Khushi Dhoke

Tragedy Crime Thriller

3  

Khushi Dhoke

Tragedy Crime Thriller

एक हात मदतीचा!

एक हात मदतीचा!

6 mins
222


मालती साधारण पंचविशीतली एक तरुणी. दिसायला गोरीपान, उंच, अंगकाठी अगदीच आकर्षक. पण तिला लग्नासाठी कोणीच पूर्णपणे होकार दिला नव्हता. पाहुणे यायचे आणि बघून जायचे. नंतर समजायचं की, जाता-जाता त्यांच्या वाहनांना अपघात झाला!


तीन-चार स्थळ सांगून आले. नंतर मात्र सततच्या अपघाताच्या बातम्यांनी तिच्या घरचे घाबरले आणि त्यांनी तिच्या लग्नाचा विषय लांबणीवर टाकला. 


लोकं टोमणे मारायची! पण त्याला कोणीही प्रतिउत्तर द्यायचे नाही; असे तिच्या घरी सांगण्यात आले होते. 


घरकाम करून घरी राहणं ही तिची दिनचर्या! कामं आटोपून ती तिच्या ठरलेल्या जागी येऊन बसायची. खिडकीतून बाहेर लोकांचे निरीक्षण करण्यात तिचा दिवस जायचा. कधी-कधी तिच्या मनात नको ते विचार येत. त्या पिंजराबंद चौकटीतून बाहेर पडून कधी तिला स्वतंत्रपणे जगता येईल या विचारात तिला गहिवरून यायचे. त्याच सोसायटीमध्ये राम नावाचा एक वॉच मेन होता. 


एके दिवशी खिडकीतून बाहेर बघत असता; तिला मागील दिवस आठवले.


मालती शाळेत शिकतानाचे ते दिवस. शाळेतून परत येताना तिला कोणी तरी तिचा पाठलाग करतो आहे; असे जाणवले. मागे वळून बघणार तोच भरधाव दुचाकी तिच्या दिशेने येताना तिला दिसली. घाबरून तिने डोळे बंद केले! पण, काही वेळानंतर सुखरूप असल्याच्या विश्वासाने तिने डोळे उघडले. वॉच मेन रामची पाठमोरी आकृती तिच्या डोळ्यास पडली. तिने आवाज दिला. मागे वळून त्याने एक वेगळेच हसू चेहऱ्यावर आणले आणि हात हवेत भिरकावला. विचारातंच ती घरी परतली. रात्री जेवण करून सगळे झोपी गेले; माञ तिच्या मनात विचारांचे काहूर माजले! 


झोप लागत नव्हती म्हणून तिने खिडकीतून डोकावून पाहिले! पलीकडून राम तिच्याचकडे बघत होता. अंग भीतीने थरथरले आणि ती घाबरून मागे हटली!


या प्रकरणानंतर ती घाबरूनच ये-जा करायची.


एकदा असेच एक मुलगा तिला शाळेत त्रास देत होता. रामला कोणी खबर दिली देव जाणे. तो पळतंच शाळेत पोहचला आणि त्या मुलाला बदडून काढले. मालती त्याला जाब विचारणार तोच, त्याने हसून परत हवेत हात भिरकावला. ती स्तब्ध होऊन त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली.


या सगळ्या प्रकरणानंतर मालतीने रामकडे बघणे ही बंद केले होते. तो गेटवर उभा असलेला बघून ती खाली मान घालून घरात पळत सुटायची.


वर्ष गेले.....!


मालतीचं शिक्षण पूर्ण झाले. तिच्या घरी स्थळ शोधायला सुरुवात झाली. एका मागून एक स्थळ तिच्यासाठी येत होती. परतताना पाहुणे मंडळींच्या वाहनांचा अपघात झाल्याच्या बातम्या नेहमी यायच्या. ह्या अशा प्रकरणामुळे तिची बदनामी तर झालीच; शिवाय तिच्या कुटुंबाशी समाज वाळीत टाकल्यागत वागू लागला.


