Viral Video प्रसारण Viral Video प्रसारण

Horror

2.1  

Viral Video प्रसारण Viral Video प्रसारण

Horror

कॉल

कॉल

14 mins
1.5K


"आईच्या गावात...!! ड्रॉप पडला."

कॉम्प्युटरवर ऑनलाईन रिजल्ट पाहताना उमेश कपाळावर हात मारून ओरडला.


'उमेश', इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी... नुकताच त्याचा दुसऱ्या वर्षाचा निकाल लागला होता आणि अनपेक्षितपणे त्याचे चार विषय राहिले होते. ज्यामुळे तो वाय. डी. म्हणजेच नापास झाला होता. कॉम्प्युटर स्क्रीनवर रिजल्ट पाहिल्यावर उमेशचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्याने दोन-तीन वेळा रिफ्रेश करून चेक केलं, त्याचा रोल नंबर पुन्हा-पुन्हा टाकून चेक केला, पण रिजल्ट काही चेंज झाला नाही. आता मात्र त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली, डोकं गरगरू लागलं होतं, कपाळावर आणि नाकावर घामाचे थेंब साचू लागले होते. 


'उमेश' छोट्याश्या गावातून आलेला मुलगा... गुणवंत आणि हुशार विद्यार्थी म्हणून गावामध्ये त्याचा नावलौकिक... बारावीमध्ये चांगल्या गुणांच्या बळावर मेरिटमध्ये नंबर काढून त्याने पुण्यातील नामवंत कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतले होते, पण रूममेट्सची संगत आणि शहरातली हवा त्याच्या डोक्यात शिरली आणि व्हायचं तेच झालं. उमेशचं लक्ष अभ्यासात कमी आणि बाकी गोष्टींमध्ये जास्त राहू लागलं. कसंबसं त्याने पाहिलं वर्ष क्लिअर केलं होतं, पण दुसऱ्या वर्षाच्या जाळ्यात तो सफाईदारपणे अडकला होता. उमेशला आता या सगळ्या जुन्या गोष्टी आठवून खूप पश्चाताप होत होता. पण वेळ आता त्याच्या हातातून निघून गेली होती. त्याच्या हातामध्ये आता काहीच राहिले नव्हते.


रात्र झाली होती, रमेश त्याच्या रूममध्ये एकटाच लाईट बंद करून, मान खाली घालून बसला होता. थोड्या वेळाने त्याचे रूममेट्स 'अजय' आणि 'गणेश' आले. अजयने लाईट लावताच त्यांची नजर उमेशवर पडली. उमेशची हालत पाहून दोघांना त्याची दया आली.


"अssय उम्या, अर्रर्रर्र नको लय टेन्शन घेऊस भावा." 

अजय उमेशला समजावण्याच्या सुरात बोलला, पण उमेशने त्यांच्याकडे मान वर करून सुद्धा पहिले नाही. तो तसाच बसून होता.


"बरं, उम्या चल जेवायला जाऊ नाहीतर मेस बंद होईल." 

गणेशने विषयांतर करून उमेशशी बोलण्याच्या प्रयत्न केला, पण उमेशचं एक नाही कि दोन नाही. तो तसाच बसून होता.


"अर्रर्रर्र चल की राव..." गणेशने उमेशच्या दंडाला धरून त्याला ओढण्याचा प्रयत्न केला.


"तुम्ही जावा मी येतो मागून." गणेशचा हात झटकत उमेश त्यांच्याकडे पाहून बोलला.


परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अजय आणि गणेशने एकमेकांना खूण करून तिथून काढता पाय घेतला.


तसं म्हणायला गेलं तर अजय आणि गणेशचासुद्धा निकाल चांगला लागला नव्हता. दोघांचे प्रत्येकी तीन-तीन विषय राहिले होते, पण ते दोघेजण पास झाले होते. उमेश त्याच्या विचारांमध्ये गुंतला होता तोच त्याच्या मोबाईलची रिंग वाजते. त्याचे मोबाईल स्क्रीनकडे लक्ष जाताच त्याच्या काळजाचा ठोका चुकतो. तो थरथरत्या हाताने मोबाईल पकडतो, मोबाईलच्या स्क्रीनवर 'स्वीट होम' असं नाव झळकत असतं. मोबाईलची रिंग वाजत होती, फोन उचलू की नको या द्विधा मनःस्तिथीत उमेश पडतो.


