कोंडवाडा
कोंडवाडा


अनिता एका श्रीमंत शेतकरी बापाची मुलगी होती. B. A. पर्यंत शिकलेली होती. गावाच्या बाजुलाच मळा होता. शेतात भव्य असा बंगला होता.महागड्या कार उभ्या होत्या.बंगल्याच्या समोर छोटेसे गार्डन होते. त्यात झोपाळे होते. बंगल्याच्या सभोवती नारळाची झाडे होती. बंगल्यात होम थेटर होते. तीन बेडरूम होते. अगदी शहरासारखे.गावची मोकळी आणि शुद्ध ताजी हवा. त्यात गावची भाकर आणि कालवन म्हणजे चवच न्यारी. त्यांचे शेत बंगल्यासमोरच होते.दहा एकर द्राक्षाची बाग बंगल्यासमोर होती.नोकर चाकर वर्ग होता. अशा वातावरणात अनिता वाढली होती. तिचे लग्नाचे वय झाल्याने अनेक मोठ मोठ्या घरातील मंडळी तिला लग्नाची मागणी घालायला येऊ लागली. तशी ती दिसायलाही सुंदर होती. खेड्यातील अनेक सरकारी नोकरी वाले लोक येऊन गेले;पण तिच्या वडिलांची इच्छा मुलगी एका छोट्या कुटुंबात व शहरातील नोकरदार वर्गाला द्यायची होती.
तसा योगही जुळवून आला. एक सरकारी नोकर त्यांच्याच नातेवाईकात मिळाला. त्याचे शिक्षण ITI झाले होते. रेल्वे खात्यात वेल्डर म्हणून नोकरी करत होता.त्याची स्वतःची खोली नव्हती. तरी सरकारी नोकर म्हणून लग्नाचे नक्की ठरले. तिच्या व त्याच्या वडिलांनी दोघांच्या रासगुण पाहिल्या. उत्तम योग जुळवून आले. लग्नाचा मुहूर्त ठरला मे महिन्याचा मुहूर्त ठरला.दोघांकडच्या मंडळींनी एकमेकांना दागिने बनविले.कपड्यांचे बस्ते झाले.कन्यादान खरेदी झाली. लग्न मे महिन्याच्या सोमवारी ठरल्याप्रमाणे शुभ मुहूर्तावर झाले. नंतर रितीरिवाजाप्रमाणे तिला महिनाभर नवर देवाच्या घरी सासू सासरे यांच्यात राहवे लागले.तिचा नवरा परत मुंबईला कामावर निघून गेला. सासरकडे घर छोटेसे होते. तिला त्या घरात करमेना. त्यात तिला शहराकडे जायची व रहाय
ची खूप इच्छा होती. ती सारखी तिच्या नवऱ्याला मोबाईलवरुन विचारणा करायची. शेवटी तिच्या नवऱ्याने एका झोपडपट्टीत सहा हजार भाडे व पन्नास हजार डिपॉज़िट देऊन दहा बाय पंधराची भाड्याने रूम घेतली. रविवारी गावी जाऊन भांडे व इतर सामानाचा टेम्पो भरून मुंबई गाठले.गोरेगाव संतोष नगर येथे रात्री बारा वाजता उतरले. थोडेसे जेवण केले व झोपी गेले. नव्याने संसार सुरु झाला.
तिचा पती विजय त्याला दारू पिण्याची सवय होती. जुगार खेळण्याची सवय होती. त्यामुळे आलेला पगार अर्धा कर्जावारी जात होता. त्याच्या आईवडिलांना त्याचे सारे नाद माहिती होते. पण कसे तरी त्याचे हाडे पिवळे करायचे होते. तिच्या नवऱ्याच्या ह्या वाईट सवयी पाई घरात घर खर्चाला पैसे उरत नव्हते.कर्जावाले कायम दारात. तीन तीन महीने खोली भाडे देत नव्हता. महिन्यातून वीस दिवस कामाचे खाडे करायचा. त्या दिवसात जुगार व दारु प्यायचा. त्यामुळे अनिता संसाराला कंटाळली होती. तिचा नाईलाज झाला होता.
शेवटी ती एका खाजगी कंपनीत कामाला लागली;पण तिथेही तो संशयाच्या नजरेने पाहत होता. तिला शिव्या देत होता. मारझोड करत होता. तिचा महिन्याचा पगार हिसकावून घेत होता. तिला आता त्याच्या जवळ राहण्याची इच्छा उरली नाही. तिचे जीवन कोंडवाडा वाटू लागले. नेहमीच्या त्रासाला कंटाळून तिने स्वतःला संपविण्याचा निर्णय घेतला. तसे तिने तिच्या नवऱ्याला सुधारण्याच्या अनेक संधी दिल्या होत्या; पण तो सुधारला नाही. अखेर नवऱ्याला जेवणाचा डब्बा बनवून दिला. बाजारात जाऊन पाच लिटर रॉकेल आणले. दार बंद करून स्वतःच्या अंगावर ओतले. नंतर काडी पेटवून स्वतः जळत मृत्यू पावली. आपले दुःख इतरांना सांगण्या ची संधी कुणालाही दिली नाही. अनमोल जीवन क्षणात संपविले.