Sandhya Kadam

Others

4.8  

Sandhya Kadam

Others

बाबांची ठमाबाय

बाबांची ठमाबाय

3 mins
2.1K


"Riddh you made us feel proud", we love you from the Sun to Moon", "Yes you did it Riddhi". 

अभिनंदनाचा वर्षाव रिद्धीवर होत होता. ती सुद्धा तेवढ्याच प्रेमाने आणि अदबीने त्याचा स्वीकार करत होती. सर्वांना भेटून जेव्हा ती तिच्या लाडक्या आईकडे (आजीला ती आईच म्हणते आणि आजोबांना बाबा) आली तेव्हा आईला घट्ट मिठी मारून आईचे अश्रू पुसताना ती मोठ्या धीराने म्हणाली "आई रडू नकोस, बाबा आले होते माझा प्रोग्राम बघायला. मला ते दिसले, मी बघितलं त्यांना, ते तुझ्याजवळ बसले होते." आणि मग नंतर काही काळ दोघीही एकमेकांना शांत करत होत्या. 

केवढी मोठी झाली बाबांची ठमाबाय! असं म्हणताना माझ्या डोळ्यांच्या कडा आपोआप पाणावल्या. 


रिद्धी, माझी भाची, सर्वांचीच आवडती. तिच्या लाडक्या श्वेता काकीच्या शब्दात सांगायचे तर गुणी माझं रिद्धु बाळ. पण तिचा सगळ्यात जास्त जीव होता तो तिच्या लाडक्या बाबांवर (आजोबावर).


शनिवार-रविवार ती जेव्हा आमच्याकडे यायची तेव्हा बाबांबरोबर गप्पा मारत बसायची. त्यांच्या काय गप्पा चालायच्या ते देवालाच माहित. आमच्या बाबांवर कर्ण देव प्रसन्न असल्याने त्यांना सर्व गोष्टी लिहून द्याव्या लागत. मग बाबा बोलायचे आणि रिद्धी पाटी पेन्सिल घेऊन त्यांच्याशी संवाद साधायची.

आठ वर्षे मेहनतीने भारतनाट्यम शिकल्यानंतर जेव्हा रिद्धीने अरंगेत्रम करायचे ठरवले तेव्हा बाबा एकदम खूश झाले.

"अरंगेत्रम म्हणजे दीक्षा समारंभ. ठमाबाय एकदम मस्त परफाॅर्मन्स द्यायचा. छान डान्स करायचा हं! आणि आपण सर्वांना बोलवायचं तुझं आरंगेत्रम बघायला."

वयाच्या 87व्या वर्षीही त्यांच्यात कमालीचा उत्साह संचारला होता. कोणाकोणाला निमंत्रण द्यायचे याची लिस्ट दोघांनी बसून काढली. इथे बाबांनी फोनवरून आमंत्रणं द्यायला सुरुवात केली तर तिथे रिद्धीची रोज नेटाने रिहर्सल चालू होती. आॅडिटोरियमचे बुकींग, काॅस्चुम डिझायनिंग, इन्व्हिटेशन कार्ड सगळी जोरात तयारी सुरू होती.


अरंगेत्रमला 20 दिवसच राहिले होते आणि अचानकच बाबा गेले. त्यांच्या लाडक्या ठमाबायचा प्रोग्राम बघायचं बाकी ठेवून देवाघरी निघून गेले कायमचे.

"मी नाही करणार अरंगेत्रम. आत्ता मला ठमाबाय हाक कोण मारणार? मला नाही करायचा प्रोग्राम."

रिद्धी ओक्साबोक्सी रडून सर्वांना सांगत होती. तिला समजवताना सर्वांच्या नाकी नऊ येत होते. शेवटी जवळ घेऊन आम्ही तिची समजूत काढली

"रिद्धी आपण प्रोग्राम करायचा, कारण आपले बाबा पण येणार तुझा प्रोग्राम बघायला. ते जिथे असतील तिथून तुला आशिर्वाद द्यायला नक्की येणार."


आत्ता अरंगेत्रमला फक्त आठवडाच राहिला होता. रिद्धीने पुन्हा प्रॅक्टीस करायला सुरुवात केली. सगळे दिवस प्रॅक्टिस आंणि इतर तयारीतच गेले. सलग 3 तास भरतनाट्यम् नृत्य करणे किती अवघड आहे हे ग्रॅन्ड रिहर्सलच्या वेळी आदल्या दिवशी लक्षात आले. आपल्याबरोबर इतर दोन नर्तकींबरोबर समन्वय साधून बेअरिग न सोडता सलग नृत्य करणे खरंच कठीण. आज कोणाचा ताळमेळ जमत नव्हता. दोन्ही नृत्य प्रशिक्षक संभ्रमात पडले होते. आज ही परिस्थिती तर उद्या कसे होणार? पण ईच्छाशक्ती आणि थोरांचे आशिर्वाद पाठिशी असतील तर काही अशक्य नाही.


आणि शेवटी तो दिवस ऊजाडला. शो सुरू झाला तसं सुरुवातीपासूनच मी फिंगर्स क्राॅस्ड ठेवली होती. देवाला प्रार्थना करत होते की देवा सर्व व्यवस्थित पार पडू दे. आज 3 तास मुलींचा कस लागणार होता!


आणि रिद्धीची एन्ट्री स्टेजवर झाली! तिचा स्टेजवरचा सहज वावर, तिचा मुद्राभिनय, तिचे नृत्य सर्वांचे मन जिंकून गेली. ती नृत्याविष्कार करताना एवढी सुंदर व आकर्षक दिसत होती की तिचा परफाॅर्मन्स बघताना आम्ही सर्व मायेने आणि आनंदाने भारावून गेलो. तिघीही मुलींनी छान समन्वय साधून एकाहून एक सुंदर नृत्य सादर केली. सलग 3 तास आम्हाला अद्वितीय स्वर्गानुभव प्राप्त करून दिला, जशा अप्सराच जणू तिथे अवतरल्या होत्या. डोळ्यांचे पारणे फिटले. मुलींचे इतक्या वर्षांचे कष्ट, मेहनत, डेडिकेशन आणि आत्मविश्वास फळाला आला. बाबांना सांगितल्याप्रमाणे अतिशय सुंदर परफाॅरमन्स रिद्धीने दिला होता. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी ऊभे राहून प्रचंड टाळ्यांच्या कडकडात त्यांचे अभिनंदन केले, कौतुकाचा वर्षाव केला.


खरंच असं वाटत होतं की खरोखरच स्वर्गातून देव आणि बाबा हा कौतुक सोहळा बघायला आले होते. बाबा त्यांच्या लाडक्या ठमाबायला भरभरून आशिर्वाद देत होते. रिद्धी म्हणाली ते खरे होते, खरंच बाबा आले होते! मला ते दिसले!


Rate this content
Log in