काळ आला होता पण...
काळ आला होता पण...
अचानक मध्यरात्री मोबाईल वाजल्यामुळे मला जाग आली. बघते तर अननोन पण परदेशातला नंबर वाटत होता. कदाचित मुलाने दुसरा नंबर घेतला असेल म्हणून मी फोन घेतला ." हॅलो"
माझ्या हॅलो ला तिकडून गोड प्रतिसाद आला.
"हॅलो मॅडम, इतक्या उशिरा फोन केल्याबद्दल सॉरी. तुमच्या बरोबर मला एक खुशखबरी शेअर करायचे आहे म्हणून फोन केला. मी शशांक मिश्रा न्यूरोसर्जरीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे, कॅलिफोर्निया यूनिवर्सिटीमध्ये आजच ग्रॅज्युएशन झालं मला ए प्लस ग्रेड मिळाली आहे. शाळेमध्ये असताना
तुम्ही मला वाचवलं होतं, आठवतय! मीच तो शशांक मिश्रा."
"अभिनंदन शशांक, मला खूपच आनंद झाला, आणि किती वर्षांनी फोन करतोय." मी म्हटलं.
झर झर झर डोळ्यासमोरून वर्षे उलटून गेली, आणि शशांकचा दहावीतला एक्सीडेंट डोळ्यासमोर आला. शशांक मिश्रा चे वडील अतिशय अस्वस्थ पणे हातावर हात ठेवून माझ्या ऑफिसमध्ये बसले होते. माझा क्लास संपला आणि मी ऑफिसमध्ये आले. उंच गोरे रुबाबदार असे मिस्टर मिश्रा एकदम उठून उभे राहिले.
"का बरं ते मला भेटायला आले होते?" माझ्या मनात प्रश्न पडला.
माझ्या सेक्रेटरीला तर त्यांनी काहीच कारण सांगितलं नव्हतं, कदाचित त्यांना कोणाला सांगायचं नसेल. जुजबी हाय-हॅलो झाल्यानंतर मिस्टर मिश्राने एकदम विषयाला हात घातला. दहावीतल्या शशांक बद्दल त्यांना काही सांगायचं होतं. आमच्या शाळेच्या नियमानुसार दोघेही पालक उपस्थित राहणं भाग होतं पण फक्त वडीलच मला भेटायला आले होते.
" शशांक ला एफ डब्ल्यू आर आहे."
"??" माझी प्रश्नार्थक नजर बघून ते म्हणाले,
फिवर विदाऊट रिजन. आतापर्यंतच्या सगळ्या वैद्यकीय तपासण्या वरून काहीही सिद्ध झालेलं नाही की शशांक ला सतत 100 डिग्री पर्यंत ताप का येतो. यालाच मेडिकल भाषेत ॲफ डब्ल्यू आर म्हणतात.
"शशांकला वेगळे ठेवण्याची गरज नाही, तो वर्गामध्ये बसू शकेल, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्याला ताप का येतो. हा कुठलाही व्हायरल ताप नाही, की ज्याच्यामुळे बाकीच्या मुलांना पण ताप येईल. जेव्हा ताप जास्त असेल तेव्हा शशांक शाळेत येणार नाही. मी त्याला अमेरिकेतल्या प्रसिद्ध डॉक्टर कडे घेऊन जात आहे. डॉक्टर रॉबर्ट स्पेशालिस्ट आहेत, शशांक ला शाळेतून एका महिन्याची सुट्टी घ्यावी लागणार आहे. आम्ही त्याचा सर्व अभ्यास करून घेऊ. तुमच्या परवानगी साठी म्हणून मी स्वतः तुम्हाला भेटण्यास आलो आहे." मिस्टर मिश्रा म्हणाले.
शशांक ची केस फार गंभीर होती. त्याच्या तापाचं कुठलंही निदान होत नव्हतं, तापामुळे त्याला कुठल्याही फिजिकल ॲक्टिविटी मध्ये भाग घेता येत नव्हता. अतिशय हुशार असणारा शशांक हळूहळू मलुल होत चालला होता.
