Nirajkumar Bhandari

Classics

3  

Nirajkumar Bhandari

Classics

माझ्या घरात टिव्ही नाही

माझ्या घरात टिव्ही नाही

4 mins
8.5K


माझ्या घरात टिव्ही नाही...हो हे खरंय...

खरं तर काही वर्षांपूर्वी मी या टिव्हीचा भक्त होतो.. अगदी व्यसनच होतं ....सकाळी उठलं की आज काय वार आणि मग त्यानुसार संध्याकाळी काय बघायचं हे ठरायचं...

ऑफिसातून घरी आलं की फ्रेश होऊन टिव्ही समोर ठाण मांडून बसायचं.... सगळं घर मग या टिव्ही समोर... हिचा दिवा लावून व्हायचा की भाजी निवडता निवडता तोंडात देवाचं आपलं काहीबाही स्तोत्र सुरू पण टीव्हीसमोर बसून.... एका पाठोपाठ एका एका सिरियलचा पाठलाग सुरू असायचा... या चॅनलवरची संपली की लगेच दुसऱ्या चॅनलवरची... ती संपली अजून तिसऱ्या चॅनलवरची असं सुरूच असायचं....

जेवणही याच टीव्हीसमोर बसून व्हायची... समोर कुठलीतरी मालिका सुरू आणि समोर जेवण...बरं जेवणानंतर ही टीव्ही सुरूच ते रात्री झोपेपर्यंत....कधी रात्री अपरात्री जाग आली आणि झोप उडाली की पुन्हा उठून टीव्हीसमोर....

रविवारचं तर काय विचारू नका.... सकाळी उठलं की पहिला रिमोट हातात घ्यायचा.... सगळे चॅनलवर धुंडाळून कुठले कुठले कार्यक्रम कुठल्या चॅनलवर, कुठले सिनेमे कुठल्या चॅनलवर असं नीट बघून त्याचं सगळं रिमायंडर लावून ठेवायचं आणि मग चहा पाणी... मग दिवसभर तो टिव्ही काही ना काही कारणाने सुरू असायचा.... त्यादिवशीचे सर्व इतर कार्यक्रम या टिव्हीवर अवलंबून असायचे...

त्यात जर IPL किंवा कुठल्या क्रिकेट मालिका असतील तर काय विचारू नका....ऑफिसच्या वेळा आणि बाकीचे इतर कार्यक्रम समारंभ या मॅचच्या वेळेनुसार ठरवले जायचे...

पण मग जरा वाटलं अती होतंय... त्यात मुलीची दहावी जवळ आली आणि मग हळूहळू टीव्हीवर बंधने आणली...

आता गेल्या दोन अडीच वर्षांपासून टीव्ही बंद केला.. अगदी शून्य.... तेव्हा आयुष्याच्या एका वेगळ्या बाजूची ओळख झाली...

आज आता गेल्या दोन अडीच वर्षात टीव्ही बघितलेला नाही... कुठलीही मॅच बघितलेली नाही.... कुठलीही सिरीयल, सिनेमा पाहिलेला नाही....

काही दिवसात बघता बघता या टिव्ही बंदचे फायदे समोर यायला लागले....टिव्ही बंदमुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळ मिळायला लागला....

आता वेळेच काय करायचं तर सुरुवातीला वाचन सुरु झालं... त्याच्या जोडीला तुटपुंजे लिखाण सुरू झालं...

मुळातच टिव्ही बंदमुळे त्या टिव्हीच्या अतिरंजित बातम्या... हेवेदावे.... जीव खाऊन तळ ना बुड नसलेल्या तावातावाने दात ओठ खात चाललेल्या चर्चा.... माणसा माणसा मधली खेचताण... त्या मालिकांमध्ये दाखवली जाणारी अतार्किक कुरघोडी... वैर.. कपटकारस्थान... आणि या सर्वांच्या सततच्या एकत्रित मारांमुळे मनात तयार होणारी जळकट मळकट नैराश्य इत्यादी काही दिवसांत निघून गेली...

बघता बघता प्रत्येक गोष्टीत एक सकारात्मकता दिसायला लागली....वेळ मिळाला म्ह्णून छोट्या छोट्या गोष्टीत आनंद दिसायला लागला....अगदी बाल्कनीत चहा पिता पिता समोरच्या झाडावर सुरू असणारी पक्ष्यांची शाळा आणि त्यांचे वेगवेगळे पैलू, नजाकती, दिसायला लागले.... संध्याकाळी पावले वेळ मिळाला तशी मंदिराकडे वळू लागली... मंदिराचं वातावरण, तिथली माणसं पाहून मन प्रसन्न व्हायला लागलं...