"हॅलो", शक्य तितक्या शांत स्वरामध्ये उमेश बोलण्याचा प्रत्न करतो.


"हॅलो बाळा, कसा आहेस." पलीकडून येणारा त्याच्या आईचा प्रेमळ आवाज त्याच्या कानी पडतो. उमेशचा अश्रूंचा बांध फुटणारच असतो, पण स्वतःला शक्य तितकं कंट्रोल करून उमेश बोलतो,

"मी मजेत आहे आई...!! तू कशी आहेस..?? काय चाललंय तिकडं??"

"सगळं व्यवस्थित आहे बाळा, आज सरपंच आले होते घरी. लय नावजत होते तुला. म्हटले, एव्हडंच पोर आहे आपल्या गावातलं जे पुढे जाऊन आपल्या गावाचं नाव काढणार...!!" उमेशची आई एकदम भोळेपणाने उमेशला सांगत होती.


"हम्म्म्म" उमेश सगळ्या भावना मनाशी दाबून बोलला.


"तुझा आज निकाल लागणार होता ना, त्याचं काय झालं?" उमेशची आई उमेशला बोलली.


आता मात्र उमेश धर्मसंकटात पडला होता. खरं आणि खोटं यांच्या द्वंद्वामध्ये फसला होता आणि विजय एकाचाच झाला.


"पास झालो आई, छान मार्क पडले सगळ्या विषयांत." उमेश खोटेच बोलला.


"बाळा असाच मन लावून अभ्यास कर, आणि खूप मोठा हो..." उमेशची आई बोलली.


"हो" उमेशने निर्विकारपणे उत्तर दिले. 


"आता मी जातो जेवण करायला, मित्र बोलावत आहेत... उशीर होतोय... बाबांना पण सांग..!!" 


एवढं बोलून उमेशने फोन ठेवला आणि ओक्साबोक्सी रडू लागला. खूप वेळ एकटाच रडत होता तो. त्यालासुद्धा समजले नाही किती वेळ आपण रडत होतो ते, त्याच्या मनावर आता दडपण आले होते. आईचे शब्द त्याच्या कानावर वारंवार पडत होते. त्याला आता जबाबदारीची जाणीव होत होती. या सगळ्या विचारांमध्ये त्याला झोप कधी लागली हे त्याचं त्यालापण समजलं नाही.


दुसऱ्या दिवशी उमेशला जाग आली. त्याने ऊठून पहिले तर अजय शेजारच्या बेडवर झोपला होता आणि गणेश कॉलेजला जाण्याची तयारी करत होता. उमेशने डोळे किलकिले करून टाइम चेक केला तर सकाळचे आठ वाजले होते. त्याचं डोकं अजूनही त्याला जड वाटत होतं. कसाबसा तो उठला आणि जाग्यावरच बसून राहिला. गणेशने त्याला गुड मॉर्निंग विश केलं, तेव्हा कसंनुसं हसून उमेशने त्याला रिप्लाय दिला. 


उमेशचं आता कशातच व्यवस्थित लक्ष लागत नव्हतं, त्याचा चेहरा हिरमुसला होता आणि तो काहीसा अबोलच झाला होता. त्याची ही अवस्था अजय आणि गणेशला पाहावली नाही. ते दोघे उमेशला वेळ देऊ लागले, त्याला बोलकं करण्याचा प्रयत्न करु लागले. पण ते दोघे कॉलेजला गेल्यावर उमेश परत रूमवर एकटा पडू लागला आणि हा एकटेपणा त्याच्या जीवावर उठू लागला. घरी पण जायची त्याची इच्छा होत नव्हती आणि आता फोनवरसुद्धा तो घरी बोलणे टाळू लागला. 


त्याची ही अवस्था अजयकडून मेसच्या काकांना समजली आणि एकेदिवशी त्यांनी उमेशला गाठून त्याला पार्ट टाईम जॉब करण्याची आयडिया दिली, जेणेकरून उमेशचा वेळही जाईल, अभ्यासही होईल आणि हातामध्ये चार पैसेही येतील. उमेशला काकांची ही कल्पना आवडली आणि हॉस्टेलपासून जवळच असलेल्या नामांकित टेलिकॉलिंग कंपनीच्या कॉल सेन्टरमध्ये त्याने काकांच्या सांगण्यानुसार बारावीच्या बेसिसवर इंटरव्ह्यू दिला. अपेक्षेप्रमाणे उमेश सेलेक्ट झाला आणि थोड्याच दिवसांत तो जॉईनसुद्धा झाला. साधारणपणे पंधरा दिवसांच्या ट्रेनिंगनंतर त्याचं सिस्टिममध्ये 'कस्टमर केअर एक्सिक्युटिव्ह' म्हणून काम सुरू झालं.