त्याच्या सुट्टीची परवानगी देण्यापासून माझ्या पुढे पण काहीही पर्याय नव्हता.
डिसेंबर महिन्यामध्ये शशांक परत आला, आठवड्यातले दोन दिवस शाळा आणि बाकीच्या दिवस घरी असा त्याचा दिनक्रम चालू झाला. शाळेत असताना तो अतिशय खुश असे. डॉक्टरांनी त्याला भरपूर औषध दिली होती, कधीकधी त्याचा घोळणा फुटे .
पण त्याच्यावर पण फक्त बर्फ ठेवणे हा एकच उपाय होता. अंगातल्या गरमीमुळे त्याचे काळेभोर केस पांढरे होऊ लागले होते.
दहावीचा क्लास, जानेवारी मध्ये प्रिलीम च्या परीक्षेची मुले तयारी करत होती. प्रिलीम साठी मुलांचं फर्निचर हॉलमध्ये नेण्यात येत होतं. नेहमीप्रमाणे लंच ब्रेक मध्ये गोंधळ आरडाओरड चालू होती, तेवढ्यात माझा फोन खणखणला.
" शशांकला हेल्थ केअर सेंटर मध्ये आणला आहे तुम्ही ताबडतोब या." टीचर चा फोन होता.
हातात मोबाईल आणि पर्स पकडून मी हेल्थ केअर सेंटर कडे धावले. जाताना लिफ्टची वाट न बघता चार मजले खाली उतरून अतिशय वेगाने मी नर्सिंग स्टेशन कडे धावले. जाता जाता त्याच्या वडिलांना इमर्जन्सी फोन करून शाळेमध्ये बोलवून घेतले.
शशांक चा हात, शर्ट रक्ताने माखला होता. नर्स रक्त पुसत असताना त्याच्या दंडावर ती झालेली एल आकाराची जखम माझ्या दृष्टीस पडली.
आधी टीचरला सांगून त्याच्या अंगातला शर्ट आम्ही कापून काढला. नर्सला कुठलंही मलम लावायला मनाई करत प्रेशर बँडेज बांधायला सांगितलं. हात वर ठेवत, त्याच्याशी कायम बोलत राहिलो. आमच्या पी टी टीचर ने शशांकला एक नवीन टी-शर्ट चढवून दिला. कॅन्टीन मधून लिंबू पाणी मागवून घेतले.
बर्फाचं प्रेशर बँडेज लावल्यामुळे हळूहळू रक्त थांबले. तेवढ्यात शशांक चे आई वडील दाखल झाले. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून आधी त्यांनाच आम्ही घालून ग्लुकोज घालून लिंबू पाणी दिल आणि ऍम्ब्युलन्समध्ये बसून त्यांची रवानगी हॉस्पिटलकडे केली.
शशांकच्या मित्रांचे रडून-रडून डोळे सुजले होते.
काय झाले होते तर?
मधल्या सुट्टी मध्ये पळापळी करताना शशांक पण धावत होता, हॉलचा नुकताच स्वच्छ पुसलेला काचेचा दरवाजा त्याला दिसलाच नाही. मित्राला पकडताना धाडकन दरवाजा वर आदळला, तो इतक्या वेगात आदळला होता की दरवाजाची काच फुटली आणि त्याच्या दंडIत घुसली. हॉलच्या ड्युटीवरील टीचर आणि बारावीच्या काही मुलांनी मिळून शशांक ला खांद्यावर घेत हेल्थ केअर सेंटर कडे नेले. आणताना त्याच्या हातातली रक्ताची धार सगळ्या कॉरिडॉरमध्ये पडली होती. ती बघून बऱ्याच मुली पण हंबरडा फोडून रडायला लागल्या. शशांक च्या दंडात जेव्हा काच घुसली तेव्हा अक्षरशहा रक्ताचा फवारा उडाला.
