टाईम ट्रॅव्हल - खंड १ - द बिगिनिंग
टाईम ट्रॅव्हल - खंड १ - द बिगिनिंग
ही कथा आहे प्रोफेसर भारद्वाज आणि त्यांचा असिस्टंट अभिजीत यांची. जे एक टाईम मशीन तयार करतात. मात्र अचानक झालेल्या बिघाडामुळे ते भूतकाळात एका अज्ञात ठिकाणी पोहोचतात आणि त्यानंतर सुरूवात होते एका रोमांचक साहसाची.
......
प्रोफेसर भारद्वाज रस्त्याने येड्यासारखे पळत सुटले होते. आजुबाजुचे लोक त्यांना पाहुन हसतायत याच त्यांना भानही नव्हत. त्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.६५ वर्षाचे असूनही ते प्रोफेशनल अँथलीट सारखे पळत होते आणि पळतांना सारखे 'युरेका युरेका' ओरडत होते. त्यांना पाहुन आर्कीमीडीजचीच आठवण येत होती. फक्त फरक एवढा होता की आर्कीमीडीज हा बाथरूम मधून बिना कपड्यांचा पळाला होता तर प्रोफेसरांनी कपडे घातले होते.
प्रोफेसर पळत शहराच्या बाहेर आले होते. आता ते जंगलात घुसले. जंगलात थोड अंतर गेल्यानंतर एक झोपडीसारख घर दिसल. प्रोफेसर त्या झोपडीच्या दारापर्यंत येऊन थांबले. ते जोरजोरात धापा टाकत होते. काही वेळाच्या विश्रांनीनंतर प्रोफेसर हळूच उठले. थरथरत्या हातांनी त्यांनी झोपडीचा दरवाजा उघडला. मध्ये अजुन एक दरवाजा होता पण तो साधा दरवाजा नव्हता. त्याला कोणत्याही प्रकारचा कडीकोयंडा वगैरे नव्हता. फक्त दाराच्या वरच्या बाजुला एक तळहात मावेल एवढा गोल काचेचा आकार होता. त्या दाराच्याच उजव्या बाजुला एक स्क्रीन होती. त्या स्क्रीनच्या खाली काही बटन होते. प्रोफेसरांनी भराभर ते बटण दाबले. तसे त्या स्क्रीनवर काही आकडे उमटले. त्याबरोबर दारावरील त्या गोल काचेच्या आकाराचा रंग हिरवा झाला. आता प्रोफेसरांनी त्या गोल काचेवर आपला उजवा तळहात ठेवला. त्यासरशी तो दरवाजा उघडला गेला. जी बाहेरून पाहतांना एक साधारण झोपडी वाटते तीच आतून ऐक सुसज्ज अशी लॅबोरटरी होती. सर्व वैज्ञानिक साधनांनी लैस आणि परीपूर्ण अशी रीसर्च लॅब. एक त्यांचा असिस्टंट सोडला तर ही गोष्ट कोणालाही माहीत नव्हती. प्रोफेसरांनी चटकन आपला मोबाईल काढून असिस्टंटला फोन लावला.
अभिजीत त्यावेळेस साखरझोपेत होता. अचानक मोबाईलच्या ट्रींग ट्रींगने त्याची निद्रा भंगली. तो चरफडतच उठला,
"च्यायला, कोणाची शामत आलीय काय माहीत?"
बडबडतच त्याने फोन उचलला,
"हैलो, कोण आहे हे बे?
प्रोफेसरः अभिजीत, आताच्या आता लॅब वर ये. लवकर.
अभिजीतः सर, काय झाल? एनी प्रॉब्लेम?
प्रोफेसरः अरे आधी ये तर खरी.
अभिजीतः अहो सर, माझी अजुन अंघोळ बाकी आहे.
प्रोफेसरः काही करू नको. तसाच ये. पण तु मल अर्ध्या तासात इथे हजर पाहीजे कळल.
अभिजीतः हैलो.... हैलो सर.
पण तोपर्यंत प्रोफेसरांनी फोन ठेवून दिला होता.
अभिजीतची मोटरसायकल त्या जंगलाजवळ येऊन थांबली. त्याने मोटरसायकल एका झाडाच्या आडोशाला लावली आणि पायीपायीच त्या
लॅब जवळ आला. त्याने झोपडीचा दरवाजा उघडला. दाराच्या डाव्या बाजुला एक बटण होत ते त्याने दाबल. आतून आवाज आला,
"कोण आहे?"
अभिजीतः सर मी अभिजीत.
प्रोफेसरः पासवर्ड सांग.
अभिजीतः 'वेळ मूल्यवान आहे.'
काही क्षणांत दरवाजा उघडला गेला. अभिजीत मध्ये शिरला.
"काय झाल सर? एवढ तातडीने का बोलावलत?
प्रोफेसरः अभिजीत आपली रीसर्च सक्सेस झाली. ये इकडे
अस म्हणून प्रोफेसरांनी अभिजीतला मिठीच मारली. आजपर्यंत त्याने प्रोफेसरांना एवढ आनंदी कधीच पाहील नव्हत. प्रोफेसरांनी एका मोठ्या गोळ्यावर टाकलेल कापड ओढल.
टाईम मशीन.
प्रोफेसरांचा आनंद गगनात मावत नव्हता. मात्र अभिजीतच्या चेहर्यावर माशीही हलली नाही. तो मुर्खासारखा कधी प्रोफेसरांकडे तर कधी टाईम मशीनकडे बघत होता.
प्रकरण २
प्रोफेसरः अरे असा काय बघतोयस? तुला आनंद नाही झाला?
अभिजीतः पण मला कशाबद्दल आनंदी व्हायचय?
प्रोफेसरः अरे वेड्या, आपली टाईम मशीन चालु झाली आहे!
अभिजीत(आश्चर्याने)ः काय? कशी? आपण तर किती दिवसांपासून तिला चालु करण्याचा प्रयत्न करतोय पण काही होत नव्हत.
प्रोफेसरः बर मला सांग. ति का चालु होत नव्हती?
अभिजीतः प्रोफेसर, टाईम मशीनला चालवण्यासाठी असीमित ऊर्जा लागेल.
प्रोफेसरः मग मी तेच सांगतोय. ऊर्जेचा बंदोबस्त झाला आहे.
अभिजीतः कसा?
प्रोफेसरः न्युक्लीयर फिजन
अभिजीतः प्रोफेसर, न्युक्लीयर फिजन टेक्नॉलॉजी तर अणूबॉम्ब मध्ये वापरली जाते.
प्रोफेसरः बरोबर. यामूळे फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून अणूबॉम्बचा स्फोट महाभयंकर असतो. हे बघ, माझ्या डोक्यात दोन आयडीयाज होते. एक म्हणजे न्युक्लीयर फ्युजन आणि दुसर न्युक्लीयर फिजन. त्यापैकी न्युक्लीयर फ्युजनवर अजुन काम चालु आहे. त्याला इथे वापरण रिस्की ठरल असत. त्यामुळे मी न्युक्लीयर फिजनची निवड केली. आता फक्त गरज होती ती या टेक्नॉलॉजीतून निर्माण होणार्या ऊर्जेला नियंत्रित करण आणि माझ्यासारख्या टॅलेंटेड माणसाला विज्ञानक्षेत्रात कोणतेही काम अवघड नाही. मी ती पावर कंट्रोल केली. झाली आपली टाईम मशीन तयार.
नोटः न्युक्लीयर फ्युजन आणि न्युक्लीयर फिजन या दोन अणूऊर्जाविषयक टेक्नॉलॉजीज आहेत. न्युक्लीयर फ्युजनमध्ये दोन किंवा अधिक अणू एकत्र आल्यावर ऊर्जानिर्मीती होते. यावर संशोधन चालु असल्याने हे तंत्रज्ञान अजुन वापरात नाही तर न्युक्लीयर फिजनमध्ये एकाच अणुचे दोन किंवा अधिक भाग केले जातात. हे तंत्रज्ञान अणुबॉम्बमध्ये वापरतात. दोन्हींमधूनही प्रचंड ऊर्जा निर्माण होते.
"प्रोफेसर, यु आर जिनीयस." आता आनंदीत होण्याची पाळी अभिजीतची होती. "आपल स्वप्न साकार झाल."
प्रोफेसरः हो अभिजीत, अरे तू तर काहीच वर्षांपूर्वी आला आहेस. पण मी गेल्या २०-२२ वर्षांपासून यात मेहनत करतोय.आता माझी मेहनत फळाला आली. टाईम मशीनचा जनक म्हणून माझ नाव संपूर्ण जगात घेतल जाईल.
"सर, फक्त तुमच नाव?" अभिजीत डोळे बारीक करून म्हणाला.
प्रोफेसरः अ... अरे म्हणजे आपल्या दोघांच नाव. हाहाहा.
अभिजीतः बेटर. बाय द वे सर, तुम्ही टेस्ट केली कि नाही.
प्रोफेसरः नाही अजुन.
अभिजीतः मग पहीले मला टेस्ट करू द्या ना. प्लीज सर.
प्रोफेसरः नाही, नाही. सर्वात आधी आपण एखाद्या निर्जीव वस्तुवर प्रयोग करूया.
अस म्हणून प्रोफेसरांनी बाजुलाच पडलेल एक घड्याळ उचलल. त्यांनी टाईम मशीनचा दरवाजा उघडला. टाईम मशीन पृथ्वीच्या आकाराएवढी गोल होती. आत दोन जण एकावेळी बसतील एवढी खुर्ची होती. त्या खुर्चीच्या बाजुला एक स्क्रीन होती. त्या स्क्रीनवर TIME, LOCATION, DATE, YEAR, RETURNING TIME अस लिहीलेल होत. त्या स्क्रीनच्या खाली बटण आणि त्या बटणांवर १-९ आकडे होते तसेच इंग्रजी अल्फाबेट्सही होते. प्रोफेसरांनी घड्याळ त्या खुर्चीवर ठेवल. आता सकाळचे सात वाजले होते. प्रोफेसरांनी त्या स्क्रीनवर सकाळी ६:३०चा टाईम टाकला. लोकेशन त्याच जंगलातील टाकल, तारीख आणि वर्ष १४ जून २०१९ टाकल आणि रीटर्नींग टाईम १ मिनिट टाकला. जेणेकरून टाईम मशीन एका मिनीटात तिच्या मूळ स्थानी परतेल. प्रोफेसरांनी मशीनचा दरवाजा बंद केला आणि GO चे बटन दाबले. अचानक टाईम मशीनमधून निळा प्रकाश बाहेर पडला भुर्र भुर्र आवाज करत टाईम मशीन फिरायला लागली आणि त्या दोघांच्याही नजरेसमोरून गायब झाली.
प्रकरण ३
....तस तर ते केवळ ६० सेकंद होते. मात्र एक एक सेकंद त्यांना एक युगासारखा भासत होता. टाईम मशीन सुखरूप परत येईल का? तिच्यात काही बिघाड तर होणार नाही? असे एक ना अनेक प्रश्न त्या दोघांच्याही मनात काहुर माजवत होते. १० सेकंद राहीले होते, ९... ८... ७... ६... ५... ४... ३... २... १... ० अचानक निळा प्रकाश पसरला आणि आवाज करत टाईम मशीन त्यांच्या दृष्टीस पडली. ते घड्याळ जसच्या तस त्या खुर्चीवर होत. प्रोफेसर आणि अभिजीत दोघांनीही जल्लोष केला. त्यांची टेस्टींग यशस्वी झाली होती.
"सर, मला वाटत आता टाईम मशीन पूर्णपणे तयार आहे." अभिजीत आनंदाने उड्या मारत म्हणाला.
प्रोफेसरः ह्म. वाटत तर असच आहे. पण तरीही अजुन माझा पूर्णपणे विश्वास बसलेला नाही. एक काम करतो. आता मी स्वतः याची टेस्टींग करतो. जर यावेळेस तिने व्यवस्थित काम केल तर याचा अर्थ आपला प्रयोग यशस्वी झाला. ठिक आहे?
अभिजीतः ओके सर.
अस म्हणून प्रोफेसर टाईम मशीनमध्ये बसले. मशीनची सगळी सेटींग त्यांनी तशीच ठेवली होती जशी त्या घड्याळाच्या वेळेस होती म्हणजे वेळ - सकाळी ६:३०, ठिकाण तेच जंगल आणी १ मिनिटाचा रीटर्नींग टाईम. प्रोफेसरांनी गो च बटण दाबल. पहिल्यासारखाच आवाज करत आणि निळा प्रकाश पसरवत टाईम मशीन गायब झाली...
प्रकरण ४
...बरोबर एका मिनिटाने टाईम मशीन परत आली. अभिजीतच्या चेहर्यावर टेस्टींग सफल झाल्याचा आनंद होता. मात्र लगेच तो आनंद मावळला आणि त्याची जागा आश्चर्ययुक्त भितीने घेतली. टाईम मशीन तर परतली होती. पण प्रोफेसरांशिवाय. त्याने प्रोफेसरांना फोन लावला. पलीकडून एका स्त्रीचा गोड, नम्र आवाज आला,
"तुम्ही ज्या नंबरला कॉल करत आहात, तो अस्तित्वात नाही. कृपया आपला नंबर तपासून पहा."
आता मात्र अभिजीतचे इंडिकेटर लागले होते. नक्कीच काहीतरी अघटीत घडल होत. आता काय कराव? प्रोफेसरांशी कसा संपर्क साधावा? असे नाना प्रश्न त्याला सतावू लागले होते. त्याने एक नजर टाईम मशीनवर टाकली. अचानक त्याच्या डोक्यात एक आयडीया आली.
अभिजीत मशीन जवळ आला. त्याने त्या मशीनच्या स्क्रिनवर पाहील. तर त्याला धक्काच बसला. ती स्क्रिन पूर्ण ब्लँक होती. त्या स्क्रिनवर ना टाईम होता, ना लोकेशन. टाईम मशीनमध्ये अशी सुविधा होती कि एकदा टाईम आणि लोकेशन टाकल्यानंतर त्यात जोपर्यंत आपण काही बदल करत नाही. तोवर तेच टाईम आणि लोकेशन मशीनमध्ये फिड रहात. म्हणजे नुसत गो च बटन दाबल कि आपण त्याच टाईमावर, त्याच लोकेशनवर पोहोचतो. जेथे आधी गेलो होतो. अभिजीत मशीनमध्ये बसला आणि त्याने गो च बटण दाबल. टाईम मशीन पुन्हा गायब झाली होती....
प्रकरण ५
.....टाईम मशीन एका ठिकाणी प्रकट झाली. अभिजीत मशीनमधून खाली उतरला. त्याने आजुबाजुला पाहिल. तो एका घनदाट जंगलात उभा होता. पण हे ते जंगल नव्हत, जिथे त्यांची लॅब होती ज्याच लोकेशन मशिनमध्ये सेट केले होत. ही जागा थोडी जुन्या काळातील वाटत होती. कदाचित टाईम मशीन काही वर्ष भूतकाळात सरकली असेल. अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि त्याच्या काळजात धस्स झालं! टाईम मशीनचा रिटर्नींग टाईम एकाच मिनिटाचा होता. त्याने मागे वळून टाईम मशीनच्या स्क्रिनवर बघितलं. टाईम मशीन तिच्या मूळ स्थानावर परत जायला केवळ १० सेकंद बाकी होते. अभिजीतने चपळाईने मशीनच ऑफ बटन दाबले आणि सुटकेचा निःश्वास सोडला. आता जोवर टाईम मशीनला पुन्हा ऑन करत नाही तोवर ती कुठेही जाणार नव्हती.
अभिजीत समोर आव्हान होत प्रोफेसरांना शोधण्याचं. हे कोणत ठिकाण आहे माहीत नव्हतं, प्रोफेसर कोणत्या दिशेला असतील तेही माहीत नव्हत, बरं भूतकाळात मोबाईल नसल्याने त्यांचा फोन लागण तर शक्यच नव्हतं. शेवटी तो शोधत शोधत निघाला. मध्ये मध्ये तो प्रोफेसरांना हाका मारत होता. काही अंतर चालत गेल्यावर त्याच्या पायाखाली काहीतरी टोचले. त्याने खाली पाहील. ते प्रोफेसरांच घड्याळ होत. आता अभिजीतच्या आशा पल्लवित झाल्या. नक्कीच प्रोफेसर ह्या रस्त्याने गेले असतील असा विचार करून तो निघाला....
प्रकरण ६
काही वेळ चालल्यावर अचानक अभिजीतला काही आवाज ऐकू आले. तो आवाजाच्या दिशेने निघाला. अभिजीत जसजसा पुढे जात होता, तसतसे ते जंगल दाट होत होते. ते आवाज आता जास्तच यायला लागले होते आणि अचानक अभिजीत त्या जागेवर येऊन पोहोचला. त्याच्या समोर एक आदिवासीसारख्या माणसांचा कबिला होता. पण त्यांचा पेहराव हा भारतीय आदिवासींसारखा अजिबात नव्हता. असं वाटत होतं, कि ते लोक सध्याच्या टेक्नोलॉजी पासून हजारो वर्ष दूर होते. अभिजीत हळूहळू पुढे गेला. ते लोक नाचत होते आणि त्यांच्या विचित्र भाषेत विचित्र आवाज काढत होते. अभिजीतने आजुबाजुला पाहिल आणि त्याला धक्का बसला. त्याच्या बाजूला काही अंतरावर प्रोफेसरांना एका झाडाला बांधलेलं होतं. त्यांच्या समोर आग जळत होती. अभिजीतला समजायला वेळ लागला नाही कि इथे बळी देण्याची तयारी चालू आहे आणि बळीचा बकरा प्रोफेसरांना बनवलं आहे. त्याला आता लवकरात लवकर काहीतरी करणं भाग होतं. तो चुपचाप प्रोफेसरांजवळ आला. अभिजीतला पाहून प्रोफेसरांच्या जीवात जीव आला. अभिजीतने प्रोफेसरांना त्या झाडापासून मुक्त केलं. पण अचानक एका विचित्र माणसाची नजर त्या दोघांवर पडली. त्याने ओरडून आपल्या साथीदारांना सावध केलं. अभिजीत प्रोफेसरांना घेऊन पुढे पळाला. ते माणसे दगडी हत्यारे घेऊन त्यांचा पाठलाग करत होते. जंगलातील झाडाझुडुपांमध्ये पळताना त्या दोघांना थोडी अडचण होत होती. ते माणसे आता त्यांच्या जवळ येत होते. अभिजीत आणि प्रोफेसर पळत पळत एका जंगलाच्या बाहेर आले. जंगलाच्या बाहेर आल्याने माणसांनी सुध्दा त्यांचा पाठलाग सोडून दिला होता. अभिजीत आणि प्रोफेसर पळून पळून दमले होते. आता त्यांना टाईम मशीनचा रस्ता सापडण जवळपास अशक्य होतं.
"अरे बापरे, केवढे भयानक लोक होते ते." प्रोफेसर धापा टाकत म्हणाले.
अभिजीत: पण नेमके ते लोक होते कोण?
प्रोफेसर: माहीत नाही. पण जुन्या काळातील आदिवासींसारखे दिसत होते.
अभिजीत: कदाचित टाईम मशीन आपल्याला काही वर्ष मागे भूतकाळात घेऊन आली आहे.
प्रोफेसर: हं. टाईम मशीन अजुनही पूर्ण तयार नव्हती. आपण घाई केली. आता टाईम मशीनला रीसेट करावं लागेल. पण त्यासाठी आपल्याला मशीनपर्यंत पोहोचाव लागेल आणि जेवढ मला माहित आहे आपण रस्ता चुकलो आहोत.
अभिजीत: पण मग प्रोफेसर, आता आपण परत कसं जायचं?
प्रोफेसर: माझ्यामते आपण कमीत कमी ५०० वर्ष भूतकाळात आलेलो असु शकतो. म्हणजे १५व्या-१६व्या शतकात.
अभिजीत: पण हे तुम्ही कसं सांगू शकता?
प्रोफेसर: कारण, ज्या माणसांना आता आपण बघितल, ती माणसे जवळपास ५००-६०० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती आणि आणखी एक गोष्ट आपण भारतापासून अगदीच दूर कुठल्यातरी देशात आलोय. कारण मागच्या हजार वर्षांच्या भारतीय इतिहासात अश्या प्रकारची मानवी प्रजाती आढळत नाही.
प्रोफेसर: अभिजीत, माझं एक स्वप्न होतं, कि आपला जो मानवी इतिहास आहे, त्याच खरं रूप समोर आणणं. त्यासाठीच गेली २२ वर्षे मी टाईम मशीन साठी खर्ची घातले.
अभिजीत: तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय प्रोफेसर?
प्रोफेसर:मला हेच म्हणायचंय कि आपली सुरूवात आपल्याला हवी तशी झालेली नाही. पण तरी टाईम मशीनने आपल्याला इथे आणून सोडलय. तर मग आपण या जागेला एक्सप्लोर करू शकतो. नाही का? बघू तरी नियतीच्या मनात काय आहे ते?
अभिजीत: पण प्रोफेसर, यात खूप रिस्क आहे. एकतर आपल्याला ही जागा कोणती आहे, हा काळ कोणता आहे ते माहीत नाही आणि आपली पहिली प्रायोरिटी ही टाईम मशीन शोधणं असायला हवी. तिच्या शिवाय आपण आपल्या काळात जाऊ शकणार नाही.
प्रोफेसर: करेक्ट आहे. एकदम बरोबर बोललास. पण काय आहे ना अभिजीत, आपण भूतकाळात आलो आहोत. आता पर्यंत इतिहास हा फक्त पुस्तकात वाचत आलो आहोत. आज पहील्यांदाच आपण खरा इतिहास पाहू शकतो. भूतकाळात नेमकं काय घडलं होतं, ते अनुभवू शकतो. डोन्ट यू थिंक हे इंटरेस्टिंग असेल? आणि राहिली टाईम मशीनची गोष्ट तर ती आपण शोधूच त्यात काही वाद नाही. अभिजीत, प्रत्येक वाईटातून काहीतरी चांगलं निघत. आपण फक्त दृष्टिकोन बदलायला हवा आणि असंही टाईम मशीन आपण याच कारणासाठी बनवली होती. नाही का?
अभिजीत: प्रोफेसर, वाईटातही चांगलं शोधणं कोणी तुमच्याकडून शिकावं. ठिक आहे. चला. लेट्स एक्सप्लोर.
आणि ते निघाले भूतकाळाला एक्सप्लोर करायला. मात्र त्यांना या गोष्टीची पुसटशीही कल्पना नव्हती की हजारो वर्षांपासूनचं न उलगडलेल एक भलंमोठं रहस्य त्यांची वाट पाहत होत....
प्रकरण ७
.... प्रोफेसर आणि अभिजीत त्या निर्मनुष्य भागातून चालत होते. ज्या जंगलातून ते आले होते ते जंगल बरच मागे पडलं होतं. आजुबाजुला केवळ तुरळक झाडी होती. पण तो परिसर पाहून दोघांच्याही हे लक्षात येत नव्हत कि ते नेमके कोणत्या ठिकाणी होते. अचानक अभिजीतने विचारल,
"प्रोफेसर, तुम्ही त्या माणसांच्या हातात सापडलाच कसे.?"
प्रोफेसर: जेव्हा मी टाईम मशीन सोबत इथे आलो. तेव्हा क्षणभरासाठी मला वाटलं कि आपण यशस्वी झालो आहोत. मात्र लगेचच मला समजले कि हे ते जंगल नाही ज्याचे लोकेशन आपण टाईम मशीन मध्ये सेट केले होते. त्या जागेला व्यवस्थित पाहण्यासाठी मी मशिनच्या बाहेर आलो. थोडं पुढे गेलो असेल कि अचानक मला काही आवाज आले ते आवाज जंगलातूनच कुठूनतरी येत होते. मी त्या आवाजांच्या दिशेने निघालो. थोडं दूर गेल्यावर मला ते विचित्र लोक दिसले. त्यांना पाहील्याबरोबर मला कळाल होत. कि टाईम मशीन चुकीने मला कोणत्यातरी वेगळ्याच काळात घेऊन आली आहे. त्यांनाही मी दिसलो होतोच. मला काही कळायच्या आत त्या लोकांनी मला पकडून झाडाला बांधून टाकले.
अभिजीत: आणि तुम्ही टाईम मशीन ऑफ करायची विसरला होतात ज्यामुळे मशीन पुन्हा आपल्या मूळ स्थानी परत आली.
