kanchan chabukswar

Tragedy

4.0  

kanchan chabukswar

Tragedy

लेसच्या पडद्याच्या खिडकीतली मुलगी

लेसच्या पडद्याच्या खिडकीतली मुलगी

5 mins
209


  मी आणि सुमेध आमच्या पहिल्या बाळाला घेऊन स्वतःच्या मालकीच्या नवीन फ्लॅटमध्ये राहायला आलो, खरं म्हणजे फ्लॅटचे लोकेशन जरा विचित्र होतं, म्हणून किंमतही कमी , कारण की आमच्या हॉलच्या समोर समोरच्या फ्लॅटचा हॉल येत होता अर्थात समोरची बिल्डिंग रस्त्याच्या पलीकडचे होते तरीपण प्रायव्हसी मध्ये बाधा म्हणून बऱ्याच जणांनी फ्लॅट नाकारला होता.

      मी आणि सुमेध ने विचार केला, खिडकीला पडदे लावले प्रायव्हसी मध्ये काहीच फरक पडणार नाही, फ्लॅट ची किंमत जवळजवळ सात लाखांनी कमी होती, तसेच फ्लॅट 10व्या मजल्यावर चा होता , समोरचे बिल्डिंग सोडली तर आमच्या समोर काहीच नव्हता. बेडरूम मधला, स्वयंपाक घरातून, गॅलरी मधला देखावा सुंदर होता, फक्त दिवाणखान्यात समोर समोरच्या फ्लॅटची खिडकी होती.


     मी हौसेने हॉलमध्ये जांभळ्या रंगाचे पडदे लावले, सोप्या चे कव्हर देखील मॅचिंग तसाच सुरेख चित्र असलेला गालीच्या. सुमेध ला टीव्ही बेडरुममध्ये पाहिजे होता म्हणून हॉलमध्ये टीव्ही नव्हता, बराच वेळ बाळाबरोबर खेळण्यातच जात होता खिडकीच्या बाहेर बघायला देखील वेळ नसे. आम्ही दोघे पण खुश होतो, आई-वडील सासू-सासरे येऊन जाऊन असतात, त्या वेळेला आमचा फ्लॅट आनंदाने उचंबळत असे. हळूहळू आमचं बाळ' चिन्मय' रांगू लागलं, आधार आला धरून चालू लागलं, बोबडे बोल बोलू लागलं. माझा तर पूर्ण दिवस चिन्मयच्या मागे गडबडीने जात असे.


     त्या दिवशी माझा वाढदिवस होता, सगळे पाहुणे घरी गेले, चिन्मय पण झोपला,


अचानक सुमेध ने मला हॉलमध्ये बोलवले. वाऱ्यावरती मस्तपैकी गाण ऐकू येत होती.

' ये क्या बात है आज की चांदनी में' किशोर आणि अIशाच सुप्रसिद्ध गाणं.

हॉल मधला दिवा मालवून सुमेध ने मला जवळ घेतले, आणि हॉलच्या खिडकीकडे बोट केले.


समोरच्या फ्लॅटमधल्या झिरझिरीत पडद्याआड, एक जोडपं एकमेकांच्या बाहुपाशात आनंदाने संथपणे गाण्याच्या तालावर नृत्य करत होते. तरुणी न सुंदर गुलाबी रंगाचा गाऊन घातला होता, तर त्या तरुणाचा थ्री पीस सूट स्पष्टपणे दिसत होता. तरुणीचे कुरळे कापलेले केस मंद वार्‍यावर उडत होते, आणि तिला अलगद आपल्या हातामध्ये धरून त्या दोघांचं मादक नृत्य सुरू होतं. नृत्यामध्ये मधून मधून तो तरुण अतिशय प्रेमाने तिच्या कपाळाचे, गालाचे चुंबन घेताना पण दिसत होता. एखाद्या माजावर आलेल्या नाग-नागिणीची नृत्य असावे तसे ते दोघेजण दिसत होते. त्यांच्या शरीराच्या हालचाली अतिशय मोहक आणि आकर्षक होत्या. दोघंही एकमेकांना साजेसे होते.

सुमेधने माझ्याकडे अर्जवित दृष्टीने पाहिले. मंद हसत आम्ही दोघांनी पण समोरून येणाऱ्या गाण्याचा तालावर ती नृत्याचा लयदार ठेका धरला. हॉलमधल्या मंद दिव्याच्या प्रकाशात आमच्या दोघांच्याही चित्तवृत्ती उल्हसित झाल्या होत्या. अंगावर रोमांच दाटूनआले होते, दोघांचाही मूड एकदम रोमँटिक झाला होता. आमच्या समोरासमोरच्या फ्लॅट मधले आमचे नृत्य बराच वेळ चालू राहिले. शेवटी समोरच्या फ्लॅट मधल्या तरुणाने तरुणीला उचलून घेतले, प्रेमभराने चुंबन घेतले आणि तो तिला आत मध्ये घेऊन गेला.

ते बघून सुमेधने मला नजरेनेच विचारले. ती रात्र अतिशय आनंददायी आणि सुखावह ठरली.


