End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Nilesh Bamne

Romance


2  

Nilesh Bamne

Romance


कवितेचा कवी

कवितेचा कवी

6 mins 1.4K 6 mins 1.4K

टी.व्ही. वर क्रिकेटचा सामाना पाहण्यात मी गुंग असताना कविता हळुच माझ्या मागे येऊन उभी राहिली आणि एक वर्तमानपत्र माझ्या हातात देत म्हणाली,’ विजय ही बघ माझी कविता वर्तमानपत्रात छापून आली आहे. मी त्या कवितेखालील कविताच नाव वाचून ते वर्तमानपत्र पुन्हा कविताच्या हातात देताच काही न बोलता किंचीत रागीट चेहरा करून कविता तोर्‍यात निघून गेल्यावर माझ्या लक्षात आले, अरेच्चा ! कविताची कविता वर्तमानपत्रात छापून आली आणि आपण त्याबद्दल तिचे साधे अभिनंदनही केले नाही. मग ! टी.व्ही बंद करून मी जवळच असणार्‍या माझ्या मोबाईलवरून कविताला फोन केला. ती हॅलो म्हणताच मी चटकन म्हणालो, ‘आय एम सॉरी कविता !’ त्यावर कविता रागात म्हणाली,’ सॉरी ! कशाकरीता ? अग ! वर्तमानपत्रात तुझी कविता छापून आली आणि मी तुझ त्याबद्दल साधं अभिनंदनही केले नाही. माझ्या अशा बोलण्यामुळे कविता अधिकच रागात म्हणाली,’ नाही आता त्याची काही गरज नाही, मी काही तुझ्या अभिनंदनाची भुकेलेली नाही पण मगाशी माझ्या कवितेतील एक ओळ जरी तू वाचली असतीस तर मला अधिक आनंद झाला असता. आता सॉरी ! कशाला बोलतोयस ? माझ्या कवितेपेक्षा तुला क्रिकेटची मॅच अधिक महत्वाची होती ना ? माझा सर्वात जवळचा मित्र म्ह्णून माझी कविता पहिल्यांदा तुला दाखवायला आले पण तू माझ्या सार्‍या रंगाचा बेरंग केलास. तू आपल्या मैत्रीचाही अपमान केलास. इतर माझ्या कविता लेखणाची खिल्ली उडवितात ते मी फारसे मनावर घेत नाही पण आज तू ही तेच केलेस ज्याची मला तुझ्याकडून कधीच अपेक्षा नव्हती. ती माझी करत असणारी स्तुती मला सहन होत नव्हती म्ह्णून मी मोबाईल बंद केला.

