मृगजळ
मृगजळ


मोबाईल वाजला आणि घ्यायला गेले तर मृण्मयी चा फोन होता. " अरे व्वा ! बऱ्याच दिवसांनी फोन केलास!". मी आनंदाने फोन receive करून म्हणाले. अपेक्षा होती समोरून तिच्या नेहमी सारख्या response ची. संध्या अशी हाक मारून ही छानसं हसेल खळखळून! आणि मी " कशी आहेस ?" विचारल्यावर म्हणेल " अगं नाही. सध्या काही दुखत नाही.". आणि मग आजूबाजूच्या गप्पा!
पण आज तसं काही झालं नाही. बहुतेक कुठल्यातरी विचारात असावी ती. आवाज थोडा दबलेला , काळजीत वाटत होता. उगीच काहीतरी बोलल्या सारखं ती बोलली आणि थोड्या वेळातच म्हणाली " चल ठेवते फोन".
हे सलग तिसऱ्यांदा होतं होतं. मी न राहवून विचारलंच " मृणु काय झालं? काही tension का? काही बोलायचे आहे का?" . नाही गं थोडं आफिसचं आणि मुलांचं टेंशन. नंतर करते फोन". तिने फोन ठेवला.
मृण्मयी माझी खुप जुनी मैत्रीण! Junior College मधली. College सोडल्यानंतर आम्ही कधी भेटलो नाही. मी ही डॉक्टरीच्या अभ्यासात रमून गेले.
नंतर बऱ्याच वर्षांनी मृण्मयी मला पुन्हा एकदा भेटली. आणि नंतर मग भेटीगाठी वाढतच गेल्या. काही दिवसांतच आम्ही अगदी जीवश्च कंठश्च मैत्रिणी झालो.
दिलखुलास स्वभावाची मृण्मयी मला खरंच खुप आवडली. आयुष्यातली अनेक आव्हानं, संकट आणि दु:खं तिने समर्थ पणे झेलली होती. आणि स्वत:चे करिअर ही सांभाळले होते. एका चांगल्या multinational company मध्ये ती चांगल्या पोस्टवर नोकरीला होती.
अतिशय समजुतदार आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणारा तिचा नवरा, अभिजित आणि दोन मुलं असा गोड संसार होता तिचा. काही संकटही होती. तिच्या एका मुलाला juvenile diabetes होता. नवऱ्याचा स्वत:चा व्यवसाय होता पण नोटबंदी नंतर त्याला बराचसा तोटा सहन करावा लागला होता. मोठ्या मुलाचे आजारपण, मुलांचे शिक्षण याची जबाबदारी ही ती सध्या समर्थपणे उचलत होती. संपुर्ण कुटुंब एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारं होतं. आणि म्हणूनच अशा अवघड परिस्थितीत ही ते सर्व आनंदाने रहात होते.
खरं तर कुठलीही गोष्ट असो मग ती office किंवा घर किंवा कशाशीही संबंधित असो, माझ्याशी अगदी ओपनली share करणारी, अगदी शिंक आली तरी लगेच मला फोन करणारी माझी मैत्रीण आजकाल माझ्याशी अशी का वागते हेच मला कळत नव्हते. ही काही तरी लपवणे आहे माझ्यापासून किंवा हिला काहीतरी सांगायचं आहे पण ती बोलत नाही आहे, हे माझ्या सारख्या इतक्या वर्षांचा medical practice चा अनुभव असलेल्या डॉक्टरने लगेच ओळखले होते. आम्ही डॉक्टर लोक लगेच कोणाचेही मन वाचू शकतो. न सांगितलेल्या लक्षणांवरून सुद्धा आजाराचे निदान आणि चिकित्सा करण्याचे ट्रेनिंग डॉक्टरांना आपोआपच मिळालेले असते!
मी बराच प्रयत्न केला पण नेहमी दिलखुलास पणे बोलणारी मृण्मयी यावेळी बिलकुल बोलू शकत नव्हती. मला जाणवत होते गोष्टी मनात ठेवून तिला फार त्रास होतो आहे पण मीही काहीच करू शकत नव्हते. मी वाट पहायचे ठरवले.
त्या दिवशी मी दुपारी मी क्लिनिक मधून घरी निघाले आणि मृण्मयी चा मोबाईल वर फोन. मी फोन घेतला. समोरून ती म्हणाली "संध्या ! एक मोठा pause! . " बरी आहेस ना? सहज फोन केलास ना?" मी विचारले.
" हो, सहजच केला फोन. कुठे चालली आहेस का? एकटी आहेस? " तिने कापऱ्या आवाजात विचारले.
अगं काय झालं? काही बोलायचे आहे का? मी काळजीने विचारलं. "काही नाही " असं म्हणत तिने फोन ठेवला.
काय झालंय मृण्मयीला? गाडीत बसून मी विचार करत होते. काही clue मिळतो का हे शोधण्यासाठी मी आमच्या मागील conversation ची हिस्ट्री तपासून बघितली. तेव्हा लक्षात आलं की मृण्मयी शाळेच्या ग्रूप बद्दल आणि मित्र मैत्रिणींबद्दल खुप बोलायची. त्यातही एका मित्राच्या नावाचा खुप उल्लेख असायचा तिच्या बोलण्यात. नंतर काही दिवस तिचे फोन येणं फार कमी झालं होतं. मी ही लक्ष दिलं नव्हतं. म्हंटलं रमली असेल पुन्हा भेटलेल्या कळपात.