प्रोफेसर: करेक्ट
बोलत बोलत ते एका निर्जन ठिकाणी आले होते. तिथे पूर्ण सपाट जमिन होती आणि काही अंतरावर एक मंदिरासारखी वास्तु होती. प्रोफेसर त्या वास्तु जवळ आले. ती वास्तु पांढर्या चुनखडीच्या दगडांची, लाईमस्टोनची बनलेली होती. त्या वास्तुला दरवाजा नव्हता. त्यामूळे प्रोफेसर त्या वास्तुच्या आत शिरले. आत शिरल्यावर त्यांना दिसलं कि ते एका शवगृहा मध्ये होते. तिथे अनेक कबरी होत्या. प्रोफेसर तिथे उभे राहिले. इतक्यात अभिजीतही तिथे येऊन पोहोचला.
"हे काय आहे, प्रोफेसर?" त्याने विचारले.
प्रोफेसर: मॉरच्युअरी टेंपल
अभिजीत: म्हणजे शवगृह ना
प्रोफेसर: हो. अभिजीत, मला असं वाटतं कि आपण बर्याच मागच्या काळात येऊन पोहोचलो आहोत. कारण अश्याप्रकारच्या कबरी ह्या इसवी सनापूर्वी अस्तित्वात होत्या.
अभिजीत: पण मग आता काय विचार आहे तुमचा? काय करायचं आपण?
प्रोफेसर त्याच्या प्रश्नाच उत्तर न देता त्या शवगृहाच्या बाहेर आले. अभिजीतही त्यांच्या मागोमाग आला. प्रोफेसर काही बोलणार इतक्यात एक बाण त्यांच्या कानाजवळून सू... सू.... आवाज करत गेला. दोघांनीही दचकून त्या दिशेला बघितले. तेथे दोन माणसे उभे होते. एकाच्या हातात धनुष्यबाण होता आणि दुसर्याच्या हातात भाला होता. त्या दोघांनी आपली शस्त्रे अभिजीत आणि प्रोफेसरांच्या दिशेने रोखली होती. त्या माणसांचा पोशाख वेगळाच होता. ते अर्धनग्न अवस्थेत होते. फक्त शरीराच्या खालच्या भागावर लोकरीचे कापड घातलं होतं. त्या माणसांचा पोशाख प्रोफेसरांना कुठेतरी पाहील्यासारखा वाटत होता. मात्र कुठे ते नेमकं आठवत नव्हतं आणि आता आठवायला वेळही नव्हता. कारण ते माणसे आता हळूहळू त्यांच्या दिशेने येत होते. ती माणसे त्या दोघांजवळ येऊन उभे राहिले. त्यातील एक जण कधीही न ऐकलेल्या विचित्र अश्या भाषेत काहीतरी बोलला. प्रोफेसर आणि अभिजीतने एकमेकांकडे पाहीले. शेवटी हिम्मत करून प्रोफेसरांनी त्या माणसांना विचारले,
"तुम्ही कोण आहात? आणि ही कोणती जागा आहे?"
आता एकमेकांकडे पाहण्याची पाळी त्या माणसांची होती. अभिजीत हळूच प्रोफेसरांना म्हणाला,
"प्रोफेसर, मला वाटतं कि आपण इथून निघायला हव."
बहुतेक प्रोफेसरांनाही अभिजीतच म्हणणं पटलं असाव. म्हणून त्यांनी अभिजीतच्या बोलण्याला दुजोरा दिला. दोघे जण तिथून जायला निघाले. मात्र ते दोघे माणसं त्यांचा रस्ता अडवून उभे राहिले. आता मात्र अभिजीतला खरोखरच धोका जाणवायला लागला होता. त्याने पूर्ण ताकदीनिशी त्या समोरच्या माणसाला जोराचा धक्का दिला. आणि तिथून पळाला. प्रोफेसरही त्याच्या मागे धावले. अचानक मागून एक बाण आला आणि प्रोफेसरांच्या पाठीत घुसला. प्रोफेसर एक किंचाळी मारून खाली कोसळले. अभिजीत प्रोफेसरांजवळ आला आणि प्रोफेसरांना उठवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र त्यांच्या शरीरात काही हालचाल नव्हती. इतक्यात अजुन एक बाण वार्याच्या वेगाने आला आणि त्याने अभिजीतच्या मानेचा वेध घेतला. अभिजीतही बेशुद्ध होऊन खाली पडला होता....
प्रकरण ८
....अचानक अभिजीतचे डोळे उघडले गेले. तो डोळे चोळत उठून बसला. काही क्षण त्याला कळत नव्हतं. कि त्याच्यासोबत नेमकं काय घडलं होतं. अचानक त्याला सगळं आठवलं. टाईम मशीनचं चुकून एका अज्ञात ठिकाणी येण, त्याचा सामना विचित्र जंगली लोकांशी होण, एक शवगृह दिसण, आणि काही रहस्यमयी शस्त्रधारी लोकांच तिथे येऊन त्याला आणि प्रोफेसरांना बेशुद्ध करणं. सगळं एक एक करून आठवत होतं. त्याने आपल्या चारही बाजुला नजर फिरवली. तो एका खोलीत होता. त्याच्या बाजूला प्रोफेसर अजुनही बेशुद्धावस्थेत पडलेले होते. अभिजीतने प्रोफेसरांना हाका मारल्या. त्यांनी हळूहळू आपले डोळे उघडले.
"अरेच्चा, सकाळ झाली वाटत. पण आज खूपच गाढ झोप लागली होती बाबा." प्रोफेसर जांभई देत बोलले.
अभिजीत आ वासून त्यांच्या तोंडाकडे बघत राहिला.
"ओ प्रोफेसर, काय बोलताय तुम्ही. काही वेळापूर्वी आपल्या सोबत काय घडलं ते विसरलात वाटत."
"काय घडलं आपल्यासोबत?" असं म्हणून प्रोफेसर आठवण्याचा प्रयत्न करू लागले आणि अचानक त्यांनाही ते सगळं आठवलं जे त्यांच्यासोबत घडलं होतं.
प्रोफेसर: अरे हो, मला आठवलं. आपल्याला काही माणसांनी बेशुद्ध केलं होतं. पण ते माणसे कोण होते? आणि आपण कुठे आहोत?
अभिजीत: जे प्रश्न तुम्हाला पडलेत ना तेच मलाही पडलेत. ही कोणती जागा आहे ते मलाही माहित नाही.
अचानक एका अपरिचित आवाजाने त्यांचं लक्ष वेधले,
"कोण आहात तुम्ही? आणि इथे कुठून आणि कसे पोहोचलात?"
अभिजीत आणि प्रोफेसरांनी आवाजाच्या दिशेने बघितलं. त्यांच्या पासून काही अंतरावर एक माणूस उभा होता. गोरापान रंग, घारे डोळे, सोनेरी केस आणि अंगात पॅन्ट शर्ट अशाप्रकारचा तो माणूस हळूहळू चालत त्या दोघांजवळ आला. अभिजीत आणि प्रोफेसरांनी एकमेकांकडे बघून काहीतरी इशारा केला. प्रोफेसर पुढे झाले आणि त्या माणसासमोर उभं राहून बोलले,
"पहीले तु सांग, तु कोण आहेस? आणि इथे कसा आणि कुठून पोहोचलास? तूच तर आम्हाला अपहरण करून नाही आणलस ना?
तो माणूस: नाही. माझं नाव अॅंड्र्यू, मी अमेरिकेतून आलोय आणि मीही इथे तुमच्यासारखाच कैदी आहे.
अभिजीत: काय? कैदी? म्हणजे तुला असं म्हणायचंय कि आपण आता ज्याठिकाणी आहोत ते एक जेल आहे?
अॅंड्र्यू: हो. तुम्ही भविष्यातून आला आहात का?
त्याच बोलणं ऐकून दोघेही जण डोळे फाडून त्याच्याकडे बघत होते.
प्रोफेसर: हे तुला कसं कळलं?
अॅंड्र्यू: कारण मीही भविष्यातूनच आलोय.
प्रोफेसर: मग तुझी टाईम मशीन कुठे आहे?
अॅंड्र्यू: ही काय.
असं म्हणून त्याने आपला डाव्या हाताच मनगट दाखवल. त्यावर एक घड्याळ होत.
प्रोफेसर: हे घड्याळ म्हणजे टाईम मशीन आहे?
अॅंड्र्यू: हो. २१५० सालात अश्याच टाईम मशीन बनतात.
प्रोफेसर: तू २१५० सालातून आला आहेस?
अॅंड्र्यू: बिलकूल. पण तुम्ही मला तुमच्याबद्दल काही सांगितलं नाहीत.
अभिजीत: हे प्रोफेसर भारद्वाज आहेत आणि मी त्यांचा असिस्टंट अभिजीत. आम्ही २०१९ सालातून आलो आहोत.
प्रोफेसर: एक मिनिट. तु अमेरिकेचा आहेस बरोबर?
अॅंड्र्यू: हो.
प्रोफेसर: मग तुला मराठी भाषा कशी काय येते?
अॅंड्र्यू: कारण मी जगातील कोणतीही भाषा बोलू, वाचू आणि समजू शकतो.
अभिजीत: बरं ओळख झालीच आहे तर आता तरी सांग कि आपण कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या काळात आहोत?
अॅंड्र्यू: तुम्हाला खरच माहीत नाही?
"नाही." दोघेही एकदम बोलले.
अॅंड्र्यू: मग ऐका. आपण १३२७ सालात आहोत.
प्रोफेसर: म्हणजे आमच्या काळाप्रमाणे ७०० वर्ष मागे?
अॅंड्र्यू: नाही. तुमच्या काळाप्रमाणे ३३४६ वर्ष मागे. आपण १३२७ AD मध्ये नाही १३२७ BC मध्ये आहोत.
प्रोफेसर: म्हणजे तुला म्हणायचंय कि आपण इसवी सन पूर्व १३२७ मध्ये आहोत.
अॅंड्र्यू: बरोबर. आणि आपण ज्याठिकाणी आहोत. ते ठिकाण आहे,
द ग्रेट पिरामिड ऑफ गिजा इन इजिप्त.
अॅंड्र्यूच बोलणं ऐकून अभिजीत आणि प्रोफेसर वेड्यासारखे त्याच्या तोंडाकडे पाहत राहिले.....
प्रकरण ९
.....अॅंड्र्यूच्या बोलण्यावर दोघांनाही विश्वास बसत नव्हता. प्रोफेसरांनी अभिजीतला जोराचा चिमटा काढला. अभिजीत जीवाच्या आकांताने ओरडला,
"आआआह, प्रोफेसर काय करताय?"
प्रोफेसर: म्हणजे हे स्वप्न नाही तर.
अॅंड्र्यू: नाही हे अजिबात स्वप्न नाही सत्य आहे.
प्रोफेसर डोळे फाडून त्या प्राचीन ईजिप्शियन तुरूंगाला बघत होते. ज्याच्या बद्दल आधुनिक जगात कुठेही फारशी माहिती उपलब्ध नव्हती. मात्र अभिजीतच्या डोक्यात वेगळेच विचार घर करत होते. त्याची नजर त्याच्या समोर उभ्या असलेल्या आणि २२ व्या शतकातून आलेल्या त्या रहस्यमयी माणसाला न्याहाळत होती. अॅंड्र्यूने अजून स्वत: बद्दल काहीच सांगितलं नव्हतं. त्यामूळेच अभिजीतच्या डोक्यात त्याच्या बद्दल संशयाचा किडा वळवळत होता. शेवटी न राहवून अभिजीतने त्याला विचारलच,
"पण तु हे नाही सांगितलंस कि तु इथे का आणि कसा आलास? तुझी टाईम मशीन सुध्दा खराब झाली होती का?"
अॅंड्र्यू: नाही. नाही. मी इथे एका महत्त्वाच्या कामासाठी आलोय.
अभिजीत: कोणत काम?
अॅंड्र्यू: सॉरी, ते मी आता नाही सांगू शकत. जर मला पुढे कधी सांगावस वाटल तर सांगेल. तसं सध्या आपल्याला ह्या जेलमधून बाहेर पडायचा विचार करायला हवा.
अभिजीत: पण आपण इथून बाहेर कसं पडणार? इथे तर कुठेच दरवाजा दिसत नाहीए. फक्त भिंतीच आहेत.
अॅंड्र्यू: मला पक्का विश्वास आहे कि दरवाजा इथेच कुठेतरी भिंतींमध्ये लपलेला आहे.
अभिजीत: एक सिक्रेट दरवाजा. मला नवल वाटत कि या प्राचीन ईजिप्शियन लोकांकडे इतकी टेक्नॉलॉजी आली कुठून?
अॅंड्र्यू: तुला खरंच असं वाटतं कि हे पिरामिड्स प्राचीन ईजिप्शियन लोकांनी बनवले आहेत?
अभिजीत: म्हणजे काय म्हणायचय तुला?
अॅंड्र्यू: कळेल लवकरच.
एवढ्यात प्रोफेसरही त्यांच्या चर्चेत सहभागी झाले,
"या तुरूंगाच्या चारही भिंती या लाईमस्टोनने म्हणजेच चुनखडीच्या दगडांनी बनलेल्या आहेत. लाईमस्टोन हा एक सॉफ्ट स्टोन असतो. ज्याला कापणं सोपं असतं आणि त्याचा कापतांना आवाजही होत नाही. फक्त प्रॉब्लेम असा आहे कि त्याला कापण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही."
अॅंड्र्यू: ओह शीट, माझ्याकडून इतकी मोठी चूक कशी होऊ शकते. प्रोफेसर, यु आर जिनियस.
असं म्हणून त्याने त्याच्या खांद्याला लटकलेल्या छोट्या पॉकेट मधून लांब धारदार करवतीसारखी वस्तु काढली. ती वस्तु त्याने लाईमस्टोनच्या भिंतीत खुपसली आणि गोल फिरवली. आरामात एक माणूस जाऊ शकेल असा रस्ता त्या भिंतीत तयार झाला होता. हे सर्व अभिजीत आणि प्रोफेसर आश्चर्यचकित होऊन बघत होते.
अॅंड्र्यू: आपण स्वतंत्र झालो. चला.
अॅंड्र्यू त्या भगदाडातून बाहेर आला. त्याच्या मागे अभिजीत आणि प्रोफेसरही बाहेर पडले. सुदैवाने ते ज्या भागातून बाहेर पडले होते तेथे कोणीही पहारेकरी नव्हता. त्यामूळे ते आरामात हळूहळू चालत होते. अॅंड्र्यू सर्वात पुढे अत्यंत सावधपणे सगळीकडे नजर ठेवून चालत होता. त्याच्यामागे प्रोफेसर चारी बाजुला आश्चर्याने पाहत चालत होते. ते कधीच पिरामिडच्या इतक्या आत मध्ये आले नव्हते. सर्वात शेवटी अभिजीत चालत होता. मात्र त्याचा अॅंड्र्यू बद्दलचा संशय अजुनही गेला नव्हता. त्याने अचानक प्रोफेसरांना थांबवलं.
प्रोफेसर: काय रे काय झालं? का थांबवलस?
अभिजीत: मला ह्या अॅंड्र्यूवर संशय आहे.
प्रोफेसर: कसला संशय?
अभिजीत: म्हणजे बघा ना. तो कोण आहे, कुठून आला आहे, का आला आहे, कोणी पाठवलंय. याबद्दल त्याने आपल्याला काहीच सांगितलं नाही. उलट आपल्याकडून सगळी माहिती काढून घेतली. मला हा माणूस गडबड वाटतोय.
प्रोफेसर: अरे त्याला जर काही करायचच असतं तर आधीच नसतं का केलं?
अभिजीत: पण प्रोफेसर....
इतक्यात अॅंड्र्यू तिथे येऊन पोहोचला.
"तुम्ही दोघे इथे काय करताय. आपल्याकडे मुळीच वेळ नाहीये. चला लवकर."
तिघेही जण पुढे चालू लागले होते. ते ज्या रस्त्याने जात होते तो एक अरूंद रस्ता होता. अचानक अॅंड्र्यू थांबला. त्याने त्या दोघांना लपण्याचा इशारा केला. तिघेही तिथेच एका भिंतीच्या आडोशाला आवाज न करता उभे राहिले. त्यांच्या अगदी जवळून एक माणूस हातात भाला घेऊन निघून गेला. त्या माणसाला पाहील्यावर अभिजीतच्या लक्षात आलं कि ह्या माणसाने सुध्दा तेच कपडे घातले आहेत, जे त्याच्यावर आणि प्रोफेसरांवर हल्ला करणार्यांनी घातले होते. अॅंड्र्यूने पुन्हा त्या दोघांना चलायला सांगितलं.
काही वेळ चालल्यावर ते एका ठिकाणी थांबले. ती एक मोठी खोली होती. ते तिघेही आत गेले.
अभिजीत: हे कुठे आलो आपण?
अॅंड्र्यू: हे एक चेम्बर आहे. पिरामिड मध्ये असे असंख्य सीक्रेट चेम्बर्स आहेत.
अभिजीत: पण तुझा इथे येण्याचा हेतू काय आहे?
अॅंड्र्यूने एक दिर्घ श्वास घेतला.
अॅंड्र्यू: तु मला विचारलं होतस ना कि मी इथे काय काम करायला आलोय म्हणून.
अभिजीत: हो.
अॅंड्र्यू: खरंतर मी जे काम करायला आलोय. ते एक टॉप सीक्रेट आहे आणि मी याचा उल्लेख कोणाजवळही करायला नको. मात्र माहीत नाही का मला असं वाटतंय कि तुम्ही दोघे माझी या कामात खूप मदत करू शकता. कारण माझ्या या कामाच्या यशापशावर पृथ्वीचं पुढचं भविष्य अवलंबून आहे.
अभिजीत: तु जरा आम्हाला कळेल अश्या भाषेत बोलशील का?
अॅंड्र्यू: हे बघा. आता मी जे तुम्हाला सांगतोय त्याचावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. कारण हे खूप अनाकलनीय आहे. हे असं होऊ शकतं याचा कधी तुम्ही स्वप्नातही विचार केला नसावा.
अभिजीत: ए बाबा, प्रस्तावना बस झाली आता. सरळ मुद्द्यावर ये ना.
अॅंड्र्यू: हे पिरामिड प्राचीन ईजिप्शियन लोकांनी नव्हते बांधले.
अभिजीत: मग कोणी बांधले होते?
अॅंड्र्यू: दुसऱ्या ब्रम्हांडातून आलेल्या लोकांनी....
प्रकरण १०
....अॅंड्र्यूच बोलणं ऐकून अभिजीत आणि प्रोफेसर दोघेही अवाक् होऊन त्याच्याकडे बघत होते.
अभिजीत: यु मीन एलियंस?
अॅंड्र्यू: हो, पण हे ते एलियंस नाही जे तुम्ही एखाद्या चित्रपटात किंवा कथेत वगैरे बघतात. मोठे डोके, मोठे डोळे, बारीक हातपाय. ही अगदी आपल्यासारखीच दिसणारी दुसर्या ब्रम्हांडाच्या पृथ्वीवरील मानवी प्रजाती आहे.
प्रोफेसर: म्हणजे हे आपले पुर्वज तर नाही. जे याच पृथ्वीवरून दुसर्या ब्रम्हांडात स्थायिक झाले असावेत.
अॅंड्र्यू: अजिबात नाही. यांचा आणि आपल्या पुर्वजांचा दूरदूर पर्यंत काहीच संबंध नाही. संबंध फक्त एवढाच कि या पृथ्वीवर जितकेही रहस्यमयी मोन्युमेंट्स आहेत, जसं कि पिरामिड्स, स्टोनहेंज, नाज्का लाईन्स, बर्म्युडा ट्र्यॅंगल अशाप्रकारचे काही रहस्यमयी बांधकाम याच एलियन्सनी एक विशिष्ट हेतूने केलेलं आहे.
अभिजीत: आर यू सीरीयस? म्हणजे अविश्वसनीय आहे हे सगळं.
अॅंड्र्यू: माहीत होतं मला. यावर कोणाचाही सहजासहजी विश्वास बसणार नाही.
प्रोफेसर: पण याचा परिणाम आपल्या भविष्यावर कसा काय होईल?
अॅंड्र्यू: हे सगळं बांधकाम त्यांनी केलं या पृथ्वीवर राज्य करण्यासाठी.
अभिजीत आणि प्रोफेसर: काय?
अॅंड्र्यू: मी ज्या भविष्यातून आलेलोय त्यात असंच घडलेलं आहे.
अभिजीत: पण हे पिरामिडस बांधून ते पृथ्वी वर राज्य कसं करू शकता.
अॅंड्र्यू: तेच शोधायला आलोय मी इथे. त्यांनी भविष्यात पृथ्वीवर हल्ला करायचा प्लान इथूनच बनवला होता.
अभिजीत: म्हणजे तु त्यांना भविष्यात हल्ला करण्यापासून रोखण्यासाठी इथे आला आहेस. त्यांचा प्लान उध्वस्त करण्यासाठी आला आहेस.
अॅंड्र्यू: हो, पण पिरामिड म्हणजे त्यांची फक्त सुरूवात आहे. त्यांचे या पृथ्वीवर अश्या अनेक ठिकाणी अड्डे आहेत. जिथून ते भविष्यात आपला प्लान एक्जिक्युट करतील.
प्रोफेसर: ठिक आहे. पण मग आता तुझा काय प्लान आहे.
अॅंड्र्यू: ते तर मीही नाही सांगु शकत.
अभिजीत: काय? म्हणजे तु काहीच प्लान बनवला नाहीये.
अॅंड्र्यू: खरंतर जोपर्यंत मला त्यांचा प्लान कळत नाही तोपर्यंत तरी मी काही करू शकत नाही आणि त्यांचा प्लान कळण्यासाठी आपल्याला एक डॉक्युमेंट शोधण्याची गरज जे त्यांनी याच पिरामिड मध्ये त्यांनी लपवलं आहे आणि त्या डॉक्युमेंटचं नाव आहे,
डेड सी स्क्रॉल्स.
प्रोफेसर: एक मिनिट. डेड सी स्क्रॉल्स. मी याच्याबद्दल ऐकलंय. याला पिरामिड टेक्स्ट असंही म्हणतात. त्यात प्राचीन ईजिप्शियन भाषेत काहीतरी लिहीलय. पण त्याला कोणीही डिकोड करू शकल नाही.
अॅंड्र्यू: बरोबर. त्यात या प्राचीन ईजिप्शियन लोकांनी काही लिहिलेलं नाही. त्यात लिहिणारे हेच दुसऱ्या ब्रम्हांडातून आलेले लोक होते. त्यांनी मुद्दामच ते या अनाकलनीय प्राचीन ईजिप्शियन भाषेत लिहिल. जेणेकरुन जोपर्यत त्यांचा प्लान एक्जिक्युट होत नाही. तोपर्यंत कोणीही त्याला डिकोड करू शकणार नाही.
प्रोफेसर: तुला हे माहीत आहे का कि आपण आता कोणत्या पिरामिड मध्ये आहोत.
अॅंड्र्यू: आपण द ग्रेट पिरामिड ऑफ खुफू मध्ये आहोत. जे खुफू नावाच्या एका फैरोने बांधलं होतं.
अभिजीत: एक मिनिट, ही फैरो काय भानगड आहे आता.
प्रोफेसर: अरे, इजिप्तवर राज्य करणाऱ्या राजालाच प्राचीन इजिप्त मध्ये फैरो म्हणायचे. पण मी असं ऐकलंय कि या फैरोंनी म्हणजेच राजांनी हे पिरामिड्स स्वत:ची कबर म्हणून बांधले होते. म्हणजे ते मेल्यानंतर त्यांना त्यात पुरण्यात यायच.
अॅंड्र्यू: बरोबर. पण तेवढच काम नव्हतं त्यांचं. मी सांगितलं ना, हे पिरामिड्स प्राचीन ईजिप्शियन लोकांनी बांधलेच नव्हते. त्यांनी फक्त इथे तेवढी जागा बनवून घेतली होती.
अभिजीत: प्रोफेसर, मला चक्कर येताहेत. हे किती.... हे किती....
प्रोफेसर: .... अकल्पनीय आहे.
अभिजीत: हो.
प्रोफेसर: खरं सांगू. माझीही तीच अवस्था झालीय.
अॅंड्र्यू: मी जे सांगितले, ते तर १० % ही नव्हतं. अजुन तर हे भरपूर एक्सपोज व्हायचं बाकी आहे. त्यासाठी आपल्याला खूप सांभाळून इन्व्हेस्टिगेट करावं लागेल. पण एक सांगतो. यात आपल्या जिवाला खूप मोठा धोका आहे. जर आपण या इजिप्तच्या फैरोच्या हातात सापडलो, तर आपल्याला मृत्युदंड निश्चित आहे आणि जर त्या दुसऱ्या ब्रम्हांडातील लोकांच्या हातात सापडलो, तर ते आपल्यासोबत काय करतील माहीत नाही. तेव्हा आता इथे करा किंवा मरा हे दोनच ऑप्शन्स आहेत.
अचानक त्या तिघांना बाहेर काहीतरी धावपळीचा आणि मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आला.
अभिजीत: हा काय गोंधळ आहे बाहेर?
