मी चुकले का?
मी चुकले का?
आज परत आम्ही नेहमीप्रमाणे भेटणार होतो. जागा तीच जिथे नेहमी भेटायचो! "तो" माझा "तो" आम्ही गेली सहा वर्षे सोबत आहोत. त्याने मला खूप समजून घेतले. आता आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घरच्यांना सांगायचं! म्हणून आधी आमच्यात तो प्री प्लॅन्ड असायला हवा होता. म्हणूनच आज भेटण्याचे ठरले. कुठला ड्रेस घालावा? गोंधळात पडले. नेहमी पेक्षा आज मनात धाकधूक होती. थोड्याच वेळात तयार झाले. साहेबांना उशीर झालेला आवडणार नाही म्हणून निघाले.
"आई येते हा कॉलेज मधून."
"आज काय स्पेशल?"
"काही नाही ग. आज छोटं फंक्शन आहे कॉलेजमध्ये. त्यासाठी मी अँकरिंग करणार आहे."
"फेब्रुवारी महिन्यात कसलं आलंय फंक्शन?"
"हा अग, शिव जयंतीला सुट्टी असेल; म्हणून आधीच आम्ही एक सोहळा करायचं ठरवलं आहे."
"अग महाराजांना काय वाटेल? त्यांचा जयंती सोहळा आधीच साजरा करताय!"
"जाऊदे, येते मी."
"बरं!"
सुटले नाहीतर आज आईने धरले असते. चला लवकर जाऊन थांबले पाहिजे.
थोड्याच वेळात तिथे पोहचले. तो अजुन पोहचला नव्हता. काही वेळाने तो समोरून येताना नजरेस पडला.
"काय रे! आज इतका उशीर? नेहमी माझ्या आधी येतोस आणि मला बोलतोस उशीर झाला."
"अग झाला उशीर, ट्रॅफिक होती."
"मग समोरच्याचं सुद्धा समजून घ्यावं माणसाने!"
"ते जाऊदे, चल निघायचं?"
"हो चल."
छानपैकी तलावाच्या काठी झाडाखाली नेहमीच बसायचो. आज उद्देश वेगळा होता. त्याला आणि मला दोघांना आमच्या भविष्या विषयी बोलायचे होते.
मी सुद्धा त्याच्या हातांना विळखा घातला आणि डोकं त्याच्या खांद्यावर टेकवत बसले.
"बोल ना, तू सांगीतलं ना आपल्याबद्दल तुझ्या घरी?"
"हो, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही."
"खरंच ना?"
"हो ग, खरंच. तू कधी सांगणार तुझ्या घरी?"
"आजच सांगते. पण जर त्यांनी मला घरातून काढलं तर? बाबा जास्त स्ट्रीक्ट आहेत!"
"माझ्या घरी यायचं! त्यात काय? मी आहे ना."
आमची भेट संपली आणि मी घरी निघून आले. मनात प्रश्न होतेच! काय बोलणार? कसं बोलणार? पण आता परिस्थितीला समोर जाणं भाग होतं. रात्री सर्व हॉलमध्ये बसून असता संधी साधत मी बोलायला सुरुवात केली.
"बाबा मला काही सांगायचं आहे."
"काय आहे?"
"बाबा ते माझं एका मुलावर!"
आमच्या घरी माझं पूर्ण वाक्य कधीच ऐकुन घेतलं जायचं नाही.
"बास.....! यापुढे एकही शब्द तोंडून काढलास; तर, जीभ बाहेर काढेल."
"आई तू तरी सांग!"
"म्हणूनच गेलीस ना आज नटून थटून? काय तर म्हणे शिव जयंती सोहळा! हेच शिकवलं का राज्यांनी आपल्याला मूर्ख मुली?"
"आई राज्यांनी जे शिकवलं ना ते आपण आत्मसात करतंच नाही. नाहीतर आज मला तुमच्या समोर अशी प्रेमाची भिक नसती मागावी लागली. महाराजांनी आंतरजातीय विवाहास बंदी या सारख्या कुप्रथांना कधी वावरूच दिलं नाही. आज त्यांच्या नावावर तुम्ही याच सगळ्या कुप्रथांना घेऊन फिरता."