बारावीच्या मुलांनी समयसूचकता दाखवत शशांकला बोलतो ठेवलं, नीरज चा शर्ट रक्ताने पूर्ण माखला होता. एवढे रक्त वाहिल्यानंतर कदाचित शशांकला ऑक्सिजनची गरज पडणार होती. त्यामुळे तो बेशुद्धावस्थेत जाऊन चालणार नव्हतं. आश्चर्य म्हणजे शशांक ला जखमेची वेदना समजतच नव्हती. आम्ही कोणीही त्याला त्याचा हात दाखवलाच नाही. बँडेज लावलेला हात त्याच्या डोक्यावर ती धरून ठेवला. नीरज ला पण कपडे बदलूनच त्याच्यासमोर घेऊ दिले. तिसऱ्या मजल्यावरून तळमजला पर्यंत घेताना प्रत्येक ठिकाणी रक्ताचे भयंकर डाग पडलेले होते. ते पाहून लहान मुले पण रडायला लागली. पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम वरून आधी सगळ्या मुलांना त्यांच्या क्लास रूम मध्ये जाण्याची सूचना करण्यात आली. कोणीही बाहेर पडू नये असं दटावून सांगण्यात आलं. शशांक असे मित्र हेल्थ केअर सेंटर च्या बाहेर रडवेल्या चेहऱ्याने उभे होते.
दहा मिनिटांपूर्वी हसत-खेळत पाठलाग करणाऱ्या शशांक आता रक्ताने माखला होता.
त्याचा परममित्र अजय त्याच्याजवळ हवा होता, म्हणून त्याला फक्त आम्ही हेल्थ केअर सेंटर मध्ये येण्याची परमिशन दिली. शशांक च्या पाठीवरुन हात फिरवत" कुछ नही होगा ब्रो, कुछ नही मामुली तो जखम है!" असं म्हणत अजय शशांकचा दुसरा हात धरून आपले रडू आवरत उभा होता. प्रेशर बँडेज मुळे रक्त वाहणे थांबले होते, आणि डॉक्टर पर्यंत पोहोचण्या साठीचा वेळ त्याला मिळाला होता. ताबडतोब स्कॅनिंग करून कुठे काच घुसली आहे का ते बघितल्यावर ती डॉक्टर नी जखम शिवली. या सगळ्या धावपळीमुळे शशांकला परत सणकून ताप चढला.
असेच चार-पाच दिवस चिंता मग्न गेले. शशांक च्या आई-वडिलांकडून त्याच्या प्रगतीची बातमी येत होती. मुलांना पण आता धीर आला होता. हळूहळू शाळा मूळ पदावर येत होती. दहा दिवसानंतर शशांकची आई माझ्या ऑफिस बाहेर उभी राहून माझी वाट बघत होती. तिच्या चेहऱ्यावरून काहीच अंदाज बांधता येत नव्हता. मी घाईघाईने तिला आत मध्ये बोलले," कसा आहे आता शशांक?" माझ्या प्रश्नातली अधीरता तिला समजत होती.
ती सावकाश उठली आणि एकदम माझ्या पाया पडली. पाय धरून हमसून हमसून रडू लागली. तिला उठवून माझ्याजवळ तिला घेतले, बाहेरच्या टीचर्स आश्चर्याने आमच्या दोघींकडे बघत होत्या. तिचा आवेग ओसरल्यानंतर तिला मी पाणी दिले आणि बसण्यास सांगितले.