अॅंड्र्यूने लक्ष देऊन ऐकलं आणि अचानक तो ओरडला,
"ओह शीट्, त्यांना कळलय कि आपण तिघेही जेलमधून फरार झालोय म्हणून. आता ते केव्हाही इथे येऊ शकतात. आपल्याला इथून निघायला हवं. चला."
असं म्हणून तो झपाझप त्या चेम्बर मधून बाहेर पडला. त्याच्या मागे अभिजीत आणि प्रोफेसर बाहेर पडले....
प्रकरण ११
.... अॅंड्र्यू, अभिजीत आणि प्रोफेसर चेम्बरमधून बाहेर आले.
अॅंड्र्यू: आपल्याला खूप सांभाळून जाव लागेल. बिलकूल आवाज करू नका. चुपचाप माझ्या मागे चालत रहा.
असं म्हणून अॅंड्र्यूने आपल्या छोट्या पॉकेट मधून एक गोल चकती सारखं दिसणारं एक यंत्र काढलं. त्या यंत्रावर एक लाल बटन होतं. ते बटन अॅंड्र्यूने दाबल. क्षणात त्या यंत्रावर काहीतरी दिसू लागल. अभिजीत आणि प्रोफेसर कुतूहलाने ते बघत होते.
प्रोफेसर: काय आहे हे?
अॅंड्र्यू: मॅप आहे या पिरामिडचा. यावर हे तीन हिरवे ठिपके दिसतायत ना ते आपण तिघे आहोत. हे लाल ठिपके म्हणजे या पिरामिड मध्ये असलेले सैनिक किंवा पहारेकरी. हे मशीन संपूर्ण पिरामिडचा नकाशा दाखवत. आपण आता कुठे आहोत, आपल्याला कुठे जायचे आहे, ते सर्व या नकाशात कळत. सध्या आपल्याला ह्या पिरामिड मधून बाहेर पडायचय या नकाशाच्या सहाय्याने.
अस म्हणून अॅंड्र्यू पुढे गेला. त्याच्या मागे अभिजीत आणि प्रोफेसर चुपचाप चालत होते. बाहेरील गोंधळ आणखीन वाढत होता. काही वेळ चालल्यावर अचानक अॅंड्र्यू उजवीकडे वळला. त्याठिकाणी सुध्दा अनेक चेम्बर्स होते. ते तिघेही हळूहळू पुढे चालत होते. अचानक त्या तिघांनाही काही पावलांचे आवाज ऐकू आले. कदाचित काही पहारेकरी तिकडेच येत होते. क्षणाचाही उशीर न करता अॅंड्र्यू बाकी दोघांना घेऊन एका चेम्बर मध्ये शिरला. तीन पहारेकरी तिथे येऊन पोहोचले होते. ते प्रत्येक चेम्बर तपासून बघत होते. आता ते पहारेकरी त्या चेम्बर मध्ये घुसले ज्यात अॅंड्र्यू, अभिजीत आणि प्रोफेसर लपलेले होते. अॅंड्र्यू पहील्यापासूनच सावध होता. ते पहारेकरी चेम्बर मध्ये घुसताच त्याने चपळाईने आपल्या छोट्या पॉकेट मधून एक प्रकारची बाटली काढून त्या पहारेकऱ्यांना काही कळायच्या आत त्यांच्या तोंडावर स्प्रे केली. बघता बघता ते पहारेकरी बेशुद्ध होऊन खाली कोसळले. अॅंड्र्यूने अभिजीत आणि प्रोफेसरांना बोलावले आणि म्हणाला,
"आपण यांचे कपडे घालून घेऊ. जेणेकरुन आपल्याला कोणी ओळखू शकणार नाही आणि आपण आपलं काम करू शकतो."
तिघांनीही त्या पहारेकऱ्यांना एका कोपऱ्यात बांधून ठेवले आणि त्यांचे कपडे स्वत: परिधान केले. आता ते हुबेहूब त्या पहारेकऱ्यांसारखेच दिसत होते. अॅंड्र्यूने आपल्या छोट्या पॉकेट मधून एक पिशवी काढली. त्या पिशवीतून त्याने एक मऊ, चिकट पदार्थ बाहेर काढला. त्याने त्या पदार्थाचे दोन तुकडे केले आणि ते तुकडे अभिजीत आणि प्रोफेसरांना दिले.
अभिजीत: काय आहे हे?
अॅंड्र्यू: तुम्हाला जाणून घ्यायचं होत ना कि मी जगातील कोणतीही भाषा कशी काय बोलू शकतो?
अभिजीत: हो.
अॅंड्र्यू: ते याचमुळे. याला ट्रान्सलेशन जेली असे म्हणतात. हे ट्वेंटी सेकण्ड सेंचुरीचं एक प्रोडक्ट आहे. हे खाल्यानंतर तुम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणतीही भाषा बोलता येऊ शकते.
अभिजीत आणि प्रोफेसर आश्चर्याने त्यांच्या हातातील त्या पदार्थाकडे, ट्रान्सलेशन जेलीकडे बघत होते. त्यांनी तो पदार्थ तोंडात टाकला. त्या पदार्थाला अजिबात चव नव्हती. मात्र तो खाल्ल्यानंतर दोघांनाही त्यांच्या शरीरात थोडा बदल जाणवला.
अॅंड्र्यू: शाबास. आता आपल्याला इथून बाहेर निघायला हवं. चला.
अभिजीत: एक मिनिट थांब.
अॅंड्र्यू: काय झालं?
अभिजीत: मी केव्हापासून बघतोय. तु प्रत्येक वस्तू तुझ्या खांद्यावरील त्या पॉकेट मधून काढतोय. इतक्या छोट्या पॉकेट मध्ये एवढ्या सगळ्या वस्तू कशा काय मावल्या?
अॅंड्र्यू: ओ गुड क्वेश्चन, खरं तर हे एक 3 डायमेन्शनल पॉकेट आहे. यात तुम्ही कितीही वस्तु ठेवू शकतात आणि आपल्याला जी वस्तु हवी असते ती या पॉकेट मध्ये हात घातल्या बरोबर लगेच मिळते. आणि हे ही....
अभिजीत: ....ट्वेंटी सेकंड सेंचुरीच एक प्रोडक्ट आहे?
अॅंड्र्यू: बरोबर. आता चला आपल्याकडे वेळ कमी आहे.
असं म्हणून अॅंड्र्यू चेम्बर मधून बाहेर पडला. अभिजीत आणि प्रोफेसर एकमेकांकडे विस्मयाने बघत होते. त्यांच्या या ॲडव्हेंचर मध्ये त्यांना अश्या अजून किती विचित्र गोष्टींना सामोरं जावं लागणार होतं, काय माहीत?
प्रकरण १२
....त्या पहारेकऱ्यांना एका कोपऱ्यात बांधून अभिजीत, अॅंड्र्यू आणि प्रोफेसर तिघांनीही त्यांचा वेश परिधान केला आणि त्या चेम्बर मधून बाहेर पडले. आता ते सैनिकी वेशात होते, तसेच आता त्यांना प्राचीन ईजिप्शियन भाषा सुध्दा बोलता येत होती. त्यामूळे आता त्यांना घाबरायची गरज नव्हती. त्या तिघांना शोधण्यासाठी अजुनही काही पहारेकरी इकडे तिकडे पळत होते. अचानक एक पहारेकरी एकदम त्या तिघांच्या समोर येऊन उभा राहिला.
पहारेकरी: तुम्ही इथे काय करताय? ते तिघे कैदी सापडले का तुम्हाला?
पहारेकऱ्याच्या वेशातील अॅंड्र्यू: नाही अजुन तरी नाही. त्यांनाच शोधतोय आम्ही.
पहारेकरी: लवकर शोधा त्यांना. नाहीतर महान फैरो आपल्याला सोडणार नाहीत.
अॅंड्र्यू: हो.
तो पहारेकरी तिथून निघून गेला.
अभिजीत: महान फैरो?
अॅंड्र्यू: त्यांचा राजा जो इजिप्त वर राज्य करतो. हे त्याचेच सैनिक असावेत. त्याने यांना हुकूम दिला असेल आपल्याला पकडायचा. कारण आपण अवैधरित्या त्यांच्या राज्यात घुसलो आहोत.
प्रोफेसर: इजिप्त वर अनेक फैरो राज्य करून गेले. मग आपण नेमके कोणत्या फैरोच्या काळात आहोत?
अॅंड्र्यू: आपण १३२७ BC मध्ये आहोत. माझ्या माहितीप्रमाणे या काळात जो फैरो इजिप्त वर राज्य करत होता, त्याच नाव होतं तुतनखामेन.
अभिजीत: मी याच्याबद्दल ऐकलंय. हा इजिप्तचा आतापर्यंतचा सगळ्यात कमी वयाचा राजा होता. बरोबर?
अॅंड्र्यू: हो.
प्रोफेसर: पण मग आता तुझा काय प्लान आहे.
अॅंड्र्यूने ते गोल डिव्हाईस काढलं ज्यावर या संपूर्ण पिरामिडचा नकाशा होता.
अॅंड्र्यू: माझ्या मागे या.
असं म्हणून तो पुढे चालू लागला, अभिजीत आणि प्रोफेसर त्याच्या मागे आले. आता पहारेकऱ्यांची धावपळही कमी झाली होती. कदाचित त्यांना त्या कैद्यांना शोधण्याचा नाद त्यांनी सोडून दिला होता. काही वेळ चालल्यावर अचानक अॅंड्र्यू थांबला.
अभिजीत: काय झालं? असा एकदम का थांबलास?
अॅंड्र्यू: समोर बघा.
अभिजीत आणि प्रोफेसर दोघांनी समोर बघितलं. त्यांच्या पासून काही अंतरावर एक भलं मोठं चेम्बर होत. पण हे चेम्बर पिरामिड मधील बाकीच्या चेम्बर सारखं अजिबात नव्हतं. ते खूप मोठं होतं, त्याच्या आत असंख्य मेणबत्त्या जळत होत्या, त्याच्या प्रवेशद्वारावर दोन पहारेकरी हातात भाला घेऊन पहारा देत होते.
अभिजीत: हे काय आहे?
अॅंड्र्यू: किंग्ज चेंबर. हे चेंबर खास राजासाठी म्हणजेच फैरोसाठी बनवलेलं आहे.
अभिजीत: तरीच म्हटलं कि हे चेंबर इतर चेंबर पेक्षा वेगळे का वाटत आहे.
ते तिघेही किंग्ज चेंबर जवळ आले. तिथे उभ्या असलेल्या दोन पहारेकऱ्यांनी त्या अभिजीत, अॅंड्र्यू आणि प्रोफेसरांवर नजर टाकली. पण त्यांना कोणीच आत जाण्यापासून रोखले नाही. कारण त्या तिघांचा पोशाख प्राचीन ईजिप्शियन सारखाच होता. दोन्ही पहारेकऱ्यांनी त्यांना आत जाण्यासाठी रस्ता करून दिला. तिघेही आत शिरले. आत शिरल्या बरोबर तिघांचेही डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. ते चेंबर इतर चेंबर पेक्षा चौपट मोठं होतं, हजारो मेणबत्त्या तिथे जळत होत्या, चेंबरच्या दोन्ही बाजूला आसन होती, त्या आसनांवर काही लोक बसले होते, आणि त्यांच्या पासून काही अंतरावर एक सोन्याच सिंहासन होत, त्या सिंहासनावर एक १७-१८ वर्षांचा पोरगा बसला होता, त्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट होता, अंगावर सोन्या-चांदीचे दागिने होते. त्याच्याकडे इशारा करून अभिजीत बोलला,
"हाच तो फैरो आहे का?"
अॅंड्र्यू: हो.
असं म्हणून अॅंड्र्यूने त्यांना आपल्या मागे येण्यास सांगितले. ते जाऊन एका कोपऱ्यात उभे राहिले. तिथे त्यांच्या सारखेच काही पहारेकरी उभे होते. एवढ्यात त्या चेंबर मध्ये काही इतर पहारेकरी येऊन ठेपले. त्यातून एक जण फैरोच्या सिंहासनाजवळ आला. त्याने खाली गुडघे टेकले आणि एक हात छातीवर ठेऊन तो म्हणाला,
"महान फैरो तुतनखामेन यांचा विजय असो. क्षमा असावी महान फैरो, आम्ही खूप शोधल. पण ते तीन कैदी आम्हाला नाही सापडले. अचानक कुठे अदृश्य झाले माहीत नाही."
तुतनखामेन काही बोलणार इतक्यात खूप मोठा आवाज झाला, जमीन हादरायला लागली, जसं कि भुकंपच येत होता. फैरो तुतनखामेन तडक सिंहासनावरून उठला. त्याला उठलेलं पाहून इतर लोक सुध्दा उठून उभे राहिले. तुतनखामेन किंग्ज चेंबर मधून बाहेर पडला. त्याच्यामागे त्या चेंबर मधील सगळे लोक बाहेर पडले.
तुतनखामेन झपाझप पावले टाकत चालत होता. त्याच्या मागे इतर लोक चुपचाप चालत होते. सर्वात मागे अभिजीत, अॅंड्र्यू आणि प्रोफेसर होते. अॅंड्र्यू सगळ्यांच्या नकळत पिरामिडचा नकाशा असलेल्या त्या गोल डिव्हाईस मध्ये लक्ष ठेवून होता. काही वेळ चालल्यावर तुतनखामेन एका दरवाज्यासमोर येऊन थांबला. त्याने तिथल्या पहारेकऱ्यांना इशारा केला. त्या पहारेकऱ्यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर सगळ्यांना बाहेरच दृश्य दिसलं. म्हणजेच तो दरवाजा म्हणजे पिरामिडची एक्झिट होती. तुतनखामेन सोबत सगळेजण पिरामिडच्या बाहेर पडले. त्या पिरामिडच्या आजुबाजुला अनेक छोटे मोठे पिरामिड्स, मंदिरांसारख्या वास्तु होत्या. अखेरीस इतके प्रयत्न केल्यावर अभिजीत, अॅंड्र्यू आणि प्रोफेसर पिरामिड मधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते. कधीपासून ते त्या पिरामिड मध्ये फिरत होते. आता कुठे जाऊन त्यांना मोकळ्या हवेत श्वास घेण्यास मिळाला होता. पण त्यांनी जेव्हा समोरचे दृश्य पाहीले, तेव्हा त्यांचा हा आनंद आश्चर्या मध्ये बदलला. त्यांच्या अगदी समोर काही फूट अंतरावर एक भलंमोठं यू.एफ.ओ आकाशातून उतरलं होतं. त्या यू.एफ.ओ. चा दरवाजा उघडला गेला. त्यातून काही शस्त्रधारी सैनिक बाहेर पडले. त्यांच्या मागोमाग एक उंचपुरा, धिप्पाड अंगावर विचित्र कपडे घातलेला एक माणूस बाहेर आला. तो विचित्र माणूस तुतनखामेन जवळ येऊन उभा राहिला आणि एक हात छातीवर ठेवून आणि अदबीने खाली वाकून म्हणाला,
"महान फैरो तुतनखामेन यांना कॅप्टन गिनयूचा प्रणाम"
तुतनखामेनने त्याचा प्रणाम स्वीकार केला आणि म्हणाला,
"वजीर होरेमहेब"
तुतनखामेनचा वजीर होरेमहेब त्याच्या जवळ येऊन उभा राहिला.
"आज्ञा महान फैरो"
तुतनखामेन: वजीर होरेमहेब, हे आमचे नवीन अतिथी आहेत. त्यांना अतिथिकक्षात घेऊन जाऊन त्यांचा योग्य तो सन्मान करावा. आम्हाला आता राजवाड्यावर जावे लागेल. लक्षात ठेवा. यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये.
होरेमहेब: जशी आपली आज्ञा महान फैरो. (कॅप्टन गिनयू कडे बघून) आपण यावे.
होरेमहेब पुढे गेला. त्याच्या मागे कॅप्टन गिनयू आणि त्यांचे सहकारी निघाले. तुतनखामेन आपल्या एका सैनिकाकडे बघून म्हणाला,
"आमची राजवाड्यावर जाण्याची व्यवस्था करण्यात यावी."
सैनिक: जशी आपली आज्ञा महान फैरो.
काही वेळातच तुतनखामेन आपल्या राजवाड्याच्या दिशेने चालता झाला होता. आता फक्त तिथे अभिजीत, प्रोफेसर, अॅंड्र्यू आणि त्यांच्यासोबत काही पहरेकरी राहीले होते.
अभिजीत: हेच ते दुसऱ्या ब्रम्हांडातून आलेले लोक आहेत?
अॅंड्र्यू: हेच आहेत ते. जे भविष्यात पृथ्वीवर राज्य करण्याची स्वप्न बघत आहेत. आता तर आपली खरी लढाई सुरू झाली आहे....
प्रकरण १३
.... अभिजीत आणि प्रोफेसर दोघांनाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यांनी समोरासमोर एलियन्सला बघितलं होतं.
अभिजीत: हेच ते एलियंस आहेत का?
अॅंड्र्यू: हो.
अभिजीत: पण हे तर हुबेहूब आपल्यासारखीच आय मीन माणसांसारखेच दिसतात.
अॅंड्र्यू: हो, मग मी सांगितलं ना कि ही दुसऱ्या ब्रम्हांडातील मानवी प्रजाती आहे. एलियंसचा अर्थ होतो, परग्रहावरील प्रजाती. म्हणजे त्यात कोणीही येऊ शकतो, एखादा माणूस, प्राणी किंवा सुक्ष्मजीव.
अभिजीत: पण तुला खरंच वाटत कि हे लोक पृथ्वीवर राज्य करू शकतील.
अॅंड्र्यू: त्यांनी तसं केलय. भविष्यात. मी त्याच भविष्यातूनच तर आलोय आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो. ह्याच कॅप्टन गिनयूने पृथ्वीवर येण्याआधी दोन ब्रम्हाडांवरील जीवसृष्टी नष्ट केलेली आहे.
अभिजीत आणि प्रोफेसर: काय?
अॅंड्र्यू: हो. आणि आता त्याला आपल्या ह्या ब्रम्हांडावर विजय मिळविण्यासाठी पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठीच तो इथे आला आहे.
प्रोफेसर: पण जर ते दोन ब्रम्हांडांना संपवण्याएवढे ताकदवान आहेत, तर आपण त्यांच्याशी लढाई कशी काय करू शकतो?
अॅंड्र्यू: खरंतर आपल्याला त्यांच्याशी समोरासमोर लढाई करायचीच नाहीये.
अभिजीत: मग?
अॅंड्र्यू: हे बघा, या पृथ्वीवर सात ठिकाणी या लोकांनी अशी काहीतरी गोष्ट लपवून ठेवली आहे, जी या पृथ्वीवर विनाश करण्यासाठी त्यांची मदत करेल. आपल्याला ते सात ठिकाणांवरील त्या गोष्टींना नष्ट करायचे आहे. त्यामुळे भविष्यात जेव्हा ते पृथ्वीवर हल्ला करतील तेव्हा त्यांची ताकद कमी असेल, मग आपण त्यांना आरामात हरवू शकतो.
अभिजीत: पण ते सात ठिकाणे आहेत कोणते?
अॅंड्र्यू: पहील ठिकाण तर हेच आहे. इजिप्तचे पिरामिड्स. बाकीचे सहा ठिकाण आपल्याला तेव्हाच कळतील, जेव्हा आपल्या हातात डेड सी स्क्रॉल्स असेल.
प्रोफेसर: पण मग आता तुझा काय प्लान आहे?
अॅंड्र्यू: सर्वात आधी आपल्याला कॅप्टन गिनयू कडून हे माहीत करावं लागेल कि डेड सी स्क्रॉल्स कुठे आहे. त्यानंतरच आपण पुढचा प्लान बनवू शकतो.
अॅंड्र्यूने अभिजीतला त्याचा प्लान समजावून सांगितला आणि प्रोफेसरांकडे वळून तो म्हणाला,
"प्रोफेसर, तुम्ही माझ्यासोबत या."
असं म्हणून अॅंड्र्यूने पिरामिडचा नकाशा असलेल ते गोल डिव्हाईस अभिजीतच्या हातात दिलं. आणि प्रोफेसरांना घेऊन निघून गेला.
अभिजीतही त्याला सांगितल्याप्रमाणे पिरामिडच्या आत घुसला. अचानक त्याला काही पहरेकरी हातात सोन्या-चांदीचे उपहार, खाण्याच सामान अश्या अनेक वस्तू घेऊन जाताना दिसले. अभिजीतही चुपचाप त्यांच्या गर्दीत सामील झाला. बराच वेळ ते चालत होते. त्यात त्यांनी अनेक वळण घेतले, बरेच चेम्बर पार केले. नव्या माणसासाठी हा रस्ता लक्षात ठेवणं महाकठीण काम होत. म्हणूनच अॅंड्र्यूने ते डिव्हाईस अभिजीतला दिलं होतं. त्या डिव्हाईस मध्ये तो रस्ता रेकॉर्ड होत राहील. बराच वेळ चालल्यावर ते सगळे जण एका चेम्बर समोर थांबले. ते चेम्बरही किंग्ज चेंबर इतकंच मोठं होतं. सगळेजण एक एक करून त्या चेंबर मध्ये शिरले. अभिजीत सर्वात शेवटी आत गेला आणि एका कोपऱ्यात चुपचाप उभा राहिला.
कॅप्टन गिनयू एका सिंहासनावर बसला होता. त्याच्या आजुबाजूला त्याचे सेवक उभे होते. वजीर होरेमहेब त्याच्या आतिथ्याकडे जातीने लक्ष देत होता. एक एक पहारेकरी आपल्या हातातील वस्तू कॅप्टन गिनयू समोर ठेवत होता. आणि कॅप्टन गिनयूही एक हात उंचावून त्याचा स्वीकार करत होता. सगळ एकदम शांततेत चालू होत. अगदी पिन ड्रॉप सायलेन्स होता. सगळ्या वस्तु ठेवून झाल्यानंतर वजीर होरेमहेबने सर्व पहारेकऱ्यांना तिथून जाण्याचा इशारा केला. सगळे पहारेकरी तिथून एक एक करून बाहेर निघत होते. कॅप्टन गिनयू कडून डेड सी स्क्रॉल्सची माहीती कशी काढायची याचा विचार करत असतांनाच अचानक एका पहारेकऱ्याचा जोराचा धक्का अभिजीतला लागला. त्या धक्क्याने अभिजीतच्या हातातून ते गोल डिव्हाईस खाली पडलं आणि जोरात आवाज झाला. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष तिकडे वेधले गेले. तिथे उपस्थित एकाही व्यक्तिने ती गोल वस्तु पहीले कधीच पाहिली नव्हती. त्यामुळे सगळे जण कधी अभिजीत कडे तर कधी त्या गोल डिव्हाईस कडे बघत होते.
अभिजीतने पटकन ते डिव्हाईस उचलून घेतले. वजीर होरेमहेबच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली. त्याचा दांडगा आवाज पूर्ण चेंबर भर घुमला,
"कोण आहेस तु"?
एव्हाना अभिजीतला कळालं होतं कि तो खूप मोठ्या संकटात सापडला आहे. आता इथून पळून जाण्यातच भलं आहे असा विचार करून तो तिथून जाण्यास निघाला. अचानक वजीर होरेमहेबने आपल्या सैनिकांना आदेश दिला,
"सैनिकांनो, पकडा त्याला"?
त्याबरोबर अनेक सशस्त्र सैनिकांनी अभिजीतला वेढा घातला. आता अभिजीतने मनातल्या मनात देवाचा धावा चालू केला होता. ते सैनिक हळूहळू भाले तलवारी घेऊन अभिजीतच्या दिशेने सरकत होते. अचानक एक आवाज आला,
"थांबा."
सगळ्यांनी वळून पाहिले. कॅप्टन गिनयू सगळ्यांना थांबण्याचा इशारा करत होता. तो म्हणाला,
"वजीर होरेमहेब, कृपया तुम्ही आपल्या सैनिकांना घेऊन बाहेर जा. मला त्या व्यक्तिशी बोलायचय."
वजीर होरेमहेब: परंतु त्याने आपल्याला काही नुकसान पोहोचवल तर महान फैरो आम्हाला सोडणार नाहीत.
कॅप्टन गिनयू: चिंता करू नका. आम्हाला काही होणार नाही.
कॅप्टन गिनयूने स्वत:च्या सहकाऱ्यांना सुध्दा बाहेर जाण्याची आज्ञा दिली. एक एक करून सर्व जण त्या चेंबर मधून बाहेर पडले. आता तिथे फक्त कॅप्टन गिनयू आणि अभिजीत दोनच जण उरले होते. कॅप्टन गिनयू आपल्या सिंहासनावरून खाली उतरला आणि अभिजीत जवळ येऊन उभा राहिला.