माझं ऐकून बाबांचा पारा आणखीच वर चढला. त्यांनी माझ्यावर शेवटी हात उगारलाच!
"लफडी करायची ना निघ इथून. तुझ्यासारखी मुलगी जन्माला घालून पछतावत अाहोत."
पूर्व कल्पना असून देखील मी का त्यांना सांगीतले? या विचारात असताच, दुसरीकडे समजलं, भारतीय संस्कृतीत मुलगी कधीच आपला निर्णय बोलून दाखवत नसते. हा प्रतिगामी समज आपल्या फिल्म इंडस्ट्री ने अजुनच रुजवण्यास मदत केली आहे.
हे सगळे विचार मला त्या क्षणी आठवले आणि डोकं जड वाटू लागलं. जाणार तरी कुठे? विचार करतंच होते की, त्याचे बोल आठवले. म्हणून, बॅग पॅक करून बाहेर पडले. आई-बाबांनी थांबवणं गरजेचं समजलं नाही. मी सुद्धा जास्त काही न बोलता निघून जाणंच योग्य समजले.
काहीच वेळात त्याच्या घरापर्यंत येऊन पोहचले. डोळ्यांसमोर नको ते विचार धिंगाणा घालत होते. तो त्याचा शब्द पाळेल? की, घरच्यांसमोर मला अपमानित करेल? या विचारातंच मी त्याच्या दारावर थाप दिली. आतून एका वयस्कर बाईने दार उघडले.
"कोण पाहिजे?"
"रजत आहे का?"
एका वेगळ्याच कटाक्षाने पाहत त्यांनी आतून रजतला बोलावून घेतले.
"तू....! ये ना....!"
आत जाऊन बसले. त्याच्या घरची मंडळी मला बघू लागली. रजतने माझ्या समोरंच घरच्यांना आमचा निर्णय सांगीतला. त्यांनीही जास्त विरोध न दर्शवता माझा स्वीकार केला. कदाचित त्यांना आधीच कल्पना दिली असावी!
लग्न मस्त पार पडलं. फक्त त्याचेच कुटुंबीय असल्याने हुंडा वगैरे सारख्या मागण्यांची काळजीच मिटली. लग्नानंतर फिरून आलो आणि मग सुरू झाले ते नेहमीचे जगणे. रजत जॉब करायचा. त्याच्या घरी तोच कमावणारा होता. मला सर्व काही सांभाळावं लागायचं. कंटाळले होते सगळ्याला. कधी तरी आपण निर्णय घेऊन चुकलो असंही वाटायचं!
एकदा निर्णय घ्यायचे ठरवून निघाले जॉब इंटरव्ह्यूसाठी. पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन मिळवून मी खूप खुश होते. पण रजत माझा निर्णय स्वीकारेल की नाही यात माझा गोंधळ उडाला. रात्री जेवणं आटोपली. मी रजतला माझा निर्णय सांगून दिला. त्याने नकारणं अपेक्षित होतंच. लग्नाआधी जरी मी नोकरी करणार नसल्याचे मान्य केले असले तरी सध्याच्या परिस्थितीत मला नोकरी मिळवणं गरजेचं होतं.
रजत आणि माझ्यात नेहमी याच मुद्द्यावरून भांडणं व्हायची. भांडण खूप विकोपाला जाऊन माझ्यावर हात देखील उगारायला त्याने संकोच केला नाही! एकदा मी निर्णय घेतलाच. वेगळं व्हायचं! कारण, जिथे आपले अस्तित्व फक्त घरकाम करणारी बाई म्हणूनच असणार असेल त्या मानसिकतेत राहूनही काय उपयोग?
मनात नसून वेगळं व्हावं लागलं!
कधी तरी मनात विचार येतात, "मी चुकले का?"
समाप्त!
