जाऊन साराह विंचेस्टरच्या समोर उभे राहीले आणि म्हणाले, "कुठे चाललीस? आधी माझा सामना कर."


विंचेस्टर किंचाळली … म्हाताऱ्या  तू माझा सामना करणार? अरे त्याच्याकडे दिव्य शस्त्र असून तो माझ काही बिघडवू शकला नाही. तू तर निशस्त्र. तू काय करशील?


 "मी निशस्त्र नाही." अस म्हणून रामुकाकांनी आपल्या गळ्यातुन एक माळ काढली आणि तिला काही कळायच्या आत ती माळ तिच्या दिशेने भिरकावली. ती माळ गळ्यात पडताक्षणीच तिला भयंकर वेदना झाल्या. ती वेड्यासारखी किंचाळत सुटली. तिने जीवाच्या आकांताने ओरडायला सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून जयंतने रामुकाकांकडे प्रश्नार्थक नजर टाकली. रामुकाका म्हणाले, "ती माळ माझ आराध्यदैवत मारूतीच्या नावाने सिध्द आहे. जोपर्यंत ही माळ तिच्या गळ्यात आहे. ती काही करू शकत नाही. पण आता आपण वेळ दवडता कामा नये. तुम्ही छोट्या बाईसाहेबांना घेऊन इथून बाहेर निघा. मी साहेबांना घेऊन येतो."


जयंतने किमयाला उचललं आणि जायला निघाला. साराह विंचेस्टरने पाहील की आपल सावज हातातून निसटून चाललय. तिने वेदनेची पर्वा न करता गळ्यातली माळ दोन्ही हातांनी पूर्ण ताकदीनिशी काढून फेकली. ती कशीबशी उभी राहीली. त्या माळेने तिची शक्ती फार क्षीण झाली होती. तिने रामुकाकांकडे पाहिलं आणि ओरडली- "म्हाताऱ्या".... ती डोळे बंद करून काहीतरी पुटपुटली आणि आपला हात रामुकाकांच्या दिशेने केला. हातातून एक काळा गोळा निघाला आणि तो रामुकाकांच्या छातीवर लागला. रामुकाका निष्प्राण होऊन जमिनीवर पडले. तिने आपला मोर्चा जयंतकडे वळवला. जयंतने रामुकाकांना पडतांना पाहिलं होतं. ती आता जयंतच्या दिशेने येत होती. अचानक त्याचं लक्ष त्या दिव्य शस्त्राकडे गेलं. ते त्याच्या पायाजवळ पडलं होत. त्याने किमयाला हळूच तिथे खाली ठेवलं आणि ते शस्त्र उचललं. पण तोपर्यंत साराहाने जयंतच्या जवळ पोहचून त्याचा गळा धरला आणि जोरात आवळला. जयंतने आपल्या हातातील दिव्य शस्त्राचा वार तिच्या गळा पकडलेल्या हातावर केला. तिचा हात मनगटापासुन तुटून खाली पडला.ती संतापाने आणि वेदनेने बेभान झाली होती. तिने डोळे बंद करून तोच मंत्र पुटपुटला आणि तिच्या हातातून काळा गोळा निघून जयंतच्या छातीवर लागला. तो निष्प्राण होऊन जमिनीवर पडला.



अचानक अमेयच्या शरीरात हालचाल झाली. त्याने डोळे उघडले. त्याचं डोकं जोरात आपटलं असल्याने अजून ठणकत होतं. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली आणि त्याला थरकाप उडवणार दृश्यं दिसल. रामुकाका आणि जयंतचे निष्प्राण देह जमिनीवर पडलेले होते आणि काही फूट अंतरावर एका कोपऱ्यात यज्ञकुंड धगधगत होत. त्या यज्ञकुंडाजवळ किमया बेशुध्दावस्थेत पडलेली होती. साराह विंचेस्टरची अघोरी साधना सुरू झाली होती. अमेयने उठण्याचा प्रयत्न केला, पण तो हलू शकत नव्हता. जणू काही त्याला अदृश्य बंधनांनी बांधून टाकलं होत. 




"हे काय केलस तू माझ्यासोबत. मुक्त कर मला." अमेय ओरडला.


साराह विंचेस्टरने त्याच्याकडे एक दृष्टी टाकली. तिच्या लाल डोळ्यांत क्रुर चमक होती. ती म्हणाली, "इतक्या लवकर नाही सोडणार मी तुला. पहीले ह्या पोरीचा बळी देऊन मी माझ्या शक्ती प्राप्त करेल आणि मग तुला मुक्त करेन. कायमचं. ह्या जगातून." 


एवढं म्हणून ती भयानक हसली आणि पुन्हा आपली अघोरी साधना चालु केली. अमेयला कहीही सुचत नव्हत. त्याने त्या अदृश्य बंधनातून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ते दिव्य शस्त्रही त्याच्यापासुन कितीतरी फुट दुरवर पडलं होत. शेवटी हताश होऊन त्याने आयुष्यात पहिल्यांदा मनोमन देवाला प्रार्थना केली.


तेवढ्यात अचानक एक अद्भुत गोष्ट घडली. अमेयच्या काही फुट अंतरावर एक पांढरा प्रकाश पसरला. त्या प्रकाशाने अमेयचे डोळे दिपले. त्या प्रकाशातून कोणीतरी येत होत. क्षणभर त्याला तिथे स्वामी आल्याचा भास झाला. पण तिथे स्वामी नाही तर काही लहान मुलं होती. एक दोन नाही तर तब्बल ४०-५० मुलं अमेयच्या दिशेने होती. अमेय त्या लहान मुलांकडे आश्चर्याने पहात होता. ती मुलेंअमेयच्या चारी बाजुंनी जाऊन उभी राहीली. अमेय त्या मुलांकडे डोळे विस्फारून पाहत होता. ही तीच मुलं होती, ज्यांचे साराह विंचेस्टरने बळी दिले होते. त्या मुलांनी आपले हात अमेयच्या दिशेने केले. त्यांच्या हातातून पांढरा प्रकाश निघाला. तो प्रकाश अमेयच्या शरीरावर पसरला. त्याला गुदगुल्या झाल्यासारख वाटलं आणि अचानक त्याचं शरीर स्वतंत्र झाल. 


ते अदृश्य बंधन नष्टं झालं होत. तो हलू शकत होता. तो उठून बसला. तो अजुनही त्या मुलांकडे बघत होता. पण यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य असे मिश्र भाव होते. त्यांतील एका मुलाने पुढे होऊन ते दिव्य शस्त्र अमेयच्या पुढे धरल. अमेयने ते शस्त्र घेतल. त्या मुलाने तिकडे बोट दाखवला जिकडे ती अघोरी साधना चालली होती. साराह विंचेस्टरची साधना आता संपली होती. ती उभी राहीली होती. तीच्या हातात एक चमचमती तलवार होती. ती बळीची तयारी करत होती. अमेयने पुन्हा त्या मुलांकडे पाहील. पण तिथे आता कोणीच नव्हत. तो पांढरा प्रकाश लुप्त झाला होता. अमेय उठून उभा राहीला आणि क्षणाचाही उशीर न करता साराह विंचेस्टरच्या दिशेने पळाला. ती आता किमया जवळ आली होती. तिने बळी देण्यासाठी तलवार उगारली होती, पण अचानक तिचं लक्ष पळत येणाऱ्या अमेयकडे गेल. तिला काही समजायच्या आतच अमेयने ते दिव्य शस्त्र तिच्या छातीच्या आरपार घुसवलं. एका क्षणाची शांतता आणि त्यानंतर एक जीवघेणी किंकाळी. बघता बघता तिच्या शरीराची राख झाली होती. साराह विंचेस्टरसोबत ते दिव्य शस्त्र सुध्दा नष्ट झालं होतं.


              


 हे थरारनाट्य संपेपर्यंत संध्याकाळ झाली होती. तळघराच्या दरवाज्यातून अमेय किमयाला घेऊन वरती आला. त्याच्यामागोमाग रामुकाका आणि जयंत सुध्दा आले. साराह विंचेस्टरबरोबर  तिच्या काळा जादूचा प्रभावही संपला होता. रामुकाका, जयंत आणि किमया शुध्दीवर आले होते. ते चारही जण तळघराच्या बाहेर आले तेव्हा नुकतीच संध्याकाळ व्हायला लागली होती. त्या चौघांनी शेवटचं एकदा मागे वळून पाहिलं. आता तो तळघराचा दरवाजा गायब झाला होता. चौघेही जण बंगल्याच्या पुढच्या दारी आले. अचानक अमेय एकदम थांबला. समोर शारदा उभी होती. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत उभे राहीले आणि एकदम शारदाने पळत अमेय आणि किमयाला मिठी मारली. थोड्या वेळाने ते एकमेकांपासुन दूर झाले. अचानक अमेयने शारदाला विचारलं, "  स्वामी इथे दिसत नाहीत. घरात आहेत का?"


नाही. मला तर नाही दिसले. जेव्हापासून मी शुध्दीत आलेय तेव्हापासुन इथेच उभी आहे.


मग स्वामी गेले कुठे, अमेयने विचारले.


अचानक रामुकाकांचं लक्ष खाली उमटलेल्या पायांच्या ठशांकडे गेलं. एक मंद स्मित करून ते म्हणाले, "साहेब,  स्वामींची चिंता तुम्ही करू नका. ते जे काम करायला आले होते ते झालं. ते गेले."

अमेय काही बोलणार एवढ्यात जयंत मध्येच बोलला, "ओय अम्या, अरे यार पहिल्यांदा तुझ्या नव्या घरी आलोय. काही स्वागत वगैरे करायची पध्दत आहे की नाही."


अमेय भानावर येत म्हणाला, अरे अस कसं. तुझ स्वागत तर करावच लागेल. त्याशिवाय तू मला सोडणार आहेस का? हो. जेवणात मला पंचपक्वान्न हवेत बरं का? नुसतं भाजी भाकरी वर निभावून चालणार नाही…. जयंत हसत हसत बोलला.


हसत खिदळत त्या सगळ्यांनी नवीन घरात नवीन प्रवेश केला.



                                           *******समाप्त*******




Rate this content
Log in

Similar marathi story from Horror