उमेशचं काम आता व्यवस्थित चाललं होतं आणि जॉबवरून आल्यावर तो राहिलेल्या विषयांचापण अभ्यास मन लावून करत होता. कंपनीमध्ये त्याचे आता नवीन मित्रही झाले होते आणि रूममध्ये आल्यावर तो अजय आणि गणेशला कंपनीतले किस्से सांगू लागला. एकंदरीत त्याची गाडी आता बऱ्यापैकी रुळावर आली होती, तरीही नापास झाल्याचं आणि घरच्यांशी खोटं बोलल्याचं दुःख त्याच्या मनात घर करून बसलं होतंच.


नेहमीप्रमाणे उमेशचं सिस्टिमवर कानाला हेडफोन लावून कस्टमरचे कॉल अटेंड करायचं काम सुरू असतं. 


"नमस्कार, मी उमेश आपली कशाप्रकारे सहायता करू शकतो?"

आलेल्या कॉलला उमेश नेहमीप्रमाणे प्रतिसाद देत बोलला.


"माझी मदत करा प्लीज...!!, मला वाचवा...!! ही लोकं मला सोडणार नाहीत...!!!"

पलीकडून एका मुलीचा खूप घाबरलेल्या स्वरात आवाज येत होता.


अचानक झालेल्या या प्रकारामुळे उमेश दचकला. त्याने कॉम्प्युटर स्क्रीनवर पाहिले तर 'रेश्मा माने' असं नाव झळकत होतं.


"मॅडम, तुम्हाला तुमच्या सिमकार्डबद्दल काही माहिती हवी आहे का?", उमेशने कंपनीचे नियम पाळत उत्तर दिले.


कंपनीचे काही नियम होते, ज्यामध्ये कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह कंपनीशी संबधित माहितीव्यतिरिक्त दुसरे काहीही बोलू शकत नाही. त्यांचे सर्व कॉल रेकॉर्ड होत असतात आणि अशाप्रकारचे काही वर्तन केल्यास कंपनी त्या कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित करायची. त्यामुळे साहजिकच उमेश जास्त काही बोलू शकत नव्हता.


"माझी मदत करा प्लीज...!!, मला वाचवा...!! ही लोकं मला सोडणार नाहीत...!!!"

पुन्हा तोच आवाज उमेशच्या कानी पडला.


उमेशला वाटले कोणीतरी त्याची फोनवर मस्करी करीत आहे. कारण यापूर्वी सुद्धा उमेशला खूप वेळा असे 'Prank' कॉल आले होते, ज्यामध्ये कोणी त्याची चेष्टा करीत असायचे, तर कोणी त्याला शिव्या देत असायचे तर कोणी उगीच टाईमपास करायचे. पण कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हला उलट उत्तर देण्याची ऑथोरिटी कंपनीने दिली नव्हती त्यामुळे बिचारा उमेश हे सगळं निमूटपणे ऐकून घायचा.


"मॅडम, क्षमा करा तुम्हाला सिमकार्डबद्दल काही माहिती हवी आहे का?" उमेश उत्तरला.


"माझी मदत करा प्लीज...!!, मला वाचवा...!! ही लोकं मला सोडणार नाहीत...!!!" पलीकडून परत तोच आवाज आला.


आता मात्र उमेश फ्रस्ट्रेट झाला होता.

"क्षमा करा मॅडम, यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनला संपर्क साधा. आमच्याकडे कॉल केल्याबद्दल धन्यवाद, आपला दिवस शुभ असो..!!", असे म्हणून उमेशने फोन कट केला आणि बाकीचे कॉल अटेंड करण्यात तो गुंतून गेला.


साधारणपणे एका तासाच्या अंतरानंतर पुन्हा त्याच नंबरवरून उमेशला कॉल येतो.

"नमस्कार, मी उमेश आपली कशाप्रकारे सहायता करू शकतो?"उमेश नेहमीप्रमाणे बोलतो.


"माझी मदत करा प्लीज...!!, मला वाचवा...!! ही लोकं मला सोडणार नाहीत...!!!" पलीकडून आवाज येतो.


