Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Neha Gosavi

Romance Others


4.8  

Neha Gosavi

Romance Others


विश्वास

विश्वास

6 mins 892 6 mins 892

"बाय बाय.." म्हणत ऋतुने आपल्या दोन्हीही मुलांना बस मध्ये बसवले. आज तिची मॉर्निंग वॉक ला जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. खरंतर मॉर्निंग वॉक वरून आल्यावर तिला तजेलदार वाटायचं, अर्धा तास चालल्यानंतर घरी यायचं, सकाळचा दुसरा चहा आणि लगेच ऑफिस ची तयारी करायची. नवरा मंदार दूर कुठेतरी ऑफिसने सोपवलेली कामगिरी बजावण्यात निघून गेलेला, वर्षातून एक दोनदा यायचा पंधरा दिवसांसाठी, बायको मुलांना अधून मधून फोन आणि ऋतू एवढ्यावरच समाधानी. दिवसभराचा एवढा प्रचंड कामाचा व्याप आणि मुलांची जबाबदारी ती अतिशय चोख बजावत होती. घर, मुलं, ऑफिस, परगावी असलेल्या सासू सासर्यांची आस्थेने विचारपूस, आईसोबतच तेवढ्याच उत्साहाने बोलणं आणि अधून मधून आपल्या जिवलग मैत्रिणीसोबत शॉपिंग च्या नावाखाली हुंदडण हे एवढंच जग होतं तिचं आणि तिलाही तेच हवं होत, सतत कामात गुंतवून घायची स्वतःला. एवढं सगळं व्यवस्थित चालू असूनही आज नेमकं एवढ उदास वाटावं. ही मरगळ आहे का आपल्या शरीराची की मळभ आहे मनावरचं? तिने स्वतःला चाचपडून बघण्याचा निरर्थक प्रयत्न केला, आणि स्वत:शीच हसली. छे, आज ऑफिस ला जाऊच नये, उगाच लक्ष नाही लागणार कामात, तशाही माझ्या बऱ्याच सुट्ट्या पेंडीग आहेत. तिने मस्त गरमागरम चहा करून घेतला आणि गॅलरीत येऊन उभी राहिली. सकाळचं रम्य वातावरण, पाऊस येण्याचे लक्षण साफ दिसत होते. तिने वर आकाशात बघितलं "हम्मम, आता काय, हा कधीही कोसळेल, येईपर्यंत सगळ्यांना अगदी जीवघेणी वाट बघायला लावतो आणि आल्यावर त्यांनाच कंटाळा येईपर्यंत भिजवतो,तसाच जसा मंदार मला त्याच्या प्रेमात. मग त्याला त्यावेळेस घरात कोणीही नको असते, अगदी मुलंही नाही मग काही दिवसांसाठी त्यांची रवानगी आई कडे. मग दोन तीन दिवस तेच ते, हातातून निघून गेलेल्या दिवसांचा हिशोब चुकता करणे. पण किती तो स्वार्थीपणा. जास्त पैसे मिळतात म्हणून काय एवढं लांब जावं माणसाने? आपल्या मुलांना नको का बापाचं सुख? रोज विचारतात बिचारे डॅडचा फोन आला होता का म्हणून. ते मुलं तर मुलं त्यांची काळजी घ्यायला मी आहेच, पण ह्याला आपल्या बायकोबद्दल काहिच नाही वाटत की तिलाही काही वाटतं असेल, तिच्याही काही अपेक्षा असतील, तिलाही वाटतं असेल चार चौघात नवऱ्यासोबत बाहेर जावं, मुलांचा अभ्यास घ्यावा, रोज रात्री सोबत जेवण करावं, की मंदार तू दुसरीकडे कुठे??... संशय..संयश घेते आहेत तू ऋतू त्याच्यावर? तुला कार्तिक ने दिलेलं चॅलेंज हरतेय ऋतू?? ते चॅलेंज वैगरे जाऊदे. .हा संशयच असू दे रे देवा..." म्हणत तिच्याही नकळत तिने मंदार ला फोन लावला. 

"The number you are trying to reach is currently unavailable , Please try again later." 

