कहां गया उसे ढूंढो।
कहां गया उसे ढूंढो।
बहती हवा सा था वो, उड़ती पतंग सा था वो, कहां गया उसे ढूंढो।
गाडी चालवत असताना FM वर गाण्याचे शब्द कानावर पडत होते. क्षणात, आमचा रान्चो आणि आम्ही three idiots नी त्याच्या बरोबर घालवलेले दिवस माझ्या डोळ्यासमोर तरळून गेले.
आमचा रान्चो तसा आम्हाला थोडासा उशीरानेच भेटला. मेडिकल प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर बरेच वर्ष लोटली होती. आम्ही सर्वजण त्याच त्या रुटीनला कंटाळलो होतो. तेव्हा हा पठ्ठ्या आम्हाला भेटला. निमित्त होतं एक मैत्रीण आजारी पडल्याचे! तिची एन्जिओप्लास्टी झाली म्हणून हा तिला लाकडं घालायला आला होता आणि तिला हसवत हसत जीवन जगण्याची कला शिकवून गेला. तिच्या साठी नेहमी तो खिशात कापूस ठेवून फिरायचा. त्याचा ठरलेला डायलॉग " तुझा काय भरोसा? तु केव्हाही गचकशील. तयारीत राहीलेले बरं". " अरे तु अजुन इथेच आहेस? मला वाटलं गेलीस की काय? " प्रत्येक वेळी तिला भेटल्यावर त्याचे हे वाक्य ऐकून हसून हसून आम्ही अर्धे व्हायचो. त्याच्या बोलण्यात एक वेगळाच थाट असायचा. जादू!! रडणारी व्यक्तिसुद्धा हसलीच पाहिजे.
"हमको तो राह चलाती , वो खुद अपनी राह बनाता, गिरता संभालता मस्ती में चलता था वो।"
रेडिओ वाजत होता. वयाच्या चाळीसाव्या वर्षीही काहीतरी वेगळं करून दाखवण्याची चमक आम्ही त्याच्या डोळ्यात पाहीली होती. मळलेल्या वाटेने जाणारा तो नव्हताच! तो आमचा role model झाला होता. प्रत्येक problem चे solution त्याच्या कडे असायचं. आयुष्य कसं जगायचं याचे धडे आम्ही त्याच्या कडून घ्यायला लागलो. रान्चो प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा . स्वत: बरोबर दुसऱ्यानाही आनंद देऊन जायचा. "आजका जश्न मनाना " म्हणजे काय हे त्याच्या कडे बघितले की समजायचे.
त्याचा स्वभावच असा होता की दिवसागणिक आणखी नवीन नवीन मित्र मैत्रिणी आम्ही जोडत गेलो. एकत्र वाटचाल करत होतो.
आमच्या ग्रुपचं एकदा एका कार्यक्रमासाठी एकत्र द्वारकेला जाणं झालं. बेट द्वारिकेला जाताना एका मैत्रिणीची एक चप्पल समुद्रात पडली. ती कावरीबावरी झाली. आत्ता काय करायचे? दुपारी दोन ची वेळ. रस्ता भयाण तापला होता. कडकडीत रस्त्यावर चालायचे कसं? रान्चो पाठून ओरडला "गया है उसका गम ना कर. टाक दुसरी चप्पल पण समुद्रात. " असं म्हणून त्याने तिला दुसरी चप्पल ही समुद्रार्पण करायला लावली. "छान ! आत्ता घाल ह्या माझ्या चप्पला" असं म्हणून तिला स्वत: च्या पायातील चप्पल काढून देवून स्वत: उघड्या पावलांनी उन्हात तरातरा निघून गेला. विस्फारलेल्या डोळ्यांनी आम्ही त्याची ती अ
नवाणी मुर्ती पाहत राहिलो.
"रेगीस्तान में गाव के जैसा, मनके घाव पे मरहम जैसा था वो" खरंच ना! .
तिलाच पुढे त्याने कुठलेही निदान न होणाऱ्या व कशालाही न जुमानणाऱ्या आजारातून हसत खेळत बरं केलं.
नदीत पोहताना खऱ्या अर्थाने स्वत बरोबर इतरांना पोहायला शिकवणारा, प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा आमचा रान्चो !
जन्मतः बेसूर आणि कधीही सूर न लावलेल्या आमच्या एका मित्राला रान्चोनेच गायला शिकवलं. " गाना यहां से आना चाहिए सर जी" असं फिल्मी स्टाईलने छातीवर हात ठेवून म्हणत डायलॉगबाजी करणं रान्चोलाच जमायचं.
अगदी हळूवारपणे कोणाच्याही मनात शिरून त्यांच्या मनातले गुपीत किंवा सल जाणून घेऊन त्यावर फुंकर घालण्याचे तंत्र त्याला अवगत होते. आजही आठवतं, कधीही काहीही न बोलणाऱ्या आमच्या सरांना त्याने बोलतं केलं होतं. पहाटे खंडाळा घाटात चहा घेताना सरांनी रान्चो समोर कॉलेज मधलं आपलं पहिलं वहिलं प्रेम व्यक्त केलं, जे त्यांनी कोणालाही बोलून दाखवलं नव्हतं. सर जेव्हा पाय मोकळे करायला गाडीतून खाली उतरले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हळूवार भाव आम्ही सर्वांनी टिपले. रान्चो ची टीपण्णी होतीच " कोरड्या चेहऱ्याआड सुद्धा किती भावना, किती वादळं शांत झालेली असतात."
खरंच खूपच "इडियट" होता तो आणि हळवाही!
दृष्ट लागेल असे सुंदर दिवस जात होते.आणि अचानक खरंच आमच्या मैत्रीला दृष्ट लागलीही.अचानक काय झालं माहिती नाही पण आमचा रान्चो हळुहळु आमच्या पासून दूरावत गेला. एखादा सडका आंबा सर्व आंब्याचे नुकसान करतो. तसेच काहीसं झालं. नक्की काय झाले? कुणाचे चुकलं काहीच कळलं नाही. पण रान्चो मात्र आमच्या पासून लांब गेला हे नक्की.
हळुहळु भेटीगाठी कमी होत गेल्या. निखळ विनोदाची जागा भयाण शांततेनं घेतली. शेवटी रान्चो निघून गेला. हरवला !
थ्री इडियट्स मधल्या रान्चोला त्याच्या मित्र मैत्रिणीनी शोधून काढले पण आमचा रान्चो आमच्या नजरेसमोर असूनही आमच्या पासून विलग झाला होता. हरवला होता ! अशा मनाने हरवलेल्या रान्चोला परत कसे आणायचे? कुठे शोधायचे?
सर्वांनी खुप प्रयत्न केले पण आमचा रान्चो आम्हाला परत मिळालाच नाही. हरवला तो हरवलाच! कायमचा.
ते गाणं ऐकताना सर्व घटना डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. अचानक समोरचा रस्ता धुसर दिसू लागला. गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून मी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आणि गाणं वाजतच राहीलं " बादल आवारा था वो, यार हमारा था वो, कहां गया उसे ढूंढो" ! ं