Neha Gosavi

Drama

3  

Neha Gosavi

Drama

कृष्णसखा

कृष्णसखा

5 mins
1.0K


ऋतु तिच्या मोबाईलवर एक कथा वाचत होती. मृगजळ असं काहीतरी नाव होतं कथेचं. कथेत नायिकेचा नवरा तिला वेळ देत नाही म्हणून ती सोशल मीडिया वर तिच्या मित्र-मैत्रिणींशी कनेक्ट होते, पण त्यातला एक जुना मित्र तिला पर्सनल वर मेसेज करतो, Hi पासून सुरुवात होते आणि सुरू होतो मग चॅटिंगचा खेळ. त्यातूनच मग बाकी बायकांसारखं आपला नवरा आपल्याला कसा खुश ठेवत नाही, त्याच्याकडे वेळच नाही माझ्याकडे लक्ष द्यायला, असे गाऱ्हाणे करते, नव्हे तो काढून घेतो. हळूहळू तो तिला आपली सवय लावतो. सकाळ, संध्याकाळ, उठता, बसता ती सतत त्याच्याच सोबत बोलत असते.


"मी त्याच्यासारखा नाही, मी माझ्या बायकोला नेहमी खुश ठेवेन."


"असा कसा वेळ देत नाही गं तो, इतकी सुंदर बायको असताना असं वागतं का कुणी?"


"बघ हा, बी केअरफुल, कदाचित बाहेर त्याचं काही..."


"मी तुलाच मागणी घालणार होतो गं, पण तूच लवकर लग्न केलं, पण आताही तू मला तेवढीच आवडते आधी सारखी... येशील का माझ्या कडे?" असं बोलून बोलून लवकरच नायिकेच्या मनाचा ताबा मिळवतो आणि काही दिवसांनी तिच्या शरीराचा. त्याची गरज संपल्यावर निघून जातो आणि तिला सारखं टाळतो. तिला जेव्हा कळता तिच्या सोबत काय झालंय तेव्हा ती सैरभैर होते. नवऱ्याला हा प्रकार कळतो तेव्हा तो घटस्फोट घेऊन संसार मोडतो.


हे सगळं वाचून ऋतुच्या अंगावर काटा आला. थोडा मोबाईल स्क्रोल केला तेव्हा WhatsApp चा पॉप अप होता, कार्तिकचा मेसेज आला होता. 


कार्तिक तिचा एक्स बॉयफ्रेंड... लग्ना आधी एकमेकांवर प्रचंड प्रेम, पण जातीबाहेरील असल्यामुळे लग्न होऊ शकत नाही म्हणून दोघेही mutually वेगळे झाले. नंतर हिचं लग्न झालं तरीही अधून मधून लहर आली, आठवण आली की ते पिंग करायचे पण ते ही फक्त कशी आहेस, काय करतेस एवढ्या पुरतंच मर्यादित. ती लिमिट त्यांनी कधीही क्रॉस केली नाही.


तिने मेसेज ओपन केला.

"Hi... कार्तिक here..." 

"Hey... number save ahe तुझा..."

"अच्छा? मला वाटलं delete केलंस की काय?"

"असं कसं होईल, काहीही."

"बाकी काय म्हणते? कशी आहेस?"

"मी ठीक..."

"पिल्लु कसं आहे तुझं?"

"ती पण ठीकच."

"आणि नवरोबा काय म्हणतो, खायला प्यायला घालते ना त्याला बरोबर? की उपाशी पाठवते?"

"तो आणि उपाशी... बरोबर काळजी घेते मी त्याची... पण तो आहे की... असो... तू बोल काय म्हणतो..."

"काय झालंय ऋतु? खुश तर आहेस ना?"

"Hmm"

"Aga? बरं belated happy Anniversary..."

"Tq"

"काय झालं तू खुश नाही दिसत आहे..."

"कंटाळा आलाय यार कार्तिक मला सगळ्या गोष्टींचा..."

"आता काय झालं? Everything is fine?"

"नाही ना..."

"Oh no... if you don't mind, may I call you? मला तुझा आवाज ऐकायचा आहे ऋतु..."

"Hmm थांब मी करते फोन..."


दुसऱ्या मिनिटाला तिने फोन केला आणि त्याने क्षणार्धात उचलला.

"काय झालं ऋतु? काही प्रॉब्लेम आहे का? हे बघ काही असेल तर आपण दोघे मिळून solve करू." 

ऋतु ने विचार केला... हे तर त्या गोष्टीतल्या सारखं होतंय.. नाही आपण फसायचं नाही... 


"Hello hello, 

ऐकतेयस ना ऋतु? मंदार नीट वागतोय ना तुझ्यासोबत? तुला काही त्रास तर नाही ना? हे बघ तुझं लग्न झालेलं असलं तरीही मला तुला आनंदी झालेलं बघायचं आहे. तू माझ्या सोबत असशील तरीही किंवा नसशील तरीही."


त्याच्या या बोलण्याने ती लगेच पाघळली आणि म्हणाली,

"नाही ना कार्तिक, मंदारचं माझ्यावरच प्रेम कमी होतंय असं वाटतं मला. तो वेळच देत नाही मला. कुठे घेऊन जात नाही. फक्त घर ऑफिस, ऑफिस घर... सुट्टीचा दिवस असला तरीही आराम करायचा म्हणून टीव्ही समोर पडून असतो, सुस्तावलेला असतो किंवा तासन् तास आई-वडिलांशी फोनवर बोलत बसतो. माझं लाईफ माझं राहिलंच नाहीये... मुलगी लहान आहे म्हणून नोकरी सोडून घरी बसली तर सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत फक्त काम आणि काम. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी पण सुट्टी नाही घेतली त्याने, रात्री घरी आला, एक गिफ्ट आणलं होतं आणि झोपून गेला. खरंच आता असं वाटतंय, माझं लग्न तुझ्यासोबत झालं असतं तर जास्त सुखी असते मी."


ऋतु भडभड बोलून गेली, त्या निमित्ताने तिच्या मनातील भावना तरी रित्या झाल्या.


कार्तिकने बोलायच्या आधी थोडा विचार केला.


"हे बघ ऋतु, मी त्याला ओळखत नाही... पण मला असं वाटतंय तो चांगला माणूस आहे... सुट्टीच्या दिवशी तो त्याच्या आई-वडिलांबरोबर बोलतो याचा अर्थ त्याचं त्यांच्यावर प्रेम आहे, मग असा मुलगा जो आपल्या आई-वडील वर प्रेम करतो, तो किती मेहनत करतो महिनाभर, कोणासाठी? तो आपल्या बायकोला तरी कसा दुःखी होऊ देईल. तर तुमच्याच संसारासाठी ना? स्वतःच्या हिमतीवर घर घेतलं, गाडी घेतली कोणासाठी? तुमच्याचसाठी ना.. तुझं frustration अगदीच समजू शकतो. पण तूही त्याला समजून घे. या सगळ्या गोष्टी ज्या मला सांगितल्या त्या त्याला प्रेमाने सांगून बघ, भांडून एकही गोष्ट साध्य होणार नाही. मला सांग, त्याने तुझा एक तरी शब्द आत्तापर्यंत खाली पडू दिलाय का?"


"नाही... पण... तो मग नीट बोलत का नाही? आल्यावरही सारखा मोबाईलला चिकटलेला असतो."


"अगं हो, पण जर तो तुझा एकही शब्द खाली न पडू देण्यासाठी इतकी मेहनत घेतोय तर त्याला जेवढा वेळ मिळतोय त्यातून थोडासा आनंद मिळू दे ना, त्याचा त्याचा "me time" मिळू दे ना. तो त्याचा "me time" enjoy करताना तूही तुझा "मी time" enjoy करत जा... सर्वात महत्वाचं म्हणजे... जे तुझ्याकडे आहे, नवरा, मुलगी त्यांच्या सोबत कायम खुश रहा. म्हणजे तू खुश दिसली की तुझी मुलगी आणि मंदार दोघेही खुश राहतील... मंदारला काम करताना दडपण येणार नाही. आणि त्याच्या डोक्यावरचे केस शिल्लक राहतील... एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो... जय हिंद-जय भारत..."


त्याच्या या बोलण्यावर ती मनसोक्त हसली... मनातला साचून ठेवलेला नवऱ्याबद्दलचा मळ तिच्या हास्य प्रवाहात वाहून गेला होता. 


फोन ठेवल्यावर तिला आनंदच झाला होता, फक्त मंदारच्या बाजूने तो बोलला याचं तिला खूप कौतुक वाटतं होतं. तिने विचार केला... कार्तिक होता म्हणून नाहीतर दुसरं कोणी असतं तर त्या कथेतल्या नायिकेसारखं आपल्याला पण कोणीतरी गोड बोलून फसवलं असतं... पण कार्तिक अजूनही तसाच आहे, आपली तेवढीच काळजी घेणारा, व्यवस्थित समजावून सांगणारा, तिला कधीही चुकू न देणारा, चुकत असली तरीही लगेच सावरून घेणारा... लग्नाआधी उगाच नाही ती त्याला कृष्णसखा म्हणायची... तेव्हा तो तिला म्हणायचा... बघ हं, कृष्णसखा म्हणतेस मला, पण राधासारखं तू सुद्धा मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी छोटीशी जागा द्यायची मला जन्मभरासाठी... आज ती जागा त्याने मिळवली होती... नक्कीच.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama