क्लॉस्ट्रोफोबिया
क्लॉस्ट्रोफोबिया
कुठलातरी सिनेमा बघितला जातो आणि काहीतरी न्यूनगंड किंवा भय डोक्यामध्ये साचून राहतात. काही मानसोपचार तज्ञ तर हे पण सांगतात ही असले घाणेरडे सिरीयल किंवा सिनेमा बघूच नयेत. छोट्या खोलीचे किंवा एखाद्या बंद खोलीमध्ये वाटणारे भय हि जरी बहुतांश ठिकाणी आढळणारी मानसिकता असली तरीपण प्रत्येकाला वाटत असलेली भीती वेगवेगळी. निशा तसंच होतं, कुठल्याही लिफ्टमधून पण जाताना तिला सोबत लागे. नशीब तिची मैत्रीण आशा तिच्याकडे कॉलापसिबल दरवाजे असणारी लिफ्ट होती. दरवाजे जाळीचे असले की निशाला ठीक वाटत असे. जर पूर्णपणे बंद होणारी असले तर निशाचा श्वास वरच्या वर आणि खालचा खाली. लहानपणची वाटणारी भीती कधी कोणी घालवली नाही. आई घर कामांमध्ये मग्न असायच्या तर बाबा तर तिची भीती हसण्यावारी उडवून लावायचे. रमेशला मात्र निशाची अतिशय काळजी वाटे. त्याला जाणवत होतं की निशाला काहीतरी मानसिक बिमारी जडली आहे. घरातल्या बाथरूममध्ये देखील दिवसाढवळ्या निशा लाईट लावून जात असे, तिथे पण दरवाजा कधीही आतून लावत नसे, त्याच्यामुळे बाबांनी ऑपरेशन थिएटर सारखा एक दिवा बाथरूमच्या बाहेर बसवून घेतला होता. दिवा लागला की समजायचे निशा बाथरूममध्ये आहे.
घरामध्ये ठीक आहे मग बाहेर काय? आशा मीना लता सर्वजणी कॉलेजमध्ये निशाच्या बरोबरच असायचा. इथेपण निशाला जेव्हा केव्हा बाथरूम ला जायचे असायचे तेव्हा दोघी दोघीजणी बाहेर पहारा देत राहायचा. त्या दिवशी मात्र गडबड झाली, प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये बाकीच्या मुलींचे नंबर दुसऱ्या बॅच मध्ये पडले. रमेश तिला जाऊन कॉलेजमध्ये सोडून आला, एवढेच नव्हे तर प्रिन्सिपल ची परमिशन घेऊन लिफ्टमधून तिला लॅबोरेटरी पर्यंत सोडून आला. केमिस्ट्रीची परीक्षा होती, पोटॅशियम परमॅग्नेट अंधाऱ्या जागी ठेवायचे होते कारण की नाहीतर ते ऑक्साईड झाले असते. बर्फ घ्यायची जागा देखील लॅबोरेटरी च्या कोपऱ्यांमध्ये अंधाऱ्या जागी येतच होती. निशा बरोबर मोहन बाजूलाच उभा होता. निशाची अस्वस्थता त्याच्या लक्षात आली.
आधी त्याला वाटले की या मुलीची बहुतेक परीक्षेची तयारी बरोबर झाली नसेल किंवा तिला काही आठवतच नसेल म्हणून तिची चलबिचल चालू आहे. शेवटी न राहवून त्याने हळूच तिला विचारले, निशा त्याला सांगितले की तिला अंधार्या जागेची किंवा बंद जागेची अतिशय भीती वाटते. मोहनने तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले,"घाबरू नकोस तुला जेव्हा केव्हा तिकडे जायचे असेल तेव्हा मी तुझ्या बरोबर येईल."
मोहनचा मित्र अनिरुद्ध दोघांकडे बारीक लक्ष ठेवून होता. त्याला समजले निशाची काहीतरी गडबड आहे. जेव्हा मोहन आणि निशा बर्फ घेण्यासाठी कोपरे मध्ये गेली तेव्हा गुपचूप अनिरुद पण त्यांच्या मागून गेला. निशा आता निर्धास्त झाली होती, तीन तासाचे प्रॅक्टिकल व्यवस्थित उरकून तिने आपली बॅग आवरली. मोहन चे आभार मानले आणि परत त्याला विनंती केली की तो लिफ्टमधून तिच्याबरोबर खाली जाईल का? मोहनला फिजिक्सच्या प्रोफेसरकडे काम होते म्हणून तो म्हणाला की त्याला तिच्याबरोबर जाणे शक्यच नाही. आता आली का पंचाईत, निशा ने ठरवले सरळ जिना उतरून खाली जावे. पण एकटीच कुठे खाली उतरणार? तिने ठरवले जेव्हा दोन तीन मुलं लिफ्टमध्ये जातील, त्यांच्या बरोबर आपणही घुसावे. तसे पण होईना, जो तो आपल्या आपल्या मित्र मंडळा बरोबर बरोबर खाली जाऊ लागला. शेवटी निशा एकटीच वरती राहिली. तेवढ्यात अनिरुद्ध बाजूने आला, लिफ्टचे बटण दाबले आणि तो आत शिरला. त्याबरोबर वेगाने निशा पण आत शिरली. अकराव्या मजल्यावर असून लिफ्ट हळूहळू खाली यायला लागली. आठव्या आणि सातव्या मजल्याच्या मध्ये काहीतरी बिघाड झाला आणि अचानक लिफ्टमधले दिवे गेले. अनिरुद्धने ताबडतोब आपला मोबाईल काढला आणि इमर्जन्सी बेल दाबायला सुरुवात केली. आणि इकडे निशाला श्वास लागू लागला. निशाचे ओठ निळे पडायला लागले, तिला श्वास पुरेना, हळूहळू तिच्या पायातले त्राण गेले आणि ती लिफ्टच्या फरशीवर खाली कोसळली.
अनिरुद्धला समजेना आता काय करावे. त्याने घाईने आपल्या पाण्याची बाटली काढून तिच्या तोंडावर पाणी मारले. निशा उठली पण तरीही तिला श्वास घेता येईना. अनिरुढ च्या लक्षा मध्ये सगळ्या प्रकारा आला. त्याच्या मोठ्या बहिणीला पण याचा त्रास होत असे त्यामुळे आधी त्याने निशाला शांत केले. नंतर तिला सांगितले की हळूहळू अर्धाच श्वास घे. पूर्ण छाती भरून श्वास घेऊ नकोस. अर्धा, अर्धा श्वास घेत रहा. निशा घामाघूम झाली होती. अशा अवस्थेत पाणी पण प्यायचे नसते. तिच्या तोंडावर मधून-मधून पाण्याचे शिपकारे मारत अनिरुद्ध ने तिच्या खांद्यावर हात ठेवले. त्याबरोबर निशा त्याच्या खांद्यावरती डोके ठेवून रडू ला लागली. तिच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवत अनिरुद्ध तिला शांत करू लागला. "मी आहे तुझ्याबरोबर घाबरू नकोस." असे तो सारखे म्हणत राहिला. "तू एकटी नाहीयेस आपण दोघेही आहोत " असं पण तो सारखे हळूहळू म्हणत राहिला. त्याने मोबाईलचा दिवा चालूच ठेवला. कारण लिफ्ट पूर्ण बंद असल्यामुळे कुठूनही प्रकाश येत नव्हता. जवळजवळ पंधरा मिनिटे दोघेही त्याच स्थितीमध्ये होते. अनिरुद्धला पण संकट पडले, इथे जर निशाला काही झाले तर आरोप त्याच्यावरती येणार होता.
क्लॉस्ट्रोफोबियाचा पेशंट बेशुद्धावस्थेत गेल्यानंतर त्याचे काहीपण होऊ शकते. समजा निशाचे काही बरेवाईट झाले तर? वेगवेगळ्या विचाराने अनिरुद्धा पण घाम फुटला. पण त्यांनी स्वतःला सावरले. शांत राहिला. निशा शांत झाल्यावर अनिरुद्धने उठून परत इमर्जन्सी बेल दाबण्यात सुरुवात केली. अजून दहा मिनिटे गेल्यानंतर लिफ्ट मधले दिवे आले आणि पंखा सुरू झाला. लिफ्ट हळूहळू खाली जायला लागली. पाच मिनिटातच खालच्या मजल्यावर पोहोचून लिफ्टचे दरवाजे उघडले. अनिरुद्धचा हात गच्च धरून निशा बाहेर पडली. तिने परत परत त्याचे आभार मानले. अनिरुद्ध निशाला घरी सोडण्यासाठी गेला आणि त्याने घडलेल्या वृत्तान्त तिच्या आईला आणि भावाला सांगितला. निशाला मानसोपचाराची गरज आहे हे त्यांनी ठासून सांगितले. तेवढ्यात बाबा पण घरी आले आणि अनिरुद्ध चे बोलणे त्यांनी ऐकले. आज निशाबरोबर होणारी दुर्घटना केवळ अनिरुद्धमुळे टळली होती हे त्यांना समजले. निशाच्या सर्व कुटुंबाने अनिरुद्ध चे मनापासून आभार मानले. आणि त्याला वचन दिले की निशाला ते डॉक्टरकडे घेऊन जातील.
भीती वाटणे अस्वस्थ वाटणे हा एक नैसर्गिक प्रकार आहे. कधीकधी भीतीचे कारण कळलेच नाही तर त्याचा रोग पण होऊ शकतो. विमाना मधले छोटेसे
बाथरूम किंवा अनोळख्या ठिकाणी असलेले बाथरूम याच्यामध्ये अडकण्याची भीती सर्वांनाच असते. विदेशी प्रवास करताना प्रत्येक ठिकाणचे कडी-कोयंडे व्यवस्थित माहिती करून घेण्या व्यतिरिक्त कोणीही एकटे कुठल्याही खोलीत जाऊ नये. आजारावर हसत बसण्यापेक्षा, टिंगलटवाळी करत बसण्यापेक्षा त्यावरचा उपाय शोधून सर्व कुटुंबाने जर त्याप्रमाणे सहकार्य केलं तर कोणीच मानसिक रोगी होत नाही. निशाच्या बाबांची परवानगी घेऊन अनिरुद्ध निशाला त्याच्या केंद्रामध्ये घेऊन गेला. केंद्रामध्ये त्याची बहीणपण येत होती. केंद्रामध्ये वृद्ध योगी श्वासाचे प्रकार आणि श्वास घेण्याची रीत शिकवत होते. कसा श्वास केव्हा घ्यावा याचं पण एक तंत्रशुद्ध शास्त्र असतं. भीती वाटल्यावर ती किंवा काही काम करताना किंवा काही महत्त्वाचे कार्य करताना किंवा अजून काही, श्वास घेण्याच्या पद्धती नेहमीच वेगवेगळे असतात. व्यायाम करताना, धावताना, तर चालताना, किंवा जेव्हा आपण शांत बसलो असतो तेव्हादेखील श्वास हा व्यवस्थित घ्यायचा असतो. श्वास कसा घेतला की तो मेंदूला व्यवस्थितरित्या ऑक्सिजन पुरवून ताजेतवाने ठेवतो याचे तंत्रशुद्ध शिक्षण वृद्ध योगी महाराजांनी केंद्रावर च्या मुलांना दिले. निशा साठी हे सगळेच नवीनच होते. असे तर तिला कोणीच कधीच सांगितले नव्हते. तिला वाटणाऱ्या भीतीवरती घरचे लोकं पडदा तरी पाडत किंवा हसण्यावारी उडवून लावत.
अनिरुद्धने मात्र खरा मित्र असल्याचे कर्तव्य बजावीत तिला योग्य ठिकाणी उपचारासाठी आणले. निशा आता एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून वावरत असते. तिला आता कुठलीही भीती वाटत नाही. आत्म शक्तीमुळे आणि स्वतःबद्दल वाटणाऱ्या विश्वासामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आलेले आहे.