"मला माहीत आहे कि तु या सैनिकांमधला नाहीस. घाबरून नकोस. मी काहीच करणार नाही. पण तुला मला सगळं खरं सांगावं लागेल. तु कोण आहेस? कुठून आला आहेस? का आला आहेस? जर तु सगळं सांगितलंस तर मी तुला सोडून देईन. नाहीतर..."
आता मात्र अभिजीत समोर मोठाच पेच प्रसंग होता. जर खर नाही सांगितलं तर त्याच्या जिवाला धोका होता, आणि खरं सांगितलं तर त्यांचा प्लान फेल होण्याची शक्यता होती. शेवटी बराच विचार केल्यावर अभिजीतने एक निर्णय घेतला. अर्धसत्य सांगण्याचा!
कॅप्टन गिनयू: मग काय ठरवलस.
अभिजीत: मी सगळं खरं खरं सांगतो.
कॅप्टन गिनयू: गुड. पण एक मिनिट थांब.
असं म्हणून कॅप्टन गिनयू आपल्या सिंहासना जवळ आला. तिथे भलीमोठी पेटी होती. ती पेटी उघडली. त्यातून एक हेल्मेट काढल आणि आपल्या डोक्यावर घातल. ते हेल्मेट अतिशय विचित्र होते. त्या हेल्मेटच्या वरच्या बाजूला दोन मोठे अॅंटीना होते, हेल्मेटवर हिरवे, लाल, निळे आणि पिवळ्या रंगाचे चार बटणं होते, जसं कि ते एक मशीनच होतं.
"हं आता सांग."
अभिजीत: माझ नाव अभिजीत. मी २२ व्या शतकातून आलो आहे. आणि मी इथे आलो आहे ते तुला रोखण्यासाठी. हो, भविष्यात पृथ्वीवर राज्य करण्याचे स्वप्न बघतोयस ना तु. पण मी असं होऊ देणार नाही. मी असेपर्यंत तु पृथ्वीवर काय, या इजिप्तवरही राज्य करू शकणार नाही.
कॅप्टन गिनयू: तु एकटाच आहेस. कि तुझ्यासोबत आणखी कोणी आहे?
अभिजीत: नाही. मी एकटाच आहे. माझ्यासोबत कोणीही नाही.
अभिजीत स्वत:च्या बुध्दिमत्तेवर खूश होत होता. त्याने अर्ध खरं आणि अर्ध खोटं सांगितलं होतं. जेणेकरुन त्याला जर काही झाल, तर प्रोफेसर आणि अॅंड्र्यू ते काम पूर्ण करू शकतील ज्याचा त्यांनी प्लान बनवला होता. मात्र अभिजीत एक गोष्टीपासून अनभिज्ञ होता. कॅप्टन गिनयूने जे हेल्मेट घातले होते, त्यात एक टेक्नॉलॉजी होती, समोरचा खरं बोलतोय कि खोटं हे त्या हेल्मेट मधील टेक्नॉलॉजी मुळे हेल्मेट घालणाऱ्याला कळायचं. कॅप्टन गिनयूलाही हे समजलं होतं कि अभिजीत खोटं बोलतोय. तो अभिजीत जवळ येऊन उभा राहिला. त्याने अभिजीत कडे पाहून एक स्मितहास्य केले आणि आपल्या हेल्मेट वरील लाल रंगाचे बटण दाबले. त्या हेल्मेटच्या अॅंटीना मधून एक सुक्ष्म विजेचा प्रवाह बाहेर पडला. तो विजेचा प्रवाह अभिजीतच्या डोक्याला लागला. त्याला डोक्याला झिणझिण्या आल्या आणि अचानक तो पुतळ्या सारखा उभा राहिला. कॅप्टन गिनयूच स्मितहास्य आता क्रूर हास्यात बदललं होतं. तो हळूच बोलला,
"अभिजीत."
अभिजीत: येस बॉस.
कॅप्टन गिनयू: तु आता माझा गुलाम आहेस. मी जसं सांगेन तसंच तु वागणार.
अभिजीत: मी आपला गुलाम आहे, बॉस.
"शाबास." असं म्हणून कॅप्टन गिनयूने एक छोटी चिप त्याच्या अंगावर लावली. आता अभिजीत जिथेही जाईल, ते कॅप्टन गिनयूला त्याच्या कॉम्प्युटर वर दिसणार होतं.
कॅप्टन गिनयू: ठिक आहे. आता जा. आणि माझ्या ऑर्डरची वाट बघ.
"येस बॉस." एवढं बोलून अभिजीत तिथून निघाला.
प्रकरण १४
..... अभिजीत गेल्यानंतर अॅंड्र्यू आणि प्रोफेसर एका ठिकाणी येऊन थांबले. त्यांच्या समोर नाईल नदी झुळझुळ करत वाहत होती. आजुबाजुच वातावरण अगदी प्रसन्न आणि शांत होत. पण प्रोफेसरांच्या मनात मात्र चलबिचल चालु होती. ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. पण अॅंड्र्यू मात्र एकदम शांत होता, जसं कि त्याला कशाचीही चिंता नाही. शेवटी न राहवून प्रोफेसरांनी विचारलंच,
"तुला काय वाटतं, अभिजीत त्याला दिलेल्या कामात यशस्वी होईल ना?"
अॅंड्र्यूने एक मोठा श्वास घेतला आणि सोडला. मग म्हणाला,
"अजिबात नाही. तो यशस्वी होणार नाही."
अॅंड्र्यूच हे बोलणे ऐकून प्रोफेसर आ वासून त्याच्याकडे बघायला लागले.
प्रोफेसर: तु काय बोलतोयस, तुझ तुला तरी कळतंय का?
अॅंड्र्यू: मी खरं तेच बोलतोय.
प्रोफेसर: मस्करी नको करूस. अरे तुच तर पाठवलं होतस ना अभिजीतला त्या कॅप्टन कडे?
अॅंड्र्यू: हो, मीच पाठवलं होतं.
प्रोफेसर: मग आता हे काय बोलतोयस, जर तो यशस्वी होणार नव्हता तर त्याला पाठवलच का? जर त्याला काही झाल तर?
अॅंड्र्यू: शांत व्हा, प्रोफेसर. अभिजीतला काहीही होणार नाही.
प्रोफेसर: हे तु इतक ठामपणे कसं सांगू शकतोस?
अॅंड्र्यू: कारण कॅप्टन गिनयूला मी चांगल्याप्रकारे ओळखतो. तो अभिजीतचा जीव घेणार नाही. हा फारफार तर तो अभिजीतचा आपल्या विरूद्ध वापर करू शकतो.
प्रोफेसर: म्हणजे? मला समजेल असं काहीतरी बोल ना बाबा.
अॅंड्र्यू: कॅप्टन गिनयू हा धूर्त आणि चलाख आहे. तसंच त्याच्या कडे आपल्या पेक्षा जास्त मशीन्स, यंत्रे आणि विज्ञानाची ताकद आहे. मला त्याची तीच ताकद जाणून घ्यायची आहे.
प्रोफेसर: म्हणजे फक्त त्याची ताकद जाणून घेण्यासाठी तु अभिजीतला बळीचा बकरा बनवलस.
अॅंड्र्यू : हो, कारण जर मी गेलो असतो तर त्याने मला चटकन ओळखलं असतं आणि आपला प्लॅन फसला असता. पण अभिजीतला त्याने कधीच नाही पाहील आणि समजा अभिजीतच खरं रूप त्याच्या समोर आल, तरी अश्या स्थितीत तो दोन काम करेल. एक तर तो अभिजीतला कैद करेल किंवा या मागे कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तो अभिजीतच्या मागे गुप्तहेर किंवा अशीच एखादी गोष्ट लावेल, जी त्याला आपल्या पर्यंत पोहोचवेल.
प्रोफेसर: माझं डोकं गरगरतय. हे खूप विचित्र आहे. माझा अजुनही विश्वास बसत नाही कि आपण एलियनशी लढतोय. अजुन काय काय बघावे लागेल त्या परमेश्वरालाच ठाऊक.
अॅंड्र्यू: प्रोफेसर, या पृथ्वीचा भविष्यातील विनाश मी स्वत:च्या डोळ्यांनी बघितलाय. जर तुम्हाला तुमच्या पुढील पिढीच भविष्य सुरक्षित पाहिजे असेल तर ही लढाई आपल्याला लढावीच लागेल. आता तर फक्त सुरूवात आहे. ही लढाई पुढे जाऊन आणखी भयानक रूप धारण करेल आणि जेव्हा आपली कॅप्टन गिनयूशी शेवटची लढाई होईल तेव्हा जर आपण तयार राहीलो नाही तर तो आपला सहज खात्मा करेल. तेव्हा आतापासूनच मनाची तयारी करा. कदाचित भविष्यात तुम्हाला एका लिजेंडच्या रूपात लक्षात ठेवलं जाईल. चला आता आपल्याला परत जायला हवं.
असं म्हणून अॅंड्र्यू मागे फिरला. अॅंड्र्यूने दिलेल्या या लांबलचक भावनिक भाषणामुळे प्रोफेसरांच्या मनातील चलबिचल थांबली होती. तेही अॅंड्र्यूच्या मागे निघाले.
ते दोघेही त्या ठिकाणी येऊन थांबले, जिथून ते अभिजीत पासून वेगळे झाले होते. अचानक पिरामिड मधून अभिजीत बाहेर आला आणि त्या दोघांजवळ येऊन उभा राहिला. पण अॅड्र्यूला मात्र थोडा संशय आला. कारण अभिजीत पहील्यासारखा वाटत नव्हता. तो एक रोबोट वाटत होता, जसं कि तो कोणाच्या तरी आज्ञेत आहे. अॅंड्र्यूचा संशय अगदी खरा होता. कॅप्टन गिनयूने अभिजीतच्या मनावर ताबा मिळवला होता. आता तो पूर्णपणे कॅप्टन गिनयूचा गुलाम बनला होता. कॅप्टन गिनयू जे सांगेल ते तो करणार आणि बोलणार होता.
अॅंड्र्यू: काय झालं? त्याच्या कडून काही माहिती मिळाली?
अभिजीत: हो, मला माहिती मिळाली आहे. मला डेड सी स्क्रॉल्सचा ठिकाणा माहित पडला आहे.
त्याच्या बोलण्यावरून अॅंड्र्यूला कळून चुकले कि नक्कीच काहीतरी गडबड आहे, असं वाटत होतं कि अभिजीतच्या तोंडून कोणी दुसरच बोलतंय. पण चेहऱ्यावर तसं काहीही न दाखवता अॅंड्र्यू म्हणाला,
"हो का. मग दाखव आम्हाला. कुठे आहे ते."
अभिजीत: माझ्या मागे या.
असं म्हणून अभिजीत पिरामिड मध्ये गेला. त्याच्या मागे अॅंड्र्यू आणि प्रोफेसर गेले. अभिजीत त्या पिरामिडच्या भुलभुलैयात इतक्या सफाईदारपणे चालत होता जसं कि तो अनेक वर्षांपासून इथे रहातोय. पण खरंतर कॅप्टन गिनयू त्याला सगळं मार्गदर्शन करत होता आणि प्रत्येक क्षणाला अॅंड्र्यूचा अभिजीत वरील संशय बळकट होत होता. बराच वेळ चालल्यावर ते एका ठिकाणी येऊन थांबले. ती जागा इतर जागांपेक्षा थोडी वेगळी होती. तिथे एकच चेम्बर होत. ज्याला दरवाजा होता आणि तो बंद होता. अभिजीतने थोडं ताकदीने दरवाजा लोटला. दरवाजा उघडला गेला.
अभिजीत: इथे आहे ते.
असं म्हणून तो आत गेला. त्याच्या मागे अॅंड्र्यू आणि प्रोफेसर आत गेले. आत घुप्प अंधार होता.
अॅंड्र्यू: अभिजीत, कुठे आहेस तु? आता कुठे जायचे आहे?
पण अभिजीतने काहीच उत्तर दिले नाही. अचानक खाड् असा जोरदार आवाज झाला. अॅंड्र्यूने पटाकन आपल्या 3 डायमेन्शनल पॉकेट मधून एक टॉर्च काढला. तो टॉर्च ऑन केल्याबरोबर तिथे सर्वत्र प्रकाश पसरला. ते चेंबर पूर्ण रिकामे होते. तिथे अॅंड्र्यू आणि प्रोफेसरांशिवाय कोणीही नव्हते. त्या चेंबरचा दरवाजा तर केव्हाच बंद झाला होता. अॅंड्र्यूने तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो दरवाजा उघडण्याच नाव घेत नव्हता. अॅंड्र्यूची चिंतीत मुद्रा पाहून प्रोफेसरांनी विचारल,
"काय झालं? आणि अभिजीत असा अचानक कुठे गायब झाला?"
अॅंड्र्यू: प्रोफेसर, माझा संशय खरा ठरला. अभिजीतच माईंड कंट्रोल केलं गेलंय. आपण कैद झालो आहोत....
प्रकरण १५
.... प्रोफेसर आणि अॅंड्र्यूला त्या गुप्त चेंबर मध्ये कैद करून अभिजीत कॅप्टन गिनयू कडे परत आला. कॅप्टन गिनयूने त्याच हसून स्वागत केलं.
कॅप्टन गिनयू: ये अभिजीत ये, शाबास फार चांगले काम केलेस तु. तु माझा एक फार हुशार गुलाम आहेस.
"पण कॅप्टन त्या दोघांना कैद करून तुम्हाला नेमकं काय साधायचे आहे. नाही म्हणजे आम्हाला जर आज्ञा दिली असती तर आम्ही केव्हाच त्यांचं काम तमाम करून टाकले असते." कॅप्टन गिनयूच्या एका अंगरक्षकाने विचारलं.
कॅप्टन गिनयू: नाही यामू, इतक्या लवकर नाही. मी त्यांना मारेल. पण वेळ आल्यावर. मला माहीत आहे कि तो अॅंड्र्यू सन २१५० मधून मला रोखण्यासाठी आणि या पृथ्वीला वाचवण्यासाठी आला आहे. पण त्याला अजुन कल्पना नाही कि कॅप्टन गिनयू काय चीज आहे ते. मी सर्वात आधी त्याच्या डोळ्यांसमोर या पृथ्वीचा विनाश करेल आणि मग त्याला मारेल. काय मजा येईल नाही.
"पण कॅप्टन त्यांना जर ते डेड सी स्क्रॉल्स सापडल तर? तर ते द सीक्रेट चेंबर ऑफ ओसायरीस मध्ये पोहोचण्यात सफल होतील आणि तसं झालं तर ते आपला प्लॅन फेल करू शकतात." दुसऱ्या अंगरक्षकाने आपली शंका उपस्थित केली.
कॅप्टन गिनयू: ते एवढं सोपं नाही, स्पोपोविच. तो एकटा आपली ती गोष्ट नष्ट करू शकत नाही. ह्या अभिजीतला तर आपण आपला गुलाम बनवल आहे. आता फक्त आपल्याला त्या म्हाताऱ्याला ठिकाणावर लावायचय. हे दोघे जण आपल्या रस्त्यातून बाजूला झाले कि तो अॅंड्र्यू एकटा पडेल. मग तो आपलं काहीच बिघडवू शकणार नाही. समजलं.
स्पोपोविच: येस कॅप्टन, तुम्ही खरंच कमाल आहात.
*******************
इकडे त्या गुप्त चेंबर मध्ये प्रोफेसर चिंताग्रस्त अवस्थेत बसले होते. अॅंड्र्यू इकडून तिकडे फेऱ्या मारत होता.
प्रोफेसर: तुला या सगळ्याची कल्पना होती, हो ना?
अॅंड्र्यू: हो आणि नाही.
प्रोफेसर: काय बोलतोयस? हो कि नाही?
अॅंड्र्यू: प्रोफेसर, माझा अंदाज होता कि तो कॅप्टन गिनयू अभिजीतला कैद करेल. पण तो त्याच्या मेंदूवर ताबा मिळवेल याचा मी अजिबात विचार केला नव्हता.
प्रोफेसर: पण मग आता काय करायचं? आपल्याला कसंही करून इथून बाहेर पडावं लागेल. अरे तुझी ती भिंती कापायची करवत कुठे गेली, ज्याने आपण त्या तुरूंगातून बाहेर पडलो होतो. ती काढ ना.
अॅंड्र्यू: त्याचा काही फायदा नाही, प्रोफेसर. ती करवत फक्त लाईमस्टोनच्या भिंतींवरच काम करते.
प्रोफेसर: म्हणजे इथून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही.
अॅंड्र्यू: आहे. पण आपण जर त्या गोष्टीचा वापर केला तर आपलं सत्य सगळ्यां समोर उघड पडेल. पण आता वाटतंय कि त्याशिवाय दुसरा मार्ग नाही.
असं म्हणून अॅंड्र्यूने आपल्या 3 डायमेन्शनल पॉकेट मधून एक बॉक्स काढला. तो बॉक्स त्याने हळूच जमिनीवर ठेवून त्याच झाकण उघडले. त्या बॉक्स मध्ये ४-५ गोळे होते. अॅंड्र्यूने त्यातून एक गोळा उचलला. आणि म्हणाला,
"प्रोफेसर, त्या कोपऱ्यात जाऊन उभं रहा."
प्रोफेसर अॅंड्र्यूच्या सांगण्याप्रमाणे प्रोफेसर दूरच्या कोपऱ्यात जाऊन उभे राहिले. अॅंड्र्यूने त्या गोळ्याच्या खालच्या बाजूला असलेल बटन दाबले. अचानक तो गोळा चमकायला लागला. अॅंड्र्यूने चपळाईने तो गोळा त्या चेंबरच्या दरवाज्या जवळ ठेवला आणि प्रोफेसरांजवळ जाऊन उभा राहिला. काही क्षणांची शांतता. आणि अचानक कानठळ्या बसवणारा आवाज झाला. त्या चेंबरच्या दरवाज्याचे आणि दरवाज्याच्या आजुबाजुच्या भिंतींचे अक्षरशः चिथडे उडाले होते.
अॅंड्र्यू: ट्वेंटी सेकंड सेंच्युरीतील सगळ्यात ताकदवान बॉम्ब आहे. याची रेंज फार कमी असली तरी त्याचा परिणाम फार भयंकर असतो. चला.
असं म्हणून अॅंड्र्यू आणि प्रोफेसर चेंबरच्या बाहेर आले. अचानक त्यांना काही लोकांच्या पावलांचा आवाज आला. काही क्षणांतच दोघांनाही पिरामिडच्या पहारेकऱ्यांनी चारी बाजूंनी घेरले. वजीर होरेमहेब तिथे येऊन पोहोचला. त्याने त्या चेंबरची हालत बघितली. आणि आपल्या पहारेकऱ्यांना म्हणाला,
"बघता काय? पकडा त्या दोघांना."
ते पहारेकरी त्या दोघांना पकडण्यासाठी पुढे सरसावले. इतक्यात अॅंड्र्यू म्हणाला,
"थांबा. वजीर होरेमहेब, आमची तुमच्याशी कोणतीही शत्रुता नाही. आणि आम्ही तुम्हाला इथे इजा करायलाही आलेलो नाही. आम्हाला फक्त कॅप्टन गिनयू कडे घेऊन चला. ते ओळखतात आम्हाला."
कॅप्टन गिनयूच नाव ऐकताच वजीर होरेमहेबच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. काही वेळ त्याने अॅंड्र्यूच्या चेहऱ्याचे निरीक्षण केले आणि अचानक मागे वळून "माझ्या मागे या." असं म्हणून पुढे निघाला. अॅंड्र्यू आणि प्रोफेसर त्याच्या मागे निघाले.
काही वेळ चालल्यावर ते एका चेंबर जवळ पोहोचले. तिथे कॅप्टन गिनयूचे दोन्ही अंगरक्षक यामू आणि स्पोपोविच उभे होते.
यामू: वजीर होरेमहेब, तुम्ही इथे? काय झालं?
वजीर होरेमहेब: या दोघांना कॅप्टन गिनयूंना भेटायचं आहे.
स्पोपोविच: ठिक आहे. तुम्ही जा. या दोघांच काय करायचं ते आम्ही बघतो.
वजीर होरेमहेब आपल्या पहारेकऱ्यांसह तिथून निघून गेला.
यामू: आत या. कॅप्टन गिनयू तुमची वाट पाहत आहेत.
यामू आणि स्पोपोविचच्या मागे ते दोघेही चेंबर मध्ये शिरले. कॅप्टन गिनयू आपल्या सिंहासनावर बसला होता. अभिजीत त्याच्या बाजूला उभा होता. कॅप्टन गिनयूने हसत त्यांचं स्वागत केलं,
"ये, अॅंड्र्यू ये, तुझीच वाट पाहत होतो मी. अरे व्वा, प्रोफेसर सुध्दा आहेत का छान, छान. यामू आणि स्पोपोविच, आपल्या पाहुण्यांच चांगलं आदरातिथ्य करा. त्यांना काही कमी नको पडायला."
अॅंड्र्यू: बस झालं तुझ नाटक गिनयू, मला माहीत आहे तु अभिजीतच माईंड कंट्रोल केलं आहेस. तुझ भल यातच आहे कि तु लवकरात लवकर त्याला स्वतंत्र कर. नाहीतर...
कॅप्टन गिनयू: अरे हो हो, इतका संताप चांगला नसतो. अभिजीत आता माझा गुलाम आहे. बरं झालं. तु मला इथेच भेटलास ते. आता तु इथून जिवंत परत जाऊ शकणार नाही. यामू, स्पोपोविच पकडा त्या दोघांना.
कॅप्टन गिनयूची आज्ञा मिळताच त्याचे दोन्ही अंगरक्षक पुढे सरसावले, तसे अॅंड्र्यूने चपळाईने आपल्या पॉकेट मध्ये हात टाकून एक बंदूक बाहेर काढली.
अॅंड्र्यू: खबरदार, जर कोणी एक पाऊलही पुढे टाकले तर.
अॅंड्र्यूच्या हातातील ती बंदूक बघून यामू आणि स्पोपोविच जागीच थबकले.
कॅप्टन गिनयू: अरे व्वा, मला माहीत नव्हतं कि तुझ्या कडे सुध्दा लेजर गन असेल म्हणून.
अॅंड्र्यू: तुला काय वाटल तुझ्या सारख्या शैतानाशी लढायला मी रिकाम्या हाताने येईल?
कॅप्टन गिनयू: हं, थोडक्यात मानवांकडेही बुध्दी नावाचा प्रकार आहे म्हणायचा.
असं म्हणून कॅप्टन गिनयूने हळूच आपला हात त्या विचित्र हेल्मेट कडे केला, ज्याने अभिजीतच माईंड कंट्रोल केलं होतं. पण अॅंड्र्यू सावध होता. त्याने लेजर गन हेल्मेट कडे करून तिचा चाप दाबला. तत्क्षणी त्या बंदुकीतून एक लेजर निघाली आणि हेल्मेटला छेदून गेली. त्या हेल्मेटला एक मोठ छिद्र पडले आणि ते हेल्मेट निकामी झाले. ते हेल्मेट निकामी झाल्याबरोबर इकडे अभिजीत चक्कर येऊन पडला. प्रोफेसरांनी अभिजीतला सावरल. तो बेशुद्ध झाला होता. अॅंड्र्यूच्या या अचानक हल्ल्याने कॅप्टन गिनयू सुध्दा गांगरून गेला होता. पण त्याने लगेच स्वत:ला सावरलं.
अॅंड्र्यू: आता समजलं. तु याच माईंड कंट्रोल हेल्मेटने अभिजीतला गुलाम बनवलं होतस. पण आता ते हेल्मेट नष्ट झालं आहे.
आपल्या बॉस वर झालेल्या या हल्ल्याने संतापलेल्या यामूने अॅंड्र्यू वर झेप घेतली. पण अॅड्र्यूने पुन्हा चपळता दाखवत लेजर गनचा चाप दाबला. त्यातून निघालेल्या लेजरने यामूच्या छातीचा वेध घेतला. त्याच्या छातीतून लेजर आरपार झालं आणि यामू जमिनीवर कोसळला.
"नाही यामू." स्पोपोविच किंचाळत यामूच्या शरीरा जवळ आला. तो केव्हाच मेला होता. त्याने संतापाने अॅंड्र्यू कडे बघितलं आणि उद्गारला,
"तु माझ्या भावाला मारलस. हे तु चांगलं नाही केलंस आता तु माझ्या हाताने मरशील."
असं म्हणून तो अॅंड्र्यू कडे झेपावणार इतक्यात कॅप्टन गिनयूने त्याला थांबवले आणि एक सुचक इशारा केला. स्पोपोविचला तो इशारा समजला आणि त्याने मान हलवली आणि स्पोपोविच वरून अॅड्र्यूच लक्ष विचलित करण्यासाठी कॅप्टन गिनयू त्याला म्हणाला,
"मानावं लागेल अॅंड्र्यू, आपण जेव्हा मागच्या वेळेस भेटलो होतो, तेव्हा पासून तु फार चांगला योध्दा बनला आहेस. माझ्या बाजूला ये. त्यात तुझाच फायदा आहे."