   आजचा दर आठवड्याचा तोच कार्यक्रम झाला, शुक्रवारी रात्री आमच्या कोणाच्या तरी फ्लॅटमध्ये सुरेख संगीत चालू व्हायचे आणि त्या तालावर दोन्ही फ्लॅटमध्ये जोडपे मनसोक्त नृत्य करत असे. आमच्या रोमान्स मध्ये चिन्मय बाळाच लुडबुड असे पण

         मला आता दुसऱ्यांदा आई होण्याची पण चाहूल लागली होती. नवीन फ्लॅट आम्हाला फारच लाभदायक ठरला होता. आता मी पडदे ओढायची घाई करतच नसे, चिन्मयच्या मागे धावणे, त्याला खिडकीत बसवून जीव काऊचा घास, दोघं मिळून सुमेध ची वाट बघणे, 

      तो आल्यावर चिन्मय त्याच्या दिशेने, बाबा बाबा असे चित्कारत धावणे , सगळं घर जणू आनंदाने भरून जात असे. शुक्रवारी रात्री चा प्रोग्रॅम मात्र ठरलेला असे. मंद, दिवे, संगीत समोरासमोरील रोमान्स.

ज्या रात्री मजाच झाली, सुमेध ला मीटिंगसाठी बाहेरगावी जायचे होते, यायला बराच उशीर झाला. हॉल मधला दिवा मालवून मी तिथेच बसून राहिले. मला नुकताच सहावा महिना लागला होता.

अचानक समोरच्या फ्लॅटमधे दिवा लागला, दोघेजण धावा धावी करत होती, तरुणीच्या अंगावर अर्धवट कपडे होते तर, तरुणाने फक्त टॉवेल गुंडाळला होता. शेवटी धावताना अचानक तरुणीने मागे वळून तरुणाच्या कडेवरती उडी मारली. दोघेही सोफ्यावर कोसळले आणि तिथेच त्यांचा बिनधास्त रोमान्स सुरू झाला. मी एकटीच असल्यामुळे मला भयंकर लाज वाटली, तेवढ्यात दार उघडून सुमेध आत मध्ये आला, त्याने पण ते दृश्य बघितले,' एन्जॉय' म्हणत गालातल्या गालात हसत तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला.


 दिवस भराभर जात होते, चिन्मय ला सांभाळून मला सगळे काम जमत नव्हते त्यामुळे सासुबाई येऊन मला आठव्या महिन्यामध्ये गावी घेऊन गेल्या. गावाकडची शुद्ध हवा, सकस खाणं यामुळे माझ्या तब्येती मध्ये फरक पडला. गावाकडच्या वातावरणात मी समोरच्या फ्लॅटमधे असलेल्या जोडप्या बद्दल सगळं विसरूनच गेले. डिलिव्हरी झाली गोड गुलाबी रंगाची सुरेख मुलगी देवाने माझ्या पदरात टाकली. नंदिनी आणि चिन्मय ला घेऊन मी जवळ जवळ चार महिन्याने घरी येत होते. आमचा संसार आता सुगंधी काजू कतली वडी सारखा चौकोनी सुंदर झाला होता. इकडे तिकडे बघायला मला वेळच नव्हता.

   त्यादिवशी नंदिनीला हातात धरुन मी झोपवत होते, अचानक समोरच्या फ्लॅटचा दिवा लागला. त्या तरुणीच्या आधाराने तो तरुण हळूहळू चालत हॉल मध्ये ठेवलेल्या हॉस्पिटल सारख्या बेड वरती झोपला. त्याच्या चेहऱ्यावरून छातीवरून हात फिरवून त्या तरुणीने त्याचे हलकेच चुंबन घेतले, त्याच्या अंगावर मऊ पांघरूण घालून, छोटा मंद प्रकाशाचा दिवा चालू करून ती त्याच्या बाजूलाच सोफ्यावर झोपली. हे दृश्य माझ्यासाठी धक्कादायक होतं.

         दिवसेंदिवस असच दृश्य दिसत असे. कधीकधी ती तरुणी त्याच्या बरोबर त्या एवढ्याशा बेडवरती त्याला कुशीत घेऊन झोपत असे. तिचं प्रेम, तिचा आटापिटा सर्व काही दिसत होते. त्याला चमच्याने भरवणे, त्याचं स्पंजिंग करणे, एवढा राजबिंडा तरुण, पण आता हाडाचा सापळा झाला होता,

      कधीकधी मंद संगीत लावून कधीकधी ती त्याच्यासमोर नृत्य करत असे. कधी कधी दिवसा शून्य नजरेने ती माझ्या फ्लॅट कडे बघत राही. माझी धावपळ, मुलांचे आवाज, त्यांचे खेळणे, नंदिनीचे आणि चिन्मय चे जोर-जोरात खिदळणे सगळे ती ऐकत राहि,

कधी कधी त्या तरुणाला आरामखुर्चीत घालून ती खिडकीपाशी बसवत असे, आमच्या फ्लॅट कडे बघत ती त्याला भरवत असे. मला कधीही पडदा सारावासा वाटलाच नाही.