आमच्या लहानपणी कविता आणि मी एकाच शाळेत जायचो आणि एकत्रच घरी यायचो. आमची घरेही हाकेच्या अंतरावर असल्यामुळे अभ्यासानिमित्त एकमेकांच्या घरात येणेजाणे होत होते. अभ्यासात आम्ही दोघेही हुशार होतो पण कविताला कवितेचे फार वेड होते. पाठ्य पुस्तकातील जवळ – जवळ सर्व कविता तिच्या तोंडपाठ होत्या. तिला कवितांची आवड असल्यामुळे तिच्या वाढदिवसाला मी नेहमी तिला एखादा कवितासंग्रहच भेठ म्ह्णून देत असे. सतत कवितांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे कळत – नकळत कवितेच्या लेखणीतून कविता आकार घेऊ लागल्या. शाळेत असताना कविताने एखादी कविता लिहिली की ती पहिल्यांदा मला वाचून दाखवित असे. शब्दांची ओढाताण करून तयार केलेल्या तिच्या कवितांचा अर्थ मला तेंव्हाही कळत नव्हता आणि आजही कळत नाही.म्हणजे कवितेच्या कवोतत लपलेला अर्थ मी कधी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. कविताचे कविता प्रेम मला आणि आमच्या सर्व मित्र – मैत्रिणींना चांगलेच माहित होते. पण कवितेचा सर्वात जवळचा मित्र म्ह्णून आमचे मित्र मला कवितेचा कवी म्ह्णून चिडवत असत. आता मला तिच्यासमोर कोणी कवितेचा कवी म्हणत नाही कारण कविता आता प्रगल्भ झालेली आहे, तिने तारुण्यात पदार्पण केलेले आहे. पूर्वी कोणत्याही बंधनात न राहणारी कवितेची कविता आता वृत्त, यमक, यती, गण, मात्रा यांच्या बंधनात जखडलेय आणि कविता नावाची एक मुलगी आता कवयित्री झालेली आहे. तिच्या कविता आता कित्येकांना कळू आणि पटूही लागल्या आहेत. कवितेवरून तिला चिडविणारे आता तिला मान देऊ लागले आहेत. कवितेची आणि माझी मैत्री सर्वांनाच सुपरिचित होती पण शेवटी मैत्रीच्या झाडाला हमखास येणारे फळ म्हणजे प्रेम असते. ते आमच्या मैत्रीच्या झाडालाही लगल. कळत - नकळत माझ्या मनात कविताबद्दल प्रेमांकुर निर्माण झाले. त्याबद्दल कविताशी स्पष्टपणे काही बोलण्याची हिंमत माझ्याच्याने झाली नाही. कविता जेंव्हा - जेंव्हा मला एकांतात भेटते तेंव्हा तेंव्हा मला तिची एखादी नविन कविता वाचायला देते. मी नेहमी प्रमाणे ती वाचतो आणि कविता समजली नाही तरी छान म्ह्णून मोकळा होतो. गेली कित्येक वर्षे हे असंच चाललयं ! माझ्या प्रेमाची गाडी ब्रेक लागलेल्या गाडी सारखी उभी आहे ना पुढे जात ना मागे जाते. आता काहीतरी ठाम निर्णय घेण्याचा मी मनाशी पक्का निर्धार केला होता.

दुसर्‍या दिवशी जेंव्हा कविता मला नेहमीसारखी भेटली तेंव्हा तिने कविता लिहिलेला एक कागद माझ्या हातात दिला आणि मी क्षणाचाही विचार न करता त्या कागदाचे तिच्यासमोरच बारीक बारीक तुकडे करून ते हवेत भिरकावत तिला म्हणालो,’ अजून किती दिवस तू अशा कविता करीत राहणार आहेस ? कवितेच्या पलिकडेही एक जग आहे हे कधीतरी तुझ्या लक्षात येणार आहे का ? नुसत्या कविता रचण्यात आयुष्य घालविणार आहेस का ? त्यावर कविता पणावलेल्या डोळ्यानी पण रागानेच म्हणाली,’ मी माझं आयुष्य कविता रचण्यात घालविण नाहीतर आणि कशात तुला काय करायचय ? पहिल्यांदा तू मला हे सांग तू माझी कविता का फाडलीस ? तिच्या या प्रश्नाला मी काहीच उत्तर न दिल्यामुळे ती अधिकच रागावली आणि रागाच्या भरात मला म्हणाली, आज तू माझ्या कवितेचे नाही तर माझ्या हृदयाचे हजार तुकडे केले आहेस. एक – एक अक्षर वेचून फक्त तुझ्यासाठी हो ! फक्त तुझ्यासाठी केलेली ती कविता होती, आज तू माझ्या फक्त मैत्रीचाच नाही तर माझ्या प्रेमाचाही अपमान केला आहेस. तू जर कधी कोणावर एक क्षणजरी प्रेम केले असतेस आणि त्या प्रेमावर कवितेची एक ओळ जरी लिहिण्याचा प्रयत्न केला असतास तर तुला समजले असते कविता करणे ते ही आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावर ! किती अवघड असते ते. तुझ्या सारख्या पाषाण हृदयी माणसाला कशी कळणार कवितेत लपलेली कोमळ भावना, तिच्यातून ओसंडणार प्रेम, तिच्यातील प्रत्येक शब्दात लपलेला विशाल अर्थ ! एवढे बोलून आपले पाणावलेले डोळे आपल्या नाजुक हाताने फुसत आपली आसवे बोटांवर जमा करत मागे वळून न पाहता कविता निघून गेल्यावर मला माझी चूक लक्षात आली होती. कविताची प्रत्येक कविता फक्त माझ्यासाठी होती हे माझ्या लक्षात आले होते पण मी कवितेच्या कवितांचा अर्थ कधी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नव्हता, बिचारी कविता ! मला तिच्या कवितांचा अर्थ आज कळेल उद्या कळेल या आशेवर जगत होती. पण आता मी कवितेच्या कवितांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार होतो. बराच प्रयत्न करून मी कविताची कविता ज्या वर्तमानपत्रात छापून आली होती ते वर्तमानपत्र मिळविले आणि त्यातील कवितेची कविता मनापासून काळजीपूर्वक वाचली त्या कवितेत एका तरुणीने आपल्या प्रियकराबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. कविताच्या त्या भावना अर्थातच माझ्याबद्दलच्या होत्या. माझ्या गाढवपणामुळे कविता दुखावली होती आणि रागावलीही होती. नुसती माफी मागून अथवा तिच्या हाता-पाया पडूनही तिचा राग जाण्यातला नव्हता. तिचा राग दूर करण्याचा मला एकच मार्ग दिसत होता तो म्हणजे तिच्यावर एखादी सुंदर कविता लिहून तिच्या समोर सादर करून तिची माफी मागण्याचा. मराठीवर माझंही बर्‍यापैकी प्रभुत्व होतं पण कविता लिहणं जरा जडच वाटत होतं. एक आठवडाभर प्रयत्न करून शंभर पाने खराब झाली तरी कविता काही लिहून होत नव्हती. तेंव्हा माझ्या लक्षात आले कविता लिहिणे येड्या- गबाळ्याच काम नाही. कविता हृदयातून निर्माण व्हावी लागते तशी ती निर्माण झाली तरच कागदावर उतरते. पण हार मानेल तो नावाचा विजय ! कसला ? सरते शेवटी कवितेच्या कोणत्याच बंधनात न अडकणारी मुक्तछंदातील एक कविता मी लिहिली आणि एक दिवस कविताला एकठ गाठून तिची माफी मागत तिच्या समोर सादर केली ती अशी...

कविते !

आहेस प्राण तू

या वेड्या कविचा...

कवितेविना !

चालेल कसा श्वास ?

या वेड्या कविचा...

कवितेसाठीच आहे

देह जगी !

या वेड्या कविचा...

कवितेमुळेच होतो

कवितेचा कवी !

म्हणोनी सन्मान कवीचा...

माझी कविता ऐकल्यावर कविता गालात गोड हसली आणि मला म्हणाली,’ वेड्या ! तुला विनाकारण शब्दांची ओढाताण करून कविता करायची काही गरज नव्हती त्या ऐवजी माझ्यावरील प्रेमाचा अधिकार गाजवत तू मला कविता लिहण कायमच थांबवायला जरी सांगितल असतेस तरी मी ते हसत – हसत केले असते. त्यावर तिचा हात हातात घेत मी तिला म्हणालो,’ नाही ! कविता ! मी इतका निष्ठुर नाही, जसा तू माझा प्राण आहेस तशी कविता तुझा प्राण आहे, तुझा प्राण तुझ्याकडून मी कसा हेरावून घेऊ शकतो ? माझे हे शब्द ऐकताच कविताने मला प्रेमाने अलिंगन दिले आणि ओल्या आवाजात म्हणाली,’ विजय ! आज तू खर्‍या अर्थाने या कवितेचा कवी शोभतोयसं ...

.


Rate this content
Log in

More marathi story from Nilesh Bamne

Similar marathi story from Romance