"मृत्यू योग होता, bleed to death, हा योग शशांक च्या नशिबात त्यादिवशी होता. जर त्याचा रस्त्यावरती किंवा अजून कुठे एक्सीडेंट झाला असता तर तो वाचला नसता. केवळ तो शाळेत होता आणि तुम्ही सर्वजण त्याची काळजी करणारे होता म्हणूनच आणि म्हणूनच शशांक वाचला. " शशांक ची आई हात जोडून म्हणत होती. शशांक वेगाने धावताना दरवाजावरती त्याचे हात आपटले गेले, त्यामुळे दरवाजाच्या काचेचा तुकडा उडून पुढे पडला तर खालच्या काचेचा तुकडा खसकन त्याच्या दंडाच्या खालच्या बाजूला घुसला. हे सगळे एका क्षणार्धात झाले होते, एवढी एक एमएम जाडीची काच तुटल्यामुळे तुटक्या काचेचा तुकडा देखील धारदार होता. काय झाले ते शशांकला कळलेच नव्हते, जेव्हा त्याच्या मित्रांनी धाडकन झालेला आवाज ऐकला, आणि दरवाजावरती वाहणारा रक्ताचा ओघळ बघितला तेव्हा त्यांनी चटकन ड्युटी वरच्या टीचरला बोलवले आणि शशांकला तिथून काढले.
एवढ्या मुलांना सांभाळताना जवळजवळ सात आठ तास शाळेमध्ये त्यांच्यासाठी उपक्रम राबवताना एक नेहमी माझ्या लक्षात आलं होतं, कुठल्याही परिस्थितीमध्ये डगमगून न जाता शांत राहायचं. आपण शांत राहिलो की हाताखालचे लोक देखील व्यवस्थित शांत राहून काम करतात. पहिली गोष्ट पालकांना सूचना करायची, आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना सूचना करून तयारी ठेवायची.
शशांक चा रक्ताने भिजलेला शर्ट बदलणे, त्यानंतर सगळ्या मुलांना मानसिक धीर देणे त्यांना समजावून सांगणे हे आमचे कर्तव्यच होते. नीरज आणि शशांक ला ताबडतोब नवीन पीटीचा टी-शर्ट देऊन आधी नजरेसमोरून रक्त हटवणे गरजेचे होते. शशांकला जाग ठेवत त्याच्याशी हसून बोलत प्रसंगाचे गांभीर्य त्याच्या मनावर परिणाम तर नाही ना करणार, त्याच्यासाठी आम्हाला शांत राहणे भाग होते. नर्स पण नवीन होती, शाळेतल्या मुलांना जास्तीत जास्त काय व्हायचं तर पडल्यामुळे गुडघे फुटायचे किंवा ताप यायचा, पण हा असला विचित्र अक्सिडेंट तिने पहिल्यांदाच बघितला होता.
शाळेच्या सर्विस स्टाफ ने भराभर कॉरिडॉरमध्ये सांडलेले रक्त साफ केले, सुगंधित फिनाईल मारून त्यांनी फरशी चकचकीत केली.
मी स्वतः स्टाफरूममध्ये जाऊन प्रसंगाचे गांभीर्य सर्व शिक्षकांना समजावून सांगितले आणि त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना कसे सांभाळायचे याच्या पण सूचना केल्या. उगीच तिखट-मीठ लावत चर्चा करण्याची आमच्याइथे पूर्ण मनाई होती. शशांकला कोणीही ढकलले नव्हते, त्यामुळे तो एक अपघातच होता. ज्युनियर कॉलेजला बायलॉजी शिकवल्यामुळे प्रसंगाचं गांभीर्य मला कळत होतं. आरडाओरड ताणतणाव त्याच्यामुळे अजून रक्तस्त्राव होण्याची शक्यता होती, शशांक चा परममित्र अजय ने प्रसंगावधान राखून नीरज सारखेच प्रसंग सुसह्य होण्यास आम्हाला मदत केली.
जखम खूप खोल होती, शशांकच्या दंडाची आर्टरी कापली गेली होती, त्याच्यानंतर एकच उपाय होता, एक तर त्याचा हात कापणे किंवा मृत्यू, पण शशांकचे नशीब थोर, सगळ्यांच्या सदिच्छा, शशांक वरची माया आणि वेळेस केलेले उपचार यामुळे
काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