अॅंड्र्यू: अरे जा, तुझ्या या आमिषाचा माझ्यावर काही फरक पडणार नाही. मी जिवंत असेपर्यंत तु पृथ्वीला धक्का सुध्दा लावू शकत नाही.
अचानक अॅंड्र्यूला कोणाच्या तरी कण्हण्याचा आवाज आला. त्याने वळून पाहिले, स्पोपोविचने प्रोफेसरांना आपल्या मजबूत बाहूपाशात जखडले होते. त्याची पकड इतकी घट्ट होती कि प्रोफेसरांना हलता सुध्दा येत नव्हते.
अॅंड्र्यू: प्रोफेसर.
अॅंड्र्यूच लक्ष विचलित झालंय हे पाहताच कॅप्टन गिनयूने बाजुला पडलेल हेल्मेट उचलून अॅंड्र्यूच्या हातावर मारून फेकल. त्या फटक्यामुळे अॅंड्र्यूच्या हातातील लेजर गन खाली पडली. कॅप्टन गिनयूने झडप घालून ती लेजर गन आपल्या ताब्यात घेतली आणि अॅंड्र्यू वर रोखली.
कॅप्टन गिनयू: हे बघ अॅंड्र्यू, मी तुला एक संधी दिली होती. पण तुझ्याच डोक्यात भुसा भरलेला आहे तर त्याला मी काय करणार. तेव्हा आता मरण्यास तयार रहा. नाही, नाही. थांब. तुला इतका सोपा मृत्यू दिला तर काही मजा येणार नाही. त्याआधी मी तुझ्या डोळ्यांसमोर ही पृथ्वी, हे ब्रम्हांड नष्ट करेल आणि मग तुला मारेल. काय मजा येईल नाही? पण आता....
असं म्हणून त्याने ती लेजर गन प्रोफेसरांवर ताणली आणि स्पोपोविचला एक इशारा केला. त्याने प्रोफेसरांवरची पकड सोडली आणि बाजूला झाला.
"प्रोफेसर, बाजूला व्हा." अॅंड्र्यू ओरडला. पण प्रोफेसर आधीच त्या मजबूत पकडी मुळे अर्धमेले झाले होते. अॅंड्र्यूचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचलाच नाही. कॅप्टन गिनयूने लेजर गनचा चाप दाबला. सगळं काही एका क्षणात घडलं. अॅंड्र्यूने चपळाईने हालचाल करून प्रोफेसरांना दूर लोटल, मात्र तो स्वत: ला वाचवू शकला नाही. त्या लेजर गनने अॅंड्र्यूच्या छातीचा वेध घेतला होता. ती लेजर त्याच्या छातीच्या आरपार झाली होती. तो जखमी अवस्थेत खाली कोसळला.
कॅप्टन गिनयू: स्पोपोविच, या म्हाताऱ्याला उचल.
असं म्हणून त्याने ती लेजर गन तिथेच फेकली आणि चेंबर मधून बाहेर पडला. त्याच्यामागे स्पोपोविच प्रोफेसरांना घेऊन निघाला. ते दोघेही तिथून गेल्यानंतर इकडे लगेच अभिजीत शुध्दीवर आला. ते हेल्मेट निकामी झाल्याने तो पुर्ववत झाला होता. काही क्षण त्याला काहीच समजत नव्हते. अचानक त्याला सगळं आठवलं. त्याने आजुबाजुला दृष्टी टाकली. तिथे त्याला फक्त एक लेजर गन, यामूच प्रेत आणि जखमी अवस्थेत पडलेला अॅंड्र्यू दिसला. अभिजीत अॅंड्र्यू जवळ येऊन पोहोचला. त्याच्या छातीत एक मोठ छिद्र होत.
अभिजीत: अॅंड्र्यू, हे... हे कसं झालं? कोणी केल?
अॅंड्र्यू: क... कॅप्टन गिनयू, त.... त्यानेच केलंय हे... हे सगळं. त.... तो प्रोफेसरांना घेऊन ग... गेला. म... मला नाही वाटत कि... कि मी आता जास्त वेळ जगेल.
अभिजीत: नाही, मी तुला काही होऊ देणार नाही. काहीतरी मार्ग असेल.
अॅंड्र्यू: नाही. क... काही मार्ग नाही. ले.... लेजर गनच्या घावापासून को..... कोणीही वाचु शकत नाही. अभिजीत, आता क... कॅप्टन गिनयूला तुलाच रोखावे लागेल. या प... पृथ्वीच भविष्य आता तुझ्या हातात आहे...
इतकं बोलून अॅंड्र्यूने प्राण सोडला. अभिजीत सुन्न झाला होता. त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याने बाजूला पडलेली लेजर गन उचलली.
अभिजीत: अॅंड्र्यू, मी वचन देतो. तुझ अर्धवट काम मी पूर्ण करेल. कॅप्टन गिनयू तुझे वाईट दिवस आता सुरू होतील. तुझ साम्राज्य मुळापासून उखडून फेकेल मी. उध्वस्त करून टाकेल मी तुला.
इतकं बोलून अभिजीत चेंबर मधून बाहेर पडला....
प्रकरण १६
....नाईल नदीच्या काठावर अभिजीत बसला होता. अॅंड्र्यूचा मृत्यू, प्रोफेसरांच अपहरण या आकस्मिक घटनांमूळे त्याला खूप मोठा धक्का बसला होता. त्याच जीवन अश्याप्रकारे बदलून जाईल याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. अॅंड्र्यूने अर्धवट सोडलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी आता अभिजीत वर होती. पण तो हे सगळं कसं करणार होता? तो कॅप्टन गिनयू सारख्या ताकदवान व्हीलनचा सामना कसा करू शकणार होता? तो हे सगळं खरंच करू शकणार होता कि त्याचाही असाच अंत होणार होता? या सगळ्या प्रश्नांनी त्याच डोकं अक्षरशः पोखरून निघत होते. त्याला सुरूवात कुठून करावी तेच समजत नव्हते. त्याच्या कडे फक्त अॅंड्र्यूच ते 3 डायमेन्शनल पॉकेट होते. पण त्याला कुठून ना कुठून सुरुवात करावीच लागणार होती. त्याचाच तो विचार करत होता. अचानक त्याला काही आवाज ऐकू आले. त्याने वळून पाहिले. वजीर होरेमहेब आपल्या सशस्त्र सैनिकांसोबत कोणाला तरी शोधत होता.
"शोधा त्याला, इथेच कुठेतरी असेल तो."
वजीर होरेमहेब सैनिकांना आदेश देत होता. अभिजीतला समजायला वेळ लागला नाही कि हा शोध त्याच्यासाठीच चालू होता. अभिजीत चपळाईने तिथून उठला. ते सैनिक अजुन त्याच्यापासून लांब अंतरावर होते. जर तो पकडला गेला, तर त्याच्या सोबत काय होईल हे सांगणे कठीण होते. त्याला मृत्यूदंडही मिळू शकला असता. कॅप्टन गिनयूला त्याच्या कृत्यांची सजा दिल्याशिवाय त्याला मरायच नव्हतं. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली. अचानक बाजूला त्याला एक छोटंसं पिरॅमिड दिसलं. त्या पिरॅमिड मध्ये एक माणूस घुसु शकेल एवढं भगदाड होतं. अभिजीत पटकन त्यात घुसला आणि एका कोपऱ्यात जाऊन बसून राहिला. काही वेळातच वजीर होरेमहेब आणि त्याचे सैनिक त्या ठिकाणी येऊन पोहोचले. त्यांनी ते छोटस पिरॅमिड सोडून संपूर्ण परिसर पिंजुन काढला. मात्र अभिजीत त्यांना कुठेच सापडला नाही. अचानक एका सैनिकाच लक्ष त्या छोट्या पिरॅमिड कडे गेल. तो सैनिक हळूहळू त्या पिरॅमिडच्या दिशेने सरकू लागला. तो सैनिक त्या पिरॅमिड जवळ येऊन पोहोचला. अभिजीत आपला श्वास रोखून गुपचुप त्या कोपऱ्यात बसला होता. तो सैनिक भगदाडाच्या आत बघणार इतक्यात त्या सैनिकाला मागून वजीर होरेमहेबचा आवाज आला. तो सगळ्या सैनिकांना तिथून निघण्याचा आदेश देत होता. हळूहळू ते सगळे तिथून गेल्यानंतर अभिजीतने सुटकेचा निःश्वास सोडला आणि तिथून बाहेर पडला. आता मात्र अभिजीतला वेळ वाया घालवून चालणार नव्हतं. तो आज वाचला म्हणून उद्याही वाचेल याची शक्यता नव्हती. केव्हा तरी तो पकडला जाईलच. त्याआधी त्याला अॅंड्र्यूने नेमून दिलेले काम पूर्ण करावे लागेल. पण त्याच्या कडे फक्त ते 3 डायमेन्शनल पॉकेट होते, ज्यात कोणते गॅजेट्स आहेत, त्यांचा उपयोग कसा करायचा याबद्दल त्याला काहीही माहिती नव्हती. अभिजीतने सहज त्या पॉकेट मध्ये हात घातला आणि जेव्हा त्याचा हात बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात एक कागद होता. त्याने तो कागद उलगडला. ते भलंमोठं मॅन्युअल होत. ज्यात त्या पॉकेट मध्ये कोणकोणते गॅजेट्स आहेत, ते कुठे आणि कसे वापरायचे याबद्दल संपूर्ण माहिती होती. या घटनेमुळे अभिजीतला अॅंड्र्यूने सांगितलेली एक गोष्ट आठवली,
'आपल्याला जी वस्तु हवी असते ती या पॉकेट मध्ये हात घातल्या बरोबर लगेच मिळते.'
अभिजीतने बाविसाव्या शतकातील हे पॉकेट बनवणाऱ्या शास्त्रज्ञांना मनोमन सलाम केला. आता त्याचे पुढील लक्ष्य होते, डेड सी स्क्रॉल्सचा शोध. पण त्याची सुरुवात कुठून करावी याबद्दल त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले होते. खूप विचार केल्यावर त्याला आठवले कि गिजा मध्ये तीन प्रमुख पिरॅमिड्स बांधले होते. पहीलं होतं, द ग्रेट पिरॅमिड ऑफ खुफू, दुसरं पिरॅमिड ऑफ खाफ्रे आणि तिसरं पिरॅमिड ऑफ मेनकाऊरे. त्यापैकी पिरॅमिड ऑफ खुफू मध्ये त्यांना काहीच सापडले नव्हते. आता पाळी होती पिरॅमिड ऑफ खाफ्रेची. अभिजीतने आपल्या खिशातून ते गोल डिव्हाईस काढलं. त्यात त्याने मॅप ओपन केला. पिरॅमिड ऑफ खाफ्रे पिरॅमिड ऑफ खुफू पासून जवळच होते. मॅपच्या निर्देशानुसार तो पिरॅमिड ऑफ खाफ्रेच्या दिशेने चालू लागला.
काही वेळातच तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचला होता. पिरॅमिड ऑफ खाफ्रे पिरॅमिड ऑफ खुफू पेक्षा थोडं छोटं होत. तसच ते कमी उंचीवर बांधलं होतं. अभिजीत पिरॅमिडच्या प्रवेशद्वारावर येऊन पोहोचला. प्रवेशद्वारावर कोणीही पहारेकरी तैनात नव्हता. तो हळूच आत गेला. या पिरॅमिड मध्येही मागच्या प्रमाणे चेंबर्स होते. अभिजीतने सर्वात आधी तो माहीतीचा कागद काढला. त्याने तो पूर्ण कागद वाचून काढला. त्यामुळे आता त्याला त्याच्या जवळील 3 डायमेन्शनल पॉकेट मधील सर्व गॅजेट्सची पूर्ण माहिती झाली होती. त्याने तो कागद खिशात ठेवला. आता त्याने आपल्या हातातील त्या गोल डिव्हाईस वर नजर टाकली. त्याच्यात पिरॅमिडचा पूर्ण नकाशा दिसत होता. त्यात दोन हिरवे ठिपके होते. दोन हिरवे ठिपके? पण कस? अभिजीत विचारात पडला. कारण एक हिरवा ठिपका म्हणजे अभिजीत स्वत: होता. पण दुसऱ्या हिरव्या ठिपक्याचा अर्थ काय? अचानक अभिजीतच्या डोक्यात प्रकाश पडला. याचा अर्थ प्रोफेसरही याच पिरॅमिड मध्ये कुठेतरी आहेत. अभिजीतच्या जीवात जीव आला होता. आता लवकरात लवकर प्रोफेसरांना शोधायला हवं. असा विचार करून त्याने पुन्हा एकदा त्या नकाशावर नजर टाकली. त्यात एकही लाल ठिपका दिसत नव्हता. म्हणजेच या पिरॅमिड मध्ये एकही पहारेकरी तैनात नव्हता. यामुळे तो आपलं काम आरामात करू शकणार होता. प्रोफेसरांच लोकेशन हे अभिजीतच्या लोकेशन पासून बरंच दूर होत. पण नकाशाच्या मदतीने तो आरामात त्यांच्यापर्यंत पोहोचु शकत होता.
इकडे स्पेस शिप मध्ये कॅप्टन गिनयू आणि स्पोपोविच बोलत बसले होते.
कॅप्टन गिनयू: स्पोपोविच, मला काही कामानिमित्त आपल्या ग्रहावर जावं लागणार आहे. त्यामुळे मी परत येईपर्यंत येथील सर्व काम तुझ्या वर सोपवतो आहे. लक्षात ठेव, या पिरॅमिड्स मध्ये आपल्या प्लॅनचा सर्वात मोठा हिस्सा आहे. याच्या संरक्षणाची जबाबदारी तुझ्यावर आहे.
स्पोपोविच: तुम्ही काहीच चिंता करू नका कॅप्टन. मी जिवंत असेपर्यंत आपला प्लॅन कोणीच बिघडवू शकत नाही.
कॅप्टन: गुड, तीच आशा आहे तुझ्या कडून.
अचानक कॅप्टन गिनयूच लक्ष आपल्या स्पेस शिप मधील कॉम्प्युटर वर पडलं. ते कॉम्प्युटर इजिप्त मधील पिरॅमिडशी जोडलेले होते. त्यामुळे पिरॅमिड मधील प्रत्येक चेंबरच फूटेज त्या कॉम्प्युटर वर दिसत होते. अशाच एका कॅमेऱ्यात कॅप्टन गिनयूला अभिजीत दिसला. तिकडे इशारा करून त्याने स्पोपोविचला विचारलं,
"तो अभिजीत तिथे काय करतोय रे?"
स्पोपोविचने त्या कॅमेऱ्यात बघितलं आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर भय दिसु लागल.
स्पोपोविच: काय? हा तिथे कसा पोहोचला?
कॅप्टन गिनयू: म्हणजे? काय म्हणायचंय तुला?
स्पोपोविच: कॅप्टन, याच पिरॅमिड ऑफ खाफ्रे मध्ये मी त्या म्हाताऱ्याला कैद करून ठेवले आहे.
कॅप्टन गिनयू: काय? अरे मी सांगितलं होतं ना तुला कि त्या म्हाताऱ्याला मारून टाक म्हणून.
स्पोपोविच: हो कॅप्टन, मी त्याला मारणारच होतो. पण अचानक तुमचं तातडीच बोलावणं आलं. म्हणून त्याला कैद करून ठेवले होते. पण तुम्ही चिंता करू नका. हा अभिजीत जरी त्या म्हाताऱ्यापर्यंत पोहोचला, तरी त्याला सोडवू शकणार नाही. कारण मी म्हाताऱ्या भोवती कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे.
कॅप्टन गिनयू: नाही स्पोपोविच नाही. तु या पृथ्वीवरील मानवांना दुर्लक्षित करू शकत नाहीस. त्यांच्या कडेही बुध्दी नावाचा प्रकार आहेच आणि त्या बुध्दीच्या बळावर ते कोणतीही लढाई जिंकू शकतात. तेव्हा आता तु जास्त उशीर करू नकोस. तिथे जा आणि त्या दोघांचाही खात्मा कर. म्हणजे आपल्या मार्गातील सगळे अडथळे दूर होतील. आपण आधीच त्या अॅंड्र्यूचा काटा काढला आहे.
स्पोपोविच: समजलं कॅप्टन, आता जातो आणि त्यांचं काम तमाम करतो.
असं म्हणून स्पोपोविच निघाला.
इकडे अभिजीत या नकाशाच्या मदतीने त्या चेंबर जवळ येऊन पोहोचला होता, जिथे तो नकाशा प्रोफेसरांच लोकेशन दाखवत होता. त्या चेंबरचा दरवाजा बंद होता. अभिजीतने दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या दरवाज्याला कडी कुलूप काहीच नव्हते. त्यामुळे अभिजीतला समजत नव्हते कि हा दरवाजा कसा उघडायचा. अचानक त्याला काहीतरी आठवलं. त्याने 3 डायमेन्शनल पॉकेट मध्ये हात घातला आणि जेव्हा त्याने हात बाहेर काढला तेव्हा त्याच्या हातात एक बॉक्स होता. त्या बॉक्सचे झाकण उघडले. तेव्हा त्यात ४ गोळे होते. हे तेच गोळे होते ज्यांचा वापर अॅंड्र्यूने केला होता. अभिजीतने ते मॅन्युअल वाचल्यामुळे त्याला सुध्दा या सगळ्या गोष्टींची माहिती झाली होती. अभिजीतने त्या गोळ्याच्या खालचे बटन दाबले आणि तो गोळा त्या चेंबरच्या दरवाज्यासमोर ठेवून तो दूर कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. तो गोळा चमकायला लागला आणि काही क्षणातच एक कानफोडू आवाज झाला. त्या चेंबरच्या दरवाज्याचे चिथडे उडाले होते. अभिजीत हळूच त्या चेंबर मध्ये शिरला. अभिजीतने चारही बाजूंना आपली नजर फिरवली. त्या चेंबर मध्ये विशेष काहीच नव्हतं. अचानक कोपऱ्यात एक काचेची मोठी पेटी त्याला दिसली. तो त्या पेटीच्या आणखी जवळ आला आणि त्याच्या काळजात धस्स झालं. त्या पेटीत प्रोफेसर बेशुद्धावस्थेत पडलेले होते. अभिजीतने जोरजोरात पेटी बडवून प्रोफेसरांना आवाज दिला. पण त्याचा काही उपयोग नव्हता. अचानक एक आवाज ऐकू आला,
"जिवंत आहे तो म्हातारा अजुन."
अभिजीतने मागे वळून पाहिले. तो आवाज स्पोपोविचचा होता. तो त्या चेंबरच्या दरवाज्यातून आत आला. स्पोपोविचला पाहताच अभिजीतच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
अभिजीत: काय केले आहेस तु प्रोफेसरांसोबत?
स्पोपोविच: सांगितलं ना कि जिवंत आहे तो अजुन. हा पण लवकरच मरेल तो आणि त्याच्या सोबत तुही मरशील.
अभिजीतच्या संयमाचा बांध फुटला. त्याने स्पोपोविच वर झेप घेतली. पण स्पोपोविचने हाताच्या एका फटक्यात अभिजीतला दूर फेकल. स्पोपोविच अभिजीत पेक्षा कितीतरी पटीने जास्त ताकदवान होता. त्याच्या सोबत सरळ लढाईत आपण जिंकू शकत नाही. हे अभिजीतला समजून चुकले होते.
स्पोपोविच: काय झालं? मला मारणार होतास ना तु? एकाच फटक्यात पडला? मुर्खा, माझ्यासमोर तु एका छोट्या किड्या समान आहेस. क्षणात तुला चिरडू शकतो मी. हाहाहा.
असं म्हणून स्पोपोविच हळूहळू अभिजीतच्या दिशेने चालू लागला. अभिजीतने आपल्या पॉकेट मध्ये हात घातला आणि लेजर गन बाहेर काढली. स्पोपोविच जागीच थबकला. आता हसण्याची पाळी अभिजीतची होती. त्याने लेजर गन स्पोपोविच वर रोखली.
अभिजीत: मी तुझ्याशी ताकदीने जिंकू शकत नाही म्हणून काय झालं. हे शस्त्र तर आहे ना माझ्याकडे. या लेजर गनने मारेल मी तुला.
अभिजीतच बोलणं ऐकून स्पोपोविच जोरजोरात हसायला लागला.
स्पोपोविच: असं. तु मला मारशील? बघ हं. पुन्हा एकदा विचार कर. जर मला थोडी सुध्दा इजा झाली, तर तुझा म्हातारा जीवानिशी जाईल.
अभिजीत: काय?
स्पोपोविचने एक वस्तू काढली. तीचा आकार लांब होता. आणि त्यावर विविध रंगांचे काही बटन होते. ती वस्तु अभिजीतच्या समोर धरत स्पोपोविच म्हणाला,
"ती काचेची पेटी आहे ना त्याच रिमोट कंट्रोल आहे हे. याच बटन दाबताच त्या काचेच्या पेटीच्या आत करंट उतरत आणि त्या काचेच्या पेटीत जो कोणी असेल, त्याला जबरदस्त शॉक बसतो. ट्रेलर बघायचाय का?"
अस म्हणून स्पोपोविचने रिमोटवरील हिरव्या बटनावर बोट ठेवले, इतक्यात अभिजीत ओरडला,
"थांब, थांब. प्रोफेसरांना काही करू नकोस. हे घे."
असं म्हणून अभिजीतने हातातील लेजर गन खाली फेकली. स्पोपोविचने ती लेजर गन आपल्या ताब्यात घेतली आणि अभिजीत वर रोखली आणि म्हणाला,
"आता तुम्हा दोघांना मृत्यू पासून कोणीही वाचवू शकत नाही. त्या अॅंड्र्यूने माझ्या भावाला मारल होत. आता मी त्याचा बदला घेईल. सर्वात आधी तुझ्या डोळ्यांसमोर मी त्या म्हाताऱ्याला मारेल आणि मग तुझा खात्मा करेल. तेव्हाच माझा बदला पूर्ण होईल."
असं म्हणून स्पोपोविच प्रोफेसरांच्या दिशेने चालू लागला. अभिजीतला आता लवकरात लवकर काहीतरी करणं भाग सर्वात आधी स्पोपोविच कडून ते रिमोट कंट्रोल हस्तगत करण गरजेच होतं. त्याच्या डोक्यात विचारचक्र चालू झालं आणि अचानक त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने आपल्या पॉकेट मध्ये हात घातला आणि एक वस्तू बाहेर काढली. शॉक गन. अभिजीतने नेम धरून ती शॉक गन स्पोपोविचच्या दिशेने रोखली आणि चाप दाबला. तत्क्षणी विजेची एक रेषा निघाली आणि स्पोपोविचला लागली. त्याला जोराचा शॉक बसला. तो जिवाच्या आकांताने ओरडला. त्याच्या हातातील रिमोट आणि लेजर गन खाली पडली. अभिजीतने त्या दोन्ही वस्तू उचलल्या. स्पोपोविच वेदनेने विव्हळत जमिनीवर पडला होता. अभिजीत स्पोपोविचच्या जवळ आला आणि लेजर गनची नळी त्याच्या डोक्यावर ठेवून म्हणाला,
"आता बऱ्याबोलाने सांग. प्रोफेसरांना इथून बाहेर कसं काढायचं. नाहीतर जिवानिशी मरशील."
अभिजीतच्या या धमकीचा स्पोपोविच वर काहीच परिणाम झाला नाही. तो हसत म्हणाला,
"तु विचारलं आणि मी सांगितलं. इतका मुर्ख वाटलो का रे मी तुला. मी मरून जाईन. पण तुला सांगणार नाही. आता तो म्हातारा तिथेच राहील. हा. जर तुझ्यात दम असेल तर बाहेर काढून दाखव त्याला."
अभिजीतने त्या रिमोट कडे बघितले त्याच्यावर बरेच बटन होते. पण काचेची पेटी उघडायच बटन कुठे असेल याचा तो विचार करत होता. बराच वेळ तो त्या रिमोटच निरिक्षण करत राहिला. मात्र त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याची ही गोंधळाची स्थिती बघून स्पोपोविच आणखीन जोरात हसायला लागला.
स्पोपोविच: काय झालं? काही सुचत नाहीये का? आणि सुचणार तरी कसं? आमच्या महान कॅप्टन गिनयूंच इन्व्हेंशन आहे ते. असं कोण्याही येड्यागबाळ्याच काम नाही ते समजावून घेण.