"नाही मंदार please, मला याआधी कधीच असं जाणवलं नाही आज का असं वाटतेय?" तिला आठवलं, दोन तीन दिवस झाले त्याचा कॉल नाही. तिने केला तर तो कामाच्या गडबडीत आहे, कामात आहे नंतर बोलतो म्हणून ठेवून द्यायचा. तिने पण त्याची परिस्थिती समजून घेतली पण आजच्या या ढगाळ वातावरणाने तिच्याही मनात संशयाचे ढग निर्माण झाले होते. तीने हळूच भूतकाळात डोकावून बघितलं. मंदारसाठी तिने कार्तिक ला सोडलं होतं. तसा कार्तिकला फक्त ती त्याची मैत्रीण समजायची पण तिचा एवढा दिलखुलास स्वभाव बघता त्याला पण ती आवडायला लागली. एकतर्फी प्रेम करायला लागला तो तिच्यावर आणि जगाला पण हेच दाखवायचा की ती त्याची फक्त मैत्रीण नाहीये म्हणून. मग काही दिवसांनी मंदार तिला भेटला आणि हळूहळू कार्तिक नि ऋतू मधलं मैत्रीचं नात संपुष्टात यायला लागलं. कार्तिकने ऋतूला हर प्रकारे समजवून सांगायचा प्रयत्न केला, त्याचं प्रेम व्यक्त करायचा प्रयत्न केला पण ती या त्याच्या कुठल्याच गोष्टींना बधली नाही. शेवटी कार्तिक ने तिच्याकडुन मी माझं तुझ्यावरचं प्रेम विसरायला तयार आहे पण प्लिज जन्मभर माझी मैत्रीण बनून राहा असं म्हंटल तेंव्हा ती त्याला नाही म्हणू शकली नाही आणि याचाच फायदा घेण्याचा त्याचा निर्णय ठाम झाला. मंदार आणि ऋतू, कार्तिक आणि त्याची एक मैत्रीण शाल्मली असे चौघ जण हळूहळू आउटिंग ला जायला लागले, डबल डेट च्या नावाखाली एकमेकांना भेटायला लागले. अशातच कार्तिकने मुद्दामहुन मंदार सोबत मैत्री केली. कार्तिक कधी कधी जाणूनबुजून मंदारच्या ऑफिसखाली जाऊन थांबायचा आणि त्याला कॉफी ला वैगरे घेऊन जायचा. एक दिवस असाच, कार्तिक मंदार च्या ऑफिसखाली येऊन त्याला लंच ला घेऊन गेला.

"तुला माहितीये मंदार, ऋतू भरली वांगी खूप मस्त करते."

"हो? नाही मला नाही सांगितलं तिने कधी."

"मला पण सांगितलं नव्हतं तिने कधी, पण एक दिवस तिने तिच्या घरी बोलवलं मला जेवायला, तिने स्वतः च्या हाताने माझ्यासाठी जेवण बनवलं होतं माझ्या आवडीचं." 

"अच्छा" मंदारने डोळे तिरपे करून कार्तिक कडे बघितलं.

"तिच्या आईला पण आवडायचो मी, त्यांनी तर माझा होणारा जावई म्हणून त्यांच्या नातेवाईकामध्ये घोषितच केलं होतं."

"हो? आणि ऋतू ला माहिती होतं हे?" त्याने टेबलवरच्याच पेपर नॅपकिन ला बोटं पुसत विचारलं.

"माहिती होतं म्हणजे काय? तिचं पण प्रेम होतं माझ्यावर पण तू आल्यावर बिथरली बिचारी, तिला नेमकं कोण हवंय कळलं नाही त्यामुळे तिने तुझा हात पकडला, नाही तर तुला हो म्हणायच्या एक दिवस आधी तिने माझ्याकडे कबुली दिली होती माझ्यावरच्या प्रेमाची. पण तो पर्यंत मी शाल्मली ला कनेक्ट झालो होतो रे. काय माहिती तिचं बिचारीच तुझ्यावर खरंच प्रेम आहे की नाही, मला तरी आपण भेटलो की तिच्या डोळ्यात माझं प्रेम दिसते."

"हम्म, तर असं आहे ते, मग तुला काय वाटत? मी काय करायला हवं या situation मध्ये? मी ऋतू ला सोडायला तयार आहे, तसही मला काही इंटरेस्ट नाही तिच्यात. मी पण हाच विचार करतोय, तिला कसं सांगावं.." 

"काय? मग असं असेल तर तू तिला सांगायला हवं हे सगळं..तीला सुरुवातीला थोडं वाईट वाटेल, पण मी आहे ना, मी सांभाळून घेईल." कार्तिकच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. 

"मग थांब, तू पण इथेच आहेस, मी तिला बोलवून घेतो इथेच" असं म्हणत मंदार ने ऋतू ला फोन केला.

"ऋतू आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिसजवळच्या कॅफेटेरियात ये मला भेटायला, खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी." 

ऋतू अर्धा तासातच तिथे पोहचली, त्या दोघांना सोबत बघून मनातून घाबरली, कार्तिक चेहऱ्यावरून खूष वाटत होता आणि मंदार गंभीर.आता परत कार्तिक ने काही तरी घोटाळा केलाय नक्कीच..तिच्या मनाने ताडले. ती आली तसा मंदार तिच्याकडे गेला, आणि कार्तिक उठून उभा राहिला. काही बोलायच्या आधी मंदार ने कार्तिककडे बघितलं. कार्तिकनेही डोळ्यांची उघडझाप करून त्याला बोल असा इशारा दिला. 

"काय झालं मंदार?" - ऋतू

"सॉरी ऋतू पण मला तुझ्यासोबत ब्रेकअप करायचा आहे.." - बोलताना त्याने एक तिरपा कटाक्ष कार्तिक वर टाकला, त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आणि ऋतूच्या डोळ्यात अश्रु

"काय बोलतोस मंदार? Please don't do this with me."

"करावं लागेल ऋतू मला, आपल्यातलं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड च रिलेशन ब्रेक करावं लागेल ऋतू आता."

"म्हणजे? काय बोलतोय तू? तुझं तुला तरी कळतंय का? हे असं अचानक...?" आणि काही क्षणातच मंदार आपल्या एका गुढघ्यावर बसला आणि तिच्यापुढे त्याच्या हातात असलेल्या अंगठीचा बॉक्स धरला.

"आपल्याला लग्न करण्यासाठी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच नातं संपवाव तर लागेल ना ऋतू? ऋतू will you marry me?"  

आणि ऋतूच्या अश्रूंच रूपांतर आनंदाश्रूत झालं आणि तिने हो म्हंटल.

कार्तिकचा चेहरा आता खरकन उतरला होता, तो आता दोघांशीही नजर मिळवू शकत नव्हता... मंदार ने ऋतूचा हात पकडला आणि तिला कार्तिककडे घेऊन गेला.

"कार्तिक, तू मला काहीही सांगितलं असतं ना ऋतू बद्दल तरी मी ते ऐकून घेतलं असतं पण तिचं माझ्याऐवजी दुसऱ्या कोणावर प्रेम, कधीच नाही, माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर, तिच्या माझ्यावर असलेल्या प्रेमावर. कळलं?"

"कळलं मंदार, पण ऋतुवर असलेल्या तुझ्या प्रेमाचं काय, तिचा आहे का एवढा विश्वास तुझ्यावर? मी चॅलेंज देऊन सांगू शकतो की आता नाही पण कधी ना कधी तिच्या मनात तुझ्या प्रेमाबद्दल संशय निर्माण होईल."

"असं होणारच नाही कधी, तिच्या मनात संशय येईपर्यंत मी ती संशयाची जागा माझ्यावरच्या तिच्या विश्वासाने भरून काढेल." असं म्हणून मंदार ऋतूचा हात हातात घेऊन बाहेर पडला. जाताना त्याने कॅफेचं दार धाडकन बंद केल होतं, त्या आवाजाने आजही ऋतूची तंद्री भंगली.

एक मिनट हा आपल्या दाराचा आवाज होता, असं म्हणत ती मागे वळून बघणार तोचं मंदार ने तिला मागून अलगद मिठी मारली. 

"मंदार? तू यावेळेस, आत्ता? What a pleasant surprise!"

"एअरपोर्टवरून आधी तुझ्या ऑफिसलाच गेलो होतो, तिथे कळलं तू आज सुट्टी घेतलीयेस, मग आकाशात बघितलं, म्हंटल हम्म, या वातावरणात तू मला मिस करत असशील म्हणून आलो तिथून पळत पळ घरी"

"पण तुझं जॉब?"

"आलो सगळं सोडून, बास झालं आता लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप, नवीन जॉब मिळाला इथे, हा थोडे पैसे कमी मिळतायत, पण सोन्यासारखे मुलं आणि बायकोसमोर ते काहीच नाहीये. आणि...हा..हा..एवढा लांब होतो, कामात व्यस्त होतो, तुझ्या मनात माझ्याबद्दल काही संशय आला असता तर कार्तिक ते चॅलेंज जिंकला असता ना.." म्हणत मंदार ऋतूच्या हातावर टाळी देत हसायला लागला आणि ऋतूही मनातून सुखावली.."कार्तिक ने दिलेलं चॅलेंज खरंच हरता हरता जिंकलास तू मंदार..त्यादिवशीच तुझं म्हणणं खरं केलंस..तुझ्यावरच्या संशयाची जागा तू विश्वासाने भरली आहेस आता." 


Rate this content
Log in

More marathi story from Neha Gosavi

Similar marathi story from Romance