नेहमीप्रमाणे आजही मालती खिडकीतून त्या गेटकडे बघत बसली होती. आज परत तिला तोच राम आठवला; ज्याने कधीतरी तिला अपघात होण्यापासून वाचवले होते आणि त्रास देणाऱ्या मुलाला चांगला बदडून काढला होता. पण त्याच्या बाबतीत एक विचित्र बातमी सर्वत्र प्रचलित होती; ती म्हणजे, त्याला कोणीतरी जीवाने संपवल्याची! खरं तर त्या मागचं कारण देखील कोणाला माहित नव्हते.


एके दिवशी खिडकीतून बाहेर बघत असता तिला तिची मैत्रीण समोरून येताना दिसली. इतक्या दिवसांतून कोणी तरी तिला भेटायला आलेलं पाहून ती खूप खुश झाली. दारावर थाप पडली आणि मालतीने दार उघडले.


"आरती, ये ना! अग आपण किती दिवसांनी भेटतोय; कशी आहेस तू?"


"अग मी मजेत आहे. तुझं काय? किती टेन्शन घेतेस? बारीक झालीस!"


मालतीने तिच्या बाबतीत मागील काही महिन्यांपासून घडत असलेला घटनाक्रम तिला सांगितला.


"तुझ्याबद्दल ऐकून वाईट वाटले!"


"जाऊदे सोड! तू सांग तुझं काय?"


"हे घे कार्ड; लग्नाला येशील."


"वा! अभिनंदन. येईल हा नक्की."


काही वेळ दोघींच्या गप्पा रंगल्या आणि आरती निघून गेली. 


लग्नाच्या निमित्ताने तिला किती तरी दिवसांनी बाहेर जायला मिळणार म्हणून ती खुश होती.


लग्नाचा दिवस उजळला. 


छान तयारी करून मालती बाहेर पडली. मैत्रिणीचं लग्न म्हणून ती तिच्या घरुन एकटीच जाणार होती. बाकी मिञ मंडळ ही येणार होते. लग्नाला गेली आणि मज्जा करून घरी परतायला निघाली. ती घरी परत येत असता बसमध्ये एका टोळीचं संभाषण कानावर पडले.


"अरे त्या रामचा कसा पत्ता काटला! साला बहीण म्हणायचा तिला. वाचली ती; नाहीतर किती किंमत होती! साला पुर्ण मार्केट गरम केलं असतं! छ्या मायला.....! त्याचा जीव घेऊन ही हाती लागली नाही."


मालती स्कार्फ बांधून असल्याने तिला ते ओळखू शकले नाही. पण तिने त्या लोकांना ओळखले होते. एकदा तोच व्यक्ती तिला राम सोबत वाद घालताना दिसला होता. पण नेमकी भानगड काय? म्हणून ती त्यांचं संभाषण पुढे ऐकू लागली.


"बॉस, राम तर इथे एकटाच राहायचा आणि तो तिथे वॉच मेन होता! मग ती त्याची बहीण कशी?"


"अरे गावाकडं त्याची फॅमिली होती म्हणे! त्याचे आई-बाबा गेल्यानंतर त्यानं त्याच्या बहिणीला वाढवलं; नंतर लग्न लावून दिलं. पण नवरा चांगला भेटला नाही! त्यानं तिचा सौदा केला. नंतर राम त्याचा मर्डर करून माझ्या जवळ आला होता. मी त्याला माझ्या टीम मध्ये यायला सांगितला. पण त्याने माझा एक ऐकला नाय! आणि बोलला, की त्याला काही काम मिळवून देऊ. मग आपण त्याला इथल्या सोसायटीमध्ये घेऊन आलो. तिथल्या मुलीवर आपली नजर होती; पण, तो साला तिला बहीण मानून बसेल वाटला नाय. पूर्ण प्लॅनची आई घातली त्यानं! मग काय, त्याला संपवावा लागला! केला रामनगर स्क्वाड रोड वर गेम त्याचा! पण आता काय फायदा? ती कुठंच दिसत नाय म्हटल्यावर नुसतीच बोंब! कोणी जर तिला लग्नासाठी होकार दिला तर एक्सिडेंट होतो; या भानगडीत नको पडायला म्हणून आपण दूर राहायचे. चला आपला स्टॉप आला, उतरा."