अभिजीत: जब घी सीधी उंगलीसे ना निकले तो उंगली टेढी करनी पडती है| और अगर टेढी उंगलीसे भी घी ना निकले तो घी का डब्बाही फोड दो|
स्पोपोविच: काय? काय म्हणालास?
अभिजीतने हसून स्पोपोविच कडे बघितलं. अभिजीतने हातातलं रिमोट खाली फेकल आणि आपला उजवा पाय त्या रिमोट वर पूर्ण ताकदीनिशी जोरात देऊन मारला. त्याच बरोबर रिमोटने तुकडे झाले आणि ती काचेची पेटी उघडली गेली. प्रोफेसर स्वतंत्र झाले होते. स्पोपोविच आ वासून सगळं बघत होता. त्यावेळी त्याला कॅप्टन गिनयूने सांगितलेली गोष्ट आठवली,
"तु या पृथ्वीवरील मानवांना दुर्लक्षित करू शकत नाहीस. त्यांच्या कडेही बुध्दी नावाचा प्रकार आहेच आणि त्या बुध्दीच्या बळावर ते कोणतीही लढाई जिंकू शकतात."
स्पोपोविचला कॅप्टन गिनयूच्या म्हणण्याचा खरा अर्थ आता कळला होता. अभिजीत स्पोपोविच जवळ येऊन उभा राहिला.
अभिजीत: माझं काम झालंय. तेव्हा आता तुझा जिवंत राहून काही फायदा नाही. हा पण एका गोष्टीची खंत नक्की असेल मला. तु तुझ्या डोळ्यांनी तुझ्या त्या कॅप्टन गिनयूच साम्राज्य उध्वस्त होतांना बघू शकणार नाहीस.
असं म्हणून अभिजीतने लेजर गन स्पोपोविचच्या डोक्याला लावली आणि चाप दाबला. लेजर गन मधून लेजर किरण निघून ते स्पोपोविचच्या डोक्याच्या आरपार झालं. स्पोपोविच गतप्राण झाला. अभिजीतने लेजर गन पॉकेट मध्ये ठेवली. आणि प्रोफेसरांजवळ पोहोचला. प्रोफेसरांनीही डोळे उघडले. अभिजीतने त्यांना मिठीच मारली. क्षणभर त्यांना काहीच समजत नव्हतं. अचानक त्यांच लक्ष स्पोपोविचच्या मृतदेहावर पडलं. त्यासरशी त्यांना एकेक गोष्ट आठवली. त्यांनी अभिजीतला बेशुद्ध पडतांना पाहील होतं. पण त्यानंतर मात्र त्यांना काही आठवत नव्हतं. त्यानंतरच घडलेल सगळं अभिजीतने त्यांना सांगितले. अॅंड्र्यूच्या मृत्यू बद्दल ऐकून प्रोफेसरांना दु:ख झालं. मात्र लगेच त्यांनी स्वत:ला सावरलं.
प्रोफेसर: आता ही वेळ दु:ख करत बसण्याची नाही अभिजीत. आपल्याला आणखी वेळ घालवून चालणार नाही. आता फक्त कॅप्टन गिनयूच नाही तर तुतनखामेनचे सैनिक सुध्दा आपल्या मागावर आहेत. तेव्हा आता लवकरात लवकर डेड सी स्क्रॉल्स शोधून कॅप्टन गिनयूचा प्लॅन आपल्याला हाणून पाडावा लागेल. नाहीतर अॅंड्र्यूच बलिदान व्यर्थ जाईल.
अभिजीत: तुम्ही बरोबर बोलत आहात प्रोफेसर.पण पहीले आपल्याला इथून बाहेर पडावं लागेल.
असं म्हणून अभिजीत प्रोफेसरांना घेऊन चेंबर मधून बाहेर पडला....
प्रकरण १७
..... अभिजीत आणि प्रोफेसर पिरॅमिड ऑफ खाफ्रे मधून बाहेर पडले होते. आता त्यांच्या समोर प्रमुख लक्ष्य होते ते डेड सी स्क्रॉल्स शोधण्याचे. आता पर्यंत घडलेल्या घटनांनी त्या दोघांनाही पुरतं हादरवून सोडले होते. दोघेही पिरॅमिड जवळच्या एका दगडावर बसून आता पर्यंतच्या घटनांचा आढावा घेत होते. आज सकाळी त्यांनी एक टाईम मशीन तयार केली होती, तेव्हापासून त्यांना ७-८ तास लोटले असतील. आता दुपार झाली होती. द ग्रेट पिरॅमिड ऑफ गिजा वर पिवळ धमक कडाक्याचं ऊन पसरलं होतं. सकाळपासून घडलेली प्रत्येक गोष्ट त्यांना आठवत होती. पण आता आठवणींत रमून काहीही फायदा नव्हता. त्यांच्या समोर नियतीने जे वाढून ठेवले होते, त्याला सामोरं जाणं त्यांना भाग होत. प्रोफेसरांना अजुनही अशक्तपणा होता. अचानक अभिजीत उठला आणि म्हणाला,
"प्रोफेसर, मी पिरॅमिड ऑफ मेनकाऊरे मध्ये जातो आहे. आता तीच आपली शेवटची आशा आहे आणि मला विश्वास आहे कि तिथेच आपला शोध नक्की संपेल."
"मी पण येतो."
असं म्हणून प्रोफेसर उठण्याचा प्रयत्न करू लागले, तसं अभिजीतने त्यांना थांबवले,
"नाही प्रोफेसर, तुम्ही इथेच बसा. तुमच्या शरीरात आता इतकी ताकद उरलेली नाही. तुम्हाला आरामाची गरज आहे."
असं म्हणून अभिजीतने आपल्या पॉकेट मध्ये हात घातला आणि त्यातून शॉक गन बाहेर काढली. ती प्रोफेसरांजवळ देत तो म्हणाला,
"ही शॉक गन जवळ ठेवा. तुमच्या सुरक्षेसाठी. मी लवकरच परत येईन."
एवढं बोलून अभिजीत तिथून निघाला.
पिरॅमिड ऑफ मेनकाऊरे हे गिजा मधील तिसरं आणि इतर दोन पिरॅमिड्स पेक्षा सर्वात छोट पिरॅमिड होत, मेनकाऊरे नावाच्या एका फैरोने बांधलं होतं. हे पिरॅमिड अतिशय कमी उंचीवर बांधलं होत. खरतर इथे डेड सी स्क्रॉल्स मिळण्याची आशा फार धुसर होती. पण एक छोटी सुई सुध्दा फार मोठं काम करू शकते. त्याच प्रमाणे कदाचित इथेच पुढचा रस्ता सापडेल. असा विचार करून तो पिरॅमिडच्या आत घुसला. आत घुसताच त्याने सर्वात आधी खिशातून ते गोल डिव्हाईस काढलं. ते ऑन केल्याबरोबर त्याच्यावर पिरॅमिडचा नकाशा दिसु लागला. त्या नकाशात या पिरॅमिड मधील सर्व चेंबर्स दिसत होते, त्याच बरोबर त्यात एक हिरवा ठिपका दिसत होता, ज्याचा अर्थ अभिजीत स्वत: होता. पण अचानक अभिजीतच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली, ज्याच कारण होतं, नकाशात दिसणारे १० लाल ठिपके. त्याचा अर्थ होता कि या पिरॅमिड मध्ये १० पहारेकरी तैनात होते. पण अजुन एका गोष्टीने अभिजीतच लक्ष वेधलं होतं आणि ती म्हणजे या पिरॅमिड मध्ये अनेक चेंबर्स असूनही ते सगळे पहारेकरी एकाच चेंबर भोवती पहारा देत होते. याचाच अर्थ त्या एकाच चेंबर मध्ये काहीतरी महत्त्वाचं होतं. आता अभिजीतच्या आशा पल्लवित झाल्या. कदाचित इथेच ती गोष्ट असेल, ज्याचा कधीपासून ते शोध घेत होते. अभिजीतने पॉकेट मधून लेजर गन काढली. एका हातात लेजर गन आणि दुसऱ्या हातात नकाशा धरून अभिजीत चेंबरच्या दिशेने रवाना झाला.
काही वेळातच अभिजीत त्या चेंबर जवळ पोहोचला होता. त्याने एका भिंतीआडून हळूच डोकावून पाहिलं. त्या चेंबर भोवती पहारेकरी सावध होऊन पहारा देत होते. पण हे ते पिरॅमिडचे पहारेकरी नव्हते, जे त्याने पिरॅमिड ऑफ खुफू मध्ये पाहीले होते. या पहारेकऱ्यांचा पोशाख एकदम वेगळा होता. त्यांनी डोक्यावर एक हेल्मेट घातले होते, त्यांनी वेगळ्या प्रकारचे कपडे घातले होते, त्यांच्या हातात बंदुका होत्या. अभिजीतला समजायला वेळ लागला नाही कि हे कॅप्टन गिनयूचे सैनिक होते. यांचा सामना करणं आणखीन कठीण होणार होतं. पण आता अभिजीत मागे हटणार नव्हता. कारण एव्हाना त्याला कळून चुकलं होतं कि डेड सी स्क्रॉल्स इथेच असणार, म्हणूनच एवढा कडक पहारा होता. त्याने हातातली लेजर गन घट्ट पकडली आणि हळूहळू त्या चेंबरच्या दिशेने निघाला. अभिजीत काही पावलं पुढे गेलाच होता कि इतक्यात त्याला 'थांब' असा आवाज ऐकू आला. अभिजीतने मागे वळून पाहिले. एक सैनिक त्याच्यावर बंदूक रोखून उभा होता. त्या सैनिकाने हळूहळू पुढे येत विचारलं,
"कोण आहेस तु? इथे काय करतोयस?"
अभिजीतने क्षणाचाही विलंब न करता हातातील लेजर गन त्या सैनिकाच्या दिशेने रोखली आणि चाप दाबला. तत्क्षणी बंदूकीतून एक लेजर किरण निघून त्या सैनिकाच्या छातीच्या आरपार झाली होती. तो सैनिक एक किंचाळी मारून खाली कोसळला. त्याची किंचाळी ऐकून इतर सैनिक धावत तिथे येऊन पोहोचले. त्यांनी चारी बाजूंनी अभिजीतला घेरून घेतलं होतं. त्या सर्व सैनिकांच्या बंदूका अभिजीतच्या दिशेने रोखलेल्या होत्या.
"कोण आहेस तू?"
एका सैनिकाने विचारलं.
अभिजीत: मी अभिजीत, मी डेड सी स्क्रॉल्स घ्यायला आलो आहे.
डेड सी स्क्रॉल्सच नाव ऐकून त्या सैनिकांमध्ये कुजबुज सुरु झाली.
पहीला सैनिक: डेड सी स्क्रॉल्स बद्दल याला कसं माहीत पडलं? त्याला तर एकदम गुप्तपणे ठेवले गेले होते.
दुसरा सैनिक: मला तर वाटतं आपण याला इथेच मारून टाकायला हव.
तिसरा सैनिक: नाही. आपण याला कैद करून कॅप्टन गिनयूंना संदेश पाठवू पुढे तेच ठरवतील कि याच काय करायचं.
याला सगळ्या सैनिकांनी आपली संमती दर्शवली. दोन सैनिकांनी अभिजीतला पकडलं आणि इतर सैनिकांच्या मागे निघाले. काही क्षणातच ते एका चेंबर जवळ येऊन पोहोचले. सगळे सैनिक चेंबरच्या आत गेले. ते चेंबर इतर चेंबर्स पेक्षा बऱ्यापैकी मोठ होतं. अभिजीतने चारी बाजूंना आपली नजर फिरवली. त्या चेंबर मध्ये अनेक सायंटिफिक एक्विपमेंट होते. कोपऱ्यात एक आधुनिक कॉम्प्युटर होत. एक सैनिक त्या कॉम्प्युटर वर बसला आणि कॅप्टन गिनयूशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू लागला. त्या चेंबर मध्ये चारही दिशांना चार कॅमेरे लावले होते. त्यामुळे त्या चेंबर मध्ये कानाकोपऱ्यातील प्रत्येक गोष्ट कॉम्प्युटर मध्ये दिसु शकत होती. पण अभिजीतच लक्ष ज्या गोष्टीने सर्वाधिक वेधलं ते होत, त्या चेंबर मधील एक बंद दरवाजा. अभिजीतच्या डोक्यात इथून कसं सुटायच याबद्दल विचार सुरू झाला. अचानक त्याला एक कल्पना सुचली. त्याने पूर्ण ताकदीनिशी त्याला पकडलेल्या सैनिकांना जोरात धक्का दिला. ते दोघेही बेसावध असल्यामुळे दूर जाऊन पडले. अभिजीत चपळाईने त्या चेंबरच्या बाहेर निघून गेला. हे सगळं इतकं जलद घडलं कि त्या सैनिकांना काय झालं हे समजायला काही क्षण लागले. अचानक एक सैनिक ओरडला,
"बघता काय नुसते पकडा त्याला."
असं म्हणून काही सैनिक अभिजीतला पकडण्यासाठी चेंबरच्या बाहेर यायला निघाले कि अचानक एक चमचमता गोळा त्या चेंबरच्या आत आला. ते सैनिक त्या गोळ्याला आश्चर्याने पाहत होते. इतक्यात त्या गोळ्यामध्ये कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. त्या गोळ्याच्या आसपास असलेल्या काही सैनिकांचे चिथडे उडाले होते.काही सैनिक जखमी होऊन दूर फेकले गेले होते. हा तोच बॉम्ब होता जो अभिजीतने अॅड्र्यूच्या पॉकेट मधून काढला होता. त्या स्फोटामुळे चेंबर मधील कॉम्प्युटर सिस्टीम पूर्णपणे निकामी झाली होती, तसेच तेथील कॅमेरे सुध्दा खराब झाले होते. अभिजीत हळूच आत आला. त्याने त्या चेंबर मध्ये असलेल्या बंद दरवाज्यावर नजर टाकली. एवढ्या भयंकर स्फोटाचा त्या दरवाज्यावर काहीच परिणाम झाला नव्हता. अभिजीत त्या दरवाज्याजवळ येऊन उभा राहिला. तो त्या दरवाज्याच एकदम सुक्ष्मतेने निरिक्षण करत होता. अचानक एक जखमी सैनिक उठून उभा राहिला. त्याने बाजूला पडलेली बंदूक उचलली आणि अभिजीतच्या दिशेने नेम धरला आणि चाप दाबणार इतक्यात त्या सैनिकाला जोराचा शॉक बसला. तो सैनिक किंचाळत खाली कोसळला. त्याची किंचाळी ऐकून अभिजीतने मागे वळून पाहिले. तिथे प्रोफेसर उभे होते. त्यांच्या हातात अभिजीतने दिलेली शॉक गन होती. प्रोफेसरांनी ती शॉक गन त्या सैनिकाच्या दिशेने रोखलेली होती.
अभिजीत: प्रोफेसर, तुम्ही इथे?
प्रोफेसर: तुला जाऊन बराच वेळ झाला, म्हणून बघायला आलो.
अभिजीत: पण तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचलात?
प्रोफेसर: इथून मला एक मोठा स्फोटाचा आवाज ऐकू आला होता.
अभिजीत: हो. तो स्फोट मीच केला होता.
प्रोफेसर: हं. बरं मग काही सापडलं कि नाही?
अभिजीत: अजुनही काही सापडलं नाहीये. पण या बंद दारामागे काही रहस्य लपलेली असु शकतात.
असं म्हणून अभिजीतने त्या बंद दरवाज्या कडे बोट दाखवलं. प्रोफेसर त्या बंद दरवाज्याच निरिक्षण करू लागले.
अभिजीत: एवढा भयानक स्फोट सुध्दा त्या दरवाज्याचे काहीही बिघडवू शकला नाही.
प्रोफेसर: माझ्या माहितीप्रमाणे हा दरवाजा एका धातु पासुन बनलेला आहे. एक असा धातु जो या पृथ्वीवर कुठेही मिळत नाही.
अभिजीत: याचा अर्थ हा धातू कॅप्टन गिनयूने त्याच्या ग्रहावरून आणला असेल?
प्रोफेसर: असु शकत आणि या दरवाज्याला कसं उघडायच हे सुद्धा कॅप्टन गिनयूलाच माहीती असणार.
अभिजीत: पण मग याचा अर्थ आपण हा दरवाजा कधीच नाही उघडू शकत?
प्रोफेसर: उघडू शकतो. हे बघ कितीही झालं तरी हा एक धातू आहे आणि धातूला वितळवल जाऊ शकत. जर आपण या धातूला वितळवता येईल इतकी एनर्जी गोळा करण्यात यशस्वी ठरलो तर आपलं काम होऊ शकत.
अचानक अभिजीत ओरडला,
"ओह शीट्, माझ्या डोक्यात हा विचार कसा आला नाही?"
प्रोफेसर: काय झालं? कसला विचार?
अभिजीत: अहो प्रोफेसर, सोलर पॅनल.
प्रोफेसर: सोलर पॅनल?
अभिजीत: हो. या 3 डायमेन्शनल पॉकेट मध्ये एक बाविसाव्या शतकातील सोलर पॅनल आहे. त्यात आपण सुर्याची एनर्जी स्टोअर करून केव्हाही आणि कुठेही त्या एनर्जीला रिलीज करू शकतो.
प्रोफेसर: पण त्यात या धातूला वितळवता येईल इतकी एनर्जी स्टोअर होऊ शकते?
अभिजीत: आरामात.
प्रोफेसर: अरे मग वाट कसली बघतोय. कर लवकर काम सुरू.
अभिजीत: हो.
असं म्हणून अभिजीतने पॉकेट मध्ये हात घातला आणि त्यातुन एक मोठ चौकोनी सोलर पॅनल बाहेर काढल. ते इतर सोलर पॅनल सारखंच होत. फक्त त्याच्या वरच्या बाजूला कोपऱ्यात एक स्क्रीन होती. त्या स्क्रीनच्या वरती लाल आणि हिरव्या रंगाचे दोन बटनं होते. अभिजीत ते सोलर पॅनल घेऊन चेंबर मधून बाहेर पडला. झपाझप पावले टाकत नकाशाच्या मदतीने तो त्या पिरॅमिडच्या बाहेर येऊन उभा राहिला. आकाशात सुर्य चांगलाच तळपत होता. अभिजीतने ते सोलर पॅनल खाली जमिनीवर ठेवल आणि त्याच्या वरच लाल बटन दाबले. बटन दाबताच जिथे ब्लॅंक स्क्रीन होती. तिथे अचानक लाल रंग दिसु लागला. एनर्जी स्टोअर होत होती.
अर्ध्या तासाने जिथे लाल स्क्रीन होती तिथे हिरवा रंग दिसु लागला.याचा अर्थ एनर्जी स्टोअरींग पूर्ण झालं होतं. अभिजीतने ते सोलर पॅनल उचललं आणि झपाझप पावले टाकत सरळ त्या चेंबर मध्ये येऊन पोहोचला. प्रोफेसर त्याची वाटच पाहत होते. अभिजीतने ते सोलर पॅनल दरवाज्या समोर ठेवलं आणि म्हणाला,
"प्रोफेसर, आपल्याला बाहेर थांबावं लागेल कारण यातून बाहेर पडणारी एनर्जी खुपच दाहक आहे. तेव्हा आपण इथे न उभं राहीलेलच बरं."
असं म्हणून अभिजीतने सोलर पॅनल वरील हिरवं बटन दाबले आणि प्रोफेसरांसोबत तो चेंबरच्या बाहेर येऊन उभा राहिला. सोलर पॅनल मधून मोठ्या प्रमाणात एनर्जी रिलीज होत होती. काही क्षणातच संपूर्ण चेंबर प्रकाशाने भरून गेलं होतं. ती एनर्जी इतकी दाहक होती कि त्याची झळ चेंबरच्या बाहेर येत होती. असं वाटत होतं कि साक्षात आकाशातील सुर्य त्या चेंबर मध्ये अवतरला होता. बराच वेळानंतर चेंबर मधील प्रकाश हळूहळू कमी होऊ लागला होता. काही वेळातच तो प्रकाश पूर्णपणे नाहीसा झाला. अभिजीत आणि प्रोफेसर आत आले. सोलर पॅनल पुर्ववत झाल होत. त्याची हिरवी स्क्रीन पुन्हा ब्लॅंक झाली होती. अभिजीतने त्या बंद दरवाज्यावर नजर टाकली आणि आनंदाने जल्लोष केला. त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला होता. तो दरवाजा पुर्णपणे वितळून आत जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला होता. अभिजीतने ते सोलर पॅनल पॉकेट मध्ये टाकलं आणि आत प्रवेश केला. त्याच्या पाठोपाठ प्रोफेसरांनीही आत प्रवेश केला. ते एक गुप्त चेंबर होतं. समोरच एक भलीमोठी पेटी त्यांना दिसली. ती पेटी सोडली तर बाकी त्या चेंबर मध्ये काहीच नव्हते. अभिजीत पेटी जवळ आला. ती पेटी लोखंडाची होती. तिला लोखंडाच कुलूप होतं. पण त्या कुलूपाची चावी त्यांच्या समोरच पेटीच्या वरती ठेवली होती. अभिजीतने प्रोफेसरांकडे एक नजर टाकली. प्रोफेसरांनी त्याला नजरेने खूण केली. अभिजीतने पेटी वरील चावी उचलून कुलूपात घुसवली. कुलूप उघडले गेले होते. अभिजीतने पेटीची कडी काढली. त्याने पेटीच झाकण उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते झाकण इतकं जड होत, कि एकट्या कडून उघडलं जात नव्हत. प्रोफेसर मदतीसाठी पुढे झाले. दोघांनाही आपल्या पूर्ण ताकदीने जोर लावला. अखेरीस झाकण उघडले गेले आणि मोठा आवाज करत मागे कलंडले. त्या पेटीत तीन-चार चर्मपत्रांच्या गुंडाळ्या होत्या. सोबतच एक छोटी पेटी सुध्दा होती. अभिजीतने एक गुंडाळी उचलली आणि तिला उघडली. समोरच मोठ्या अक्षरात लिहिलेले होते,
'डेड सी स्क्रॉल्स'
प्रकरण १८
...... अखेरीस शोध संपला होता. डेड सी स्क्रॉल्स त्यांच्या हातात होतं. अभिजीतचा आनंद तर गगनात मावत नव्हता.
"येस, आपण जिंकलो प्रोफेसर. शेवटी डेड सी स्क्रॉल्स आपल्या हातात आलच."
अभिजीत आनंदाने उड्या मारत म्हणाला.
"पण मी अजुन आनंद साजरा करणार नाही. अभिजीत, ही तर फक्त सुरूवात आहे. पुढे आपल्यासमोर काय येईल सांगता येत नाही. तेव्हा जोवर कॅप्टन गिनयू जिवंत आहे, तोवर तरी आपण जिंकलेलो नाही."
प्रोफेसर गंभीर होऊन म्हणाले.
प्रोफेसरांच बोलणं ऐकून अभिजीत म्हणाला,
"हो प्रोफेसर, तुम्ही बरोबर बोलत आहात. पण आता हे आपल्या हातात आलं, म्हणजे कॅप्टन गिनयूचा सामना करणं आपल्यासाठी सोपं झालं आहे."
प्रोफेसर: आधी या चर्मपत्रांमध्ये काय लिहिलं आहे ते वाच. बघु तरी त्यात नेमकं आहे तरी काय?
अभिजीतने पहील्या चर्मपत्राची गुंडाळी उघडली. त्यात सर्वात वरती मोठ्या अक्षरात डेड सी स्क्रॉल्स लिहिले होते. त्याच्या खाली ४-५ ओळींचा मजकूर लिहिला होता:
'पृथ्वीवरील ती सात ठिकाणे निवडली गेली आहेत. सगळ्या पृथ्वीवासियांसाठी ती ठिकाणे म्हणजे एक रहस्य बनून राहतील. मोठमोठे शास्त्रज्ञ सुध्दा त्यांचा उलगडा करू शकणार नाहीत. तीच सात ठिकाणे पृथ्वीच्या विनाशाच कारण बनतील.'
हा मजकूर वाचून काही क्षण प्रोफेसर आणि अभिजीत एक-दुसऱ्याच्या तोंडाकडे बघत राहीले. काही वेळानंतर प्रोफेसर म्हणाले,
"अजुन काय लिहिलं आहे त्यात?"
अभिजीत: पुढे काहीच नाही. एवढंच लिहिलं आहे त्यात. हे नेमक लिहिलं कोणी आहे त्याचही नाव नाहीये यात.
प्रोफेसर: अभिजीत, तुला आठवतंय? अॅंड्र्यूने सुध्दा याच गोष्टीचा उल्लेख केला होता. जेव्हा आपण पहिल्यांदा कॅप्टन गिनयूला बघितलं होतं?
अभिजीत: हो, मला चांगलंच आठवतंय. अॅंड्र्यू म्हणाला होता कि या लोकांनी सात ठिकाणी विनाशक गोष्टी लपवून ठेवल्या आहेत आणि आपल्याला त्या सातही गोष्टी नष्ट कराव्या लागतील. पण या स्क्रॉल मध्ये ती सात ठिकाणे कोणती आहेत, कुठे आहेत याबद्दल काहीच सांगितलं नाहीये.
प्रोफेसर: त्या सात ठिकाणांपैकी पहिल ठिकाण हे पिरॅमिड आहे. या पिरॅमिड मध्येच कुठेतरी ती पहिली विनाशक गोष्ट लपवून ठेवली आहे. पण कुठे? याच उत्तर कदाचित आपल्याला बाकीच्या स्क्रॉल्स मधून मिळेल. ते दुसरं स्क्रॉल उचल.
अभिजीतने दुसरं चर्मपत्र उचललं. त्यात सुध्दा पहिल्या सारखाच ३-४ ओळींचा मजकूर लिहिला होता,
'जेव्हा तीनही पिरॅमिड्स मधून विजेची शक्ती प्रवाहीत होईल, तेव्हा त्यांना ताकद मिळेल आणि ते आपलं काम करण्यास सिद्ध होतील. यालाच आपण पॉवर थिअरी नाव दिले आहे.'
या मजकुराचा अर्थ दोघांनाही उमजत नव्हता. काही वेळ विचार केल्यावर अचानक प्रोफेसरांच्या डोक्यात प्रकाश पडला. ते ओरडले,
"डॅम इट्, मला हे पहिले का नाही सुचलं?"
"काय झालं प्रोफेसर? काय नाही सुचलं तुम्हाला?"
त्यांच्या ओरडण्यामुळे दचकलेल्या अभिजीतने विचारलं,
प्रोफेसर: लाईमस्टोन अभिजीत, लाईमस्टोन.
अभिजीत: लाईमस्टोन? त्याच काय?
प्रोफेसर: लाईमस्टोन इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रीसिटी. जसं लोखंड किंवा ॲल्युमिनियम विजेला वाहून नेऊ शकत तसंच चुनखडीच्या दगडात सुध्दा वीज वाहून नेण्याची क्षमता आहे.
अभिजीत: म्हणूनच त्यांनी याला पॉवर थिअरी नाव दिले आहे.
प्रोफेसर: पुढचं स्क्रॉल घे.
जसजस एक एक रहस्य उलगडत जात होतं, तसतसं त्या दोघांच्याही आश्चर्याला पारावार उरत नव्हता, त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल, अश्या गोष्टी त्यांच्या समोर येत होत्या.
अभिजीतने तिसरं चर्मपत्र उलगडले,
'जेव्हा तीन ओरियन तारे एका सरळ रेषेत येतील, ती पृथ्वीच्या अंताची सुरूवात असेल. पृथ्वीवर एका नवीन वर्चस्वाची सुरूवात असेल.'
प्रोफेसर: जेव्हा तीन ओरियन तारे एका सरळ रेषेत येतील... ओके, मला वाटतं हा मजकूर त्या तीन ओरियन स्टार्स कडे इशारा करतोय, ज्याचा उल्लेख प्राचीन ईजिप्शियन संस्कृतीत आढळतो.
अभिजीत: मी काही समजलो नाही, प्रोफेसर.
प्रोफेसर: प्राचीन ईजिप्शियन संस्कृतीत आकाशात तीन ओरियन तारकांचा समूह दिसतो. त्याला द ओरियन कॉरेलेशन थिअरी म्हणतात. हा तारका समूह दर १०,००० वर्षांनी दिसतो. असं म्हणतात कि खुफू, खाफ्रे आणि मेनकाऊरे हे तीन पिरॅमिड्स आणि या तारकासमूहाचा परस्पर संबंध आहे. हे पिरॅमिड्स त्या तारकासमूहाच्या सरळ रेषेत बांधले गेले आहेत.
अभिजीतने चौथ आणि शेवटचं चर्मपत्र उघडलं,
'ज्याच अर्ध शरीर मानवाचं आणि अर्ध शरीर प्राण्याच आहे अश्या त्या वास्तूत ज्या ठिकाणी प्राचीन देवतेचे तुकडे लपवले होते, तिथेच पृथ्वीच्या विनाशाचा पहिला हिस्सा तयार झाला आहे.'
प्रोफेसर: ज्या ठिकाणी प्राचीन देवतेचे तुकडे लपवले होते.... ओह नो! आय डोन्ट बिलिव्ह धिस! पण असं कसं होऊ शकत!? सिक्रेट चेंबर ऑफ ओसायरिस खरच आहे?!
अभिजीत: तुम्हाला म्हणायचं काय आहे, प्रोफेसर?
प्रोफेसर: अभिजीत, प्राचीन ईजिप्शियन लोक ओसायरिस नावाच्या एका देवतेची पूजा करायचे. प्राचीन दंतकथेनुसार खूप वर्षांपूर्वी ओसायरिस नावाचा एक प्राचीन ईजिप्शियन लोकांचा देव होता. लोक त्याची पूजा करायचे. त्याला देवाचा दर्जा देण, हे त्याचा सख्खा भाऊ सेठ याला आवडलं नाही. म्हणून त्याने ओसायरिसच्या शरीराचे १६ तुकडे करून त्याची हत्या केली! ओसायरिसची सख्खी बहिण आयसिस जी नंतर त्याची पत्नी बनली होती. तिने ओसायरिसच्या शरीराचे १६ तुकडे एका चेंबर मध्ये लपवून ठेवले. त्यालाच द सिक्रेट चेंबर ऑफ ओसायरिस म्हणतात! ओसायरिसचा मुलगा होरस याने नंतर सेठला ठार मारून आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतला.
अभिजीत: पण ओसायरिसच्या पत्नीने त्याच्या शरीराचे तुकडे लपवून का ठेवले?
प्रोफेसर: कारण असे केल्याने ओसायरिसचा पुनर्जन्म होऊन तो परत येईल अशी त्यांची धारणा होती! पण मला हे समजत नाही, ज्याच अर्ध शरीर मानवाचं आणि अर्ध शरीर प्राण्याच आहे अशी कोणती वास्तू आहे?
काही वेळ विचार केल्यावर अचानक अभिजीतच्या डोक्यात प्रकाश पडला.
"स्फिंक्स!"
प्रोफेसर: काय?
अभिजीत: द ग्रेट स्फिंक्स! ज्याचं अर्ध शरीर मानवाचं आणि अर्ध शरीर प्राण्याच आहे.
प्रोफेसर: बरोबर, आणि त्या ग्रेट स्फिंक्स मध्येच सिक्रेट चेंबर ऑफ ओसायरिस आहे.
अचानक प्रोफेसरांच लक्ष त्या छोट्या पेटी कडे गेले.
प्रोफेसर: त्या छोट्या पेटीत काय आहे?
अभिजीतने ती छोटी पेटी उघडली. तिच्यात एक छोटी चर्मपत्राची गुंडाळी होती. अभिजीतने ते चर्मपत्र उघडलं. त्यात चित्रविचित्र आकार काढले होते.
एक मोठा वर्तुळ होता. त्याच्या चारही बाजूंना वक्ररेषा होत्या. त्यासोबतच काही अनाकलनीय आकार होते. असं वाटत होतं कि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती होत्या. अभिजीत आणि प्रोफेसर दोघांनाही त्यातून काहीही निष्कर्ष काढता येत नव्हता.
प्रोफेसर: ही एखादी कोड लॅंग्वेज असावी असे वाटते. या चित्रविचित्र आकारांचा नक्कीच काहीतरी अर्थ असावा. या कोड लॅंग्वेजला ब्रेक करायला आपल्याला वेळ लागेल. पण आपली प्रायोरिटी ते सिक्रेट चेंबर ऑफ ओसायरिस शोधणं आहे. तेव्हा आता तु हे सगळे स्क्रॉल्स 3 डायमेन्शनल पॉकेट मध्ये ठेव. आपल्याला आताच ग्रेट स्फिंक्स मध्ये जाऊन आपलं शोधकार्य चालू कराव लागेल.
अभिजीत: तुम्ही बरोबर बोलताय, प्रोफेसर.
असं म्हणून अभिजीतने ते सगळे स्क्रॉल्स पॉकेट मध्ये टाकले आणि प्रोफेसरांसोबत तो चेंबर मधून बाहेर पडला. पण चेंबर मधून बाहेर पडल्याबरोबर अचानक ते थांबले. त्यांना चारही बाजूंना ईजिप्शियन सैनिकांचा वेढा पडला होता. ते दोघेही चारी बाजूंनी घेरले गेले होते.
"तर इथे आहात तुम्ही दोघे?"
वजीर होरेमहेब त्या दोघांच्या समोर येऊन उभा ठाकला.
"चला, महान फैरो तुमची वाट पाहत आहेत."
असं म्हणून वजीर होरेमहेब पुढे चालू लागला. त्याचे सैनिक अभिजीत आणि प्रोफेसरांना बंदी बनवून त्याच्या मागोमाग घेऊन जाऊ लागले.
प्रकरण १९
...... वजीर होरेमहेब आणि त्याच्या सैनिकांनी अभिजीत आणि प्रोफेसरांना बंदी बनवून पिरॅमिड ऑफ खुफू मधील किंग्स चेंबर मध्ये आणले होते. फैरो तुतनखामेन त्याच्या सिंहासनावर बसून त्या दोघांकडे निरखून बघत होता. त्या दोघांचेही हात पाय साखळदंडाने पक्के बांधलेले होते. अखेरीस तुतनखामेनने आपले मौन सोडले,
"कोण आहात तुम्ही? आणि तुम्ही माझ्या राज्यात माझी परवानगी न घेता का आलात?"
तुतनखामेनचा हा प्रश्न ऐकून अभिजीत आणि प्रोफेसर दोघांनाही जरा धीर आला, कारण त्यांना वाटलं होतं कि त्यांना सरळ मृत्युदंडच मिळतो कि काय? पण तुतनखामेनने त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती. तुतनखामेनच्या प्रश्नाला प्रोफेसरांनी निर्भय पणे उत्तर दिले,
"माझ नाव प्रोफेसर विश्वंभर भारद्वाज आणि हा माझा शिष्य अभिजीत कुलकर्णी. आम्ही वैज्ञानिक आहोत आणि आम्ही भविष्यातून २०१९ सालातून आलो आहोत?"
तुतनखामेन: आणि तुमचं इथे यायचं कारण?
प्रोफेसरांनी टाईम मशीन बनल्यापासून आतापर्यंतच्या सर्व घटनांची इत्थंभूत माहीती तुतनखामेनला दिली. आणि शेवटी,
"महान फैरो, माझ्यावर विश्वास ठेवा. कॅप्टन गिनयू हा खूप मोठा धोकेबाज आहे. तुमचा वापर करून तो या पृथ्वीवर राज्य करण्याचे स्वप्न बघतो आहे. अजुनही वेळ गेलेली नाही. तुम्ही त्याला कैद करून त्याच्या कडून सर्व माहिती काढून घ्या. नाहीतर या पृथ्वीला भयंकर विनाशाला सामोरं जावं लागेल. तो सर्व माणसांना आपला गुलाम बनवेल."
एवढं बोलून प्रोफेसरांनी आपलं बोलणं संपवलं. काही क्षणांकरीता संपूर्ण चेंबर मध्ये स्मशानशांतता पसरली होती. प्रोफेसरांकडून ही धक्कादायक माहिती ऐकून तुतनखामेन तर एकदम स्तब्ध होऊन गेला होता. काही वेळातच स्वत:ला सावरून तो म्हणाला,
"तुम्ही हे जे काही सांगितलं, त्याचा पुरावा आहे तुमच्याकडे?"
प्रोफेसर: आहे, अभिजीत, महान फैरोंना ते डेड सी स्क्रॉल्स दाखव.
अभिजीतने क्षणाचाही उशीर न करता पॉकेट मधून डेड सी स्क्रॉल्स काढून ते वजीर होरेमहेब जवळ दिले. वजीर होरेमहेबने ते तुतनखामेनच्या सुपूर्द केले. तुतनखामेनने ते सर्व स्क्रॉल्स वाचून काढले. प्रत्येक स्क्रॉल वाचतांना त्याच्या भुवया उंचावत होत्या. त्याच्या चेहऱ्यावरील भाव भराभर बदलत होते.
प्रोफेसर: महान फैरो, आतातरी तुम्हाला विश्वास बसला ना आमच्यावर?
तुतनखामेन: कॅप्टन गिनयूंनी मला याबद्दल काहीच का सांगितलं नाही?
प्रोफेसर: कसं सांगणार? हीच तर त्याची योजना होती आणि हे तर काहीच नाही. त्याने आणखी सहा ठिकाणी कोणतीतरी विनाशक वस्तू ठेवलेली आहे. त्यामुळे आता कृपा करून वेळ वाया घालवू नका, महान फैरो. कॅप्टन गिनयू जर इथून निघून गेला तर आपल्याला त्याची पुढची योजना कधीच माहीती पडणार नाही.
तुतनखामेन: वजीर होरेमहेब, आताच्या आता कॅप्टन गिनयूं कडे जा आणि त्यांना सांगा कि आम्ही त्यांना ताबडतोब इकडे बोलावलं आहे. जा.
वजीर होरेमहेब: जशी आपली आज्ञा, महान फैरो.
एवढं बोलून वजीर होरेमहेब किंग्स चेंबर मधून बाहेर पडला.
कॅप्टन गिनयू आपल्या स्पेसशिप मध्ये बसला होता. अचानक एका सैनिकाने येऊन त्याला वर्दी दिली,
"कॅप्टन, वजीर होरेमहेब तुम्हाला भेटायला आले आहेत."
कॅप्टन गिनयू: पाठवून दे त्याला.
"जशी आज्ञा." म्हणून तो सैनिक बाहेर गेला. आणि काही वेळातच वजीर होरेमहेब कॅप्टन गिनयू समोर येऊन उभा राहिला.
वजीर होरेमहेब: कॅप्टन गिनयूला वजीर होरेमहेबचा प्रणाम. महान फैरोंनी आपल्याला तातडीने बोलावणे धाडले आहे. तेव्हा कृपा करून आपण माझ्याबरोबर त्यांच्या कडे चलावे.
कॅप्टन गिनयू: महान फैरोंची आज्ञा आमच्या साठी शिरसावंद्य आहे. परंतु समस्या अशी आहे कि आम्ही आताच आमच्या ग्रहावर परत जाण्यास निघतो आहोत. कारण आमची तब्येत जरा खराब आहे. तेव्हा जर महान फैरो स्वत:च थोडी तसदी घेऊन इथवर आले तर त्यांची फार कृपा होईल.
हे उत्तर ऐकून वजीर होरेमहेबने काही क्षण कॅप्टन गिनयूच निरिक्षण केले आणि मग म्हणाला,
"ठिक आहे, तुमचा निरोप मी महान फैरोंना देतो."
इतकं बोलून तो तिथून निघाला आणि किंग्स चेंबर मध्ये आला. तुतनखामेन, अभिजीत आणि प्रोफेसर त्याची वाटच पहात होते. वजीर होरेमहेबने कॅप्टन गिनयूच उत्तर तुतनखामेनला सांगितले.
तुतनखामेन: ठिक आहे, आम्ही स्वत:च तिथे जातो. वजीर होरेमहेब, तुम्ही इथेच थांबा.
एवढं बोलून तो काही सैनिकांना सोबत घेऊन किंग्स चेंबर मधून बाहेर पडला.
तुतनखामेन आणि त्याचे सैनिक झपाझप पावले टाकत कॅप्टन गिनयूच्या समोर जाऊन उभे राहीले. तुतनखामेनला आलेलं पाहताच कॅप्टन गिनयूने उठून त्याचे स्वागत केले,
"या, महान फैरो या. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथवर आलात, याकरिता आपले खूप खूप आभार." आपल्या सैनिकांकडे वळून, "ए, जा रे, महान फैरोंसाठी आसनाची व्यवस्था करा."
तुतनखामेन: त्याची काही एक गरज नाही. कॅप्टन गिनयू, आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आमच्यापासून काही लपवलं आहे का?
कॅप्टन गिनयू: नाही महान फैरो, आम्ही तुमच्यापासून काही लपवलं नाही.
"तर मग हे काय आहे?"
असं म्हणून तुतनखामेनने डेड सी स्क्रॉल्स कॅप्टन गिनयूच्या समोर धरले.
कॅप्टन गिनयू: ओ, शेवटी तुम्हाला याबद्दल माहिती पडलच तर. हं, मानावं लागेल त्या अभिजीत आणि त्या म्हाताऱ्याला त्यांनी डेड सी स्क्रॉल्स शोधून काढलेच.
तुतनखामेन: माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या कॅप्टन गिनयू. आम्ही असंही ऐकलं आहे कि तुम्ही या पृथ्वीवर राज्य करून माणसांना गुलाम बनवणार आहात? कारण जर असं असेल तर तुम्हाला सर्वात आधी आमचा सामना करावा लागेल.
कॅप्टन गिनयू: ठिक आहे, ठिक आहे. शांत व्हा, महान फैरो. तुम्ही आमच्या बद्दल हे जे काही ऐकलं आहे ना ते सर्व खोटं..... नाहीये. खरं आहे ते. हाहाहाहा. तुम्हाला काय वाटलं या पिरॅमिड सारख्या मोठ्या रचना आम्ही कशासाठी बांधल्या? ही तर आमच्या या पृथ्वीवर राज्य करण्याच्या योजनेची सुरूवात आहे. पृथ्वीवरच नाही तर संपूर्ण ब्रम्हांडावर राज्य करायचं आहे मला.
तुतनखामेन: कॅप्टन गिनयू, याचा अर्थ तु इतके दिवस आमच्याशी खोट बोलत होतास? आम्हाला मुर्ख बनवत होतास दगाबाज? पण लक्षात ठेव, या पृथ्वीवर राज्य करण तर दूर, फक्त या इजिप्त वर राज्य करण्यासाठी तुला आम्हाला पार कराव लागेल.
यावर कॅप्टन गिनयू हसत म्हणाला,
"बस इतकंच. हे तर मी चुटकीसरशी करू शकतो..... महान फैरो."
असं म्हणून त्याने आपल्या सैनिकांना इशारा केला. बघता बघता तुतनखामेन आणि त्याच्या सैनिकांना कॅप्टन गिनयूच्या सैनिकांनी चारही बाजूंनी घेरून घेतलं. तुतनखामेन आणि त्याचे सैनिक सुध्दा तलवार, भाले, धनुष्यबाण हातात घेऊन लढाईसाठी तयार झाले होते......
प्रकरण २०
......फैरो तुतनखामेनला कॅप्टन गिनयू कडे जाऊन बराच वेळ झाला होता. अभिजीत, प्रोफेसर आणि वजीर होरेमहेब किंग्स चेंबर मध्ये बसले होते. अचानक तुतनखामेनचा एक सैनिक पळत पळत चेंबर मध्ये घुसला. त्याच्या अंगावर अनेक जखमा होत्या. तो सैनिक चेंबर मध्ये घुसताक्षणीच जमिनीवर कोसळला.
"काय झालं?" वजीर होरेमहेबने त्या सैनिका जवळ जात विचारलं, "कोणी केल हे सगळं? आणि महान फैरो कुठे आहेत?"
पण त्या सैनिकाचा जीव केव्हाच निघून गेला होता. प्रोफेसर आणि अभिजीतही तिथे आले.
"याला तर लेजर गनने मारलेल दिसतं आहे." अभिजीत त्या सैनिकाच्या जखमांच निरिक्षण करत म्हणाला.
अचानक जमिन हादरायला लागली, जणू काही भूकंप आला होता. पाठोपाठ एक मोठा आवाज झाला. पिरॅमिडच्या बाहेर काहीतरी घडत होतं.
प्रोफेसर: मला हे लक्षण चांगले दिसत नाही. वजीर होरेमहेब, मला वाटतं आपण शीघ्र तिथे चलायला हवं. तो कॅप्टन गिनयू मोठा धोकेबाज आहे. महान फैरोंचा जीवही धोक्यात असू शकतो.
वजीर होरेमहेबला सुध्दा प्रसंगाचे गांभीर्य समजले होते. आपल्या सर्व सैनिकांना सोबत घेऊन तो अभिजीत आणि प्रोफेसरांबरोबर किंग्स चेंबर मधून बाहेर पडला.
ते पिरॅमिड मधून बाहेर आले तेव्हा चारही बाजूला धुळच धूळ होती. काही वेळानंतर ती सर्व धूळ हळूहळू दूर झाली आणि त्या तिघांनाही समोर एक दृश्य दिसल. तुतनखामेनसोबत आलेले सर्व सैनिकांचे शव तिथे पडलेले होते आणि काही अंतरावरच त्यांना फैरो तुतनखामेनचा मृतदेहही आढळून आला. पण कॅप्टन गिनयूच स्पेसशिप मात्र कुठेच दिसत नव्हतं.
अभिजीत: प्रोफेसर.....
प्रोफेसर: हो, हे सगळं कॅप्टन गिनयूनेच केलं आहे आणि तो पळून गेला. तो मोठा आवाज त्याच्याच स्पेसशिपचा होता.
वजीर होरेमहेबला तर स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास होत नव्हता. तुतनखामेनच प्रेत त्याच्या समोर पडलं होतं. तो तिथेच जमिनीवर गुडघ्यावर बसला.
"हे सगळं माझ्यामुळे झालंय." वजीर होरेमहेब भरलेल्या गळ्याने म्हणाला, "मला सुरूवातीला कॅप्टन गिनयू वर संशय आला होता. पण मी दुर्लक्ष केल. जर मी व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर कदाचित महान फैरो....."
प्रोफेसर: वजीर होरेमहेब, जे झालं ते फार वाईट झालं. पण आता ही रडत बसण्याची वेळ नाही. आपल्याला कॅप्टन गिनयूला थांबवायला हवं. नाहीतर अजून कितीतरी जीव जातील. महान फैरोंच बलिदान व्यर्थ जायला नको. पण त्यासाठी तुम्हाला आमची मदत करावी लागेल.
वजीर होरेमहेब डोळे पुसत उठला,
"मी तुमची मदत करायला तयार आहे. महान फैरोंचा खूनी जिवंत रहायला नको. त्यासाठी वाटेल ते करायला मी तयार आहे. सांगा कसली मदत हवी."
प्रोफेसर: आम्हाला द ग्रेट स्फिंक्स मध्ये जायचं आहे.
वजीर होरेमहेब: माझ्या मागे या.
वजीर होरेमहेबने काही निवडक सैनिकांना तुतनखामेनच शव राजवाड्यात सुरक्षित पोहोचवण्याचा आदेश दिला आणि उर्वरित सैनिकांसह द ग्रेट स्फिंक्सच्या दिशेने निघाला. प्रोफेसर आणि अभिजीत त्याच्या मागे निघाले.
********************
"वंडरफुल!"
हे उद्गार प्रोफेसरांच्या तोंडून नकळत बाहेर पडले, जेव्हा त्यांनी द ग्रेट स्फिंक्सला बघितलं, ज्याचं अर्ध शरीर मानवाचं आणि अर्ध शरीर प्राण्याच होत. असं वाटत होतं कि पिरॅमिड्सची रक्षा करण्यासाठीच त्याला बनवलं गेलं होतं. ते ज्या काळातून आले होते, म्हणजे २०१९ मध्ये अश्याप्रकारची परिपूर्ण वास्तु बांधण म्हणजे महाकठीण काम होत. इच्छा नसतानाही प्रोफेसरांना कॅप्टन गिनयू आणि त्याच्या प्रगतीशील संस्कृतीची स्तुती करावीच लागली. स्फिंक्स हा खुफू, खाफ्रे आणि मेनकाऊरे या तिन्ही पिरॅमिडच्या आधीच बनला होता.
अभिजीत: प्रोफेसर, याला स्फिंक्स का म्हणतात?
प्रोफेसर: ग्रीक संस्कृतीत एका प्राचीन स्फिंक्स नावाच्या काल्पनिक प्राण्याचा उल्लेख आहे, ज्याच अर्ध शरीर मानवाचं आणि अर्ध शरीर सिंहाच आहे. या वास्तूला त्याच प्राण्याच्या रूपात बनवलं गेलं आहे, त्यामुळे याला स्फिंक्स म्हणतात.
अचानक त्यांना वजीर होरेमहेबचा आवाज ऐकू आला. त्याने स्फिंक्सचा दरवाजा उघडला होता, जो बिलकूल स्फिंक्सच्या पायाशी होता. सर्वप्रथम वजीर होरेमहेब, नंतर प्रोफेसर आणि अभिजीत, मग इतर सैनिक स्फिंक्सच्या आत शिरले.
