कष्टाचे दिवस
कष्टाचे दिवस


दुपारचे तीन वाजले होते. आकाशात काळेभोर ढग जमले होते. सगळीकडे अंधार पसरला होता. शेतात बाजरीचे पीक बाळसे धरू लागले होते. पीकातील गवताचे तण काढण्यासाठी सहा बायका दहा वाजल्यापासून मजूरीने राबत होत्या. पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाज होता. अचानक ढगांचा गडगडाट व वीजेचा कडकडाट व पाऊस जोराचा सुरू झाला. भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यात सर्व बायका घराकडे निघाल्या. पावसाने त्या व सीताबाई भिजल्या होत्या. सीताबाईची तीन मुले होती. त्यात दोघे पायाळू होते. त्यांची तिला चिंता सतावत होती. विजेचा लखलखाट पाहून सीताबाई खूपच घाबरल्या होत्या. त्यातच तिने वीज पडताना पाहिली. देवा आता मला वाचव. सगळे तुझ्या हातात आहे. असे बोलत, बोलत सीताबाई वावरातून चिखल तुडवित अखेर गावात पोहचल्या. तिच्यासोबत असलेल्या बायकाही वाचलो एकदाचे म्हणून सीताबाईला शब्दाचा आधार देत होत्या.
सीताबाई घरी पोहचल्यावर मुलांना लोखंडाची पकड दारात ठेवा म्हणून सांगत होत्या. त्यामुळे वीज आत येत नाही याची सीताबाईला पक्की खात्री होती. त्यामुळे आपल्या मुलांना धोका पोहोचणार नाही असे वाटू लागले होते. एकदाचा पाऊस थांबला. परत उद्या आपल्याला काम मिळेल म्हणून सीताबाईला बरे वाटू लागले. पाऊस सतत पडल्यामुळे उपाशी राहण्याशिवाय पर्याय नव्हता. सारे कुटुंब तिच्या मजूरीवर जगत होते. सीताबाई त्या कुटुंबाची पोशिंदा होती.कधी, कधी सीताबाईला गिरणीतील खाली पडलेले पीठ आणून त्याची भाकरी करून कुटुंबाला पोसावे लागत असे. तिचे दुःख ती कुणालाही सांगत नव्हती. तिचे कष्ट हेच तिचा आधार होता. रडगाणे गात तिला जीवन नकोसे होते.