ती टोळी उतरताना बघून, मालती सुद्धा त्याच स्टॉप वर उतरली. तोंडाला स्कार्फ बांधून असल्याने त्यांना ती कोण हे समजले नाही.


"भाई, नवीन माल!"


"चला आपली सोय झाली!"


ती लोकं तिच्या दिशेने येताना बघून मालती घाबरली. त्यातला एक तिला हात लावणार तोच त्याच्या पाठीत मोठ्याने रॉडचा आवाज झाला आणि तो जागीच कोसळला. मालतीने दोन्ही हात तिच्या कानावर ठेवत डोळे बंद केले. थोड्या वेळाने डोळे उघडले. समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालून जमीन सरकली. समोर त्या टोळीचा प्रत्येक जण विव्हळत पडून होता. त्यांच्या पुढे बसून राम एका समाधानाने हसत होता. हे सर्व पाहून मालती घाबरतंच पळत सुटली. काही अंतरावर जाऊन तिने मागे वळून पाहिले. राम नेहमीप्राणेच हवेत हात भिरकावत उभा होता. ते बघून ती परत वेगाने पळाली.


दुसऱ्या दिवशी सकाळी उठली. टोळीच्या संभाषणात उल्लेख असल्या प्रमाणे ज्या पत्त्यावर त्यांनी रामचा जीव घेतला होता; तिथल्या सर्व रुग्णालयात तिने जाऊन माहिती घेतली. पण तिला काहीच हाती लागले नाही. शेवटी हार मानून ती परतणार की, समोर एक छोटं क्लिनिक डोळ्यास पडले. हिम्मत करून तिने पाऊल पुढे टाकले. तिथे विचारणा केली असता तिला जे काही समजले; त्याने तिच्या मनात राम विषयी आदर निर्माण होण्यास मदत झाली. असे असले तरी राम कायद्याने गुन्हेगार असल्याची खंत तिच्या मनात होतीच! 


डॉक्टरांना मालती विषयी माहिती होतीच. कारण रामने तिचा फोटो त्यांना दाखवला असल्याचे त्यांनी तिला सांगीतले.


"मालती बेटा, रामचा जीव तुझ्यात होता. त्याने एक बहिण गमावली होती. इथे आल्या पासून तुझ्यात तो त्याची बहीण शोधायचा! त्यामुळे तुझा सौदा करणाऱ्या लोकांना त्याने विरोध केला आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकला. तुझं लग्न त्याला होऊ द्यायचं नव्हतं; कारण त्याच्या बहिणीसोबत जे झाले; ते तुझ्या बाबतीत घडू नये अशी भीती त्याच्या मनात होती. तुझ्यासाठी येणाऱ्या स्थळांच्या मागावर जात त्यांचा किरकोळ अपघात घडवून ताकीद द्यायचा. तुझ्यासारख्या आणि त्याच्या सख्ख्या बहिणीसारख्या किती तरी मुलींचे जीवन धोक्यात येण्यापासून तो वाचवतो आहे. मी त्याला समजावले; यानंतर तो तुझ्यासाठी येणाऱ्या स्थळांना त्रास देणार नाही. उलट मी माझ्या एका पुतण्यासाठी तुझ्याविषयी विचारले. त्याचा होकार आहे. उद्याच घरी घेऊन येतो. मालती बेटा, कसं असतं आपलं जास्त प्रेम असणाऱ्या वस्तूला ज्या कारणाने आपण गमावतो; नेहमी त्या कारणाची चीड आपल्या मनात असते आणि नंतर मग असेच काहीसे गुन्हे घडतात."


हे सर्व ऐकून मालती सुन्न झाली. तिच्या डोळ्यात अश्रू आणि डोक्यात नको ते विचार धिंगाणा घालत होते. डॉक्टरांचा निरोप घेत ती जायला निघाली. रस्त्याने आपल्याच धुंदीत जात असता, तिला रस्त्याच्या कडेला हवेत हात भिरकावताना राम उभा दिसला. तिने त्याच्या नजरेला-नजर भिडवत स्वतःचा हात हवेत भिरकावला आणि तोंडून एकच वाक्य बाहेर पडले!


मालती : "का? का केलंस दादा असं?"


समाप्त.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy