कृष्ण बाधा.
कृष्ण बाधा.


प्रिय...
आज मनाची अवस्था खरच खुप वेगळिये. तू म्हणशील तुझं काहीतरीचं असतं. नेहमी. नाही रे. काय सांगू न कस तेच कळेना. शब्द जुळवतेय फ़क्त...
म्हणजे बघ ना काठोकाठ भरलेल भांड हिंदकळल की जरास सांडत. तेव्हा इतकं सगळ असून ही थोडसं गमावल्याच् दुःख वाटतं हो न?
मला ना रितेपण जाणवतोय की उणीव? अजून नक्की नाहीच समजल म्हण. पण एक सांगू तुझ्यातल्या तुला माझ्यात सामावून घ्यायला खूप तोकडे पड़तायेत् माझे हात. अगदी आभाळ मिठीत घ्यायला पडतात तसे...
तुझी आभाळमाया जाणवते रे. पण कवेत नाही घेता येत तुला. किती जवळ असतोस. पण क्षितीजा सारखा मी जवळ आले की तू तेवढाच लांब. फक्त भास्. तुझं अस अधांतरी अस्तित्व तरीही माझचं आहे माहितिये मला. पण हा अमूर्तते चा शाप... हो शाप च ना? कारण तडफड होते रे जीवाची. असून ही नसणं पण सगळ अस्तित्व व्यापून उरणं काय म्हणायच याला?
मीरेच भाग्य की राधेच प्राक्तन?
दोघीं सारखीच मीही नाही का? त्या नाही का कृष्णाच्या अस्तित्वाला चिकटुन असल्या तरी तो किती वाट्याला आला त्यांच्या हा ही अनुत्तरित प्रश्नचं... उत्तर कदाचित त्या दोघीं कडेही नसाव. त्याचं उत्तर हेच तो अंतर बाह्य व्यापून उरला होता त्यांना वेगळे पण नव्हतं च पण खरच हे अद्वैत जितक म्हणायला सोप तितक जगायला सोप आहे? माझ्या सारख्या सर्व सामान्य व्यक्ति ला नक्कीच नाही तस पाहिल तर काय हवय रे जगायला. प्रेमाची फ़क्त जाणीव. क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पड़ो मरणाचा. ही जाणीव तू कधीच दिलिएस मला. पार समृद्ध करुन टाकलस न खूप भरभरुन दिलयस सुद्धा पण तुला सांगू मायेच पांघरुण मिळालं ना की मग त्या उबेची इतकी सवय होते की नुसत ते सरकल्याची भीति सुद्धा पोरके पणा ची जाणीव करुन द्यायला लागते. मला नाही रे पोरक व्हायच कधीच...
तुझ्या सोबत प्यायलेला चहा आपण एकत्र बसून मारलेल्या गप्पा तुझ्या तळहातांचा तो मऊ उबदार पण आश्वासक स्पर्श आणि तुझ्या डोळ्यातला प्रेमाचा पाऊस तुला मारलेली पाठमोरी मिठी. अन् तुझ्या ओठांची साखर साय. तुझ्या मिठीत स्वर्ग आहे. एक चिरंतन सुख. जगातल्या कोणत्याही मौल्यवान वस्तू, दागदागिने, हिरे माणकं कशाचीच तुलना ह्या सुखाशी नाही होऊ शकत. ते सुख लेवून तुझ्याच मनाच्या आरशात स्वत:ला न्याहळत राहायचय मला.
आणि हो...स्वप्न ही आहेत बरका. यादी थोड़ी मोठ्ठी च आहे म्हणजे बघ. हाआता पड़तोय ना तशा सतत कोसळणार्या पावसात चिंब भिजायचय मला. तुझ्या सोबत. गालावर पावसाच्या थेंबां सोबत तुझ्या ओठांच्या मोहरा सुद्धा ओघळायला हव्यात मनसोक्त.
आणि मग गरम गरम वाफळणारा चहा एका कपातून प्यायचाय. जमल च तर भुट्टा न भजी सुद्धा खाऊया हा. आणि ऐक ना आपण ना समुद्रावर जाऊ तेव्हा त्या मऊशार वाळूतून चालत जाऊ अनवाणी...एक खोपा वाळूचा तुझ्या माझ्या पायांभोवती बांधायचा. पांढऱ्या शुभ्र फेसाळणाऱ्या लाटेत खूप खूप भिजायच. कधीतरी गर्द हिरव्या झाडीत पायवाटेने चालत जाऊ दूरवर. छोटी छोटी निळी जांभळी गवतावर डोलणारी फुलं अन सभोवार दाटलेल धुकं. कमरेभोवती तुझ्या बाहूंचा विळखा, अजून काय हव रे. तिन्ही सांजेला तुळशी समोर न देवा समोर सांजवात लावताना हात जोडून तू शेजारी उभा असशील मंगल्याचा अन सौभाग्यचा प्रकाश घेऊन. कोणत्याच काळोखाला भिणार नाही तेव्हा मी. अंगणभर पसरलेला रातराणी चा गंध. खिडकीशी बहरलेला मोगरा न पहाटवेळी केशर लेवून रीता झालेला प्राजक्त. रात्रभर तुझ्या हाताची मऊ उशी अन् तुझ्या कुशीत तृप्त होऊन गंधाळलेली स्वप्न पापण्यात ठेवून निजलेली मी, डोळे उघडले की समोर दिसेल तुझा निरागस गोड चेहरा माझ्या उगवणाऱ्या दिवसाची हसरी सकाळ घेऊन.
ये... स्वप्न रंजन पुरे झालं ...मनाने कितीही गुलाबी थंडीत रहायच ठरवल तरी वास्तवाची झळ लागली की बाहेर कडकडित उन आहे ह्याची जाणीव होतेच ना...निळ्या शार आभाळा सारखा विशाल... निळ्या भोर सागरा सारखा गहिरा...निळ्या मखमली मोरपिसासारखा हळुवार अन निळ्या सावळ्या कृष्णासारखा मला अंतर बाह्य व्यापून उरणारा तू...माझा सखा...कृष्णसखा. जेव्हा जेव्हा तुझ्या वास्तव जगातून माझ्या आभासी विश्वात येशील ना तेव्हा तेव्हा काळजाच्या मखमली पायघड्या अंथरलेल्या दिसतील तुला न पंचप्राणाची आरती अन डोळ्यातले मोती तुझ्यावरुन ओवाळताना मंगळसूत्राच्या काळ्यामण्यात तुला बांधून ठेवील तुझी ही राधा...तुला चालेल ना?
तुझीच ‘मी’