आणि आत्ता पुन्हा तिचे फोन येऊ लागले आहेत. तिचा आवाज उदास आहे . तिच्या आवाजातही पुर्वी सारखी ऊभारी वाटत नाही. आवाजात काळजी दिसतेय. मनात विचार चमकून गेला. बापरे!! पुन्हा प्रेमात बिमात पडून आपटी तर खाल्ली नाही ना बाईसाहेबांनी? काळजात एकदम धस्स झालं!
खरंतर मी पुराणमतवादी नाही. कुणी कधी, कुणाच्या प्रेमात पडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे मानणारी. पण प्रेम करताना किमानपक्षी परिस्थिती बघून डोळसपणे प्रेम करावे असे मानणारी. देव करो आणि असं काही न असो! पण असं काही असेल तर ? या अशा प्रकारच्या प्रेमातल्या वेदना आणि त्या पाठोपाठ येणारे दु:ख सहन करायला मृण्मयी समर्थ आहे का? खरं तर मधल्या ती तिच्या कुटुंबाचा backbone झाली होती. तिच्या एका चुकीच्या पावलामुळे अख्खं कुटुंब कोलमडून पडले असते. आणि त्या बरोबरच ती ही!!
हा emotional trauma मृण्मयी स्वत: आणि तिचं कुटुंबही सहन करु शकलो नसतं. सर्वस्वी एकमेकांचे असणं ही त्या कुटुंबाची ताकद होती. खरंच असं काही असेल का? असेल तर मी काही मदत करु शकते का तिची? कसं बोलू ? कसं विचारू तिला. मनात अनेक विचार थैमान घालू लागले. ते काही नाही, मला बोललेच पाहिजे मृण्मयीशी. माझे intuition मला सांगत होते.
दुसऱ्या दिवशी मी तडक तिच्या घरी गेले. तिने माझ्या नजरेशी नजर मिळवली नाही. मी तिला सरळच विचारले" तुला काही सांगायच आहे का मला? काही टेन्शन आहे का?"
ती काहीही स्पष्ट बोलेना. तिने मोघम उत्तर दिली. शेवटी मी न राहवून म्हटलंच" हे बघ मृण्मयी! बाकी सर्व गोष्टी ठीक आहेत पण सगळ्यात महत्वाचा असतं ते आपलं कुटुंब. त्याला आपण आधी सांभाळायला पाहिजे. अगं प्रॉब्लेम येतच राहतात आयुष्यात. पण त्यांनी खचून नाही जायचं. कधी कधी असं होतं की कोणीतरी आपल्या भावनांशी खेळ खेळून जातो. आपल्यालाही आपण फसवले गेलो आहोत याची जाणीव होते. पण ते सगळं transitional असतं अगं! अशा phases आयुष्यातून निघून जातात आणि त्या लवकरात लवकर निघून गेल्यास बरे असतात".
मृण्मयी काही बोलली नाही. खरे तर एवढे सगळे तिने शांतपणे कसं ऐकून घेतलं ह्याचंच मला आश्चर्य वाटलं. तसं काही नसतं तर तिच्या स्वभावानुसार तिने तडकून मला उत्तर द्यायला पाहिजे होतं, पण तिने तसं दिलं नाही. माझं निमुटपणे ऐकून घेतलं. म्हणजे माझं provisional diagnosis बरोबर आहे तर असा निष्कर्ष मी काढला. एवढंच म्हणून मी तिकडून निघून आले. त्यानंतर मात्र मी मृण्मयीशी संभाषण थांबवले, म्हटलं थोडं थांबू या.
काही दिवसांनी पुन्हा मृण्मयीचा फोन आला. तोच चिंतातूर आवाजात तिने मला हाक मारली आणि नंतर तीच शांत झाली. तिच्या आवाजातला गहिवर मला जाणवला. कदाचित ती रडत असावी. मी तिला सौम्य शब्दात म्हटले "मृण्मयी! काही बोलू नको. समजतंय मला कुठल्या परिस्थितीतून जाते आहेस तू ते. अगं मृगजळाच्या पाठी कधी जाऊ नये. मृगजळ कधीच हाती लागत नाही आणि आपली नुसतीच दमछाक होते. त्याच्यापाठी धावताधावता आपण इतके पुढे आलेले असतो की आपल्याला पुन्हा आपल्या मूळ ठिकाणीही जाता येत नाही. आपला तिथला hold ही आपण गमावून बसलेलो असतो आणि एक सांगू का आपल्या आयुष्यात family, करिअर या शिवाय दुसरं महत्त्वाचं असं काही नसतं. बाकी सर्व गोष्टी दुय्यम असतात. आपल्या वर जिवापाड प्रेम करणारी माणसं कायम जपायला हवी. It's never late. सावर!
तिने काहीही न बोलता फोन ठेवला. कदाचित तिला माझं म्हणणं पटलं असावं.
नंतर मी तिच्या फोनची अशीच वाट बघत राहिले.. कित्येक दिवस.
आणि एकदा पुन्हा मृंण्मयीचा फोन आला पण त्यादिवशी मृण्मयीचा आवाज मला पहिल्यासारखा जाणवला आणि ती तिच्या अगोदरच्या स्टाईलमध्ये मला हसत म्हणाली, "संध्या अगं बघ ना सकाळपासून पोट दुखतं आहे माझं. अभिजित मस्करी करतोय उगीच. सांग बाई काहीतरी औषध. घेते, त्या शिवाय तो थांबणार नाही."
तिचा असा हसता खेळता आवाज ऐकला आणि माझ्या मनावरचे दडपण कमी झालं...
म्हणतात ना सुबह का भूला अगर शाम को घर वापस आये तो उसे भूला नहीं कहते।