ते सगळे ज्याच्या आत शिरले होते, ते एक छोटंसं चेंबर होतं. त्यात विशेष असे काहीच दिसत नव्हतं. प्रोफेसरांनी चारही बाजूंना नजर फिरवली आणि अचानक त्यांची नजर एका जागेवर खिळली. त्यांच्या समोर दहा-बारा पावलांच्या अंतरावर एक दरवाजा होता. त्याला भलंमोठं लोखंडी कुलूप लावले होते. त्यांनी वजीर होरेमहेबला विचारले,
"तो दरवाजा तुम्ही उघडू शकता का?"
वजीर होरेमहेब: हो, नक्कीच. पण त्या खोलीत विशेष असं काहीच नाहीये. फक्त आमच्या मागच्या फैरोंच्या ५-६ कबरी आहेत. बस.
प्रोफेसर: तरीही मला एकदा तिथे जाऊन बघायचय.
वजीर होरेमहेबने आपल्या एका सैनिकाला त्या कुलूपाची चावी आणण्याचा आदेश दिला. काही वेळातच तो चावी घेऊन हजर झाला होता. वजीर होरेमहेबने आपल्या हाताने ते कुलूप उघडले आणि दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर खूप सारी धूळ उडाली. कदाचित कित्येक दिवसांपासून तो दरवाजा असाच बंद होता. प्रोफेसर, अभिजीत, वजीर होरेमहेब आणि त्याच्या सैनिकांनी चेंबर मध्ये प्रवेश केला. वजीर होरेमहेबने म्हटल्याप्रमाणे तिथे कबरीच होत्या. प्रोफेसरांनी संपूर्ण चेंबर फिरून तपासणी केली. मात्र त्यांना थडग्यांशिवाय तिथे काहीच दिसल नाही. प्रोफेसरांनी काही वेळ विचार केला आणि अचानक त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली.
प्रोफेसर: वजीर होरेमहेब, जर तुमची आज्ञा असेल तर मी हे थडगे उघडून पाहू शकतो का?
वजीर होरेमहेबने चमकून प्रोफेसरांकडे पाहीलं. त्याच्या चेहऱ्यावरून समजत होत कि प्रोफेसरांची मागणी ऐकून त्याला आश्र्चर्य वाटल होत. अभिजीतही प्रोफेसरांच्या ह्या मागणीचा अर्थ समजू शकला नव्हता. पण प्रोफेसर विनाकारण काहीही करत नाहीत, हे माहीत असल्याने तो शांत बसला.
वजीर होरेमहेब: या राज्याच्या नियमानुसार कोणत्याही बाहेरील व्यक्तीला फैरोचे थडगे उघडून पाहण्याचा अधिकार नाही.
प्रोफेसर: मी जाणतो. परंतु मला एक संशय आलेला आहे आणि जर तो खरा असला तर कदाचित आपण ज्याच्या शोधात आहोत ते आपल्याला मिळेल. कृपया एकदाच याची परवानगी द्या.
वजीर होरेमहेबने काही वेळ विचार केला आणि म्हणाला,
"ठिक आहे."
असं म्हणून त्याने आपल्या सैनिकांना ते थडगे उघडण्याचा आदेश दिला. आदेशाचे पालन केले गेले. पहिल थडगे उघडले. त्यात एक ममी होती. प्रोफेसरांनी पुढच्या थडग्याकडे इशारा केला. पहिल थडगे जसे होते तसे परत बंद करून सैनिकांनी दुसरे थडगे उघडले. असं करत एकापाठोपाठ एक असे पाच थडगे उघडले गेले. पण त्या सर्वांमध्ये फक्त ममीच होत्या. आता शेवटचे थडगे बाकी राहिले होते. सैनिकांनी ते थडगही उघडलं. त्यात ममी नव्हती. खरं म्हणजे त्या थडग्यात इतका अंधार होता कि त्यात नेमकं काय आहे ते दिसत नव्हते.
प्रोफेसर: अभिजीत, टॉर्च काढ.
अभिजीतने पॉकेट मधून टॉर्च काढून प्रोफेसरांजवळ दिली. प्रोफेसरांनी टॉर्चचा प्रकाशझोत थडग्याच्या आत टाकला. त्यांना थडग्यात खाली उतरणाऱ्या पायऱ्या दिसल्या. ते तिथे उपस्थित सगळेच आश्र्चर्यचकित झाले. वजीर होरेमहेबला तर या पायऱ्यांविषयी काहीच कल्पना नव्हती.
प्रोफेसर: मला पूर्ण विश्वास आहे कि आपण ज्या गोष्टीच्या शोधात आहोत ती आपल्याला इथेच मिळेल.
अभिजीत: पण प्रोफेसर, खाली नेमकं काय आहे, याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नाही. असं एकदम खाली जाण धोक्याच असू शकत.
प्रोफेसर: ते काहीही असो. पण खाली आपल्याला जावच लागेल.
वजीर होरेमहेबने पटापट आपल्या सैनिकांना मशाली पेटवण्याची आज्ञा दिली. मशाली तयार झाल्यानंतर काही सशस्त्र सैनिकांना पुढे पाठवण्यात आले. त्यांच्या मागे अभिजीत, प्रोफेसर, वजीर होरेमहेब आणि बाकी उर्वरित सैनिक अश्या क्रमाने त्या थडग्यात उतरले.
*********************
त्या पायऱ्या उतरत उतरत त्यांना बराच वेळ लागला. अखेरीस पायऱ्या संपल्या आणि ते एका चेंबर मध्ये येऊन पोहोचले.
"हूश्श. १५ पायऱ्या होत्या."
प्रोफेसर चेंबर मध्ये येत म्हणाले. अभिजीत त्यांच्या अगोदर तिथे येऊन उभा राहिला होता आणि डोळे फाडून समोर बघत होता. प्रोफेसरांनी सुध्दा त्या दिशेने पाहिले जिकडे तो बघत होता आणि त्यांचीही तीच अवस्था झाली. कारण ते ज्या चेंबर मध्ये ते उभे होते ते साधंसुधं चेंबर नव्हतं. ती एक लॅबोरेटरी होती. आर्टीफिशियल इंटेलिजन्सने सुसज्जित एक प्रयोगशाळा. चारही बाजूंना सुपर कॉम्युटर्स होते. त्यांच्या माध्यमातून अनेक रोबोट्सना कंट्रोल केलं जात होतं. जितके रोबोट्स तिथे पूर्णपणे तयार झाले होते, ते त्यांच्या सारखेच इतर रोबोट्स तयार करत होते. ती एक छोटी सायन्स सिटी होती असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. वजीर होरेमहेब सुध्दा तिथे येऊन पोहोचला आणि समोरच दृश्य बघून दंग राहून गेला.
"हे सगळं काय आहे?"
वजीर होरेमहेब भयभीत होऊन म्हणाला. त्याने अशाप्रकारची जागा आपल्या जीवनात कधीच पाहिली नव्हती. त्याच्या ह्या प्रश्नाने प्रोफेसर भानावर आले. तेही भयभीत नजरेने ते सगळं पाहत होते. पण त्यांच्या भयाच कारण वेगळं होतं.
प्रोफेसर: हीच ती गोष्ट आहे जिचा वापर कॅप्टन गिनयू या पृथ्वीच्या विनाशासाठी करणार आहे.
अभिजीत: याचा अर्थ याच आर्टीफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तो पृथ्वीचा विध्वंस करणार आहे.
वजीर होरेमहेबला त्यांच बोलणं एवढं समजलं नाही, मात्र त्याला एक कळलं होतं, कि हे जे काही आहे ते धोकादायक आहे. त्याचबरोबर आपल्या राज्यात परवानगी विना अशी काहीतरी विचित्र गोष्ट बनवणाऱ्या कॅप्टन गिनयूचा त्याला रागही आला होता. त्याने ताबडतोब आपल्या सैनिकांना त्या यंत्रमानवांवर आक्रमण करण्याचा आदेश दिला. हे सगळं एवढ्या जलद घडलं कि प्रोफेसरांना त्याला थांबवण्याची संधी मिळाली नाही. आदेश मिळताच सैनिक आपल्या शस्त्रांसहित रोबोट्सवर धाऊन गेले. रोबोट्सला जोडलेल्या सुपर कॉम्प्युटर्सने त्यांना धोक्याचा इशारा दिला. त्या यंत्रमानवांनी सुध्दा आपले शस्त्र काढले. त्यांच्या कडे गन्स, रॉकेट लॉंचर्स तसेच अनेक आधुनिक शस्त्र होते, ज्यांच्यासमोर वजीर होरेमहेबच्या सैनिकांचे जुन्या काळातील भाले, तलवारी, धनुष्यबाण हे कुठेच लागत नव्हते. या जुन्या शस्त्रांचा यंत्रमानवांच्या मशिनी शरीरावर काहीच परिणाम होणार नव्हता. बघता बघता यंत्रमानवांच्या शस्त्रांनी वजीर होरेमहेबच्या अर्ध्या सैनिकांचा सफाया करून टाकला होता. त्या चेंबरला एका रणभूमीचे स्वरूप आले होते.
प्रोफेसर: वजीर होरेमहेब, तुम्ही असा आदेश नव्हता द्यायला पाहिजे. आपले सैनिक त्यांचा मुकाबला करू शकणार नाहीत. बघा, काही क्षणांतच आपले अर्धे सैनिक धारातिर्थी पडले आहेत.
वजीर होरेमहेब: मग आता आपण काय करायला हवं.
प्रोफेसर: सर्वात आधी तुम्ही आपल्या उर्वरित सैनिकांना सोबत घेऊन या खोलीतून बाहेर जा.
वजीर होरेमहेब: आणि तुम्ही....
प्रोफेसर: वजीर होरेमहेब, आम्ही वैज्ञानिक आहोत. या यंत्रमानवांना कसं सांभाळायच ते आम्हाला चांगल माहीत आहे. तुम्ही ताबडतोब येथून बाहेर जा.
वजीर होरेमहेबने आपल्या उर्वरित सैनिकांना मागे फिरण्याचा आदेश दिला. ते सगळेजण त्या चेंबर मधून बाहेर पडले. आता तिथे फक्त प्रोफेसर आणि अभिजीतच उरले होते.
अभिजीत: प्रोफेसर, तुमच्या डोक्यात आहे तरी काय?
प्रोफेसर: हे सगळे रोबोट्स आर्टीफिशियल इंटेलिजन्स वर चालतात. हे सुपर कॉम्प्युटर्स त्यांना कंट्रोल करतात. याचाच अर्थ या कॉम्प्युटर्स मध्ये सेल्फ डिस्ट्रक्ट प्रोग्रॅम असेलच. तो प्रोग्राम ॲक्टीवेट करावा लागेल.
अभिजीत: पण याला तर वेळ लागेल.
प्रोफेसर: हो, आणि म्हणून तोपर्यंत तुला यांना सांभाळावे लागेल.
अभिजीत: काय? पण प्रोफेसर मी एकटा?
प्रोफेसर: दुसरा काही उपाय नाहीये. जर आपण सेल्फ डिस्ट्रक्ट प्रोग्रॅम ॲक्टीवेट करण्यात सफल राहीलो तर हे एका क्षणात नष्ट होईल. आणि मला माहीत आहे कि तु हे करू शकतोस.
अभिजीत: किती वेळ लागेल?
प्रोफेसर: सांगू शकत नाही. काम झाल्यावर मी सांगेलच तुला.
असं म्हणून क्षणाचाही विलंब न करता प्रोफेसर लपत छपत सुपर कॉम्युटर्सच्या सर्व्हर जवळ पोहोचले. इकडे त्या यंत्रमानवांच लक्ष आता अभिजीत कडे वळले होते. अभिजीतने पॉकेट मधून शॉक गन आणि लेजर गन काढली आणि त्या यंत्रमानवांचा सामना करण्यास तयार झाला होता.
त्या यंत्रमानवांजवळ अत्यंत आधुनिक शस्त्रसामग्री होती. समोरासमोरच्या लढाईत कोणाचाही त्यांच्यासमोर टिकाव लागण जवळपास अशक्य होते. म्हणून अभिजीत त्यांच्या समोर येत नव्हता. काही वेळातच त्याच्या शॉक गन आणि लेजर गनने त्याने ५ यंत्रमानवांना निकामी करून टाकले होते. पण एवढ्या सगळ्या यंत्रमानवांना तो मात देऊ शकत नव्हता. इकडे प्रोफेसर सर्व्हरवर सेल्फ डिस्ट्रक्ट प्रोग्रॅम ॲक्टीवेट करण्याचा प्रयत्न करत होते.
अभिजीत: प्रोफेसर, अजुन किती वेळ?
प्रोफेसर: बस अजुन काही मिनिटे धीर धर. मी त्याच्या एकदम जवळ पोहोचलोय.
अचानक एका यंत्रमानवाने अभिजीतच लक्ष चुकवून आपल्या हातातील गनचा मारा त्याच्यावर केला. अभिजीतने त्याच्या मारापासून वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र एक बुलेट त्याच्या डाव्या हातात घुसली. तो किंचाळत खाली पडला. त्याच्या हातातून भळाभळा रक्त वाहायला लागले होते. त्याने उठून बाजूला होण्याचा प्रयत्न केला. पण अजुन एक बुलेट त्याच्या डाव्या पायात घुसली. अभिजीतने कसं बसं स्वत:ला सावरलं. पण तो जखमी झाला होता. तो अजुन जास्त त्या यंत्रमानवांशी झुंज देऊ शकत नव्हता. अचानक प्रोफेसर ओरडले,
"येस, वी डिड इट"
पण त्यांच्या ओरडण्यामुळे यंत्रमानवांच लक्ष त्यांच्याकडे वळल.
प्रोफेसर: अभिजीत, मी प्रोग्रॅम ॲक्टीवेट करतोय. आताच्या आता या इथून बाहेर पड.
अभिजीत: पण प्रोफेसर, तुम्ही?
प्रोफेसर: माझी चिंता करू नकोस. हे सगळं नष्ट होण जास्त महत्त्वाचे आहे.
अभिजीत: मी तुम्हाला एकट सोडून जाणार नाही. प्रोफेसर.
"मुर्खपणा करू नकोस अभिजीत. आताच्या आता इथून बाहेर निघ. दिड मिनिटात इथे एक स्फोट होईल आणि इथल सगळं नष्ट होईल." प्रोफेसर गरजले.
आता अभिजीत कडे दुसरा पर्याय नव्हता. तो कसाबसा उठला आणि त्या चेंबर मधून बाहेर पडला. प्रोफेसरांनी ताबडतोब प्रोग्रॅम ॲक्टीवेट केला. कारण यंत्रमानवांनी आपला मोर्चा आता त्यांच्याकडे वळवला होता. दिड मिनिटाचे टायमर सुरू झाले होते.
इकडे अभिजीत थडग्यातून वर आला. त्याने एकदा थडग्यात नजर टाकली. पण प्रोफेसरांचा कुठेही मागमूस नव्हता. नाईलाजाने तो लंगडत लंगडत स्फिंक्सच्या चेंबर मधून बाहेर पडला. आणि एवढ्यात कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. जमीन हादरली. मात्र द ग्रेट स्फिंक्सच्या मुर्तीवर याचा काहीच विशेष परिणाम झाला नव्हता. फक्त मुर्तीच नाक तेवढं तुटलं होतं. अभिजीत सुन्न झाल्यासारखा तिथे बसुन राहिला. कारण प्रोफेसर बाहेर आले नव्हते आणि एवढा मोठा स्फोट झाल्यानंतर त्यांची बाहेर येण्याची शक्यताही नव्हती. स्फोटाचा आवाज ऐकून वजीर होरेमहेब तिथे धावत आला.
"काय झालं?" त्याने विचारले.
"प्रोफेसरांनी आपलं बलिदान दिले."
अभिजीत थरथरत्या आवाजात म्हणाला. त्याला पुढे बोललच जात नव्हत. इतक्यात एक हात त्याच्या खांद्यावर पडला. त्याने मागे वळून पाहिले. तिथे प्रोफेसर उभे होते.
"अरे हा विश्वंभर भारद्वाज इतक्या लवकर तुझा पिच्छा सोडणार नाही." प्रोफेसर बोलले.
त्यांच्या मुखावर चिरपरिचित हास्य होतं. त्याने प्रोफेसरांची गळाभेट घेतली. त्यानंतर वजीर होरेमहेब कडे वळून प्रोफेसर म्हणाले,
"आमचं इथलं काम झालंय. कॅप्टन गिनयूची सेना नष्ट झाली. कायमची. आता आम्हाला परत आमच्या काळात जायला हवं. तुम्ही आम्हाला जी मदत केली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार."
वजीर होरेमहेब: खरंतर आम्ही तुमचे आभार मानायला हवेत. जर तुम्ही नसतात तर त्या गिनयूच सत्य आम्हाला कधीच कळालं नसतं.
प्रोफेसर: ही तर आमच्या लढाईची सुरूवात आहे आणि ही लढाई तेव्हाच संपेल, जेव्हा कॅप्टन गिनयूचा अंत होईल. आता आपण आम्हाला आज्ञा द्यावी.
वजीर होरेमहेबने मान हलवली. प्रोफेसर अभिजीतला घेऊन तिथून निघाले. अभिजीतला वेदना होत होत्या. पण या वेदना त्या आनंदा पुढे काहीच नव्हत्या. ते पहिली लढाई जिंकले होते. रात्र होत आली होती.
अभिजीत: प्रोफेसर, आता आपण काय करायचं? टाईम मशीनच नेमकं ठिकाण आपल्याला माहीत नाही. त्याला कसं शोधायचं?
प्रोफेसर: हं. माझ्याही डोक्यात तोच प्रश्न आहे. जर माझ्याकडे माझं घड्याळ असतं तर......
अचानक अभिजीत थांबला. त्याने आपल्या पॅंटच्या खिशातून एक घड्याळ काढलं.
"प्रोफेसर, हे तुमचंच घड्याळ आहे ना."
प्रोफेसरांनी त्या घड्याळाला हातात घेतलं. त्यांचे डोळे आनंदाने चमकत होते.
प्रोफेसर: हे तुला कुठे सापडलं.
अभिजीत: मी जेव्हा पहिल्यांदा इथे आलो तेव्हा तुमच्या शोधात असतांना मला रस्त्यावर सापडलं होतं. पण तुम्हाला द्यायचं विसरलो.
प्रोफेसर: जर हे घड्याळ तू मला पहिले दिलं असतं तर टाईम मशीन केव्हाची आपल्याला सापडली असती.
अभिजीत: कस काय?
प्रोफेसर: कारण या घड्याळाला मी टाईम मशीनशी कनेक्ट केलेलं आहे. याच्या मदतीने आपण टाईम मशीन पर्यंत पोहोचु शकतो.
अभिजीत: प्रोफेसर, तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली.
प्रोफेसर: अरे बाबा, तुला सांगायचं विसरलो मी.
अभिजीत: पण प्रोफेसर, पहिल ठिकाण आपण नष्ट केलं. पण बाकीच्या ठिकाणांची माहिती आपल्याला कशी मिळणार?
प्रोफेसर: तुला आठवत आपल्याला डेड सी स्क्रॉल्स बरोबर अजुन एक छोटं स्क्रॉल मिळालं होतं?
अभिजीत: हो.
प्रोफेसर: मला पूर्ण खात्री आहे कि त्याच स्क्रॉल मध्ये आपल्याला दुसऱ्या ठिकाणाचा क्लू मिळेल. फक्त आपल्याला त्या कोड लॅंग्वेजला ब्रेक कराव लागेल.
असं म्हणून प्रोफेसरांनी घड्याळावरील एक बटन दाबले. त्याक्षणी त्या घड्याळाच्या स्क्रिनवर एक बाण दिसायला लागला.
"माझ्या मागे ये."
असं म्हणून प्रोफेसर त्या बाणाने दाखवलेल्या दिशेने चालू लागले. अभिजीत त्यांच्या मागे निघाला.
ते दोघेही बराच वेळ चालत होते. अचानक तो घड्याळ्याच्या स्क्रीनवरील बाण गायब झाला. प्रोफेसरांनी इकडे तिकडे नजर फिरवली आणि त्यांना डाव्या बाजूला टाईम मशीन दिसली. प्रोफेसर आणि अभिजीत तिच्याजवळ पोहोचले. मशीन त्याच अवस्थेत होती. ज्या अवस्थेत ते तिला सोडून गेले होते. टाईम मशीनची स्क्रीन पूर्ण ब्लॅंक होती.
"आपल्याला मशीनला रिसेट करावं लागेल."
असं म्हणून त्यांनी स्क्रिनच्या वरच्या बाजूला असलेल पिवळ बटन दाबले. एक बीप सारखा आवाज आला. टाईम मशीन रिसेट झाली होती. दोघेही टाईम मशीन मध्ये बसले. प्रोफेसरांनी पटापट स्क्रिनवर जंगलातील आपल्या लॅबच लोकेशन टाकलं. टाईम टाकला आणि तारीख आणि वर्ष टाकलं आणि गो च बटन दाबले. सर्वत्र निळा प्रकाश पसरला आणि आवाज करत टाईम मशीन गायब झाली.
********************
टाईम मशीन त्यांच्या त्या जंगलातील लॅब मध्ये प्रकट झाली होती. दोघेही टाईम मशीन मधून बाहेर आले. दोघेही खूप थकले होते. पण थकवा त्यांना जाणवत नव्हता. कारण एक रोमांचक ॲडव्हेंचर करून आले होते. त्यांच्या जीवनाला एक लक्ष्य मिळालं होतं.
"मला आता घरी जायला हवं, प्रोफेसर. मी निघतो." अभिजीत म्हणाला.
प्रोफेसर: थांब अभिजीत, तु जखमी आहेस. मला वाटतं तु आजची रात्र इथेच रहावस.
"नको प्रोफेसर, तुम्हाला अजुन बरेच काम असतील ना. या जखमांना मी सांभाळून घेईल." अभिजीत हसत म्हणाला.
प्रोफेसरांना त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला. ते 3 डायमेन्शनल पॉकेट कडे आले, जे अभिजीत तिथेच ठेऊन गेला होता. त्या पॉकेट मध्ये हात घालून त्यांनी ते छोटं स्क्रॉल काढलं, ज्यात अनाकलनीय आकृत्या होत्या. त्यांनी आपले मॅग्निफायर (भिंग) घेतल आणि त्या आकृत्यांच निरिक्षण करू लागले......
*********************
कॅप्टन गिनयू आपल्या स्पेसशिप मध्ये बसला होता. त्याची इजिप्त मधील आर्टीफिशियल इंटेलिजन्सची सिस्टीम नष्ट केल्याची आणि डेड सी स्क्रॉल्स त्यांच्या हाती लागल्याची बातमी त्याच्या पर्यंत पोहोचली होती. त्याला विश्वास होत नव्हता कि दोन तुच्छ मानवांनी त्याच्या एका फुलप्रूफ प्लॅनचे बारा वाजवले होते. आणि त्यात डेड सी स्क्रॉल्स त्यांच्या हाती लागले होते. म्हणजे त्यांना पुढील ठिकाणाची माहिती सुध्दा मिळू शकते. तसं ते कोड लॅंग्वेज मध्ये असल्याने त्यांना आता लगेच ते ब्रेक करता येणार नाही. पण त्याला रिस्क नव्हती घ्यायची.
"झेऊरला बोलावून आण. ताबडतोब." त्याने हुकूम सोडला.
एक सैनिक पळत पळत बाहेर गेला. काही वेळातच धष्टपुष्ट दिसणाऱ्या व्यक्तीने आत प्रवेश केला. त्याचा चेहरा एकदम भयानक होता.
"आपण मला बोलावलं, कॅप्टन." झेऊर घोगऱ्या आवाजात म्हणाला.
कॅप्टन गिनयू: झेऊर, मी तुझ्यावर एक काम सोपवतोय.
झेऊर: आज्ञा करा, कॅप्टन.
कॅप्टन गिनयूने संपूर्ण काम समजावून सांगितले.
झेऊर: तुम्ही निश्चिंत रहा, कॅप्टन. मी जिवंत असेपर्यंत त्या ठिकाणापर्यंत कोणीही पोहोचु शकणार नाही.
कॅप्टन गिनयू: तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आताच निघ.
कॅप्टन गिनयूला अभिवादन करून झेऊर तिथून निघून गेला.
कॅप्टन गिनयूच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य विलसत होतं.
खंड पहिला समाप्त
***********************
टाईम ट्रॅव्हल खंड दुसरा द मिस्ट्री ऑफ अटलांटिस प्रकाशित करण्यात आला आहे.
........
संदर्भ
The complete pyramids- solving the ancient mysteries by Mark lehner
The pyramids of Giza by Charles and Linda George
The pyramids and the Pentagon by Nick Redfern
The orion mystery by Robert bauval and Adrian Gilbert
The secret chamber of Osiris by Scott Creighton and Rand flem ath