     एक दिवशी नंदिनीला आंघोळ घालून कपडे घालत असताना अचानक समोरच्या फ्लॅटमध्ये धावपळ उडालेली दिसली.

डॉक्टर आणि नर्स येऊन त्या तरुणाला तपासत होते. खाली ऍम्ब्युलन्स उभी होती. शेवटी त्याला उचलून घेऊन गेले. मागोमाग घरच्याच कपड्यात ती तरुणी. बरोबर कोणीही नाही, एकटीच, उदास.

मला पण फारच उदास वाटलं, त्या दिवशी मी पण जेऊ शकले नाही.

तीन दिवसानंतर अचानक समोरच्या फ्लॅटमध्ये बरीच माणसं दिसली. काळे कपडे घातलेली, काही पांढऱ्या कपड्यात, बिल्डींगच्या खाली अंगणामध्ये, चर्च मधला कोणीतरी फादर एका शवपेटी च्या समोर उभा राहून काहीतरी म्हणत होता. ांढर्‍या कपड्यातले ती खूप वेगळी भासली. शेवटी आलेली मंडळी शवपेटी ला घेऊन निघून गेली, तिला नेलेच नाही.

नंदिनीला कडेवर घेऊन मी त्या बिल्डिंग कडे धावले. ती तरुणी एकटीच उभी होती. रिकाम्या नजरेने.

मला पाहताच ती पुढे आली, अचानक माझ्या गळ्यात पडून तिने रडायला सुरुवात केली.

ती मराठा तर तो तरुण क्रिश्चन, घरातून पळून जाऊन लग्न, सगळ्यांचाच विरोध. सगळ्या दुनिया ने पाठ फिरवलेली पण त्यात तिला माझ्या उघड्या खिडकीचा आधार वाटत होता. माझ्या घरातलं भरलेले गोकुळ तिला सुखाचा अनुभव करून देत होतं. रात्री-अपरात्री असलेला मंद दिवा तिला आधार देत होता. तिच्या-माझ्या फ्लॅट कडे बघण्याला मी कधीच विरोध केला नव्हता, आमचे जोडप्यांनी केलेले नृत्य तिच्या लक्षात आले होते आणि आम्ही दोन्ही घरं ते मनसोक्त एन्जॉय पण करत होतो.

       मला हे सगळेच फार विचित्र आणि नवीन वाटत होतं. का नाही बर मी तिच्याशी आधी बोलले? मी जेव्हा चार महिने सासरी गेले होते तेव्हा तिच्या नवऱ्याचा ब्लड कॅन्सर उफाळून आला होता, एकटीने सहन करत तिने पूर्ण दुनियेशी लढा दिला, पण शेवट पर्यंत तिने त्याला आनंदी ठेवले. हमसून हमसून रडत ती स्वतःचं मन मोकळं करत होती.

अचानक बाजूला एक चमचमणारी स्कोडा येऊन उभे राहिले, त्याच्यातून एक घरंदाज मोठं कुंकू लावलेली स्त्री बाहेर आली बहुतेक तरुणीची आई असावी,

' चल बाय, घरी चल. तू हट्टी आणि तुझे पप्पा हट्टी मधल्यामध्ये मला चेंगरून टाकली दोघांनी. चल आता तरी घरी चल ग. " बाय तू तुझं म्हणणं खरं केलं आणि तुझ्या पप्पांनी त्यांचं. एकटीने कसा ग एवढे दुःख झेलले? तुला माहित नाही पण तुझ्या नवऱ्याचा डॉक्टरचा खर्च तुझे पप्पाच भरत होते. बापाचं हृदय ग त्याचं. आता अजून त्यांना दुःख देऊ नको. तुझे पप्पा आणि तुझे भाऊ तुझ्या नवऱ्याला मूठमाती द्यायला गेले आहेत, मेल्यावर कसलं ग अपमान आणि मान, कसली दुश्मनी? चल माझ्याबरोबर चल." ती बाई तिच्याशी अIर्जव करत राहिली, तिची समजूत घालत राहिली." तू म्हणत असशील तर त्याला मूठमाती द्यायला मी तुला घेऊन चलते पण अशी इथे एकटी राहू नको ग." तिच्या हाताला घट्ट धरत त्या स्त्रीने तिला आपल्या छातीशी लावले तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला आणि तिला आपल्या बरोबर घेऊन गेली.

जाणाऱ्या तिच्याकडे बघत माझ्या मनात विचार आला, प्रेम माया आदर समर्पण जीव लावणे,,, सगळं किती वेगळं जगण्याची उमेद देणार.

त्याच्या जाण्याने समोरच्या फ्लॅटमध्ये चैतन्य पूर्णपणे हरपल.


    तिच्या घराचे लेसचे पडदे निर्जीवपणे हलत आहेत, आम्हालाही आता या घरात करमत नाही. सुमेध पण हादरून गेला, त्याने दुसरं मोठं घर बघायला सुरुवात पण केली आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy