आत्मानुभव
आत्मानुभव
प्रिय सुमे,
पत्रास कारण की,
पाऊस धो धो कोसळतोय आणि सुमे तुम्हा सर्वांची खरंच खूप आठवण येतेय.
आठवतंय तुला...
शाळेत जायला निघालो कि नेमका धो धो पाऊस लागायचा. मग डोक्यावर छत्रीचं ओझं कशाला? असा विचार करून direct आभाळाशी आणि पावसाशी connect होण्यासाठी चिंबचिंब भिजायचो आपण.
खळग्यात साठलेल्या पाण्यात मनसोक्त खेळायचो. एकमेकांवर साठलेल्या पाण्याचे तुषार उडवत आनंदात मस्त डुंबायचो.
पुन्हा तशाच भिजलेल्या अंगानी शाळेत जाऊन बाकड्यावर बसायचो. कुरकुर वाजणाऱ्या पंख्याची हवा खात कधी अभ्यासात रमून जायचो ते समजायचेही नाही.
अभ्यास करतानाही डोळ्यासमोर तरळायचा तो अवखळ पाऊस आणि मन भरून जायचं मातीच्या मंदमंद सुगंधाने.
शाळेतून परत येताना पुन्हा भिजण्याचा आणि भिजवण्याचा कार्यक्रम असायचाच.
एखादेवेळी पावसात चिंब भिजल्यावर शाळेला दांडी मारुन, भिजलेल्या अंगानीच, मैत्रिणीच्या घरी घेतलेल्या फेसाळलेल्या चहाची आणि गरमागरम शिऱ्याची मज़ा काही औरच असायची!!
सर्व कसं बेभान आणि दिलखुलास!! पण कधी आजारी पडलो नाही की कधी साधी शिंकही आली नाही किंवा कधी डॉक्टरकडे जावे लागले नाही. उलट दुसऱ्या दिवशीही पुन्हा त्याच उत्साहाने शाळेत जायला निघायचो.
पुन्हा तोच पाऊस आणि तोच अनुभव चिंब भिजवणारा!! कारण तेव्हा त्या कोसळणाऱ्या पावसात, एकमेकांना खट्याळपणे भिजवत, निसर्गाशी connect होण्याचा आत्मानुभव, मन आणि सर्व ज्ञानेंद्रियांबरोबर शरीरालाही टवटवीत ठेवायचा. अगदी वर्षभर... पुढल्या पावसाळ्यापर्यंत!!
खरंच आहे... मन, आत्मा व इंद्रिय प्रसन्न असतील तरच शरीरही सुदृढ व निरोगी रहाते, हो ना?
मग आज असं उदास आणि sick का वाटतंय?? प्रश्न विचारतेय स्वत:ला कधीपासून. उत्तरही मिळालं आहे पण कारण हेच आहे हे मानायला मन तयार नाही. सुमे तू रागावली आहेस ना माझ्यावर??
खरंच कामाच्या व्यापात स्वत:ला एवढं गुरफटून घेतलं की मैत्रिणींसाठी वेळच काढू शकले नाही. आपण सर्वांनी भेटावे यासाठी अधीर तू होऊन फ
ोन करायचीस. प्रत्येक वेळी काहीतरी काम मध्ये यायचं आणि मी नकार कळवायची. तू नाराज व्हायचीस. सगळं कळत होतं गं. पण काय करू??
तेव्हा नाही जाणवलं. पण काल जेव्हा मनी भेटली तेव्हा काळजात चर्रर्र झालं!
मनी भेटली होती, तेव्हा कळलं की नुकत्याच तुम्ही सर्व जणी ठरवून भेटलात फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने. खूप enjoy केलात फ्रेंडशिप डे! पण यावेळी मला न सांगता भेटलात तुम्ही.
खरंच खूप हेवा वाटला आणि रागही आला स्वत:चा. अगदी एकटं एकटं वाटलं.
सुमे खरं सांग ना प्लीज, पावसात भिजताना मनाच्या कोपऱ्यात माझी आठवण काढलीस ना?
सुमे रागावू नकोस ना प्लीज. घेशील ना बट्टी माझ्याबरोबर?
पुन्हा एकदा पावसात चिंब भिजून मैत्री दिवस साजरा करू या. साठलेल्या पाण्यात उभं राहून एकमेकांना भिजवू या. सप्रेकडे थांबून गरम फेसाळ चहा आणि बटाटावडा खाऊ या. आणि... आणि एकमेकांचे हात हातात घेऊन सर्व रस्ता अडवून चालू या. पुन्हा एकदा लहान होऊ या.
ए सुमे शायरी खूप आवडायची ना तुला? मला आठवतंय. मी तुला खूश करण्यासाठी शायरी करायची आणि तू फिदीफिदी हसायचीस आणि अगदी सहन नाही झालं की पाठीत धपाटा घालायचीस माझ्या. थोडी शायराना होऊ का मग येशील पाठीत धपाटा घालायला..?
"दिल दोस्ती यारीचे क्षण अमूल्य क्षण, येतील का पुन्हा शिंपायला मनाचे अंगण?
jokes apart dear...
तू रागावू नकोस ना गं! कारण आत्ता भेटीची आस लागली आहे. मनमुराद हसायचं आहे... पुन्हा एकदा नव्याने जगायचंय... अगदी पूर्वीसारखं
गुलजार म्हणतात ते खरं आहे..
कोई सुलाह करा दे
जिंदगी कि उल्झनोंसे
बडी तलब लगी है
आज मुस्कुराने की
तू आ के मुझसे मिल मेरे दोस्त, सुलाह करले
आज हमसे कभी न बिछडने का वादा करले...
सुमे शेवटच्या दोन ओळी माझ्या आहेत बरं, ढापलेल्या नाहीत.