वेळ मिळतोय म्हटल्यावर पावलं घराबाहेर पडली.. माणसं दृष्टीस पडली.... माणसं भेटायला लागली.... संवाद वाढायला लागला... जीवनाचा एक नवा दृष्टिकोन मिळायला लागला....

वेळ मिळायला लागला तसा स्वतःच्या छंदाला वेळ देता येऊ लागला.... जरा जरा छायाचित्रण जमायला लागलं.... त्यामुळे आयुष्यात अजूनच नवीन रंग भरायला सुरुवात झाली.... आनंद गोळा करायला शिकलो.... आनंद साठवायला शिकलो....पण तो ओसंडून वाहायला लागला मग त्याला शब्दांच रूप दिलं आणि बघता बघता एक एक लेख तयार होऊ लागले..

टिव्ही समोर बसून हे केवळ अशक्य होतं... त्याच त्याच कपोलकल्पित अतिरंजित गोष्टी, त्या मालिका आणि बातम्यामधून मनाचे खच्चीकरण व्हायचं ते थांबलं..

आज टिव्ही नसल्याने जगाच्या घडामोडी, बातम्या, कदाचित काही गोष्टी जरा उशिरा समजतात पण ठीक आहे.... सर्वसामान्य माणूस असल्याने त्यामुळे माझ्या आयुष्यात फार मोठी उलथापालथ होतं नाही..

संध्याकाळी एकत्रित समोरासमोर बसून गप्पा टप्पा मारत, हसत खेळत जेवायची जी मजा आहे ती त्या टिव्हीसमोर नाहीच.... जेवताना आताशा गप्पा होतात, वादविवाद ही होतात, उणेदुणे ही काढले जाते पण संवाद होतो.... दिवसभराचा आढावा होतो... पुढच्या दिवसाचा कार्यक्रम ठरतो.... काही महत्त्वाचे निर्णय होतात... काही बाबींवर चर्चा होते.... कधी चेष्टामस्करी होते.... हास्य विनोद होतात.... मुख्य म्हणजे एवढ्या कष्टाने केलेल्या जेवणाचा खरा स्वाद घेता येतो.... मग त्यातून निघायला लागतात एक एक भन्नाट कल्पना... त्यातून साकारणारा एक एक लेख....

टिव्हीच नाही म्हटल्यावर वर्तमानपत्र नीट वाचायला शिकलो.... आजूबाजूला आपल्या जवळच घडणाऱ्या गोष्टी जसं की काही नाट्य, कला, छायाचित्रण, साहित्य यांचे कार्यक्रम, वेगवेगळे प्रदर्शन, संगीत महोत्सव, व्याख्यानमाला यांच्याशी आपोआपच ओळख व्हायला लागली... यातून मिळणारा आनंद त्या टिव्हीपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे...

टिव्ही अगदीच बंद असावा असं माझं बिलकुल म्हणणं नाही पण त्याला वेळेची मर्यादा आणलीच पाहिजे.. त्यात अडकलं की माणूस त्यात गुंतूनच जातो..

मुलीच्या परीक्षा संपत आल्यात आणि पुन्हा टीव्ही सुरू करा असं टूमण आता सुरू होईल.. त्यावरही काहीतरी मार्ग नक्कीच निघेल...

प्रत्येक माणसाच्या अंगात कुठलं ना कुठलं गुण वैशिष्ट्य असतंच या गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे....ते ओळखून जरा वेळ काढून त्याकडे लक्ष दिले पाहिजे असं मला वाटतं... टिव्हीचा काही वेळ कमी करून हे नक्की होऊ शकतं असं मला वाटतं...त्यातून मिळणारा आनंद या टिव्हीपेक्षा खूप मोठा असेल हे खात्रीेने आणि अनुभवाने सांगतो...

बघा आज पाडवा आहे, नववर्षं सुरू होतंय... स्वतःला ओळखा, स्वतःला वेळ द्या....वादविवाद, हेवेदावे याला फाटा द्या आणि आयुष्याचा आनंद घ्या....

आपणास आणि आपल्या कुटुंबाला गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा...!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics