जन्मवेळ
जन्मवेळ


दुपारी एक वाजून वीस मिनिटांची वेळ, न्यूयॉर्क मधल्या एका भव्यदिव्य सभागृहात त्याने जगप्रसिद्ध असा मानाचा जीवशास्त्रातला पुरस्कार स्वीकारला.
हीच ती वेळ दुपारी एक वाजून वीस मिनिटांची, जेंव्हा त्याने 45 वर्षांपूर्वी भारतातल्या एका खेड्यात जन्म घेतला होता. एक अपंग म्हणून. जन्मतःच त्याचा एक पाय निकामी आहे असे डॉक्टरांनी सांगीतले आणि त्याच्या आई वडिलांवर जणू आभाळ कोसळलं.
मध्यमवर्गीय असलेले त्याचे आईवडील करून करून काय करणार होते? वडिलांनी चार ओळखीच्या ठिकाणी त्याच्या कायमस्वरूपी इलाजाबद्दल विचारून बघितले.आईने तडक जोतिष्याचा मार्ग पकडला. "याची जन्म घेण्याची वेळच चुकली हो, एक च्या ऐवजी बाराची वेळ असती तर शास्त्रज्ञ झाला असता तुमचा मुलगा. आता साधा दहावी झाला तरी खूप आहे."
जसा तो मोठा होऊ लागला तसा जोतिश्यावर प्रचंड विश्वास असलेली ती भोळी माऊली त्याला खडे बोल ऐकवू लागली."आमचंच दुर्देव आमच्या पोटी जन्म घेतला तू. अरे थोडा आधी जन्मला असतास तर काय बिघडलं असतं तुझं?" हे असं तिचं बोलणं ऐकून त्यालाही आता त्या जन्मवेळेवर राग येऊ लागला होता. आधीच अपंग, काही प्रमाणात दुसऱ्यावर अवलंबून, आईचं परिस्थितीला वैतागून जिव्हारी लागेल असं बोलणं आणि शाळेत काहींच्या नजरेत कीव तर काहींच त्यांचाकडे बघून हसणं यासगळ्यामुळे त्याच मनोधैर्य खचत होतं. अभ्यासातून लक्ष पूर्ण उडालं होत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही तो काठावर पास झाला. "आता बोर्डात काय दिवे लावणार, तरीच ते जोतिष्यी म्हणाले होते साधा दहावी झाला तरी खूप आहे म्हणून." त्याची नववीची गुणपत्रिका बघून आई म्हणाली. त्याने घड्याळात बघितलं दुपारचे बारा वाजून वीस मिनिटं झाली होती.
अजून एक तास आहे आपल्याकडे, ज्या वेळेस या जगात आलो त्याच वेळेस या जगातून जायचं असा चमत्कारिक विचार त्याच्या डोक्यात आला. चिडून त्याने कुबडं हातात घेतले आणि रागारागातच घराच्या बाहेर पडला. नेमकं काय करायचं आहे त्याला माहित नव्हतं फक्त संपवायचं आहे स्वतः ला आणि त्याच वेळेस ज्या वेळेस आपण जन्मलो.
रस्त्याने चालता चालता एका छोट्याश्या उद्यानाच्या बाकेवर त्याला एक चांगल्या घरातली डोळे नसलेली वृध्द व्यक्ती लहान मुलांना फुगे देताना दिसली. कोणीही यायचं त्यांच्याकडे आणि ते त्या मुलांना हसत हसत फुगे द्यायचे.
अजून एका तासाला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ होता. असाच वेळ घालवावा म्हणून तो त्यांच्याकडे जाऊन बसला. बोलता बोलता त्याने त्यांची चौकशी केली. त्यातून त्याला कळलं की ह्याचे कार अपघातात दोन्हीही डोळे गेलेले. घर गडगंज श्रीमंती, बायको, मुलगा, मुलगी, सून, नातवंडांनी गजबजलेलं. जेवढं कमवायच होतं ते कमवून झालेलं. "एवढं सगळं ज्यांच्या साठी कमावून ठेवलं ते आता डोळे गेल्यावर विचारतही नाहीत. सगळ्यांवर अवलंबून राहाव लागतेय. कंटाळून मुलगा संध्याकाळी मला इथे आणून सोडून देतो, दोन तीन तासांनी परत घेऊन जातो घरी. ठरवलं होतं, एकदा पोरांची लग्न झालीत की जग भ्रमंती करायला जाऊ. पण कसलं काय हे सगळं बघायला आता डोळेच नाहीयेत. कुठल्या मुहूर्तावर जन्म घेतलाय मी देव जाणे. देवानी जन्मांधळ बनवलं असत तर बरं झालं असतं, कमीत कमी आपले कोण परके कोण हे तरी कळालं असतं आणि त्यातूनच मग मी आपलं विश्व निर्माण केलं असतं. आता या वयात माझ्याकडे असा कुठलाही पर्याय नाहीये. "
ते असं म्हणाले आणि याचे डोळे खाडकन उघडले, डोक्यात प्रकाश पडला.
वेळच ती, कधी कशी कोणावर सांगून येईल कळत नाही. त्यांची नंतर चुकली आणि आपली आधी, त्यांनी आधी कमावलं तर आपण नंतर कमवणार नाही कशावरून? जन्मवेळ चुकली, त्यामुळे एक पाय नाहीये मान्य पण नशीबच खराब आहे कशावरून? फक्त एकच पाय नाहीये ना बाकी सगळंच तर चांगलं आहे.
कुठेतरी वाचलंय, देव जर एखादी गोष्ट कमी देत असेल तर त्याही पेक्षा जास्त दुसरं काहीतरी देतो, ते फक्त ओळखता आलं पाहिजे.
काय म्हणाले होते ते महाराज, दहावी पास झाला तरी खूप आहे, म्हणजे दहावी नापास होणार असं तर नाही ना.
चला, आता पूर्ण एक वर्ष हा खेळही खेळुनच बघू, असं म्हणून तो उठला आणि घरी आला. घरी आल्यावर त्यानी त्याच्या दहावीच्या सेकंड हँड पुस्तकाचं पहिलं पान उलटवलं, तेंव्हा घड्याळीत काटे त्याच्या जन्मवेळेवर येऊन थांबले होते.
वर्षभर त्याच्या डोक्यात फक्त आपल्याला नशिबाला दिलेलं आव्हान जिंकायचं आहे हेच होतं. परिणामी तो बोर्डात पहिला आला. तो नशिबाने दिलेलं आव्हान, वर्षभरापूर्वी चालू केलेला खेळ जिंकला होता आणि हाच नशीबापुढे जिंकण्याचा खेळ तो आता जन्मभर खेळणार होता.