आता मात्र उमेश मनातून पुरता हदरतो. तोच नंबर, तोच आवाज आणि तेच वाक्य...!!

कंपनीमध्ये एकाच वेळेस जवळपास 100 ते 120 लोकं काम करत होते आणि एकदा एका एक्झिक्युटिव्हला कॉल आल्यानंतर पुन्हा त्याच कस्टमरचा कॉल त्याच एक्झिक्युटिव्हकडे येणं म्हणजे जवळपास अशक्यच असतं. उमेशला आता नक्कीच काहीतरी सीरियस मॅटर आहे असं वाटतं.


"एक काम करा मॅडम, तुम्ही माझा नंबर नोट डाऊन करा आणि माझ्या नंबरवर कॉल करा. इथे मी तुम्हाला अशी मदत करू शकणार नाही.", उमेश धीर एकवटून सगळं एका दमात बोलतो.


"तुम्हाला कॉल करण्यासाठी माझ्या मोबाइलमध्ये बॅलन्स नाहीये..." पलीकडून ती मुलगी रडतच बोलली.


"बरं ठीक आहे, मी तुमचा नंबर घेतलेला. मी तुम्हाला लगेच कॉल करतो. तुम्ही शांत व्हा प्लीज..." उमेश समजुतीच्या स्वरात बोलतो.


"ठीक आहे..!! लवकर कॉल करा." पलीकडून आवाज येतो आणि कॉल कट होतो.


उमेश ताबडतोब टीम लीडरची परमिशन घेऊन छोटा ब्रेक घेतो आणि कंपनीच्या बाहेर येऊन लागलीच 'तो' नंबर डायल करतो आणि कॉल कनेक्ट होण्याची वाट पाहतो.


"द नंबर यु ह्याव डायल्ड इज नॉट इन सर्व्हिस" हा आवाज उमेशच्या कानी पडतो. 


उमेश आश्चर्याने नंबर चेक करतो आणि परत तो नंबर डायल करतो, पण परत तोच मेसेज त्याला ऐकू येतो. उमेश एकदा नाही, दोनदा नाही, कित्येक वेळा तो नंबर डायल करतो पण कॉल काही कनेक्ट होत नाही. 


आता मात्र उमेश चक्रावतो. त्याचं डोकं ब्लॅंक पडतं. तसाच तो माघारी वळतो आणि त्याच्या चेअरवर बसून कॉल अटेंड करत बसतो. तो कॉल अटेंड करत होता पण त्याचं लक्ष कामावर अजिबात नसतं. त्याला राहून राहून त्या मुलीचा आवाज आठवायचा आणि आपल्याकडून त्या मुलीला मदत करायला उशीर तर नाही ना झाला, या विचाराने तो सुन्न पडतो.


जॉब सुटल्यानंतर उमेश घरी येतो आणि घडलेला किस्सा तो त्याच्या मित्रांना सांगतो आणि तो अजयला बोलतोही की आपण ही गोष्ट पोलिसांच्या कानी घातली पाहिजे. परंतु अजय उमेशला समजावतो की कोणीतरी तुझी थट्टा केली आहे, जर एखादी व्यक्ती संकटात असेल तर कॉल सेन्टरला कशाला फोन करेल. उमेशला अजयचं बोलणं पटतं आणि तरीपण तो त्या नंबरला कॉल लावण्याचा प्रयत्न करत व त्याची कामे उरकत झोपी जातो.


दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे उमेश सिस्टमवर कॉल अटेंड करीत बसलेला असतो, तोच पुन्हा त्याच नंबरवरून त्याला कॉल येतो.


"माझी मदत करा प्लीज...!!, मला वाचवा...!! ही लोकं मला सोडणार नाहीत...!!!"

उमेश काही बोलायच्या आत त्याला पलीकडून त्याच मुलीचा घाबरलेल्या स्वरात आवाज येतो.


उमेशला आता चक्करच यायची बाकी होती.

"अहो मॅडम, काल मी तुम्हाला कॉल करण्याचा कित्ती प्रयत्न केला पण तुमचा फोनच लागला नाही" उमेश शक्य तितक्या परीने शांत राहून बोलला.


"प्लीज, माझी मदत करा. नाहीतर हे दोघे मला सोडणार नाहीत." पलीकडून ती रडवेल्या स्वरात बोलत होती आणि बोलता बोलता हुंदके देत होती.


उमेशला हा मामला आता जाम सीरियस वाटला.

"मॅडम तुम्ही आत्ता कुठे आहात मला सांगाल का?" उमेशने विनवणी करून विचारले.


"माहिती नाही मी कुठे आहे ते, पण इकडे गोडाऊनसारखी मोठी खोली आहे आणि रसायनांनी भरलेले बॅरल आहेत. खूप उग्र वास येत आहे, मला नाही सहन होत आहे.", ती मुलगी आपलं रडू आवारात उमेशला सांगत होती.


"अजून काहीतरी सांगा मॅडम, एरियाचे तरी नाव सांगा जेणेकरून मी मदत घेऊन तिकडे पोहचेल." उमेशने तिला शांतपणे विचारले.


"एरियाचं नाव नाही मला माहित, पण कायम रेल्वे येण्या-जाण्याचा आवाज येत राहतो." त्या मुलीने शक्य तितकं आठवून सांगण्याचा प्रयत्न केला.


"ठीक आहे मॅडम, तुम्ही काळजी करू नका, मी करतो काहीतरी." असे बोलून फोन कट झाला.


आता मात्र उमेश पुरता गंगारला होता. त्याने त्याच्या सिस्टिमला येणारे सगळे कॉल डायव्हर्ट करून ठेवले आणि 'त्या' मुलीच्या नंबरची डिटेल्स चेक करू लागला.


"रेश्मा माने"

"सुनंदा विहार, काळेपडळ, हडपसर, पुणे."


उमेश नाव आणि ऍड्रेस डिटेल्स लिहून घेतो. लिहून घेतलेला पत्ता तसा त्याच्या लोकेशनपासून बराच लांब असतो, पण मनामध्ये विचार करून तो त्या ऍड्रेसवर जायचं ठरवतो. टीम लीडरला आजारी असल्याचा बहाणा सांगून तो हाफ डे टाकून हडपसरची पीएमटी बस पकडतो. हडपसरपासून रिक्षा पकडून तो 'सुनंदा विहार'मध्ये पोहोचतो आणि दोन-तीन ठिकाणी चौकशी केल्यानंतर त्याला रेश्माचा फ्लॅट सापडतो. धावतच उमेश पायऱ्या चढतो आणि धापा टाकत घराची बेल वाजवतो. साधारणतः एक पन्नाशी पार केलेले गृहस्थ दरवाजा उघडतात.


"रेश्मा माने यांचं घर हेच ना" उमेश धापा टाकत विचारतो.

"आपण कोण?" ते गृहस्थ प्रश्नार्थक नजरेने उमेशला विचारतात.

"मी उमेश, तुम्ही तिचे वडील ना?"

"हो"

"हे बघा काका, जास्त काही सांगत बसण्याचा टाइम नाहीये. तुमच्या मुलीला कोणीतरी किडनॅप केलेलं आहे. चला लवकर आपल्याला पोलीस स्टेशनला जायला हवं." उमेश एकदम गडबडीत बोलला.


"कसं शक्य आहे हे." रेशमाचे वडील आश्चर्याने उमेशकडे पाहत बोलले.


"अहो काका, तुमच्या मुलीचा गेल्या दोन दिवसापासून मला सतत फोन येत आहे. तुम्ही वेळ नका दवडू, चला पटकन आपण पोलिसांकडे जाऊ."


"तुम्ही आधी घरात या, बाहेर तमाशा नको आणि शांतपणे सोफ्यावर बसा बघू आधी." रेशमाचे वडील उमेशला शांत करत बोलले आणि पाणी आणायला घरात गेले.


"काय माणूस आहे हा. याला तर स्वतःच्या मुलीबद्दल काही पडलेलंच नाही." उमेश स्वतःशीच बोलत होता.


रेश्माचे वडील पाणी घेऊन आले आणि पाणी पिता-पिता उमेशची नजर घरामध्ये लावलेल्या फोटोवर पडते. तो फोटो एका मुलीचा होता आणि त्या फोटोला हार घातला होता.


"ही माझी मुलगी रेश्मा, कालच हिचं वर्षश्राद्ध झालं." त्या फोटोकडे बोट दाखवत पाणावलेल्या डोळ्यांनी रेश्माचे वडील उमेशला बोलले.

हे ऐकून उमेशला ठसकाच बसला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.


"कसं शक्य आहे?" उमेश जवळजवळ ओरडलाच.


"का? काय झाले?, तुम्ही शांत व्हा आणि जे काही सांगायचं आहे ते शांतपणे सांगा." रेश्माचे वडील उमेशला समजावत म्हणाले.


"ठीक आहे." असं बोलून उमेशने घडलेली सगळी कहाणी रेश्माच्या वडिलांना सांगितली.


उमेशचं बोलणं ऐकून रेशमाचे वडीलसुद्धा गडबडून गेले.

"हे बघा तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय, कारण रेश्माला जाऊन एक वर्ष झालं आहे."


"रेश्माचं निधन कशामुळे झालं. काका?" उमेश विचारतो.


"त्या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिला मारून टाकलं." रेश्माचे वडील पाणावलेल्या डोळ्यांनी रागात बोलतात.


"नक्की काय झालं होतं मला सांगाल का काका?" उमेश रेश्माच्या वडिलांना पाणी देता-देता बोलतो.


रेशमाचे वडील सांगू लागतात,

"रेश्मा, माझी पोर. खूप गुणाची होती. निरागस, होतकरू आणि कायम हसऱ्या स्वभावाची!! तिच्या कॉलेजमध्ये सगळेजण तिला नावजयाचे. तिची खूप मोठी मोठी स्वप्नं होती, तिला शिकून स्वतःच्या पायावर उभं राहून खूप मोठं बनायचं होतं. पण तिला त्या दोन हरामखोरांची नजर लागली. कायम पळत ठेऊन असायचे तिच्यावर. खूप घाण नजरेने पाहायचे तिला."


"कोण काका?" उमेशने त्यांचं बोलणं मधेच तोडत विचारलं.


"आमच्या सोसायटीचा नीच वॉचमन मनोज आणि समोरच्या बिल्डिंगमधला कॅब ड्रायव्हर इंगळे!! रेश्माने एकदा मला या दोघांबद्दल सांगितलंपण होतं. पण मीच तिला त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस आणि आपलं कॉलेज व्यवस्थित कर असं सांगितलं होतं. इथेच माझं चुकलं आणि सगळा सत्यानाश झालं." बोलता बोलता रेशमाचे वडील हुंदके देऊन ओक्साबोक्सी रडू लागले. उमेशने त्यांना कसंबसं शांत केलं आणि पुढे ते सांगू लागले.


"लाखात एक होती हो रेश्मा माझी. तिने कधी बाकी मुलींसारखा माझ्याकडे कपडे किंवा बाकी वायफळ गोष्टींसाठी हट्ट नाही धरला. खूप जिद्दीने शिकत होती ती. पण एके दिवशी रेश्मा कॉलेजमध्ये गेली आणि संध्याकाळी परतलीच नाही. खूप शोधलं मी तिला, तिच्या मित्रांकडेसुद्धा चौकशी केली पण ती कुठे सापडलीच नाही. दुसऱ्या दिवशी पोलिसांकडे तक्रार केली, त्यांनीसुद्धा त्यांच्या परीने खूप तपास केला पण त्यांच्या हातीसुद्धा निराशाच आली. तीन दिवस झाले तरी रेश्माचा काही पत्ता लागत नव्हता. पोलिसांना आता यामध्ये घातपाताची शक्यता वाटत होती. इन्स्पेक्टर सावंतांनी जेव्हा मला कोणावर शंका आहे का, असं विचारलं तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि मी पोलिसांना वॉचमन मनोज आणि कॅब ड्रायव्हर इंगळेबद्दल घडलेला किस्सा सांगितला. इन्स्पेक्टर सावंतांनी ताबडतोब मोर्चा वॉचमन मनोजकडे वळवला. मनोजच्या घरी गेल्यानंतर मनोजची हालत पाहून मला भोवळच आली होती."


"का?, काय झालं होतं मनोजला?" उमेश कपाळाला आठ्या पडत विचारतो.


रेश्माचे वडील सांगू लागले.

"मी पाहिलं तेव्हा मनोजच्या डोक्याच्या चिंध्या झाल्या होत्या. त्याच्या घरामध्ये शोककळा पसरली होती. इन्स्पेक्टर सावंतांनी मनोजच्या आईला विचारलं तेव्हा त्याच्या आईने सांगितलं कि मनोज फोनवर बोलत होता आणि अचानक फोनचा स्फोट झाला.


इन्स्पेक्टर सावंतांच्या मते त्यांनी त्यांच्या संपूर्ण करियरमध्ये असा मोबाईलचा भीषण स्फोट पाहिला नव्हता. यानंतर आम्ही कॅब ड्रायव्हर इंगळेच्या घरी गेलो. पण तेव्हा इंगळे त्याच्या घरी नव्हता. घरी विचारपूस केली तेव्हा समजलं की तो प्रवासी भाडे घेऊन बाहेरच्या शहरात गेला आहे म्हणून आणि तो दुसऱ्या दिवशी घरी येणार होता. आमच्याकडे आता दुसऱ्या दिवसाची वाट बघेपर्यंत काही पर्याय नव्हता.


दुसऱ्या दिवशी अचानक इन्स्पेक्टर सावंतांचा मला फोन आला आणि ताबडतोब मी संजीवनी हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे गेल्यावर समजलं कि इंगळेंचा कार ऍक्सीडेन्ट झाला होता आणि हॉस्पिटलमध्ये आणल्यावर त्याचा जाब घेत असताना त्याचा तिथेच मृत्यू झाला होता. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार इंगळे कार घेऊन घरी परतत असताना तो मोबाईलवर बोलत होता आणि त्यातच त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि दुभाजकावर त्याची गाडी आदळली होती.


इन्स्पेक्टर सावंतांच्या सांगण्यानुसार इंगळेने त्याचा गुन्हा कबूल केला होता. त्याने आणि मनोजने रेश्माचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता आणि तिला जीवे मारून टाकले होते."


रेश्माच्या वडिलांनी त्यांचे पाणावलेले डोळे पुसले आणि आवंढा गिळला.


"काका मला माफ करा, मला तुम्हाला भूतकाळात नेऊन तुमचं मन दुखवायचं नव्हतं." उमेश निराशेच्या स्वरात म्हणाला.


"असू दे रे उमेश, यात तुझी काही चूक नाहीये. रेश्मा गेली या दुःखापेक्षा, मी अजूनपर्यंत तिचं शेवटचं तोंड पाहू शकलो नाही याचं दुःख अजून माझ्या मनामध्ये सलत आहे." रेश्माचे वडील रेश्माच्या फोटोकडे पाहत म्हणाले.


"म्हणजे, मला काही समजलं नाही!" उमेश प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलला.


"इंगळेने दिलेल्या जाबामध्ये इंगळेने फक्त एवढेच सांगितले की त्याने रेश्माला मारून टाकले. पण तिला मारून तिचे शरीर कुठे आहे, हे सांगायच्या आतच तो मरण पावला." रेश्माचे वडील बोलले.


"म्हणूनच तिच्या आत्म्याला अजून शांती मिळाली नाही तर." उमेश तर्क लावून बोलला.


"म्हणजे?"


"अहो काका, तिचे व्यवस्थित अंतिम संस्कार झाले नाहीत त्यामुळे तिला अजून शांती मिळालेली नाहीये. तिचे मारेकरी तर कायमचे यमसदनी पोहोचले आहेत, पण जोपर्यंत तिच्या शरीराचे अंतिम संस्कार होणार नाहीत तोपर्यंत तिला शांती नाही मिळू शकणार." उमेश बोलला.


"तिच्या शरीराचा शोध घेण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला पण काहीच फायदा झाला नाही." रेश्माचे वडिल बोलले.


"रेल्वे.... रसायनाचा वास..." उमेश मनाशीच पुटपुटला आणि अचानक बोलला,


"काका, इथे जवळच रेल्वे ट्रॅक आहे ना?"


"हो आहे."


"मग तुम्ही आत्ताच्या आत्ता इन्स्पेक्टर सावंतांकडे चला आणि त्यांना विचारा की या रेल्वे ट्रॅकच्या शेजारी किंवा अवतीभवती कोणतं रसायनांचं गोडावून, फॅक्टरी किंवा फर्टिलायझर स्टोअर रूम आहे का ते." उमेश एकदम उत्साहात बोलला.


उमेश काय बोलतो आहे हे रेश्माच्या वडिलांना काहीच समजत नव्हते. त्यांचा गोंधळलेला चेहरा पाहून उमेशने त्यांना समजावले कि जेव्हा रेश्माचा फोन आला होता तेव्हा रेश्मा सांगत होती की तिला रेल्वेचा आवाज आणि रसायनांचा उग्र वास येत आहे म्हणून.


उमेश आणि रेशमाचे वडील लगबगीने इन्स्पेक्टर सावंतांची गाठ घेतात आणि त्यांना विश्वासात घेऊन सगळा किस्सा सांगतात. सावंतांना सर्वप्रथम या गोष्टींवर विश्वास बसत नाही पण त्या दोघांच्या अवताराकडे पाहून एक शेवटचा प्रयत्न म्हणून ते त्या दोघांना मदत करायला तयार होतात. हवालदार गोरेला बोलावून इन्स्पेक्टर सावंत त्यांना रेल्वे रुळाशेजारील रसायनांच्या गोडावूनची यादी मागवतात. त्या यादीनुसार 'प्रिन्स केमिकल्स' नावाचं गोडावून त्यांच्या एरियापासून जवळच आणि रेल्वे ट्रॅकला लागूनच होतं.


इन्स्पेक्टर सावंत तडक गाडी काढतात आणि तीन कॉन्स्टेबलसहित उमेश आणि रेश्माच्या वडिलांना घेऊन गोडाऊनला जातात. गोडाऊन तसं छोटंच होतं पण एकदम सुनसान होतं. गोडाऊनचा वॉचमन सोडून तिकडे बाकी कोणीच नव्हतं. इन्स्पेक्टर सावंत आणि बाकी कॉन्स्टेबल संपूर्ण गोडाऊनची कसून तपासणी करतात. रसायनांचा उग्र वास सगळीकडे पसरलेला असतो. तपासणी करीत असताना एका कोपऱ्यातल्या काही फारश्या उचकटल्या आहेत असं इन्स्पेक्टर सावंतांच्या निदर्शनास येतं. त्या फारश्या काढून जमीन खोदल्यावर काही फुटाच्या अंतरावर शरीराच्या सांगाडा आणि सडून गेलेलं थोडं मांसल शरीर लागतं.


त्या शरीराच्या झालेल्या अवस्थेकडे पाहून रेश्माचे वडील धाय मोकलून रडू लागतात. उमेश कसाबसा त्यांना सावरतो. त्याच शरीराभोवती रेश्माचा मोबाईल आणि तिची पर्ससुद्धा सापडते ज्यावरून हे शरीर रेश्माचंच आहे याची खात्री पटते.


न राहवून उमेश इन्स्पेक्टर सावंतांना विचारतो की, "जर रेश्माला मदतीसाठी फोन करायचा होता तर तिने पोलिसांना का फोन नाही केला?"


यावर इन्स्पेक्टर सावंत मान खाली घालून सांगतात की, "त्यांना मिळालेल्या रेकॉर्डनुसार ज्या दिवशी रेश्माचे अपहरण झाले होते त्या दिवशी पोलीस हेल्पलाईन 'डायल १००' अंडर मेंटेनन्स होती त्यामुळे तिला आम्हाला कॉल करता आला नाही."


शेवटी रेश्माच्या शरीरावर विधीनुसार अंतिम संस्कार होतात आणि उमेश रेश्माच्या वडिलांचा निरोप घेऊन त्याच्या रूमकडे निघतो. रूमकडे जात असताना उमेशच्या मनात बऱ्याच प्रश्नांचं काहूर माजलं होतं.


"मनोज आणि इंगळे यांचा अपघात हा योगायोगच होता का? जेव्हा रेश्मा खरंच अडचणीत होती आणि तिने कस्टमर केअरला फोन केला होता, तेव्हा खरंच कोणीतरी चेष्टा करतंय असंच त्या कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हला वाटलं असेल का? आता खरंच रेश्माच्या आत्म्याला शांती मिळाली असेल ना?"


उमेश त्याच्या रूममध्ये पोहचतो, फ्रेश होऊन त्याच्या रूममेट्सची वाट पाहत बसलेला असतो तेव्हा त्याच्या मोबाईलची मेसेज टोन वाजते. उमेश मेसेज वाचतो, तर तो मेसेज रेश्माच्या नंबरवरून आलेला असतो आणि लिहिलेलं असतं,


"THANK YOU !!"


उमेशच्या तोंडावर हलकेच स्माईल पसरते आणि मनाशी काहीतरी निश्चय करून तो घरी फोन करतो.


"हॅलो आई, मी तुझ्याशी खोटं बोललो होतो... मला तुला सगळं खरं खरं सांगायचं आहे........."



Rate this content
Log in

More marathi story from Viral Video प्रसारण Viral Video प्रसारण

Similar marathi story from Horror